Sunday, July 21, 2024

कळमंज्याचा दरा

 https://giribhramantrekkers.blogspot.com/2022/03/blog-post.html

सदस्य

सलीम बेग

राहुल सूर्यवंशी

तेजस नेने

संकल्प चौधरी

भटकंतीचे बाळकडू मिळाल्यावर नवख्या भटक्यांच्या शिरस्त्याप्रमाणे साधारण दहा - बारा वर्षांपूर्वी रतनगडावर पहिल्यांदा येण झालेलं. तेव्हा कात्राबाई, कर्नाडा, आजोबा यांच्या अतिदुर्गम कातळभिंती आणि तळाचा ठाव सुद्धा न लागणाऱ्या घळी हा नजारा कायमचा मनात कोरला गेला.


कधी आपण अश्या दुर्गम दरीच्या तळाशी जाऊन दिसणारे सह्यवैभव पाहू हा विचारही तेव्हा मनाला शिवला नव्हता, पण जसजसा भटकंतीमध्ये आणि डोंगरदऱ्यांमध्ये मुरत गेलो तसतसे किल्ल्यांसोबत घाटवाटा पालथ्या घालण्याचे पण उद्योग सुरू झाले आणि अनवट जागांचे हे आरस्पानी वैभव मनाचा ठाव घेऊ लागले.

साधारण ६ - ७  वर्षांपूर्वी पहिल्यांदा जेव्हा गुहिरीच्या दाराने आजोबाचा माथा गाठलेला तेव्हाच कर्नाडा आणि कात्राबाईच्या मध्ये असलेल्या कळमंज्याच्या दऱ्याबद्दल ऐकले होते पण म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीचा योग यावा लागतो तसंच काहीसं या वाटेबद्दल झालं. या भागातील पाथरा , गुहिरीचे दार , चिकणदरा अश्या एकाहून एक सरस अन कसदार घाटवाटा पालथ्या घालून झाल्या पण कळमंज्या आम्हाला हुलकावणी देतच होता.पण अखेर २०२० मध्ये सर्व गोष्टी जुळून आल्या आणि आम्ही कळमंज्याच्या भटकंतीला निघालो. 

सुरवातीला फक्त मी आणि तेजस असे दोघच जाण्याचे ठरले असताना आयत्या वेळी राहुल आणि सलीम यांनी होकार कळवल्यामुळे चार जणांची टीम ३ फेब्रुवारी २०२० ला सकाळी १.३० वाजता डेहण्यात पाटेकरांकडे दाखल झालो. तीन तासांची अल्पविश्रांती घेतली . सकाळी बल्लवाचार्य बनण्याची खुमखुमी आली आणि मग मी व तेजसने मिळून गरमागरम कांदे - बटाटा -मटार मिश्रित पोहे बनवले . पोहे हादडून  सव्वापाचच्या सुमारास आम्ही कळमंज्याच्या दऱ्याला जाण्यासाठी डेहण्यातून निघालो. 

गर्द काळोखात लपलेले अजस्त्र पर्वत डोळे फाडून पाहिले तरी दिसत नव्हते, हेड टॉर्चच्या आधारे जाताना पाचव्याच मिनिटाला रस्त्यावर घोणसने दर्शन दिले. त्याच्या वाटेला न जाता आम्ही डांबरी रस्ता सोडून नदीकाठच्या पायवाटेने पुढे जायला निघालो. 

गुहिरीच्या दाराने केलेला आजोबा, चिकणदऱ्याच्या मार्गाने वर जाऊन बारा पायऱ्यांच्या वाटेने केलेला रतनगड या जुन्या मोहिमांचा पट डोळ्यासमोरून सरकत होता तर त्याच वेळी या नवीन वाटेची चाल कशी असेल? , या वाटेवर कश्याप्रकारचा अनुभव येईल ? याची हुरहूर मनाला लागून राहिली होती. या सगळ्या आठवणींच्या हिंदोळ्यात साधारण वीसेक चमकणारे डोळे आपल्याला रोखून बघातायत हेच ध्यानात आले नाही. अंधारात लकाकणारे एवढे डोळे पाहून पाय जागच्या जागी थिजले, भीतीची एक शिरशिरी सर्वांच्या मनात उमटून गेली.  इतक्या जवळून ते सुद्धा अंधारात कोणत्या जनावराचा सामना करण्याचा पहिलाच प्रसंग असल्याने उगाचच वातावरणातील दडपण वाढतंय असं वाटायला लागलं. आम्ही पाचही जणं जागच्या जागी स्तब्ध उभे राहून परिस्थितीचा अंदाज घेऊ लागलो, सुमारे ५ मिनिटांच्या standoff नंतर हळूहळू सावकाशपणे मागे सरकू लागलो, जंगलातल्या त्या नीरव शांततेत full speed ने धडधडणाऱ्या आमच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. तशातच मामांनी दाखवलेल्या पर्यायी वाटेने आम्ही पुढे मार्गक्रमण सुरू केले.

