Sunday, December 12, 2021

अफलातून तर आहेच 'दाऱ्या' अन 'हिरडी'चाही 'दरा'रा!'

 'सह्याद्रीचा काय थाट, वाह! भटकंती ती 'करारा';


(भाग १ : दाऱ्या  आणि भाग २ : हिरडीचा दरा)

भाग...१ 

'दाऱ्या'

ट्रेक तसा अचानकच ठरलेला.. अन भीडूही तसे पाचच! योगेश, त्याचे दोन काका, शिल्पा अन मी! ..आणि, रात्रीचे ठीक नऊ..  ही भेटायची वेळ; अन ठिकाण.. कल्याण! तसा आणखी एक  भिडूही आमच्या सोबत होताच.. सहावा, जिच्यावर आमच्या नेण्या-आणण्याची जबाबदारी होती ती म्हणजे.. योगेशची 'चपळ मनीषा' 'शिरूर-पुणे- कल्याण' अशी,  आधी  बसने अन नंतर रेल्वेने, चांगलीच 'धावपळ' करीत मी कल्याण गाठलं तेंव्हा घड्याळाचा काटा नऊच्या पुढे केंव्हाच सरकलेला! साडेनऊ  झालेले.. स्थानकाबाहेर येईतो नऊ चाळीस! आता पोटोबासाठी माझ्याकडे खार तर वेळच नव्हता. पण, असं म्हणून कसं चालेल.. मग, स्थानकामध्येच,  केवळ पाच-सात  मिनिटांतच, 'दाऱ्या'चं नाव घेत 'वदनी दोन कवळ' घेतले  नि लागलीच सहकाऱ्यांना जाऊन मिळालो. दरम्यान, शिल्पाचा फोन झालाच होता. तिलाही यायला उशीर झालेला. आज रात्रीच इथून निघून भोमळवाडीला जाऊन विश्रांती घ्यायची आणि  भल्या पहाटे उठून चहा-नाश्ता करून 'दाऱ्या'ला भिडायचं; असं आमचं नियोजन होतं. तसा निरोपही पुढे पोहोचलेला होता. आणि, त्यानुसारच आम्ही आता भोमळवाडी मुक्कामी निघालो होतो. आम्ही सर्वाँनी जेवण केलेलं.. मनीषाचंच बाकी होतं . मग, छानसा पंप बघून आम्ही थांबलो.. तिनंही पोटात इंधन रिचवलं नि निघाली.


दाऱ्याच्या संपूर्ण चढाईत सदोदित दर्शन देत चढाईचा हुरूप कायम ठेवणारा... सिद्धगड 

नांदगाव मार्गे भोमळवाडी..  साधारण अडीच तासांचाच रस्ता, पण काय नि  कसं झालं, माहित नाही; पण, थोडंफार उलटं-पुलटं फिरणं झालं नि मग आम्ही नीट वाटेला लागलो.. हमरस्ता, मुख्य रस्ते, शहर, उपशहरे मागे टाकत जसा आम्ही गावहद्दीत प्रवेश केला, तसा दोन्ही बाजूंनी अनंत कुबाभळी आणि त्यांच्या सोबतीलाही तशीच आणखी काही कु-झुडपं त्यांच्या मधून वळवळत निघालेला रस्ता.. कुठं बरा तर कुठं 'बरा'च म्हणावं असा तर कुठं अगदीच केविलवाणा! पण त्यातूनही सराईतपणे अन सहज धावणाऱ्या 'मनीषा'ला पाहून मला आश्चर्य वाटत होतं. अर्थात, सह्याद्रीत ती मनमुराद हिंडलेली.. अजूनही हिंडतेय.. मात्र, आज, आम्हांला सहज-सुलभ नि शक्य तितक्या लवकर वाडीला पोहोचवायचं होतं म्हणून  की तिलाही 'दाऱ्या' पाहायची घाई झाली होती, हे मात्र कळत नव्हतं. वाडीत पोहोचलो तेंव्हा एकवरचा काटा तीन घरं पुढं सरकून सव्वावर गेलेला. वाडीत पोहोचताच संजय मोरे मामांनी पुरविलेल्या खाणाखुणांच्या मदतीनं आम्ही त्यांचं घर बरोबर शोधलं, खोलीचा ताबा घेतला, लगेचच आडवेही  झालो नि गप्पा गप्पा मारत निद्राधिनही झालो. पहाटे लवकरच म्हणजे पाचलाच आम्ही उठलो.  बाहेर येऊन पाहतो तो कालच्या रात्रीच्या गडद अंधारातही, समोर, अगदी नजरेच्या टप्प्यात दिसत असलेला तो भला विस्तीर्ण असा 'दाऱ्या'.. आता, या पहाटेच्या अर्धउजेडातही चांगलाच 'हुकमी' अन 'आव्हानात्मक' दिसला.

