http://sahyadrichabhatakbhavanya.blogspot.com/
डोंगरात फिरताना अनेक माणसांचा
साथ-सहवास-अनुभव मिळत असतो, कधी त्यांच्या सोबत फिरताना तर कधी त्यांच्या
कडून ऐकताना. अशाच या डोंगरातल्या नात्याला बहर येते ती याच माणसांबरोबर
डोंगरात भटकंती करताना. संस्थामक दृष्टीने फिरत असताना, संस्थेच्याच
कार्यक्रमात समाविष्ट होत असल्याने अशा इतर संस्थातल्या या मित्र
परिवारासोबत फिरण्याचा योग मात्र सहजासहजी येत नाही, त्यांच्या बाबतीत
देखील असच.
"Journey is better than destination !!!" |
त्यामुळेच
करू करू म्हणत अखेर योग जुळून आला आणि निसर्गमित्र-पनवेल(विश्वेश, वरद,
पराग, रवी, राहुल, राम, कौस्तुभ, मी), आम्ही
गिर्यारोहक-डोंबिवली(अभिषेक,राज,पल्लवी, सुमुख, स्पृहा, तेजस, प्रवीण) , ऑफ
बीट सह्याद्री-मुंबई(प्रीती, राजस, यज्ञेश, आदी) - अशा तीन संस्थांचा
मिळून आणि अजून एक विश्वेशचा मित्र अक्षय लाड असा गळत-पडत-कलटी देत 20
जणांचा चमू तयार झाला. ट्रेक ठरला शुक्रवारी रात्री प्रवासाला सुरुवात करून
शनिवारी पहाटे शिवथर घळीच्या अलीकडे शेवते गावात उतरून शेवत्या घाटाने वर
चढत केळद ला पोचायचं आणि रविवारी केळद वरून अंधारीच्या वाटेने शिवथरला येऊन
परतीचा प्रवास.
![]() |
| याच एकेरी रस्त्यावरून रात्री बस आणली होती |
२७ जुलै शुक्रवारी रात्री 10
वाजता डोंबिवली वरून बस निघाली, शनिवारसाठी सर्वांना भाकरी घेऊन मी आणि रवी
देखील थोड्याच वेळात बाईकने उलव्यावरून पनवेल ला पोचलो. एव्हाना डोंबिवली
वरून बस आली होती, पनवेलचे पण सगळे जमले होते. मुंबई वरून येणाऱ्या राजस
आणि यज्ञेशची वाट बघत थोडीफार पोटपूजा करून पावणेबाराच्या सुमारास आम्ही
पनवेल सोडलं. खड्डयांनी रस्त्याची अशी दुर्दशा झाली होती की मुंबई गोवा
राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करतोय की एखाद्या दगड खाणीचा कच्चा रस्ता(तो
सुद्धा बरा असेल एक वेळेस). भरपूर दिवसांनी सगळे भेटल्यामुळे बस मध्येच
रंगलेल्या गप्पा, रस्त्यात वाकण ला घेतलेला कटिंग ब्रेक, आणि
खड्ड्या-खड्ड्यातून आदळत-आपटत चाललेला प्रवास.
रात्रीचा प्रवास असल्यामुळे आणि
दुसऱ्या दिवशी मजबूत ट्रेक करायचा असल्या कारणाने मिळेल तेवढा आराम या
उद्देशाने बस मध्येच झोपी गेलो. मी, पराग,वरद, राहुल, अभिषेक मागच्या सीट
वर बसलेलो असल्यामुळे खड्डे जरा जास्तच जाणवत होते, मध्येच एका ठिकाणी
मोठ्या खड्ड्यामुळे मी एकदम अधांतरी गेलो नशीब म्हणावं वरद आणि पराग ला
पटकन धरायला मिळालं नाहीतर माझा पार्श्वभाग आणि मी गेलोच होतो समजा.
अनुभवातून आलेलं शहाणपण म्हणा की आणखी काही तिथून तडक उठलो आणि
ड्रायव्हरच्या केबिन मध्ये विश्वेष सोबत जाऊन बसलो. विश्वेश आणि मुस्तार
(ड्रायव्हर) ची बऱ्यापैकी जमलेली दिसत होती. मुस्तार हा बिहारी बाबू,
तोंडात आपला मस्त चूर्ण टाकून फुल बिहारी टोनिंग मध्ये एक एक सूर भिडवत
बोलत होता.
