सावर्णे व बेलपाड्याचे बिबटे - भाग १
१९८८ चा काळ, आमच्या चमूची हरिश्चंद्रगडाच्या महाकाय कोकणकड्यावर अतिशय कठीण व चढाईस अशक्य वाटणाऱ्या सेंटर रूट वर चढाई मोहीम चालू होती. अपुऱ्या मनुष्यबळामुळे काहीही सामानाची गरज भासल्यास चढाई मोहीम सदस्यांना चढाई थांबवून परत मुंबई पुणे गाठावे लागत असे. मग ते खाण्याचे सामान असो किंवा चढाईस लागणारे असो. मोबाईल फोन त्याकाळी नव्हता हे वेगळं सांगायची गरज नाही. बेलपाडा (सध्याचे नाव वाळीवरे) हे आमचे पायथ्याचे गाव. तिथे पूर्वी गाडी जात नसे. माळशेज घाटाच्या रस्त्यावरील, घाट जिथे चालू होतो तिथले गाव "सावर्णे ". बस ईथे थांबायची आणि मग आम्हाला चालत प्रवास चालू करावा लागत असे. रात्रीच्या वेळी माळशेज घाटातून वाहतूक पूर्णतः बंद असायची. सावर्ण्याहून निघालो की काळू नदीच्या काठा काठाने पायवाट जात असे, त्यावर एके ठिकाणी फक्त चालत जाणाऱ्यांसाठी नदीवर छोटासा पूल बांधला होता आणि तो ओलांडला की चढाई चालू होत असे. सावर्णे व बेलपाड्याच्या मध्ये एक छोटी डोंगररांग आहे, ती ओलांडावी लागत असे. आम्ही सामान घेऊन सावर्ण्याहून निघालो की तडक ह्या डोंगरातील खिंडीमध्ये चढून येऊन विश्रांतीसाठी थोडावेळ थांबत असू.
१९ नोव्हेंबर १९८८. मी आणि विश्वास थत्ते दुपारी ठाण्याहून किराणा सामान, चढाईचे काही साहित्य घेऊन निघालो. कल्याणहून सावर्णे बस पकडून संध्याकाळी ७-७.३० च्या सुमारास सावर्ण्यामध्ये पोहोचलो. तेंव्हा तिथे एकच टपरी वजा हॉटेल होते. विठ्ठल, त्याचा मालक, बस येईपर्यंत थांबायचा व बसमधून उतरलेल्या लोकांचे चहा पाणी झाले की हॉटेल बंद करून त्याच बसनी मोरोशीला त्याच्या घरी निघून जायचा. त्या दिवशी आम्हीही चहा बिस्किटं खाल्ली व रात्री बेलपाड्याकडे प्रयाण सुरु केले. मस्त चंद्र प्रकाश पडला होता त्यामुळे टॉर्च लावायची गरजच भासलेली नव्हती. काळू नदीवरील ब्रिज ओलांडताना आमचं लक्ष सहज खाली गेलं आणि अंगावर शहारा आला. जोरात चालावं, दबकत जावं कि थांबून राहावं काहीच सुचत नव्हतं. खालती पाण्यापाशी एक बिबट्या शांत पणे बसला होता. आम्ही दबक्या पावलांनी हळू हळू पुढे सरकत होतो तोच बिबट्याने आळस दिला व रुबाबात उभा राहिला. आमच्याकडे बघून न बघितल्यासारखे केलं व बाजूच्या जंगलात उडी मारून गायब झाला. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला व पुढे निघालो. झाल्या प्रसंगामुळे, आमच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता व लक्ष चारी बाजूला भिरभिरत होतं, कोणी आस पास वावरतंय का ह्याची चाहूल घेत होतं.
साधारणपणे तासाभरात आम्ही खिंडीमध्ये पोचलो. आता जरा बरं वाटत होतं. आम्ही खांद्यावरील सामान खाली ठेऊन निवांतपणे एका दगडावर पाठ टेकून पाणी पीत बसलो. वर आकाशात सुंदर चांदणं पडलं होते, चंद्र आता अस्तास चालला होता. आम्ही दोघेही नकळतच पहुडलो व माहिती असलेल्या तारका समूहांना शोधू लागलो. व्याध व मृग नक्षत्र हे पटकन सापडणारे समूह, त्यावरून उत्तर दिशा लगेच ओळखता येते. मग कृतिका, रोहिणी, हस्त नक्षत्र ओळखुन झाली. नजर थोडीशी खालती आली व विश्वास म्हणाला, अरे देवयानी बघ....काय दिसतेय...वा !! मीही क्षणभर दचकलोच, की ही देवयानी कोण व ईथे काय करतेय रात्रीची डोंगरात? मग समजलं की ही भुतलावरची देवयानी नसून आवकाशस्थित देवयानी आहे. त्या माझ्या “आ” वासलेल्या अवस्थेतच आमचं लक्ष आणखीन खाली गेलं, खिंडीतल्या डोंगराच्या काळ्या पार्श्वभूमीवर दोन तारे लकाकत होते. विचित्ररीत्या दिसणाऱ्या त्या ताऱ्यांकडे बघत आम्ही संभ्रमात पडलो होतो की हे कुठले तारे असावेत? तेव्हढ्यात ते दोन तारे हलले आणि पुढच्याच क्षणाला आम्ही स्तब्ध झालो. कारण ते दोन तारे नसून आणखीन एका बिबट्याचे चमकणारे व आमच्या दिशेनी रोखलेले डोळे होते हे आम्हाला कळून चुकलं होतं. परत एकदा नव्याने तंतरली आमची. साधारणपणे १०० मीटर वरच्या बाजूला एका दगडावर तो विसावला होता. आम्ही क्षणार्धात कृतिका, रोहिणी, देवयानी वगैरे सर्व काही विसरलो, व इथेच थांबायचे कि गावाकडे निघायचे ह्या गहन प्रश्नात रममाण झालो. ५-१० मिनिटं अशीच आमची निष्काळजी चळवळ चालू होती व काय करावे ते सुचत नव्हतं. तो बिबट्याही शांतपणे बसून आमच्याकडे बघत बसला होता व हलायचं नाव काढत नव्हता. तेव्हढ्यात आमच्या नशिबाने बेलपाड्याकडून ३-४ गाववाले जोर जोरात गप्पा मारत व हातातील काठ्या जमिनीवर आपटत खिंडीकडे येताना आम्हाला दिसले. ते येईपर्यंत इथेच थांबावे असं आम्ही ठरवलं व परत स्तब्ध होऊन तिथेच बसलो. बिबट्यालाही त्यांची चाहूल लागली असावी कदाचित, कारण इतका वेळ आरामात बसलेला तो अचानकपणे उठून, आमच्याकडे एक खणखणीत कटाक्ष टाकून, डोंगर उतारावर नाहीसा झाला. जणू काही त्याला म्हणायचं होतं “बघतो तुम्हाला पुढच्या वेळेस”. थोड्याच वेळात ते गाववाले आमच्या पर्यंत पोहोचले, आम्ही “राम राम” वगैरे करून, व बाकी काहीच न बोलता भयावह वेगाने तडक गावाकडे कूच केले. तासाभराच्या अंतराने दोन बिबट्यांचे झालेले दर्शन, ह्यामूळे आम्ही पुरते हबकून गेलो होतो, व परत एकदा तोंडातून चवाक्षरही नं काढता झपाझप पावले टाकत बेलपाडा गाठले. नेहमी प्रमाणे पोलीस पाटलांच्या घराबाहेर ओसरीवर नं झोपता, सरळ दार लावून घराच्या आतमध्येच झोपणे आम्ही पसंत केले 😊.....नं जाणो ईजा, बीज्या झाला... आता तिज्या नको 🤪
- अभिजित दांडेकर
सावर्णे व बेलपाड्याचे बिबटे - भाग २
२९ नोव्हेंबर १९८८, कोकणकड्यावरचा विजय दृष्टीपथात येत चालला होता. प्रोजेक्ट चालू होऊन आता जवळ जवळ २ महिने होऊन गेले होते. असंख्य वेळा चढाई काही ना काही कारणास्तव थांबवावी लागली होती. कधी माणसं, कधी पैसे तर कधी चढाई व खाण्याचे साहित्य. चढाईच्या अंतिम टप्प्यासाठी लागणारे काही रींग बोल्ट्स पुण्याहून येणार होते व किराणा माल कल्याणहून. तो घेऊन आम्हाला परत कोकणकड्याच्या बेस कॅम्पला पोहोचायचे होते. काही दिवसांपूर्वीच्या व्याघ्र अनुभवामुळे आम्ही चौघं जण, उगाच लफडं नको म्हणून, सावर्ण्यामध्ये अंधार व्हायच्या आतच पोहोचलो होतो. संध्याकाळची शेवटची बस येऊन गेली तरी आमचे सामान घेऊन येणारा काही त्यातून आला नव्हता. मोबाईल फोन वगैरे संदेशवहनाची काहीच साधनं त्या काळी उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला उद्या सकाळ पर्यंत तिथेच थांबण्यावाचून काहीच पर्याय नव्हता. अश्या प्रकारच्या प्रसंगातूनच प्रचंड सहनशक्ती निर्माण होत असावी. बेस कॅम्पला कळवायचीदेखील काही सोय नसल्यामुळे, त्यांचीही समजून घेण्याची क्षमता वाढत जात असावी एकंदरीत. असो. संध्याकाळचे ७.१५ वाजले होते. शेवटची कल्याण-सावर्णे बस आली होती. विठ्ठलने, सावर्ण्यामधील एकमेव रस्त्याला लागून असलेल्या टपरी वजा हॉटेलच्या मालकाने, आवरा-आवारी चालू करून हॉटेल बंद करायची तयारी चालू केली होती. त्यालाही त्याच बस ने परत मोरोशी गाठायचे होते. आम्हाला रात्र काढायची असल्यामुळे आम्हीही त्याच्याकडून खायचे पदार्थ घेऊन ठेवले होते. आमच्याकडे एकच टॉर्च असल्यामुळे, आम्ही विठ्ठलला विनंती केली की हॉटेलच्या बाहेरचा दिवा रात्रभर चालूच ठेवशील का? आमचा हॉटेलबाहेरील सारवलेल्या जमिनीवरच आज रात्री मुक्काम होता व आम्हाला हिंस्त्र जनावरापासून धोका असल्याचे त्याला वाटल्यामुळे त्यानेही लगेच आमच्या विनंतीला मान देऊन होकार दिला, अन् तो मोरोशीकडे मार्गस्थ झाला.
