https://gdbhatkanti.blogspot.com/2020/12/blog-post.html
![]() |
![]() |
| Add caption |
![]() |
| सकाळी बेलपाड्यातून दिसणारा हरिश्चंद्र गड |
बऱ्याच दिवसापासून गड किल्ले , फोटोग्राफी , सायकलिंग साठी भटकंती होत असते. खूप साऱ्या गोष्टी मनाला भावतात त्या शब्द रुपात ब्लॉगमध्ये उतरल्या तर चिरकाल लक्षात राहतील . या हेतूने व बऱ्याच जवळच्या मित्रांनी आग्रह केल्या मुळे ब्लॉग चे लिखाण सुरू करत आहे.
नुकताच २८ व २९ नोव्हेंबर २०२० रोजी रोहिदास शिखर परिक्रमा ट्रेक पूर्ण केला. त्या ट्रेकच्या दरम्यान घडलेले प्रसंग , फोटो या ब्लॉग मध्ये मी लिहीत आहे.
ट्रेकर लोकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. नाशिककरांना राजूर , पाचनई मार्गे सोपा आणि सोईस्कर आहे. त्याशिवाय टोलरखिंड, खिरेश्वर मार्ग मुंबई , पुणे कर जास्त वापरतात.
हे मार्ग पाहून झाले की ट्रेकर लोकांना नळीची वाट , माकड नाळ हे अवघड, रोमांचकारी मार्ग खुणावू लागतात. मागच्या वर्षी आम्ही एकाच दिवसात नळीच्या वाटेने चढाई करून कोकणकडा फेर फटका मारून बैल घाट व साधले घाट मार्गे ट्रेक पूर्ण केला होता. पहाटे पाच वाजता चालू केलेला ट्रेक संध्याकाळी १०=३० वाजता संपला होता. त्याच वेळी आमचा गाईड कमळू ने समोरची माकड नाळ दाखवली होती. तेव्हा पासून ह्या मार्गे कधीतरी नक्की जाऊ असे ठरवले होते.
त्यानंतर सह्याद्रीची घोरपड, कोकणकडा पुत्र अशी ओळख असलेले स्वर्गीय अरुण सावंत सर, सूरज मालुसरे, संजय अमृतकर, तुषार कोठावदे व ग्रुप यांनी माकडनाळ मार्गे हा ट्रेक केला होता. त्यावेळी त्यांनी माकड नाळेतील एका अवघड अशा रॉक पॅच ला बोल्ट मारले होते. जेणे करून इतर ट्रेकर सुरक्षित नाळ चढू शकतील. त्यानंतरच्या कोकणकडा रॅपलिंग व ट्रॅव्हर्स करतांना अरुण सावंत सरांचा दुर्दैवी अंत झाला, अरुण सावंत सर कोकणकड्यात कायमचे सामावले ... 😢
जी व्यक्तीने दुसऱ्या ट्रेकरचा जीव जोखिमेत अडकू नये म्हणून स्वखर्चाने बोलटिंग करते. पण त्यांच्यावरच असा वाईट प्रसंग ओढावला यासारखे दुसरे दुर्दैव ते काय असू शकते. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांचे पाऊल ज्या नाळेतून गेले त्याच मार्गे जाऊन स्वर्गीय अरुण सावंत सरांना श्रद्धांजली अर्पण करायची असे मनोमन ठरविले होते. हा माझा पहिला ब्लॉग त्यांच्या स्मृतीस समर्पित ...
त्यानंतर जगभर कोविड चा हाहाकार माजला, पावसाळा चालू झाला. त्यामुळे आमची ही मोहीम थंडावली होती. पावसाळा संपला , रस्ते , वाहतूक , ट्रेक चालू झाले आणि परत एकदा माकड नाळ मार्गे रोहिदास शिखर परिक्रमा करायची असे ठरले.
२७ तारखेला शुक्रवारी रात्री ८ वाजता निघून १२ ते १ वाजे पर्यंत बेलपाड्याला पोहचून आराम करायचा व पहाटे पाच / सहा वाजता ट्रेक चालू करायचा असे ठरले होते. आमच्या गिरिदुर्ग भटकंती ग्रुपवर तशी पोस्ट टाकली गेली. ट्रेक अवघड आहे फक्त अनुभवी लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले होते. जास्तीत जास्त १५ लोक बरोबर घ्यायचे असे ठरविले होते. तरीही २३ लोकांनी येण्यासाठी होकार दिला.
