Monday, July 22, 2024

खुट्याचे दार आणि त्रिगुणधारा घाट

 https://giribhramantrekkers.blogspot.com/2019/06/blog-post.html

भटकंती मंडळ
संकल्प चौधरी
तुषार करडे
कुणाल सुंकड
संतोष यमगेकर


सह्याद्रीमधील नितांत सुंदर ठिकाणी होणारी गर्दी, गोंधळ टाळायचा असेल आणि  राकट , कणखर सह्याद्री सोबत  निसर्ग अनुभवायचा असेल तर सद्यस्थितीत आडवाटांच्या भटकंती शिवाय गत्यंतर नाही. मार्च महिन्याच्या सुरवातीस केलेल्या दणदणीत अश्या बोचेघोळच्या घाटवाटेचा  अनुभव घेतल्यावर मन स्वस्थ बसत नव्हते.

Google Maps वर सह्याद्री निरखताना नजर स्थिरावली ते आहुपे ते ढाकोबाच्यामधील परिसरावर. २०१३-१४ साली दाऱ्या घाट आणि ढाकोबा केल्यानंतर या परिसरात जास्त फिरकणे झाले नव्हते, त्यानंतर हल्लीच मागच्या वर्षी म्हणजे २०१८च्या पावसाळ्यात आहुपे घाटाच्या निमित्ताने या भागात पुन्हा येणं झालेलं त्यामुळे याच भागातील खुट्याचे दार आणि त्रिगुणधारा घाट या आडवाटांच्या भटकंतीचा निर्णय पक्का केला.

आधीच दुर्गम त्यामुळे कमी वापरात असलेले खुट्याचे दार म्हणजे साधारण १.५ किलोमीटरची अरुंद आणि निसरडी अशी खडी चढण जी आपणास कोकणातील रामपूर गावातून दुर्ग मार्गे घाटावरील हातवीज गावात नेते. तर त्याच रांगेत असलेले लांबलचक डोणीचे दार हे डोणी आणि मढ या अनुक्रमे घाट व कोकणातल्या गावांना जोडते.

खुट्याचे दार

सुरवातीला २३-२४ मार्च असा दोन दिवस बनवलेला भटकंतीचा बेत आम्हाला काही कारणास्तव बदलून एक दिवसाचा करावा लागला. २३ तारखेला रात्री गाडी घेऊन कल्याण वरून निघालो आणि मुरबाड- धसई मार्गे रामपूर गावात रात्री २:३० वाजता येऊन दाखल झालो. देवळाशेजारीच गाडी पार्क करून गाडीमध्येच डुलकी काढली. पहाटे साडेपाचच्या सुमारास कोंबड्याने बांग दिली आणि त्याला प्रतिसाद देत आम्ही आमची निद्रादेवीची आराधना अर्धवट सोडली.आन्हिक  आणि न्याहारी आटोपून ७ च्या ठोक्याला आम्ही गावातून तानाजी शेळकंदे यांना सोबत घेऊन खुट्याच्या दाराच्या दिशेने चालू लागलो.

तुषार, कुणाल आणि संतोष

पूर्वेला लांबवर नाणेघाट आणि वर्हाड्याच्या सुळक्यांवर सोनेरी साज चढत होता तर इकडे गावाची वेस आणि कातळाची भिंत यामधील जंगल जागे होत होते.

सूर्योदय

मोहाच्या फुलांचा मंद सुगंध घेत घेत बाभळी, करवंदाच्या जाळ्यातून मार्ग काढत आम्ही चाललो होतो. मधेच एखादे काटेसावर आणि कुंभीचे झाड डोके वर काढत होते.

मोहाची फुले

जसेजसे आम्ही कातळ भिंतीजवळ जात होतो तस तसे वाटेचा चढ तीव्र होत होता. इकडे तानाजी मामांच्या गप्पांना जोर चढला होता आणि २ वर्षांपूर्वी गावात बिबट्या आल्यावर काय धुमाकूळ माजला होता, बिबट्याने मामांवर कसा हल्ला केला आणि आयत्या वेळी  मामांनी त्याला चकवून कशा प्रकारे सुटका करून घेतली याचे रसभरीत आणि अतिशयोक्ती पूर्ण वर्णन ऐकून  आमची हसून हसून मुरकुंडी वळायची बाकी होती.

पायवाट संपवून आता आम्ही कातळ भिंतीच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो होतो, इकडूनच छोट्या मोठ्या अश्या अनेक कातळ टप्प्यांची सुरवात होत होती.साधारण १० फुटांचा पहिला टप्पा पार करून आम्ही गर्द झाडीत आलो

पहिला कातळ टप्पा

 अतिशय कमी वावर असल्याने जमिनीवर सुक्या पानांचा गालिचा पसरला होता, झाडाच्या खोडासदृश दिसणाऱ्या मोठ्या वेली इतस्ततः पसरल्या होत्या. एकूणच  मानवी हस्तक्षेपाच्या अभावामुळे जंगल चांगलेच फोफावले होते.


