सदस्य
महेश तानपाठक
चित्रेश खेऊर
स्वराज्याची राजधानी रायगड आणि त्याच्या प्रभावळीतला परिसर (खासकरून घाटाच्या बाजूचा) म्हणजे हाडाच्या भटक्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय. गगनावरी गेलेले घाटमाथ्याचे कडे रायगडावरून पहिल्यांदा पाहताना मनात धडकी भरली नसेल असा भटका विरळाच. काळ नदीच्या खोऱ्यातून सरासरी ९५० ते १२०० मी. उंचावलेल्या या रांगेत कुंभ्या घाट, कावळ्या घाट, बोचेघोळ, गायनाळ, निसण, बोराट्याची व सिंगापूरची नाळ, जननीची नाळ, फडताड,भिकनाळ, बिबनाळ, आग्या अश्या एकाहून एक सरस, कसदार आणि अनवट अश्या घाटवाटा लपलेल्या आहेत ज्यांच्या वाटेला सहसा कोणी जात नाही.
फेब्रुवारी २०२१ मध्ये नाणेघाट भागातील घोडेपाण्याची नाळ आणि रिठ्याचे दार केल्यानंतर गायनाळ आणि निसणीच्या घाटवाटेच्या बेताने पुन्हा एकदा उचल खाल्ली. खरंतर गायनाळेचा बेत खूप आधीपासून मनात घोळत होता परंतु काही न काही निमित्त होऊन प्रत्येकवेळी बेत बारगळत होता, सरतेशेवटी ५ मार्चला रात्री मी , महेश आणि चित्रेश असे तिघे जण अनवट अश्या गायनाळ आणि निसण या घाटवाटा पालथ्या घालण्यासाठी सज्ज झालो.
कोकणातून दुर्गम अश्या गायनाळेने घाटमाथा गाठून, अजूनही वापरात असलेल्या तुलनेने सोप्या अश्या निसणीच्या वाटेने खाली येण्याचे आमचे नियोजन होते. त्यानुसार रात्री दादर स्टेशनला भेटून लालपरीने महाड मार्गे पाने गाव गाठण्याचे ठरले. महेशला येण्यास थोडा उशीर होत असल्याने मी आणि चित्रेश बस स्टँड वर जाऊन परिस्थितीचा अंदाज घेऊ लागलो. COVID च्या काळात लालपरीच्या ताफ्यातील बहुतेक गाड्या मुंबई महानगरपालिकेच्या दळणवळण यंत्रणेत ( BEST) मध्ये सामील करून घेतल्यामुळे आधीसारखी ST ची रेलचेल नजरेस पडत नव्हती. दिड तास उलटूनसुद्धा महाडमार्गे कोकणात जाणारी ST येत नव्हती. महाडला पहाटे लवकर पोहोचल्यावर वेळ वाया जाऊ नये म्हणून आमच्या महाडच्या स्नेही भारतीने दिलेल्या गाडीवाल्याने महाड ते पाने या 30 किमी च्या अंतरासाठी सांगितलेली चार आकडी संख्या ऐकून आम्ही कोकणातून जाण्याऐवजी घाटावरून जाऊन ट्रेक करण्याचे ठरवले.
लागलीच रात्री ११ वाजता शेअर गाडीने (Innova) आम्ही पुण्याला जायला निघालो. Express way च्या घाटात ट्रॅफिक असल्याने गाडीवाल्याने जुन्या घाटमार्गे गाडी वळवून सकाळी २ वाजता पुणे स्टेशनला पोहोचवले.तिकडून गाडी बदलून आम्ही पहाटे अडीच वाजता पानशेत मार्गे दिघे गावाकडे निघालो. सलग प्रवास न झाल्यामुळे झोपेचे आधीच खोबरे झाले होते त्यातच पहाटे ४ च्या सुमारास ड्रायव्हर दादा रस्ता भटकल्याने माणगाव वरून डावीकडे वळून घोडखळच्या दिशेने न जाता आम्ही सरळ दापसरेचा रस्ता धरला. नशीबाने झालेली चूक लगेच ध्यानात आल्याने गाडी वळवून घेतली. डोळ्यावर आलेली झोप बाजूला सारून navigation ची सूत्रे पुढे बसलेल्या चित्रेशकडून माझ्या हातात घेतली.
