-पुर्वालाप---
बरेच दिवस डोक्यात असलेला भाग प्रत्यक्षात कधी पाय लागतील अशा आशेत होता.
होकार नकार पचवत शेवटी जे कोणी उरलोय त्यांनी ठरल्याप्रमाणे भटकायला
निघायचंच असं ठरलं. सध्या प्रयत्न असा असतो की, 'घरापासून ४-५ तास प्रवास
करून तिथले घाट करायच्या आधी जवळपास असतील तेवढे सगळे "पास" (घाट) पालथे
घालायचे'. उद्देश एकच घाटासाठी अन मुळातच सह्याद्री साठी जास्तीतजास्त वेळ
देत यावा.
दिवस पहिला:
घटना १: आधी ठरलेल्या दराप्रमाणे पैसे न आकारणारा मुजोर अन लाचार चालक.
कर्जत स्थानका बाहेर उभ्या सहा आसनी रिक्षावाल्याशी आधी बोलणे
झाल्याप्रमाणे जाम्रुग ला जाण्यास बसलो. मी त्याला इतर उपलब्ध २ सीटा
भरायची मुभा दिली, भावना हीच की त्याला हि ४ पैसे कमवायची संधी! वर जाम्रुग
ऐवजी आंबिवली पेठ ला घातली गाडी आणि मग माझ्या म्हणण्यावर कामतपाड्यावर
सोडला(जणू काही उपकारच), अन वर वाद असा की त्याला वाटलं आम्हाला पेठ ला
जायचंय. हो-नाही/ हो नाही करता करता १०० रुपये जास्त पदरात पाडून घेतलेच
बंड्याने. आजूबाजूने गर्दी जमा, "काय झाला" ?
घटना २: हाती असल्या-नसल्या जिमिनीचा तुकडा विकून नवश्रीमंत झालेल्या
आदिवासी बांधवांना दारूच्या विळख्यात नष्ट होतांना पाहून मनाला पीळ पडतो.
कामतपाड्याहून वाटेला लाऊन द्यायला आलेला हा तरुण पण अशाच दुष्टचक्रातला.
घाटाला लाऊन द्यायला मुळात स्वताहून आला खरा पण त्यामागे त्याची ३०० रुपये
द्यावे ही अपेक्षा असेल हे नव्हत माहीत. याला सर्वस्वी, जिमीन विकून अचानक
हाती लागलेलं घबाड आणि पैशापायी गिर्यारोहणाच्या खेळाचा व्यवसाय करणारे अन
त्यात स्थानिकांना नाकारणारे आपले शहरी बांधवही तितकेच कारणीभूत आहोत.
सह्याद्री अन सर्वसाधारणपणे आसपासच्या परिसरात उभ्या कृषी-घरांनी या भागाची
सामाजिक वीण कशी सुट्टी केलीये अन किती तकलादू केलीये याची २ उत्तम
उदाहरणं घेत आम्ही वाजंत्रीच्या चरणी हजर झालो. इथून सह्याद्रीन जे काही
दर्शन दिलंय त्याने मानवजातीच्या क्षुल्लक अस्तित्वाची स्पष्ट जाणीव करून
दिली. जणूकाही सह्याद्री आपल्याच पोराचे वार हसत झेलत म्हणत होता, … "परी
सह्याद्री ला विसरू नको" !! जाम्रुग हे पायथ्याच गाव घाटाच्या सुरुवाती
पासून साधारण अर्धा तासाच्या सपाट चालीवर आहे. घाटाच्या सुरूवातीला एक
मोक्याचा पाणवठा आहे. तिथे पाण-पिशव्या भरून घेतल्या, मनसोक्त पाणी पिउन पण
घेतलं.
