पहाटे पाचलाच शिरुर सोडलं अन जवळचे ओतूर आणि बोठा मार्ग हे दोन्हीही 'खराब रस्ते' या कारणास्तव ते दोन्हीही टाळून 'चांगला व अधिक सोयीचा' पर्याय म्हणून संगमनेरमार्गे निघालो; मात्र, महामार्ग नि राज्यरस्त्याचा काही अपवाद वगळता पुन्हा 'खराब रस्ता' याच कारणास्तव इकडूनही गडपायथ्याशी यायला आम्हांस अखेर उशीर म्हणजे साडेनऊ झालेच! मग प्रत्यक्ष भटकंती सुरू करायलाही, अर्थातच, दहा वाजले. आधीच एक संदेशगट बनवून आजच्या भटकंतीची संपूर्ण माहिती, भटकंतीचे सर्वसाधारण नियम आणि आचरण पद्धती समजावलेली असल्याने मंडळी अगदीच जोशात अन पूर्णतया तयारीत होती.
आजची भटकंती..
#श्री क्षेत्र कळसूबाई..
( देवाची वाट, माची, सांबरखडक, सावरधाव, मोठी टिवई , छोटी टीवई,
तिसरी शिडी आणि शिखरमंदिर )
#दि. २८ ऑक्टोबर २०१८.
| मुंज्याचा दरा |
आम्ही पोहोचेतो सकाळची सगळी लगबग संपवून आख्खा बारी गाव आपल्या
कामाला लागला होता. क्वचित एक-दोन ठिकाणीच ज्येष्ठ नागरिकांचे गट
गप्पा-गोष्टींत रमलेले दिसले; बाकी गाव बऱ्यापैकी निवांत झालेलं दिसत होता.
थोडं अलीकडेच, एका उपाहारगृहाजवळ गाडी लावली, चहा-नाश्ता आधीच रस्त्यात
झालेला असल्याने त्वरेने सोयीचा पेहराव केला नि खाऊ-पाण्याच्या पाठपिशव्या
पाठीला लटकावत आम्ही मारूती मंदिराजवळून, पुढे गल्ली-बोळानं 'देवाची वाट'
धरली. पाच-सात मिनिटांतच गाव, नंतर 'मुंज्याच्या दरा', त्यापाठोपाठ ओढा, अन
मग बांधही मागे टाकत आमचं सरळ 'गडा'च्या दिशेने 'आक्रमण' सुरू झालं.
| अवखळ वाट |
गाव संपताच वाटेनेही आपलं 'सोज्वळपण' गुंडाळून घेतलं आणि काहीसं अवखळ होत
ती वर वर चढू लागली. झाडांच्या आडव्या-तिरक्या मुळ्या, दगड-खडकांचे टप्पेही
आता वाटेतील पायऱ्या बनून आम्हांला वर घेऊ लागले. चढाई सुरू झाली.
बऱ्यापैकी झालेला उशीर, विरळ झाडी अन वाऱ्याचा अभाव यांच्या संयुक्त
विद्यमाने थोडीशी विपरीत परिस्थिती निर्माण होऊन आमच्या 'दमा'ची 'चाचपणी'
एव्हाना सुरू झाली होती.पण, तेवढ्यात, एक 'मंदिर कौलारु' दिसलं. हळूहळू
त्यापुढील पार, त्यावरील आणि त्याभोवती इतरत्र शेंदरी रंगातील
काही 'देवादिक' अन चार-सहा 'दुकानंही' दिसली.
| श्री माता कळसूबाई निवासीनी मंदिर, माची |
अर्थात, 'माची' तथा जहागिरदारवाडी आली होती. मंदिर परिसर बराचसा स्वच्छ
आणि विलोभनीय दिसला. छोट्या विसाव्याची संधी मिळताच चमू इथं थोडा
स्थिरावला, विसावला, विहरला अन 'श्री माता कळसूबाई निवासीनी'चं दर्शन घेऊन
पुन्हा आपली वाट पकडत शिखरमंदिराकडे मार्गस्थ झाला. एव्हाना साडेदहा झालेले
होते. आम्ही पुन्हा गडवाटेला बिलगतो. आता वाट देवस्थान ट्रस्टने बनवलेल्या
एका छोट्याशा लोहकमानीतून वर निघाली. लगोलग, प्रथम उजवीकडे एक नव्यानं बनत
असलेलं, एक बनलेलं तर डावीकडेही एक अशा गडमार्गातील या पहिल्या
उपहारगृहांचं दर्शन झालं; मात्र ही तिन्हीही बंद अवस्थेतच होती.
