हा किल्ला बघण्याबाबत सकाळपासून झालेली वणवण या सर्व चित्राने
कुठच्या कुठे पळून गेली. आता इथेच थांबावं पार भरतीच पाणी वर येईपर्यंत...
त्या खिडकीतून पाय मोकळे सोडावे, भरतीच चढलेल पाणी पायांना स्पर्श करतंय,
दाट अंधार पडलाय, वाऱ्याचा स्पर्श आणि लाटांच्या गाजेचा आवाज काय तो
सोबतीला, मस्त टिपूर चांदण पडलंय आणि त्या चांदण्यात न्हाऊन निघालाय तो
केळवे पाणकोट आणि त्याच्या संगे आपण...निवांत नि निश्चल. झाल्या दिवसाची
सांगता अशी काही होती की या सर्व विचारात पापणीला पापणी कधी लागली हे कळलं
देखील नाही...
 |
| आजची टीम -डावीकडून प्रमोद, पराग, मी, प्रिसिलिया (दातिवरे बंदरावरील फोटो) |
अंदाजे दोन वर्षापूर्वी पराग आणि मी फोनवर बोलता बोलता ठरवलं होत
की संस्थेचे ट्रेक आणि आपले दुसरे सगळे उद्योग सांभाळून काही शनिवार
रविवार मोकळेच असतात, असे मोकळे शनिवार रविवार फुकट न घालवता जस जमेल तस
किल्ले फिरायच.... म्हटलं पहिला रायगड जिल्ह्यातल्या किल्ल्यांच्या वाटा
धुंडाळत हळू हळू पुढे सरकू, सुरुवातीचा प्लॅन ठरला आणि निघालो रवी आणि मी
गेलो होतो खंदेरी उंदेरी करायला आणि करून आलो कुलाबा,सर्जेकोट, रेवदंडा,
जंजिरा... पुढच्या वेळी प्लॅन ठरला आणि निघाले पराग आणि राहुल त्यांनी केले
रोहा भागातले बिरवाडी, थळचा किल्ला आणि घोसाळगड... आणि जस ठरल होत तस
आम्ही दोघं काही बाहेर पडलोच नाही...
दोन वर्षानंतर अखेर या रविवारी अचानक योग जुळून आला, पराग आताच
देवकूंड करून आला होता, तर त्याच भागातील अंधारबन ट्रेक करून येऊ अशा
दृष्टीने अभ्यास चालू झाला, पण तिकडे रस्ता मोडलाय वगैरे हे समजल्यावर
प्रीसिलिया आणि मी खुटेधार घाटा बद्दल माहिती जमा करू लागलो, हेही गणित नीट
जुळत नाही तर मी प्रिसिलिया च्या डोक्यात अर्नाळा किल्ल्याबद्दल खुळ घातल
आणि ठरवलं कोणी येवो न येवो आपण इथे जायचंच... ठरलेलं आता पराग च्या कानी
घातलं तर तो म्हणतो ठीक आहे, मी कार काढतो... कार काढतोच बोलल्यावर अर्नाळा
किल्ल्याच्या जवळपासचे किल्ले बघुया म्हणत मॅप वर दातिवरे किल्ला दिसला
आणि बाजूला पालघर विभागातील सागरी किल्ल्यांची शृंखला खुणावू लागली... आणि
अखेर अंधरबन, खुटेधार, अर्नाळा सोडून शिरगावचा किल्ला, महिमचा किल्ला,
केळवे भुईकोट, केळवे पाणकोट, दांडा किल्ला, भवान गड, दतिवरे किल्ला या
किल्ल्यांची सफर करायचं ठरलं...
 |
| ८ जणांच्या गाडीत ४ जण बसून जाण्याचं सुख काही वेगळंच |
ठरला प्लॅन जास्त कुणाच्या कानावर न घालताच निघालो, प्रमोद एक तेवढा
आम्हा तिघांच्यात सामील झाला, सकाळी 5 वाजता पनवेल सोडायचं ठरलं, माझं आणि
परागचं तर बोलणं झालं होत की कोणी नाय आला वेळेत तर मी डायरेक्ट निघणार, पण
अस कुणाला टाकून जायची वेळ काही आली नाही, हे तिघे पनवेल वरून निघाले आणि
मी देखील उरण फाट्याला त्यांना जॉईन झालो. सकाळचं वातावरण असल्याने
गाड्यांची वर्दळ कमी होती, त्यामुळे ट्राफिक काही कुठे लागलं नाही.
तासाभराच्या ड्राईव्ह नंतर सर्वाना भूक लागली होती, जो तो घरून फक्त चहावरच
निघाला होता, घोडबंदर रोडला उडप्याच्या टपरीवर नाश्ता करून बनमस्का पाव
आणि इराणी चहाचा समाचार घेऊन धुक्याच्या दुलईतून गाडी पुढे मार्गस्थ झाली.
आम्ही आज जी काही किल्ल्यांची साखळी बघायची ठरवली होती त्यापैकी केळवे
पाणकोटला ओहोटी असल्यावरच जाता येते, आणि त्यादिवशी ओहोटी दुपारच्या
सुमारास होती, त्यादृष्टीने रूट फायनल करून शिरगावचा किल्ला पहिला बघायचं
ठरवलं आणि ८:१५ च्या सुमारास गाडी आमची शिरगाव गावात पोचली.