एव्हाना सकाळचे ६ वाजत आले होते , समोर असणाऱ्या सुळक्याच्या मागून सोनेरी प्रभावळ आसमंतात विखरायला सुरवात झाली होती. आम्ही आमच्या पहिल्या Halt point पाशी येऊन पोहोचलो होतो, ही सपाटीची जागा म्हणजे चिकणदऱ्याची सुरवात होय. इकडून पुढे डाव्या बाजूला असलेल्या धारेवरून वाट पुढे जाते आणि वर जाऊन बारा पायऱ्यांच्या वाटेजवळ निघते. मागच्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने पायथ्याला पाणी उपलब्ध होते. इकडे थांबून थोडा सुकामेवा आणि बिस्किटे पोटात टाकून गाडी पुढे दामटली.

चिकणदरा करताना २०१७ मध्ये इथपर्यंत आलो होतो. यापुढे Into the unknown मध्ये प्रवेश केल्यावर पायवाट असा काही प्रकार उरलाच नव्हता, नदीच्या पात्रातल्या दगडांमधून उड्या मारत आम्ही पुढे जात होतो. जसजसे आम्ही कळमंज्याच्या घळीच्या जवळ जात होतो तसतसा रतनगड, अग्निबाणची घळ /चिपाचे दार, कात्राबाईची घळ , कर्नाड्याचे आभाळात शिरणारे कडे असा panorama अजूनच स्पष्ट होत होता. 






 सकाळचे  ७ वाजले होते , डाव्या हाताला असलेल्या रतनगडाच्या खालील कातळभिंतींची शिखरे सोनेरी झालेली आणि आम्ही कळमंज्याच्या तोंडाशी येऊन ठेपलो. 


दूर उंचावर कात्राबाई आणि कर्नाड्याच्या मधील खिंड, जिकडून आम्ही दुसऱ्या बाजूस उतरणार होतो, ती दृष्टीपथास पडली. एकूणच खिंडीचा छोटासा आकार आणि आजूबाजूचे उंचच उंच कडे पाहता दणदणीत अशी नाळेची चढाई आम्हाला करायची होती परंतु हे करताना आम्हाला वेळेचे नियोजन पण तेवढ्याच काटेकोरपणे करावे लागणार होते. कारण या प्रदेशाचा भूगोल पाहिल्यास आपल्याला असे लक्षात येईल की, घाट आणि कोकण यांना जोडणाऱ्या डोंगररांगांच्या उंचीतला फरक इकडे प्रचंड आहे. इकडे रमत गमत उतरणाऱ्या डोंगरांच्या सोंडा नसून उंचच उंच कडे आणि घळी आपल्यातल्या ट्रेकरला आव्हान देत असतात. त्यातच या दुर्गम भागातल्या २ घाटवाटा एका दिवसात करणे म्हणजे  एक प्रकारे आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस पाहण्यासारखे आहे.

"W" आकारातील डावीकडची खिंड कळमंज्याची

पाच मिनिटे विश्रांती घेतली, तेवढ्यात आजूबाजूचे भयचकित आणि विस्मयकारी नजारे कॅमेऱ्यात कैद केले आणि नाळ चढण्यास सुरवात केली. लगेचच दहा मिनिटात आम्हाला पाण्याच्या प्रवाहामुळे तयार झालेला खळगा दिसला. पाण्याची बारीक धार अजूनही वाहत होती. मगाशी चिकणदऱ्याच्या पायथ्याला बाटल्यांमध्ये भरून घेतलेले किंचित गढूळ पाणी ओतून दिले आणि खळग्यातले थंडगार पाणी भरून घेतले.

  



     
पुढे नाळ उतरून कुमशेतला पोहोचेपर्यंत वाटेत पाणी मिळण्याची शक्यता खूपच कमी होती. सुरवातीचा moraine सदृश भाग पार करून आम्ही boulders मध्ये प्रवेश केला आणि इकडेच आम्हाला पुढे नाळेत काय वाढून ठेवलय याची कल्पना आली. बरं नाळेतले छोट्यात छोटे boulders सुद्धा साधारण पुरुषभर उंच, अश्या उंची  दगडांमधून मार्ग काढताना आमची चांगलीच दमछाक होत होती. त्यातूनच  दमट हवामानामुळे आणि वाऱ्याच्या अभावामुळे अजूनच जीव कासावीस होत होता.  लवकरच घामाच्या धारांनी अंगावरचे कपडे डबडबले.

