Monday, July 22, 2024

बोचेघोळ

 https://giribhramantrekkers.blogspot.com/2019/03/blog-post.html

भटकंती मंडळ

संकल्प चौधरी
कुणाल सुंकड
रुतू नलावडे



दिनांक ११ जानेवारी २०१९

वेळ दुपारचे ३:३० च्या आसपासची

लिंगाण्याच्या माथ्यावरून घाट आणि कोकणाचे मनमोहक रुपडे न्याहाळताना आसपासच्या भागातील   करवतीच्या धारेसारख्या कोकणात तुटणाऱ्या एकाहून एक सरस अश्या घाटवाटा, नाळा पाहून मन दडपून जात होते, पण कोणाला माहीत होते की यातीलच एक दुर्गम अशी बोचेघोळ आम्ही लवकरच पादाक्रांत करणार आहोत.

मध्यंतरी 2 महिन्यात डोंगरात पाय ठेवायला उसंत मिळाली नाही ,पण लिंगाण्याच्या माथ्यावरून पाहिलेल्या नाळा काही मनाला स्वस्थ बसू देत नव्हत्या. सरतेशेवटी अनवट आणि दुर्गम अश्या बोचेघोळच्या वाटेवर भटकून सह्याद्रीचे अनोखे रुपडे अनुभवायचं पक्के केले.

ठरल्याप्रमाणे  1 मार्चला ऑफिस आटोपून मी, कुणाल आणि रुतू  रात्री 10 च्या सुमारास कुर्ला ST डेपोला पोहोचलो. तिकडून सांडोशी गाडी पकडून सकाळी 5 च्या सुमारास महाडमार्गे पाचाडला पोहोचलो.

मनोहरकडे भल्या पहाटे मसाला ऑम्लेटचा फडशा पाडून  आम्ही वारंगी गावाकडे मार्गस्थ झालो.पूर्वेला लिंगाण्याच्या मागून केशरी छटा आभाळ व्यापून टाकत होती तर दूसरीकडे रायगड, वारंगीचे कणगे, खानुचा डिग्गा यांचीउत्तुंग शिखरे सोनेरी रंगात न्हाऊन निघाली होती.


वारंगीचे कणगे

वारंगी गावात पोहोचून जुन्या जाणत्या ग्रामस्थांकडून हेदमाचीमार्गे जाणाऱ्या वाटेची माहिती घेतली आणि 7.30 वाजता आमच्या भटकंतीचा श्रीगणेशा केला.


शेतातून जाणाऱ्या वाटांमधून चालत जाताना आम्ही ढोरवाटांच्या जाळ्यात कधी गुरफटले गेलो हे आमचं आम्हालाच समजलं नाही. सरतेशेवटी गाठीशी असलेला अनुभव पणाला लावून दुसऱ्या दांडाने वर चढणारी एक वाट शोधून काढली आणि हेदमाचीच्या पदरात पोहोचलो. पदरात पोहोचल्यावर निबिड जंगलातून वाट काढत काढत वारंगीहून निघाल्यापासून सुमारे दिड - पावणेदोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आम्ही हेदमाचीला पोहोचलो.


ओसाड हेदमाची

पाठीशी घाटाच्या उंचच उंच कातळभिंती तर पुढे गर्द जंगलात उतरणार कोकणाचा तीव्र उतार आणि अश्या या नयनरम्य आणि अतिसुखावह ठिकाणी वसलेली ही वस्ती, परंतु आता मात्र ओसाड पडलेली. शेतीतून मिळणारे अल्पशे उत्पन्न त्यामुळे अर्थार्जनाच्या शोधात निघालेली तरुण पिढी , सह्याद्री मध्ये दिसणारे हे typical चित्र त्यामुळे सुमारे 2 वर्षांपूर्वी सगळी वस्ती वारंगी गावात उतरली. आजूबाजूच्या आंबा,फणस, बांबूच्या झाडांमुळे छान सावली पडली होती त्यातच उंबराच्या फळांचा सुगंध हवेत मिसळला होता. डोळ्यातल्या डोळ्यात इशारा झाला आणि आम्ही तिघेही पेटपूजे करिता थांबलो. यथावकाश भूकलाडू खाऊन आम्ही पुढच्या वाटेला लागलो.

इकडून थोडे पुढे आल्यावर वाटेला दोन फाटे फुटतात , त्यापैकी उजवीकडची वाट पकडून वर चढायला सुरवात केली. सुमारे 60 ते 70 अंशातला तीव्र चढ आणि त्यात आमच्या पाठीवरील अवजड सॅक या सगळ्यामुळे आतापर्यंत राखून असलेला वेग मंदावला.

