Sunday, December 12, 2021

घाटघरच्या अंगणात भारी, घाटनदेवीचा थाट;धाकट उंबरदरा खासच, दमदारही चोंढ्याघाट!'

 शेंडीच्या त्या वळणावरच्या उपाहारगृहात थोडं विसावत, काळ्या चहाचा मस्त आस्वाद घेत, काही वेळ भंडारदऱ्याची ती 'काळी भिंत' अन बाजूचा तो कोरडा पडलेला 'अंब्रेला' नजरेत साठवून घेतला नि चहा संपताच निघालो. तुषारच्या इनोव्हानं समोरचं डौलदार 'यु' वळणही तितक्याच डौलानं घेतलं नि घाटघर मार्गाने पुढे निघाली. काही मिनिटांतच पाबरगड दृष्टीस पडला.  लागलीच आमची मनं खुलली.. आता आम्ही सह्यपंढरीत पोहोचत होतो ना! हा पाबर, या पंढरीतील 'विठोबाचं' 'पहिलं रूप', पुढे वेगवेगळ्या कोनातुन बराच वेळ दर्शन देत राहिलं. काही वेळानं रस्त्याच्या दुतर्फा आम्हांस 'विठोबा'ची आणखी विविध रुपें दिसू लागली आणि आम्ही 'सह्यविठ्ठला'चे वारकरी "अवघे 'सह्यपंढरी'मय झालो! डावीकडे दूरवर पण काहीसे अस्पष्ट असे घनचक्कर, मुढा, गवळदेव, कात्राबाई, आजोबा, रतनगड, खुटा.. तर उजवीकडे, अगदी जवळूनच, आख्खी कळसुबाई रांग गेलेली! हे सर्व 'दर्शनसुख' घेतच आमचं मार्गक्रमण सुरु होतं. #उडदावणे इथं थोडं थांबत भाऊ नि संजयची गाठ घेतली; चार गोड शब्दांची देवघेव झाली अन गाडीनं पुन्हा रस्ता धरला. या गडवैभवाच्या 'दर्शनगप्पां'मध्ये काही मिनिटांतच आम्ही घाटघरच्या पुढ्यात दाखल झालो. पुण्याहून निघून पाच-सहा तास झालेले; पण, पंढरीत उतरताच ना झाली ताजेतवाने व्हायची घाई ना चहाची तलफ! थेट मिळेल तो उंचवटा गाठत आम्ही पुन्हा 'सह्यदर्शना'चं आणखी पुण्य पदरी पाडून घेण्यासाठी थोडं धडपडलो. एव्हाना एक-एक करीत नाशिकच्याही गाड्या दाखल झाल्या नि मग आम्ही सर्वच ताजेतवाने होत चहापानात रमलो.

पुण्याहून आम्ही चौघं.. तुषार कोठावदे, मुकुंद पाटे, विजय गुर्जर नि मी तर मुंबईहुन माझे दोन मित्र माधवी सुभाष अन सुहास पाटील आणि नाशिकहून स्वतः सरदार नानांसह वीसेक.. अशी भलीच फौज आज नानांच्या पदरी होती. महिला, लहान मुलं असा 'लवाजमा' जरी दिसत असला तरी तोही फौजेचाच एक भाग होता; नव्हे, ते फौजीच होते.. लढवय्ये होते ते नि प्रत्यक्ष लढणारही होते. परतावया अंतरे खूप दूरची, पुणे, मुंबई, नाशिक.. अशी होती. प्रत्येकास आपापल्या प्रांती वेळेत पोहोचून पुढील नियोजनही साधणेचे होते.. सबब, एका विशिष्ठ मिजाशीत पण ठरल्या वेळेत मोहीम फत्ते करायची होती. आणि म्हणूनच, त्या 'बेता'ने प्रत्येकजण पूर्ण तयारीतच होता.

