Sunday, December 12, 2021

प्रबळगड, कलावंतीण ते माथेरान.. द्वारा उंबरणेवाडी, पिसारनाथ शिडी भटकंती :

 


प्रबळगड, कलावंतीण ते माथेरान.. द्वारा उंबरणेवाडी,  पिसारनाथ शिडी भटकंती  :


'वैविध्यपूर्ण वृक्षराजी नि भव्य पर्वतरांगा, निसर्गानं इथं केलंय, अगदी 'मुक्तहस्ते दान';
'विस्तीर्ण प्रबळगड ते शीतल माथेरान',  ही दीर्घ पण मोहनिय अशी, भटकंती खूप छान!'



'युथ हॉस्टेल, मालाड' आणि 'ट्रेक-सह्याद्री'  :

'युथ हॉस्टेल, मालाड', मुंबई म्हणजे उत्तमोत्तम सह्यभटकंतीची मेजवानी देणारी एक सुप्रसिद्ध अशी संस्था आणि 'ट्रेक-सह्याद्री' ही या संस्थेचे भटकंतीतील वेगळेपण दर्शविणारी नि थोडं दीर्घ नियोजन असलेली एक आगळी अशी सह्यभटकंती मोहीम! ..मग त्यात असतील सह्यविशेष अशा विविध पर्वतरांगा, विलक्षण दऱ्या-खोरी, अतुलनीय गड-कोट, सुंदर सुंदर गुहा, मंदिरे आणि अवखळ समुद्र, नद्या, तळी, ओढे, नाले.. इ. इ. वा असंच अन्य खूप काही! आणि, अशा भटकंतींचे  आयोजनही असतंय खूप सुंदर आणि अगदी नियोजनबद्ध!

सोबत आहे, या संस्थेने  सन २०१५   मध्ये आयोजिलेल्या अशाच एका भटकंती मोहिमेचा सचित्र वृत्तांत..

'ट्रेक-सह्याद्री' - २०१५'
'प्रबळगड, कलावंतीण ते माथेरान' मार्गे 'उंबरणेवाडी,  पिसारनाथ शिडी'


प्रबळगड व कलावंतीण  :

 (प्रबळगड आणि कलावंतीण)

खरं तर अशी दीर्घ निसर्गभटकंती म्हणजे भटक्यांसाठी एक सुवर्णसंधीच! साहजिकच, ही मोहीम मी खूप आधीच निश्चित करून ठेवली होती. पुण्याहून  एकटाच असल्यानं, आधी शिरुर ते पुणे नि मग पुण्याहून पनवेल असा 'लालपरी'ने 'शेडुंग' फाट्या'पर्यंत, मग, योगायोगानेच, या मोहिमेतीलच एक नायक, श्री. परबांबरोबर त्यांच्या दुचाकीवरून ठाकुरवाडीपर्यंत अन त्यानंतर पुढे प्रबळमाचीपर्यंत मात्र पायी..  असा दणदणीत प्रवास करत एकदाचा  इथं येऊन पोहोचलो. बाकीचे इतर सर्वजण तर आधीच येऊन पोहोचले होते.

तसंही, इथं, याआधीही तीनदा येणं झालेलं. त्यामुळं नवखेपणा नव्हताच. पहिल्या-दुसऱ्यावेळी तर निव्वळ गडभटकंती हाच उद्देश तर तिसऱ्यावेळी मात्र निमित्त होतं 'निसर्गमित्र, पनवेल'च्या शिलेदारांनी शोधलेल्या कलावंतीणच्या पायथ्याला असलेल्या नेढ्याचं आरोहण आणि अवरोहण! यावेळेची, खास अशी आठवण म्हणजे मी ठाकुरवाडीत पोहोचलो होतो रात्री साडेतिनला, एकटाच, पनवेलहून सूटणाऱ्या पहिल्या गाडीनं! आणि उरलेली  रात्र काढली  होती तिथल्या मंदिरात,  डासांबरोबर  चीड-चीड गाणी गुणगुणतच! आणि जसं तांबडं फुटलं तसा उठलो, तिथल्याच एका घराच्या ओट्यावरून 'पोहऱ्या-टमरेल' घेतलं नि सार्वजनिक विहीरीवर जाऊन ताजातवानाही झालो. सुदैवानं त्याच घरातून स्नेहपूर्वक मिळालेला चहा घेतला, निघताना मग तिथल्या मुलीच्या हाती खाऊ ठेवला नि  मोहिमेसाठी निघालो.  तिथंही,  अगदी सुरुवातीलाच  सहभाग पूर्ण करीत परतही फिरलो लगेचच म्हणजे तासाभरात, अगदी आठच्याही आधीच!! ते दोरशिडीसहाय्याने आरोहण, नेढ्यातलं रांगत चालणं, पलीकडील बाजूचं अवरोहण, तिथून गडाच्या पायथ्याला तो अर्धवळसा आणि त्यावेळी दिसणारा तो निसर्ग! सगळंच अफलातून!