रात्रीच्या गडद अंधारातही नजरेच्या टप्प्यातील तो बलदंड

पहाटेच्या उजेडात मनोहर दर्शन देणारा दमदार  दाऱ्या 

मनोमन नमन करीत, त्याला शरण जाण्यासाठी आम्ही घाईघाईनं सर्व काही उरकलं. आमचे आजचे मार्गदर्शक  गणेश केंगळे मामा होते. आम्ही लवकरच उठलो होतो खरे, पण उजाडल्यावर निघू असे त्यांनीच सुचविल्याने आम्ही तिथंच काही वेळ थांबून त्यांच्याकडेच चहा घेतला आणि त्यांच्या सूचनेनुसार उजाडताच त्यांना  साथीला घेत आम्ही निघालो. काही मिनिटांतच  वाडीची पाण्याची टाकी मागे टाकत आम्ही सरळ 'डामसे माळाकडे चालु लागलो. आणखी पाच-सात  मिनिटांतच हा माळ संपून छोटी-मोठी झाडं-झुडपं सुरु झाली.. मग त्यांचं दाट-विरळपण अनुभवतच आम्ही, पुढं, साधारण पाऊण तासातच एका छोटयाशा नाळेजवळ आलो. समोर सिद्धगड आमच्या आजच्या भ्रमंतीस प्रेमभऱ्या शुभेच्छा देण्यासाठी उभा दिसला. त्याचा निरोप घेत, इथपर्यंत सलग अन सरळ आलेली पायवाट सोडून आम्ही उजवीकडेची नाळ पकडली. नाळच ती.. वाट अशी नव्हतीच पण ती छोटीशीच असल्याने लगेचच संपली. ती संपताच, डावीकडे, वर, स्पष्ठ अशी वाट पुन्हा निघत असल्याचे दिसते. ही वाट पुढे जाऊन 'शिडी'कडे निघणाऱ्या वाटेला मिळते. तिला साथीला घेत आम्ही सरळ पुढे निघालो. दगड-धोंडे अन मातीच्या टप्प्या-टप्प्याने बनलेली व वर वर चढत जाणारी ही जंगलवाट तुडवत, पानगळीच्या प्रसन्न संगीतमय साथीत आणि सकाळच्या शांत अन उल्हासमय अशा वातावरणात आम्ही 'पदरा'त अवतरतो.

गवताळ मुरमाड अशी एक उभी डोंगरवाट 
पुढे गवताळ-मुरमाड आणि खडकाळ अशा उभ्या आडव्या डोंगरवाटेने चढत आम्ही थोडे पुढे आलो अन सहज मागे वळून पाहिले.. तर, समोर डावीकडे भोमळवाडी, तो बाजुचा तलाव अन भोवतालचा जंगलपरिसर तर उजवीकडे बलदंड 'सिद्धगड' आपल्या पुन्हा दृष्टीस पडतो.. अत्यंत मोहक असा तो नजारा न्याहाळून घेत आम्ही पुढे निघतो. पुढे आम्हांला चार-दोन छोटे गवताळ खडकटप्पे लागतात. चढाई आता वर वर चढत निघालेली असते. हे टप्पे पार करीत आम्ही वर वर चढत येत असतो. दाऱ्या आता दमदारपणे सुरु झालेला असतो आणि मामांच्या सांगण्यानुसार आता  काही याहीपेक्षा मोठे असे  तीन खडकटप्पे थोडे विशेष आणि लक्षात राहण्याजोगे लागणार  असतात. त्यात तिसरा टप्पा चढाईस थोडा कठीण असतो. त्या तीनपैकी पहिल्या टप्प्याजवळ आता आम्ही आलेलो असतो