घाटनदेवी  :


घाटनदेवीचे अंगण 

एक सुंदर नैसर्गिक सपाटी.. अर्थात भव्य निसर्ग -अंगण! चारही दिशेस दाट-विरळसं जंगल.. पाण्याचा भलासा तलावही! बाजूस सुंदरशी दरीही, तिच्या काठाला सुंदरसं सुरक्षाकुंपण आणि त्या भव्य अंगणात वनखातेनिर्मित काही  पॅगोडे तर काही झाडांना सुंदरसे चाबूतरेही! आणि.. आणि, समोर ते.. सह्याद्रीतील ते "राजबिंडं कुटुंब".. ती सुप्रसिद्ध 'गडत्रयी'.. #अलंग, #मदन, #कुलंग! ..नि त्यांचे सोबती! बस्स, आणखी काय हवं? या साऱ्या 'गडवैभवा'त आम्ही आमची ती सायंकाळ गप्पांच्या मैफिलीत आणखी 'वैभवी' केली नि त्या परमसुखातच 'घाटघरी' परतलो. इथंही एकनाथच्या घराच्या अंगणात स्वयं'प्रि'प्रेरित निशाभोजनाचा आस्वाद घेत, गडवाटांच्या गप्पांत रमत छान निद्राधीन झालो ते उद्याच्या भटकंतीची सुरम्य स्वप्ने रंगवितच!

दुसरा दिवस.. प्रात:प्रहर.. सुमारे पाचचा सुमार.. अजून झुंजूमंजूही झालं नव्हतं. एवढ्यात, माथ्याजवळील सर्वच 'कोंबडे' आळीपाळीने आरवायला सुरुवात झाली.. तसा हरेक सह्यसैनिक उठला, तो ही आरवला.. म्हणजे, त्यानेही आवरले अन आपापली सामुग्री पाठीवर लादत, हाती काष्ठशस्त्र घेत मोहिमेसाठी सिद्धही झाला!

                   
भटकंती सुरु ...

आता  साधारण  सहाचा   सुमार.. 'सेने'ने घाटघर सोडलं  नि  डांबरी रस्त्याला  बिलगत  ती  पूर्वेकडे   निघाली. समोर  भास्करदेवाचीचीही लगबग   चालूच होती. डावीकडे अलंग,  मदन,   कुलंग  थोडं  दूरवर कळसूबाई  तर उजवीकडे अस्पष्टसा रतनगड, बाजूचा खुटा आणि शिपनूर ही अशी  'वजनी'  किल्ल्यांची  मांदियाळी  केंव्हाच जागे झाली होती.  त्यांमधोमध, अगदी समोर, एक स्थानिक  इटुकला डोंगर नि त्याखाली  एक पिटुकला  डोह.. अन   या  अधोभूमीवर  होत  असलेला  तो   'रवीउदय'!  आणि,  केवळ  आसमंतीच  नव्हे  तर  भूवरही   विपुल सोनसौंदर्याची पखरण करीत असलेली ती  लोभस  सुवर्णकिरणे!   धुंद मनाला वेड लावत बेधुंद करील असा हा नजराणा.. एक अफलातून असाच होता.

 घाटघरचा अरुणोदय!

इथपर्यंत दहाएक मिनिटे झालेली होती. आता, समोरील या डोहाला तसंच डावीकडे ठेवत आमची फौज उजवीकडील वरच्या_माळाने निघत पुढच्या दहाएक मिनिटांतच बंगल्याच्या माळाला लागली. काहीशा दाट-विरळशा जंगलातून मार्गक्रमण करीत ती चालली होती. अद्याप जरी सकाळच होती; तरी ती भर उन्हाळ्यातील असल्याने मोकळवन येताच त्याची जाणीव होत होती. काहीसा घाम येऊन दमायलाही होत होतं; मात्र, वनराई येताच मिळणारा गारवा ते वातावरण पुन्हा शिथिल अन सुसह्य करीत होता. एवढ्यात एक जीर्ण बंगला नजरेस पडतो. पूर्वी भंडारदरा धरणाच्या (त्यावेळीचा विल्सन डॅम) कामावेळी ब्रिटिश अधिकाऱ्यांचं इथं वास्तव्य असायचं, असं सांगतात. आणखी पुढे जाताच एक कुंपण लागतं.  वाट आता या कुंपणाच्या डावीकडेने आपणांस 'घाटघर उदंचल जलविद्युत प्रकल्पा'चे प्रांगणात घेऊन जाते. इथं विकसित केलेल्या भल्या मोठ्या जागेत काही कार्यालयीन इमारती, बगीचा, पॅगोडे, डांबरी रस्ते आदि सुविधा दिसून येतात. इथल्या कोकणकड्याला सुरक्षिततेच्या हेतुतून दहा-बारा फूट उंचीचं जाळीदार कुंपण केलेलंही आपल्याला आढळून येतं.
मात्र, त्यातुन खालचं कोकणसौंदर्य निरखण्यास मात्र काही बाधा येत नव्हती, हे सुखदच होतं.