शिरगाव किल्ल्याच्या इथे पोचलो, पण किल्ल्याकडे जायची वाट काही
नजरेस येत नव्हती, त्यात मुंबई विभागातील बहुतेक किल्ल्यांना आजूबाजूच्या
वस्तीचा विळखा बसल्याने किल्ल्यात शिरताना बहुधा किल्ल्याला कधी प्रदक्षिणा
होते हे कळत देखील नाही, गाडीतून किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज दिसत होतं,
पण वाट नाही अशी काहीशी फसगत आमची झाली होती. गाडीतून उतरून एका काकींना
किल्ल्यात जायची वाट विचारली तर ही काय समोरूनच अस त्यांनी उत्तर दिल आणि
माझा मीच फिदीफिदी हसत या सर्वांना उतरायला सांगितलं.
 |
| शिरगाव किल्ल्याचा प्रवेशद्वार |
सर्वात पहिला प्रवासाचा मोठा टप्पा यथोचित वेळेत पार झाला होता. गाडी पार्क
करून शिरगावच्या किल्ल्यात प्रवेश केला, मुंबई, पालघर विभागात असलेल्या
सर्व किल्ल्यांमध्ये एकदम सुस्थितीत असलेला हा शिरगावचा किल्ला, त्यामुळे
इथे पाहिजे तेवढा वेळ घेऊया अस ठरवून किल्ल्यात प्रवेश केला. संरक्षित
स्मारक म्हणून सरकार दप्तरी या किल्ल्याची नोंद असल्याचा बोर्ड
किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या इथेच लावला होता, किल्ला संवर्धन करण्याचं
काम चालू आहे अस दर्शवणाऱ्या गोष्टी किल्ल्याच्या बाहेर आणि आत विखुरलेल्या
आहेत. या संवर्धन कामातील सर्वात भारी गोष्ट वाटली ती म्हणजे किल्ल्याच्या
प्रवेशद्वाराच्या अलीकडेच काळ्या ग्रेनाईटवर कोरलेला किल्याचा नकाशा.खूप
ठिकाणी पत्र्याचे बोर्ड असतात, जे कालांतराने गंजून जातात किंवा रंग उडतो,
काही ठिकाणी ग्रेनाईटवर किल्ल्याची माहिती कोरलेली देखील पाहण्यात आली आहे,
पण किल्ल्याचा नकाशा अशा स्वरूपात पाहण्याची हि पहिलीच वेळ. नकाशा समजून
घेताना सूची वाचून "न" पर्याय वाचून तो शोधू लागलो, पण कुठेच दिसेना, बाकी
तिघांना पण लावले कामाला कुणालाच दिसलं नाही, चला या किल्यात पाहिजे असं
थोडंफार खुराक मिळणार असं ठरवून हा गुप्त प्रवेश असलेला भंडारगृह शोधायचा
असं ठरवत महादरवाजाने प्रवेश केला.
 |
| शिरगाव किल्ल्याचा ग्रेनाईटवर कोरलेला नकाशा |
महादरवाजावर सुबक नक्षी कोरलेली आहे, किल्ल्यावरील बांधकाम शैली बघून
पोर्तुगीजांच्या काळी किल्ला बांधला गेला असल्याचं लगेच समजून येत,
सैनिकांसाठी देवड्या आणि एक विसाव्यासाठी असलेली ओसरी देखील तीच अढळ स्थान
टिकवून आहे, दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या इथे परांच्या लावून किल्ला
संवर्धनाचं काम होत असल्याचं कळत होत. आज आम्हा चौघांच्या कपड्यांचा
योगायोग आणि प्रिसिलियाला सुचलेली कॅप्शन इतकी भन्नाट होती कि त्या कॅप्शन
साठी खास फोटो काढण्याचा मोह आम्हाला आवरता आला नाही. मी पिवळा, पराग लाल,
प्रमोद काळा आणि प्रिसिलिला करडी - हळद-कुंकू-अबीर-भस्म.
 |
| हळद-कुंकू-अबीर-भस्म. |
 |
| शिरगावचा किल्ला |
दोन दरवाजातून प्रवेश केल्यावर आपण किल्ल्याच्या प्रांगणात येतो
डाव्या बाजूला होत एक खोली होती, तर त्या खोलीच्या समोरच चौकोनी आकाराची
विहीर होती, विहिरीच्या आजूबाजूला आणि त्या पडझड झालेल्या खोलीच्या इथे गवत
माजलं होत, विहिरीत डोकावून पाहिलं तर विहिरीत कचरा असला तरी पाणी इतकं
स्वच्छ होत की अगदी खालचा तळ एकदम स्पष्ट दिसत होता. जिन्यावरून वर चढत
महादरवाजाच्या वर असलेल्या मनोरा वजा टेहळणी बुरुजावर चढून आजूबाजूचा परिसर
न्याहाळू लागलो.
 |
| महादरवाजाच्या वरच्या भागातील बुरुजावरील मनोरा |
५ बुरुज आणि संपूर्ण तटबंदी सुस्थितीत असलेल्या किल्ल्याचा घेर आता नीट
समजून येत होता. मनोऱ्यातल्या भिंती काही प्रेमवीरांनी अवलीययांनी रंगवून
ठेवल्याच बघून अतोनात वाईट वाटलं. तिथून पुढे होत तटबंदी वरून गडफेरी पूर्ण
करायच ठरवून प्रवेशद्वाराच्या डावीकडच्या म्हणजे वायव्य दिशेच्या
बुरुजाकडे चाल धरली, अवघा २०० x १५० फुटांचा क्षेत्र असलेला हा छोटेखानी
किल्ला खूप सारे अवशेष सांभाळून आहे. वायव्येच्या बुरुजाला देखील मनोरा आहे
आणि बुरुजाच्या वर असलेल्या मनोऱ्यात एक मजला असून त्याच्या छतावर जायला
देखील मार्ग आहे.
एकंदरीत या किल्ल्याचा हा सर्वोच्च स्थान असून येथून पश्चिमेला नजर गेली
असता अथांग पसरलेला अरबी समुद्र डोळे दिपवू लागला. किल्ला, किल्ल्याचा
परीघ, शिरगाव गावाची आणि आजूबाजूच्या परिसराची व्याप्ती आणि हा अथांग
पसरलेला जलसागर... चला, अजून पूर्ण गडफेरी झाली नाही पण पहिलं गंतव्य आज
होणार असलेल्या पूर्ण सफरीच आनंद व्यक्त करत समाधानाची लकेर चेहऱ्यावर
उमटवत होता.
 |
| रावणमाड |
पुढच्या बुरुजाकडे जसे चालायला लागलो तशी एकाकी नजर किल्ल्याच्या मध्यभागी
असलेल्या झाडाकडे गेली, पानांवरून खोडाच्या रचनेवरून हा नारळ किंवा
माडाच्या प्रजातीतील झाड असावा अस वाटत होत, परंतु एखादा डेरेदार वृक्ष कसा
फांद्यांनी बहरावा तशाच असंख्य फांद्यांनी हा झाड बहरला होता आणि त्यावर
तांबूस लाल रंगाची फळे लगडली होती. तेथे एक स्थानिक गावकरी एका लहान
मुलासोबत बेचकी घेऊन आला होता त्याला विचारलं असता त्याने हे माडाचे झाड
असल्याचे सांगितले(घरी येऊन अजून माहीत बघता या झाडाला रावणमाड असेही
म्हणतात हे समजलं).