तो एक थरारच होता नि त्याबद्दल नंतर कधीतरी. असो. 

दिवस पहिला..  प्रबळमाची :




 (प्रबळमाची)

प्रबळमाची.. भटक्यांचं हे तर अत्यंत आवडीचं ठिकाण! कारण,  जेंव्हा केंव्हा प्रबळ-कलावंतीणसाठी कोणी येतं, ते थकून भागून नि पहिलं थांबतं ते इथंच! मग पहिली पाठपिशवी उतरवून निवांत होत, पाणी-सरबत-चहा-कॉफी-थंङपेये असं हवं ते घेत आणि थोडं ताजंतवानं होत भटकंतीला सुरूवात करण्याआधीच भटकंतीपश्चातच्या जेवणा-खाण्याची व्यवस्था करून ठेवायला, हे एक अत्यंत सोयीचं असं ठिकाण!

आजचा दिवस असतो पहिला नि दुपारपर्यंतच सर्व सहभागी इथं उपस्थित हवे असतात. दुपारचं जेवण, आराम होतो, सायंकाळचं चहापानही होतं नि मग सहभागी-परिचय-कार्यक्रम झाल्यानंतर पाच दिवसांच्या या मोहिमेसंबंधीचा परिचय देण्यात येतो. या भटकंतीचं आयोजन हेच मुळी विद्यार्थ्यांसाठी होतं एक शिबीर म्हणून.. निसर्गसान्निध्यात  व्यक्तिमत्त्व विकास, असा उदात्त हेतू त्यामागे होता. आणि, यासाठी एक पाहुणे-व्याख्याता म्हणून मुंबईतीलच श्री. चंद्रशेखर पाटील यांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं.  त्याबद्दलचाही संक्षिप्त तपशीलही  यावेळी देण्यात आला. मग थोडा विसावा झाला नि पंधरा मिनिटांतच पुढचा कार्यक्रम सुरु झाला.

आजच्या नियोजनानुसार, पहिल्या सत्रात मा. पाटीलसरांनी, रुसी  वीरकन्या 'मारिया स्पिरिडोनोवा' हिला केंद्रीभूत धरून 'रशियन राज्यक्रांती' यावर व्याख्यान दिलं तर जेवणानंतरच्या दुसऱ्या सत्रात, सुमारे ६३ विनोदी प्रसंग एकत्र गुंफत स्वतः निर्मिलेलं 'बाळ्या' हे व्यक्तिचित्रण कथास्वरूपात सादर केलं. पहिल्या सत्रातील ती  मारियाची सततची अटक, तुरुंगवास, मानसिक छळ नि  अखेर गोळ्या घालून हत्या, यामुळं मुलं गहिवरली, मात्र दुसऱ्या सत्रातील 'बाळ्या' मुलांना  जाम आवडला. या सगळ्यांत पहिला दिवस कधी संपला, ते कळले देखील नाही.

प्रबळगड  : एक प्रचंडगड!

स्वराज्यासाठी विपुल  धन दिलेला, प्रचंड गडमाथा अन त्यावर घनदाट जंगल, औषधी वनस्पती अशी वनसंपदा असलेला, दोन गडदरवाजे आणि तब्बल अकरा बुरुज इतकी गडसंपत्ती असलेला आणि  खुद्द शहाजी राजे, आई जिज़ाऊ आणि बाल शिवाजी  यांचं सान्निध्य लाभलेला, हा किल्ला खरं तर ब्रिटिश काळात 'माथेरान' व्हायच्याच बेतात होता; पण, पायथ्याला गाढी, उल्हास नि पाताळगंगा अशा तीन दिशेने तीन  नद्या वाहात असल्या तरी गडावरचं 'पाण्याचं दुर्भिक्ष्य' आडवं आलं,  आणि मग हा संपूर्ण 'बेत' आताच्या 'माथेरान'च्या नशिबी जाऊन पडला.