आम्हीही
मग बराचवेळ इकडे तिकडे टंगळ-मंगळ केली, गप्पा मारल्या, आमच्याकडे असलेल्या तुटपुंज्या
शिदोरीतून जेवलो. मग आता काय करायचे असा म्हणत असताना राजूने शक्कल लढवली की चला मस्त
पैकी गाणी म्हणत बसूया. थंडीही बरीच पडली होती, म्हणून शेकोटीच्या तयारीला लागलो. सुक्या
काठ्या व गवत गोळा करून स्टॅाक करून ठेवला. शेकोटी पेटवण्यास सुरुवात केली व त्यावरच
चहा करायला ठेवला. मग लगेचच रफी, किशोर व तलत च्या रंगतदार गाण्यांनी जोर धरला, दगड्याचे
आवडते "शुक्र तारा, मंद वारा" झालं, मन्याचं फेमस "वेग वेगळी फुले उमलली"
पण झालं. त्यानंतर गरमा गरम चहा ढोसून झाला. मग उदय म्हणाला की मी जाऊन झोपतो, कारण
मला प्रचंड झोप येतेय. मग तो टपरीबाहेरील अंगणात, दिव्याखाली पथारी पसरून झोपी जायच्या
तयारीला लागला. आम्ही त्याच्या पासून अवघे १००-१५० मीटर लांब असू जास्तीत जास्त. आमच्या
गझल्स आणि मराठी गाणी म्हणून संपल्यावर व घसा दमल्यावर आम्ही जुन्या केलेल्या चढाया
व त्यातील मजेशीर अनुभव आठवून त्यावर गप्पा मारत बसलो होतो. आणि तेव्हढ्यात पाला पाचोळ्याच्या
आवाजाने आमची नजर उदय झोपला होता त्या दिशेनी गेली, आणि परत पायाखालची जमीन सरकली व
नव्याने फाटली. एक बिबट्या रस्ता ओलांडून सरळ टपरीच्या दिशेनी, म्हणजे उदय जिथे झोपला
होता, त्या दिशेनी झपाट्याने येत होता. आम्ही आमच्यात म्हणालो की आपण शेकोटीतल्या पेटत्या
काठ्या घेऊन एकाच वेळी आवाज करत जाउया त्या दिशेनी. असं म्हणे पर्यंत तो बिबट्या उदयच्या
जवळ पोहोचला देखील. उदय एका कुशीला वळून झोपला होता. त्याच्या तोंडापाशी जाऊन तो बिबट्या
त्याला हूंगू लागला, तसं उदयने हाताने त्याला अक्षरशः "हाड" असे करून ढकललं
आणि कुस बदलून तो परत पांघरून डोक्यावर ओढून झोपी गेला. बिबट्याने सुद्धा “असा काय
हा, घाबरतच नाही बाबा” असा विचार करून त्याच्या पासून लांब जायला सुरुवात केली
व पलीकडील झाडीत घुसला. आम्ही आरोळ्या ठोकत उदयपाशी पोहोचलो आणि त्याला उठवले. तेंव्हा
तो आम्हाला विचातरो कसा, काय झाली का गाणी म्हणून? मग आम्ही त्याला विचारलं "की
ते गाण्याचं जाउदे, तू आम्हाला एक सांग, की तू त्या बिबळ्याला चक्क ढकलून कसं काय दिलंस,
तू घाबरला नाहीस का?" व झाला प्रकार त्याला सांगितला. तेव्हा उदय गर्भगळीत होऊन
थरथर कापतंच त्याने विचारले "काय? तो बिबट्या होता? मला वाटलं कुत्रा हुंगतोय
मला, म्हणून मी त्याला हाड केले व परत येऊन हूंगू नये म्हणून डोक्यावरून पांघरून घेऊन
झोपलो". आम्हाला सगळ्यांना हसावे की रडावे तो समजेनासं झालं. आता ह्या बिबट्यांच्या
सततच्या होणाऱ्या भेटींमुळे आमची तंतरलीच होती, व रात्रभर काही आम्हाला झोप लागली नाही
हे वेगळं सांगायलाच नको.
दुसऱ्या दिवशी सकाळी विठ्ठलाला झाला प्रकार सांगितला व दिवा चालू ठेवल्याबद्दल त्याचे आभार मानले. आमचं आलेलं सामान घेऊन सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आम्ही बेलपाड्याकडे कूच केले. सगळेजण न बोलता गप्प बसून नुसते चालत होतो.
१ डिसेंबर १९८८,आम्ही चौघे जण आमच्या सुट्ट्या संपल्यामुळे परत मुंबई कडे निघालो होतो. आता कोकणकडा पुढच्या आठवड्यात सर होईल अशी आम्हाला आशा होती. सुट्ट्या संपल्यामुळे व कंपनीकडून धमकीवजा पत्र आल्यामुळे सगळ्याच चमूची पार पांगा पांग झाली होती. बेस कॅम्पला आता फक्त प्याऊ (सुहास पाठक) जो इतके दिवस समर्थपणे बेस कॅम्प व जेवण-खाण सांभाळत होता, स्व. मिलिंद पाठक, विश्वास थत्ते (लाटू), राजेश देशमुख (कष्ट्या), वरूण नामजोशी (मन्या) व स्व. उदय रेमजे एव्हढेच शिलेदार शिल्लक राहिले होते. नेहमीप्रमाणे बेलपाड्याहून खिंडीतून उतरायला आणि सावर्ण्यात पोहोचायला आम्हाला जरा उशिराच झाला होता व आमची शेवटची सावर्णे कल्याण बस चुकली होती. विठ्ठलही हॉटेल व "दिवे" बंद करून मोरोशीला निघून गेला होता. आता अंधारात तिथे रात्र काढायची म्हणून आमची परत नव्याने फाटली होती. ८ च्या सुमारास आमच्या नशिबाने एक रिकामा टेम्पो मुरबाडला चालला होता. आम्ही त्याला हात दाखवल्यावर त्याच्या ड्राइव्हरनेही गाडी थांबवली व माणशी २ रु. दराने आम्हाला मुरबाडला सोडायला तो तयार झाला. आम्ही क्षणाचाही विचार न करता आमचे सामान टेम्पोमध्ये टाकलं व आत उड्या मारल्या. सुटकेचा निश्वास टाकला होता आम्ही आणि एव्हढा आनंद झाला होता म्हणून सांगू, की सांगायची सोय नाही. मुरबाड ते ठाणे प्रवास कसा करायचा ही चिंता कोणालाच सतावत नव्हती ह्या क्षणी, सावर्ण्यातून सुटका झाल्याचा आनंदच जास्त होता.
थोडं अंतर गेलो आणि टेम्पो वाल्यानी गचकन टेम्पो थांबवला. आम्ही ड्रायव्हर व मागच्या भागात असलेल्या छोट्या खिडकीतून त्याला ओरडूनच विचारले “की काय झालं असा अचानक ब्रेक मारायला, सगळे आपटले इकडे तिकडे टेम्पोच्या मागील भागात”. तेंव्हा तो घाबरतच म्हणाल की रस्त्यावर पट्टेवाला वाघ उभा आहे. आम्ही त्याला वेड्यातच काढले, व म्हणालो सह्याद्रीमध्ये फक्त बिबटेच आढळतात, पट्टेवाले वाघ नाही. आणि खरंच आमची अशी ठाम समजूत होती की वाघ आपल्याइथे कुठेच आढळत नाहीत, आहेत ते फक्त बिबळे. ड्रायव्हरने सांगितले तो रस्ता ओलांडून टेम्पोच्या मागच्या भागाकडे चालला आहे, म्हणून आम्ही टेम्पोच्या मागील भागातील शटर उचलून लोंबबकाळतच, पण टेम्पोच्या बाहेर न पडता, डोकावून लांब लांब अंधारात डोळे किलकिले करून वाघ दिसतोय का ह्याची शहानिशा करण्यात व्यस्त होतो. इतक्यात राजूचे लक्ष खाली गेले आणि तो ढाण्या वाघ टेम्पोच्या मागच्या दाराच्या खालीच, म्हणजे आमच्या पासून अवघ्या ४-५ फुटांवर आमच्याकडे बघत उभा होता. तो नुसता गुरगुरला जरी असता ना, तरी आमच्यापैकी एक दोघे जण घाबरून टपाटप खाली पडले असते, त्याच्या समोर. पण तो जंगलचा राजा होता, आमच्याकडे तुच्छतेने बघत, शेपटी हलवत शांतपणे चालत रस्त्याबाजूच्या जंगलात निघून गेला. त्यामुळे सह्याद्रीमध्ये पट्टेवाले वाघ नाहीत ह्या आमच्या समजाला कायमस्वरूपी तडा गेली होती, व कोकणकडा आपल्याला अजून काय काय दाखवणार आहे ह्या विचारात आम्ही गर्क असतानाच मुरबाड कधी आले हे आम्हाला समजलेच नाही.
कोकणकडा व बाणच्या चढाई दरम्यान बिबळ्या व वाघांबरोबर इतके वेळा नजरानजर झाली, पण ह्या हिंस्त्र (??) प्राण्यांनी आम्हाला कधीही इजा केली नाही, कारण....कारण एकच असावं, आम्ही त्यांचे खाद्य नाही, व विनाकारण हल्ला करून मारणे हे त्यांचे पिंड नाही. काही आठवड्यांपूर्वी, एक रानगवा चुकून शहरात आला, आणि माणसाने काही कारण नसताना त्याचा बळी घेतला. आता हिंस्त्र प्राणी कोण हे तुम्हीच ठरवा. आमचं नशीब की असा विचार करणारे प्राणी आम्हाला जंगलात भेटले नाहीत, नाहीतर हे लिहायला आज हयात नसतो कदाचित....!!