दाऱ्याच्या चढाईत लागणाऱ्या तीन विशेष खडकटप्प्यांपैकी पहिला टप्पा  


हा टप्पा सहजच पार करीत साधारण चालीने पंधरा-वीस मिनिटांतच आम्ही दुसऱ्या टप्प्यावर येतो.
इथं असलेल्या, वाळलेल्या जुन्या नि भल्या मोठ्या लाकडाचा, झाडाच्या सोंडेचा, आधार घेत आम्हीं हाही टप्पा थोड्या अधिकच श्रमाने पार करतो.



दाऱ्याच्या चढाईत लागणाऱ्या तीन विशेष खडकटप्प्यांपैकी दुसरा  टप्पा   

आता मात्र, त्यानंतर लागलीच येणारा तिसरा टप्पा हा काहीसा कठीण असणार असतो; हे मामांनी आधीच सांगितलेले असते. जरा जवळ येत त्याला भिडताच  तो  भलताच अवघड नि खानदानी . घाटवाटेचा हा खानदानी खडकटप्पा असल्याचं लक्षात येतं.




दाऱ्याच्या चढाईत लागणाऱ्या तीन विशेष खडकटप्प्यांपैकी तिसरा  टप्पा   

 पण, मग पाठ-पिशव्या पाठीवरुन उतरवत नि पुढे छातीवर लावत आणि थोडीशी चिमणी-चढाई करत, थोड्या-अधिकच श्रमाने आम्ही हाही टप्पा व्यवस्थित पार करतो. पुढे झाडीयुक्त जंगलातुन वाट काढत आम्ही वांगणाच्या पदरात येतो. मग पुन्हा थोडंसं मोकळवन तर कधी थोडंसं जंगलबन.. असं करीत करीत दहाएक मिनिटांतच आम्ही वांगणाच्या पाण्याजवळ येतो. ही असते एक छोटीशी, पिण्यायोग्य पाणी असलेली जलधार! आता जरी ती काहीशी सुकलेलीच दिसत असली तरीही, तिथं पाण्याचा एक लहानगा पण जिवंत असा झरा आज फेब्रुवारीमध्येही पहावयास मिळतो..

वांगणाचं पाणी 

एव्हाना नऊ वाजलेले असतात. पिण्यालायक छान पाणी अन बसायला प्रसन्न अन निवांत अशी जागा मिळाल्यानं केंव्हापासून लागलेल्या भुकेची आठवण होते. थोडासा विसावा, थोडंसं खानपान होतं. मग, पाण्याचं व्यवस्थापन करुन घेतच आम्ही पुन्हा आमच्या वाटेला बिलगतो. येथुन निघता निघता पावणेदहा होतात. पुढे थोडं वर चढत आम्ही उजवीकडे निघतो नि त्यापुढच्या दोनच मिनिटांत आम्ही पोहोचतो ते खिडप्यात! दहा-एक मिनिटांचा हा खिडपा आम्हांस चांगलाच गारवा अन तजेला देऊन जातो. या वनातुन पुनः बाहेर पडत, मोकळवनाने थोडं-थोडं वर चढत आम्ही छोटयाशा सपाटीवर येतो. सस्मित सिद्धगड आताही आम्हांस दर्शन देतो. त्याच्या सदिच्छांची आठवण ठेवत, त्यांस मनोमन नमन करत आम्ही आता समोर दिसणारं या घाटवाटेचं नवखं रूप, तिची ती उभी चढण, ती खिंड, त्यातील ती नाळ.. यांचं अस्पष्ट असं दिसणारं चित्र निरखु लागतो.
झाडी-झुडुपे नसलेली ही सरळ, खडकाळ-गवती अन उभी चढण पाहून काहीसं 'धस्स' होतं! पण ते तेवढ्यापुरतंच असतं. मग त्या चढणीच्या गवताळ-मुरमाड घसाऱ्याने.. कधी छोट्या-मोठ्या खडक टप्प्यांवरुन असल्या-नसल्या आधाराने तर कधी..  जणु जोखीम सोबत घेत निघालेल्या कातळाच्या संगतीने आठ-दहा मिनिटांतच त्या कातळटप्प्याच्या माथ्यावर, अर्थात काचळांत, येतो. इथं येताच मघाच्या त्या खिंडीचा अगदीच स्पष्ट असा नजारा आपल्या चांगलाच दृष्टिपथात येतो.