२५ सीटर बस सांगितली होती. रात्री ८ वाजता येणारी बस १०=१५ वाजता आली. चला हरकत नाही सर्व जण बसले, गणपती बाप्पा मोरया, शिवाजी महाराज की जय घोषणा दिल्या गेल्या. वाडीवर्हे च्या पुढे निघालो आणि ड्रायव्हर ने बस एका बाजूला घेतली. बसचे मागचे एका बाजूने दोन्ही टायर पंचर झाले होते. बस मध्ये एकच स्टेपनी होती. पंचर चे दुकान दीड किमी लांब होते. आमच्या काही तरुण सदस्य ते टायर हायवे वरून लोटत पंचर च्या दुकानाकडे निघाले. पंचर वाला आजारी होता त्याने पंचर काढायला नकार दिला. परत पुढच्या १ किमी वर पंचर दुकान होते तेथपर्यंत जाणे भाग होते. बस ला एका बाजूला एकच टायर लावून रिकामी बस कशी तरी त्या पंचर दुकानात पोहचली. रात्री चे बारा वाजून गेले होते. पंचर वाला तर्राट होऊन झोपला होता. त्याने पंचर काढायला अगोदर होकार देऊन नंतर नकार दिला. रात्रीचे दीड वाजला होता. आमच्या कंपनीची सहन शिलता संपत आली होती. विनंती करूनही पंचर काढून ऐकत नाही म्हणल्यावर प्रकरण हातघाई वर गेले. आजू बाजूचे लोक जमा झाले प्रकरण चिघळत चालले होते. वाद नको म्हणून मध्यस्थी करून प्रकरण मिटवले , परत पुढच्या एका दुकानात वरात निघाली.
तेथे एक १७ /१८ वर्षाचा मुलगा होता. त्याने पंचर काढायला लगेच तयार झाला. आमचा बस ड्रायव्हर दिवस भर ड्राइविंग करून थकला होता. तो झोपून गेला. आमचे तरुण तुर्क पंचर काढणाऱ्या राजुच्या मदतीला सरसावले. त्याने दोन्ही टायर पंचर काढून व्यवस्थित बसवून दिले . घडयाळात तीन वाजले होते. आराम , झोप तर नाहीच नाही पण ट्रेक होईल की नाही या बाबत शंका येऊ लागली होती. पंचर वाल्या राजुचे बिल ३०० रुपये झाले होते. आमच्या मंडळीने ४०० रुपये दिले व त्याचे आभार मानले.
अशा प्रकारे पहाटे साडे तीन वाजता निघून आम्ही बेल पाड्यात सकाळी ७ वाजता पोहचलो. अवघड ट्रेकची सुरुवात अशी अवघड होईल अशी कोणी कल्पना केली नव्हती. मात्र आम्ही पोहचलो आणि ट्रेक होऊ शकतो या कल्पनेने सर्व त्रास विसरून आनंदी झालो होतो.
भाग दुसरा ...
दिनांक - २८ नोव्हेम्बर २०२० , शनिवार .
बेलपाड्यात पोहचता पोहचता सकाळचे ७ वाजून गेले होते . नाशिक पासून अवघ्या १३० की मी. अंतरासाठी आम्हाला तब्बल ९ तास लागले होते. अवघड ट्रेकची अशी अवघड सुरुवात होईल हे कोणाच्या ध्यानी मनी नव्हते. तरीही आमचा ट्रेक होऊ शकेल हाच आनंद मोठा होता.
सूर्य देवता तारामती शिखराच्या आडून वर येऊ पाहत होती. बेलपाडा हे गाव कोकणकड्याच्या अगदी समोर पश्चिमेला वसलेले आहे. त्यामुळे सूर्य दर्शन येथे नेहमी उशीरा होत असते. कोकणकड्याचे दर्शन येथून खूपच विलोभनीय होते. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर पांढरे ढग पिंजून पसरलेले होते. लांबच लांब व उंचच उंच पसरलेला हरिश्चंद्र गड छाती दडपून टाकत होता.
आम्ही २३ जण गावात पोहचलो. नैसर्गिक विधी आटोपुन चहा , नाश्ता करून कोकणकड्याच्या दिशेने चालू लागलो. शेत, जंगल तुडवत जाणारा रस्ता पुढे ओढ्याला जाऊन मिळतो . पावसाळ्यात हा ओढा दुधडी भरून वाहतो . तेव्हा या वाटेने जायचे धाडस कोणी करत नाही. ओढा आत्ता कोरडा झाला होता मात्र काही ठिकाणी पाणी साचलेले दिसत होते. या नितळ पाण्यात छोटे मासे मस्त विहार करत होते. आम्ही मोठं मोठे दगड धोंडे ओलांडत पुढे पुढे जात होतो.