 फसव्या वाटांमुळे एक दोन वेळा वाट चुकलो देखील पण तानाजी मामांनी पुन्हा मूळ वाटेवर आणले. थोड्याच वेळात आम्ही साधारण २५-३० फुटी दुसरा  कातळटप्पा पार करून वर आलो आणि आमची प्रतिक्षा संपुष्टात आली. 

दुसरा कातळ टप्पा
प्राचीन काळापासून वापरात असलेल्या वाटेच्या खाणाखुणा अजूनपर्यंत दिसल्या नव्हत्या पण दुसऱ्या कातळ टप्प्यानंतर आम्हाला खुट्याच्या दाराच्या प्राचीनत्वाची साक्ष देणाऱ्या खोदीव पायऱ्यांची रांग दृष्टीपथास पडली. अरुंद जागेवर खोदलेल्या त्या छोट्या पावट्या पाहून मन स्तिमित झाले आणि त्या पायऱ्या बनवण्यासाठी झटलेल्या हातांना मनोमन सलाम ठोकला.

कातळात खोदलेल्या पावट्या

आता जवळपास आम्ही खुट्याच्या दाराची अर्धी उंची गाठली होती, खोदीव पायऱ्यांचे २-३ टप्पे पार करून आता सुकलेल्या गवताच्या आणि सुट्ट्या मातीच्या घसाऱ्यावरून पुढे जायचे होते.


अरुंद वाट, scree आणि exposure मुळे होणारे दृष्टीभय या सगळ्यामुळे सर्वजण सावकाश काळजीपूर्वक पुढे जात होते.


एव्हाना साडेदहा वाजत आलेले खुट्याच्या दाराचा शेवट आता दृष्टीपथात आला होता, साधारण अर्ध्या तासाच्या चढणीनंतर आम्ही शेवटच्या Traverse वर येऊन पोहोचलो. 


सरकत्या मातीवरून सावकाशपणे  चालत तो टप्पा पार केला आणि  सुमारे सव्वा अकराच्या सुमारास आम्ही दुर्गच्या माथ्यावर पाय ठेवला. सभोवतालच्या भागातील ढाकोबा, दाऱ्या घाट , नाणेघाट, चावंड आणि दूरवरच्या हरिश्चंद्रचा landscape पाहून मन हरखून गेले. उन्हाचा तडाखा वाढल्याने तडक पावले गर्द वनराईतल्या देवीच्या मंदिराकडे वळवली. आत शिरल्यावर लगेचच त्या छोट्याश्या वनराईमधील गारवा जाणवला. जीर्णोद्धार केलेलं देवीचे मंदिर, आसपास भक्तांच्या श्रद्धेमुळे तयार झालेले अनेक शेंदूरचर्चित दगड असा एकूणच देखावा समोर आला. 


जीर्णोद्धार केलेलं देवीचे मंदिर

"मंगळवारच्या दिवशी इकडे खूप गर्दी होते, ३०-४० बकरे तरी कापतात.लोकं दूरवरून बोललेला नवस पूर्ण करायला येतात त्यामुळे इकडच्या परिसराला साधारण जत्रेचे स्वरूप आलेले असते" अशी माहिती तानाजी मामांनी पुरवली.

सावलीतच थोडा वेळ आराम करून आम्ही दुर्गच्या माथ्यावर जायला निघालो. किल्ला म्हणता येईल अश्या काहीच खाणाखुणा वरती दिसून आल्या नाही. मोठमोठया दगडांचा सडा असलेला उंचवटा असंच काहीसे वर्णन आपण दुर्गचे करू शकतो. परंतु तानाजी मामांचे मत काहीसे वेगळेच होते , त्यांच्या मते हा किल्ला बांधायला घेतला आणि अर्धवट सोडला नाहीतर याची उंची इतकी वाढवणार होते की या किल्ल्याची सावली शिवनेरीवर पडणार होती परंतु तसे नंतर झाले नाही. उसळून येणाऱ्या हास्याच्या फवाऱ्याला कसाबसा आवर घालून आम्ही गडावरून उतरते झालो. 

दुर्गच्या माथ्यावरून दिसणारी देवराई

खालीच असलेल्या विहिरीजवळ जेवण उरकून घेतले . या विहिरीनंतर वाटेत कुठेही पाणी उपलब्ध होणार नव्हते त्यामुळे पुढच्या प्रवासासाठी पाणी भरून घेतले. बरोबर दुपारचे २.३० वाजता आम्ही विहिरीवरून त्रिगुणधाराच्या दिशेने निघालो. 