घाटातील नाळ 

ती खिंड, त्यातून खाली ती उड्या घेत धावत धावत उतरत येणारी, आज जरी सुकलेली, ती अवखळ नाळ, तीचं पावसाळ्यातील ते रौद्र रुप आपोआपच डोळ्यांसमोर उभं राहतं. नुसत्या कल्पनेनंही तन-मन अगदी शहारून निघतं. तिच्या भव्यतेची अन थरारकतेची काल्पनिक अनुभूती घेत आम्ही तिचा प्रवाहमार्ग ओलांडून पुढे येतो. मग तिला  डावीकडे ठेवत आम्ही तेथून निघालेल्या आडव्या वाटेने उजवीकडे निघतो. काहीशी सपाटी आल्यानं, साहजिकच, पुन्हा, दूरवर दिसणाऱ्या निसर्गाचा धांडोळा घेत नजर सभोवार भिरभिरते.. मघाचंच संपुर्ण दृश्य आता आणखी थोड्या रुंद कोनातुन अनुभवत अन आपल्या मनकोंदणात ते साठवून घेत आमची वाटचाल चालु असते. आता, तेच ते छोटे-मोठे, पसरट-उभट खडकटप्पे, वाढलेलं गवत अन त्यातून लपत-छपत धावणारी ती जंगलवाट, तेच ते दगड-धोंड्यांचे कधी अडथळे तर कधी आधार..
घाटाच्या अंतिम टप्प्याच्या चढाईतील उभे, नागमोडी अन कातळालगतच्या काठ-किनाऱ्याचे भयावह टप्पे 

कधी सरळ, वर उभ्या चढणीने, कधी अस्सल नाजुक नागमोडी वळणाने, तर कधी कातळालगतच्या भयावह काठ-किनाऱ्याने चढाई करवून घेत ही वाट आम्हांस ,अगदी अंतिम टप्प्यात, या घाटवाटेच्या माथ्याच्या अलीकडील सपाटीवर घेऊन येते. इथं कारवीचं अगदी छोटसंच अन विरळ असं बन आमचं स्वागत करतं..



आपल्या पर्णविरहित 'बाहूं'च्या कमानीतुन ते आम्हांला एका छान, रुंद अशा माळावर आणुन सोडतं. हा #गायमाळ.. ही असतेय कोंढवळची शीव अन अगदी तासाभरावरच असतंय कोंढवळ!
आणि समोरच एक छानसं, इटुकलं झाड.. आम्ही त्याच्या सावलीत थोडं विसावतो.



दाऱ्या चढून वर आल्यानंतर लागणारं कोंढवळ माळावरचं एक इटुकलं झाड 

एक कठिणशी परंतु तितकीच रम्य अशी घाटवाट पूर्ण केल्याचा जोशपुर्ण आनंद प्रत्येकाच्या डोळ्यांत, चेहऱ्यावर चमकत असलेला दिसतो. एक घाटवाट संपवून अर्धी मोहीम पूर्ण केल्याचं समाधान त्यातुन स्पष्टपणे डोकावत असतंय. आता प्रत्येकालाच छान विश्रांती आणि पोटपूजा हवी असते. मात्र, कोंढवळला जाऊन दुपारचं भोजन व थोडी विश्रांती घेऊन पुढची घाटवाट करणं आता अशक्यच आहे, हे सर्वांना जाणवतं. साहजिकच, "पुढं काय" याचा विचार सुरु होतो..

मग, 'ही भटकंती, एकतर डावीकडे अशीच पुढे नेऊन कोंढवळला थांबविणे वा उजवीकडचा हिरडीचा दरा  करत पदराला उतरून रानशीळला जाऊन मिळणे..' हे दोनच पर्याय निघतात. तेंव्हा, गणेशच्या अनुमोदनाने आम्ही 'दुसऱ्या' पर्यायाचा विचार करतो.

