Sunday, December 12, 2021

डोणे दार - आहुपे घाट

आजची आपली भटकंती आहे मुरबाड परिसरात. कल्याण डोंबिवली पासून हाकेच्या अंतरावर असलेली एक से एक ठिकाणं यात येतात. गड-किल्ले, लेणी, धबधबे, घाटमाथे यांचं जणू माहेरच! कल्याण पासून माळशेज कडे जाताना मुरबाड गेलं की उजव्या हाताला अर्थात दक्षिण दिशेला एक बलाढ्य डोंगररांग सोबत करते. ही अर्थातच सह्याद्री मुख्य पर्वतरांग म्हणजेच धार माथा. सर्वसाधारणपणे समुद्रास समांतर म्हणजे उत्तर दक्षिण जाणारी ही रांग जुन्नर जवळच्या प्रसिद्ध दाऱ्या घाट पाशी काटकोनात वळते आणि काही किलोमीटर पूर्व पश्चिम धावते. या भागात रांगेची सरासरी उंची १००० मीटर च्या आसपास आहे. पायथ्याच्या वाड्या ह्या १००-१५० मीटर च्या पट्ट्यात असल्याने इथे सह्याद्री महाकाय वाटतो अन दुरूनच लक्ष वेधतो. 



तर अश्या या परिसरात आमच्या चमूने डोणेदार अन आहुपे घाट असा एक दणकट ट्रेक करायचं ठरवलं. सकाळी लवकर स्टेशन ला भेटून पुढे भटक्यांचं आवडतं वाहन रा.प. अर्थात एस टी ने मुरबाड गाठलं. इथेच वडापाव, मिसळ, पोहे अशी गरमगरम न्याहारी उरकली. वर चहाच्या एक दोन फेऱ्या उरकत टमटम चं संधान बांधलं. मुरबाड हुन घाट पायथा साधारण ३० किमी अंतरावर (१ तास). 

पायथ्याला पोचून, सोबतीला माणूस शोधून वाटेवर लागेस्तोवर १०.३० वाजले. परिसर अन सोबतचे गडी नवखे असले कि शक्यतो सोबतीला माणूस शोधावा. भटकंतीत बऱ्याच गोष्टी सोयीच्या होतात. अर्थात ज्याला नेव्हिगेशन आणि एक्सप्लोरेशन शिकायचंय त्यांनी गावात कल्पना देऊन मार्गी लागावं. जून अखेरचे दिवस असून ही लक्ख ऊन पडलं होतं. त्यात पण मळभ असल्यानं भयंकर दमटपणा होता. अर्थात हे येणाऱ्या गडगडाटी पावसाची वर्दीच होती म्हणा. 



डोणेदार ची चढाई फार न्यारी. जवळपास १००० मीटर ची सलग चढाई करायला सह्याद्रीत फार क्वचितच मिळते. त्याखातर हा घाट, ढवळे घाट, आजोबा, भीमाशंकर इत्यादी मर्यादित वाटांच्या पंगतीत बसतो.  सुरवातीला रुंद घळीतील तीव्र चढाईचे टप्पे सटासट उंची गाठून देतात. त्यातही पावसाळ्यात एका अजस्त्र ओढ्याची माथ्यापासून साथ लाभते ती थेट खाली सपाटी ला येईपर्यंत. ओढा उजवीकडे ठेवत छोटया सोंडा ओलांडत साधारण ४ तासात वर पोचलो होतो. वाटेत किती वेळा माथ्याची खिंड आत्ता येईल मग येईल करत चकवा देत होती. 
                                                


त्रिगुणधारा धबधबा 





शेजारच्या डोंगराचं शिखर नजरेखालच्या टप्प्यात आल्यावर वाट थोडी समतल झाली आणि घाटावरचा भर्राट वारा अंगावर आला. इथेही ढगांनी अंमळ गर्दी केलीच होती पण बरसले तेवढे नव्हते. घाटमाथ्यापासून गाव ओलांडून रस्त्याला पोचणं हि या वाटेची खरी गोम. 

एवढे चढून आलो तर आणखी अर्धा तास काय करत करत वरचं टुमदार डोणी मागे टाकलं अन बस थांब्यावर येऊन थांबलो. हा सगळा आंबेगाव तालुक्याचा तुलनेने दुर्लक्षित अन दुर्गम आदिवासीबहुल परिसर. डिंभे धरणाच्या मागे घाटमाथ्याला लागून असलेला, त्यामुळे एकपदरी जेमतेम रस्ता अन जेमतेम वाहतूक. आणि त्यामुळेच मिळणारी असंख्य रान पाखरांची, पक्ष्यांची अखंड साथ, सोबतीला दाट जंगलाचे टप्पे या भागातील निसर्ग किती समृद्ध आहे याची ओळख पटवत राहतो. 


एस टी मिळेल असे आमचे ग्रह नव्हते अन बाकीच्या ताऱ्यांना पण काही सोय होणं मंजूर नव्हतं. असा अर्धा पाऊण तास घालवल्यावर एक जीपाड आलं. बॅगा आत टाकत, मिळेल तसं लोंबत अहुपे गाठलं. दुपारचे ४.३० वाजले.