आता डावीकडे, पूर्वेला तो नुकताच उगवलेला रविराज, समोर महाकाय शिपनूर अन उजवीकडे इथल्या कोकणकड्यावरून खाली नजर फिरवताच दिसणारा तो कोकणचा नयनमनोहर नजारा! असं मुळात नजरेलाही तिन्ही दिशा फिरवायला लावणारं ते तिहेरी दृश्य.. तिथं कॅमेरा काय, कसा नि किती फिरवणार..? अक्षरशः अफलातून!


Add caption

सुमारे साडेचारशे मीटर खोलीची ती दरी.. त्या दरीतून एकटीच वाहणारी ती #शाई.. ते #चोंढे_धरण.. ती धरणभिंत अन ती जलसंपदा.. मस्त वारा.. नि दूरवर, तिकडे ती ठिबक्या-ठिबक्यात दिसणारी ती रंगीबेरंगी घरं.. रस्ते.. त्याभोवतीची ती हिरवाई.. नि त्याही पलीकडे करड्या रंगांतील ती पर्वतराजी.. नि, कड्याला लागूनच असलेला तो #चोंढे_जलविद्युत प्रकल्प! अहाहा! सारं काही अगदीच मनोहारी, विलोभनीय असंच!!
आता वाट या प्रांगणातून बाहेर निघत, पुन्हा कुंपणाच्या कडेकडेने तशीच पुढे नेत आम्हांस पोहोचवते ते थेट उंबरदऱ्याच्या दारातच!

उंबरदरा  :

एक छानसं नदीपात्र. एक मनोहारी नाळच ती!
उभ्या उताराची.. साहजिकच, त्यामुळे पाणी खळाळतं.. अन फेसाळतंही!
उंबरदरा.. एक सुंदर दरा..


 उंबरदरा  :  एक नळीचीच वाट जणू .. १

दोहोबाजूस उंचच उंच कातळभिंती नि त्यामधून अगणित उड्या घेत, धावत-धडपडत धावणारा तो जलप्रवाह! आज जरी लहानसा! पावसाळ्यातील त्याच्या रौद्ररूपाची तर कल्पनाच केलेली बरी.. आणि समोर.. तो सुंदर नजारा! ते चोंढे धरण क्षेत्र.. ते थोपवलेलं पाणी.. त्यापलीकडे तो हिरवागार निसर्ग.. आणि त्याही पलीकडे ती हिरवी-करडी पर्वतराजी! मघाचंच दृश्य, पण थोडं वेगळ्या कोनात! उतरताना सततच समोर दिसणारं हे निसर्गदर्शन आमच्या उतराईला आणखी बळ देत होतं. वारंवार दिसणारं ते दृश्य, त्यावर नजर जाताच मन अगदी बेभान होत होतं. आपण एका सुंदर नाळेची, एका मनोहारी भटकंतीची अनुभूती घेत आहोत, हे लक्षात येत होतं.