पानशेत सोडल्यानंतर थोड्याच वेळात डांबरी रस्ता इतिहासजमा झालेला आणि आम्ही आता खडी टाकलेल्या रस्त्यावरून गाडी दामटवत होतो परंतु घोडखळ नंतर माती आणि सुट्या दगडांचे साम्राज्य रस्त्यावर पसरले आणि त्यातून गाडी काढण्यात ड्रायव्हरचे कौशल्य पणाला लागत होते. २-३ मातीतले चढ लिलया पार करत आम्ही पुढे आलो परंतु ४.३० वाजता एक तीव्र चढ आम्हाला समोर लागला. गाडीचा ground clearance कमी असल्यामुळे आम्ही तिकडून गाडी वर चढवण्याचे धाडस टाळले आणि गावापासून ४-५ किमी वर गाडी सोडून पायी रस्ता तुडवायला सुरवात केली.
उजाडायला अजून अवकाश होता, hedtorch च्या उजेडात घाटमाथ्यावरच्या आल्हाददायक वारा अंगावर झेलत आणि वातावरणात दरवळणारा सुक्या गवताचा आणि झाडांचा मंद सुगंध उरात साठवत पावले दिघे गावाकडे चालत होती. दूरवर दिघे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सौरदिवे लुकलूक करत होते. तिथवर जाईपर्यंत पूर्वेकडील डोंगरांच्या कडा सोनेरी होण्यास सुरुवात झाली होती. साधारण ६.३० च्या सुमारास आम्ही दिघे आणि चांदर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या junction वर पोहोचलो.
दोन- चार वर्षांपूर्वीच या गावात रस्ता आलेला. मातीचा कच्चा रस्ता अजूनही पक्का होण्याच्या प्रतीक्षेत दिसत होता. डोंगर धारेच्या खालच्याच पदरात छोटीशी टुमदार अशी चांदर गावाची घोकट वस्ती नजरेस पडत होती तर दूरवर मागच्या रांगेत लिंगाणा डोके वर काढून खुणावत होता.
![]() |
| डाव्या हाताला रायलिंग पठार आणि लिंगाणा तर उजव्या हाताची खिंड निसण. |
दिघे
गावाच्या मुख्य वस्ती मधे पोहोचायच्या आधी तुरळक घरे दिसत होती. लाकडी
वासे, मातीच्या भिंती, अंगणाच्या बाजूला गोठा, रचून ठेवलेल्या भाताच्या
पेंढ्या असा एकूणच सुंदर साज घरे ल्याली होती.गावातील मंडळी गुरांना वैरण
घालणे, कोंबड्या त्यांच्या टोपल्यांतून बाहेर सोडणे अश्या सकाळच्या
कामांमध्ये व्यग्र दिसत होती. बाहेर दिसणाऱ्या काही जुन्या खोडांनी तोवर
आमची विचारपूस सुरू केली.
![]() |
| महेश आणि चित्रेश निसर्गावलोकन करताना |
गायनाळेच्या वाटेने खाली जायचे आहे ऐकून बहुतेकांनी वाट पूर्ण मोडलेली आहे, आता कोणी त्या वाटेला जात नाही, तिकडे खूप रान माजले असणार , त्या वाटेला जनावरांचा धोका आहे अश्या अनेक सबबी सांगत आमचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही गायनाळेच्या वाटेवर ठाम होतो. याच सगळ्या गडबडीत कोकरे आजोबा खूपच आग्रह करून आम्हाला घरी येण्यावर जरा जास्तच भर देत होते, कदाचित ४ पैसे कमवायची संधी त्यांना हातची जाऊ द्यायची नव्हती असा विचार उगाचच मनात डोकावून गेला. शेवटी त्यांच्या आग्रहाला बळी पडून त्यांच्या घरी पोहोचलो. सुनबाई चुलीशेजारी भाकरीचे पीठ मळत बसल्या होत्या तर तीन चिल्लीपिल्ली चुलीवर दूध उकळायची वाट पाहत बसली होती. वरच्या फळीवर ठेवलेल्या रेडिओवर सकाळच्या बातम्या चालू होत्या, पुष्कळ वर्षांनी पुन्हा एकदा भटकंतीच्या निमित्ताने असे वातावरण अनुभवायला मिळत होते.