पुढच्या बुरुजात म्हणजेच नैऋत्ये कडील बुरुजातून आत खाली उतरायला पायऱ्या
होत्या खाली येऊन पाहतो तर एका खोलीत पोचलो तिथे एक मातीने बुजलेला भुयार
होत, तर दुसरी किल्ल्याच्या तटबंदीच्या आतून त्या बुरुजात प्रवेश करणारी
पायऱ्यांची वाट होती जी काही विटांची भिंत बांधून बंद करण्यात आलेली आहे.
 |
| तटबंदीतून बाहेर पडणारी छोटी वाट |
आग्नेयेकडे म्हणजेच समुद्राच्या बाजूला असलेला बुरुज पाहून किल्ल्याच्या
मधल्या भिंतीवरून चालत राहिलेला ईशान्येकडील बुरुज पाहत खाली उतरायला
लागलो, ईशान्येकडील बुरुजात एक तोफ देखील आहे. ती तोफ बघून तटबंदीचा फेरा
पूर्ण केला आणि किल्ल्याच्या प्रांगणात उतरलो, मध्यस्थानी त्या ताडाच्या
झाडाखाली येताच त्या झाडाच्या फळांचा पडलेला खच, संवर्धनासाठी असलेली
अवजारे, चुन्याच्या गोणी आणि इतस्ततः विखुरलेला चुना या सर्वातून वाट काढत
पश्चिम तटबंदी कडे गेलो असताना तटबंदीतून छोटेखानी दरवाजा तटबंदीच्या बाहेर
जातो, नकाशामध्ये जो "न" हा पर्याय दाखवला होता तोच असावा का असे
तर्कवितर्क काढत उर्वरित खोल्यांमध्ये पाहणी करून दक्षिण तटबंदीला लागून
असलेलं तुळशी वृंदावन पाहून गडफेरी आटोपती घेत असताना पाया जवळून नानेटीने
साक्षात्कार देऊन सापांबद्दल असलेली माझी ओढ दाखवून दिली🤣 . तासाभरात ही
गडफेरी पूर्ण करून आमचा जथ्था गाडीत बसून माहीमच्या किल्ल्याच्या दिशेने
रवाना झाला.
शिरगाव माहीम रस्त्याने अवघ्या ८ किमी अंतरावरील माहीम
किल्ल्यापर्यंत पोचतानाचा रस्ता आपण कोकण फिरतोय की काय अशी अनुभूती देत
होता, दोन्ही बाजूला झाडे, निरव शांतता, मध्येच कुठेतरी येणारी खाडी किंवा
झाडांच्या आड दूर दिसणारा समुद्र. याच कारणामुळे आम्ही आज घरून डब्बे न
आणता इथल्याच माशांवर ताव मारायचा अस ठरवून आलो होतो. माहीम गावात येऊन
किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या अगदी समोरच गाडी लावून किल्ल्यात प्रवेश
केला, स्वागताला असलेला पूर्वाभिमुख पूर्णाकृती प्रवेशद्वार किल्ल्याच
किल्लेपण जपत होता. पायऱ्या चढून आत जशी नजर फेकली एखाद्या मोठ्या महालात
असावा तसा दोन दिशांना वळवलेला जिना या किल्ल्याच्या समृद्धतेची जाणीव करून
देत होता.
 |
| समृद्ध गतवैभवाची आठवण करून देणारा माहीम किल्ल्यातील जिना |
आता जर का हे सौंदर्य दिसतंय तर त्यावेळेस काय असेल हे जर का आता
बोललो तर ते अतिशयोक्ती ठरू शकेल. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या
बाजूला तटबंदीत असलेली खोली तर डाव्या बाजूला उध्वस्त वास्तूंचे अवशेष
होते, समोर असलेल्या जिन्याच्या इकडे चाललो असता एक छोटी गोलाकार विहीर
होती. दोन्ही बाजूना भिंती पडलेल्या खोल्यांचे अवशेष होते तर जिन्याच्या आत
खोल्या चांगल्या स्थितीत असलेल्या दिसत होत्या.
 |
| जिना चढून वर चढून आल्यावर असलेली दुमजली पंचकोनी खोली |
त्या प्रशस्त जिन्याने वर चढून वर फांजीवर प्रवेश केला, आणि तिथून
किल्ल्याच्या मागच्या पंचकोनी भागात गेलो, भिंतींना लाकडाचे वासे
अडकवण्यासाठी असलेल्या खाचा अजूनही नीट आहेत, यावरून इथे वर देखील मजला
असल्याचे कळून येते, त्या भागातून बाहेर निघून तटावरून चालायची सुरुवात
केली, तटाला लागूनच किल्ल्याच्या आतल्या भागात कडुनिंबाच झाड चांगलच जोम
धरून वाढलेलं आहे.
प्रत्यक्षात आम्ही ज्या भागात फिरत होतो तो माहीमच्या किल्ल्याचा फक्त
बालेकिल्ला होता, प्रत्यक्षात माहिमचा किल्ला पार समुद्र तटापर्यंत
विस्तारलेला होतो, परंतु काळाच्या ओघात आणि मानवी हस्तक्षेप आणि
अतिक्रमणामुळे सारा भाग नामशेष होऊन बालेकिल्ला तेवढा आता तग धरून आहे
जिन्याच्या एका टोकाने चढून तटावरून गडफेरी करून जिन्याच्या दुसऱ्या बाजूने
उतरून माहिमचा किल्ला देखील पाहून झाला असं म्हणत किल्ल्यातून काढता पाय
घेतला आणि केळवे गावाच्या दिशेने पुढच्या किल्ल्याच्या दिशेने आम्ही
सरकलो.वाटेत एका ठिकाणी उसाचा रस आणि नारळपाणी पिऊन पुढे मार्गस्थ झालो.