खानुचा डिग्गा


कोकणातून घाटावर जाणारा तीव्र चढ

सूर्य आता थेट डोक्यावर यायला लागला होता त्यामुळे घशाला कोरड पडत होती. सुमारे अर्ध्या पाऊण तासाच्या चढाईनंतर वाट बाजूच्या घळीकडे जाण्यासाठी वळते आणि चालू होतो आपला अरुंद अश्या ट्रॅव्हर्स वरचा प्रवास. या भागात बहुतेक ठिकाणी वाट अरुंद असून लाकडाचे ओंडके आणी दगड लावून वाटेची रुंदी चालण्यायोग्य केलेली आहे.

ट्रॅव्हर्स वर चालताना आपणास समोर धबधबा दिसत असतो , धबधब्याच्या जवळ येऊन वाट पुन्हा एकदा वर चढते.

आता मात्र कहर झालेला , साधारण साडेअकरा वाजण्याच्या सुमार होता झाडी संपून आम्ही मोकळ्या माळरान वजा टेकडीवर येऊन पोहोचलो.इकडे येऊन पाहतो तो समोर अजून एक टेपाड आमच्या स्वागताला हजर होते. टळटळीत उन्हात आम्ही स्वतःला आणि जाडजूड बोजा खेचत पावले टाकत होतो पण तेवढ्यात वाट थोडी खाली उतरली आणि सुकलेल्या पाण्याच्या प्रवाहाच्या बाजूला असलेल्या घाटदेवाचे दर्शन झाले, एक मोठ्या शिळेला चार बोटे शेंदराची लावलेली त्याला वाहिलेल्या छोट्या घंटीचे तोरण आणि एक समई असं एकंदरीत  स्वरूप होते.


काळकाईचे ठाणे

आजूबाजूला असलेल्या झाडीमुळे चांगला गारवा होता , प्रवाहाच्या पात्रात असलेल्या रांजणखळग्यात पाणी साठलेले होते परंतु ते पिण्यायोग्य नव्हते. सावलीत थोडावेळ आराम करून आम्ही पुढची टेकडी चढायला घेतली आणी साधारण अर्ध्या पाऊण तासाने आम्ही सुमारे पावणे एक वाजता बोचेघोळची घाटवाट संपवून खानु गावात पोहोचलो.

ठरलेल्या वेळेपेक्षा आम्ही पाऊण तास उशीरा खानु गाठलेले त्यामुळे अंधार पडायच्या आत आंबो मार्गे गारजाईवाडी गाठायचे कठीण धेय्य पूर्ण होईल की नाही अशी शंका मनात डोकवायला लागली. त्यातच समोरच्या उंच टेपाडानी आमच्या जखमांवर मीठ चोळायला सुरवात केली होती. दुर्गम कडेकपारीत वसलेले खानु गाव, मोजून 15 ते 20 घरांची वस्ती. वारंगी प्रमाणेच इथली तरुण पिढीपण अर्थार्जना साठी शहरात स्थलांतरित झालेली त्यामुळे मागे उरली होती ती जुनी खोडं. आपल्या घराशी , आपल्या मातीशी इमान राखत त्या मातीत आपली पाळंमुळं खोलवर रुजवून उर्वरित आयुष्य व्यतीत करणाऱ्या जोडप्यांना बघून गहिवरून आले. पुण्यापासून अवघ्या 80 किमी असणारे हे गाव परंतु आजही या गावात वीज, पाणी , रस्ता अश्या मूलभूत सुविधांची वानवा आहे. अलीकडेच 2 वर्षांपूर्वी कच्चा रस्ता गावापर्यंत बनवण्यात आला आहे असं गावकरी म्हणाले.

नजरेस पडणाऱ्या पहिल्याच घराच्या अंगणात एक आजोबा केरसुणी वळत बसलेले, आमच्या अवजड बोज्याकडे पहात लागलीच आम्हाला बसायला जागा करून दिली. सॅक काढून खाली बसेपर्यंत आतून थंडगार पाण्याची कळशी आणि तांब्या आमच्या समोर हजर. पाणी पिता पिता आजोबांनी प्रेमळ विचारपूस सुरू केली. आम्ही शहरातली मुलं वाटाड्या न घेता वारंगी वरून बोचेघोळ चढून वर आलो हे ऐकल्यावर त्यांना खूप अप्रूप वाटलं. एव्हाना अजून दोन तीन आजी आजोबा येऊन आमची काळजीपोटी विचारपुस करू लागले. तेवढ्यात आधीच्या आजोबांनी ताज्या ताकाच मडकं आमच्यासमोर ठेवलं आणि "हं, प्या आता हवं तेवढं" असा प्रेमळ दम भरला.