| सांबरखडक |
या माचीपर्यंत आलेली पाऊलवाट आता थोडी रुंद अन सपाट अशी 'बनवलेली' दिसली पण
पुढच्या चौथ्या-पाचव्या मिनिटालाच तिनं पुन्हा त्वरेने चढाई सुरू केली.
रस्त्यात मध्येच काहीसं दगडी अतिक्रमणही अवतरलं. मग खडक-मातीच्या पायऱ्याही
लागल्या. पाच एक मिनिटांतच छोटा खडकटप्पाही लागला. हा 'सांबरखडक'! दोन एक मिनिटांतच तोही संपला नि वाट केवळ मातीच्याच सातआठ पायरीटप्प्याने बनलेल्या वाटेने सरळ 'सावरधावे'तल्या 'कळसुबाई हॉटेला'त पोहोचली अन पुन्हा तशाच तीनचार पायऱ्या चढून बाहेरही निघाली अन पुढे चालू लागली.
अकरा केंव्हाच झालेले असतात. झाडी अद्यापही तुरळकच असल्याने वातावरणामधील
उष्मा 'सुखात' काहीशी 'खोडी' ( की 'खोटी'! ) करीत होता. वाट आता एका
सुकल्या ओहोळमार्गाला साथीला घेत काही मिनिटांतच एक दगड-मातीयुक्त पण रचीव
असा छानसा पायऱ्यांचा टप्पा पार करीत सरळ 'टीवई'च्या पोटातील तथा 'लहान
टीवई'मधील 'कळसूबाई प्रसन्न'मध्ये घुसली. हे इथलं उपहारगृह! इथं येताच
पुढं आलेली आमची 'तरुण तुकडी' मला इथं निवांतपणे विसावलेली दिसली. इथलं
लिंबूजलपान होताच आमची पलटण पुन्हा पुढच्या मार्गाला लागली.
आता रचीव दगडांचा असाच आणखी एक पायरीमार्ग आम्हांस वर घेत पुढे एका
ओबडधोबड पायरीवाटेला जुळवत चारदोन मिनिटांतच 'टिवई'वर पोहोचवता झाला. या
वाटेवरचा नियम म्हणून की काय इथंही एक उपाहारगृह दिसलं. 'टीवई' म्हणजे एक
बऱ्यापैकी सपाट जागा! सपाट असल्यानं इथून बाजूचे पर्वत, हिरवाई असा मनोहारी
भोवताल दृष्टीस पडत होता. शिखर अद्यापही दृष्टिपल्याडच होते; मात्र,
शिखरमार्ग आणि त्या मार्गातील तीनही शिड्या मात्र इथून स्पष्ट दिसत होत्या.
एव्हाना सव्वाअकरा होत आलेले असतात.
| अवखळ वाट |
सततची 'वळ, वळ' वळणे नि सलग उभी अन खडकाळ-मुरमाड अन धोंड्यांनी युक्त अशी
चढाई, हे इथलं विशेष! आणखी विशेष म्हणजे वळणावरच्या जवळजवळ सर्वच उंच-सपाट
टप्प्यांवर मुबलक अल्पोपहार तथा पेयपान केंद्रे! ..आणि त्यांच्या मधूनच,
अगदी पोटातून, वाटेचे, आणि अर्थातच 'वाटसरूं'चेही, येणे-जाणे! आणि वाट..
ती तर सदोदित वर्दळीचीच! आणि रविवार असेल प्रश्नच नाही. अगदी पूर्णतया
वर्दळीची! त्यामुळे, संपूर्ण गडवाट ही मातकट, रुळलेली अन उठावदार!
