लीड क्लाईम्बर -
वासुदेव दळवी (वासू - 'वासूगिरी' अजिबात जमत नाही)
मार्गदर्शक - प्रदीप म्हात्रे (पद्या - नसलेला काना (I) टाकून नाव वाचू नये)
हुजरे:
संजय गवळी -
(गवळ्या - याच्याकडे एकही गाय नाही)
दर्शन एडेकर -
(दर्शन - हा कल्याण ला राहतो ठाण्यात नाही. कृपया गैरसमज नको)
नितीश गिरकर -
(नवीन आहे आणि 'माझोच गाववालो आसा'. लवकरच नामकरण होईल)
रोमी मिस्त्री -
(पारश्याचे मराठीकरण 'रामू')
सतीश कुडतरकर - (सत्या - आडनाव वाचून हसू नये. दात पडण्याचा संभव)
ट्रेकचे नियोजन करण्यासाठी चहाच्या टपरीशिवाय दुसरी उत्तम जागा नाही. एकमेकांची थट्टा-मस्करी करत चहाचे गरम घुटके घ्यायचे आणि दुसऱ्या कुणीतरी सुचवलेली ठिकाण रद्दबातल करत रहायचं. आज मला वेळ आहे, उद्या तुला वेळ नाही अस करत करत एखाद्या तारखेवरती शिक्कामोर्तब करायचं.
असेच आम्ही सगळे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात डोंबिवली पश्चिमेला गोपी टोकीजच्या चौकात चहाच्या टपरी वर गोळा झालो होतो. मी सगळ्यांना सिद्धगड-भीमाशंकर चा प्लान सांगितला होता आणि त्यावरच विचार करायचं ठरलं होत. खरतर तर हा ट्रेक मी खास रोमीसाठी प्लान केला होता. कारण गेल्या २० वर्षापासून तो भीमाशंकरचा वारकरी होता आणि या वर्षी आपल्या नेहमीच्या मंडळीबरोबर न जाता आमच्यासाठी थांबला होता. पण इतर सभासद मात्र भीमाशंकरला खूप वेळेस जाऊन आलेले असल्यामुळे परत जाण्यास उत्सुक नव्हते.
शेवटी रोमीनेच माघार घेतली आणि दुसऱ्या ठिकाणी जाण्यास तयार झाला. इतक्यात प्रदीपसुद्धा आमच्या विचार-विनिमयामध्ये येऊन सामील झाला. ट्रेक करायचाच होता पण जास्त दगदग नसलेला आणि जवळपास असलेल्या एखाद्या किल्ल्यावर, कारण त्याच्या पुढच्याच आठवड्यात आम्हाला आमच्या क्लबच्या (गिरीविराज हायकर्स) प्रस्तारोहण कार्यक्रमासाठी जायचे होते. त्यामुळे क्लबच्या नवीन सभासदांना प्रस्तरारोहणाची ओळख आणि जुन्या सभासदांना त्याचा सराव होईल असा दुहेरी कार्यक्रम आखला.
पेठ, पेब, पदरगड, चंदेरी असे करत करत शेवटी गोरखगडावर शिक्कामोर्तब केल. प्रदीपने असे सुचवले कि गोरखला जातोच आहोत तर किरण काकांच्या परवानगीने गिरीविराजच्या बेनरखाली मच्छिंद्रसुद्धा करू. या आधीही गिरीविराजच्या मंडळीनी २ वेळेस पावसाळ्यातच मच्छिंद्र सर केला होता.
लौकीकार्थाने गोरख आणि मच्छिंद्र हे गड नसून सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटलेले सुळके आहेत. त्यातील गोरखगडावर एक सातवाहन कालीन गुहा, काही पडझड झालेल्या वास्तू आहेत. हा गड मुख्यतः आहुपे घाटावर नजर ठेवण्यासाठी वापरत असावा. याच्या माथ्यावर अलीकडेच बांधलेले देऊळसुद्धा आहे. गोरखगडावर वर्षभर लोकांचा राबता असतो, पडझड झालेल्या शंकराच्या देऊळात रोज दिवाबत्ती केली जाते. गोरखगड, लहानथोर सर्वाना आपल्या अंगाखांद्यावर खेळवत राहतो आणि समोरच हाकेच्या अंतरावर असलेला बिचारा मच्छिंद्रगड लोकांच्या भेटीसाठी पारखा झालेला आहे. आम्ही त्याच एकटेपण थोड्यावेळाकरिता का होईना कमी करण्याचा प्रयत्न करणार होतो.
