Sunday, December 12, 2021

अफलातून तर आहेच 'पाथरा' नि जबरदस्तही 'गुहिरीचं दार'!'

 रात्र अशी अद्याप पूर्ण उलगडलेली नव्हती, तांबडं फुटायलाही बराच अवकाश होता; आणि, पक्षीच काय, श्वानं वगळता एकूण एक सजीव एक तर गाढ झोपेत तरी होता वा पहाटेच्या रमणीय स्वप्नांत गढलेला तरी! आणि अशा शांत, निरव वातावरणात जेंव्हा आम्ही 'त्या' वाडीत अवतरतो, तेंव्हा पहाटेचा साधारण चारचा सुमार झालेला! सवयीनं जागे असणारे काही ज्येष्ठ गाववाले, आमच्या गलबल्यानं घराबाहेर येत एक एक करत तिथं हजरही झाले नि आमचं किचन बसगाडीमधून उतरेपर्यंत आम्हांला आणि आमच्या एकुणएक हालचालींना निरखत, थोडी अधिकची चौकशी करत, काही वेळांतच आमच्यातले बनलेही! मग, आम्हीही त्यांना चहाला सोबत घेत आज करावयाच्या 'भ्रमंती'संदर्भात जरूर ती माहिती व मार्गदर्शन घेत त्यांच्याशी गप्पा चालू केल्या. एवढ्यात, आधीच संपर्क केलेले आमचे 'मार्ग'दर्शक काकाही हजर झाले. सकाळचा अल्पसा उपहार अन पाण्याचं व्यवस्थित नियोजन करुन घेईतो पाच वाजून गेलेले होते. त्यात आजची भटकंती होती दोन घाटवाटांची! दमदार, कसदार आणि कठीणतम!


भटकंती सुरू करताना फटफटण्यापूर्वी दिसणारा  पाथऱ्याचा माथा 

अजूनही सभोवताली अंधारच असतो. म्हणून, अधिक वेळ न दवडता भाऊ या दोन्ही घाटवाटासंबंधी थोडक्यात माहिती देतात. मग शिटी वाजते आणि, आमचं आख्खं मंडळ, भाऊ अन त्या काकांच्या मागोमाग विजेरीच्या प्रकाशात वाट चालु लागतं..

पाथरा :

घड्याळाचे काटे सव्वापाचच्या थोडेसेच पुढे सरकलेले.. समोर, दूरवर अंग पसरुन अस्ताव्यस्त पहुडलेली ती डोंगररांग आणि तिच्या उजव्या बाजुची ती खिंड.. अंधारात, अगदी अतिअंधुकशा प्रकाशातही, जरी काळसर तरी चांगलीच दृष्टीस येत होती. वातावरण साधारण कुंद-कुंद असंच.. पण, नुकत्याच झालेल्या चहानं अन त्यानंतर  सुरु झालेल्या चालीनं शरीर काहीसं उबदार बनलेलं.. गावातील एक-एक घर मागे टाकत आमची पाऊलवाट, कधी शेतवाट तर कधी बैलगाडीवाट बनून पुढे पुढे चाललेली.. मोकळवन, थोडीशी झाडी असं करत साधारण अर्ध्या तासातच आम्ही  'चेडोबा'त येतो. 'चेडोबा' हे एक या जंगलातील छोटंसं देवस्थान!  अद्यापही खास असं उजाडलेलं नव्हतं. काहीशी दाट झाडी, हवेत कुंद गारवा आणि सोबतीला पायाखालील पानगळीचाच काय तो मंजुळरव! बाकी सारी.. शांतताच!