रात्री साडेतीन च्या आसपास महाड
सोडलं आणि महाड MIDC मार्गे शिवथर कडे निघालो, रात्रीचा तो निबिड अंधार,
एकेरी रस्ता,त्यावर चाललेली आमची एकच बस, MIDC क्षेत्र असे पर्यंत रस्तावर
लाईट होती, नंतर दूर दूरवर पसरलेला काळोख, आणि त्या काळोखातली भयाण
शांतता, वळणा-वळणाचा घाट चढत एक-एक गाव मागे टाकत गाडी चालू होती. एव्हाना
यज्ञेश पण पुढे आला होता कारण शिवथर च्या अलीकडे कुठे थांबायचं हे त्यालाच
माहीत होत. शेवते गावात आम्ही उतरणार हे तेव्हा कळलं. शेवतेच्या थोडं
अलीकडे असताना विश्वेश ड्रायव्हर ला सांगू लागला की "हम लोग अब यहाँसे
निकलेंगे, आपको हमे लेने के लिए दूसरें गाँव आना हैं", अगोदरच हा असा रस्ता
बघून तो ड्रायव्हर कावरा-बावरा झाला होता, आणि विश्वेश ते टाकलेल्या गुगली
वर त्याची अशी काही तंतरली की तो जे काही बोलला ते अजूनही कानात गुंगतय.
तर त्याच म्हणणं अस पडलं(बिहारी स्टाईल ने, एकदम सुर लाऊन)-"नहीं,
नहीं...ऐसा कैसा...हम अकेले नहीं जाएँगे... आप में से कोई एक को तो हमारे
साथ आना ही पड़ेगा .." . अखेर त्या ड्रायव्हरला
सांगत-समजावत पहाटे ४:५० ला गाडी शेवते गावात पोचली. शाळेजवळ थांबून
बाजूच्या एका घरात आम्ही आल्याची वर्दी दिली, बाहेर पाऊस पडत असल्याने बस
मध्येच झोप घ्यायचं ठरलं. विश्वेश, मी आणि तेजसने भल्या पहाटेच भूक भूक करत
तेवढ्या सकाळी दुपार साठी आणलेल्या ठेचा-भाकरीतली एक-एक भाकरी खाऊन
डोळ्यांची पापणी लववली.
![]() |
| सूर्रर्रर्र के पीओ ... |
पावणे सात वाजता जाग आली खरी पण
कोणीच उठण्याच्या मनःस्थितीत नव्हता, काय करावं म्हणत मोबाईल मध्ये गजर
लावला आणि वर बॅग ठेवतात तिथे मोबाईल ठेऊन मी सुद्धा झोपण्याच नाटक केलं.
तो कर्कश गजर वाजायला लागल्यावर जाग तर आलीच पण इतका वाजून सुद्धा कोणी बंद
करत नाही म्हणून सगळे वैतागून अखेर डोळे चोळत तयारीला लागले. त्या
बाजूच्या घरातल्याना चहा सांगितलाच होता, फ्रेश होऊन, चहाचा घोट घेईपर्यंत
वाटाड्याशी देखील बोलणं झालं होत. दोन्ही वाटाड्यांचे नाव दगडू कचरेच,
त्यातल्या एकाने आमच्या साठी ताजा खरवस आणला होता, दुसऱ्या दादांनी देखील
लगेच आमच्यासाठी ताज्या ताकाची कळशी समोर केली.
| शेवते घाटाच्या दिशेने निघालेली टीम |
सकाळी सकाळी दिवसाची अशी दमदार
सुरुवात झाल्यावर ट्रेक करायला पण आता उत्साह आला होता. शेवते गावातून दोन
वाटा केळदला पोहोचतात, एक मढे घाट जो अवघ्या चार तासात केळद ला पोहोचतो, तर
दुसरा शेवते घाट ज्याला सहा ते सात तास लागतात. आम्ही आता सगळे बऱ्यापैकी
चालणारे असल्याने आणि चांगला ट्रेक करायच्याच उद्देशाने आलेलो असल्याने
शेवते घाटातून जायचं ठरलं होत. सकाळी नऊ च्या आसपास ट्रेक सुरू झाला, मस्त
धुकं आणि ढगांचा चाललेला मिलाप त्यामध्ये हिरव्या रंगांच्या विविध छटांची
झालेली लयलूट, त्यावरून सूर मारणाऱ्या त्या जलसरी आणि या सर्वांवर मध्येच
येणारी पांढरी शुभ्र चादर. उन्हाळ्यात रांगडा दिसणारा काळाकभिन्न सह्याद्री
आता मात्र नव्या नवरीप्रमाणे नटला होता. लाजर बावर त्याच रूप मनाला मोहून
टाकत होत.