आपल्याकडे शहरी विकासात गावाकडचा असा निरागसपणा कुठेतरी लुप्त झालाय किंवा दुर्मिळ तरी होत चालला आहे. या सगळ्या विचारांच्या मांदियाळीत एकीकडे गरमागरम वरईच्या भाकऱ्या ताटात पडल्या पडल्या पोटात जात होत्या, भरपेट नाश्ता करून सुमारे ८ वाजता आम्ही कोकरे आजोबांसोबत गायनाळेच्या दिशेने निघालो.
![]() |
| अगदी डावीकडे निसणीची खिंड |
सकाळचे कोवळे ऊन आता हळूहळू तीव्र होण्यास सुरुवात झाली होती. सुमारे अर्ध्या तासात आम्ही गायनाळ आणि निसणच्या junction वर येऊन पोहोचलो इकडून डाव्या हाताला जाणारी वाट आपल्याला निसणीच्या खिंडीत नेते तर सरळ गेलेली वाट आपल्याला गायनाळेकडे नेते. निसणीची वाट , चांदर गावाच्या खालील भव्य दरी , रायलिंग आणि लिंगाणा असा नजारा डावीकडे तर दूरवर मान वर काढून बघणारे वारंगीचे कणगे, खानुचा डिग्गा उजवीकडे ठेवत आम्ही गायनाळेच्या दिशेने पुढे सरकत होतो. वाटेत एक दोन ठिकाणी गर्द झाडीच्या पट्ट्यात वाट शोधावी लागली , तोवर जवळच असलेल्या उंबराच्या झाडाकडे आम्ही मोर्चा वळवला. झाडीचा तो छोटासा पट्टा उंबराच्या घमघमाटाने उधळून निघालेला. २-४ मऊशार , लुसलुशीत उंबराची फळ खाऊन होत नाहीत तोवर कोकरे मामांनी तात्पुरती वाट बनवली आणि आम्ही पुढे निघालो. जसजसे आम्ही cliffline च्या जवळ जात होतो तसतसे डोंगररांगेची रुंदी कमी होत होती आणि उताराचा कोन वाढत चालला होता. पुढे आल्यावर उजव्या हाताला मगाशी लांबवर दिसणारे कणगे आणि खानुचा डिग्गा , पदरातली बोचेघोळची वाट , काळ नदीच्या खोऱ्यातले वारंगी गाव, समोरच आडवा पसरलेला भव्य रायगड, गडावरील जगदीश्वराचे मंदिर, टकमक टोक, भवानी कडा असा सगळा नजारा अतिशय स्पष्ट दिसू लागला.
![]() |
| काळ नदीचे खोरे आणि मागे उठावलेला किल्ले रायगड |
![]() |
| गायनाळेच्या आधी लागणार ट्रॅव्हर्स |
गायनाळेच्या खिंडीच्या पलीकडील डोंगरांची टोक एखाद्या उंच फणा काढलेल्या सापाच्या डोक्यासारखी आकाशात उठावलेली, साधारण एक १०-१५ मिनिटांची घसाऱ्यावरची वाट (traverse) पार करून आम्ही खिंडीच्या जवळ पोहोचणार होतो. सुमारे साठ ते सत्तर अंश उतारावरून दरी उजव्या हाताला ठेवत चालत जाणे जरा जिकीरीचे होते, त्यात भरीस भर म्हणजे अश्या वाटांवरचा आमचा हक्काचा आधार म्हणजे कारवीची झाडे सुद्धा उतारावर नव्हती आणि गांडुळांनी संपूर्ण भागातील मातीसुद्धा उकरुन ठेवली होती. एक चुकीचे पाऊल आणि तुमची दांडी गुल असा एकंदर प्रकार असल्याने आम्ही पावले खूप जपून टाकत आम्ही पुढे जात होतो. थोड्याच वेळात आम्ही खिंडीवरील सपाटीवर येऊन पोहोचलो. इकडून समोरच रायलिंग पठाराचे आणि लिंगाण्याचे भव्य दर्शन होत होते परंतु खऱ्या अर्थाने अंगावर काटा तेव्हा आला जेव्हा सपाटीच्या कडेला येऊन कराल अश्या गायनाळेचे प्रथम दर्शन केले. सह्याद्रीचे कडे तिकडून कोकणात अक्षरशः कोसळत होते, नाळेचा तीव्र उतार आणि खोली बघून मनात धडकीच भरली.