-
अभिजित दांडेकर
माहुलीचा नवरा व नवऱ्याची करवली सुळके चढाई मोहीम (१४-१७ मार्च १९८७)
डिसेंबर १९८३ मध्ये दिलीप झुंझारराव च्या चमूने अजिंक्य नवरा सुळका (५२० फूट), ज्याला सध्या भटोबा नावाने ओळखतात, यशस्वीरीत्या चढल्यानंतर येथे २-३ च टीम्स आल्या होत्या. पण त्या चढाया यशस्वी झाल्या नव्हत्या, आणि नंतरच्या अशाच एका चढाईमध्ये निष्णात प्रस्तरारोहक व प्रख्यात गिर्यारोहक अनिलकुमार ह्याचे अपघाती निधन झाले होते. मिलिंदनेच काही वर्षांपूर्वी नवऱ्याची करवली प्रथम सर केली होती ही जमेची बाजू. आमच्या मनामध्ये जरा ह्या माहुली रांगेतील दिसणाऱ्या देखण्या व कठीण सुळक्यांच्या चढाईबद्दल धास्तीच वाटत होती. पण जगन्नाथ (बाळा) राऊळ नी टीम गोळा केली व सर्व जण असेल तेव्हढे साहित्य घेऊन निघाले. तेंव्हा ह्या पिनॅकल्स चा तळ गाठणे म्हणजे महा कर्मकठीण काम होते, तेही सर्व वजन घेऊन जाऊन व पाण्याची वानवा असताना. आसनगाव स्थानकातूनच चालायला सुरुवात करावी लागत होती... हो, माहुली गावात वाहन जाऊ शकत नव्हतं.
आम्ही सगळेजण १४ मार्चला रात्रीच्या ११ वाजताच्या आसनगाव ट्रेननी मुंबईहून निघालो, मध्यरात्री माहुली गावाकडे चालायला सुरवात केली. शुक्ल चतुर्दशी असल्यामूळे छान चंद्रप्रकाश पडला होता. तिथून पुढे पाणी शोधून २० लिटरच्या २ कॅन्स मध्ये भरून घेऊन बेस ला जायचे होते. रस्ता शोधत शोधत बेसला पोहोचायला पहाटेचे ४.३०-५ वाजले. प्रचंड अश्या स्क्री वरून सामान व पाण्यासकट बेस ला पोहोचलो. बेस ला पोहोचण्यासाठी रोप लावायला लागणारे हे एकमेव ठिकाण असावे. झोपण्याचा थोडावेळ प्रयत्न करण्यात आला पण झोप काही लागली नाही कोणालाच. थंडीही होतीच, मग शेकोटीपाशी चहा व गप्पा चालू झाल्या.
१५ मार्चला सकाळी लवकर उठून, तयारी करायला सुरुवात केली. दोन टीम्स करण्यात आल्या. मी, प्रदीप केळकर व विश्वास थत्ते हे नवरा चढाईसाठी आणि दत्ता कऱ्हाडे, मिलिंद पाठक व विजय भालेराव हे नवऱ्याच्या करवली सुळक्यावर चढाई करणार होते. नवऱ्याच्या बेस वरून त्याच्या फेमस क्रॅक आणि उंचच उंच अश्या चिमणीमध्ये पोहोचण्यापूर्वी २००-२५० फुटाचा एक ट्रॅव्हर्स मारावा लागणार होता. तिघांनाही तो आपापल्या बळावरच मारावा लागणार होता. सकाळी ८-८.३० च्या सुमारास आम्ही चढाईस सुरुवात केली व तासा दीड तासातच आम्ही चिमणी मध्ये पोचलो. प्रदीप लीड करत होता पण मध्ये मध्ये येणाऱ्या बोल्डर्स नी चिमणी ब्लॉक होत असल्यामुळे आम्हा सर्वांनाही हा सर्व रूट क्लाइम्बच करावा लागत होता, बिले रोप आहे हेच तेव्हढं समाधान होतं. चिमणीच्या टॉप ला पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती व वरचा रूट नीट समजत नव्हता कारण वरती तर ओव्हरहॅन्ग दिसत होता. माथा २०-२५ फूटही लांब नव्हता. मग उजवीकडे ट्रव्हर्स मारल्यावर एक जुना रिंग बोल्ट दिसल्यावर जरा हायसे वाटले. प्रदीप व मी माथ्यावर पोहोचेपर्यंत संध्याकाळचे ६.३० वाजले होते, त्यामुळे विश्वास ला वर घेण्यात वेळ नं दवडता आम्ही रोपचा यू टाकून खालच्या चिमणीच्या टोकाशी उतरण्यास सुरुवात केली. खूप उशीर झाल्यामुळे, व आदल्या रात्री झोप नं झाल्यामुळे, सर्व जण थकले होते व अश्या अवस्थेमध्ये अंधारात रॅपलिंग नं करण्याचा निर्णय आम्ही घेतला, तसे बेस टीम ला कळवले व रात्री त्या चिमणीतल्या निमुळत्या चिंचोळ्या जागेतच मुक्काम करण्याच्या तयारीला लागलो. रात्रभर बसून झोपण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, प्रचंड थंडी (दातावर दात वाजत होते अक्षरश:) व साप, विंचवांच्या भीतीने (जे आम्ही वर चढताना आम्हाला दिसले होते) झोप लागणं शक्यच नव्हतं. त्यादिवशी होळीपौर्णिमा असल्यामुळे पुरणपोळ्या बेसला असुनसुध्दा न खाता फक्त चंद्राकडे बघत रात्र कशी काढली हे आमचं आम्हालाच माहित. खालून “पुरणपोळ्या झकास, तुप पण मस्त रवाळ व कणीदार आहे” अश्या आरोळ्या उठतच होत्या अधून मधून.
१६ मार्चला फटफटल्यावर लगेचच खाली उतरायच्या तयारीला लागलो. दुसऱ्या टीमला ही समिट व्हायला काल उशीर झाल्यामुळे त्यांनी रात्री रोप न काढता नुसतेच रॅपल करून बेस कॅंप गाठला होता. त्यात वरच्या एका ट्रिकी व कठीण पॅचवर दत्ताचा फॉल झाल्याचे नंतर कळले. मिलिंदनी नंतर त्याच्या "तिरक्या" हाताचा वापर करून, तो पॅच पार केला व काल संध्याकाळी नवऱ्याच्या करवलीचा माथा गाठला होता. आम्ही खालती बेस ला पोहोचल्यावर चहा, नाश्ता करून जरा पहूडणार तोच बाळा म्हणाला की तू आणि विश्वास करवली सुळक्यावर जायला लागा, व सगळे रोप काढून या. प्रदीप व मिलिंदला आराम करुदे ...!!! मग काय, अख्खा दिवस चढण्यात व रोप पिटॉन्स काढून खाली परत येण्यात गेला. सगळा कॅम्प गुंडाळेपर्यंत व रात्रीचे जेवण संपे पर्यंत रात्रीचे १० वाजले होते. त्यानंतर आम्ही सामानाची बांधा बांध करून, उतरायला सुरुवात केली. मजल दरमजल करत माहुली गाव गाठलं, नंतर आसनगाव स्थानकाकडे चालायला सुरुवात केली. रात्री ३ च्या सुमारास आसनगावला पोहोचलो. प्लॅटफॉर्म वरच पथाऱ्या पसरल्या. पण नंतर कळले कि पहाटे ५.१५ ला पहिली लोकल ट्रेन आहे मुंबईला जायला, त्यामुळे न झोपताच जागे राहिलो.
१७ मार्चचा ला सकाळी ७ वाजता ठाण्यात पोहोचलो. गेले ३ रात्री झोप मिळालेलीच नव्हती. घरी आल्यावर आंघोळ करून सकाळी ९ वाजता घरात जे काही उरलं सुरलं होतं ते खाऊन सकाळी १० वाजता मी जो झोपलो, तो दुसऱ्या दिवशी सकाळी ९ ला उठलो. २३ तास मेल्यासारखा झोपलो होतो, घरच्यांनी डॉक्टर ला बोलवायची तयारी चालू केली होती. माझ्या आयुष्यातली ही सर्वात मोठी व लांबलचक झोप म्हणावी लागेल.