![]() |
| दुर्गाचा कडा |
पहिलच टेपाड वर चढून गेल्यावर आजूबाजूची
डोंगररांग खूप काही सांगायचं प्रयत्न करीत होती, पण संपूर्ण वातावरण
पांढऱ्या ढगांनी भरून गेल्यामुळे पंधरा-वीस फुटांच्या पलीकडचं काहीच दिसत
नव्हतं, तेजाचा धनी दिसण्याची तर लक्षणच नव्हती, मध्येच थोडे ढग निवळल्यावर
जे मिळतंय ते डोळ्यांत साठवण्याचा अतोनात प्रयत्न आम्हा सर्वांचा चालू
होता. एक सरळसोट कडा थेट नभांना भिडला होता दगडू दादाला विचारता कळलं की
त्याला दुर्गाचा कडा म्हणून संबोधतात. विलक्षण गोष्ट म्हणजे हा दुर्गाचा
कडा पाहून आम्हाला नाणेघाटातल्या नानाच्या अंगठ्याचीच आठवण झाली. घाट
वाटांचा ट्रेक जास्त कोणी करत नसल्यामुळे आणि पावसाळी बेडकांप्रमाणे
उगवणाऱ्या नवख्या ट्रेकर्स कम पर्यटकांना अशा जागांचा मागमूसही नसल्याने हे
निसर्गाचं नितांतसुंदर रूप मुक्तहस्तपणे वेगवेगळ्या दृष्यांची उधळण करत
होता. एक बारीकशी मळलेली वाट, कचऱ्याचा कुठेही लवलेश नाही, ना मानवाचा
कुठल्याच प्रकारे हस्तक्षेप त्यामुळे एक वेगळीच अनुभूती मिळत होती आणि दोन
दिवस आम्ही याच सुखाचा उपभोग घेणार होतो.
![]() |
| धुक्यातून चाललेला प्रवास |
घड्याळाचे काटे पुढे सरकत होते,
पावलांचा वेगही चांगला होता, पावसाची रिप रिप देखील चालू होती. या वाटेत
चालताना मध्ये-मध्ये वाड्या-वस्त्या लागत होत्या, घरांची संख्या देखील
बऱ्यापैकी असायची परंतु रोजगारासाठी या वाड्यांमधील सर्वच लोकांनी आपली
राहती घरे सोडली होती. पांगारी ही त्यातलीच पहिली वाडी. काही
महिन्यांपूर्वी राजस, प्रीती ताई, यज्ञेश आणि त्यांच्या टीम ने
पांगारीमध्येच अशाच एका ओसाड घरात मुक्काम ठोकून त्या भागातली रोज एक अशा
प्रकारे इथल्या सगळ्या घाटवाटा पिंजून काढल्या होत्या. एक घाटवाट करायची
आणि रात्री मुक्कामाला त्या घरात परतायचं,
| वाडीतील ओसाड घरे |
दुसऱ्या
दिवशी दुसरी घाटवाट आणि परत मुक्कामी असा मस्त प्लॅन त्यांनी यशस्वी केला
होता. पांगारी नंतर पिशवी ही वाडी देखील आम्ही आता मागे टाकली होती,
सकाळपासून पोटात जास्त काही गेलं नव्हतं आणि न थांबता चालही बऱ्यापैकी झाली
होती त्यामुळे पोटातल्या आतड्यांची चलबिचल चालू झाली होती. मी, विश्वेश,
तेजसने सकाळीच भाकरींवर ताव मारलेला असल्याने आम्ही अजून लांबवत होतो, पण
जेव्हा याची जाणीव झाली तेव्हा थांबायचा निर्णय झाला आणि थांबलो देखील पण
पावसाच्या सरीने आम्हाला तेथून हुसकावून लावले. थोड्या अंतरावर वाडी आहे
तिथे थांबूया म्हणत चाल धरली, परंतु बहुतेक सर्वांनीच सूर धरल्यामुळे
पुढची(गुगुळशी) वाडी येण्याच्या अगोदरच एक ओढ्याच्या किनारी थांबलो. मस्त
घरून आणलेल्या भाकरी, सोबतीला ठेचा, चटणी यथेच्छ ताव मारून पोटाची क्षुधा
भागवून पुढच्या वाटेला लागलो.