थोडंसं फटफटल्यानंतर चेडोबापासून थोडं वर चढून गेल्यानंतर स्पष्ठ नजरेत येणारा पाथऱ्याचा माथा 


मार्चच्या मध्यावरही एक रम्य, शीतल अशी प्रभात अनुभवयास मिळत होती. कारण, अर्ध्याअधिक तासाची चाल होऊनही हवेत अजूनही गारवाच जाणवत होता. थोडीशी चढण सुरू झाली. दहाएक मिनिटांतच मग आणखी उभी चढण सुरु झाली. ही चढण तशी दहा-बारा मिनिटांचीच होती; पण, भल्या पहाटेच्या या गारव्यातही तिने मात्र चांगलाच नाकी 'दम' आणला. गारव्याचं कौतुक संपलं होतं. थोडक्यात, आता पाथरा सुरु झाला होता. आणि चेडोबा, अर्थातच, संपला होता..


'पाथऱ्या'ला लागेतो चांगलंच फटफटलं होतं. जवळ जवळ साडेसहा होत आलेले.. समोरच, 'पाथऱ्या'चं नेमकं स्वरूप आणि ती खिंड आता व्यवस्थित नजरेत येत होती. आता फक्त चढण आणि केवळ चढणच दिसत होती.. कधी सरळ, कधी उभी तर कधी आडवी, कधी पाय मजबुत रोवता येतील अशा पावट्या तर कधी विनाहमी गवताळ अन मुरमाड असे घसरण-टप्पे, कधी धाक दाखवणारी कातळाच्या कडेकडेची वळणे तर कधी दहशत बसविणारे, विना वा थोड्याबहुत आधाराचे कातळटप्पे!


कधी पाय रोवता येतील अशा पावट्या, कधी विनाहमी गवताळ अन मुरमाड घसरण-टप्पे, कधी धाक दाखवणारी कातळाकडेची वळणे; तर कधी दहशत बसविणारे, विना वा थोड्याबहुत आधाराचे कातळटप्पे!


एक टप्पा तर असा अवघड की आता दोर वगैरे साहित्य लागणारच.. पण, नाही! इथं स्वतः भाऊ नि इतर दोघांनी इतरांना 'हात' देत पुढे-पुढे पोहोचवले.


इथं नक्कीच दोराची मदत लागेल असा हा टप्पा


थोडी 'हट के' नि 'झटके'बाज अशीच होती ती वाट! पुढचं एक वळणही असंच होतं. तितकंच 'हट के' नि 'झटकेबाज'! पण ते वळणही थोडी जिगर राखत कसल्याही मदतीविना आम्ही पार केलं. त्यापुढे तर छोटे-मोठे अनेक असे टप्पे लागले की ज्यांची वळणं, उंची  हे  नजर स्थिर ठेवत, मनाचा ताल नि शरीराचा तोल सांभाळतच चढावं लागत होतं.



पुढची वाट फक्त 'त्याला'च ठाऊक असलेलं असं हे एक वळण.. १ 

पुढची वाट फक्त 'त्याला'च ठाऊक असलेलं असं हे एक वळण.. २


एक-दोन वळणावर तर, बस्स, तिथपर्यंत पोहोचायचंय एवढंच आपल्या हातात असतंय; तिथून पुढची वाट  फक्त त्या वाटेलाच ठावूक असते. कारण, पुढचं वळण पार करेपर्यंत त्यावळणापुढचं काही दिसतच नव्हतं. एकंदरीत, या जबरदस्त अन भयावह वाटेचा थरार अनुभवत एकेक टप्पा शहाणपणाने पार करत रहाणं एवढंच आपल्या हातात असतं. आणि यश मात्र त्या माथ्याच्या अंतिम टोकावर आपली वाट पहात उभं असतंय.

यशस्वीपणे पार करत साधारण पावणेनऊ ते साडेनऊचे दरम्यान आमचं संपुर्ण मंडळ आगेमागे, गटा-गटाने, तर काही अपवादात्मकरित्या, एक-एक करीत, पण पाथऱ्याच्या त्या अत्युच्च माथ्यावर अगदी सुरक्षितरीत्या येऊन पोहोचलं.