![]() |
| गायनाळ |
आताच्या घडीला अतिशय अनवट वाटणाऱ्या वाटेवरून कधी काळी जनावरांची ये - जा व्हायची परंतु नंतर दरड कोसळल्यामुळे वाट पूर्णपणे बंद झाली असे कोकरे आजोबांनी सांगितले. आताशा फक्त इकडे शिकारीसाठी लोकं येतात ते पण खालच्या पदरात, इकडे वर कोणीही कडमडत नाही इति आजोबा.
गावातून निघून इथवर यायला आम्हाला साधारण दीड पावणे दोन तास लागले, वाट मळलेली असती तर कदाचित थोडा कमी वेळ लागला असता. तिकडेच एका झाडाखाली बसून संत्री आणि चिक्की फस्त केली. खाली उतरायला सुरुवात करायच्या अगोदर तिकडेच झाडाच्या बेचक्यात मोबाईल अडकवून चौघांचा एक ग्रुप फोटो काढला.
उन्हाचा तडाखा आता खूपच जाणवायला लागला होता. लहानपणी भिंग वापरून कागदावर सूर्यप्रकाश केंद्रित करून कागद जाळायचे उपद्व्याप करायचो त्याप्रमाणे कोणीतरी वरती भिंग पकडून आमच्यावर सूर्यप्रकाश केंद्रित केलाय असे वाटत होते. कारवीची सुकलेली झाडे, झाडांवरील व पायाखालील दगडांवरील धूळ, हाता-तोंडाला चिकटणारी कोळीष्टके हे सर्व त्या परिसरातील निर्मनुष्यत्वाची साक्ष देत होते. जमेल तिकडून वाट काढत किंवा बनवत आम्ही खाली उतरत होतो. नाळेतून सरळ खाली उतरल्यास आपल्याला खाली कातळटप्पे लागतात परंतु नाळेचा उजवीकडचा कडा जवळ ठेवून खाली उतरले आणि धारेवरील खालच्या बाजूस असलेल्या सपाटीपर्यंत ट्रॅव्हर्स मारून तिकडून उजव्या हाताच्या नाळेतून खाली आल्यास आपल्याला कातळटप्पे लागत नाहीत. जसे आम्ही खाली येऊन Treeline मध्ये प्रवेश केला तसं उन्हाने तगमगलेल्या जीवाला थोडी शांती मिळाली. इकडे झाडीतून वाट काढता काढता आजोबा नाळेच्या मध्यातून डावीकडे सरकले आणि वरच्या बाजूला मी हेरलेली बारीक पायवाट सोडून आम्ही अजून खाली उतरलो, इकडे मात्र गचपण आणि घसारा जास्त वाढल्याने बहुतेक आजोबांना वाट चुकल्याचा साक्षात्कार झाला आणि वरती दिसणाऱ्या पुसटश्या वाटेवर परतायचे ठरवले. परत मागे फिरुन वाट शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा, आहे त्या ठिकाणापासून नाळेच्या उजव्या कातळभिंती कडे आम्ही झाडीतून वाट काढत जाऊ लागलो. सुमारे अर्ध्या तासात भुसभुशीत मातीमधे धडपडणे, सरकून मातीत लोळणे, झाडाला लागून खरचटणे, नाका - तोंडात माती जाणे अशा अनेकविध कसरतीनंतर आम्ही एकदाचे कातळभिंती जवळ पोहोचलो. तिकडून खालच्या सपाटीकडे गेलेली बारीकशी पुसट पायवाट नजरेस पडली. लागलीच आम्ही ती पायवाट पकडून पुढे चालायला सुरुवात केली आणि लगेचच आम्ही मधल्या पठारापर्यंत येऊन पोहोचलो.