उभ्या-उभ्याच भर पावसात ठेचा-भाकरीवर यथेच्छ मारलेला ताव
| मानवी साखळीने ओढा पार करताना |
| ओढ्यातल्या पाण्यात चाललेला कल्ला |
एव्हाना दिवसाचा प्रहर मध्यानाच्या पुढे गेला होता, गुगुळशी वाडी सुद्धा
आता मागे टाकली होती, वाटेत एक ओढा होता, पाऊस नसल्यामुळे ओढ्याला पाणी कमी
होत, साखळी करून तो ओढा सर्वजण लिलया पार करू शकलो.
का कुणास ठाऊक पण तिथे सर्वांचं बालमन जिवंत झालं आणि मग काय एकमेकांच्या
अंगावर पाणी उडवत, पाण्यात एकमेकांना पाडून, भिजवून मस्त मजा चालू होती,
राहुल एका बाजूला राहून आम्हा सर्वांचे फोटो देखील काढत होता. ओढ्यातली मजा
आटोपती घेऊन पुढचं राहिलेलं अंतर कापायला सुरवात केली. चिरा या वाडीची
हद्द पार करून अखेर अडीच च्या सुमारास आम्ही केळदच्या वेशीवर पोहोचलो.
![]() |
| दोन्ही वाटाड्यांसोबत आमच्या बाकरे बाई ... |
वेळेचं गणित आता आमच्या बाजूला असल्याने मढे घाटातल्या धबधब्याकडे जायचं
ठरलं. तिथल्याच एका टपरीवजा हॉटेल मध्ये गरमागरम चहाचे घोट घेऊन धबधब्याकडे
जायला निघालो, आमच्या सोबतचे दोन्ही वाटाडे आता याच मढे घाटातल्या वाटेने
शेवते ला जाणार होते, त्यांना निरोप देत आम्ही धबधब्याच्या पॉईंट ला पोचलो,
तिथे जमलेली MH 12 पब्लिक आणि त्यातली काही हिरवळ न्याहाळत तो परिसर
धुंडाळून काढला. आपल्याकडे लोणावळ्याला जशी लोक जावीत ना तेवढी नाहीत पण
तशीच थोडीफार लोक इकडे मढे घाटातल्या धबधब्यावर येतात. रिमझिम पडणारा पाऊस,
आणि गार गार थंडी आणि या सर्वात भाजलेल्या मक्याच्या कणीसाची मजा अनुभवली
नाही तर या असल्या मस्त मौसमाचा अपमानच समजावा लागेल. एका हिरवळीचा अंदाज
घेत तिकडून काढता पाय घेतला. वाटेत वडापाव-कांदाभजीवर हात मारून
मुक्कामाच्या दिशेने पावले वळवली.
![]() |
| रात्री रंगलेला मेंढीकोटचा डाव |
सकाळी नऊ वाजता सुरू झालेला पहिल्या दिवसाच्या ट्रेकचा टप्पा
संध्याकाळी पाचच्या आसपास कुठे संपायला आला. दिवसभर भिजलेल्या, गारठलेल्या,
आणि दिवसभराच्या तंगडतोडीनंतर मुक्कामाच्या ठिकाणी पोचून ओले कपडे, शूज
काढून, घातलेले सुके कपडे, आणि त्यात हाफ पॅन्ट हे सर्व म्हणजे दुग्धशर्करा
योगच. अजून एक, सोबतीला चहा हवाच! सर्वांचं आवरून झाल्यावर चहा घेत
दिवसभराचा घेतलेला आढावा आणि दुसऱ्या दिवसाचं थोडंफार नियोजन करून बैठक
थांबवत आता आम्ही आमचा वेळ देण्यास मोकळे झालो होतो. भरपूर दिवसांनी
भेटल्यामुळे गप्पांना अक्षरशः उधाण आलं होत. एकमेकांची खेचत, एकमेकांवर
खिदळत, हा पिकलेला हशा या सर्वांमुळे दिवसभराच्या ट्रेक चा थकवा कुठच्या
कुठे पळून गेला. जेवणाची वेळ झाली आणि लगेच ताटं वाढायला घेतली, संतोष दादा
आणि वहिनींनी आमच्या साठी मस्त बेत बनवला होता. चिकन, भाकरी, पनीरची भाजी,
डाळ, भात, लोणचं, पापड, श्रीखंड अहाहा! एक प्रकारे हा आमचा रॉयल ट्रेकच
होता. यथोचित जेवण करून दिवसभराचा थकला भागला जीव शांत केला.