माहीम पासून केळवे गाव अगदी ५-६ किमी वर, या किल्ल्यांची हीच खरी गंमत
आहे, जास्त लांबचा प्रवास नाही, किंवा थकवा नाही. गाडीत मागच्या दोन
किल्ल्यांबद्दल आणि पुढच्या मार्गाबद्दल चाचपणी आणि आमच्या चाललेल्या
टिंगलटवाळ्या यात केळवे गावात कधी पोचलो ते कळलच नाही. केळवे गावात दोन
किल्ले एक केळवे भुईकोट जो शितलादेवी मंदिराच्या पुढे उजव्या हाताला
सुरुच्या बनात दडलेला आहे, जिथे सहसा कुणाची वर्दळ नसते, गाडी देखील तिथवर
पोचत नाही, तर दुसरा केळवे पाणकोट जिथे ओहोटी असल्यावरच गाडी केळवे
बंदराच्या इथे लावून चालत जावे लागते. एव्हाना घड्याळाचे काटे ११-११:३०
च्या आसपास गेले होते आम्ही केळवे भुईकोटाच्या दिशेने निघालो, गुगल मॅप वर
किल्ल्याचा काही नीट मागमूस लागत नव्हता, वर उल्लेख केल्याप्रमाणे
शीतलादेवी मंदिराच्या पुढे उजवा रस्ता पकडून गावातल्या लोकांना विचारत
विचारत पुढे जाऊ लागलो, तस एका ठिकाणी गावातल्या मुलाने सांगितलं की गाडी
आत जाणार नाही, गाडी इथेच लावा आणि इथून चालत जा, भेटली आज्ञा शिरोधार्य
मानून गाडी लावून त्या सुरुच्या बनातून आम्ही चालू लागलो, पुढे आलो तर त्या
रस्त्यातच प्री-वेडिंग शूट चालू होतं पार अगदी झाडांना पडदे वगैरे
गुंडाळून मांडवच थाटला होता त्या माणसांनी, मागचे दोन किल्ले फिरलो तिथे
बाहेरच बोर्ड लावले होते प्री-वेडिंग शूट साठी बंदी म्हणून. इथे पण
किल्ल्यात नव्हतं चालू, किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यात चालू होतं, त्याच
पडद्यांना ओलांडत किल्ला कुठे दिसतोय अशी नजर भिरकावत आम्ही चौघे चाललो
होतो. प्रमोदला लांबून एक भिंत दिसली आणि जरा हायस वाटलं कारण मनात एक शंका
घेऊनच आम्ही त्या सुरुच्या बनातून चालत होतो, अखेर किल्ल्यापर्यंत पोचलो,
बाहेरूनच किल्ल्याचा समुद्राकडील भागाचा त्रिकोणी बुरुज कळून येत होता,
त्याला न्याहाळत पूर्वाभिमुख प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केला, वाळू
मुळे अर्धा प्रवेशद्वार गाडून गेला आहे, वाकून त्यातून प्रवेश केला.
 |
| सुरुच्या बनात लपलेला केळवे किल्ला आणि समोरील त्रिकोणी बुरुज |
 |
| केळवे भुईकोट किल्ल्याच्या तटावर काढलेला फोटो |
किल्ल्याच्या आतल्या भागात देखील वाळूचे ढिगारे झाल्यामुळे बराचसा किल्ला
गाडलेल्या स्वरूपातच होता. किल्ल्याचा घेरा एकदम छोटासाच होता आणि त्रिकोणी
बुरुजांमुळे याला चांदणी सारखा आकार प्राप्त झाला आहे, कॉलेज च्या पोरांचे
दोन ग्रुप आले होते आणि त्यांचं मस्त पोझ देऊन फोटोशूट चालू होतं.
किल्ल्याच्या भिंतीवर/तटावर चढून आजूबाजूला अजून काही दिसतंय का बघून तिथला
कोपरा कोपरा पिंजून काढत तिथून काढता पाय घेतला. किल्ल्याची झालेली
दुरावस्था बघून खूप वाईट वाटलं. कालौघात हाही किल्ला अजून किती काळ तग धरून
राहील याची काहीच शाश्वती नाही. इतके सारे विचार करता करता कधी गाडीपर्यंत
पोचलो आणि पुढे रवाना झालो.
आता केळवे पाणकोट हा आम्हाला जवळ होता, पण भरती असल्यामुळे आणि कळत होतं
समुद्राला किती पाणी आहे ते त्यामुळे केळवे पाणकोटला तिथेच रामराम करत
दांडा खाडीच्या रक्षणार्थ बांधलेल्या दांडा किल्ल्याकडे निघालो. केळव्यातून
दांडा खाडी पार करताना असलेल्या पुलावरून समुद्राकडे पाहिलं असता होडीच्या
आकाराचा छोटेखानी केळवे पाणकोट लक्ष वेधून घेत होता. आता नाही, नंतर
कधीतरी अस म्हणतं दांडा किल्ल्यापर्यंत पोचलो देखील.
 |
| वडाच्या अशा पारंब्यांनी दांडा किल्ल्याचा उरला सुरला भाग गिळंकृत केला आहे |
दांडा किल्ला तर अक्षरशः अखेरच्या घटका मोजत उभा आहे, एक चौकोनी विहीर, एक
भुयारवजा खोली जी वरून गवताने पूर्णतः झाकोळली आहे तर आत चिखल गाळाने भरली
आहे, तर बाजूला उभ्या असलेल्या भिंती बाहेर वाढलेल्या वडाच्या झाडाच्या
पारंब्यांनी पार गिळंकृत केलेल्या आहेत. त्या पारंब्यांचाच आधार घेत
भिंतीवर चढलो. मोकळ्या मैदानाच्या एका कोपऱ्यात हे सगळं आहे, बाकी किल्ला
अस म्हणण्यासारखं दुसर काहीच इथे शिल्लक नाही. गावकऱ्यांनी बाजूलाच
सार्वजनिक शौचालय बांधलेले आहेत. अवघ्या ५-१० मिनीटात दांडा किल्ल्यावरून
काढता पाय घेतला आणि आता पुढची स्वारी भवानगडाच्या दिशेने निघाली.