अगदी डोळे झाकून चालावं अशीच!!''
येथून पुढं ही वाट थोडी खडकाळ बनते. भलेच दगड-धोंडे कवेत घेत वर वर चढू
लागते. मग, असंच एक वळण घेताच आपणांस अचानक समोर दिसतात त्या सुंदर अन
सुबकशा पायऱ्या! अन आधार व सुरक्षिततेसाठी बाजूस लोखंडी कठडेही!
"तीन शिड्या, मंग थोडं रेलिंग आन मंग मंदिरच!"असं गावकऱ्यांनी खालीच सांगितलेलं असतंय.
| पहिली शिडी |
त्यामुळे इथं पोहोचल्यावर आपणांस पहिली शिडी आल्याचा भास होऊन आनंदून
जायला होतं; मात्र, हा आनंद क्षणिकच ठरतो. कारण, प्रत्यक्षात पहिली शिडी
अद्यापही थोडी पुढे तर शिखरमंदिर सुमारे तासभरावर असतंय.
अशा या लोखंडी कठड्यांची सुविधा असलेल्या या पायरीवाटेचे साधारण चार एक
वळणटप्पे संपल्यानंतर आम्ही येतो 'चांदसुर्या'त! अर्थात, पहिल्या
शिडीजवळ! या टप्प्यावर पूर्वी माता कळसूबाईच्या 'पादूका' होत्या; मात्र
इथल्या 'रस्तासुधार' कार्यात त्या इथून हलविल्या गेल्याने आज त्या इथं
दिसून येत नाहीत. थोडासा वक्राकार हा शिडीमार्ग संपताच आपणांस प्रथमच
आठ-दहा कोरीव पायऱ्या लागतात. इथून सहज मागे पाहता
| शिडीमार्ग संपताच दिसणारे आल्या मार्गाचे नयनमनोहर निसर्गदृश्य |
खोलवर खाली आपणांस दिसते ती 'मोठी
टीवई', आणि त्याखालोखाल वाटेतील काही उपहारगृहे, ती माची, अर्थात ती
जहागिरदारवाडी, तो बांध, ते बारी गाव, ती विखुरलेली काही घरे, त्या
वाड्या-वस्त्या, ते समोरील डोंगर आणि एकूणच मस्त हिरवाई असलेला मनोहारी
भोवताल दिसून येतो. ही सर्व दृश्ये छायाबद्ध करीत अन मनकप्प्यात साठवून घेत
आम्ही पुन्हा मार्गी लागतो.
आता, कुठं लोखंडी कठड्यांसह तर कुठे त्याविरहित, कुठं नैसर्गिक कोरीव तर
कुठं कृत्रिम बांधीव अशा पायरीवाटेने वीसएक मिनिटांची वळणे अन चढाईमिश्रित
अशी वाटचाल करीत आम्ही दुसऱ्या शिडीजवळ येतो. इथून वर येताच दिसणारा मघाचाच
तो निसर्गनजारा पुन्हा पाहण्याचा मोह आपण आवरू शकत नाही. साहजिकच, काही
वेळ ते नेत्रसुख पुनश्च लुटत आम्ही पुन्हा 'वाटे'ला लागतो. पाचच मिनिटांत
आपण 'लागे'त येतो. इथंही एक उपहारगृह असतंय.
| एक पायरीमार्ग, बाजूला पार आणि त्यावर जांभळाचं झाड |
अशाच पद्धतीची आणखी बारा-पंधरा मिनिटांची वाटचाल करीत आम्ही एक पूर्ण
इंग्रजी 'यु ' आकाराचं वळण घेतो तर अगदी समोरच आमच्या दृष्टीस पडतो एक
सुंदर, बांधीव असा थोडासा वक्राकार पायरीमार्ग, बाजूलाच एक छानसा पार आणि
त्यावर सावली धरून असलेलं एक जांभळाचं झाडही!