दिवस दुसरा  : 

दुसऱ्या दिवशी होता गडफेरीचा कार्यक्रम. मग सकाळी लवकर आवरूनच प्रबळगड नि कलावंतीण गडांची गडफेरी आणि सायंकाळी पुन्हा श्री. चंद्रशेखर पाटील यांचं कथाकथनाचं पहिलं सत्र आणि रात्री भोजन  व भोजनपश्चात दुसरं सत्र नि तत्पश्चात हव्या असतील तर गप्पा-टप्पा आणि विश्राम.. असा आजचा कार्यक्रम होता. दोन्हीही गड याआधी दोनदा झालेले असल्याने नाविन्य नव्हतेच; मात्र, नवीन नि आगळे भिडु सोबत असल्याने उत्कंठा मात्र होती.

 (प्रबळगडावरील गडसंपत्ती)

गडफेरी  :

साहजिकच, सर्वांबरोबर पुन्हा दोन्ही गडांची भटकंती झाली. ते भग्न असं पण तात्पुरतं पत्र्याच्या आधारे  छाया देत सावरलं गेलेलं गणेशमंदिर, तो वाडा, ती पाण्याची टाकी, ती तळी.. असे सारे अवशेष  पुन्हा पाहून झाले. स्थानिकांना गिर्यारोहण आणि शिकारीचे धडे देणाऱ्या सावंतांची समाधीही पाहिली. प्रबळच्या दक्षिण टोकावरुन दिसणारा 'काळा बुरुज', उत्तर टोकावरून दिसणारा 'स्थापत्यशास्त्राचा अजब नमुना.. कलावंतीण’, ही दोन्ही नयनमनोहर दृष्येही डोळ्यांत भरवली. मग कलावंतीणच्या पायऱ्या नि सर्वोच्च टोकाचा चढाई-थरारही अनुभवला, खाली येताना डावीकडेच्या गुहेतूनही जाऊन आलो. मग माचीवर  दुपारचं जेवण झालं. सर्व काही यथानियोजन व्यवस्थितरीत्या पूर्ण झालं. अनेक मुलांची पहिलीच गडभटकंती असल्यानं त्यांना दमल्यासारखंही झालेलं, पण सायंकाळच्या मतप्रदर्शनात त्यांनी दोन्ही गडांची गडफेरी खूप आवडल्याचं नि थकलो होतो तरी त्यातुनही प्रचंड आनंद मिळाल्याची भावना  व्यक्त केली.




 (कलावंतींण, गडाचा वरचा टप्पा नि प्रबळगडावरील काळा  बुरुज)

त्यानंतर होता पाटीलसरांचा 'तास'. काल सरांवर अत्यंत खुश असलेली मुलं आज स्वतः होऊन वेळेआधीच जमली होती. पाटीलसरांनी आज आपल्या पहिल्या सत्रात, 'फ्रान्सची दुर्दैवी वीरकन्या, तिच्यावरील आरोपांखाली ब्रिटिशांकडून 'जिवंत जाळून मारण्याची' शिक्षा मिळालेली 'जोन ऑफ आर्क' हिला केंद्रीभूत धरून 'फ्रेंच राज्यक्रांती'' हा विषय खुलवला तर त्यानंतर, 'अत्यंत कमी वयात क्रांती घडवणाऱ्या 'अरुणा असफअली, प्रीतिलता वड्डेदार, सुनीता चौधुरी, शांती घोष आणि कनकलता बरुआ' या भारतीय  वीरकन्यांच्या शौर्यगाथा' ऐकवत पाश्चिमात्य नि पौर्वात्य असा सुरेख संगम घडवला. दुसऱ्या सत्रात, त्यांनी  मराठीतले विनोदी लेखक व कथाकथनकार द. मा. मिरासदार यांच्या दोन कथा मुलांसमोर मांडल्या. यात सुरुवातीला 'व्यंकुची शिकवणी' घेतली नि मग 'ड्रॉइंग मास्तरांचा तास'ही घेतला. 'ड्रॉइंग मास्तरांचा तास'मधला 'पर्यायी शिक्षक तथा 'कामचलाऊ पेंटर' मुलांना भावलाच पण 'मास्तरांचाही मास्तर असलेला, इब्लिस नि इरसाल व्यंकु' जरा अधिकच भावला! 'चेटकीण' नावाची एक नाटिकाही सादर झाली. 'चेटकीणी'ची भूमिका स्त्री-सहभागी श्रीमती आरजू इराणी यांनी तर छानच वठवली अन मुलांनीही आपापल्या भूमिका  अगदीच चोख केल्या. एकूणच, हा 'प्रयोग'ही अत्यंत कौतुकास्पद झाला. मुलांमध्ये घडत असलेला, असा छान नि सकारात्मक बदल पाहून संस्था करीत असलेलं अशाप्रकारचं आयोजन हे 'सही राह पर' असल्याची खात्रीच यातून उपस्थित सर्व 'संस्थानायकां'ना झाली.

