Monday, July 22, 2024

घोडेपाण्याची नाळ आणि रिठ्याचे दार

 https://giribhramantrekkers.blogspot.com/2021/02/blog-post.html

      करोना आणि लॉकडाऊनच्या गदारोळात डोंगरात पाऊल ठेवल्याला किती काळ लोटला काही समजलेच नाही. दुधाची तहान ताकावर या उक्तीप्रमाणे जुन्या भटकंतीचे ब्लॉग वाचणे, फोटो पाहणे यावरच मनाचे समाधान करून घेत होतो. नोव्हेंबर महिन्यात सरतेशेवटी प्रिय सह्याद्रीचे दर्शन झाले. २-३ छोट्या मोठ्या भटकंतीमध्ये रमलो सुद्धा पण आपल्या आवडीच्या कसदार अश्या घाटवाटांमध्ये अजून भटकंती बाकी होती. हिच खुमखुमी कमी करण्यासाठी आम्ही पुणे जिल्ह्यातील २ घाटवाटांचा बेत निश्चित केला, त्याप्रमाणे तयारी देखील सुरू केली परंतु आयत्या वेळी प्रियांकाने माघार घेतल्याने मी आणि तेजस आम्ही दोघांनीच ट्रेकला जायचे ठरवले.  पुण्यातील घाटवाटांचा लांबचा पल्ला आणि रात्रीच्या वेळी असणारी वाहतुकीच्या साधनांची वानवा लक्षात घेता आम्ही ठरलेले नियोजन बदलून जिवधन आणि ढाकोबाच्या रांगेत असलेल्या घोडेपाण्याची नाळ आणि रिठ्याचे दार हा आडवाटांचा कार्यक्रम पक्का केला.

      २५ जानेवारीच्या रात्री लोकल पकडून मी कल्याण गाठले तर सामान्य जनतेसाठी लोकल प्रवासाची सुविधा नसल्याने तेजस त्याच्या scooty वरून कल्याणला येऊन पोहोचला. Fleece jacket, कानटोपी, handgloves असा सगळा जामानिमा करून पुढील प्रवासासाठी सज्ज झालो. २०१३ मध्ये ढाकोबाच्या भिंतीला लागून असलेला दाऱ्या घाट केल्यावर बरेच वर्षांनंतर दुचाकीवरून ट्रेकला जायचा योग आला. ११ वाजता कल्याण वरून आम्ही निघालो , मुरबाड सोडल्यावर चांगलाच गारठा जाणवायला लागला. सरळगावच्या पुढे नेहमीच्या प्रांजळी हॉटेलवर तर्रीदार मिसळ आणि चहा असा भरगच्च पेटपूजेचा कार्यक्रम करून गाडी धसईमार्गे सिंगापूर गावाकडे दामटली. गावात पोहोचेपर्यंत रात्रीचे दीड वाजले.गाडी पार्किंगला लावेपर्यंत गावातल्या भू-भू गँगनी आमचे जोरदार स्वागत केले. अशोक मामांना भेटून गावच्या शाळेत आडोशाची सोय केली. दुचाकीवरून आल्याने आधीच आम्ही गार पडलेलो त्यामुळे मामांच्याच कृपेने त्यांच्याकडची थोडी लाकडे घेऊन शेकोटी पेटवली.


     पौर्णिमा जवळ आल्यामुळे सहयकडे चांदण्याच्या दुधाळ प्रकाशात उजळून निघालेले, डाव्या हाताला जिवधन ते उजव्या हाताला ढाकोबा असा विस्तीर्ण प्रदेश नजरेस पडत होता. २०१३ च्या थंडीत केलेल्या दाऱ्या घाटमार्गे ढाकोबाच्या आठवणी डोळ्यासमोर तरळून गेल्या. शेकोटीवर जरा उब घेऊन झोपेपर्यंत पहाटेचे ३ वाजले. पुढल्या दिवशीची चाल पल्लेदार असल्यामुळे सकाळी लवकर उठणे क्रमप्राप्त होते, तद्नुसार सकाळी ५.१५ वाजता उठून आवराआवर सुरू केली. शेकोटीवर पुन्हा एकदा हातपाय शेकायचा कार्यक्रम उरकून सकाळी ६.१५ वाजता अशोक मामांच्या घरासमोर हजर झालो.