पण ही तर सुरवात होती, जसे आम्ही घळीतून वर जात होतो तसे दगडांचा आकारसुद्धा वाढत होता , काही काही ठिकाणी तर  साधारण 10*10 मीटर आकाराचे प्रस्तर आम्हाला आमचेच खुजेपण दाखवून देत होते.  आमच्या विरुद्ध बाजूच्या कातळभिंती मध्ये असणारी चिकणदऱ्याची वाट आता स्पष्ट नजरेस पडत होती.
सुमारे दिड दोन तासांच्या चढाईनंतर आम्ही नाळेतल्या एका rock patch सदृश formation समोर येऊन उभे ठाकलो. इकडून सरळ चढाई करणे शक्य नसल्याने उजवीकडे असलेल्या कारवीत घुसून हळू हळू वर आलो. इकडून पुढे वाटेत पुन्हा एकदा पाणी लागले परंतु ते पिण्यायोग्य दिसत नसल्याने हातातोंडावर पाण्याचा हबका मारून पुढे निघालो. 


चिकणदऱ्या एवढी उंची घळीत गाठल्यावर रतनगडाच्या धारेमागे लपलेला शिपनूर स्पष्ट दिसू लागला. सुरवातीला प्रशस्त असणारी घळ आता अरुंद होत चालली होती, कात्राबाई आणि कर्नाड्याच्या गगनभेदी प्रस्तरभिंती पाहताना मन दडपून जात होते, मान कितीही वाकडी केली तरी त्या प्रस्तरभिंतींची उंची डोळ्यात सामावून घेता येत नव्हती. सह्याद्रीमधील big wall climbing साठी अतिशय सुयोग्य अश्या या भिंती आहेत, अजूनपर्यंत कोणत्याही प्रस्तरारोहण करणाऱ्या संस्थेने या भिंतींवर आरोहण केल्याचे ऐकीवात नाही त्यामुळे समस्त गिर्यारोहकांसाठी हे खुले आव्हान आहे परंतु या प्रदेशाची दुर्गमता, पाण्याचा अभाव आणि कठीण approach पाहता  हे आव्हान कधी पूर्णत्वास येईल हे माहिती नाही. 





कळमंज्याची खिंड गाठताना साधारण १२०० मीटरची उंची आपण गाठतो पण ही उंची गाठणे हे आमच्यासाठी कर्मकठीण काम ठरत होते. अविरतपणे slow & steady ह्या तत्वानुसार आम्ही वर चढत होतो, छातीचा भाता जोरात धडधडत होता , सकाळी खालून बघितलेली खिंड आता मोठी  भासत होती , बोल्डर्सचा आकार कमी होत चालला होता आणि आम्ही कारवीत प्रवेश केला होता . वर नमूद केलेल्या सर्व गोष्टी खिंड जवळ आल्याचे संकेत देत होत्या त्यामुळे आम्हीसुद्धा जरा सावलीत रेंगाळलो पण सह्याद्रीच्या पर्वतरांगा आमची मिश्कीलपणे खोडी काढत आहेत हे आमच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हते. साधारणपणे ११ वाजता आम्ही ज्या भागाला खिंड समजत होतो तिकडे पोहोचलो पण तिकडे आल्यावर मूळ खिंड अजून बऱ्यापैकी पुढे असल्याचा साक्षात्कार आम्हाला झाला. Tree line मधून बाहेर आल्यामुळे आता उन्हाच्या झळा जाणवत होत्या त्यातच या अधिकच्या चाली मुळे जीव मेटाकुटीला आलेला पण आम्ही नेटाने खिंड लढवत होतो. सरतेशेवटी सुमारे साडेबाराच्या सुमारास आम्ही प्रचंड अशी ती घळ संपवून आम्ही वरच्या खिंडीत पोहोचलो. 