दिनांक २१/०९/२०१३ ला दुपारी १ वाजता संजय, रोमी आणि प्रदीप डोंबिवलीहून २ बाईकवर निघाले. मी, वासुदेव आणि नितीश त्यांना कल्याणला गुरुदेव हॉटेल जवळ भेटणार होतो. मला सांगितलेली काम विसरून गेलो होतो. कल्याणला पोहोचल्यावर अचानक आठवण झाली आणि जीभ चावली. च्यायला जेवाणासाठीची भांडी मी घेतलीच नव्हती. मी माझे घालायचे कपडे तेवढे घेतले होते. आता परत ठाकुर्लीला जाणे भाग होते. मनात विचार आला, संजय आणि प्रदीप माझी चांगलीच काशी करणार आणि त्यांना पण आयताच बकरा मिळणार होता संपूर्ण ट्रेक मध्ये टर उडविण्यासाठी. लगेच डोक चालवलं आणि वासुदेवला फोन केला, नशिबाने तो घरातून निघाला नव्हता. मग त्यालाच जेवणासाठीचा टोप, मीठ मसाला या वस्तू आणायला सांगितल्या आणि मी सुद्धा काही घडलच नाही अशा अविर्भावात डोम्बिवलीकरांची वाट पाहत उभा राहिलो. साधारण दुपारी १.३० वाजता वासुदेव मी सांगितलेल्या वस्तू घेवून मला आणि नितीशला येवून मिळाला. माझी छाती आणखी २ इंच बाहेर आली, स्वतःशीच म्हणालो चला सुटलो संजय आणि प्रदीपच्या तावडीतून.
१.४५ संजय, प्रदीप आणि रोमी आम्हाला येवून मिळाले. संजयने सांगितलं कि हो-नाही करत दर्शन त्याचा MBA चा पेपर देवून संध्याकाळी कल्याणहून निघून आपल्याला रात्री गोरखगडावर भेटणार होता. चला म्हणजे एक जण आणखी वाढणार होता. सगळे गोळा झाल्यावर, बरोबर २.०० वाजता कल्याण सोडले. खड्ड्यातून रस्ता शोधत शोधत आणि कल्याणकर वासू आणि दर्शनची टर उडवत उडवत मुरबाड रस्त्याला लागलो. कल्याण-डोंबिवली महापालिकाहद्दीच्या बाहेर आल्यावर मात्र रस्ता एकदम चांगला होता. त्यामुळे पुढे कुठेहि न थांबता दुपारी ४.०० वाजता मुरबाडच्या पुढे म्हसा गावाच्या बाजारपेठेत पोहोचलो. म्हसा येथील खांब लिंगेश्वराची वार्षिक जत्रा खूप प्रसिद्ध आहे. इथूनच एक रस्ता सिद्धगड किल्ल्याच्या पायाथ्याशी असलेल्या नारिवली गावात जातो आणि पुढे याच रस्त्यावर गोरख गडाच्या पायथ्याचे देहरी गाव वसलेले आहे. पुढे हाच रस्ता आहुपे घाटाच्या पायथ्याशी असलेल्या खोपिवली पर्यंत जातो. म्हसा ते देहरी हे अंतर जवळपास १८-२० किलोमीटर आहे.
तेव्हढ्यात नितीशने तो शाकाहारी असल्याच सांगितलं, मनात म्हटलं नशीब लवकर सांगितलस. कारण आमचा मांसाहार करण्याचा बेत होता आणि तशीच तयारीसुद्धा आम्ही केली होती. मग त्याच्यासाठी तुरडाळ विकत घेतली आणि मांसाहार प्रस्तारारोहकासाठी किती चांगला आहे याविषयी त्याला थोडा उपदेशही केला आणि म्हसाच्या बाजारपेठेत चहापाणी करून वाटेला लागलो. बरोबर ४.३० ला गोरख गडाच्या पायथ्याशी असलेल्या देहरी गावातील विठ्ठलाच्या देवळापाशी उतरलो. सर्व मोटरसायकल देहरी गावातीलच एका दुकानात लावल्या आणि देवळापासून आमच्या ट्रेकला सुरुवात झाली.