सुरुवातीच्या सपाट चालीने वाट सह्याद्रीच्या गर्भात जाते. अन मग दांडाची
खडी चढण सामोरी येते. नेटाने तासभर चढाई आहे. उजवीकडे सह्याद्रीत एक
अप्रतिम घळ नजरेस पडते. अतिशय विस्मयकारक असे हे दृश्य आहे. इथे आषाढात
निर्झर काय निर्दयीपणे मार्गक्रमण करत असेल याचा जरासा अंदाज येतो.
खिंडीच्या अर्ध्या उंचीपास्न दाणा-दाण उडवत पाणी कोकण सपाटीला लागते.
पदरात पोहोचताच सह्याद्रीन डोक्यावर छप्पर अंथरलं. शेंदरी मिनिवेट,
स्वर्गीय नर्तक अशा एक से एक मानकऱ्यांनी साद घातली अन ओळख पटताच दर्शन हि
दिलं. त्या पाठोपाठ मलबारी धनेश, तुरेवाला सर्पगरुड यांच्या तानाही ऐकू
आल्या.
स्वर्गीय नर्तक
शेंदरी मिनिवेट
अंजनी ची आकर्षक तितकीच नाजूक फुले..
अनोखी रंगसंगती
दीपंकर डोंगरे : घाटातले विश्रांतीचे २ क्षण
तासभरात माथ्या-खालच्या आडव्या टप्प्यात आलो. समोर पदरगड आमची चेष्टा पहात होता. पदराशी अपार जंगल व्हतं.
चमुचित्र : दीपंकर, राजेश, रविअण्णा, सुजय आणि प्रतिश आसपासचा परिसर न्याहाळतांना
दशमुळी
खेतोबचं प्रवेशद्वार
नजरेत मावायचे न्हाई अन पट्टीवर मोजता यायचे न्हाई इतके प्रकारच्या
हिरव्या छटा पाहिल्या. वाट खोदणाऱ्या त्या हुशार डोक्यास दाद देत
खेतोबास सामोरे गेलो.
वरून सह्याद्रीच रांगडं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होतं. त्याला बिलगु पाहणाऱ्या अनेक खोंगळया, खड्या नाळा. . निव्वळ शब्दातीत !
सह्यवैभव : पंचमहातत्वांचा एक विलक्षण अविष्कार
खेतोबा
खेतोबापासून येळावली गाव तसं पाउण
तासाच्या अंतरावर, पण हे काय डोंबिवली हून फास्ट लोकलने मुंबई गाठण्याइतकं
सरळ-सोपं थोडीच. अन त्यात ती धार-माथ्यावरली गावं, त्यांना घुमाक्कडांना पण
चकवायला आवडतंय. मध्येच लोणावळा - भिमाशंकर पदभ्रमण मार्ग आडवा गेला.
उत्तरेस, आधी कमळजाईचं पठार अन मग शिव-शम्भो !! गावाजवळ पण तेवढ्यात एक
बारीक चढाई-उतराई करावी लागली. :D
दातपाडी
येलवळी गावच्या वाटेवरील काही विहंगम दृश्ये. . .
गावात जंगलाबद्दल आपलेपणाची भावना आहे. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करण्याची इच्छाशक्ती सुद्धा. गावात शासनाच्या वन-
विभागातर्फे एक वन-पर्यटन योजना प्रायोगिक तत्वावर सुरु केली आहे.
ज्यात,
१) आलेल्या पर्यटकांची मुक्कामाची खोली,
२) २-३ तंबू, तसेच स्थानिक बांधवांतर्फे न्याहारी अन जेवणाची वाजवी दरात सोय,
३) स्थानिक तरुण आसपासच्या जंगलात फिरवण्यासाठी वाटाडे म्हणून उपलब्ध,
४) गावात लाकुडतोड बंदी पाळली जाते,(मर्यादित वापर सोडल्यास)
५) शिकारबंदी पण पाळली जाते तसेच गस्त देण्यास गावकरी स्वत:हून पुढे येतात.
६) ग्रामस्थांची वनखात्याच्या अधिकाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा पण होत असते.