सरांच्या कथा-कथनापश्चात आजच्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता झाली. गडफेरीमधील तंगडतोड नि मस्त जेवण यामुळं रात्रीची झोपही छान झाली ती अगदी  उद्याच्या दिवशीच्या नाविन्यपूर्ण भटकंतीसंबंधीच्या मधुर स्वप्नांच्या साथीतच!

दिवस तिसरा..  प्रबळमाची ते उंबरणेवाडी  :

आज असतो जंगलवाटेचा एक रम्य प्रवास आणि प्रबळमाची ते उंबरणेवाडी (मुक्कामी) असं असतंय त्याचं स्वरूप! आणि, ही असते, क्वचितच भटकंती होत असंलेली एक आगळी वाट! 'प्रबळगड-कलावंतीण' या दुर्गद्वयींच्या भटकंतीसाठी  साधारणतः प्रत्येकजणच, पनवेल-ठाकुरवाडी मार्गेच येतो नि तसाच परतही जातो. मात्र, आज  आम्ही प्रबळगडाची ती बाजू पाहणार असतो, जी पाहणारे भटके असतील क्वचितच वा  फारच कमी!  कारण, स्थानिकांशिवाय क्वचितच कोणी भटका या मार्गाने येत-जात असणार!  उत्सुकतेपोटी आम्ही सकाळीच नाश्ता-चहापान लवकर उरकून भटकंतीसाठी तयार बसलेलो; पण, दुर्दैवाने, आमचा 'राजू गाईड' मात्र अंमळ उशिराच आला, त्यामुळे आजची भटकंती चांगलीच  उशिरा सुरु  झाली.
 (उंबरणेवाडीकडे जाताना सतत मागे वळून पाहायला लावणारा प्रबळगड)

माची मागे टाकत, डावीकडे वळून 'खोप्या'ने पुढे निघत आणि प्रबळगड  व कलावंतीण या  दोहोंनाही उजव्या हाताला  ठेवत  आमची अर्धवळसा  फेरी  सुरु झाली. काही वेळांतच, आम्ही आलो  ते 'लांबाच्या सड्या'वर! अन इथं येताच डोळ्यांत भरली  ती प्रबळगडाची सुंदर अशी तटबंदी! याआधी कधीही न पाहिलेली! अत्यंत मोहक नि मनोहारी असं ते दृश्य! मग, थोडं डोळ्यांत साठवत नि थोडं छायाचित्रण करीत आम्ही पुन्हा आमच्या वाटेला  बिलगलो.

काही वेळातच आम्ही दाट अशा जंगलात प्रवेशते होतो. मग  सुरु होतो तो जंगलप्रवास.. कधी जंगलाच्या मध्यातून तर कधी काठा-काठाने! प्रबळ माचीवरून निघून आता बराच वेळ झालेला असतो. त्यामुळे भूक लागल्यासारखं झालं होतं. 'राजू'ला आता , 'वाटेत जवळ कुठं पाणी असेल का?'  असे विचारता, तो, "थोडा वेळ थांबा, 'आंब्याचं पाणी' येईलच आता..", असं  म्हणत थोडं थांबायला सांगतो. आणि, काही वेळातच एक नाळ, अर्थातच,  'आंब्याचं पाणी' येतं.   मग एक 'छोटासा  'खंड' घेत  थोडं खाऊ-पिऊ होतं आणि बऱ्यापैकी आधार मिळाल्यामुळं आमची सवारी पुन्हा  'ताज्या दमानं'  आपल्या वाटेला भिडते.

आता जंगल तर चागलंच दाट असतं. मात्र, अधूनमधून लागणाऱ्या मोकळ्या प्रदेशातून सहज मागे वळून पाहताना प्रबळगडाचा तो प्रचंड पसारा अजूनही नजरेत भरत असतो. इतका की आपल्याला तो त्यासाठी सदोदित मागे पाहण्यास भाग पाडतो.. अन  इकडे समोर, माथेरानच्या डोंगररांगेतील ते हाजी मलंग, चंदेरी अन पेबही नजरेआड होण्यास मुळीच राजी नसतात. एक अफलातून असाच आणि अतिशय सुंदर असा 'सह्यनजारा'  आता आमच्या पुढे सादर असतो!