नशिबाने पाऊसही नव्हता आणि पावसात भिजण्याची आमची अजिबात इच्छा नव्हती. वाट तशी सोपीच आहे आणि कुठेही चुकण्याची भीती नाही. सुरुवातीलाच देवळाच्या मागच्या अंगाने वाट एक छोट्या टेकडी वर वळण घेत चढत जाते. सगळीकडे दाट रान वाढल्यामुळे झाडी बाजूला करत, काट्यांना अंगावर घेत मार्गक्रमणा चालली होती. शहरात आपण अंगावर गोंदवून घेण्यासाठी पैसे देतो पण इथे रानात आपल्याला फुकट 'काटेगोंदण' होत. सगळ्यात पुढे प्रदीप, वासू, नितीश होते आणि मी, संजय, रोमी सगळ्यात मागे होतो. आज रोमीचा कायापालट झाला होता, त्याने आपणहून सगळ्यात जड पाठ्पिशवी घेतली होती. मी नेहमी सगळ्यात मागे राहण्याचा प्रयत्न करतो, जेणे करून आपण किती थकलो आहोत हे कुणाला कळत नाही आणि कुणी विचारलच, अरे मागे करतोयस, तर सांगायचं
'backlead' करतोय म्हणून. झाकली मुठ सव्वा लाखाची. पण संजयला माझी हि युक्ती आता चांगलीच माहिती झाल्यामुळे आज त्याने
'backlead' घेतली होती आणि माझ्याकडे बघून हसत होता, आणि मी त्याला शिव्या घालत होतो. शेवटी चरफडत वाटेला लागलो.
१५ मिनिटांमध्ये टेकडीचा माथा गाठल्यावर मी, प्रदीप, रोमी आणि संजय ने एक विश्रांती थांबा घेतला. तो पर्यंत वासू, नितीश पुढे निघून गेले होते. इथे गार वारा अंगावर घेत तिथेच बसून राहिलो आणि कधी १५ मिनिट झाली ते सुद्धा कळल नाही. भानावर येऊन पुढच्या वाटेला लागलो कारण अंधार पडायच्या आधी गोरख माथा गाठायचा होता. पावसामुळे कारवीचे रान माजले होते आणि वाट आता सपाट माळावरून जात होती. २०-२५ मिनिटांमध्ये गोरखच्या मुख्य धारेला लागलो. जवळपास ५.३० वाजत आले होते म्हणून दर्शनला फोन करून तो कल्याणहून निघाल्याची खात्री करून घेतली.
सर्व सोपस्कार पार पडल्यावर आमची राजेशाही मिरवणूक पुढे निघाली. आता पुढची वाटचाल अंगावर येणारी होती, पण जास्त चढ नसल्यामुळे आणि या आधीही गोरखला येवून गेल्यामुळे मी मात्र निश्चिंत होतो. १५-२० मिनिटांमध्ये तो चढ सगळ्यांनी पार केला आणि आता आम्ही गोरखच्या मुख्य धारेवर आलो. वासू आणि नितीश धावत पळत पुढे पुढे चालले होते, त्यांच्या मागे मी रमत गमत चाललो होतो. रान खूप वाढल्यामुळे आम्ही एकमेकाला दिसू शकत नव्हतो. माझ्या मागे संजय, प्रदीप आणि रोमी माझ्याहीपेक्षा हळू हळू फोटो काढत चालत होते. आता गोरखमाथा जवळपास फक्त २०-२५ मिनिटे लांब होता. जवळपास ६ वाजत आले होते. वासू आणि नितीश ने आमच्याआधी गोरख माथा गाठून आमची वाट पाहत बसले होते. इथून आता गोरखच्या पायऱ्या सुरु होतात, एक एक पायरी जवळपास दीड फुटाची आहे आणि या पायऱ्या तुमचा चांगलाच दम काढतात. शेवटी हाश-हुश्श करत संध्याकाळी ६.४५ वाजता अंधार पडता पडता गोरख माथ्यावरच्या गुहेमध्ये पोहोचलो. समोरच मच्छिंद्रचा सुळका संधीप्रकाशात सुंदर दिसत होता. गोराखवरची गुहा चांगलीच ऐसपैस आहे पण पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी गळत असल्यामुळे झोपण्यासाठीची जागा कमी होते. आम्ही फक्त ७ जण असल्यामुळे आम्हाला जागेची कमतरता नव्हती.