या अन अशा ग्राम-सहभागी योजनाच सह्याद्रीचं भवितव्य आहेत. अशा
लोक-सहभागी योजना निश्चितच सह्याद्रीचं पुढील अध:पतन नियंत्रित करतील.
गावाजवळच्या मोकळ्या जागेत आमचे २ तंबू लागले. अन मग सुग्रास जेवणाचा आनंद
घेत आम्ही तृप्तीने ढेकर दिली. त्यानंतर साधारण १०.३० वाजेपर्यंत विविध
विषयांवर मस्त गप्पा रंगल्या. शेवटी सकाळ पासूनचे श्रम अन पुढील दिवसाची
वाटचाल पाहता आम्ही ढाराढूर पंढरपूर झालो.
दिवस दुसरा: रात्रभर छान थंडगार झुळूक चालू होती. आजूबाजूला निबिड अरण्य
होतं. अशा वातावरणात खरंतर रात्र जागवायला मजा येते, पण आमचे दिवसभराचे
श्रम आम्हाला वेगळ्याच दुनियेत घेऊन गेले. सकाळी पहाट गारवा होता पण फार
कुडकुडण्या एवढी थंडी नव्हती. मस्त कोमट पाण्यात तोंड धुवायचं दुर्मिळ सुख
लाभलं. त्या उबदार पाण्याच्या तांब्याने आमची अन खंडूभाऊची दोस्ती एकदम
पक्की करून गेली. आदरातिथ्य ते हि इतक्या दुर्गम परिसरात ते ही एवढ्या उच्च
दर्जाचं, वन-पर्यटनाचा एक अतिशय व्यावसायिक पण तितकाच आपुलकीचा अनुभव पेश
होत होता.
खंडू बाणेरे - त्यांची मंडळी अन आम्ही . .
वाफाळते पोहे अन मस्त पैकी दोनदा चहा घेऊन आम्ही ८.३० च्या सुमारास आम्ही भिमाशंकर कडे निघालो.
कमळजाई देवस्थान
मधेच माळरानावर झुलणारं, सकाळचं कोवळं ऊन अंगावर घेत वाऱ्यावर भिरभिरतं गवत, तर कधी असंख्य पक्ष्य-फुलांचं हक्काचं घर असलेलं, हिरव्या रंगाच्या अनेकविध छटा मिरवणारं गच्च रान.
कधी कापशाची पंख न हलवता वाऱ्याच्या
झोतावर चाललेली डोंबारी कसरत, तर कधी हजारो दवबिंदूंनी निर्मिलेला एक
अमुल्य (बिंदू)हार. कुठे भक्ष्याच्या शोधात
निघालेला सर्प-गरुड, तर कुठे शिंजीर पक्ष्याची नाजूक कलाकारी शीळ. दूरवर
आपापल्या गावातनं देवाकडे म्हणजे आपल्या कामकाजासाठी निघालेलं गावकऱ्यांच
टोळकं अन सहज नेहेमीच सवय म्हणून मागे वळून पाहताच उलगडलेलं भिमा
खोऱ्याचं निव्वळ स्वर्गवत भासणारं लोभस चित्र.

असं सगळं अन बरंच काही नजरेत कैद करत स्मृतीपटलावर चितारत आम्ही
गुप्त-भिमाशंकर च्या जवळपास आलो. पर्यटकांचा एखादा मोठा गट आला
असावा. फार गोंगाट चाललेला. तडक मागे फिरून पुन:श्च देवाकडे लागलो.
मनात वेडी आशा अन चेहऱ्यावर शरणागतीचे भाव असलेल्या त्या भाविकांना पाहून
बंदिस्त कोनाड्यात जगन्नियंत्याला शोधणाऱ्या पामराच कवतिक वाटतं. अन त्या
बाबतीत आपल्याला आपला देव सह्यरुपात गवसल्याचा पराकोटीचा आनंद होऊन जातो.