You Tube Video link for above story to be experienced visually: Visual Story (Click here)
M1 मदनबाण (२२-२४ डिसेंबर १९८६) व M2 (८-११ जानेवारी १९८७) अजिंक्य सुळके चढाई मोहीम
पहिल्यांदा १९८२ साली कुलंग, मदन व अलंग (AMK) ट्रेक केल्यानंतर सह्याद्रीतील ह्या अफलातून त्रिकुटाच्या आम्ही अक्षरशः प्रेमात पडलो होतो. त्यावेळी सह्याद्रीच्या ह्या डोंगररांगांमध्ये कोणीच फिरकत नसे, त्याला दोन कारणं होती, एक म्हणजे इथे यायचा अप्रोच खूपच लांबचा होता व दुसरं म्हणजे ह्या दुर्गम किल्ल्यांवर पोहोचण्यासाठी प्रस्तरारोहणाचा वापर करावा लागत असे. त्यानंतर AMK ला आम्ही ७ ते ८ वेळा आलो असू व वेगवेगळ्या मार्गानी चढाया केल्या होत्या त्यामुळे ह्या डोंगररांगांची खडान् खडा माहिती झाली होती. त्यात काही नवीन मार्ग शोधण्याच्या आम्ही मागेही लागलो होतो. तेंव्हा इथे फिरताना कुलंग व मदनच्या मधील दोन सुळके त्याचप्रमाणे अलंगच्या पलीकडील दोन सुळके आम्हाला कधीपासून खुणावत होते. मार्च १९८६ ला अजिंक्य व सह्याद्रीतील आत्तापर्यंतचा सर्वात ऊंच सुळका "बाण" सर केल्यानंतर आम्हाला काही नवीन सुळके करण्याची खुमखुमी आलीच होती. त्यात आमच्या कॉलेजच्या मित्रांचा ग्रुप होता व बरेच ट्रेक्स आम्ही एकत्र केले होते, त्या सर्वांना एखादा सुळका चढण्याची मनापासून इच्छा होती. मग आमचे तत्कालीन गुरु व स्नेही मिलिंद पाठक ह्यांच्या डोक्यात कुलंग व मदन च्या मधील दोन सुळक्यांपैकी डावीकडचा (जो थोडा उंचीला कमी आहे) सुळका करण्याचा विचार आला. ह्या सुळक्यांची पहाणी करायलाही वेळ मिळाला नव्हता. त्याच्या बेस पर्यंत जायला रस्ता आहे का, तिथे राहायला जागा कशी आहे किंवा पाण्याचा साठा जवळपास कुठे असेल, चढाईला अंदाजे किती वेळ लागेल आणि काय काय साहित्य पाहिजे हे प्रश्न अनुत्तरीत होते. पण मिलिंद म्हणाला "भिडेंगे", तर भिडेंगे. काही नाही तर AMK चा आणखीन एक ट्रेक तर होईल व आम्हाला अलंगचा आणखीन एक नवीन रूट शोधायचं डोक्यात होतंच ते कृत्य तरी पूर्ण करता येईल, अश्या विचाराने हाताशी असलेले साहित्य म्हणजे ३०० फूट रोप, ५-६ स्नॅपलिंक्स (अल्यूमिनीयम अलॉयच्या कड्या), १ सीट हार्नेस (सुरक्षिततेकरता कमरेला बांधायची पट्टी), ३-४ पिटॉन्स (दगडांच्या भेगांमध्ये सुरक्षिततेकरता मारायचे लोखंडी खिळे) व १ रींग एक्सपान्शन बोल्ट (प्रसरण पावणारा दगडात ठोकायचा कायमस्वरूपी खिळा), एव्हढे साहीत्य घेऊन आम्ही सर्वजण ठाण्याहून निघालो.
२१ डिसेंबर १९८६ ला मध्यरात्री भुसावळ पॅसेंजर ने आम्ही ९ जण (ह्यातले ६ जणांची पहिलीच सुळका चढाई मोहीम, तीही एका अजिंक्य सुळक्यावर), ठाण्याहून निघून पहाटे ३.३० वाजता इगतपुरी स्थानकात उतरलो. बाहेरच गरम गरम बटाटेवडा व चहा पिऊन आम्ही कुलंगवाडीकडे चालत सर्व सामनानिशी प्रस्थान केले. त्यावेळी कुलंगवाडीला जायला कुठलेही वाहन नव्हते किंबहुना रस्ताच नव्हता तिथे जायला. इगतपुरी - बाहुली मार्गे २२.५ किमी चालत जावे लागत असे. साधारणतः ४ तास लागायचे कुलंगवाडीत पाहोचायला. २२ डिसेंबरला सकाळी ९ वाजता कुलंगवाडीहून मदन व अलंगच्या मध्ये असलेल्या खिंडीमध्ये पोहोचण्यासाठी चढाईला सुरुवात केली. ११ ला त्या खिंडीत पोहोचलो. इथपर्यंत रस्ता माहिती होता पण आता पुढे सगळं शोधायचं होतं. खिंडीमध्ये मदन गडाकडे तोंड करून उभं राहिलं असता, मदनच्या डाव्या बाजूने ट्रॅव्हर्स (एकाच उंचीवरून आडवं जाणे) घ्यायचं ठरलं. ह्या रस्तावरून पहिल्यांदाच कोणीतरी जाणार होतं. मदनगड ओलांडून आम्ही मदन व त्याला लागून असलेल्या पहिल्या सुळक्याच्या (M2) जवळ आम्ही अर्ध्या तासात पोहोचलो व नंतर पुढील काही मिनिटातच पहिल्या (M2) व दुसऱ्या (M1 मदनबाण) सुळक्याच्या मध्ये आलो. आम्हाला M1 किंवा मदनबाण हा ३०० फुटी अजिंक्य सुळका चढायचा प्रयत्न करायचा होता. थोडावेळ स्थिरस्थावर झाल्यावर थोडं खाऊन घेतलं (घरून डबा आणला होता, नवीन पोरं होती ना बरोबर), चढाईचं साहित्य बाहेर काढलं व चढाईचा मार्ग निश्चित केला. मिलिंद चढाई करत होता, काही वेळातच तो दोन्ही सुळक्याच्या मधल्या क्रॅक मधून त्यांच्या मधल्या खिंडी मध्ये पोहोचला. नंतर रोप लावल्यावर आम्ही सर्वजण खिंडीमध्ये पोहोचलो. मग वरच्या चढाईला सुरुवात झाली. त्यानंतर मिलिंदने तासाभरात माथा गाठला मग रोप लावल्यावर पाठोपाठ सर्व जण अजिंक्य सुळक्याच्या माथ्यावर पोहोचले. ६ जणांची पहिल्यादाच सुळका चढायची वेळ, आणि ती ही एका अजिंक्य सुळक्यावर...!! सर्वांनी एकमेकांचं अभिनंदन केलं व खालती उतरायला सुरुवात केली. मिलिंदने सुरक्षिततेकरता एक रींग बोल्ट मारला आणि सगळ्यांनी रॅपलिंग (दोराच्या साहाय्याने खाली उतरणे) करायला सुरुवात केली. साधारण पणे ४ वाजता बेसला उतरलो.
आता पुढचे प्रश्न सोडवायचे होते. राहायची व पाण्याची जागा जवळपास कुठेही नव्हती मग आम्ही मागच्याच महिन्यात शोधलेल्या नवीन मार्गानी अलंगवर मुक्कामाला जाण्याचा निर्णय घेतला. हा रस्ता अलंग-मदनच्या खिंडीमध्ये अलंग गडाकडे तोंड करून उभं राहिलं असता, डाव्या बाजूनी जातो. हा नवीन रस्ता आम्हीच पहिल्यांदा शोधून काढला होता पण त्यामध्ये ७० फुटाची भिंत चढायला लागणार होती. जुन्या दगडी पायऱ्या ब्रिटिशांनी सुरुंग लावून उडवून दिल्यामुळे हि दगडी भिंत प्रस्तरारोहणकरून चढायला लागणार होती. ह्या नवीन मार्गाच्या शोध मोहिमेबद्दल मी वेगळी पोस्ट करणार आहे. सध्या हा मार्ग नेहमीचा प्रचलित मार्ग झाला आहे त्याचप्रमाणे स्व. अरुण सावंतनी आम्ही केलेल्या सुळक्याच्या इथूनच पुढे कुलंगला जाणारी नवीन वाट शोधल्यानंतर हा मार्गही आता प्रचलित झाला आहे. असो, मिलिंदनी ह्या भिंतीवर प्रस्तरारोहण करून (एकही खिळा न मारता) वर रोप फिक्स केला. सर्वजण "मावळा" पद्धतीने (दोर पकडून पाय दगडाला टेकत स्वत:ला वर खेचत चढणे) फटाफट वर चढून गेले. त्यानंतर गडाच्या वरच्या पायऱ्या लागतात व वाटेमध्ये एक पाण्याचे टाके आहे तिथे थांबून पोटभर पाणी पिऊन आम्ही संध्याकाळी अलंगच्या गुहेमध्ये मुक्कामासाठी पोहोचलो.
२३ डिसेंबरला आम्ही अलंगवरच मुक्काम करायचा निर्णय घेतला आणि अलंग किल्ला सर्व काना-कोपऱ्यात जाऊन नीट बघितला. त्या रात्री "बडा खाना" करायचा होता, त्यानुसार पंचरंगी पुलाव, कांदा बटाटा टोमॅटो रस्सा आणि शिरा करायच्या तयारीला दुपारपासूनच लागलो. संध्याकाळी खुपच गार वारा सुटला होता व चांगलीच बोचरी थंडी पडायला लागली होती. मग आम्ही शेकोटीपाशी छान गाणी म्हणत ह्या अमृततुल्य जेवणावर ताव मारला व काही वेळातच सर्व भांडी धुवायलाही लागणार नाहीत एव्हढी स्वच्छ झाली. सगळेजण सोलापुरी चादरी पांघरून कुडकुडत झोपी गेले. २४ डिसेंबरला सकाळी उतरून परत कुलंगवाडी गाठलं, नंतर चालत ईगतपुरी, तिथून शेअर जीपनी कसारा, मग लोकल ट्रेननी रात्रीपर्यंत ठाण्यात परत आलो.
कुलंगवाडीला निघायच्या अगोदर आम्ही सध्या कोणाला विश्वास बसणार नाही अशी गोष्ट केली. आम्हाला परत एक-दोन आठवड्यांनी दुसऱ्या अजिंक्य सुळक्याच्या चढाई साठी परत यायचंच होतं त्यामुळे आम्ही आमचं सर्व चढाईचे साहित्य सुळक्याच्या पायथ्याशी असलेल्या दगडाच्या नैसर्गिक ढोलीमध्येच ठेऊन दिले. ह्या वाटांवर कोणीच फिरकत नसल्यामुळे हे सहज शक्य होतं. परत वजन उचलून न्यायला व आणायला नको हा उद्देश. अश्या रीतीने एक अजिंक्य सुळका यशस्वीरीत्या चढून अविस्मरणीय मोहीम फत्ते करण्यात आली होती.
मोहिमेचे शिलेदार : मिलिंद पाठक, अभिजित दांडेकर, राजू डिंगणकर, अजय दीक्षित, श्रीधर बापट, विद्याधर काळे, विनय आठवले, किशोर आणि संजय गुप्ते.
त्यानंतर दोन आठवडयांनी, ७ जानेवारी १९८७ ला रात्री, आम्ही दुसरा सुळका M2 (५५० फूट) चढण्यासाठी परत आलो. म्हणजे आम्ही तिघंच (मिलिंद, मी आणि अजय) परत येणाऱ्यातले. आमच्याबरोबर आणखीन सरावलेले प्रतारारोहक जसेकी प्रदीप केळकर, अनिल चव्हाण, संतोष कल्याणपूर ह्यावेळी उपस्थित होते कारण हा सुळका जरा कठीण व वेळ काढणारा वाटत होता. ह्यावेळी आम्ही आमचा बेत मागील अनुभवानुसार थोडा बदलला. ८ जानेवारीला आम्ही ईगतपुरी - कुलंगवाडी मार्गे अलंगच्या भिंतीवरून प्रस्तरारोहण करून सरळ अलंगची गुहा गाठली व तिथेच त्या रात्री मुक्काम केला.