विश्रांतीसाठी ही जागा अगदीच अनुरूप असल्यानं अनेक भक्त, भटके इथं हमखास
निवांत विश्रांत होताना दिसून येतात. इथं आजूबाजूला जांभळाची आणखीही
अनेक झाडं दिसून येतात. त्यामुळे हा परिसर काहीसा जांभुळमयच दिसतो.
| 'जांभळाचं पाणी' |
आणखी थोडं वर चढून जाताच उजव्या बाजूस दिसणाऱ्या विद्युतरोहित्राजवळून थोडं
आत गेल्यास आपणांस दिसतो तिथल्या प्रचंड हिरवाईत लपलेल्या एका प्रस्तरातून
वाहणारा एक छोटासा, सुरेख असा जलपाझर! हे 'जांभळाचं पाणी'! हा
पाझर पुढे छोटा नक्कीच प्रवाह बनून पलीकडील तामकडा आणि अलीकडील 'टिवई' या
दोहोंमधील खाचेने खाली उतरत गेलेला दिसतो. हे निरखण्यास इथं आपला काही वेळ
जरूर जात असला तरी थोडीबहुत विश्रांती मिळतेच शिवाय एक सुंदर
निसर्ग'टप्पा' पाहिल्याचं समाधानही! पावसाळ्यात मात्र ही जागा नक्कीच एका
रमणीय धबधब्यात रूपांतरित झालेली आपणांस दिसेल.
यापुढील छोट्याशाच चढाईत, पाचएक मिनिटांवरच, तिथल्या सपाटीवरील एका रचिव
दगडी ओट्यावर आणखी एक लिंबूपाणी केंद्र दिसतं. आमच्या मंडळाचा इथं
विश्रांतीचा हा तिसरा टप्पा होतो. आणखी थोडं पुढे जाता पुन्हा थोडी सपाटी
लागते. मग थोडी उजवी, थोडी डावी करताच आपणांस समोर दिसतो एक अतिशय सुंदर
असा नजारा! तो अंतिम टप्पा! ती टेकडी.. आणि तीवरील तो गडमाथा आणि तो फडकता
भगवा! गड आता पूर्णतया जवळ आलेला असतो.
| तळ |
आणखी थोडंसं पुढे निघताच आपण येतो इथल्या 'तळा'वर! होय, हा एक छोटासा 'तळ'च असतो.
ही असते इथली एक लहानशी सपाटी आणि या सपाटीवरील वाटेच्या
दोहोबाजूसही आपणांस दिसून येतो तो पूजासाहित्याची दुकाने आणि उपहारगृहांचा
आणखी एक छोटासा समूह! आणि.. नावही याचे 'तळ'च! अगदी एखाद्या 'तळा'ला साजेसा! या
तळाला लागूनच असते एक लहान अन छानशी विहीर.. अगदी थंड अन गोड अशा
पाण्याची! तिथल्याच उपलब्ध पोहऱ्याने पाणी शेंदून काढून, आम्ही पोटभर
पाणी पिऊन घेतो, थोडं सोबतही घेतो आणि पुन्हा आमची वाट पकडतो.
| तिसरी शिडी |
आता दुपारचा एक वाजलेला.. आणि पोटभर पाणी पिल्यानं आम्ही ताजेतवाने तर
झालेलोच असतो शिवाय अंतिम टप्पाही जवळ आल्याचं पाहून इथवर येता झालेला
शीणही केंव्हाच पळून गेलेला असतो. आणखी थोडं वर निघता शिखरमाथ्याखालील तो
संपूर्ण कठडामार्ग, ती अंतिम शिडी आणि फडकता भगवा असं मनमोहक दृश्य नजरेला
खूपच भावतं. पाय आता आणखी भर भर चालण्याचा प्रयत्न करतात. ते काहीसं जमतही!