येथून पुढची वाट तशी साधी जंगलवाट होती; पण थोडा विसावा, थोडं घाटवाटेचं अवलोकन आणि या अवघड वाटेतील त्या 'मागास' मंडळींचं निरीक्षण.. इतक्या साऱ्या हेतुतून आम्ही समोरच उजवीकडे असलेल्या छोट्याशा सपाटीवरील छोट्याशाच पण एकुलत्या एक अशा झाडाजवळ पोहोचलो. क्षणाचाही विलंब न लागता लगोलग पाठपिशव्या सुटल्या गेल्या, काहींच्या तर पाठीही जमिनीला टेकल्या;  तर काही आल्या घाटवाटेच्या अवलोकनात रममाण झाले. पाथऱ्याचं वरून खालच्या भागाचं ते दर्शन.. त्याचा तो 'धाक'युक्त उतार, ते 'दरारायुक्त' खडकटप्पे आणि त्या वळणा-वळणांवर अजूनही दिसणारे आमचे साथी, ती संपूर्ण डोंगररांग अन त्या दऱ्याखोऱ्यात इकडे-तिकडे विखुरलेली रंगीबेरंगी घरे अन वस्त्या आणि ती इटुकली-पिटुकली गावं.. एक मोहक असंच दृश्य होतं ते! पण.. पण, तेवढ्यात शिटी वाजली. आज दोन घाटवाटा असल्याने फार अधिक वेळ, अर्थातच दवडण्यासाठी, हाती नसल्यानं मागची सवारी या सपाटीला पोहोचण्याआधीच आमची आघाडी पुढे नेण्याबाबतची सूचना झाली.. नि आम्ही दौडत निघालो.. 'कानडीउडान'च्या दिशेने!


कानडी उडान


धारेरावचा माळ

आता ना घाट होता ना उतार, थोडीशी विश्रांतीही मिळालेली. मग नव्या जोमाने या वाटेला बिलगत, झपाझप पावलं उचलत आम्ही निघालो. दुतर्फा असलेली बव्हंशी झाडे कमी उंचीचीच असल्याने ती आमचा हात हातात घेत घेत जणू आम्हांला पळवू पाहत होती, आम्हांस उशीर होऊ नये , याची जणू त्यांनाही काळजी होती.  जंगलाचा रम्यपणा निरखण्यात आम्हीही तितक्याच उत्साहात रमलो होतो. पण या 'नादा'त ते 'कानडीउडान' अन पाठोपाठ तो धारेरावचा माळही कधी मागे टाकला, हे कळलं देखील नाही. इथपावेतो, साडेदहा होत आलेले.. घाईत आम्ही धारेरावच्या माळावरील प्रसिद्ध मंदिरदर्शनालाही मुकलो होतो हे खरे; पण पुन्हा 'पुढच्या-वेळी' या खात्यात ही बाब 'खतवून' आम्ही पुढे निघालो नि पोहोचलो ते थेट ठाकुरवाडीतच!


दृष्टीपथात ठाकुरवाडी.. 

वास्तविक, आजची वाटचाल तशी ठाकुरवाडीत यायची परवानगी देत नव्हतीच; कारण, गुहिरीची वाट, या वाडीच्या बरेच आधी, साधारण एखाद-दीड किलोमीटरवर डाव्या हाताला वळत पुढे असलेल्या भांबळवस्तीला तथा धनगरवाड्याला ..वाडा कसला? तेवढंच एकमेव घर! भोजा करत त्या समोरच्या खिंडीत जाणार होती. परंतु, हे माहीत असूनहीकेवळ समोर वस्ती दिसल्याने, काहीजण, "भुकेल्या पोटात दोन घास जावेत, मग 'त्या'नंही थोडं निवांत व्हावं.. नि पाण्यानंही थोडं तहान भागावल्याचं पुण्य कमवावं.." या आणि एवढ्याच 'उदात्त' हेतुतून ही 'पामर'पावले आपसूकच इकडे वळली होती. साधारण दहाएक मिनिटेच गेली असतील.. काहींचा 'कार्यभाग' साधून झाला होता तर काहींचा तो चालूच होता.. एवढ्यात मागून शिटी ऐकू आली, पुन्हा पुन्हा अशा तीन-चार शिट्ट्या झाल्या अन एकच धावपळ उडाली. कारण तातडीने मागे फिरण्याचा तो संकेत होता. शिवाय, अधिकृत भोजनथांबा तर हा नव्हताही मुळीच! पण त्यांतही काही, भरली पोटं, "चला, जमलं बुवा!" या आनंदात तर उपाशी पोटं, "निदान पाण्याचं तरी जमवलं.." एवढ्या माफक आनंदात धावत पळत पुन्हा मागे जात, त्या वळणाला, त्या गुहिरीच्या वाटेला बिलगली.