 (माथेरानच्या डोंगररांगेतील चंदेरी, हाजी मलंग आणि पेब)

आमची वाटचाल अशीच पुढे चालू असते. मध्येच भल्यामोठ्या आकाराच्या शिळाही आमची  साथ करू लागतात. थोडक्यात आता आम्ही 'कोडा'त आलेलो असतो!  या 'कोडा'तुन, त्या शिळांच्या  साथ-संगतीने आमची  सफर पुढे 'सुतार माची'ने हाश्श-हुश्श करीत एका ओढ्याजवळ येवून स्थिरावते, आणि, थोडीशी विश्रांती घेऊन पुनश्च  ताजीतवानी होत  निघते.. मात्र, ती  काहीशी भांबावण्यासाठीच!

होतं काय.. तो थोडा  घोटाळाच! आमची  वाटचाल मध्येच कुठंतरी  चुकते, जी पुढे जाऊन अटकते नि  आम्हांलाही अटकवते ते काही झुडपं आणि  एका भला मोठ्ठा खडक असलेल्या टप्प्यावर! इथं आम्ही अडकतो इतकं की, मुळात तिथून पुढं  वाटच नसते आणि तो टप्पा तिथूनच उतरणं, ते ही या नवख्या मुलांना घेऊन, असतंय थोडं जिकिरीचंच शिवाय पुन्हा मागे जात मूळवाटेला भिडणंही असतंय केवळ वेळखाऊ!  आणि, आजच्या नियोजनानुसार, यासाठी हाती वेळही नसतो. तेंव्हा, आहे त्या परिस्थितीला तोंड देत त्यातूनच पुढच्या मार्गाचा काहीतरी माग घेणं हेच आणि फक्त असंच अधिक श्रेयस्कर राहील, असा निर्णय घेतला जातो नि मग,  त्या वाटेनेच मध्येमध्ये आलेल्या झुडपांच्या फांद्या  बाजूला सारत नि हळूहळू त्यातूनच मार्ग काढत आणि त्या खडकटप्प्यांवरून एकमेकांना आधार देत आम्ही कसाबसा तो टप्पाही पार करतो. पण एवढ्याने भागेल ती खोडील जंगलवाट कसली? तिनं तर अजूनही अंत बघायचा हे ठरवलेलंच असतंय. अर्थात, नियतीनं फेकलेल्या नव्या फाशांनुसार, आम्ही काही वेळातच त्या भाबड्या जीवांसह  खतरनाक अशा  धामण दांडा'ला लागलो.


 (धामणदांडाला.. एका सुरक्षित टोकावर)

'धामण दांड'! ह्या 'दांडा'चा उतार इतका तीव्र होता की, काही वेळा बसूनच नि स्वतःला नीट सावरत-सांभाळतच उतरण करावी लागे. त्यात आमच्या गटात माझ्याशिवाय तीनेक आणखी ज्येष्ठ मंडळीही होती  नि  काहीशी 'मुश्किली'नेच चालू होती  आमची उतराई..! त्यामुळे, 'आलिया भोगासी.....' याला काहीच पर्याय नसतो. मग, कधी उभे राहून तर कधी बसून, अगदी नेटाने आम्ही ते 'कठीण असं कार्य' पूर्ण करण्याचा प्रयत्नात होतो. चांगलाच कठीण कार्य होतं ते!  आणि, 'आता काय, जवळ तर आलंय', असं म्हणत, राजुला तर केंव्हाच पाठी सोडलं होतं. पण म्हणतात ना, दैव पाहायचा तेवढाच  अंत पाहतं! एवढ्यात,  आमच्या सुदैवाने काही गाववाली मुलं बाजूने चाललेली आम्हांला दिसली. त्यांनीही, आम्हांला पाहिलं होतं. आम्ही काहीसे अडचणीत आहोत, याची त्यांना दुरूनच कल्पना आलेली.. बहुदा 'दैवा'नेच पाठविलेली असणार ती! तीही  उंबरणेवाडीलाच निघालेली होती. मग त्या मुलांच्या मदतीने आम्ही सर्वजण तो 'दांडा' व्यवस्थित उतरते झालो.  आता या  मुलांचं अगदी  'गोड' शब्दांत छान कौतुक करीत आभार मानायचं, हा विचार मनी होताच, पण.. त्यांचा-आमचा मेळ कुठला जमायला? आता आम्ही सर्व सुखरुप उतरलोय, याची खात्री पटताच ते आल्या वेगे पसारही झाले! 'ना उपकाराची भाषा, ना परतफेडीची आशा!' 'गावा'कडे हे असंच असतंय. ..."तुका म्हणे  सुख पराविया सुखें।" अशा भावना आणि वृत्तीचे ते! आमचे आभार प्रदर्शन ओठी येण्याआधीच ते दूर तिकडे, थेट पाताळगंगेच्या काठी पोहोचलेलेही! पुढे काही वेळातच आम्हीही त्या नदीपात्राजवळ पोहोचलो. आता गाव पलीकडेच.. काठावरूनच तसं  दिसलंही होतं पण, उतारास बरेच कष्ट पडलेले.. मग, काहींच्या आग्रहास्तव, जराशी सावली पाहून थोडं विसावलो नि अखेरच्या टप्प्यातली ती वाटचाल, पात्रातले ते लहान-मोठे दगड-गोटे पार करीतच आम्ही उंबरणेवाडीत येऊन  दाखल झालो.  
 