![]() |
| धबधब्याची जागा , मागे कोकणकडा |
हरिश्चंद्रगडाचा
परिसर फार मोठा आहे. पूर्ण गड फिरायचा दोन तीन दिवस कमी पडतील . या गडाला
तीन शिखर आहेत हरिश्चंद्र बालेकिल्ला , तारामती , रोहिदास शिखर यातील
तारामती शिखर सर्वात उंच म्हणजे ४८०० फूट आहे. हा गड माळशेजच्या डोंगर
रांगेत नगर , पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सिमेवर स्थित आहे. मात्र गड नगर
जिल्ह्यात मोडतो. तर कोकणकडा च्या खालचा भाग ठाणे जिल्ह्यात येतो.
आमचा हा ट्रेक कोकणकड्याच्या डाव्या बाजूने जाणाऱ्या नाळेतून जाणार होता. हिलाच माकड नाळ असे म्हणतात. पूर्वी या ठिकाणी खूप माकड असायची असे स्थनिक सांगतात. ट्रेकिंग चा दांडगा अनुभव असल्याशिवाय या नाळेच्या वाटेला शक्यतो कोणी जात नाही. तसेच आरोहन चे तंत्र अवगत असल्या शिवाय जाणे धोक्याचे आहे.
वाटेत एक बंद असलेला वॉटर फॉल येतो याठिकाणी नळीची वाट व माकड नाळ या दोन्ही येऊन मिळतात. पावसाळ्यात दोन्ही बाजूने पाणी एकत्र येऊन मोठा ओढा तयार होतो. हाच ओढा पुढे काळू नदीला जाऊन मिळतो. या भागातून मंगळगंगा व काळू या दोन नद्या उगम पावतात.
पावसाच्या जोरदार प्रवाहा मुळे या नाळा खडक फोडून तयार झाल्या असाव्यात . याच नाळेचा वापर पूर्वी पासून लोक जाण्या येण्यासाठी करत होते. आत्ता रस्ते , दळण वळण चे साधने झाल्यामुळे यांचा वापर बंद झाला आहे. मात्र ट्रेकिंग करणारी मंडळीना सर्व गड किल्ले पाहून झाले की या आड मार्गाचा घाट वाटा खुणावू लागतात.
हरिश्चंद्रगडाला ऐतिहासिक तसेच पौराणिक महत्व पण आहे. या किल्ल्यावर यादवांचे राज्य होते तसेच १७५० नंतर मोगलांकडून मराठयांनी हा किल्ला जिंकून घेतला, असा इतिहास आहे.
माकड नाळ बाहेरून इतकी मोठी असेल हे लक्षात येत नाही. पण जसा आपण तिच्यात प्रवेश करतो तसा तिची लांबी आणि भव्यता लक्षात येते. मोठं मोठे दगड ओलांडत आपला मार्ग वर वर जात राहतो. काही ठिकाणी मोठया आकाराच्या खडकवरून चढतांना चांगलाच दम निघतो.
'एकमेका साह्य करू, अवघे चढू माकड नाळ' या प्रमाणे एकमेकाला साथ करत होते. नाळेच्या एका ठिकाणी जिवंत झरा वाहतो त्याचे पाणी अतिशय थंड व चवदार होते. तेथे पाणी पिऊन रिकाम्या झालेल्या बाटल्या भरून घेतल्या.
विरुद्ध बाजूला नळीची वाट स्पष्ट दिसत होती . तिच्यावर ऊन पडल्यामुळे त्या मार्गाने चढणारी ट्रेकर मंडळी मुंगी सारखी भासत होती.
वातावरण स्वच्छ असल्याने फोटोची आवड असणाऱ्यांना पर्वणीच लाभली होती.