बसल्या जागी काहीतरी उद्योग
म्हणून पत्ते काढून मेंढीकोटच्या रंगलेला डावात आमच्यावर(मी, सुमुख, राज,
विश्वेश, अभ्या) आलेल्या चार कोटांचा बंगला मोडून समोरच्या(पल्लवी, स्पृहा,
राहुल, पराग,प्रवीण) टीमवर सहा कोटांची बांधलेली बिल्डिंग हे समीकरण खूप
काही हास्यकल्लोळ पिकवून गेलं. प्रीती ताई आणि आदी हे दोघे रात्री येऊन
आम्हाला मिळणार होते, त्यांना आणायला संतोष दादा गेले होते. घड्याळाचे काटे
एक वर कधी गेले कळलेच नाही, एव्हाना बाकी सगळे निद्रेच्या अधीन झाले होते,
आम्ही देखील आमच्या डावाचा समारोप घेतला आणि स्लीपिंग बॅग मध्ये शिरलो.
अशा प्रकारे आमचा संपूर्ण दिवस खूप काही आठवणींनी,अनुभवांनी मार्गी लागला
होता.
क्रमशः
"हिरवी चादर ल्यालेलं, पांढऱ्या धुक्यात, धुक्यातल्या त्या नभात गुडूप होणारं, आणि मेघसरींनी न्हाऊन निघणार, मध्येच कुठे मातकट चिखलाचे शिंतोडे,तर कुठे गवतावर पडलेले गुरांच्या शेणाचे ढिगारे, आणि तृण-पाती-वल्ली-वृक्षांच्या अगणित हिरव्या छटा! अहाहा! अरे काय पाहिजे या जीवाला अजून? आमच्या सुखाची व्याख्या हीच! डोंगरात जाणं, डोंगरात जगणं आणि डोंगर अनुभवणं... बास!!!"
घाटवाटांच्या ट्रेकचा पहिला
दिवस खूप चांगल्या प्रकारे वर्णी लागला होता, दिवसभराच्या त्याच आठवणींना
गोंजारत थकला जीव आडवा होऊन कधी निपचित झाला ते कळलं सुद्धा नाही. रात्री
तीन साडेतीनच्या आसपास प्रीती ताई, आदी आणि त्यांच्यासोबत अजून एक पवन
म्हणून आमच्या घोरण्यात सूर मिळवत आम्हाला सामील झाले.
![]() |
| आमच्या सुखाची व्याख्या हीच! डोंगरात जाणं, डोंगरात जगणं आणि डोंगर अनुभवणं... बास!!! |
सकाळी जाग आली उठून बसलो बहुतेक सगळेच
आडवे होते, अक्षयही लगेच उठला होता. कोणी उठले नाही तर पटकन आपला सकाळचा
कार्यक्रम उरकून घ्यावा म्हणत तिकडे पळालो. थोड्याच वेळात उठ रे उठ रे,
आरडाओरडा करत सर्वानी एकमेकांना उठवले. झोप बऱ्यापैकी मिळाली होती आणि आराम
देखील चांगला मिळाला होता,त्यामुळे कुणाची चिडचिड नव्हती, लगेच सगळी
आवराआवर करून चहा-नाश्त्यासाठी एकत्र जमलो. प्रीती ताईने बॅग भरून खायचं
सामान आणलं होतच त्यात पवन ने पराठे आणले होते आमच्याकडेदेखील थोडाफार खाऊ
होताच. या सर्वांचा फडशा पाडत चहाचे घोट घेऊन दहाच्या सुमारास बॅगा पाठीला
लावून पुढची तंगडतोड करण्यासाठी सज्ज झालो.
| पावलाला पाऊल जोडत निघालेली हीच ती मांदियाळी |
![]() |
| दूर-दूरवर दिसणारा किचकट डांबरी रस्ता |
आजच्या दिवसाच्या सुरुवातीचा ट्रेक थोडा कंटाळवाणा होता कारण
सुरुवातीचं सहा-सात किलोमीटरच अंतर हे डांबरी रस्त्यावरून कापायचं होत.
प्रत्येक ट्रेकर च्या बाबतीत हे असच असतं डोंगरातल्या वाटा-पायवाटा
तुडवताना, मोठ-मोठाले चढ चढताना किंवा दिवसभर तंगडतोड करताना काही वाटत
नाही पण तेच जर का डांबरी रस्त्यावरून चालायचं असेल तर ते एक किचकट काम
होऊन बसत. रस्त्याला लागलो आणि जो तो ज्याच्या त्याच्या वेगाने अंतर कापत
होता यामध्ये आमचेच तीन ग्रुप झाले होते, पुढला मधला आणि मागचा. या
कंटाळवाण्या रस्त्यात मध्येच येणारी सर उगाचच अंग चिकट करून जायची.