 (उंबरणेवाडीची शाळा)

वाडीत शिरताक्षणी जे चित्र दिसलं, त्यानं तर मन अगदी मोहवूनच गेलं. थकवा तर पळूनच गेला. चांगलंच प्रशस्त, साधारण वर्तुळाकार असं  ते आवार, त्याभोवती जुनी, उंच पण डेरेदार अशी वनराजी, तीही  दाट नि  हिरवीजर्द! काही झाडांभोवती तर सुंदर असे पारही! उजवीकडे समोर ती मस्तपैकी रंगवलेली शाळा-इमारत आणि डावीकडे तो आख्खा गाव! तोही हिरव्याजर्द नि दाट अशा वनराजीत नटलेला, थटलेला! आम्ही आल्याचे पाहताच आमची आजची नायक-मंडळी सत्वर आमच्या स्वागताला आली. कारण, आमच्या 'अंतरंगाचा पाढा' आम्ही पोहोचण्याआधीच तिथं पोहोचलेला होता. 'उशिराची सुरुवात' नि 'मध्यांतरातली गडबड' आम्हांला चांगलीच भोवलेली  होती. आजची,  साधारण चार-साडेचार  तासांची सहजची  वाटचाल सुमारे दीड ते दोन तास व्याजासह जास्त घेऊन तब्बल सहा-साडेसहा तास वसूल करून गेलेली होती. शिणले-भागले आम्ही तिथं पोहोचताच लागलीच पाठपिशवी उतरवत, तिथल्या पाण्यानं थोडं ताजंतवानं होत तिथल्या शाळेच्या भिंतींवर रंगवलेल्या सुभाषितांत रमतो. काही वेळातच जेवणाचं बोलावणं  येतं अन आम्ही त्या 'घरा'कडे निघतो. 'गड्या, आपुला गावच बरा' याला साजेसंच असं  ते सारं वातावरण असतंय. जेवण होताच आम्ही पुन्हा शाळेजवळ जमतो. 

अवतीभवतीही सहज फेरफटका होतो. दूरवर तिकडे प्रबळची पूर्व बाजू आता आपल्या अगदी समोर आणि  विशाल स्वरूपात डोळ्यांसमोर असते तर डाव्या हाताला ईर्शाळही डौलाने ऊभा असलेला दिसतो. आज तर मुले वेळेआधीच सरांभोवती घुटमळू लागलेली. सरांची कथा ऐकवण्याची हातोटीच मुळी अलग होती! मातीतला ओलावा जशी 'मूळं' पकडून ठेवतात, तसं सर आपल्या मधुर नि आश्वासक 'वाणी'नं 'मुलं' जखडून ठेवत असत! आजच्या नियोजनानुसार सरांनी मग पहिल्या सत्रात 'मलाला' तथा 'मलालाई' या अफगाणिस्तानी  वीरकन्येचा पराक्रम ऐकवला तर दुसऱ्या सत्रात चारुता सागर यांची 'वाट' आणि रत्नाकर मतकरी यांची 'ती, मी आणि तो' या कथाही ऐकवल्या. दुर्दैवी 'मलाला' नि 'वाट'मधल्या 'कावरी' या दोहोंचंही दुर्दैव ऐकून मुलं चांगलीच गलबलली तर 'ती, मी  आणि तो' 'मधल्या त्या खुन्यानं एक वेगळंच आणि गूढ-गंभीर असं वातावरण  निर्माण केलं.