गुहेत पोहोचल्यावर लगेच चहाचा कार्यक्रम आटोपून घेतला. पेट्रोमाक्सचा सिलीन्डरबरोबर असल्यामुळे लाकड शोधत बसण्याची गरज नव्हती. संजय आणि रोमी खूपच आग्रह करू लागल्यामुळे आमच्यासाठी मांसाहार आणि नितीशसाठी शाकाहारी डाळ करण्याची जबाबदारी त्यांच्यावर ढकलून दिली. इतर गुहेची साफसफाई आणि पाणी वगेरे आणण्याच्या तयारीला लागले.
एव्हढया वेळेत दर्शन रात्री ९.१५ वाजता गोरख गडाच्या पायथ्याशी पोहोचला. गावकऱ्यानी त्याला एव्हढ्या रात्री एकट्याने गडावर न जाण्याची सूचना केली, पण जंगलाचा थोडाफार अनुभव गाठीशी असल्याकारणाने तो वर येण्यास निघाला. आम्ही त्याची वाट पाहतच होतो. त्याच्याशी मोबाईल वर संपर्क केल्यावर कळले कि तो पठार ओलांडून जवळपास गोरख गडाच्या मुख्य धारेवर पोचला होता. मी आणि प्रदीप त्याला आणण्यासाठी खाली उतरलो, पायऱ्या उतरल्याबरोबर मधल्या शंकराच्या पडक्या देवळापाशी दर्शन भेटला. पठठ्याने फक्त १ तासातच गड सर केला होता, त्याला घेऊन वर गुहेमध्ये रात्री १०.३० वाजता पोचलो. रात्री ११.३० ला जेवण करून उद्याच्या मच्छिद्र चढाईची रूपरेषा ठरवून सगळे झोपी गेलो.
रात्री २.३० ला आमच्यातलच एक संजय नामक भूत गडावर फेरफटका मारून कोणी जातभाई भेटतोय का ते पाहत होत. खरतर रात्रीच्या काळोखात पांढऱ्या सावल्यांपेक्षा, वळवळणारी भूतच (साप) सापडतात. पण बिचारयाच्या नशिबात कोणीच नव्हते, मग गुपचूप येऊन झोपला आणि आपल्या 'घोराना' घराण्याच्या सुरेल गायकीने गुहा दणाणून सोडायला लागला. गिरीविराज मध्ये अशी रात्री अपरात्री भटकणारी भुतावळ खूप आहे.
सकाळी सगळा आराम का मामला असल्याकारणाने कोणीही घाई करत नव्हता. साधारण सकाळी ९.३० वाजता सगळेजण गोरखगडाच्या सर्वोच्च माथ्यावर जाण्यास निघालो. या माथ्यावर जाण्यासाठी गुहेपासून साधारण २०० फुट अंतरावर पायऱ्या खोदलेल्या आहेत. या पायऱ्या जवळपास ९५-१०० अंशाच्या कोनात खोदलेल्या असल्यामुळे तुम्हाला सतत खोल दरी दिसत राहते. एक समाधानाची बाब म्हणजे या पायऱ्यामध्ये पकडण्यासाठी खोबण्या खोदलेल्या आहेत, त्यामुळे चढ उतार करण्यास सोपे पडते.
हा माथा खूपच लहान आहे आणि याचा अर्धा अधिक भाग अलीकडेच बांधलेल्या देवळाने व्यापलेला आहे.
वरून खूपच दूरवरचा परिसर दिसतो. समोरच अहुपे घाटाचा डोंगर, समोरच्या मच्छिंद्र सुळक्याच्या पायथ्याशी असलेले खोपिवली गाव, जिथून अहुपे घाट रस्ता सुरु होतो. त्याच्या पलीकडे वातावरण स्वच्छ असल्यास दूरवर खुटेधरा घाट, पुढे ढाकोबा, जीवधन, नाणेघाट आणि माळशेजचा परिसर दिसतो. याच्या मुरबाड कडील दिशेस सिद्धगड सह्याद्रीच्या मुख्य रांगेस स्पर्धा करीत उभा आहे.