 |
| भरतीच्या वेळी लांबून दिसणारा केळवे पाणकोट |
दांड्या पासून अवघ्या दीड किमी वर असलेल्या भवानगडाकडे जाताना
मनात विचार घोळू लागले की मागे दांडा खाडीच्या पुलावरून जाताना केळवे
किल्लाही दिसत होता आणि केळवेच्या बंदरावर खूप होड्या लागल्या होत्या,
एखादी लहान होडी जरी मिळाली तरी आपलं काम होईल. तिथल्या होडीवाल्यांशी
बोलून बघू, उगाच अस नको व्हायला की आपण बोललो नाही, आणि महत्वाचं हा
राहिलेला एक किल्ला बघायला आपण परत येऊ याची पुसटशी देखील खात्री कोणी देऊ
शकत नव्हता, तसाही आता आम्ही जिथे होतो तिथून केळवे बंदर जास्त लांब
नव्हतं, चर्चेला आलेलं उधाण गाडीला यु टर्न मारून केळवे बंदरात पोचूनच
थांबवलं. तिथल्या मच्छीमारांशी बोलायला गाडीतून उतरलो आणि त्यांना आमची
रामकहाणी सांगितली, पनवेल वरून आलोत, किल्ले बघायचे आहेत,परत यायला जमेल न
जमेल माहीत नाही, इतका समोरून चाललोय तर उगाच अस नको व्हायला की बोललो
नाही, छोटी होडी मिळाली तरी चालेल, त्यांना मनवायचा हरएक प्रयत्न माझा चालू
होता. त्या काकांनी शांतपणे सांगितलं की तिथे होडी लावायला मिळत नाही आणि
तुम्हाला चढायला जमणार नाही पाण्यात होडी असताना. शेवटी त्यांचाही बरोबर
होत म्हणा. इतक्या वर्षांच्या आमच्या अनुभवावरून कुठल्याही भागात गेल्यावर
तेथील स्थानिक लोकांचं म्हणणं कधीच डावलायच नाही अस म्हणत आम्ही तिथून
निघालो, ते काका बोलत होते दुपारपर्यंत थांबा ओहोटी होईल, किंवा २-३
वाजेपर्यंत या तेव्हा तुम्हाला जाता येईल. इतका वेळ थांबणं शक्य नव्हतं आणि
पुढचा प्रवास कसा आहे माहीत नव्हतं त्यामुळे परत येऊ की नाही हे गणित
देखील आता ठरवू शकत नव्हतो. जेवढं गणित जुळतंय तेवढं जुळवूया असा विचार करत
गाडी परत आल्या रस्त्याने मागे फिरवून भवानगडाच्या रोखाने निघालो.
 |
| तटबंदीवर वाढलेलं वडाचं झाड |
भवानगड किल्ला हा छोट्या टेकडीवर आहे, त्यामुळे इथे छोटा ट्रेक
करावा लागतो अगदी १० मिनिटांचा, रस्त्याच्या कडेलाच गाडी लावली आणि त्या
टेकडीवर प्रवेश केला. ती टेकडी मस्त झाडांनी बहरून एक छोटेखानी जंगलच तयार
झालं आहे, टेकडीच्या सुरुवातीलाच गेट होत आणि सर्व बाजुंनी तारेचं कुंपण
घातलेलं आहे. आजचे किल्ले हे सगळे भुईकोट आणि गाडी पार किल्ल्याच्या तटाला
लागते असे होते आणि हा भवानगड तेवढा टेकडीवर त्यामुळे मनात जे ठरलं होत की
आज काही चालायला लागणार नाही आणि समोर अचानक ट्रेक आल्यामुळे हा दहा
मिनिटांचा ट्रेक देखील आमच्या अंगावर आला होता. वरून ऊन आणि टेकडीचा चढ
अंगाची लाहीलाही करत होता. चाल तशी म्हणायला गेलं तर १० मिनिटांची पण
नव्हती, पण मनात जे आजच्या दिवशीच चित्र ठरलं होत त्याच्या विरुद्ध हे
असल्याने ती टेकडी चढायला १० मिनिटे लागलीच असणार. किल्याच्या माचीवर आलो
तिथे भवानगडेश्वराचे नव्याने जीर्णोद्धार केलेले मंदिर आहे. तिथून पुढे
चालू लागलो आणि किल्ल्याच्या तटाला लागलो. इथेदेखील वडाच्या पारंब्यानी
तटबंदी व्यापली आहे आणि तटावर नक्षीदार जाळी विणली आहे, जी सुंदर दिसत असली
तरी त्या तटबंदीच आयुष्य कमी करणारी आहे. पुढे गोमुखी बांधणीच्या
प्रवेशद्वारातून बालेकिल्ल्यात प्रवेश केला. दहा मिनिटांचा का होईना
छोटेखानी ट्रेक, अंगातुन निघालेला घाम, भव्य अशी तटबंदी, आणि गोमुखी
बांधणीच्या भव्य प्रवेशद्वारातुन प्रवेश करताना आता कुठे किल्ल्यावर आलोय
अस आम्हाला वाटत होत.