ताक पिताना खानु वरून आंबो मार्गे गारजाईवाडीला जायच्या वाटेची माहिती विचारली,पण आता माणसं कमी झाल्याने ४ वर्षांपासून वाट मोडली आहे त्यामुळे तिकडे रान माजलं असणार असं आजोबांनी सांगितले त्यामुळे दुसरा काही पर्याय आहे का याचा विचार आम्ही करू लागलो. आमची विवंचना ओळखून आजोबांनी आम्हाला खानु मधून टेकपवळे गावात जाऊन तिकडून घोळ गावात जाणारी मुक्कामाची ST पकडण्याचा सल्ला दिला.  त्यावर अर्थातच आमची लगबग सुरू झाली. गावातल्याच दत्त मंदिरात जेवणं उरकली. आजोबांना वाट दाखवायला येण्याबाबत विचारणा केली आणि त्यांनीदेखील आनंदाने हमी भरली.

दुपारचे अडीच  वाजत आले होते , आम्ही तिघे , आजोबा आणि त्यांचे दोन पाळीव कुत्रे असा सगळा लवाजमा टेकपवळेच्या दिशेने निघालो. कापडाला वळ्या पडाव्या तशी भुरूपाची रचना असल्याने एकामागून एक टेकड्या ओलांडणे क्रमप्राप्त होते. गावात केलेला आराम , जेवण, ताक आणि अवजड सॅक या सर्वांमुळे आमची गाडी काही वेग घेत नव्हती, तर आमचे आजोबा तर तरुणाला लाजवतील अश्या वेगात टेकडीच्या चढावर पण तुरुतुरु  पळत होते आणि त्यांच्या वेगासोबत जुळवून घेताना आमची मात्र त्रेधातिरपीट उडत होती. पहिली टेकडी चढून गेल्यावर वरती जरा सपाटी लागली त्यामुळे जीव जरा विसावला. एव्हाना दुपारचे साडेतीन वाजून गेलेले. उन्हं हळू हळू कलतीला लागलेली, सायंकाळचे गार वारे वाहायला लागल्याने वातावरण जरा आल्हाददायक झाले होते. मधल्या एका ठिकाणाहून डावीकडे पळणाऱ्या डोंगरधारेवरून आजोबांनी आंबो वस्तीचे साधारण लोकेशन दाखवले आणि तो पल्ला पाहून आमची खात्री पटली की आम्ही काही केल्या अंधार पडायच्या आताआंबो ला सुद्धा पोहोचलोनसतो, त्यामुळे ठरल्याप्रमाणे आम्ही टेकपवळेच्या दिशेने आगेकूच केली.

पठार संपवून आम्ही आता उताराला लागलो होतो. बऱ्याच दिवसात वापरात नसल्याने वाटेवर गचपण जमले होते. वाट काढत काढत आम्ही अर्धी टेकडी उतरून आलो , पण वेळेअभावी  आता यापुढे येता येणार नाही असे आजोबांनी सांगितले , अंधार पडण्याच्या आता मुक्कामावर पोहोचणे किती महत्त्वाचे असते ह्याची आम्हाला पण कल्पना असल्याने आम्हीसुद्धा आजोबांचा शब्द मानला. जायच्या आधी आजोबांनी तिकडूनच वाट कशी गेलीय हे समजावून सांगितले आणि आमच्याकडून २-३ वेळा उजळणी पण करून घेतली, शेवटी निरोप घेताना "सांभाळून जा रे बाळांनो!!" मधला जिव्हाळा मन हेलावून गेला. कोण कुठचे आम्ही , पण एवढ्या उन्हातान्हाचे आडवाटा भटकंतो म्हणून आमच्या काळजीपोटी आमच्या सोबत आलेले ते आजोबा, असं निर्मळ आणि निस्वार्थी प्रेम फक्त इथे या सह्याद्रीच्या कडेकपारीतच अनुभवायला मिळतं.

वेळ वेगाने पुढे सरकत होती, तिन्ही सांजा होऊ घातलेल्या, आम्ही सुद्धा आजोबांनी सांगितलेल्या  खाणाखुणा पाहत टेकपवळेच्या दिशेने चालत होतो. मधेच एके ठिकाणी थांबून गावातून निघताना सोबत घेतलेले ताक प्यायलो आणि ताजेतवाने झालो.


डेंड्रोबियम बार्बाटूलम

 थोड्याच वेळात पाय वाट संपून आम्ही कच्च्या रस्त्यावर आलो आणि अखेर साधारण ११.३० तासांच्या पायपीटीनंतर आम्ही टेकपवळे गावात दाखल झालो. गावात पोहोचल्यावर घोळ गावात जायला काही वाहन उपलब्ध होईल का याबाबत चौकशी केली असता गावात एकही वाहन नसल्याचे समजले त्यामुळे घोळ गावात जाऊन दुसऱ्या दिवशी कावळ्या घाटाने उतरायचा आमचा प्लॅन फसला. सरते शेवटी सर्वानुमते टेकपवळे गावात रात्रीचा मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पानशेत मार्गे पुणे गाठून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आणि आमच्या बोचेघोळच्या घाटवाटेच्या भटकंतीची सांगता केली.


No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...