मध्ये एका ठिकाणी दगडखाणीच्या खड्ड्यात पाणी साचलं होतो त्यामुळे त्यात पोहण्याच्या इच्छेला आवर घालता आला नाही. मधले आणि मागचे आम्ही तिथे एकत्र आलो होतो, आमचा तिथे एक स्विमिंग ब्रेकच झाला होता, पुढचे तर एव्हाना दृष्टिपल्याड गेले होते. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत, फोटो काढत आमची मस्त मजा चालू होती. सकाळचे अकरा जरी वाजले असले तरी वेळेची मर्यादा होतीच. पोहणं लगेच आवरत घेऊन पुढे गेलेल्यांना गाठायचं ठरवत पावलांना गती दिली. दहा एक मिनिटं चालून झाल्यानंतर तेजसच्या अस लक्षात आलं की त्याचा मोबाईल पोहत होतो तिथेच राहिला, साहेबांनी लगेच तिकडे धूम ठोकली. तेजस येईपर्यंत आम्ही आमचं बास्तान रस्त्यातच मांडून चकाट्या पिटत बसलो होतो. तेजस आला आणि आम्ही पुढची वाट धरली.
![]() |
| रस्त्यात चाललेली मस्ती |
केळद वरून शिवथरला जाण्यासाठी
दोन वाटा आहेत पहिली कर्णावाडीमार्गे बोप्या घाटातून उतरून शिवथर गाठता
येतो तर दुसरी कुंबळे, वाघमाची मार्गे
होडीने नदी पार करून, सांघवी अंधारीच्या वाटेने सह्याद्रीवाडी गाठत पुढे
शिवथरला पोचता येतो. पहिली वाट बऱ्यापैकी सोपी आणि कमी अंतरात होणारी होती
तर दुसरी वाट याच्या उलट म्हणजे थोडी adventures आणि thrill देणारी होती
त्यात पुन्हा होडीची मजा म्हणून आम्ही अंधारीच्या वाटेने खाली उतरायचा
निर्णय घेतला होता. केळद वरून डांबरी रस्त्याने निघाल्यावर चार एक किलोमीटर
अंतर कापल्यावर या दोन्ही वाटा फुटणारा फाटा आला. साहजिकच ठरल्याप्रमाणे
आम्ही बोप्या घाटाची वाट सोडून वाघमाचीकडे
जाणारी वाट धरली. एकवीस जणांचं टोळकं आपल्या पाठीवर गाठोडं घेऊन गाड्यांवर
जायचं सोडून वाट तुडवीत चाललीत बोलल्यावर येणाऱ्या-जाणाऱ्यांचं लक्ष
आपसूकच आमच्याकडे वळायचं आणि त्यातले काही जण विचारायचे सुद्धा की कुठे
चाललात म्हणून.
![]() |
| पल्लवी बाई 🤣🤣🤣🤣 |
अशाच एका आजीने विचारलं तर त्यांना सांगितलं की शिवथरला चाललोय म्हणून, त्यावर आज्जी आणि आमच्यात झालेलं संभाषण-
आज्जी : "पोरांनो कुठं चाललात?"