      यापुढचा महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे घाटवाटांची कल्पना असलेला माहितगार माणूस शोधणे. दुर्गम भागात विकसित झालेले रस्त्यांचे जाळे त्यामुळे जुन्या काळापासून प्रचलित असलेल्या घाटवाटांकडे आजच्या पिढीचे दुर्लक्ष होत चालले आहे म्हणूनच जुन्या खोडांपैकी कोणी आमच्या सोबत यायला तयार होतंय का ? याची चाचपणी सुरू केली. तेवढ्यात अशोक  मामा  तेजसला घेऊन बाजूच्या वाडीत गेले आणि सुमारे अर्ध्या तासानंतर तिशीतल्या एका तरण्या मुलाला घेऊन आले. जुन्या खोडाच्या ऐवजी समोर दिसणारे ते लवलवते पाते पाहून मन जरा साशंक झाले पण मामांनी छातीठोक पणे "याला घेऊन जा" असा फर्मान सोडला आणि आम्ही तिघे सकाळी ७:३०- ८ च्या सुमारास गावातून निघालो.


ट्रेकची सुरुवात

      सुरवातीचा अर्धा पाऊण तास वाट अतिशय मळलेली होती. नदीपात्रातून रेती काढण्यासाठी गाड्यांची ये - जा असल्याने चांगल्यापैकी रस्ता तयार झाला होता. सकाळच्या थंड वातावरणात पक्षांचा गुंजारव सुरू होता, मध्येच एखादा हुप्प्या साद घालत होता. कळमांज्याचा दरा केल्यानंतर बरोबर एक वर्षांच्या अंतराने पुन्हा असे वातावरण अनुभवायला मिळत होते. सुमारे एक तासाभराने आम्ही घोडेपाणी नाळ आणि रिठ्याचे दार या दोन्ही घळी जिकडे एकमेकींना मिळतात तिकडे येऊन पोहोचलो. इकडून थोडी उंची गाठून नदीच्या पात्रात ठिकठिकाणी पाणी उपलब्ध होते  त्यामुळे तिकडेच बसून आम्ही न्याहारी उरकून घेतली. एव्हाना जिवधन आणि वानरलिंगीच्या माथ्यावर भास्करप्रभा पसरण्यास सुरवात झाली होती. 

जिवधन वरील सोनेरी प्रभा

      इकडून थोड्याच वेळात डाव्या हाताला आम्हाला बाहुली सुळके समूह स्पष्ट दिसू लागला आणि आम्ही घोडेपाण्याच्या खालील नळीच्या तोंडाशी येऊन पोहोचलो. 



बाहुली सुळके आणि घोडेपाण्याच्या खालील नाळ

       सरळसोट कड्यापर्यंत जाणारी नाळ अर्ध्यापर्यंत चढून तिकडून उजवीकडे असलेल्या दुसऱ्या नळीने आम्ही वर जाणार होतो. जसजसे आम्ही इकडून उंची गाठण्यास सुरुवात केली तशी वाटेमधले पाणी कमी होण्यास सुरुवात झाली. शेवटच्या पाण्याच्या ठिकाणी पुन्हा बाटल्या भरून घेतल्या आणि पुढची चढाई सुरू केली. 

   


  बाहुली सुळके समूह आमच्या मागे ठेऊन आम्ही आता उजवीकडच्या नळीत घुसलो. पहिल्या नाळेतून पूर्वी घाटावरच्या फांगळे गावात जाता येत असे परंतु दरड कोसळल्याने आता तिकडून मार्ग बंद झाला आहे असे कैलासने आम्हाला सांगितले. जसजसे आम्ही घोडेपाण्याच्या नळीत उंची गाठत होतो तसे बाहुली सुळक्यांचे विहंगम दृश्य समोर उलगडू लागले. सुमारे अर्ध्याहून जास्त नाळ चढून गेल्यावर मागून जिवधन, खडापारशी, टोक सुळका, बाहुलीचे सुळके आणि आजूबाजूच्या उत्तुंग कातळभिंती असा मंत्रमुग्ध करणारा नजरा आमच्यासमोर उलगडला. सह्याद्रीचे ते विलक्षण रूप आम्ही कितीतरी वेळ डोळ्यात साठवून ठेवत होतो. 









मनसोक्त फोटोग्राफी करून आम्ही कारवीने भरलेल्या मार्गातून खिंडीकडे मोर्चा वळवला आणि सुमारे १२.४५ वाजता खिंडीत पोहोचलो. गावातून निघून इथवर यायला आम्हाला सुमारे साडेचार ते पाच तास लागले तर साधारण जिवधन एवढी उंची आम्ही यावेळेत गाठली होती. 