९ जानेवारीला सकाळी लवकर उठून अलंगवरून चढाईसाठी निघालो. बाकी सर्व राहायचे आणि खाण्याचे सामान आम्ही अलंगच्या गुहेमध्येच सोडले होते कारण परत रात्री तिथेच मुक्कामाला यायचे होते. हे सुद्धा सध्याच्या घडीला अद्भुत असेच वाटणारे आहे पण त्या काळी गडावर आम्ही सोडून कोणीच नसायचे.
तासाभरातच आम्ही सुळक्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. सर्व साहित्य मागच्या खेपेला आलो असताना एका दगडाच्या ढोलीमध्येच ठेवलेले होते, ते सर्व सुखरूप होते, ते बाहेर काढले. ह्यावेळी आमच्या बरोबर मिलिंद पाठक (मिल्या), प्रदीप केळकर (पद्या), अनिल चव्हाण (अन्या) असे कसलेले प्रस्तरारोहक असल्यामुळे, सुळका चढाईची धास्ती अजिबात नव्हती. मदन व M2 च्या मध्ये असलेल्या क्रॅक मधून चढाई करण्याचे सर्वानुमते ठरले, त्याप्रमाणे पद्यानी कलाईम्बिंगला सुरुवात केली. प्रथम कठीण श्रेणीचे प्रतारारोहण होते, व नंतर रूट एका मोठ्या चिमणी मध्ये शिरत होता. हि चिमणी चढून आम्हाला वरच्या कोल (खिंड) मध्ये जायचे होते. मी सेकंड मॅन असल्यामुळे पद्यानी मला वर बोलावून घेतले व वरची चढाई चालू केली. मोठं मोठे बोल्डर्स (दगडं) चिमणी ब्लॉक करत होते, त्यामुळे, सारखं सारखं चिमणीतून बाहेर येऊन चढाई करावी लागत होती त्यामुळे खूप वेळ जात होता. मधल्या एका कठीण पॅच वर मिल्यानी चढाई चालू केली व तो टप्पा पार करून आम्ही साधारण पणे दुपारी २ च्या सुमारास खिंडीत पोहोचलो. नंतर परत पद्यानी चढाई चालू केली. ५० फूट चढल्यानंतर तो एका लेज वर तो पोहोचला. तिथून आडवं जायचं असल्यामुळे, मी व अजय त्या लेजपाशी पोहोचलो, व पद्यानी पुढे चढाई चालू केली. वरती बोल्टींग चालू असल्यामूळे बराच वेळ आम्ही त्या लेज वर नुसते बसून होतो. जोक सांगून झाले, गाणी झाली, आठवणी झाल्या मग बारीक व मध्यम आकाराचे दगड आम्ही लेजवरून खाली ढकलून द्यायला सुरुवात केली, जेणेकरून आम्हाला पहुडायला थोडी जागा होईल 😊. हे करत असताना आम्ही आमच्या डोक्यावरील सेफ्टी हेल्मेट काढून बाजूला ठेवले होते 😎. मग थोडे पाय पसरण्याएव्हढी जागा झाल्यावर आम्ही आडवे झालो. थोड्या वेळानी पद्याचा वरून कॉल आला की रोप स्लॅक (सैल) ठेवा, म्हणून परत उठून बसलो. बाजूलाच ठेवलेले हेल्मेट खाली पडू नये म्हणून आम्ही ते परत अनावधानानेच डोक्यावर ठेवले आणि..... आणि वरून दगडांचा अक्षरश: पाऊस सुरु झाला व हेल्मेट वर कित्येक दगड आपटू लागले. भेदरायला लावणाराच प्रसंग होता तो. कसले “बाल बाल” बचावलो होतो आम्ही. त्या प्रसंगानंतर अलंग च्या गुहेत परत जाईपर्यंत मी व अजयनी हेल्मेट डोक्यावरून काढलेच नाही. सगळे पोट धरून हसत होते, पण असो, जो भोगतो त्यालाच समजतं 😔.
प्रस्तरारोहण संपवून ४५० फुटांवरच्या स्क्री मध्ये पोहोचल्यावर मी वर गेलो व पुढील चढाई चालू केली. ही चढाई फारशी कठीण नव्हती, व मी ती पुढील तासाभरातच पूर्ण करून संध्याकाळी ५ च्या सुमाराच ह्या ५५० फुटी अजिंक्य सुळक्याच्या माथ्यावर प्रथम पाऊल ठेवले. पाठोपाठ सर्वजण वर आले व आम्ही दोराच्या साहाय्याने खाली उतरून परत ७ वाजेपर्यंत सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचलो. आम्हाला सर्व windup करून मुक्कामाला अलंगच्या गुहेत जायचे होते, पण अलंगच्या रॉक पॅच वर रोप फिक्स असल्यामुळे आम्हाला चिंता नव्हती. आरामात टंगळ मंगळ करत आम्ही सर्वजण रात्री ८ वाजता अलंगच्या गुहेत पोचलो. ह्यावेळेस मात्र "बडा खाना" वगैरे करायची ताकद कोणातंच नव्हती, म्हणून ट्रेकर स्पेशल मुंग डाळीची पात्तळ खिचडी, कांडा व पापड असा फक्कड बेत केला. नंतर अजिंक्य सुळक्याच्या चढाईच्या यशाबद्दल मिल्यानी आणलेल्या गुलाबजामवर सगळ्यांनी ताव मारला व लगेच निद्राधीन झालो.
दुसऱ्या दिवशी (१० जानेवारीला) सकाळी अलंगवरून कुलंगवाडीमध्ये उतरण्यास सुरुवात केली. आम्हाला खूपच लांबचा पल्ला गाठायचा होता अजून आणि तेही आता सगळे वजन घेऊन. ३ तासात आम्ही कुलंगवाडीमध्ये पोचलो. कुलंगवाडीतील पोलीस पाटलांच्या घरी मस्त गरमा गरम नाचणीची भाकरी, कांदे बटाट्याचा रस्सा, भात व आमटी रेमटवून बाहुली मार्गे इगतपुरीकडे आम्ही मार्गक्रमण करणे सुरु केले (त्याकाळी गावातील पाहूणचार हा नीत्याचाच भाग होता) व रात्री कसारा मार्गे ठाण्यामध्ये पोचलो. त्यानंतर रात्री आमच्या बाणच्या चमूमधील विजय भालेरावच्या लग्नाच्या रीसेप्शनला सगळेजण चेंबुरला हजरही झालो.
अश्या रीतीने एका यशस्वी अजिंक्य सुळका चढाई मोहिमेची सांगता झाली. 🙏🙏
- अभिजित दांडेकर
काट्याची लिंगी - अजिंक्य सुळका चढाई मोहीम (२१-२२ नोव्हेंबर १९८७)
१९८७ च्या पावसाळ्यात नाणेघाटात फिरताना व थंड गार वाऱ्याचा आस्वाद घेत बसलेलो असताना, अचानक ढगांची चादर बाजूला झाली व आम्हाला नाणेघाटाच्या पठाराच्या खालच्या बाजूला असलेल्या "काट्याच्या लिंगी" चे दर्शन घडले. थोडी चवकशी केली तेंव्हा कळले की हा सुळका अजिंक्य आहे....झाले, लगेच क्लाइम्बिंगला हाती घ्यायला पाहिजे असे म्हणून आखणीला सुरुवात झाली. माथेरानचे मार्जोरी नूक व ढाकचा कळकराय ह्या मोहिमा पावसाळ्यानंतर लगेचच असल्यामुळे काट्याच्या लिंगीची आगाऊ पाहणी करायला वेळच मिळाला नाही. शेवटी नोव्हेंबर उजाडला.
सुळक्याला डायरेक्ट भिडायचे ठरले व त्याप्रमाणे मी, प्रदीप केळकर, राजू डिंगणकर, राजू देशमुख, अभय पावगी जमेल ते साहित्य करून वैशाखरे गावाकडे निघालो. २१ नोव्हेंबरला दुपारी ट्रेननी कल्याण गाठले. तिथून दुपारच्या सावर्णे बसनी निघालो. सरळगावला बस नेहमीप्रमाणे थांबली, तिथली मिसळ पाव खूप प्रसिद्ध होती त्या काळी. अचानक निघाल्यामुळे आमच्याजवळ खायला काहीच नव्हते (म्हणजे असं नुसतं लिहायचं असतं, खायला बरोबर कधीच काही नसायचं) त्यामुळे आम्ही कल्याणहून घेतलेला फ्रुट ब्रेड व ८-१० संत्री क्लाईम्बकरता साठवून ठेवत मिसळीवर ताव मारला, नं जाणे उद्या रात्री पर्यंत खायला मिळेल कि नाही. संध्याकाळी ७ च्या सुमारास वैशाखरे गावात उतरलो. सुळक्याची फक्त दिशा माहित होती, दिसत नव्हताच, त्यामुळे गावात चवकशी केली असता पायथ्याशी काट्याची वाडी नावाचे गाव असल्याचे कळले व आम्ही त्या दिशेनी कूच केले. रस्ता असा नव्हताच (परत "आपण रस्ता चुकलो" की असं लिहायचं असतं) त्यामुळे आम्ही अंदाजानेच रात्री ११ पर्यंत भरकटत होतो. शेवटी कंटाळून आम्ही तेथेच माळरानावर झोपण्याचा निर्णय घेतला व पहाटे उठून निघूया असे सर्वानुमते ठरले. पहाटे उठल्यावर गावातल्या गुरांचा आवाज ऐकल्यावर कळले कि आम्ही गावापासून पाच दहा मिनिटाच्या अंतरावरच झोपलो होतो. म्हणजे आपण बरोबर दिशेनी निघालो होतो तर, छान. प्रातःर्विधी उरकून गावाकडे निघालो, आता काट्याची लिंगी सुळका आम्हाला दिसत होता, त्यामुळे अर्धी चिंता मिटली होती. तरीही रस्ता शोधण्यात अजून वेळ जायला नको म्हणून आम्ही एका गाववाल्याला येतोस का म्हणून विचारले असता, खायला मिळेल ह्या आशेवर तो तयार झाला (??!!). गावातून निघाल्यावर डोंगराची एक उभी धार सुळक्याच्या पायथ्यापर्यंत जाते. त्यावर वाळलेले गवत व खूप स्क्री होती. आम्ही सर्वजण घसरत,आपटत १० वाजेपर्यंत एकदाचे बेसला पोहोचलो.