पण.. पण, पुढं काय वाढून ठेवलंय, याची पुसटशीदेखील कल्पना, ना गणेशला असते ना आम्हांला!

   ■●■●■●■   

भाग.. २


हिरडीचा दरा  :

सांबरशिंग-काजूपाकळी-पदर-मधला आंबा-रानशीळ



साहजिकच, आता निवडलेला दुसरा पर्याय म्हणून म्हणून 'हिरडीच्या दऱ्याने रानशीळ' हे 'लक्ष्य' धरुन आमची वाटचाल सुरु होणार होती. कित्येक वर्षांपासून वहिवाटीत नसलेल्या या वाटेची चाचपणी करायला गेलेला गणेश काही मिनिटांतच अवतरला आणि मग 'दाऱ्या' उजवीकडे आणि कोंढवळची वाट पाठी सोडून आम्ही समोरच्या दिशेने निघालो. निघालो खरं पण गणेश वाटेबद्दल काहीसा साशंक दिसला. त्याला त्याबद्दल विचारता "वाट मिळाली नाही, पण मिळेल, काही काळजी करु नका.. उशीर करायला नको."  एवढं मोजकंच तो बोलला. त्याच्या या बोलण्यात साशंकता जरूर होती, पण, त्याहीपेक्षा जास्त आश्वासकता व आत्मविश्वास होता. त्यामुळे आम्ही बिनधास्त त्याच्या मागे चालत निघालो. थोडंसंच मोकळवन चाललो असेल, दोनेक मिनिटांतच जंगल सुरु झालं. अगदी सुरुवातीलाच करवंद-जाळ्या अन इतर झाडांझुडपांमधून, असल्या-नसलेल्या विविध वाटांमधून काहीसं गोल फिरतच आम्ही एका ओढ्याकाठी आलो. 





हिरडीचा  दारा वाटेमधील ओढा 

वाट आकलनीय नसल्याचा हा 'पहिला दृष्टांत' आम्हांला इथंच मिळतो. कोंढवळकडून येऊन या वाटेस मिळणारी एक वाटही इथं दृष्टीस पडते. पण, पुढे तिचा मागमूसही लागत नाही. भूक तर लागलेली.. पाणवठाही जवळ आहे.. पण कुठं तो नेमका 'ठिकाणा' सापडत नाही, अशी परिस्थिती बनते. मग काही वेळासाठी आम्हांला इथंच थांबवून गणेश पुन्हा वाट शोधायला जातो. मात्र, दहा-पंधरा मिनिटांतच वाट सापडल्याचा आनंदमय निरोप घेऊनच येतो. आम्हीही पुन्हा त्याच उत्साहात त्याच त्याच्या पाठी  वाटेला भिडतो. थोडं मोकळवन, पुन्हा थोडी झाडी, पुन्हा मोकळवन असं करत-करत आम्ही वनखात्याने दोन्ही बाजूंस दगडी मांडून अधोरेखित केलेल्या छानशा गाडीवाटेवर येतो.


 वनखात्याने दोन्ही बाजू दगडांनी अधोरेखीत केलेली गाडीवाट 


सुरक्षित वाटेवर आल्याचं समाधान पदरी पडताच थोडं हायसं वाटतं. चरण्यासाठी आलेली काही गुरेही ठराविक अंतराने दोन ठिकाणी दृष्टीस पडतात.. म्हणजे इथंच कुठं जवळपास पाणी असल्याचा हा संकेत असतो. आणि हो, काय आश्चर्य.. पुढच्या काही मिनिटांतच आम्ही काजूपाकळीत येऊन धडकतो.. 'सांबरशिंग' हे या भल्या मोठ्या जंगलाचं नाव आणि काजूपाकळी हा येथील एक छानसा पाणवठा! ..या जंगलातील  एक सुंदरसं ठिकाण! भोवती हे भलं मोठं असं मोकळवन.. दगडी कुंपणांनं काहीसं बंदिस्त केलेलं.. आणि, सभोवती दाssट, हिरवीगार झाडी! ठिकाण इतकं रम्य की, निवांत ठोकावा तंबू अन न्याहाळत बसावं चंद्र-तारे रात्रभर.. असंच!