उंबरदरा  : एक नळीचीच वाट जणू ... २  


सोबत बाल-महिला असल्याने आम्ही एक-एक करीत पण एकमेकांस आधार देत-घेत, अत्यंत सावधानतेने अन काळजीने तो दरा उतरत होतो. कारण, वाटेत होते.. अपार खाच-खळगे, टोकदार कडा-कपाऱ्या नि उंच-सखल टप्पे! चिमण-चढाई-उतराई, घसारा नि अगदी बोगदा-वाटही!! ..आणि बसल्या अवस्थेत नि दोन्ही बाजुंच्या खडकांचा दोन्ही हातांनी आधार घेत, एक पाय त्याच्या लांबीपेक्षाही अधिक ताणत, कधी त्यापेक्षाही अधिक खाली अंदाजानेच स्वतःला झोकून देत उतरायला भाग पाडणारे टप्पे इथेही होते. 'दरा' या शब्दाला जागणारी वाटच ती.. आम्हांस आमच्या प्रत्येक पावलागणिक, आपल्या हरेक अंग-प्रत्यंगाचा अनुभव देत जणू तीच आम्हांस सावधानतेने उतरवीत होती!




 उंबरदरा  :  एक नळीचीच वाट जणू .. ३
कारण, आम्हीं अगदीच निर्विघ्न अन बिनधोक उतरत होतो. अखेर नाळेचा पहिला टप्पा संपला. आम्ही पात्र सोडून डावीकडे वळत, ढासळलेल्या दगड-धोंड्यांतुन वाट काढत, थोड्या सपाटीसदृश नि बऱ्यापैकी वनराई असलेल्या भागात उतरतो. ही असते किल्ट्याची लामटी! 'किल्टं' म्हणजे माकडं नि 'लामटी' म्हणजे 'राई'! इथं माकडंही खूप. म्हणून असं नाव, हे स्थानिकांकडूनच कळलं.
आता सकाळचे साडेनऊ होत आलेले.. तीनेक तासांची उतराई झालेली.. अर्थात 'इंधन' संपत आल्याचे अनेकजण घोषित करतात; मग, साहजिकच, या 'लामटी'त आम्ही 'मधला भोजन-विसावा' घेतो. दुर्दैवानं, लामटी या नावाला लाजवत, केवळ एकच मर्कटराज या भोजनावळीला उपस्थित होते.

समोरचे धरण, तो परिसर आता बराचसा नजरेच्या टप्प्यात आल्याने, 'वाटेचा थरार आता संपला',  असं समजून आम्ही थोडं निवांत झालो.   पण हा विचार ही एक चूक असल्याचं पुढच्याच क्षणी लक्षात आलं; कारण, आता सामोरी आलेली 'राहगुजर' चांगलीच 'कठीण' निघाली. काट्याचा_मोढाच तो! सुदैवानं काटे नव्हते त्यावेळी..  शिवाय वाट तर नाहीच, पण जिथं कुठं वाटत होती तिथं गवतही खूप, चांगलाच उतार नि जोडीला घसाराही! मग 'थोडी देर' एकनाथचं मार्गदर्शन नि 'साहसा'ला साथीला घेत, नि "जरा संभालके"च चालत, हा मोढाही आम्ही जरी काहीसं धडपडत पण सुरक्षित पार केला नि पुन्हा नदीपात्रात उतरून वर निघत दऱ्याच्या अंतिम टप्प्यात आलो. पुढे ती कोसळलेली दरड ओलांडून आलो ते थेट त्या 'धानक-पडी'च्या नाळेच्या पायथ्याशीच!


धानक-पडीची नाळ 

वाट इथं भलीच रुंदावलेली होती. गाडीमार्गच होता ना तो! तोही पक्का नि डांबरीही!! आम्ही निवांत झालो, कारण आम्ही आता चोंढे धरण क्षेत्रात आलेलो असतो. आणि अर्थातच, दरा आता संपलेला असतो.
इथं पुन्हा थोडी विश्रांती होते. पुढे एक बोगदा पार करताच आम्ही धरणक्षेत्रातील कळयंत्र विभाग (स्वीच यार्ड) आवारात येतो. उजव्या हाताला अगदी समोर, मागोमाग दिसतात उंचशा तीन डोंगरधारा नि त्याखालून जाणारा वळणावळणाचा डांबरी गाडीमार्ग नि डाव्या हाताला धरणक्षेत्र! ती धरणभिंत, ते थोपवलेलं पाणी नि त्यावरील तो पूल.. आम्हांला तिसऱ्या धारेपर्यंतच जायचं असतं. दोन डोंगरधारा ओलांडत आम्ही तिसऱ्या धारेपाशी येतो ते समोर दृष्टीस पडतो तो एक भलाच, आठएक फुट रुंदसा पायरीमार्ग! अगदी बांधीव अन रेखीव! थोडं चक्रावल्यासारखंच होतं. हा घाटमार्ग की मंदिरमार्ग असा उगा प्रश्नही पडतो. पण, तोच घाटमार्ग असतो.. चोंढ्याघाट! ..आणि त्याच मार्गाने आम्हांस जायचे असते. मग, तो असाच सरळ डोळखांबकडे जाणारा आला रस्ता डावीकडे सोडत आम्ही त्या 'पायरी-घाटमार्गा'ला भिडतो. मागे शिपनूर हसतमुखाने आम्हांस निरोप देताना दिसतो.