नाणेघाटाच्या पठाराचा डोंगर व लिंगी ह्यामधील खिंडीमध्ये चढाई करून रोप लावले व आम्ही सर्वांनी सामान खिंडीत आणून ठेवले. खिंडीतून क्लाइम्बला सुरुवात झाली, प्रदीप लीड करत होता, त्याने पहिला ५० फुटांचा टप्पा फ्री मारून एक पेग टाकला. नंतर चढाई थोडी उजवीकडे ट्रॅव्हर्स घेऊन करावी असं ठरलं. १५ फूट उजवीकडे थोडंसं तिरकं गेल्यावर चढाईचा मार्ग निश्चित केला, व चढाई पुढे चालू झाली. मधे मधे ३-४ पिटॉन्स मारून व बराचसा पॅच फ्री चढून १.३० वाजता आम्ही सगळे समिटला पोहोचलो. आणि हा २०० फुटी अजिंक्य सुळका सर केला. दुर्दैवाने आमच्याकडे कॅमेरा नसल्यामुळे, एकही फोटो काढू शकलो नाही.
आता खरा गमतीचा भाग सुरु... ! मधल्या
एका लेजवरून तिरकं खाली उतरून परत तिरकं खिंडीत येण्यापेक्षा सरळ खिंडीत उतरायचे ठरले.
त्याप्रमाणे रिंग बोल्ट मारायची तयारी सुरु झाली. पद्यानी शांतपणे दगडामध्ये ड्रिल
बिटनी हॅमर करायला सुरुवात केली. प्रशस्त लेजवर उभं असल्यामुळे, वेडं वाकडं उभं राहून
तिरपगड्या अवस्थेत बोल्ट मारायचा नाही हा अनुभव खरंच सुखावणारा होता. एक शालजोडीतला
गोंडस बोल्ट घेऊन व तशीच सुंदर साजेशी वेज त्याला लावून, बोल्टला त्या कातळात ठोकण्यात
आले. त्याला रोप फिक्स करून खालच्या खिंडीत सोडला. आम्ही पाचही जण त्या बोल्टला अँकर
होतो. राजू देशमुख नी रॅपल करायला सुरुवात केली, इटालियन हीच लावून तो ३-४ फूट लेजपासून
खाली आला आणि त्याची नजर बोल्टकडे गेली, व तो म्हणाला पद्या, बोल्ट हलतोय. आम्ही सगळ्यांनी
त्याला वेड्यात काढले व खाली उतरण्यास सांगितले. आणखीन २ फूट गेल्यावर त्याचा परत तोच
आक्रोश...!!! शेवटी प्रदीप वैतागून म्हणाला की वर ये परत, स्वतःच्या हातानी चेक कर
आणि मग रॅपलिंग ला सुरुवात कर. त्याप्रमाणे, क्षणाचाही विलंब न करता राजू वर आला. तो
लेजवर पोहोचल्यावर प्रदीप त्याला बोल्ट खेचून दाखवू लागला, व म्हणत होता, अरे असा बोल्ट
कधी हलतो का रे? असं म्हणत असे पर्यंत, तो गोंडस बोल्ट त्या सुंदर वेज सकट हातात आला.
त्याक्षणी, एकदम ३-४ स्नॅपलिंकचे आवाज आले, सर्वांनी आपल्याल्या सेल्फ अँकर मधून डिस्कनेक्ट
केल्याचा आवाज होता तो. त्या दिवशी आम्हा पाचही
जणांची "कटी पतंग" झाली असती पण राजूच्या सावधानतेमुळे अनर्थ टळला. खिंडीत
बसलेल्या गाववाल्याला ह्याची काहीच कल्पना नव्हती, तो आपला सगळे खाली येऊन आपल्याला
खायला कधी मिळेल ह्याच प्रतिष्ठेत होता. शेवटी, दुसरी चांगली वेज त्याच बोल्टमध्ये टाकून,बोल्ट परत नीट मारण्यात आला, ४-५ वेळा चेक
करून सर्वजण सुखरूप रीत्या खाली आले. सामान आवरून, फ्रुट ब्रेड व संत्री यांचं जेवण करून (गाववाल्यानी कपाळाला हात मारला असणार, निश्चितच),
आम्ही खाली उतरायला ५ वाजता सुरुवात केली. परत त्या भयावह स्क्री वरून घसरत, पडत व
पडल्यावर एकमेकांना हसत (हा आमचा आवडीचा उद्योग, एकमेकांना पडल्यावर जोर जोरात हसणे)
कसे बसे काट्याच्या वाडीत पोहोचलो. रात्री चालत वैशाखरे गाठले पण तोपर्यंत शेवटची बस
निघून गेली होती (त्या काळी माळशेज घाटातून रात्रीची वाहतूक बंद असे), त्यामुळे रस्त्यावरच
पथाऱ्या पसरल्या. योगा योगाने एक मारुती जिप्सी आली व त्यात दोनच माणसे होती, त्यांनी आम्हाला कल्याण
पर्यंत लिफ्ट दिली व आम्ही मध्यरात्री ठाण्यात परत सुखरुप आलो.
- अभिजित दांडेकर
कळकराय सुळका चढाई मोहीम व अपघात १९८७
ह्या मोहिमेचा महिना कुठला तो आठवत नाही पण पौर्णिमा होती त्या रात्री एव्हढं नक्की. हॉलिडे हायकर्स क्लबची ढाक बहिरी ट्रेक होती. छत्रपती पुरस्कार विजेता व नामवंत गिर्यारोहक प्रजापती बोधणे (प्रजा) मोहिमेचा नेता होता. आम्ही सर्वजण शनिवार दुपारच्या कर्जत लोकलने कर्जतला उतरून पायथ्याच्या वधप गावात एस. टी. बसने पोहोचलो. सामानाची बांधाबांध झाल्यानंतर सर्वांनी चालायला सुरुवात केली. मोहिमेच्या आखणीनुसार आम्ही सर्वजण ढाकच्या खालच्या विस्तीर्ण पठारावर रात्रीचा मुक्काम करणार होतो व दुसऱ्या दिवशी सकाळी ढाकच्या गुहेत जाऊन आल्यानंतर परत कर्जतमार्गे मुंबई गाठणार होतो. ह्यात ढाक शेजारच्या कळकराय सुळक्यावर चढण्याचं वगैरे काहीच ठरलेले नव्हते. मस्त पौर्णिमेचा चंद्रप्रकाश पडला होता आणि त्यामुळे आम्ही कोणीच टॉर्च लावायच्या भानगडीत पडलोच नव्हतो व झपाझप पावले टाकीत तासा दीड तासातच आम्ही पठारावर येऊन पोहोचलो. बाकी सर्वजण येईपर्यंत दोन अडीच तास गेले. एक छानशी सपाट जागा आम्ही मुक्कामासाठी निवडली व रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागलो. गरमागरम आंबेमोहोर भात, फोडणीचे वरण व कांदा-बटाटा-टोमॅटोचा रस्सा असा झकास कार्यक्रम होता. मनसोक्त जेवणावर ताव मारून आम्ही आडवे पडायच्या तयारीला लागलो.
ह्या
सुमारास, म्हणजे १९८६-१९९० चा काळ, आम्ही प्रस्तरारोहणाच्या अधीन झालो होतो. बाण, एम १, एम २, मार्जोरी नूक (माथेरान) हे अजिंक्य
सुळके तसेच लिंगाणा, भवानी कडा, कर्नाळा, माहुलीचा नवरा व नवऱ्याची करवली, पदरगडचे
सुळके, मुंब्रादेवी भिंत अश्या बऱ्याच चढायांची शिदोरी आमच्या पाठीशी होती. त्यामुळे
नाही म्हटलं तरी आमच्यात थोडी खुमखुमी होतीच.
रात्री जेवण झाल्यावर मी, प्रदीप म्हसकर (म्हश्या) व धनंजय कुंटे बोलता बोलता म्हणालो की उद्या आपण पटापट
पुढे जाऊन कळकराय सुळका चढूयात का? तोपर्यंत बाकी सगळे लोक ढाकच्या गुहेत दोर लावतील
व चढायला सुरुवात करतील. आपण सगळ्यात शेवटी जाऊन रोप काढून येऊ व सर्वांबरोबर परत निघूया
कर्जतला जायला. खिंडीतून तशी चढाई सोपी असल्याचे आम्ही ऐकले होते त्यामुळे प्रजाला
विचारून त्याची अनुज्ञा घेण्याचे ठरले. प्रजानेही किती जण जाणार व किती दोर बरोबर नेणार
ह्याची खातरजमा करून जाण्यास संमती दर्शवली. त्यानुसार आम्ही तिचे जण जायचे ठरले व
त्यासाठी लागणारे चढाईचे सामान म्हणजे २०० फुटी दोर, काही खिळे, स्नॅपलिंक्स (अल्लुमिनियमच्या
कड्या), फिगर ऑफ ऐट डिसेंडर (दोराच्या साहाय्याने खाली उतरायचे साधन) व सीट हार्नेस
आमच्या सॅकमध्ये आम्ही रात्रीच काढून ठेवले जेणेकरून उद्या सकाळी वेळ जायला नको.