आणि पाणवठ्याचा आकार म्हणाल तर जणु काजूपाकळीच! त्यामुळं मोह अनावर होऊन मीच, या लेखापुरतं, त्याचं नामकरण केलंय.. 'काजूपाकळी'!


हिरडीचा  दरा वाटेतील एक जलसंचय :  काजूपाकळी (काल्पनिक नाव)

एव्हाना दोन वाजलेले असतात.. स्मृतीला ताण देत देत गणेशनं अगदी बरोबर ठिकाणी आणून पोहोचवलेलं असतंय.. त्याचं कौतुक करुन आम्ही या नूतन वनस्थळी निवांत क्षुधाशमन करत चांगलंच तासभर श्रांत, विश्रांत होतो.. मात्र, जेवणानंतर लगेचच पुन्हा 'मार्ग-निरीक्षणा'साठी गेलेला गणेश, 'मार्गा'चा 'माग' लागल्याचा निरोप घेऊन हजर होतो.. आता दुपारचे तीन वाजलेले असतात. गणेशच्या मते अजून अडीच-तीन तासांचीच काय ती भटकंती बाकी असते. आतापावेतो बराच वेळ दवडला गेल्यानं निघणं खूपच गरजेचं होतं; कारण, बुजलेली घाटवाट शोधत शोधत जायचं असतं. थोड्याच वेळांत पुन्हा जंगल सुरु होतं. आता पाऊलवाटेलगत अडीच-तीन फुटांची कारवी लागते. तिचा तो गंध सभोवती दरवळलेला असतो. आजुबाजूला दाट-विरळ वनराई, तर पायाखाली सुकलेलं गवत अन त्याखाली लपलेली पाऊलवाट.. एक 'खेळ' खेळतच आमचं 'उतरायण' चालू होतं. 




 हिरडीचा  दरा :  एक अवघड वाट 


आता आता दुपारचे चार झालेले.. दोनेक तासांची ही भ्रमंती आम्हांला आता एका वेगळ्या वळणावर घेईन येते. जंगलटप्पा असा आलेला की भूभाग पूर्ण संपलेला आणि इथला कातळ तर एकदम सरळ खाली उतरलेला.. दूर तिकडे डाव्या हाताला भीमाशंकर, मागे काहीसा खाली पदरगड.. धुरकटशा पर्वतरांगा आणि त्याअलीकडे अवघं अभयारण्य! रानशीळचा अंदाज घेत आपण कुठं नि कसं उतरणार यासंबंधीचं आमचं निरीक्षण आणि आपल्या तर्कबुद्धीचा पूर्ण कस लावत 'वाटशोधमोहीम' राबवण्याचं गणेशचं अध्ययन आता एकाचवेळी पूर्ण 'भरात' होतं.

आम्ही येऊन टपकलो ती जागा म्हणजे आजच्या ट्रेकचा तसा 'गाभा'च होता.. एक थरारच होता.. सनसनाटीही होती.. मध्यंतरानंतरचं नाट्यमय असं एक वळण होतं..


 हिरडीचा दरा आणि अवखळ वाट ...

एका भयावह उताराला बिलगवत हे 'नाट्य' आम्हांला एका गंभीरतेच्या वळणावर घेऊन चाललं होतं.. ज्या पदराला आम्हांला उतरायचं असतं तो तर केंव्हापासून अगदी समोरच होता; पण तिकडं उतरणारी वाट.. वाट मात्र कुठेच दिसत नव्हती. समोरील उतराई बिकट जरी दिसत होती तरीही शक्य तितक्या लवकर 'रानशीळ'ला जाऊन मिळणं हेच यावेळी महत्वाचं होतं. कारण, आता 'परतीचे दोर' तर आम्हीच कापलेले होते; आणि, पुढं काय, किती नि कसं वाढून ठेवलंय, याची कल्पना ना बिचाऱ्या गणेशला होती ना आम्हां पामरांना..  परंतु, या भयावह उताराला भिडत 'पुढेच' चालणं हे बेभरवशी नव्हतं, याची आम्हांला पूर्ण खात्री होती. गणेशवर आमचा पूर्ण भरोसा होता. एवढयात खालून गणेशचा आवाज आला आणि आमचं गप्पा वजा निरीक्षण आटोपतं घेऊन मोठ्या धीराने आम्ही आमची उतराई सुरु केली.