दिसायला छोटेसे वाटणारे अंतर पार करायला प्रत्यक्षात मात्र आमचा बराच वेळ खर्ची पडला होता. कोकणात उतरत असल्याने आर्द्रतेमुळे अजूनच जीवाची काहिली होत होती. दुसरी नाळ उतरायला सुरुवात केल्यावर थोड्याच वेळात आम्हाला कातळात एक कपार दिसली. तिकडे बसून चौघांनी पुन्हा एकदा खाऊन घेतले आणि थोडावेळ विश्रांती घेऊन पुन्हा पुढची वाटचाल सुरू केली. दोन महिन्यांच्या अंतराने पुन्हा एकदा दणकट ट्रेक करत असल्याने चित्रेशची गाडी आता डगमगायला लागलेली. ठळक मळलेली वाट अशी कुठे दिसतच नव्हती. कोकरे आजोबांनी आता नाळ सोडून डाव्या हाताला खाली दिसणाऱ्या पोट्याच्या पाड्याच्या मागील पठाराकडे मोर्चा वळवला आणि पुन्हा एकदा उतारावरून आम्ही कारवी आणि झाडांमधून वाट बनवत चालू लागलो. लडखडत्या पावलांनी कारवीतून वाट काढताना चित्रेशची चांगलीच त्रेधातिरपीट उडत होती आणि या सगळ्यामुळे आमचा वेग कमालीचा मंदावत चालला होता. सरतेशेवटी अतिथकव्यामुळे चित्रेशने विश्रांती घेतल्याशिवाय पुढे येण्यास साफ नकार देत जवळच असलेल्या एका झाडाच्या सावलीत बसकण मारली , हे पाहून आम्ही देखील मिळेल त्या झाडाच्या सावलीत पाठ टेकते झालो. सुमारे अर्ध्या तासाच्या Power Nap नंतर आम्ही पुन्हा एकदा संत्री आणि चिक्कीचा खुराक खाऊन पुढील वाटचालीसाठी सज्ज झालो. सोबत आणलेले पाणी सुद्धा संपायच्या बेतात असल्याने आणि निसणीच्या वाटेला जाताना लागणारे पाण्याचे टाके अजून खूप लांब असल्याने पाण्याचा थेंब अन थेंब आम्ही जपून वापरत होतो.
साडेतीन वाजले तरीसुद्धा आम्ही अजून खालच्या पठारावर पोहोचलो नव्हतो. पुढचा लांबचा पल्ला लक्षात घेता आम्ही जरा पटापट पावले उचलू लागलो . उन्हे कलतीला लागल्याने मधूनच येणारी वाऱ्याची झुळूक सुखावून जात होती.
सह्याद्रीची हीच तर खासियत आहे , याच्या डोंगररांगा दुर्गम आहेत पण त्यातून घोंघावणार वारा मात्र अवखळ, मुक्त संचारी आहे. इथल्या वाटा जितक्या अनवट आणि कसदार असतात तेवढंच त्या वाटांवर असणारे पाणी निर्मळ आणि शीतल असते. वडिलांप्रमाणे राकट आणि उग्र असला तरी आईचे वात्सल्य या सह्याद्रीच्या ठायी दडलेले आहे. हल्लीची पिकनिक छाप गर्दी सोडली तर संवेदनशील भटकंती करणाऱ्या दर्दी मंडळींना याचा प्रत्यय हमखास येतो.