सकाळी
लवकर उठून, चहा नास्ता करून सगळ्याची आवरा आवारी चालू असेपर्यंत आम्ही ढाक व कळकराय
सुळक्याच्या मध्ये असलेल्या खिंडी कडे प्रयाण केले. तासाभरातच आम्ही तिथे पोहोचलो व
समजले की दुसऱ्या एका ग्रुपची तिथे चढाई सकाळपासूनच चालू आहे. म्हणजे ह्यामध्ये जयंत
डोफे व पुण्याच्या ससून हॉस्पिटलचे २ ऑर्थोपेडिक डॉक्टर्स एव्हढेच जण होते. त्यांनी
त्या मार्गातील थोड्याश्या कठीण असणाऱ्या कातळटप्प्यावर दोर लावलेलाच होता. मग आमचे
काम आणखीनच सोपं झालं. आम्ही बिले (दोरीचा शरीराला बांधून दिलेला सपोर्ट) घेऊन अर्ध्या
तासातच सुळक्याचा माथा गाठला. धनंजयनी कॅमेरा काढून छायाचित्रे घेण्यास सुरुवात केली.
माथ्यावर ५-१० मिनिटे थांबून निसर्गरम्य देखावा बघून झाल्यानंतर आम्ही उतरायला सुरुवात
केली. माथ्यावर पेग (जमिनीत मारायचा एक लांबलचक खिळा) मारून आम्ही त्याला दोर लावला
व सरळ खिंडीपर्यंत सोडला. म्हश्यानी रॅपलिंगला (दोराच्या साहाय्याने उतरणे) सुरुवात
केली. सुळक्याच्या भिंतीला परपेंडीकुलर पोसिशन घेतली, दोन पायात अंतर ठेवले, ब्रेकिंग
हॅन्ड मागे ठेवला व तो निघाला. त्याने एक पाय उचलला मात्र, आणि त्याचा तोल गेला व ज्याला
आम्ही पेन्डूलम म्हणतो त्या प्रमाणे तो त्याच्या डावीकडे अनियंत्रित जाऊ लागला. त्याने
पेन्डूलम थांबवण्यासाठी दावा पाय सुळक्याच्या भीतीवर दाबण्याचा प्रयत्न केला, त्या
धडपडीत तो एका दगडाच्या भेगेत अडकला पण शरीराचा वेग न थांबल्यामुळे पाय टाचेपाशी दुमडला
गेला. पायातून कडाड कट्ट असा आवाज आला. पाय
दगडातील भेगेत अडकल्यामुळे, म्हश्याचा डावा हात सुळक्याच्या प्रस्तरावर आपटला व परत
कडाड कट्ट..!!! म्हश्याला जागेवरून हलताही येत नव्हते व वेदनेने तो ग्रासला होता. ताबडतोब
मी त्याच्यापाशी जाऊन बिले दोर अडकवला व त्याला परत सुळक्याच्या माथ्यावर खेचून घेण्यात
आम्हाला यश आले.
दोनपैकी
एक ऑर्थोपेडिक डॉक्टर माथ्यावरचा असल्यामुळे म्हश्याचा डावा पाय व डावा हात दोन्ही
तुटल्याचे (फ्रॅक्चर झाल्याचे) निदान करण्यात आले (नंतर ससून मध्ये क्ष-किरण चाचणी
घेतली असता समजले की हातापायात मिळून एकंदरीत ६ ठिकाणी हाड मोडले होते). आता ह्या अवस्थेत
म्हश्याला सुळक्याच्या माथ्यावरून, खाली खिंडी पर्यंत आणि पुढे वधप किंवा कुंडेश्वर
इथे कसे नेता येईल ह्याचा आम्ही विचार करू लागलो. प्रजाला निरोप पाठवून झालेला वृत्तांत
कळवला. तोही ढाकच्या गुहेतील चढाईची सूत्र दुसऱ्याकडे सोपवून लगेचच कळकराय सुळक्याच्या
माथ्यावर पोहोचला. ह्या नंतर आम्ही जे बघितले ते एव्हढे अचाट होते की अजूनही आठवले
की कळतं की ताकद, टेक्निक व अनुभव ह्या तिन्ही गोष्टी प्रस्तरारोहणकरता आणि एखादा अपघात
झाला असता रेस्क्यू करण्यासाठी किती महत्वाचे आहेत. पाठुंगळीला एखाद्या माणसाला घेऊन
लॉन्ग स्लिंग रॅपलिंग करणं हे दिसतं तेव्हढं सोपं नसतंच पण खरं सांगायचं झालं तर धोकादायकही
असतं. त्यामुळे प्रजाने त्याला पाठुंगळीला घेतले, दोघांच्या सीट हार्नेस लॉक केल्या,
बिले दोर लावला आणि चक्क त्याने त्या सुळक्याच्या माथ्यावरून म्हश्याला घेऊन
"स्टमक रॅपलिंग" करायला सुरुवात केली. ज्यांना कोणाला स्टमक रॅपलिंग कसे
करतात हे माहित नसेल तर ह्या प्रकारात दोराच्या साहाय्याने खाली उतरताना आपले तोंड
व छाती हि खालच्या दिशेने असते व पाठ माथ्याकडे. बघणाऱ्या माणसाला हे दृश्य भयावहच
असते. त्याला खिंडीत सुखरूप उतरवले व ह्याचे संपूर्ण श्रेय प्रजाला जाते. तो नसता तर
आम्हाला हे कर्मकठीण झाले असते, एव्हढं नक्की. नंतर म्हश्याला प्रथोमोपचार चालू झाले
या काठ्या, दोऱ्या बांधून तात्पुरता आधार देण्याचे काम त्या २ डॉक्टर्सनी चालू केले.
तोपर्यंत आम्ही ढाकच्या गुहेत जाऊन आलो व तेथील लोकांना सुखरूप खाली आणून, तेथील दोर
काढून परत खिंडीत पोहोचलो. मग आम्ही ठरवले
की म्हश्याला पाटीवर उचलून अळी पाळीने न्यावे लागणार आहे आणि त्यासाठी वधपला नं जात
जरासा सोपा रस्ता असलेल्या कुंडेश्वर इथे नेण्याचे ठरले. कुंदेवारहून बसनी कामशेत व
पुढे पुणे असं नेता येणं सोपेही पडेल या जलद उपचारही सुरु होऊ शकतील. त्यावेळी मला
स्वतःचे वजन कमी असले कि कितीही फायदा होतो ह्याचा साक्षात्कार घडला. म्हश्या फक्त
४० किलोचा असल्यामुळे त्याला पाठीवर टाकून उचलून आणणे आम्हा सर्वाना शक्य झाले. माझ्यासारखा
७० किलोचा असता तर तिथेच टाकून यावे लागले असते.
संध्याकाळी
आम्ही मजल दरमजल करत कुंडेश्वरला येऊन पोहोचलो. सर्व जण दमून गेले होते. पाठीवर उचलून
आणणे जेव्हढे कठीण व त्रासदायक असते ना त्याही पेक्षा कित्येक पटीने त्रासदायक त्या
अवस्थेत लाचार होऊन पाठीवर बसणे असते, तेही हातापायात फ्रॅक्चर असताना. जयंत डोफे,
सासूचे ते दोन डॉक्टर्स (नावं आठवत नाहीत त्यांची आता), प्रजा व इतर सदस्यांनी पुढाकार
घेऊन व आपणहून मदत करून हे शक्य केलं होतं. जो कोणी म्हश्याला उचलत होता, त्याची सॅक
दुसऱ्या कोणालातरी उचलावी लागत होती हे विसरून चालणार नाही. गावात मुक्कामाची बस येऊन
थांबली होती. आम्ही मेडिकल इमर्जन्सी आहे असं सांगितल्यावर, एस. टी. च्या चालक व वाहकाने,
स्वतःच्या जबाबदारीवर बस पुन्हा कामशेतला नेली जेणेकरून वैद्यकीय मदत लवकरात लवकर मिळावी.
धन्य ते एस. टी.महामंडळ व त्याचे जबादार वाहक चालक. त्या दोघांनाही सलाम.
खालील
फोटो हा अपघात व्हायच्या काही मिनिटं आधी कळकराय सुळक्याच्या माथ्यावर धनंजय कुंटे
नी काढला आहे. मागे उभे (डावीकडून) जयंत डोफे व अभिजित दांडेकर. खाली बसलेले (डावीकडून) प्रदीप म्हसकर (म्हश्या) व ससून हॉस्पिटल मधील ऑर्थोपेडिक
डॉक्टर. जयंत डोफेची व आमची ओळख ह्याच सुळक्यावर झाली.
- अभिजित दांडेकर
पळूची लिंगी, अजिंक्य सुळका चढाई मोहीम जानेवारी १९९१ (कथा उडालेल्या “वेज” ची)
आम्ही नोव्हेंबर १९८७ ला जेव्हा प्रथम काट्याची लिंगी सर केली होती, तेंव्हाच आम्हाला ह्या नाणेघाटाच्या पठाराच्या खाली पण बऱ्याच वरच्या अंगाला असलेल्या २०० फुटी उंचीच्या “पळूच्या लिंगीचे” दर्शन घडले होते. पण तो सुळका इतक्या उंचावर होता की खालील पळू गावातून त्याच्या पायथ्याला जायचे म्हटले तर तिथे पोहोचेपर्यंतच बरंच प्रस्तरारोहण करावे लागलं असतं. म्हणजे “चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला” 😜. दुसरा मार्ग म्हणजे नाणेघाटाच्या पठारावरून ह्या लिंगीच्या व नाणेघाटाच्या डोंगरामधील खिंडीत दोराच्या साहाय्याने उतरायचे आणि मग ह्या सुळक्यावर आरोहण करायचे. पण त्याकरता साधारणपणे ४०० फूट लांबीच्या दोरीची आवश्यकता होती आणि त्या काळी ४०० फूट लांबीचा अखंड दोर आमच्याकडे नव्हताच. त्यामुळे ही चढाई लांबणीवर पडत चालली होती. शेवटी ठाण्याच्या समिट माऊंटेनिअर्सच्या सौजन्याने एक नवीन कोरा करकरीत असा ८ मिमी जाडीचा नायलॉनचा दोर (तोडी कंपनीचा) उपलब्ध झाला आणि २६ जानेवारी १९९१ ला लगेचच ही मोहीम हाती घेण्याचे ठरले.