चौथा दिवस..  उंबरणेवाडी  ते पिसारनाथ शिडी मार्गे माथेरान  :

आजचा जंगलप्रवास शेवटचा.. माथेरान.. थंड हवेचे एक रम्य ठिकाण! जगप्रसिद्ध!! प्रचंड हिरवाई, पूर्ण नैसर्गिक वातावरण असलेलं कोकणचं नंदनवनच!!! मुलं प्रचंड खुश होती. त्यात कालच्या 'ठेचे'तून 'शहाणपण' घेऊन आज सकाळी सव्वासातलाच सुरुवात केलेली. काही मिनिटांतच आम्ही 'डेंगची'च्या पायथ्याला पोहोचतो. ही 'डेंगची' म्हणजे साधारण पाऊण तासाची एक घसरणयुक्त नि सलग अशी उभी चढण, अगदी शेवटपर्यंत छातीवर येणारी.. थरारक अन दमखाऊ! पण ठराविक गति आणि ताज्याच दमात अविश्रांत मार्गक्रमण केल्यानं ती व्यवस्थित पार करीत  आम्ही  आलो पहिल्या शिडीजवळ.  एव्हाना  साडेनऊ  झालेले होते.

 
(शिडीवाटेवरील एक थरारक टोक..)
ही शिडी अत्यंत जीर्ण तर असतेच शिवाय काही पायऱ्याही असतात 'अलविदा', त्यात ती असते  डुगडुगतीही, वय झाल्यासारखी जणू! अन त्यानंतर लागणारी लाकडी शिडी, ही मात्र असते सुमारे चाळीसेक फूट उंचीची, अवस्थेने बरी पण बाजूलाच पाण्याची धार  असल्याने तिनं  काहीसा ओलावाही  पकडलेला!  मग  इथंही सहकाऱ्यांना मदत करीत मी पुनर्नुभवाचा पूर्ण आनंद लुटला. हा शिडीमार्गाचा एक वेगळाच थरार अनुभवल्याचा आनंद मात्र सर्व मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता.

 
 (शिडीवाटेचा थरार!)
मध्यंतरी इथं दोन लोखंडी शिड्या नव्यानं बसविण्यात आलेल्या, पण इथल्या तुफानी पावसात त्या  काही टिकल्या नाही.  मग पुन्हा लाकडी शिड्याच बसविण्यात आल्या. पुढचा नाळेचा टप्पा तर विलक्षणच होता. ओलसर अन काहीसा घसरण असलेलाही! मग तिथंही मुलांना व्यवस्थित सूचना देत व आवश्यक साहाय्य करीत नि  'आखाड्या'ने वर निघत साधारण अकराचे सुमारास आम्ही 'तळ्या'जवळ पोहोचलो. मग काही वेळ तळ्याकाठी रमत आणि थोडंफार  पर्यटकांच्या त्या स्तिमित नजरा झेलत आम्ही 'पिसारनाथ महादेव मंदिरा'कडे निघतो. दर्शन घेऊन थोडं तिथंही निवांत होतो अन मग निघतो ते थेट मुक्कामाचे स्थळाकडेच! जेवण वगैरे आटोपून दुपारच्या सत्रात आम्ही एकच परंतु अतिशय सुंदर असं ठिकाण निवडलेलं.. 'एको पॉईंट'! आमच्या भटकंतीचा संपूर्ण प्रवासमार्ग इथून आम्हांला छानपैकी उलगडत होता, न्याहाळता येत होता.. 'अच्छा! असं, या मार्गे, आपण आलो तर!' असाच भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता.

आजच्या सायंकाळी नि रात्रीसाठी पाटील सरांच्या 'पेटाऱ्या'त काय दडलंय याची मुलांसह सर्वांनाच उत्कंठा होती. यथावकाश, सायंकाळी जेंव्हा सर्व मंडळी जमा झाली तेंव्हा सरांनी ऐकवली आपल्या विलक्षण नि धीर-गंभीर आवाजात आणखी दोन महान क्रांतिकारकांची गाथा.. एक म्हणजे खुद्द 'माथेरानचा ढाण्या वाघ, भाई कोतवाल' नि दुसरे शूर वीर 'हिराजी पाटील'! सिद्धगडावरील त्यांच्या त्या दुर्दैवी अंताची व्यथा ऐकताना सर्वांचेच डोळे अक्षरशः पाणावले होते.

 
 (श्री. पाटील सर, श्री. दीक्षित सर,  मुलं.. आणि.. त्यांचं  विश्व!)