 |
| गोमुखी बांधणीच प्रवेशद्वार |
प्रवेशद्वाराच्या बाजूलाच पहारेकरांच्या देवड्या आहेत, पुढे जाळीने बंदिस्त
केलेली चौकोनी विहीर होती, पावसाळा आताच सरून गेल्याने विहिरीत पाणीसाठा
देखील मुबलक होता. विहिरीच्या पुढे तसाच तटबंदीवर चढून गडफेरीला प्रारंभ
केला. गवताच रान माजल्यानं तटबंदी संपूर्ण झाकली होती, त्यामुळे एक एक पाऊल
जपून टाकत चाललो होतो. थोड्या वेळापूर्वी बोलल्याप्रमाणे खरंच किल्ल्यावर
आलोय याची प्रचिती होती. तटबंदीच्या फेरा पूर्ण करून महाद्वाराच्या वरच्या
बाजूला असलेल्या झाडाच्या इथे सर्व जण आलो आणि त्या झाडाच्या गार सावलीत
विसावलो, अभ्याक्रमाच्या बाहेरचा प्रश्न आल्यावर जशी काही स्थिती होते,
तसंच आजच्या भुईकोट किल्ल्यांच्या साखळीत हा दमछाक करणारा डोंगरी किल्ला
आल्याने अक्षरशः घामाघूम होऊन आम्ही अर्धेमेले झालो होतो.
 |
| दमछाक |
त्या गर्द सावलीतून आता हलायची देखील इच्छा नव्हती पण ठरल्याप्रमाणे अजून
एक दातिवरेचा किल्ला आमच्या आजच्या यादीत होता, नशिबानं वेळेचं पारडं
आमच्या बाजूने झुकलं होतं, म्हणून आजच्या दिवशीचा अर्नाळा किल्ला ठरवत
असताना पुढे दातिवरे किल्ला दिसला होता, म्हणून आता दातिवरे किल्ल्यापर्यंत
पोचतोय आणि वेळही हातात आहे तर अर्नाळा किल्ला बघूया म्हणत सर्वाना
विचारलं आणि बाकीच्यांनी देखील होकारार्थी मान हालवली. हे सगळं ठरवून
भवानगड उतरायला सुरुवात केली, माचीवर तोंड हात धुवून किल्ला उतरून गाडीत
बसलो, या किल्ल्याच अजून एक झाडी बऱ्यापैकी असल्याने फुलपाखरांच्या विविध
प्रजातींचे दर्शन होत होते. फुलपाखरं बघत बघत आमचं फुलपाखरांबद्दलच ज्ञान
पाजळत आम्ही गडउतार झालो.

पुढचा टप्पा आता दातिवरे किल्ला, दातिवरे किल्ल्याबद्दल जास्त काही
म्हणण्यापेक्षा काहीच माहिती मिळाली नव्हती, गुगल मॅप वर तेवढं लोकेशन
मिळालं होतं तेच, आणि त्याच्याच आधारावर आम्ही हा किल्ला आमच्या यादीत
टाकला होता. गावात प्रवेश केला आणि गुगल मॅप वर दिसत असलं तरी गावकऱ्यांशी
बोलतोच या उद्देशाने प्रिसिलियाने तेथील एका आमच्याच वयाच्या मुलाला
विचारलं - "इथे किल्ला कुठे आहे?" तो मुलगा -"इथे किल्ला आहे ????" त्याच
ते उत्तर आणि चेहऱ्यावरील हावभाव बघून आमच्या तोंडावर बारा वाजले होते. या
विभागातील किल्ले शेवटच्या घटका मोजत आहेत, काही ठिकाणी तरं एखाद-दुसरी
भिंत शिल्लक आहे आणि दांडा किल्ल्यावरून आम्हाला हे समजलंच होत आणि काही
लोकांची किल्ल्यांची संकल्पना हि खूप वेगळी असते, तसंच काहीस त्या मुलाचं
झालं असणार आणि म्हणूनच एकमेकांकडे बघून हसत-हसत गूगल मॅप दाखवत असलेल्या
ठिकाणापर्यंत आम्ही गेलो, समोर एक टेकडी दिसू लागली आणि मंदिर होती,
बाजूलाच मोठं तलाव होतं , तलाव कमळाच्या फुलांनी पूर्ण भरलं होतं, तलावावर
काही गावकरी महिला कपडे धुण्यासाठी आल्या होत्या. समोर आता टेकाड दिसतंय
मोठंमोठे दगड लांबूनच दिसत होते, त्यामुळॆ आपण पोचलोय अशा अविर्भावातच
आम्ही होतो, मंदिरांच्या पुढे आल्यावर आत्ता-आत्ताच बांधलेल्या पायऱ्या चढू
लागलो आणि वरच्या मंदिरापाशी पोचलो, झालं पाहतोय तर वाट संपली आणि पुढे
कुठे जायला काहीच मार्ग नाही, अरे किल्ला कुठे आहे? असे भावविभोर
होऊन आम्ही सारे एकमेकांकडे पाहू लागलो, आणि तो मुलगा तस का बोलला होता याच
कोड आम्हाला आता उलगडलं.
 |
| गुगल बाबा कि |
टेकडीवर असल्याकारणाने अंगाला स्पर्शून जाणारी गार हवेची झुळूक तेथून हलून
देत नव्हती. तिथे असलेल्या झाड-पाचोळ्यात अजून एका छोट्या सापाचे दर्शन
झाले. किल्ल्याची अगोदर काही माहिती काढली नव्हती तरी देखील आता परत थांबून
गुगल बाबा कि जय म्हणत काही माहिती मिळतेय का बघू लागलो. तेव्हा वाचनात आल
कि आम्ही जिथे होतो त्याला हिराडोंगरीचा दुर्ग म्हणतात तर किल्ल्याचे
अवशेष असलेली एक भिंत गावात आहे जी कि वस्तीने पूर्ण वेढलेली आहे. आणि
गावकरी तिला वाडीचा बुरुज असं म्हणतात. एकंदरीत गुगल ने आम्हाला चांगलंच
भरकटवलं होत. तिथून काढता पाय घेऊन गावात कुणाला तरी वाडीचा बुरुज विचारत
विचारत जाऊ किल्ल्यापर्यंत असं ठरवून आम्ही निघालो. समोरच कपडे धुवत
असलेल्या बायकांकडे चौकशी करूया म्हणत मोर्चा तिकडे वळवला. त्यांना विचारलं
वाडीचा बुरुज कुठे आहे ते त्यांना काही कळलं नाही, किल्ला कुठे आहे तेव्हा
त्या आम्ही आलो त्याच टेकडीकडे बोट करून "शिवनेरी पण तिथेच आणि पंढरपूर पण
तिथेच आहे, खूप छान ठिकाण आहे, तुम्हाला आवडेल, भारी आहे, पण वाट नाही,
तुम्हाला जाता येणार नाही, अगदी रंगवून रंगवून सांगू लागल्या". परागने मला
लांबूनच इशारा करून निघण्याची खूण केली परंतु त्यांना मध्येच कुठे तोडायचं
म्हणत त्यांच्या त्या रंगवलेल्या गोष्टी आवरत्या घेत अखेर आम्ही तेथून
निघालो.