 दृष्टीक्षेपात भीमाशंकर ... 

कधी कातळाला खेटून तर कधी त्याच्या बाजूनं, कधी अत्यंत नाजुक उतारानं तर कधी अतिनाजुक वळणानं.. कधी गवतविरहित खडकटप्प्याच्या आधारहीन उतराईचा भीतीदायक धाक तर कधी न दिसणाऱ्या मात्र गवतातच दडलेल्या अत्यंत अरुंद अन घसरड्या पाऊलवाटेचा भयपूर्ण दरारा..! "कुणी पावटी देतं का पावटी.. निदान, पाय ठेवण्यापुरती तरी!" अशीच कठीण परिस्थिती झालेली.. 



अखेर हा खूपसा कठीण टप्पा साधारण तासाभरातच पार करत आम्ही थोडं खाली आलो खरं, पण, पदरात फार काही पडलं नव्हतं. कारण, उतराईचा आणखी एक टप्पा समोर दिसत होता. आणि, पार केलेलं अंतर जणु कुणी खाऊन टाकलं होतं. उतराई कधी संपेन याच्या चिंतेत असलेल्या आम्हांपुढं उतराईचा अजून एक टप्पा नव्यानं वाढल्याचं स्पष्ट झालं होतं. गणेश पुन्हा एकदा 'फिरुन' आला होता. वाट तर अजूनही कुठेच दृष्टीस पडत नव्हती. जणु ती अद्यापही हिरमुसलेलीच होती.





 हिरडीचा दरा आणि अवघड वाट 

फरक एवढाच की, मघाच्या खड्या उतरणीऐवजी ती आता नागमोडी वळणानं उतरवत होती. बाकी तिचा घसारा आणि दरारा मात्र कायमच होता! पण गणेशची स्मृतीशक्ती आणि आमचं मनोबल दोन्हीही तितकंच धडधाकट होतं. हा ही उतारटप्पा आम्ही संपवला. यापुढच्या वाटचालीतील उतार आता थोडा कमी झाला होता. आजुबाजूला झाडं-झुडपं सुरु झाली होती. वाटेचं हिरमुसणं आता आमच्या सवयीचं झालं होतं. प्राप्त परिस्थितीशी पुर्णपणे झुंजत आमची ही 'शोधयात्रा' यशस्वीतेच्या मार्गावर होती.



अखेर प्रचंड यातायातीतुन आम्ही मधल्या आंब्याला पोहोचलो. तब्बल पावणेसात झाले होते.. एक थरार..? तो आता संपला होता. सनसनाटी? तीही आता राहिली नव्हती.. धाक अन दरारा तर केंव्हाच फरार झालेले होते.. आम्ही सुखेनेव होतो.. सुखरूप होतो.. उशीर तर चांगलाच झाला होता पण आम्ही रानशीळला येऊन मिळालो होतो. कितीतरी काळ वहिवाटीत नसलेल्या या डोंगरउतारवाटेने दाखवायचे ते 'तारे' भर उजेडी दाखवले होते. पण, कठीण आणि बहारदार वाटेच्या या थरारापेक्षाही ही भटकंती आम्ही कसोशीने पूर्ण केल्याचा आनंद अचाट, अफाट आणि अभूतपूर्व होता. एका अत्यंत अविस्मरणीय भटकंतीचा आम्ही खऱ्या अर्थानं "आनंद लुटला" असं सांगायला काहीही कमी राहिलं नव्हतं!




मधला आंबा परिसर 

 रानशीळ वाट 


अंततः, उर्वरित रानशीळ वाट, भोमळवाडी फाटा ते भोमळवाडी हा संपुर्ण टप्पा संपला तेंव्हा रात्रीचे तब्बल नऊ वाजुन गेले होते..



एक अत्युत्तम दर्जाची घाटवाट भ्रमंती आता संपली होती.

परतीचा प्रवास आता कसाही होवो, आम्हांला ना कसलं भय होतं ना कसली चिंता!

(समाप्त)

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...