![]() |
| माकड नाळेतील ७० फुटाचा रॉक पॅच |
मजल
दर मजल करत आम्ही एका ७० फुटाचा रॉक पॅच जवळ येऊन पोहचलो. हा टप्पा चढणे
तांत्रिक अवजार असल्या शिवाय अवघड आहे. रोप च्या साहय्याने सेट अप लावला
गेला. हर्णेस कमरेला बांधून, हेल्मेट घालून एक एक जण दोराच्या साहाय्याने
कातळ कडा चढू लागला. या ठिकाणी दगड निसटून डोक्यावर पडण्याची भीती असते
म्हणून हेल्मेट घातल्या शिवाय वर चढू नये. आम्हाला हा टप्पा पार पाडायला
दोन तास लागले. त्यानंतर साधारण पाऊण तासाच्या चढाई नंतर आम्ही रोहिदास
च्या पायथ्याच्या खिंडीत पोहचलो. ही खिंड तारामती व रोहिदास यांना जोडते.
ह्या खिंडीत असलेला शेंडी सुळका लक्ष वेधुन घेतो. हा सुळका सर्वात प्रथम
स्वर्गीय अरुण सावंत सरांनी १९८४ साली आरोहन केला होता.
तेथे त्यांच्या स्मृती जाग्या झाल्या व त्यांना मनोभावे श्रद्धांजली अर्पण केली.
![]() |
| शेंडी सुळका |
आत्ता
दुपार चे दोन वाजले होते . आम्ही २३ जणांनी सकाळी ८=३० वाजता चालू केलेली
माकड नाळ चढाई दुपारी २ वाजता यशस्वी रित्या पूर्ण केली होती. सर्वांच्या
चेहऱ्यावर समाधान दिसत होते . मनावरचा ताण हलका झाला होता.शेंडी सुळक्याचे
वेग वेगळ्या अँगल ने फोटो काढले जात होते. सभोवतालचा नजारा इतका प्रसन्न
करणारा होता की मंडळीना जेवणाचा विसर पडला होता. फोटो सेशन झाल्यावर
सर्वानी तांदळाच्या भाकरी आणि बटाट्याच्या भाजीवर यथेच्छ ताव मारला .
एव्हाना दुपारचे साडे तीन वाजले होते रोहिदास शिखर चढाई करायचे बाकी होते , वेळ फार कमी राहिला होता. रोहिदास शिखर चढणे घसारा असल्याने जिकरीचे होते . शिवाय अंधार पडायच्या आत परत येणे गरजेचे होते. शेवटी आम्ही १० जणांनी शिखरावर जाण्याचा निर्णय घेतला. अगदी छोटीशी कसा बसा पाय बसेल इतकी जागा असलेली वाट. थोडासा अंदाज चुकला तर थेट दरी .... अतिशय काळजी पूर्वक चालावे लागत होते. त्यानंतर जंगलातुन वर चढावे लागते. वेळ कमी असल्याने झाडांच्या खोड , फांद्यांचा आधार घेत पळत पळतच वर चढत होतो. पुढे कारवी चे दाट जंगल लागते. वाट अगदी निसरडी खूप दमछाक होत होती. पुढचा टप्पा खडकातून वर जात होता. अनेक रिस्की पॅच चढून एकदाचा रोहिदास शिखर गाठले. समोरचा नजारा देहभान विसरायला लावेल असा होता. सह्याद्रीचे हे विराट रूप डोळ्यात साठवून घेत होतो. अक्षरक्षा फोटो काढायचे विसरून गेलो होतो. शिखरावर उभे राहायला एकदम कमी जागा होती . जोरदार हवा वाहत होती . वातावरण अतिशय प्रसन्न होते . सूर्य मावळतीला निघाला होता. ढगांचा आडून सूर्य किरण खालच्या बेलपाड्यात sun ray shower ने आंघोळ घालत होते. उत्तरेला सीतेचा डोंगर , अजस्र कोकणकडा , नाप्तां , आजोबा या ठिकाणाहून सह्याद्री चे रौद्र भीषण रूप डोळ्याचे पारणे फेडत होते.
![]() |
| रोहिदास वरून दिसणारा नजारा, कोकणकडा, सीतेचा डोंगर, नाफ्ता. |
तर
दक्षिणेला उधळ्या, सिंदोळा, निमगिरी, भैरवगड, जीवधन , हडसर, खिरेश्वर,
पिपळगाव जोग चे धरण मनमोहक नजारा दिसत होता. या ठिकाणाहून निघूच नये असे
वाटत होते . पाच वाजले होते अंधार पडायच्या आत मुक्कामी ठिकाणी सुरक्षित
पोहचणे महत्वाचे होते. आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. खाली उतरतांना
चांगलीच पंचायत होत होती. आपण वर कसे आलो हेही कळत नव्हते. ७० ते ८०
कोणातील उतरण होती. थोडीशी चूक खूप महागात पडू शकते. शेवटी एका झाडाला दोर
बांधून त्याचा साहाय्याने एक मोठा रॉक पॅच उतरलो.