त्यानुसार मी, अभय पावगी, उदय रेमजे, राजू डिंगणकर, आनंद कुलकर्णी (अंत्या), राजू रेळे (कुल्फी), वरुण नामजोशी (मन्या) व मिलिंद परांजपे (पोंग्या) २५ जानेवारीला रात्रीच नाणेघाटाच्या गुहेत मुक्कामाला पोचलो (त्याकाळी, ह्या गुहांना आत्तासारखी “झाकणं” नव्हती, व आत मुक्काम करता येत असे). पहाटे, पोहे व चहा करून लगेचच पठारावरील "टोक" सुळक्याच्या खाली असलेल्या एका चांगल्याश्या जागेवर जाऊन धडकलो. थोडं वर-खाली, डावीकडे-उजवीकडे केल्यावर कुठून उतरायला सुरुवात करता येईल त्याचा अंदाज बांधून एका छानश्या झाडाला दोर बांधून खाली उतरण्याच्या तयारीला लागलो. सुळका आम्हाला वरून दिसत नसल्यामुळे, सर्वांचे अंदाज बांधणे चालू होते. १००-१५० फूट खाली उतरल्यावर अंदाज येईल म्हणून मी प्रथम उतरायला सुरुवात केली. २०० फूट साधारण उतरल्यानंतर मला समजले कि सुळका माझ्या बराच डावीकडे राहिला आहे. परत वर चढून नवीन ठिकाणी रोप बांधून खाली उतरण्यात वेळ गेला असता, म्हणून मी तसंच आडवं आडवं जायला सुरवात केली. साधारणपणे खिंडीच्या वर आलोय असं वाटल्यावर, तिथे भिंतीत एक खिळा (पेग) ठोकला, आणि सरळ खाली खिंडीत पोहोचून, सर्वांना एका मागोमाग एक तिथे चढाईचे साहित्य घेऊन यायला सांगितले. त्याकाळी मोबाईल तर सोडाच पण साधी वॉकी-टॅाकीही आमच्याजवळ नसल्यामुळे, आरडा-ओरडा करूनच संवाद साधायला लागत असे. त्यात वाऱ्यामूळे आवाज वर पर्यंत पोहोचेलच ह्याची खात्री नसायची.
माझ्यानंतर अंत्या थोड साहीत्य घेऊन खाली उतरून आला आणि येताना पेगला “फिगर ऑफ ऐट” ची गाठ मारून तो खाली आला होता आणि हे वरच्यांना माहिती नव्हतं. नंतर पोंग्यानी रॅपलिंग (दोराच्या साहाय्याने उतरणे) करायला सुरुवात केली, पण मध्ये दोर बांधला असल्याचे माहित नसल्याने तो सरळ त्या पेगपर्यंत जोरात येऊन आदळला. दोर, त्याच्या नाममात्र वजनामूळे का होईना, पण ताणला गेल्यामूळे तो तिथे पूर्ण पणे लॉक झाला. प्रचंड जीवाचा आकांत व धडपड करून त्याने कशी-बशी स्वतःची सुटका करून घेतली, व ह्या नादात त्याच्या नाकाला दोर घासून जी जखम झाली होती ती आम्हाला अनाकलनीय व प्रचंड हास्यास्पद अशी होती. ती, आम्ही त्याला पुढचा महीनाभर हसायला व त्याचं टोपणनाव सार्थ ठरायला पुरेशी होती.
नंतर मी चढाई सुरु केली. आमच्याकडे २०० फूट रोप, काही पिटॉन्स (दगडात माराचे एक विशिष्ट प्रकारचे खिळे) व २-३ एक्सपांशन बोल्ट्स होते. एक्सपांशन बोल्ट दगडात मारण्याआधी ड्रिलबीट व हातोडीने दगडात एक भोक पाडावे लागत असे. त्यानंतर त्याच्या मागच्या भागात दिलेल्या भेगेमध्ये एक त्रिकोणी आकाराची पाचर बसवून तो खिळा आत मारला कि तो दगडामध्ये घट्ट बसतो. तो खिळा मग तिथेच सोडून द्यावा लागत असे. त्याच्या ह्या विशिष्ट रचनेमूळे, ती त्रिकोणी पाचर अतिशय महत्वाची असते. मी वर चढाई करत असताना अभय म्हणाला "अरे, आपल्याकडे बोल्ट्स तर २-३ आहेत, पण पाचर एकच आहे". हा एक आमच्यासाठी एक धक्काच होता कारण आम्हाला आता एका पेक्षा जास्त बोल्ट वापरता येणार नव्हता. चढाईच्या शेवटच्या टप्प्यात एक कातळ असल्यामुळे, बराच प्रयत्न करूनही, बोल्ट मारण्याशिवाय काहीच पर्याय उरला नाही आमच्या पुढे. परत बोल्ट हाताळण्यामुळे होणाऱ्या चुकांमुळे, आम्हाला रिस्क घ्यायची नव्हती, त्यामुळे मी अभयला माझ्यापाशी बोलावले व पुढे जाऊन बोल्ट मारण्यास सांगितले. पाचर एकच असल्यामुळे “जीवापेक्षाही जास्त काळजी घ्यायला” सांगितली तिची. अभयनी बोल्ट करता दगडात छिद्र बनवले, व बोल्ट निवडून त्यात पाचर टाकून हातोडीने ठोकण्यास सुरुवात केली मात्र, आणि हातोडीचा फटका चुकला व बोल्ट त्या पाचरसहित हवेत उडाला. बोल्ट दोरीला बांधला असल्यामुळे कुठे जाणार नव्हता, पण एकमेव पाचर हवेत उडाल्यामुळे आम्हाला ही चढाई अर्धवटच सोडून द्यावी लागणार होती. माझ्या तोंडाचा "आ" करून मी हताशपणे अभयकडे मान वर करून बघत होतो तोच अभय म्हणाला कि "वाट लागली, पाचर उडाली बहुतेक, आत दिसत नाहीये ह्यामध्ये". मी काही बोलणार तेव्हढ्यात ती हवेत उंच उडालेली पाचर सरळ माझ्या "आ-वासलेल्या" तोंडातून जिभेवर येऊन विसावली. मी काहीही न बोलता व क्षणाचाही विलंब न करता ती पाचर अभयला दिली व सांगितलं की चढाई चालू ठेव. नंतर चढाई यशस्वीरीत्या पूर्ण करून आम्ही दुपारीच पळूच्या लिंगीचा माथा गाठला होता व आणखीन एका अजिंक्य सुळक्यावर चढाई पूर्ण केली होती.
अभयला शेवट पर्यंत नं उलगडलेले कोडं होतं कि माझ्याकडे दुसरी पाचर आली कुठून? त्याने मला खूप वेळा हा प्रश्न विचारला, पण मी त्याला आज पर्यंत सांगत आलो होतो कि "मला झाली......!!" 🤣
नशीब ती पाचर माझ्या जीभेवर येऊन विसावली, “आत गीळली असतीस तर?” उदयने प्रश्न विचारला. त्यावर मी हसतंच म्हणालो “मग त्यात काय प्रॅाबलेम? जास्तीत जास्त उद्या सकाळ पर्यंत थांबावं लागलं असतं व समीट उद्या झालं असतं” 🤣🤣
- अभिजित दांडेकर (फोटो साहाय्य : राहुल खोत)
Harishchandragad via right side gully of Konkankada (Jan 2017)
We were thinking of going to
Harishchandragad via gully to the right side of world famous Konkankada
(while facing it from bottom). When we had undertaken super ambitious
project of climbing Konkankada (KK) via its most difficult and
impossible looking center route in 1988, we had discovered several
routes going to the Fort from the left gulley (Makadachi Naal),
traversing from KK base camp. It took almost 35 days for us to climb KK
via its fascinating center route and going to the fort on weekends was
like relaxation.
Since then, this right gully route was left to
be explored by us, primarily due to its approach to fort was too long.
From the base of Shendi pinnacle, there is no direct approach to
Harishchandragad via KK's left ridge, but has to traverse on the back
plateau then via Junnar Darwaja to Balekilla requiring 3-4 hours after
an exhaustive climb of 4-5 hours upto Shendi pinnacle from base village
of Valivare (Belpada).
But, this time, we had decided to climb
from here in the winter and fixed dates, team members and logistics. We
limited the members to 7 and only experienced climbers were selected.
We knew that the route is difficult, time consuming and challenging so decided to reach base village on the previous day night and start early morning on Saturday (6 am). Due to abnormally high traffic at Kalyan junction, could reach Valivare at 12 in the midnight (after having dinner at Titwala), slept for few hours and were ready to ascend at 7 am.
The route started climbing steadily from Valivare (950 feet elevation) towards KK Base Camp. The overall route is shown "marked up" in below picture. Red line indicates the location of the rock patch where we need to fix the ropes.
The route descended for 15 minutes to the lower plateau through bushes and then traversed for almost 2 hours to reach the base of the final climb. The route until here was virtually non-existent. We had to cut though bushes, locate the path which we lost many times, tripped several occasions, had bruises and cursing ourselves for selecting this difficult terrain. At 3 pm, we reached the base of final climb and estimated that it will take 1.5 hours more to reach the top of fort. We then took a call to head towards Khireshwar, the base village of famous Tolar Khind route. Our estimation was 2.5 hours, but reached Khireshwar at 7 pm instead (4 hours), again traversing many mountain ranges and dried water streams. The route has also broken at 3 to 4 locations making it more difficult.
Finally, everyone was very happy and had a feeling of accomplishment after an exhaustive and difficult trek comprising of 12 hours of non-stop climbing, traversing and descending.
Kudos to the outstanding team members - Abhijit Dandekar, Sujeet Sathe, Vilas Sathe, Pradeep Mhaskar, Sujit Sawant, Girish Sathe & Bhushan Amrute....Cheers !!!!
Shown here are some glimpses captured during this high endurance trek….Enjoy.
- अभिजित दांडेकर

















No comments:
Post a Comment