मनोमन जीपवाल्याच्या रूपातल्या परमात्म्याचे आभार मानले अन आहुप्यात मुक्कामाची सोय बघू लागलो. एका मामांकडे विचारपूस केल्यावर आमच्या छोटेखानी चमू ला शाळेची शेड रात्रीचा निवारा म्हणून उपलब्ध झाली अन आम्ही आमची बिरबल ची खिचडी पकवायला सुरुवात केली. 

अहुप्यातली ती संध्याकाळ फार सुंदर होती. खिचडी होईस्तोवर आम्ही पाऊस एन्जॉय करत मस्त वाफाळत्या सूप चा आस्वाद घेतला. पावसानेही थोडी विश्रांती घेतली. एक गूढ संधिप्रकाश अन पाकोळ्यांचे स्वछंद थवे याशिवाय त्यात भर घालणारी निरव शांतता. एकदम स्पिरिच्युअल अनुभव. गप्पा टप्पा करत खिचडी लोणच्यावर ताव मारला अन शाळेच्या कुबट ओलसर आसऱ्यात थोडी उब शोधत गाढ झोपलो. 



पहाटे जाग आली. डोंगरात तसा दिवस लवकरच सुरु होतो. आन्हिक उरकून चहा न्याहारी करून सगळं आवरून घेतलं. डोंगरात भटकंती करतांना "मागे कसलीही खूण न ठेवणं" हे फार महत्वाचं. आपल्याला मिळाल्यासारखं पुढच्याला मिळावं किंवा आपल्यापेक्षा चांगलंच मिळावं या भावनेने हाडाचे भटके मुक्काम आवरतात. 
आहुप्यातली सकाळ फारच रम्य होती. जून अखेर उजाडला तरी पावसाचा पत्ता नाही असं वातावरण. 



                                                                    आहुपे घाटाची सुरुवात



आजचा टप्पा आहुपे घाट उतरून खोपिवली. हा अतिशय उत्तम रित्या वापरात असलेल्या काही प्राचीन वहिवाटीच्या मार्गांपैकी एक. खोपिवली अन आहुपे करांचे नात्यागोत्याचे संबंध. कोणी बहीण खाली खोपिवली ला दिलेली तर कोणाची मावशी आत्या लगीन करून वर आहुपेकर झालेली. वापर अशा साठी की आजही कोकणातून आहुप्यात यायचं म्हणजे माळशेज - जुन्नर - पिंपरगाणे - आहुपे असा लै लांबचा पल्ला माराया लागतु. भाडं पण लै अन येळ पण. मंग काय आपलं बिऱ्हाड आवरून खोपिवलीकर सकाळची न्याहारी करून दुपारच्या जेवणाच्या आत वर पाव्हण्यांकडे पोचतात. दिवसभर च काम उरकून सांच्याला ज्येवाया घरी दिवेलागणी ला. तर असा हा सुरेख बांधीव घाट  उतरायला साधारण २-२.५ तास मोडतात. वाटेतलं पाण्याचं टाकं वाटसरुंची बाराही महिने तहान भागवतं. 






घाटाच्या सुरुवातीला गोरख मछिंद्र चे जुळे सुळके पार पाताळात असल्यासारखे वाटतात. जस जस आपण उंची उतरत जातो तस तस ते उंची गाठतात. यापैकी मछिंद्र ला माथा गाठायला तांत्रिक चढाईची साधनं लागतात तर गोरखगड ला माथ्याच्या पोटात असलेल्या गुहां पर्यंत तुलनेने सोपी पण तितकीच थरारक वाट आहे. नाथपंथीयांच्या साधनेचं ठिकाण म्हणून हे परिचित आहे. 



खोपिवली जवळ मोकळवनात येताच वावरातील भातशेतीची कामांची लगबग दिसून आली. आषाढाचा अन भाद्रपदाचा पाऊस पिऊन दोन-तीन महिन्यांनी हि रोपं तरारली असतील अन अक्ख्या आसमंतात एक नितांत सुंदर सुवास भरून टाकेल. पुढच्या भटकंतीचे आडाखे बांधत आम्ही ही खोपिवलीच्या जीपच्या गर्दीत एक झालो. 



    
    पांढरी तुटक रेष - पायी वाटचाल 
    निळी रेष - रस्ते अन वाहन मार्ग

सह्याद्री - युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांपैकी एक असून जैव-विविधतेतल्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्व.  

चालोनि जाणावे। जाणोनि चालावे।आपुले म्हणोनि राखावे। सकळ वन।।


http://simplyatin.blogspot.com/2020/07/blog-post.html

 

No comments:

Post a Comment

किल्ले बहुला.

 आयुष्यात पाहिल्यांदा आपल्या आर्मीला घाबरून जीव मुठीत धरून केलेला एक अविस्मरणीय ट्रेक - किल्ले बहुला.   ✍️ मेघन तारिहाळकर पाटील (चौफेर भटकंत...