आम्ही : "शिवथर"
आज्जी : "हितनं कुठं चाललात म? त्यो रस्ता शिवथरला जातो"(त्या आम्हाला बोप्या घाटातून जाण्याबद्दल सांगत होत्या)
आम्ही : "आमची माणसं पुढं गेलीत याच वाटेने , त्यांना माहित आहे रस्ता "
आज्जी : "आर पोरांनो, तो रस्ता लांबचा हाय, या रस्त्याहुना जा"
आम्ही : "आम्ही वाघमाचीतून सांघवी वरून जाणार आहोत"(आम्ही आमचंच घोड दामटवत होतो)
आज्जी: " तिकडं तुम्हाला होडी न्हाय
मिळाची, ऐका पोरांनो" (खूप काळजीपोटी त्या आम्हाला सांगत होत्या, पण तरी
आम्ही मात्र पुढेच चाललोत)
आम्ही: "होडीसाठी बोलणं झालंय आमचं अगोदरच"
(आमच्या या उत्तराने आजीचं देखील समाधान झालं होत, तसच त्यांच्या या काळजीबद्दल आम्हीदेखील थोडं कृतकृत्य झालो आणि पुढे चालू लागलो)
रस्त्यात असच पुढे गेल्यावर
दुचाकीस्वाराने देखील गाडी थांबवून विचारपूस करून बोप्या घाटातून जाण्याचा
सल्ला दिला पण त्यांना सुद्धा पुढचं गणित सांगितल्यावर त्यांनी देखील
आम्हाला शुभेच्छा देत आमचा निरोप घेतला. सव्वाबाराच्या आसपास कुंबळे
गावाच्या इथे प्रीती ताई, राजस आणि बाकीच्यांनी देखील आम्ही येईस्तोवर
ब्रेक घेतला होता, उभ्या उभ्याच बोलणं झालं की - आपला वेग खूप कमी आहे, जर
वेग वाढवला नाही तर खाली उतरायला अंधार होईल. अंधाराची भीती नव्हती पण खाली
लवकर उतरलेल आणि लवकर घरी पोचलेलं आपल्याला आणि आपल्या घरच्यांनाही खूप
सुखदायक असत(तसही रोज घरी लेट येतो म्हणून घरच्यांच्या बोंबाच असतात,
असो!).कुंबळे तुन पुढे जात वाघमाची हे गाव गाठलं. वाघमाची मध्ये होडीसाठी प्रीती ताईने अगोदरच बोलणं करून ठेवलं होत, नावाडी आले आणि आम्ही नदीतीराकडे चालू लागलो.
![]() |
| ट्रेकमध्ये होडीचा प्रवास म्हणजे जणू चार चांद |
| वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा !!! |
आमची सर्वांची संख्या आणि होडीचे आकारमान
बघता आमचे दहा आणि अकरा असे दोन ग्रुप केले. वीसएक मिनिटांचा होडीचा प्रवास
असेल त्यामुळे त्याच वेळात जेवण करता येऊ शकतं म्हणून आणलेल्या जेवणाची
विभागणी करून पहिला गृप होडीत बसला तर आम्ही दुसऱ्या गृपने तिथेच आणलेल्या
शिध्यावर ताव मारायला सुरुवात केली. प्रीतीताईने रात्री येतानाच सर्वांसाठी
भाकरी, पुरणपोळी, आणि चटण्या आणल्या होत्या त्यात सकाळी केळद वरून निघताना
भाजी घेतली होती. सोबतीला दही देखील होतच. खरंच, या ट्रेक मध्ये जणू आमचा
राजेशाही थाटच होता. अर्ध जेवण होतंय ना होतंय तोच पैलतीरावरून अभ्याने
आवाज दिला पोचलो म्हणून. आँ!( वीस मिनिट होडीचा प्रवास म्हटलं होत, आणि हे 5
मिनिटात पोचले देखील...). नावाडी आता कधीही येतील म्हणून पटापट जेवण
उरकायला लागलो तोच नावाडी मामांनी आवाज दिला. बाहेर काढलेलं जेवणाचं सगळं
सामान तसच हातात घेऊन आम्ही होडीत बसलो. या इथेच जेवण हातात घेऊन होडीत
चढताना मी विचित्र प्रकारे पडलो.
अजून एक इथे घटना घडली ती
म्हणजे कसा कोण जाणे पण होडीला दिशा देणारा नांगर अचानक पाण्यात पडला. वरद
आणि यज्ञेशने पाण्यात खाली जाऊन शोधण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. मग
नावाडी मामांनी तशीच होडी वल्हवत त्यांच्या जोडीला यज्ञेश, वरद, राजसने
उगाचची कसरत करून आमचा होडीत बसण्याचा वेळ तेवढा वाढवला, आणि आम्हाला
दुसऱ्या तीरावर पोचवलं. आम्ही दुसऱ्या तीरावर पोचेपर्यंत अगोदर पोचलेल्या
ग्रुपने देखील जेवायची सुरुवात केली होती.