मुलांचा 'जोषा'तला वयोगट पाहता सरांनी निवडलेल्या क्रांतिकारकांच्या 'त्वेष'पूर्ण कथा, जोडीला करमणूकप्रधान, हास्यकथा नि गूढकथा ऐकवत त्यांनी मुलांना साहित्यातील  'नवरसा'ची छान मेजवानीच दिली. एकंदरीत सर्वच  मुलांनी त्यांच्या वयास साजेशी शिस्त पाळत आणि आवश्यक  वाटेल त्यावेळी परवानगीसह थोडं मोकळंही होत संपूर्ण मोहीम 'बहु आनंदे' साजरी केली.

आजचा  मुक्कामाचा अखेरचा दिवस..   त्यातच आज  एका  सहभागी मुलाचा  वाढदिवसही होता.  मग,  सर्वांनी एकत्र येऊन तो  उत्साहाने साजरा केला. बाजूलाच मैदानात असलेल्या कारंजाचा, परवानगी घेऊन, लाभ उठवीत सुंदर संगीताच्या साथीत मुलांनी छान 'पाऊस-नाच'ही केला.

आज अखेरचा दिवस.. पाच दिवस अत्यंत उत्साहात नांदलेली मंडळी आज दुपारच्या जेवणानंतर एकमेकांपासून अलग होत परतीच्या वाटेला लागणार होती. आज, सहेतुक, माथेरानच्या भाई कोतवाल उद्यानातच  प्रमाणपत्र वाटप सोहळा पार पाडला जातो. मग बाजारपेठ फेरफटका, सौम्य खरेदी आदि गोष्टी उरकून प्रत्येकजण इथूनच आपापल्या सोयीने रवाना झाला तो  पाच दिवसांच्या रम्य  आठवणी सोबत घेऊनच!

खरं तर, निसर्गसान्निध्य आपणांस सहजीवन शिकविते; निसर्ग आपणांस लवचिकता आणि निर्णयक्षमताही शिकवितो, शिवाय, निसर्ग आपल्याला काटकसरही शिकवितो. साहजिकच या सर्वांतून 'समभावनेने तारतम्य राखत समायोजन करता आले की षडरीपुंचा विसर पडूनआपणांस आरोग्यपूर्ण पद्धतीने छान जीवन जगता येते. म्हणुन यासाठी निसर्गसान्निध्य हे हवेच! ..आणि म्हणून,  'शिस्तबद्ध संयोजन' नि 'सहभाग' हा भटकंतीचा 'पाया' आणि 'आत्मा' ठरतो. आणि हे तत्व 'युथ हॉस्टेल, मालाड' अशा पद्धतीच्या मोहिमा सन २००१ सालापासून 'ट्रेक सह्याद्री'च्या माध्यमातून आयोजित करून जपत आहे, हे निश्चितच सह्यसेवेतील महत्वपूर्ण  नि दखलपात्र असं योगदान आहे.

 
 (मोहिमेतील  सहभागी विद्यार्थी आणि शिक्षक)
या मोहिमेत सर्वश्री वसंत घाडीगावकर, अक्षय मुळे, मधुकर धुरी, श्रीराम परब, नानाभाई, आश्विन लोखंडे आणि आणखी इतर चार   नायक, व्याख्याते चंद्रशेखर पाटील आणि सहभागीमध्ये गोव्याच्या श्रीमती क्लॅरिटा जोन्स, मुंबईच्या आरजू इराणी, पूनम लोखंडे आणि आणखी अन्य दोन तसेच 'पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, जळगाव'चे श्री. संजय दीक्षित सर आणि त्यांच्या शाळेच्या ८ वी व ९ वी या दोन वर्गांचे मिळून १९ तर मुंबईचा चिरंतन चव्हाण असे २० विद्यार्थी आणि मी असे आम्ही एकूण ३८ जण सहभागी होतो.

- सह्यभ्रमर 

●■स■मा■प्त■●

या भटकंतीतील आणखी काही छायाचित्रे... ::


(प्रबळगड ते  उंबरणेवाडी.. वाटचाल)


 (शिडीवाटेदरम्यानचे एक अवघड ठिकाण.. )


 (शिडीवाटेनंतरचं आणखी एक कठीण मार्गक्रमण.)

(उंबरणेवाडी नंतरची एक अवघड घसारायुक्त चढाई.. डेंगची)



(उंबरणेवाडी-माथेरान मार्गावर श्री. पाटीलसर, अक्षय मुळ्ये आणि मी)

●■स■मा■प्त■●


http://ishwargaikwad.blogspot.com/

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...