घोडेपाणी नाळेच्या खिंडीतून जिवधन

खिंडीतून डावीकडे फांगळे गावात वाट जाते तर खाली जाणारी वाट आपल्याला आंबिवली गावात घेऊन जाते. आम्ही उजवीकडे दाट कारवीतून वाट काढत पुढे निघालो.सुमारे ४५ मिनिटे आडवे गेल्यावर वाट रिठ्याच्या दारात निघाली. इकडे पुन्हा एकदा आम्हाला चौफुला लागला आणि तिकडेच आम्हाला बिबट्याची विष्ठा दिसली. कैलासने निरीक्षण करून बिबट्या साधारण आदल्या रात्री तिकडे आला असावा असा निष्कर्ष काढला. तिकडूनच खाली १५-२० पावलांवर कड्याच्या कपारीत उंबराचे पाणी आहे, ते पाहून आम्ही तिकडेच जेवण उरकून घेण्याचा निर्णय घेतला. मेथीचे ठेपले, शेंगदाणा चिक्की, मक्याचा चिवडा, काकडी, संत्री अशी सगळी सरमिसळ पोटात ढकलून १५ मिनिटे आराम केला आणि साधारण २ वाजताच्या सुमारास आम्ही रिठ्याचे दार उतरायला सुरुवात केली. 

सौजन्य - तेजस नेने

सुरवातीचा साधारण २०० मीटरचा झाडीचा टप्पा पार केल्यावर मुख्य नळीमध्ये आलो. इकडे मागच्याच वर्षी मोठी दरड कोसळल्याने धारधार दगडांचा खच पडला होता. दगड हलत असल्याकारणाने एक दोन वेळा पायखालचा दगड निसटून खरचटले सुद्धा पण त्याला काही इलाज नव्हता. जसजसे आम्ही खाली यायला लागलो तसे जिवधन, वानरलिंगी, नाणेघाट, नानाचा अंगठा, टोक आणि काट्याची लिंगी हे सुळके दूरवर दिसायला लागले.


रिठ्याच्या दारातून नाणेघाट व जिवधन

   सुमारे तासभर घळीतून उतरल्यावर अजून खाली असणारे Rock Patch टाळण्यासाठी कैलासने डाव्या हाताकडच्या जंगलात मोर्चा वळवला. पायाखाली वाढलेलं गवत,वेली तर सोबतीला कारवी बाभळीच्या जाळ्या अश्या सगळ्या परिस्थितीतून दिड दोन तास मार्ग काढत आम्ही पुन्हा मुख्य घळीच्या पात्रात येऊन पोहोचलो. मोकळ्यात आल्यावर सगळेच जण जरा वेळ विश्रांतीसाठी पहुडलो, तिकडेच पुन्हा एकदा संत्री खाऊन घेतली आणि पुढे निघालो. इकडून मोठाल्या दगडांची आरास जरा कमी झाल्यामुळे मार्ग सुकर झालेला.



उतरताना दिसलेला Argiope Keyserlingi प्रजातीचा कोळी

सरतेशेवटी साधारण सव्वा पाचच्या सुमारास आम्ही दोन्ही घळीच्या Junction वर पोहोचलो. इथून पुढे सकाळच्याच मळलेल्या रस्त्याने आम्ही गावाकडे निघालो. एव्हाना उन्हे कलतीला लागलेली, खडा पारशीची लांबलचक सावली जिवधन वर पडलेली, सूर्य अस्ताला जाण्याची सुरवात करत होता त्यामुळे त्याचे बिंब लालभडक झालेले, संधिप्रकाशाची गुलाबी छटा सह्याद्रीच्या भिंतींवर पडली होती तर त्यांच्या मागून टपोरा चंद्र आकाशात डोकावत होता...


मावळतीच्या रंगात उजळलेला सुंदर नजारा

एकूणच स्वर्ग दोन बोटे उरल्याचा भास मनाला होत होता. असा तो सुंदर नजारा पाहून मन प्रफुल्लित झाले आणि शरीराचा थकवा नाहीसा झाला. 


       रमत गमत शेवटी आम्ही सव्वा सहा वाजता परत सिंगापूर गावात पोहोचलो. अशोक मामांकडे पुन्हा एकदा चहा झाला आणि अशाप्रकारे दोन जबरदस्त आडवाटांचा अनुभव गाठीशी  घेऊन सात वाजता आम्ही गाव सोडले आणि मुंबईकडे निघालो. वाटेत सकाळच्याच प्रांजळी हॉटेल मध्ये जेवण आटपले आणि कल्याणमार्गे साडेबारा वाजता घरी पोहोचलो.







No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...