नेहमीप्रमाणेच घाटावरच्या सुखावून टाकणाऱ्या वाऱ्याच्या झुळुका आमच्या स्वागताला हिरीरीने हजर झाल्या. अधेमध्ये त्या अवखळ झुळुका रोरावणाऱ्या वाऱ्यात रुपांतरीत होत होत्या. काहीतरी अकल्पित आणि अगम्य गोष्ट साध्य केल्याची भावना सगळ्यांच्या मनात उमटली. घळीचे एकूणच स्वरूप पाहता ही एखादी घाटवाट असावी आणि याचा वापर घाट आणि कोकणात जाण्या येण्यासाठी वापर होत असावा अशी शक्यता खूपच दुरापास्त वाटत होती. अरुंद आणि बिकट अश्या त्या खिंडीतून समोरच कुमशेतच्या इकडे असणारा वाकडी सुळका , मागे हरिश्चंद्राचे तारामती शिखर, सीतेचा डोंगर, नाप्टा आणि मागे दूरवर माळशेज रांगेतील भोजगिरी आणि घोण्याचे मनमोहक दर्शन घडत होते.


खिंडीमधून घाटावरचा विहंगम नजारा

दुर्गम अशी नाळ चढून आल्यावर सगळ्यांचे चेहरे आनंदाने उजळले होते पण आमचा हा आनंद क्षणिकच ठरला. पुढे उतरून कुमशेत पर्यंत जाणाऱ्या वाटेचा तपशील पाटेकरांना विचारला असता  "खाली उतरून जाणारी वाट माहित नाही " असे सांगत आश्चर्याचा मोठा धक्काच आम्हाला दिला. आगीतून फुफाट्यात अश्या प्रकारची अवस्था आमची झाली. खालून गावातून निघायच्या वेळी "वाट पूर्ण माहिती आहे" , "या आधी वाट केलेली आहे" हे छाती ठोकून केलेले सगळे दावे फोल ठरले होते आणि आमची मात्र विवंचना वाढली होती.  सरतेशेवटी पुढे सरसावत , आतापर्यंतचा भटकंतीमधील अनुभव पणाला लावत कुठून उतरता येईल याची चाचपणी सुरू केली. समोर धबधब्यासदृश्य पाण्याचा सरळ मार्ग सोडून उजव्या हाताला सुमारे साठ सत्तर फुटांवर tree line दिसत होती जी बऱ्यापैकी खाली उतरत होती. exposure डाव्या हाताला ठेऊन ट्रॅव्हर्स मारत आणि सुमारे पंधरा फुटांचे दोनतीन टप्पे सावकाशपणे उतरत आम्ही कसेबसे एकदाचे झाडांमध्ये घुसलो आणि पुढे वाट काढत सुमारे पावणेतीन वाजता मोकळ्या शेतांमध्ये आलो. 

बाणाने दर्शविलेली कळमंज्याची खिंड (कुमशेतच्या बाजूने)

उजवीकडे कात्राबाई तर डावीकडे कर्नाडा

समोरच एक शेताच्या बांधावर डेरेदार झाडाच्या सावलीत बसून जेवण आटपले , कुमशेत गाव जवळच असल्याने जवळ असलेले सगळे पाणी संपवले आणि साडेतीन पावणेचारच्या सुमारास आम्ही पुढची वाट धरली. वाटेत कुमशेत गावात परत एक छोटा ब्रेक घेत पाणी भरून घेतले आणि आमचा मोर्चा गुहिरीच्या दाराकडे वळवला. 

गुहिरीचे दार (कुमशेतच्या बाजूने), डावीकडे आजोबा

२०१५ मध्ये गुहिरीच्या दारातून आजोबाचा माथा गाठलेला, त्यानंतर आता पुन्हा गुहिरीचे दर्शन होणार होते. आजोबाच्या भटकंतीदरम्यान आम्ही एका दिवसात गुहिरीमार्गे चढाई आणि उतराई केलेली, त्यामुळे वाटेची कल्पना होतीच तसेच हे प्रकरण किती वेळकाढू आहे याची सुद्धा जाणीव होती. गुहिरीच्या वरच्या भागात असणारा कातळटप्पा सदृश्य भाग आणि मध्यात असणारा exposure वरचा scree दिवसाच्या उजेडात उतरून जाण्याचा आमचा बेत यशस्वी होईल अशी चिन्हं दिसत नव्हती. कर्नाड्याच्या लांबवर पसरलेल्या सोंडेला वळसा मारून गुहिरीच्या दारात संध्याकाळी पावणेसहा वाजता आम्ही पोहोचलो. 