आमच्या इतर खाली थांबलेल्या मंडळींनी आडराई मधील पाण्याच्या ठिकाणी मुक्कामाची जागा शोधली होती. या ठिकाणी पाण्याचा निर्मळ झरा वाहतो. खडकावरच पथाऱ्या मांडल्या गेल्या. जसा अंधार पडायला सुरुवात झाली तशी थंडी पडायला सुरुवात झाली शेकोटी पेटवली गेली. येथे विपुल प्रमाणात झाडे असल्याने सरपणाला तोटा नव्हता. फक्कड चहा बनवला गेला. माळशेज घाटातून जाणाऱ्या गाड्यांचा लाईट मुळे नागमोडी वळण उजळून निघत होता. जणू दिवाळीत टांगलेल्या दिव्यांच्या माळा दिसत होत्या. इतका मोठा नजारा या अगोदर कधी पाहिला नव्हता.
दगडाच्या चुलीवर स्वयंपाकाची तयारी चालू झाली . गप्पांची मैफल जमली होती. अचानक काळे ढग जमायला सुरुवात झाली पौर्णिमेचा चंद्र झाकोळला गेला. एक दोन थेंब अंगावर पडले . आत्ता जर पाऊस आला तर काय हाल होतील याचा विचार करू लागलो. पण देवालाच काळजी... जोरदार हवा सुटली व ढग दूर सारले गेले. स्वयंपाक होई पर्यंत माळशेज घाटातील गाड्यांचा लाईटचा ट्रेल चा फोटो काढायला जागा शोधत फिरत होतो. स्लो शटर स्पीड वर फोटो काढायचा होता पण ट्रायपॉड आणलेला नव्हता . शेवटी एक मोठा दगड सापडला त्याच्या वर कॅमेरा ठेऊन काही long exposer चे शॉट क्लीक केले.
![]() |
| माळशेज घाटातील गाड्यांची रोषणाई |
गाढ झोपेत असतांना पुण्याहून आलेल्या ग्रुपने जंगलात आग लागली उठा... उठा... आग विझवा... म्हणून आरडा ओरड चालू केली . तेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते.
बरेच जण खडबडून जागे झाले . जंगलात आग लागलेली दिसत होती . ती आग कशी विझवायची हा यक्ष प्रश्न डोळ्यासमोर उभा राहिला. तेथे पाण्याचा साठा मुबकल नव्हता . आजू बाजुचे गवत वाळलेले होते आग पसरली तर बाका प्रसंग उभा राहील याची जाणीव झाली. शूज घालून बरेच जण सज्ज झाले. आमच्या कडे पाणी टाकायला कोणतेही साधन नव्हते. म्हणून आमच्या वाटाड्या कमळूला जोर जोरात आवाज दिला . ज्या बाजूला आग लागलेली दिसत होती तिकडूनच त्याचा आवाज आला. त्याला आग लागली आहे का ? असे विचारले असता तोच मोठी शेकोटी पेटवून झोपला होता असे लक्षात आले.
हे ऐकून जीव भांड्यात पडला पण झोपेचे खोबरे झाले होते. चंद्राचा टिपूर प्रकाशात सर्व परिसर जणू न्हाऊन निघाला होता. रात्र आहे की दिवस असा प्रश्न पडावा इतका सारा परिसर उजळून निघाला होता. शहरात आपल्याला असे क्षण नशिबी नसतात . ते उपभोगायचे असतील तर डोंगर , दऱ्या , निसर्गा तच यावे लागते . जेथे कोणताही कृत्रिम प्रकाश नसेल तेथे ...
हा देखावा बघून मन तृप्त झाले. थकव्यामुळे झोप पण येत होती, थंडीनेही उचल खाल्ली स्लीपिंग बॅगमध्ये स्वतःला कोंबून पुन्हा एकदा निद्रा देवीच्या स्वाधीन झालो.
- दिलीप गिते (7020100445)
- क्रमशः
![]() |
| रोहिदास च्या दिशेने वाटचाल |
![]() |
| माकड नाळ |
![]() |
| Sun shower बाथ |
![]() |
| रोहिदास वरून दिसणारा , कोकण कडा, सीतेचा डोंगर |
![]() |
| रोहिदास शिखर |
![]() |
| जय गिरिदुर्ग , जय शिवराय ! |

















No comments:
Post a Comment