दुर्ग कडून त्रिगुणधाराला जाताना

तानाजी मामांनी डोणीच्या दाराच्या तोंडाशी पोहोचायला आम्हाला साधारण ४.३० वाजतील असे सूतोवाच केले पण घाटाचा लांबलचक उतार लक्षात घेता आम्ही दुर्ग ते डोणीचे दार हे साधारण ४ किमी चे अंतर दुपारच्या टळटळीत उन्हात आम्ही एका तासात कापत ३.३० वाजता आम्ही त्रिगुणधाराच्या टोकाला पोहोचलो. डोंगररांगेच्या धारेवरून प्रवास करत असताना डोणीच्या दाराच्या अलीकडे असलेल्या पोशिशी नाळेत डोकावलो. भयाण आणि रौद्र अश्या त्या नाळेच्या दर्शनानेच अंगावर काटा उभा राहिला.
               
पोशिशी नाळ

उंचच उंच कातळभिंतींना चिरत गेलेली ती नाळ, वरून खाली डोकावून पाहिले तरी तळाचा काही ठाव लागत नव्हता. क्षणभर थांबून सह्याद्रीचे ते कराल रूप अनुभवून मोर्चा डोणीच्या दाराकडे वळवला.

त्रिगुणधारा घाट

इथवर येईपर्यंत संतोषची ११ नंबरची बस डगमगायला लागलेली. वाटेतल्या एका झाडाखाली त्याला बसवून पाणी आणि २ संत्री असे सकस इंधन त्याच्या गाडीत भरले आणि पाच मिनिटांच्या अल्प विश्रांतीनंतर  आम्ही त्रिगुणधारा उतरायला सुरुवात केली. नळीच्या सुरवातीच्या भागात झाडी आणि गवताळ घसारा होता त्यामुळे संतोषने सरळ घसरगुंडी करणे इष्ट समजले.संतोषच्या मागून येता येता आम्हाला Lappet Moth चे दर्शन झाले. 

Lappet Moth

मोरपिशी रंगाचा आणि जरा पांढुरक्या रंगाचे केस असलेला तो जीव शांतपणे फांदीवर पहुडला होता. वरून खाली उतरताना वाट नळीच्या उजव्या हाताने खाली उतरते त्यामुळे मुख्य नळीच्या वाटेतले मोठाले boulders आपल्या वाटेला येत नाहीत. मधेच वाट डावी उजवी करत नळीच्या दुसऱ्या टोकाला जाऊन येते.

जसजसे आम्ही खाली कोकणात उतरत होतो तशी घाटाच्या वरती जाणवत नसलेली आर्द्रता पुन्हा जाणवायला लागली. ५.३० च्या सुमारास आम्ही सुमारे अर्धा घाट उतरून आलेलो परंतु संतोष आता प्रमाणाच्या बाहेर थकल्यामुळे आमचा वेग कमालीचा मंदावला होता. माणूस शरीराने थकलेला असतो पण तो मनाने थकल्यावर काय होते याचा अनुभव आम्ही याचि देही याचि डोळा संतोषच्या रुपात पाहत होतो. वेळ झपाट्याने पुढे सरकत होती, अंधार पडायच्या आत आम्हाला गावात किंवा घाट संपवून मोकळ्या रानात पोहोचणे तरी क्रमप्राप्त होते. संतोषची बॅग तानाजी मामांकडे देऊन  मी , तुषार आणि कुणाल त्याचा धीर वाढवून त्याला हळू हळू खाली घेऊन येत होतो.

एव्हाना आमच्याकडील पाणी संपत आलेले पण तेवढ्यात मामांनी जंगलातील एक बऱ्यापैकी जाड अशी सर्पिलाकृती वेल अर्ध्यातून कापली व त्याखाली मला ओंजळ पकडायला लावली आणि काय आश्चर्य !! थेंब थेंब करत साधारण अर्धा लिटर पाणी आम्ही जमा केले. इयत्ता १२वी मध्ये जीवशास्त्र विषयात Transcription system in stem, water coloumn in tree याचा अभ्यास केलेला , त्याचे प्रत्यक्ष उदाहरण आज चौदा वर्षांनी या ट्रेकच्या निमित्ताने पाहिले.  अंधार गडद होत चाललेला , सगळ्यांच्या सॅक मधून टॉर्च बाहेर आलेल्या.


 सरते शेवटी साधारण ८.३० च्या सुमारास आम्ही मोकळ्या रानातून मढ गावातील एका शेतावरील घरात पोहोचलो. मामांच्या ओळखीमुळे गरमागरम कोरा चहा प्यायला मिळाला. पोटभर पाणी आणि चहा पिऊन ताजेतवाने होऊन आम्ही रामपूर कडे मोर्चा वळवला आणि साधारण साडेआठच्या सुमारास आम्ही पुन्हा तानाजी मामांच्या घराकडे पोहोचलो. कडकडीत अश्या गरम पाण्याने हात पाय धुवून ताजेतवाने झालो, पुन्हा एकदा चहा झाला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.






No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...