चोंढ्या_घाट   :

अगदी व्यवस्थितरीत्या बांधीव असा हा घाटमार्ग पुढच्या तीनेक मिनिटांतच बराचसा रचीव अवस्थेवर येतो; तर त्यापुढच्या तीनेक मिनिटांत थोडी रुंद पाऊलवाट बनून  तो आपणांस एका टॉवरकडे घेऊन निघतो नि इथं येताच मोठमोठ्या गोल दगड-धोंड्यांचा अडथळा सादर करीत एक साधी पाऊलवाट बनून जातो. आश्चर्य म्हणजे पुढल्या तीनचार मिनिटांत ही वाट पुन्हा एक रचीव दगडांची आठदहा फुट रुंद बनते तर पुन्हा पाच-सात मिनिटे गायब होत पुन्हा मिनिटभरासाठी आपल्याला दर्शन देत, थोड्याशा सपाटीवर आणून सोडते. हा असतो #भातखळा! पूर्वी इथं काही घाटघरकर भातशेती करायचे, साठवायचे नि साळी बनवल्यावर वर न्यायचे.


चोंढ्या घाट  :  एक पायऱ्याची  तथा निसणीची वाट 

इथपावेतो निवांत चालीने वीसेक मिनिटे झालेली असतात. थोडी दाट सावली अन बसायला उंच दगडी मिळाल्यानं इथं एक छोटा विसावा होतो  नि मागे दिसणाऱ्या शिपनूर नि त्यामागील आजोबाचे आशीर्वाद घेत पाच-सात मिनिटांतच पुन्हा आक्रमण! डाव्या बाजूची #धानकपडी मात्र थोडी आत असल्याने जणु जरा पुढे डोकावतच आमची उन्हातली घालमेल बारकाव्याने काळजीने टिपत असल्याचे भासते.


आईचं काळीज ते.. बिचारी धानक आजी! वरून पडली ते थेट खालीच! कित्ती लागक होतं कुणास ठाऊक!
आमचं मार्गक्रमण चालूच असतंय. आता वाटेत मध्येच थोड्या पायऱ्या, पुन्हा पाऊलवाट असा खेळ चालतो. मग पुढे आम्ही जंगलवाटेनेच चालत राहतो. मध्येच एका ठिकाणी असंख्य परंतु अनाकलनीयरित्या अस्ताव्यस्त पडलेले दगड दिसतात. ते ओलांडत आम्ही पुढे निघतो तो समोरच काही सहभागी आंब्याच्या सावलीत विश्रांती घेताना दिसतात. हा असतो आंब्याचा मोढा! आम्ही पुढच्याच मिनिटाला त्या मोढ्यात पोहोचतो. एव्हाना सव्वाअकरा झालेले असतात. इथल्या सावलीतही पुन्हा एक छोटा विसावा होतो; किरकोळ खाणं नि जलपान होतं नि पुन्हा आक्रमण! एवढ्यात एकच गलका होतो.. आमची बिनीची फौज खिंड चढून वर गेलेली असते; त्यांचाच तो आवाज असतो.