| लागली हे क्षुधा जात असे प्राण । काय हें निर्वाण पाहातोसि ।।-संत तुकाराम |
मन हेलावून टाकणारी गोष्ट
म्हणजे केळद वरून निघाल्यापासून आमच्यासोबत एक कुत्रा आलेला, आतापर्यंतच्या
बहुतेक ट्रेकचा अनुभव असा की प्रत्येक ठिकाणी येणारा कुत्रा हा ट्रेकच्या
शेवटपर्यंत सोबत असायचा. पण इथे मध्ये अचानक नदी लागल्यामुळे त्याला आम्ही
पुढे घेऊ शकलो नाही. पैलतीर गाठून आम्ही त्याच्याकडे बघतच होतो. त्याने
इकडे-तिकडे काही रस्ता आहे का बघायचा अंदाज घेतला आणि थेट पाण्यात सूर
मारला. कुत्र्याच्या
एकनिष्ठतेबद्दल बद्दल खूप ऐकलं होत,एखाद-दुसरी भाकरी आणि दोन-चार बिस्कीट
काय दिली आम्ही त्याला आणि त्याने पोहत येऊन आमच्यासोबत पुढे केलेला ट्रेक
हे सर्व डोळ्यात पाणी आणणारच होत.
| नांगरणीला आलेला वेग |
![]() |
| समाधी शिळा |
आता पुढची चाल धरली, घड्याळाने
दोनचे ठोके दिले होते. शेतांच्या बांधावरची वाट धरून काही ठिकाणी चाललेली
नांगरणी, काही ठिकाणी चाललेल्या लावणीच्या कामांचा वेग हे बघून लहानपणी
काकाच्या शेतावर जाऊन चिखल तुडवायचे दिवस आठवले. तिथून थोडं वर गेल्यावर एक
समाधीवजा दगडी चौथरा दिसला, शेतात काम करणाऱ्या माणसांकडे विचारपूस करून
पल्लवीने सांगितलं की- जे लोक इच्छा व्यक्त करतात त्यांच्या नावाने त्यांचे
वारस अशी शिळा उभी करतात. त्या शिळेच्या पुढे आम्हाला नागमोडी वाट लागली
ही वळणावळणांची वाट पार करून आम्ही एका ट्रॅव्हर्सला(डोंगराला असलेला तिरपा
रस्ता) लागलो.
![]() |
| निसर्गाची किमया मनात भरून घेताना |
जुलैचा शेवटचा आठवडा असल्याने आणि वरुण
राजाची चांगली कृपा बरसल्याने हा दुरदूरवर पसरलेल्या गिरीधारींनी नटलेला
सह्याद्री, खळाळणाऱ्या जलप्रपातांच्या माळा लेवून वनराईच्या साक्षीने
चांगलाच भाळला होता. हळूच मध्ये कुठे होणारा तुषारांचा शिडकाव, वातावरण कस
मदमस्त झालं होत. या अशा धुंद वातावरणात चालताना भान हरपून जात होत, पण
मध्येच कुठे पाय घसरून लटपटल्यावर भानावर यायला व्हायचं. एक डोंगरधार उतरत
असताना दुरूनच काही मोठमोठाले घरांचे शेड्स दिसू लागले. काही कारखाने
किंवा फॅक्टरी आहे असच थोडंफार भासल, लोकवस्तीची अशी काही चिन्ह दिसत
नव्हती. अंदाज आला पोल्ट्रीफार्म असू शकतात, पण लांबून अंदाज बांधणे
चुकीचेच. जवळ गेलो असता कॉक-कॉक-कोकॉक च्या आवाजाने पोल्ट्री फार्मच
असल्याची पुष्टी मिळाली. फार्म बऱ्यापैकी मोठं होत आणि इथे गाड्यांची येजा
असल्याने आताची पायवाट ही पायवाट नसून हायवे झालेली होती.सांघवी गावाच्या
हद्दीतील तो भाग होता.
| अंधारीच्या वाटेची सुरुवात |
![]() |
| स्वर्ग |
![]() |
| अंधारीची वाट |
![]() |
| अंधारीची वाट, जणू अवघड घाट |
![]() |
| बांधा-बांधावरून चाललेली भटक्यांची वारी |
![]() |
| ट्रेक पूर्ण झाल्यानंतर अंघोळ म्हणजे दुग्धशर्करा योगच |
![]() |
| स्वर्गानुभूती ... |
एक अविस्मरणीय अनुभवांचं गाठोडं कनवटीला बांधून या घाटवाटांच्या ट्रेकची सुयोग्य सांगता झाली.
समाप्त.
फोटो क्रेडिट्स -राहुल खोत, रवी खोसे, वरद पवार, पराग सरोदे, राजस देशपांडे,विश्वेश महाजन
कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा वाट बघतोय तुमच्या प्रतिक्रियांची, भेटूयात पुढच्या ट्रेकला.
साभार,
सह्याद्रीचा भटकभवान्या...





















No comments:
Post a Comment