आजूबाजूचा संपूर्ण परिसर डोळ्यांमध्ये साठवून घेतला आणि खाली परत गुहेकडे परतलो. थोडा उशीरच झाला होता. आता पुढच लक्ष मच्छिंद्र सुळका होता. मच्छिंद्र सुळक्यावर चढाई करतानाचे फोटो काढण्यासाठी कोणीतरी गोरखगडवर राहणे क्रमप्राप्त होत. आता प्रश्न आला कुर्बानी देगा कौन! मग मीच समजुतदारपणाने माघार घेतली आणि फोटो काढण्यासाठी गोरखवरच थांबण्याचा निर्णय घेतला. दर्शनला सुद्धा मला एकट्याला इथे सोडून जाणे बर वाटले नाही म्हणून तोही माझ्या बरोबर थांबला.
प्रदीप, वासुदेव, संजय, रोमी आणि नितीश जाण्यासाठी निघाले. गोरखच्या पायऱ्या संपल्यावर जिथे शंकराचं पडक देऊळ आहे तिथूनच गोरख गडाकडे तोंड करून उभे राहिल्यावर उजवीकडे एक वाट खाली उतरते. तीच वाट तुम्हाला मच्छिंद्रकडे नेते. मच्छिंद्र सुळक्यावर जाण्यासाठी मळलेली पायवाट नाही. नेहमीचे ट्रेकर्स इथे जात नाहीत. पावसाळा सरत आल्यामुळे इथे गच्च रान तयार झाले आहे. त्यामुळे आता वाट शोधत शोधत पुढे जावे लागणार होते. प्रदीप ७-८ वर्षांपूर्वी इथे येऊन गेल्यामुळे त्याला थोडीफार माहिती होती, त्यामुळे तोच पुढे वाट काढत जात होता. गोरखच्या पायऱ्यापासून सुरु झालेली हि वाट गोरखगडाला लागुनच समांतर दिशेत जाते आणि पुढे मच्छिंद्र सुळका आणि गोरख यांच्या मधल्या धारेवर पोचते. या मधल्या धारेवर जवळपास पुरुषभर उंचीचे गवत वाढते. खाली दिलेल्या प्रचीमध्ये त्याची झलक आहे.
बरोबर एका तासाने ११.३० वाजता हि मंडळी मच्छिंद्र सुळक्याच्या पायथ्याशी पोचली. आता पुढची सूत्रे प्रदीप ने आपल्या हातात घेतली. प्रदीप, आमचे गुरुजी किरण अडफडकर यांच्या तालमीत तयार झालेला असल्यामुळे त्याच्याकडे प्रस्तरारोहणचा दांडगा अनुभव आहे. तो २००५ मधील गिरीविराज हायकर्सच्या कोकणकडा यशस्वी मोहिमेमध्ये सुद्धा सामील होता. पण यावेळेस त्याने वासुदेवला नेतृत्व करण्याची संधी दिली. वासुदेवने या आधी कधीही lead
climbing केली नव्हती. त्यामुळे त्याचे हातसुद्धा आता शिवशिवायला लागले होते. गोरखच्या दिशेने मच्छिंद्रची चढाई तीन टप्प्यात करता येते.
सर्व तयारी करून वासुदेव ने दुपारी १२.०० वाजता चढाईस सुरुवात केली. मुक्त चढाई करत दोराशिवायच वासुदेव पहिल्या टप्प्यावर १२.१५ वाजता पोचला.
पाठोपाठ प्रदीप, नितीश आणि रोमी पोचला. परंतु संजय एके ठिकाणी अडकून पडला, काही केल्या त्याला वरची मुव्ह करता येत नव्हती. शेवटी प्रदीप ने पहिल्या टप्प्यावर असलेल्या एका खडकाला दोर बांधून संजय कडे फेकला आणि नंतर संजय कॅम्मान्डो पद्धतीने दोर पकडून पहिल्या टप्प्यावर पोहोचला. पुढच्या चढाईची चाचपणी करून वासुदेव निघाला. इथे सुद्धा वासुदेवने दोराशिवायाच मुक्त चढाई करत दुसरा टप्पा गाठला. त्याच्या पाठोपाठ प्रदीपने सुद्धा मुक्त चढाई करत दुसरा टप्पा गाठला. बाकीची मंडळी प्रथमच सुळके गिरी करत असल्यामुळे त्यांच्यासाठी प्रदीपने एक पेग (एक लांब सळई जिच्या एका टोकाला अनुकुचीदार टोक असते आणि एक टोक गोलाकार केलेले असते) जमिनीमध्ये ठोकला आणि त्याला दोर बांधून खाली पहिल्या टप्प्यावर उभ्या असणाऱ्या संजय, रोमी आणि नितीशकडे फेकला. मग तिघेही कॅम्मान्डो पद्धतीने दोर पकडून दुसऱ्या टप्प्यावर पोहोचले.