 |
| दातिवरे बंदर |
दातिवरे किल्ला आता आहे कि नाही हे काही आम्हाला कळत नव्हतं, आणि गावात पण
कुणाकडे नीट माहिती मिळेल याची कशी शाश्वती नव्हती म्हणून वेळ
घालवण्यापेक्षा निघूया म्हणत गाडीकडे आलो. वाचता वाचता अजून एक गोष्ट
वाचनात आली होती कि दातिवरे गावाच्या बंदरावरून अर्नाळा किल्ला दिसतो असं
म्हणत दातिवरे बंदराकडे निघालो. आणि तसही केळवे पाणकोट बघता न आल्यामुळे
पुढचा ठिकाण अर्नाळा किल्ला करूया म्हणत दातिवरे पासून अर्नाळ्याचं अंतर
बघतोय तर ते झालं ७८ किमी-डायरेक्ट नाही असं एकमत सर्वांच झालं. आणि
दातिवरे बंदरावरून तेवढ अर्नाळा किल्ल्याच दूरून दर्शन घेऊन राहिलेला केळवे
पाणकोट करूया म्हणत गाडी आल्या रस्त्याने परत मागे फिरवली.
सकाळी घोडबंदर रस्त्याला ६-६:३० ला नाश्ता केल्यानंतर भवानगडावरून
दातीवरेला येतानाच भूक लागली होती, पण वाटेत कुठं काही नव्हतंच आणि आता जस
दातिवरे सोडलं तस पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. गाडीत चिवडा सोडला तर
दुसर काहीच खायला नव्हतं आणि महत्वाच त्या वेळेस चिवड्याची भूक लागली
नव्हती आणि ठरवल्याप्रमाणे किनारी भागात आलोय तर इकडचंच खायचं होत.
सकाळपासूनच्या प्रवासात एवढं कळलं होत की आपल्याला जे पाहिजे ते केळवेच्या
इथेच मिळेल कारण तिथेच अशी दुकानं आणि हॉटेल्स होते आणि सकाळी केळवे
गावातून फिरताना केळवे महोत्सव लागलेला पहिला होता. पण महोत्सव तर
संध्याकाळी भरतो म्हणजे आता काही तिथे मिळणार नाही, म्हणत गावात शोधू कुठे
मिळेल ते, केळवे गावात प्रवेश केला आणि तिथे विचारणा केली असता त्यांनी
सांगितलं की पुढे जा इथल्या बहुतेक हॉटेल वाल्यांनी महोत्सवात दुकान
टाकल्याने सगळे तिथेच आहेत. महोत्सवात दुकान टाकलंय म्हटल्यावर त्याच्या
किंमती पण तशाच असणार आणि आमच्या सारखी ट्रेक करणारी माणसं खिश्यात जरा
जपूनच हात घालतात...तरी देखील दुसरे कुठे हॉटेल आहेत का शोधत त्या
महोत्सवाच्या इथे आलो, प्रिसिलिया आजी मी महोत्सवात शिरलो तर पराग आणि
प्रमोद ला पुढे चौकशी करायला जायला सांगितलं.
 |
| तोंडाला पाणी सुटलं ना राव! |
महोत्सवात गेलो आणि वाटलं होत तसच भाव बघूनच पोट भरलं होतं. आणि जी काही
भूक लागली होती, त्यावरून खिशाला चांगलाच फटका बसला होता. तेवढ्यात परागचा
फोन आला, त्याला इथला वृत्तांत सांगितला आणि काही नसेल तुम्हाला मिळालं तर
या इथेच अस सांगितलं. पण परागने त्यांना एका हॉटेल मिळालंय असं सांगितलं
आणि आम्हाला तिकडेच बोलवून घेतलं. हॉटेल कृपा शितलादेवी मध्ये मस्तपैकी
पापलेट, सुरमई, कोळंबीचा यथोचित समाचार घेऊन मोर्चा सोलकढी कडे वळवला,पण
तिथे उरलेला शेवटचा एक ग्लास आमच्या टेबलवर आला. एक एक घोट सोलकढी पिऊन
सोलकढीने केलेला भ्रमनिरास दूर करण्यासाठी दुसऱ्या हॉटेल मध्ये गेलो, तिथे
पण सोलकढी संपली होती...
 |
| गोळा गोळा चम्मच गोळा रंगीबेरंगी गोळा |
थोड्याच वेळापूर्वी त्या महोत्सवात फिरताना एका ठिकाणी सोलकढी पहिली
होती. सोलकढी प्यायचीच या इराद्याने तिकडे जायला देखील आम्ही कमी नाही
केली. महोत्सवात जाऊन ते दुकान शोधलं आणि ४ ग्लास सोलकढी मागवली, पण पराग
बोलला ४ नको एकच द्या...आणि खरंच बर झालं एक ग्लास मागवला ते, सर्वात मुख्य
म्हणजे त्या सोलकढीचा पांढरा रंग पाहून आमच्या मनातूनच ती प्यायची इच्छा
उरली, त्या एका ग्लासाचा एक एक घोट घेताना जो काही तिखट चवीचा ठसका सर्वाना
गेला ना की बर झाल ४ ग्लास नाही मागितली ते, चला परत हिरमोड. अजून कुठे
मिळतंय का बघू लागलो, पण दुसरीकडे कुठेच आम्हाला त्या सोलकढीचे दर्शन झाले
नाही, अखेर सोलकढीची तहान बर्फाच्या गोळ्यावर भागवली. महोत्सवात आलोय तर
फिरून घेऊया म्हणत एक एक दुकानावरून चक्कर टाकत होतो, तिथे म्हणत असलेली
गाणी गुणगुणत चाललो होतो, एकंदरीत या सर्वामध्ये आम्ही इतके गुंतलो होतो की
आपला राहिलेला केळवे पाणकोट किल्ला बघायचा आहे याचा विचार पण काही काळ
मनातून गेला होता. पण एक मात्र चांगलं झालं होत, या सर्वामध्ये ओहोटीची वेळ
देखील झाली होती आणि आम्हाला अस वाट बघत थांबावं नाही लागलं.