एकमेव घराची भांबळवस्ती अन तिथून समोर दिसणारं गुहिरीचं दार

मग, बरंचसं मोकळवनाने, भूस्खलनामुळे विस्थापित झालेल्या भांबळवस्तीतील एकमेव घराच्या (रामा भांबळ) उजव्या बाजुने, त्याहीपुढे थोडंसं झाडवन पार करीत बारा-सव्वाबाराच्या सुमाराला आम्ही पोहोचलो ते थेट गुहिरी च्या दारातच!

हा आजचा दुपारच्या भोजनाचा अधिकृत थांबा होता. मग, उर्वरित भुकेल्यांनी आपलं दुपारचं जेवण इथं आटोपलं. त्यानंतर लगेचच सर्वांनी गुहिरीच्या वाटेशी सलगी केली.

गुहिरीचं दार  :


गुहिरीचं दार 

वाट कसली? नाळच ती! दगड-धोंड्यांनी युक्त असा एक जलप्रवाहमार्ग तो! ती नाळ अन त्यातले ते दगडधोंडे.. कधी हृद्य साथ तर कधी त्यांचेच अडथळे! जशा भयावह उतरणी तितकेच भयावह खाच-खळगे अन जोडीला  कपाऱ्याही!! क्वचित कुठे एक दोन ठिकाणी थोडासा दिलासा म्हणून छोटा-मोठा किरकोळ 'बाह्यवळणमार्ग'.. अन्यथा, खडकप्रस्तरातील विविधता, त्यांचे आकार आणि अजस्त्रता यांतील भिन्नता, नाळेची रुंदी नि उंची यांतलं वेगळंपण एवढं सोडलं तर इतर नाळेसारखीच ती नाळ..


गुहिरीचं दार 


जणू एकीला झाकावी अन दुसरीला बाहेर काढावी अशीच! फक्त नावं काय ती वेगळी.. पण,  असंही वाटून जातं कधी कधी..  म्हणून "नावांत काही नसतं", असं म्हणूनही चालत नाही; कारण प्रत्येक नाळ, अखेर, आपलं काही न काही, निदान एखादं तरी वैशिष्ठ्य जपून राहतेच! आणि या वैशिष्ठ्याखातर आपलं नावही! साहजिकच, इथंही, नाळ संपल्यानंतरची ती भयावह उतराई! हे हीचं वैशिष्ठ्य! ती उतरण.. जिथं थोडासा हलगर्जीपणाही जीवावर बेतेल अशीच! अगदीच छोटी अशी पाऊलवाट, त्यावरचं सुकलेलं, म्हणून नाजूक असं गवत नि कुठं जमिनीत रुतलेले छोटेमोठे दगड हेच थोडाबहुत आधार अन समोर व डाव्या बाजूला.. फक्त नि फक्त सह्याद्रीचा अंश.. आणि अदृश्य स्वरूपात.. केवळ देवादिकच! "मदत करा रे" म्हणत आशेनं केवळ पाहतच राहायचं! विनंती, दया, गयावयासाठी हात तर नाहीच जोडायचे! कारण ते तर उतरण्याकामी गुंतलेले.. कारण, इथं खाली बसूनच उतरायला लागतं.. अन तेही त्या सिंहाचं जाळं कुरतडणाऱ्या उंदराचं काळीज उसनं घेतच! दोन्ही हात पार्श्वभागाजवळ जमिनीलगत डावी-उजवी असं दोन्हीकडे टेकवत, दयार्द्र'भावा'त उतरायला लावणारी अशी ती घसारायुक्त उतरण! इतकी की आधीचा एक अनुभव असूनही मी ती इतक्या नवखेपणाने नि काळजीने उतरलो की त्याचीही काळजी वाटावी.. अन उतरल्यानंतरचा "हुश्श!" तर अविस्मरणीयच! मागील वेळेचाही आठवला. पण दोघात श्रेष्ठ कोण? हा वादसुद्धा उदभवला नाही.