सुमारे चार वाजता, म्हणजेच दिघे गावातून निघाल्यापासून सुमारे आठ तासांनी आम्ही गायनाळेची वाट संपवून पदरातल्या सपाटीवर पोहोचलो. लिंगाण्याच्या माथ्यावरून साडीच्या निऱ्यांप्रमाणे दिसणारी डोंगररांग प्रत्यक्षात मात्र अपेक्षेपेक्षा अधिकच भव्य दिसत होती. उतराई करताना सतत खाली बघत असल्याने समोरचे ते उंचच उंच डोंगर बघताना मानेला रग लागत होती. सपाटीवर आल्याने पायांना जरा आराम मिळाला. अगम्य अशी गायनाळ सुखरूप उतरून आल्याने अंगावर मूठभर मांस चढल्यासारखे झाले परंतु आमचे लक्ष्य अजून खूप लांब होते.
![]() |
| गायनाळ उतरून खाली आल्यावर दिसणारा समोरचा अफाट नजारा |
![]() |
| निसणीच्या वाटेकडे जाताना |
![]() |
| निसणीच्या वाटेकडे जाताना |
इकडून
निसणीच्या वाटेला जाण्यासाठी साधारण एक ते सव्वा तास लागेल असे आजोबा
म्हणाले. आमच्या पूर्वअभ्यासित माहितीनुसार वाटेत पाण्याचे टाके लागते
त्यामुळे जवळपासचा सगळा पाणीसाठा काही घोटांमध्ये रिकामी झाला. अंधार
पडायच्या आता काही करून आम्हाला निसण चढून वर पोहोचायचे होते. घाटावरून
दिसणारी भव्य अशी चांदर गावाची दरी आमच्या समोर तर लिंगाणा आणि विस्तीर्ण
असे रायलिंग पठार उजवीकडे ठेऊन आम्ही आता पुढे चालू लागलो. दिवसभराच्या
उन्हाच्या त्रासामुळे आणि पायपीटीमुळे नाही म्हटले तरी आमचा वेग थोडाफार
मंदावला होता. वाट तशी बऱ्यापैकी मळलेली असल्याने चालीत थोडा निवांतपणा आला
होता. पदरातून वाट थोडी वर चढून पुन्हा झाडीत शिरली होती. जंगलाचा थंडावा
आता सुखावह भासत होता. सुमारे पाऊण तासाच्या वाटचालीनंतर आम्ही पाण्याच्या
टाक्याजवळ पोहोचलो. वाळवंटात पांथस्थाला मरूद्यान दिसल्यावर जसा आनंद होईल,
अगदी तशीच काहीशी आमची अवस्था झाली. दगडाच्या कपारीतून पाण्याची जिवंत धार
ओघळत होती आणि त्याच्या खाली टाके खोदून ते पाणी साठवले होते. हे पाणी
बाराही महिने उपलब्ध असते असे कोकरे आजोबांनी सांगितले. मनसोक्त पाणी पिऊन
आणि तोंड धुऊन आम्ही तरतरीत झालो आणि उर्वरित ट्रेकसाठी पाणी भरून आम्ही
निसणीच्या मार्गाला लागलो.
![]() |
| निसणीच्या वाटेला जाताना वाटेत लागणारे एकमेव पाण्याचे टाके |
जसजसे आम्ही निसणीच्या वाटेजवळ पोहोचत होतो तशी चित्रेशची गाडी पुन्हा एकदा लडखडायला लागली. अक्षरशः पाच दहा मिनिटे चालल्यावर तेवढाच वेळ आराम ह्या वेगाने आम्ही पुढे जात होतो. मागे दिसणाऱ्या लिंगाण्यावर आता रक्तवर्णी लालिमा चढायला सुरुवात झालेली. सूर्यास्त व्हायची वेळ जवळ येत चालली होती पण चित्रेशची अवस्था पाहता निसण आम्हाला अंधारात चढून जावी लागणार हे स्पष्ट झाले होते. शक्य तितका संयम राखून कोकरे आजोबा , मी आणि महेश सतत चित्रेशला धीर देऊन त्याचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत होतो. नुकताच जंगलात वणवा लागून गेला असल्याने काही झाडांच्या बुंध्यामधे अजूनही आग धुमसत होती त्यामुळे काही ठिकाणी सांभाळून चढावे लागत होते.