वाट तशी दीड-दोन तासांचीच.. पण, गंभीर उन्हाळा नि आधीच केलेली एक उतराई यामुळं नाही म्हटलं तरी थोडंसं थकायला झालेलं होतं. त्यामुळे अंतरा-अंतराने घेतलेली ही छोटी-मोठी विश्रांती आणि मागे पाहताच दिसणारा चोंढे धरणाचा नयनमनोहर नजारा आणि सस्मित वदनाने सदोदित साथ देत असलेले तो शिपनुर, आजोबा, कात्राबाई  चढाईसाठी निश्चितच पुन्हा उत्साह मिळवून देण्याचे काम करीत होती.


चोंढ्या घाट चढाई करीत असताना आपण जेंव्हा जेंव्हा मागे पाहू तेंव्हा हसत निरोप देणारे सह्यमंडळ 

वाटेचा रेखीवपणा आता सुरुवातीपेक्षा कमी झालेला असतो. मध्येमध्ये विस्कळीत दगड-धोंडेच अधिक नजरेस येतात. बारकाईने निरखल्यास जलप्रवाह मार्गात आलेल्या पायऱ्यांबाबतच हा फरक घडलेला दिसतो. आणि, ह्याला कारणीभूत असतो इथला जोरदार पाऊस! अर्थात, ही वाट मुळात एक रचाईची तथा पायऱ्यांचीच वा निसणीची असल्याचे मात्र स्पष्टच जाणवते.
अशाच विस्कळित मार्गाने आता आपण थोडी उभी चढाई करीत निघतो. ही असते मेंढरओढीची धाव! 'धाव' म्हणजे बीळ! दहाएक मिनिटांच्या या चढाईत इथं मोठमोठ्या दगडधोंड्यांचीच गर्दी नि वाटही वळणावळणांची आहे. या वाटेने शेळ्या-मेंढ्या येत-जात असताना या दगडधोंड्यांच्या सापटींत चोरीच्या हेतूने लपून बसलेले चोर शिताफीने मेंढ्या आत ओढत. हाक ना बोंब.. मेंढी गायब! त्यावरून या जागेस हे नाव पडल्याचे सांगितले जाते.

इथून पुढे बव्हंशी जलप्रवाहमार्गच आहे. पुढे पाच-सात मिनिटांतच आपण #देवीपाशी येतो. अगदीच उघड्यावर




नि मध्यम-मोठ्या आकाराच्या सहाएक धोंड्यातच देवीचं हे ठाणं साकारलं गेलेलं आहे. पुढे चारेक मिनिटांतच केवाळूची खिंड लागते.. अन, अर्थात, लगेचच येतो घाटमाथा! सुंदर करवंदांच्या जाळ्यांनी बहरलेला! मग चारपाच मिनिटांतच काही घरं दिसू लागतात. हा असतो सोंगाळांचा माळ.. आणि.. घाटघर आलेलं असतंय. भटकंती संपत आलेली असतेय. चालणंही संपल्यामुळे हुश्श करीत आपण निवांत होत असतोय.. एवढ्यात, त्या घरांच्या पार्श्वभूमीवर समोर दिसणारा अलंग, मदन, कुलंग या गडत्रिकुटाचा नजारा केवळ मोहनियच नव्हे तर अत्यंत जबरदस्तच दिसत असतोय..


घाटघर गावातून कुठूनही दिसणारं अफलातून गडत्रिकुट   :  अलंग, मदन, कुलंग 

दोन्ही घाटवाटांच्या उतराई-चढाईचा हा असा इतका सुंदर समारोप होईल, असं वाटलंही नव्हतं. ही, एक छोटीशीच, अगदी सहाएक तासांचीच भ्रमंती.. पण दोन घाटवाटा, मुबलक निसर्गसौंदर्य नि समृद्ध गडदर्शन याने नटलेली अशीच होती, एक अप्रुपच होतं नि एकमेव असंच होतं, हे निःशंक!

■◆■समाप्त■◆■

भटकंतीत हे नियम आपण सर्व अवश्य पाळू... 


या भटकंतीतील आणखी काही छायाचित्रे..  :


 चोंढ्या घाट 


 घाटघर उदंचल जलप्रकल्प प्रांगणातून होणारे  शिपनुरचे रम्य दर्शन 


उंबरदरा : एक नळीची वाट

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...