उतराईतील अखेरच्या टप्प्यात उजव्या बाजुचा तो जलप्रपात, जो मागील वेळेस बऱ्यापैकी धोधावत होता; आज मात्र त्यात पाण्याचा ठिपूसही नव्हता. ..अखेर, इथं जीवात जीव येतो तो पूर्ण उतराई झाल्यावरच!

या उतराईनंतर इथं ही नळीची वाटही संपते. आणि अर्थात दुःख अन कष्टही! कारण, भीतीदायक, भयानक, भयावह आदि सगळं संपलेलं असतंय अन उरलेलं असतंय ते फक्त आपलं 'साधारण पातळी'वर येणं.. आणि हे काम चोख करतात ते सह्याद्रीतील प्रेमळ 'आजोबा'.. अगदी घरच्यासारखे! आपल्याला नातवंड समजून जीव लावणारे. तितक्याच मायेने, आणि, तेवढ्याच ममतेने! अन सोबत त्यांचे इतर सगेही.. 'कात्रा'मावशी, रतन नि कारंडामामा! खुट्टाभाऊ आणि त्याचं ते स्थानिक मित्रमंडळ!!


गुहिरीच्या उतराईपश्चात असलेली सग्यांची संगत ! 

गुहिरीचं दार तर आता केंव्हाच मागे गेलेलं असतंय.. तो कोपरा.. ते अख्खर.. अरे, कुठं नेऊन ठेवलीय चिंचवाडी? असा प्रश्नही पडतो. अगदी चाल-चाल चालायला लावणारी आताची  ही या वाटेची वाटचाल.. घाटवाट संपल्यानंतर गाव येऊन थांबा  घेण्याचं नावच घेत नाही! अंतराच्या "मर्यादे"लाही " चु.. चु.. चुना लावत" "थ.. थ.. थकवणारी (की ठकविणारी?) नि "या सम ती मीच" हेही आग्रहानं नमूद करणारी.. अशी ती वाट! अत्यंत दीर्घ वाटचाल असा हा 'आखरी दांव' हे तिचं आणखी एक वैशिष्ठ्य! मोठ्या दिमाखात ते आपल्या कमरेला खोचूनच ती जेंव्हा आपल्याला चिंचवाडीत आणून पोहोचवते; तेंव्हा आणखी एक छोटी भटकंती केल्याचं पुण्य पदरात पडून एका सुंदर परंतु तितक्याच कठीणतम अशा घाटवाट-भ्रमंतीची सांगता होते.

      ■स◆मा ◆प्त ■

या भटकंतीतील आणखी काही रम्य छायाचित्रे..  :


चिंचवाडी वाटेवरून दिसणारं गुहिरीचं दार 

चिंचवाडीमधून दिसणारी सह्यसमृद्धी :  स्थानिक सुळा, खुटा,रतनगड, चिकणमातीचा दरा, घोगळ इ..

पाथऱ्याच्या चढाईतील असाच एक नवलपूर्ण टप्पा 

ठाकूरवाडी दृष्टीक्षेपात 

ज्यामुळे भांबळवाडी विस्थापित झाली ते भूस्खलन

भांबालवस्तीनंतरची एक जंगलवाट 

आणि ..
गुहिरीचे दार आणि बाजूचे सगे 

   ■◆■स◆मा ◆प्त ■◆■

http://ishwargaikwad.blogspot.com/




No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...