![]() |
| दोन खिंडीपैकी उजवीकडची निसणीची खिंड |
एव्हाना संधिप्रकाश विरून अंधार पडायला सुरुवात झालेली. पुन्हा एकदा हेडटॉर्च सॅक मधून बाहेर आल्या आणि पुढची उर्वरित ८०% चढाई अंधारात पार पाडून सुमारे रात्री ९ वाजता आम्ही निसणीची वाट पार करून घाटावर पोहोचलो. घाटमाथ्यावर पाय ठेवल्यावर पुन्हा एकदा वाऱ्याच्या मंद झुळुका आमच्या स्वागताला हजर झाल्या. दूरवर कोकणातल्या गावांमधले दिवे चमकत होते, मधेच एखाद्या वाहनाचा आवाज कानावर पडत होता. टॉर्च बंद करून लखलखत्या ताऱ्यांची मांदियाळी बघण्यात वेळ कसा निघून गेला ते समजलेच नाही. विशेष म्हणजे निसण चढताना मरगळलेला चित्रेश आता मात्र एकदम ताजातवाना होऊन टुणटुणीत उड्या मारत होता. इकडून पुढे दिघे गाव साधारण तासाभराच्या अंतरावर होते. किशोरची गाणी मनातल्यामनात गुणगुणत कोकरे आजोबांच्या मागे गावचा रस्ता धरला. वाटेतले छोटे मोठे चढ उतार पार करून शेवटी साडेदहाच्या सुमारास आम्ही पुन्हा दिघे गाव गाठले. आमचे ड्रायव्हर सुद्धा गावात येऊन आमची वाट पाहत थांबलेले. पटकन कोकरे आजोबांच्या घरी जाऊन हातपाय धुऊन घेतले, दुपारच्या जेवणासाठी सोबत आणलेले मेथीचे आणि पालकाचे पराठे सूनबाईंनी तव्यावर गरम करून दिले. थोडेफार खाऊन लगेच आवरून घेतले , कोकरे आजोबांना ठरलेले मानधन दिले आणि त्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. आमच्या सुदैवाने गावातील शाळेचे बांधकाम साहित्य पोहोचवण्यासाठी छोटा टेम्पो आलेला, ड्रायव्हर दादांनी त्यांना विनंती करून आम्हाला खाली गाडी पर्यंत सोडायची सोय केली ज्यामुळे सकाळी केलेली ५ किमी ची अधिकची पायपीट वाचली. रात्री ११ च्या सुमारास गाडीत बसल्यावर जे डोळे मिटले ते थेट रात्री २ वाजता पुण्यात नवले ब्रिजला पोहोचल्यावर उघडले. तिकडून सुदैवाने लगेचच मुंबईच्या दिशेने जाणारी Innova मिळाली. जुन्या हायवेने येताना वाटेत मध्ये लोणावळ्याला थांबून गरमागरम मॅगी आणि सँडविच हादडले आणि सुमारे सकाळी पावणे सहाला दादर गाठले.
हातापायांवर पडलेले ओरखडे, थकलेले शरीर , सुजलेले डोळे अश्या अवस्थेत डोळ्यांवर आलेली प्रचंड झोप आवरत आम्ही रविवारी पहाटे स्टेशन वर पोहोचलो पण अफाट आणि अगम्य अश्या गायनाळेचा ट्रेक सुखरूप पार पाडल्याच्या आनंदापुढे बाकी गोष्टी क्षुल्लक वाटत होत्या. सह्याद्रीमधल्या अशा दणकट आडवाटांना भिडायचे असेल तर शारीरिक आणि मानसिक कणखरपणा दोन्ही आवश्यक आहे हे पुन्हा एकदा या ट्रेकच्या निमित्ताने अधोरेखित झाले.
फोटो आणि व्हिडीओ सौजन्य
संकल्प चौधरी
महेश तानपाठक
चित्रेश खेऊर



























No comments:
Post a Comment