जवळपास २०० फुट चढाई झाली होती आणि ८०-१०० फुट चढाई अद्याप शिल्लक होती.
आता संजय, रोमी आणि नितीशला इथेच थांबविण्यात आले. कारण वेळ कमी होता आणि सगळी आवराआवर करण्यात परत वेळ गेला असता. पुढे दुसरा टप्पा आणि वरचा ८०-१०० फुटांचा उरलेला सुळका यांच्यामध्ये एक 'V' आकाराची ६०-७० फुट खोल घळ आहे. त्यामुळे पुढची चढाई या घळीत उतरून सुरु होते. वासुदेवने जवळपास २०० फुट चढाई दोराशिवायच केली होती पण आता उंची वाढल्यामुळे पुढची चढाई दोर बांधून करण्याच ठरवण्यात आलं. आता वासुदेव ने कंबरेला हार्नेस बांधून त्याला दोर बांधला आणि कड्याला भिडला.
कड्यावर सगळीकडे गवत उगवल्यामुळे सगळीकडे घसरगुंडी तयार झाली होती. त्यामुळे सावधानपूर्वक चढाई करत वासुदेव माथ्यापासून २० फुट खाली असलेल्या लेज वर पोहोचला. आता फक्त २० फुट चढाई शिल्लक होती. पाठोपाठ प्रदीपने आपल प्रस्तारारोहणातील
कसब दाखवत दोराशिवायच चढाई करत वासुदेव पर्यंत पोचला.
प्रदीप आपले कसब दाखवताना: जमिनीपासून ५०० फुटांवर:
आता इथेच प्रदीपने कड्यामध्ये उगवलेल्या एका छोट्य़ा पण मजबूत खोड असलेल्या झुडुपाला दोर बांधला आणि सुरक्षेसाठी वासुदेवचा बिले घेतला. लगेच वासुदेव ने २ मिनिटा मध्येच ती शेवटची खाचेतून जाणारी २० फुटी चढाई करून १.४० वाजता माथ्यावर पाय ठेवला. पाठोपाठ प्रदीपने सुळक्याचा माथा गाठला.
मी आणि दर्शनने गोरखवरून आणि बाकीच्या मंडळीनी मच्छिंद्रवरून हर हर महादेवचा जयघोष करून दरी निनादून सोडली. आता परत खाली उतरण्याची घाई करायची होती. सर्व प्रथम वासुदेव खाली येण्यास निघाला. उतरतेवेळी वासुदेव ने थोडीशी वेगळी वाट धरली. त्याने एका खडकाला हात घातला आणि नेमका तो खडक (माणसाच्या आकाराचा) मुळातून उखडला गेला. वासुदेव ने प्रसंगावधान राखून तो खडक तसाच जागेवर दाबून धरला कारण रोमी नेमका त्या खडकाच्या दिशेत खाली उभा होता. बाका प्रसंग बघून प्रदीपने रोमि ज्या खडकावर उभा होता त्या खडकावरून उतरून थोडेसे उजव्या बाजूला व्हायला सांगितले. रोमी ने आपली नवीन जागा घेतली. रोमी वाटेतून बाजूला झाल्या बरोबर वासुदेव ने तो खडक सोडून दिला आणि तो खडक कड्यावर आदळत, भीषण आवाज करत खालच्या मंडळींच्या दिशेने जायला लागला. २ मिनिटां पूर्वी रोमी ज्या दगडावर उभा होता अगदी त्याच दगडावर भीषण आवाज करत जाऊन आपटला आणि पुढे दोन्ही दगड खाली घरंगळत दरीमध्ये जावून पडले. आम्हाला गोरख गडावरूनहि ते दगड खाली घरंगळत जाताना दिसत होते. काही क्षण सगळे जण सुन्न झाले. आम्हालाही काळजी लागली होती. जरी मच्छिंद्र सुळका गोरखच्या अगदी समोर असला तरी वारा विरुद्ध दिशेला वाहत असल्याकारणाने आमचा आवाज तेथपर्यंत पोहोचत नव्हता. नशिबाने संजयने आपला भ्रमणध्वनी आपल्यासोबत ठेवला होता. लगेच त्याने मला फोन करून सगळे सुखरूप असल्याचे कळवलं आणि आमचाही जीव भांड्यात पडला. सुदैवाने वासुदेव आणि प्रदीपच्या सतर्कतेमुळे होऊ घातलेली दुर्घटना टळली होती.