सूर्य आधीच क्षितिजाआड गेलेला , संधिप्रकाशात शिपनूर आणि चोंढ्या धरणाचा परिसर उजळून निघालेला. हेडटॉर्च काढून गळ्यात लटकवल्या आणि उपलब्ध उजेडाचा शक्य तेवढा फायदा घेण्यासाठी लगबगीने गुहिरी उतरायला घेतले. थोड्याच वेळात आम्ही वरच्या भागातील patch जवळ पोहोचलो. थोडाफार शिल्लक असलेल्या उजेडात सांभाळून आम्ही तो टप्पा पार केला आणि हेडटॉर्चच्या आधारे पुढील वाटचाल सुरू केली. दिवसभराच्या दगदगीने थकवा अंगात भिनला होता , पाय डळमळायला लागले होते, वजनदार rucksack दिवसभर पाठीवर वागवून मानेला आणि पाठीला रग यायला लागलेली आणि या सगळ्याचा परिणाम आम्हाला lapse of concentration च्या स्वरूपात जाणवायला लागला होता. 



भटकंतीमध्ये आपण चढाई जेवढी काळजी घेऊन करतो तेवढीच किंबहुना त्याहून जास्त काळजी आपल्याला उतराई करताना घ्यावी लागते हे सर्वश्रुत आहे. शक्य तितकी काळजी घेत आणि एकमेकांना सांभाळत आम्ही उतरत होतो. सुमारे दीड तासाच्या उतराईनंतर आम्ही खालच्या टप्प्यातील scree च्या वरती येऊन पोहोचलो. ६० ते ७० अंशाचा तो गवताळ टप्पा, जो दिवसा उजेडी पण जिकिरीचा वाटतो तो उतरून जाताना सगळ्यांची भलतीच तारांबळ उडाली, उभ्याने उतरत तोल घालवण्यापेक्षा बूड टेकवणे इष्ट समजत काही ठिकाणी सरळ बसकण मारत उतरलो आणि कसाबसा हळूहळू आम्ही हा टप्पा सुद्धा पार केला. इकडून घळीचा शेवट जास्त लांब नसल्याने सरळ दगडांमधून निघत खालच्या जंगलात आलो आणि जरा मोकळी जागा बघत पाठ टेकवली. घड्याळात पाहिले तर रात्रीचे  ९ वाजत आलेले, रात्रीच्या अंधारात गुहिरी उतरून जायचे दिव्य आम्ही सुखरूपपणे पार पाडले होते. गुहिरी संपेपर्यंत मनावर असणारा ताण निवळल्याने जर हलके वाटत होते. इकडून पुढे नाही म्हटले तरी साधारण दोन तासांची  डेहण्यापर्यंतची चाल बाकी होती. पंधरा वीस मिनिटे आराम करून आम्ही पुढे निघालो. अर्ध्या तासात जंगलातून बाहेर पडत नदीच्या किनारी आलो आणि दगडगोट्यांमधून डेहण्याची वाट तुडवायला लागलो. दशमीची तिथी असल्याने  बऱ्यापैकी चंद्रप्रकाश होता. वाटेत पुन्हा सकाळचे डोळे नजरेस पडले परंतु यावेळी मात्र चांदण्याच्या उजेडात त्या म्हशी असल्याचा उलगडा झाला. शेवटी शेवटी चिंचवाडी पासून डेहण्यापर्यंत डांबरी रस्त्यावरून चालताना पायाचे अक्षरशः तुकडे पडतायत की काय असे वाटायला लागले पण अखेर रात्री अकरा - सव्वा अकराच्या सुमारास परत डेहण्यात पाटेकरांच्या घरी पोहोचलो आणि अजून एका आडवाटेवरच्या भटकंतीचा सुखद अनुभव गाठीशी घेऊन बारा वाजताच्या सुमारास पुन्हा घरची वाट धरली .


आज दोन वर्षानंतर जेव्हा हा ब्लॉग लिहतोय तेव्हा लिखाणाच्या स्वरूपात या वाटांवर पुन्हा एकदा भटकून आलो. हल्ली सोशल मीडियाच्या उद्रेकामुळे आतापर्यंत गर्दी पासून शाबूत असणार्‍या घाटवाटांना पण सुगीचे दिवस आल्याचे चित्र दिसू लागले आहे. ट्रेंडिंग ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचे कड्यावरचे फोटो व रील्स बनवायची जणू अहमहमिकाच सुरू आहे. परंतु या सर्व गोष्टी सह्याद्रीमध्ये अपघातांना निमंत्रण देत आहेत हे पिकनिक छाप भटक्यांना आणि त्यांना घेऊन जाणार्‍या धरपकड ट्रेक ग्रुपना लक्षात येत नाही आहे हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

असो, बाकी डोक्यात नवीन आडवाटांची चक्र फिरतच आहेत, त्याबद्दल लवकरच पुढील ब्लॉग मध्ये…


लेखनसीमा


फोटो आणि व्हिडीओ सौजन्य

संकल्प चौधरी
तेजस नेने

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...