तर, तो आनंद साठवत अन मनात त्या शिवशंभो चे आभार मानत आम्ही उसाचा रस
प्यायला थांबलो. इथे आम्हाला कोंढवळ गावातले एक मामा भेटले, त्यांना
घाटाला जाणारी वाट विचारली त्यावर म्हणले, "चला मीच लाऊन देतो घाटाला".
अतिशय घाणेरड्या अवस्थेत असलेला घाटाचा सुरुवातीचा टप्पा, इथल्या नाजूक
परिसंस्थेवर होणारे अत्याचार दाखवून देतो.
ब्राऊन कॅप्प्ड फुलवेट्टा, काळा बुलबुल, काळ्या डोक्याचा हळद्या अश्या
अनेक मानकऱ्यांनी हाळी देऊन इकडे सगळं (जंगल) आलबेल असल्याची
दाद दिली.
काळा बुलबुल
मोरपंखी
टप्प्या टप्प्यात उतार उतरत आम्ही पदरात आलो, इथे एक अनावश्यक डावा
रस्ता घेऊन पुढे झालो तोच एक पाणवठा लागला. इथेच तहानलाडू भूकलाडू
संपवून पदरगड च्या दिशेनं जंगलात निघालो. अप्रतिम दाट सदाहरित रानाचा हा
पट्टा, वाट कुठेच उजवीकडे म्हणजेच कोकणाकडे उतरत नव्हती.
वेळेत आम्ही त्या डावा रस्ता घेतल्या फाट्यावर परतायचं ठरवलं. तिथून पुढे
मागून आल्या ठळक पायवाटेने आणखीन एक फाटा लागला. ही वाट मात्र निश्चितच
खाली उतरत होती, पण जर जास्तच खडी उतरण होती. त्यावरून आमचा असा
निष्कर्ष निघाला की ही नेहेमीच्या वापरातली वाट नसावी. आणि ते थोड्याच
वेळात खरं ठरलं. वाट अचानक पानझडीत हरवली. इथून पुढचे ५० मीटर
दिशा-शोधन कौशल्य पणाला लागलं, पण लौकरच एका ठार बोडक्या सपाटीवर
वाट पुन्हा ठळक झाली अन घाटाखालच्या माळावर पोचली. सगळ्यांचे पाय सलग उतार
अन अचानक पडलेल्या उन्हाच्या तावाने हुळहुळे झाले होते. पुढे एका
ओढ्यापाशी पाण्याचा हबका मारताच शरीरच तापमान नियंत्रणात येऊ लागलं.
आमच्या वाटेकडे डोळे लाऊन बसलेले सिद्धगड अन दमदम्याचा डोंगर
मागे वळून पाहताच सिद्धगड ते पदरगड पट्टा डोळ्यात भरेस्तोवर पहात राहिलो.
इथून पुढे सुरु झाल्या ते १-२ बीएचके घरांच्या जाहिराती.
लक्षात आलं, लौकरच इथेही विकासाचं अन प्रगतीचं रूप की आत्मघातकी ठरणारं अनावश्यक शहरीकरण येऊ घातलं असेल.
या भटकंती मधील काही उल्लेखनीय गोष्टी. .
१) पक्षीप्रेमी रवि वैद्यनाथन या "पक्षी-भांडाराची" लाभलेली मोलाची सोबत. .
२) साधारण ३५ पेक्षा अधिक प्रजातीचे पक्षी पाहण्यात अन ऐकण्यात आले. .
३) २ उत्कृष्ट घाटवाटांचे अनुभव पोतडीत जमा..
४) येलवळी गाव अन खंडू बाणेरे. .
सहभागी प्राणीमात्र :
१) प्रतिश साने
२) रवि "अण्णा" वैद्यनाथन
३) राजेश "बाल्या" पाटील
४) सुजय "अरब" राणे
५) दीपंकर डोंगरे
६) यतिन नामजोशी
आणखीन काही फोटोंची लिंक:-






































No comments:
Post a Comment