देवाचे आभार मानून वासुदेवने खाली उतरण्यास सुरुवात केली आणि तो दुसऱ्या टप्प्यावर जिथे बाकीची मंडळी उभी होती तिकडे आला. प्रदीपसुद्धा खाली आला. चढताना पायाखाली गवत आणि माती तुडवली गेल्यामुळे घसरगुंडी तयार झाली होती, त्यामुळे आता उतरताना दोर खाली सोडण्यात आला आणि त्याला धरूनच सगळेजण खाली उतरायला लागले. पण मच्छिंद्रने आणखी काही आठवणी सोबत देण्याचं ठरवलं होत. उतरतांना एके ठिकाणी एक फुरस मस्त पैकी वेटोळ घालून हल्ल्या करण्याच्या स्थितीत स्वागताला बसलं होत. कोकणातल्या लोकांना फुरशाची चांगलीच ओळख असेल, कोकणात सगळ्यात जास्त सर्पदंश फुरश्यामुळे होतो. त्याला थोडेसे बाजूला करत वळसा घालून सगळी मंडळी सुरक्षित खाली उतरली आणि परत गोरखच्या वाटेला लागली.
मग मी आणि दर्शनसुद्धा आमची आवराआवर करून खाली शंकराच्या देवळाकडे जाण्यास निघालो. आता धक्का देण्याची पाळी गोरखगडाची होती. मी पुढे चालत होतो आणि जिथे पायऱ्या संपतात अगदी त्या पायरीला लागुनच असलेल्या झुडुपावर एक फुरस बसलेल होत. मी आपला तोंडवर करून पुढे निघून गेलो होतो, नशिबाने त्या फुरशाने मला चावा घेतला नाही. पण दर्शन च्या नजरेतून मात्र सुटल नाही. दर्शन स्वतः सर्पमित्र असल्यामुळे त्याची नजर कायम भिरभिरत असते. त्याला ते फुरस बरोबर दिसलं. तो तर एव्हढा खुश झाला कि फक्त उड्या मारायचाच बाकी होता, कारण त्यानेही पहिल्यांदाच फुरस त्याच्या नैसर्गिक आवासात पाहिलं होत.
फुरसे- Saw Scaled Viper
थोड्या वेळाने बाकीची मंडळी शंकराच्या देवळाकडे आली आणि सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेतली. भगवान शंकराला वंदन करून एक अविस्मरणीय ट्रेकची सांगता करण्याची वेळ आली होती. बरोबर ४.३० वाजता खाली उतरण्यास सुरुवात केली आणि ५.१० वाजता देहरी गावात पोहोचलो.
थोड्या वेळाने बाकीची मंडळी शंकराच्या देवळाकडे आली आणि सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेतली. भगवान शंकराला वंदन करून एक अविस्मरणीय ट्रेकची सांगता करण्याची वेळ आली होती. बरोबर ४.३० वाजता खाली उतरण्यास सुरुवात केली आणि ५.१० वाजता देहरी गावात पोहोचलो.
सूचना:
गोरखगड चढण्यास अगदी सोपा पण मच्छिंद्र सुळका थोडासा कठीण आहे. मच्छिंद्र सुळक्यावर पावसाळ्यात पुरुषभर उंचीचे गवत उगवते आणि चढाई आणखी बिकट होते. हेच गवत उन्हाळ्यामध्ये सुकून मातीचा घसारा तयार होतो. या ट्रेकमधील सहभागी मंडळी एका नामांकित गिर्यारोहण संस्थेचे सभासद आहेत आणि वर्षभर (पावसाळीसुद्धा) सुळकेगिरी करत असल्यामुळे दांडगा अनुभव आहे, म्हणूनच हा सुळका दोराशिवाय सर केला. सामान्य
No comments:
Post a Comment