महोत्सवातील फेरी तशीच आटोपती घेऊन पाणकोटाच्या दिशेने जायचा म्हणत
गाडी केळवे बंदराच्या इथे लावली. बंदरावर पोचल्यावर ओहोटीमुळे पाणी आत जाऊन
किल्ल्यापर्यंत जायचा मार्ग मोकळा झालेला दिसत होता. विस्तीर्ण पसरलेला तो
किनारा पुळणीच्या पिवळसर रंगाने चमकत होता, ओहोटीमुळे आत गेलेलं समुद्राचं
पाणी आणि तिथे अविरत, अचल समुद्राच्या खऱ्या पाण्याचा लाटांचा मारा
झेलणारा होडीच्या आकारातील केळवे पाणकोट किल्ला दिमाखात उभा होता, सूर्यदेव
वरून तिरपी नजर टाकूनच होते, पण वाऱ्याची झुळूक मनाला सुखावह करून जाणारी
होती.
 |
| भरतीच पाणी ओसरल्यावर मोकळा झालेला केळवे पाणकोट |
किल्ल्याजवळ पोहोचलो, किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार हे जमिनीपासून ८-१० फूट
उंचीवर असून तेवढा भाग चढावा लागतो, अजून दुसरीकडून रस्ता आहे का बघत
किल्ल्याच्या मागच्या बाजूला गेलो असता तिकडे तटबंदी ढासळली होती, आम्ही
तिथून वर जायचं ठरवलं.
 |
| ढासळलेली तटबंदी |
किल्ल्यात प्रवेश करताच क्षणी जाणवलं की हा किल्ला देखील गवत-झाडोऱ्याने
भरलेला आहे, किल्ल्याच्या मागच्या बाजूला म्हणजेच समुद्राच्या बाजूला
असलेला खिडक्यांमध्ये जाऊन बसलो आणि अहाहा... अथांग पसरलेला तो जलस्रोत
त्यावरून अंगाला भिरभिरत जाणारी वाऱ्याची झुळूक, लाटांची गाज, मन मोहून
टाकणारे ते क्षितिज, हा पुळणीचा पसरलेला सडा, किनाऱ्याला लागलेल्या
रंगीबेरंगी होड्या, त्यावर वाऱ्याच्या तालावर फडफडणारे बावटे, केळवे
गावातील बंदराच्या इथे असलेली लोकवस्ती, आणि किनाऱ्याला लागून असलेलं सुरूच
बन. केळवे पाणकोट बघण्याबाबत सकाळपासून झालेली वणवण या सर्व चित्राने
कुठच्या कुठे पळून गेली.
 |
| सुख |
आता इथेच थांबावं पार भरतीच पाणी वर येईपर्यंत... त्या खिडकीतून पाय मोकळे
सोडावे, भरतीच चढलेल पाणी पायांना स्पर्श करतंय, दाट अंधार पडलाय, वाऱ्याचा
स्पर्श आणि लाटांच्या गाजेचा आवाज काय तो सोबतीला, मस्त टिपूर चांदण पडलंय
आणि त्या चांदण्यात न्हाऊन निघालाय तो केळवे पाणकोट आणि त्याच्या संगे
आपण...निवांत नि निश्चल. झाल्या दिवसाची सांगता अशी काही होती की या सर्व
विचारात पापणीला पापणी कधी लागली हे कळलं देखील नाही, प्रमोदच्या आवाजाने
भानावर आलो आणि तिथून उठलो, पूढे आता किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे तिथे येऊन
तिथून उतरण्याचा निर्णय घेतला. एक एक करून सारे उतरलो किनाऱ्याकडे लागलो
आणि गाडी पनवेल च्या दिशेने सुरू झाली.
या भटकंती वरून आल्यानंतर काही गोष्टी खास नमूद कराव्याश्या वाटतात-
१) नवीन ठिकाणी जाताना स्थानिक माणसांचा सल्ला घेणे
२) त्या जागेचा पूर्णपणे अभ्यास करून मगच त्या जागेवर जाण्याबद्दल निश्चित करावे
३) आपण ज्या भागात चाललो आहोत तेथील निसर्गावर व तेथील कुठल्याही
घटकावर आपल्या येण्याचा कुठलाही परिणाम, प्रदूषण, हानी होणार नाही याची
काळजी घ्यावी
४)आपल्या पावलांव्यतिरिक्त तिकडे काही सोडू नका, आणि तिथल्या आठवणींशिवाय तिकडून काही आणू नका.
५) आपण कुठे आणि कुणासोबत चाललोय याची पूर्ण माहिती घरच्यांना देऊन ठेवा
६) निसर्गाच्या पुढे आपण काहीच नाही, त्यामुळे तो जिथे थांबवले तिथे थांबा आणि माघारी फिरा.
भेटूया पुढच्या ट्रेकला...
साभार,
सह्याद्रीचा भटकभवान्या
महत्वाची सूचना:गडकिल्ल्यांवर फिरताना कृपया खालील चित्रामध्ये दिलेले
संकेत काळजीपूर्वक पाळा आणि आपल्याला, सह्याद्रीला, गडकिल्ल्यांना आणखी
हानी होण्यापासून वाचवा.
No comments:
Post a Comment