आणि. अखेर तिसरी शिडी चढली जाते. आता आम्ही अंतिम टप्पात येतो. आता
शिखरमंदीर केवळ काही फुटांवरच असते.
| माता कळसुबाई |
आकर्षक आणि देखण्या अशा शेंदरी रंगामध्ये रंगवलेलं ते मंदिर.. बाजूचा त्या
काही फडकत्या भगव्या पताका असलेले ते ध्वज.. मंदिराजवळील ती
पूजासाहित्याची दुकाने आणि काही 'हौसे-नवसे' भक्त तर काही आपले 'छंदबंधू'
तथा 'भटकंतीभाऊ' अशी भाऊ-भक्तांची मांदियाळी! गडावर क्वचितच दिसणारं असं
नवखं दृश्य आपलं दुरुनच चांगलंच लक्ष वेधून घेतं. एव्हाना घड्याळात दुपारचे
दीड झालेले असतात. आता शिखरावरून दिसणाऱ्या भोवतालाला निरखण्यास व त्याची
छायाचित्रे काढण्यास अन त्यातच अधिक रमवून घेण्यास मी तडक मंदिरामागे
निघतो.
| अगदी मागे.. अलंग-मदन-कुलंग |
तिथं पोहोचताच दिसणारं अगदी नाकासमोरच असलेल्या डोंगरगर्दीत 'अलंग-मदन-कुलंग' हे अफलातून असं गडत्रिकुट त्यांच्या बेलाग-बुलंद रूपाने आपल्याला भलंच मोहात गुंतवितं तर त्याअलीकडील छोटंसं 'ढेकूळ'ही आपल्या चांगलंच नजरेत भरतं. येथून नजर हटते न हटते तोच डावीकडील रतनगड, त्याबाजूचा खुटा अन पाबरगड स्पष्ट तर अगदी कारंडा, आजोबा, पाथरा, कात्राबाई, मुढा, गाविलगड, घनचक्कर ही अख्खी रांगही अस्पष्टशी परंतु सरावानेच नजरेत भरते. त्याखालील भंडारदऱ्याचा विशाल जलाशय नि भोवतालची निसर्गसृष्टीही प्रसन्न नेत्रसुख देते.
| विस्तीर्ण भंडारदरा जलाशय अन त्यामागे अस्पष्टसा रतनगड |
उजव्या हातास तर अख्खी सातमाळ रांगच, अगदी अचला, अहिवंत ते अगदी रवळ्या-जवळ्यापर्यंत, आपल्याला लुभावते. मन आणि नेत्राला स्वच्छंद सुखावत मातादर्शनासाठी मागे येताच समोर, पूर्वेकडील औंढा, पट्टा, बित्तनगडही आपल्याला तेवढंच सुखवितात. डावीकडची शेंडी, आंबेवाडी, उडदावणे, पांजरे, इंदोरे तर आल्या बाजूची बारी, पेनशेत ही गावेही या 'गडगोकुळा'त स्वच्छंद नांदताना दिसतात. आई कळसुबाईचं दर्शन तर भलंच पण हे 'गडगोकुळ'ही आपल्याला चांगलंच मंत्रमुग्ध करते.
अखेर, बऱ्याच दिवसांपासूनचा, 'या महिन्यात-पुढच्या महिन्यात' असं करीत
करीत, पुढे पुढे ढकलला जात राहिलेला शिरूरकरांसोबतचा हा बेत आज एकदाचा
'फळा'ला आला नि पाचही 'नवागतां'ना सोबत घेत त्यांच्या पहिल्या-वहिल्या
गडचढाईची मुहूर्तमेढ.. तीही सलग चढाईचे वळणदार टप्पे आणि खानदानी घाटवाटेची
सारी वैशिष्ट्ये आपल्या अंगा-खांद्यावर ल्यायलेल्या, 'महाराष्ट्रातील
सर्वोच्च शिखर' असं बिरुद मिरवणाऱ्या, गड अन तिर्थक्षेत्र असंही
जोडमाहात्म्य लाभलेल्या या 'कळसूबाई शिखरा'च्या माध्यमातून रोवली गेली; अन,
ही पहिलीच भटकंती चांगलीच उशिरा सुरू होऊनही अगदी सुयोग्य वेळेत
यशस्वीरित्या संपन्न होऊन तयांना एका सुंदर भटकंतीचा 'पूर्ण' आनंद देऊन
गेली; हे मात्र निःसंशय!
।।। x ।।। x ।।।
http://ishwargaikwad.blogspot.com/
No comments:
Post a Comment