Sunday, December 12, 2021

'चिकण्या'ची धार.. अर्थात् 'किये-कोंड' (ता. महाड) ते 'शिरगाव (ता. भोर)

 

 'खडी चढाई, गवताळ नि मुरमाड घसरण अन मध्येच गायब अशी रानवाट;
'होय, ती 'चिकण्या'च!' 'कांगोरी'च्या पुढ्यातील एक कसदार धारवाट!'


घाटवाट तथा धारवाट...  चिकण्या!


घाटवाट तथा धारवाट .. चिकण्या!  घारवाटेतील एक टप्पा..  तोरणीचा टप्पा.. 

नेहमीच्या शिरस्त्यानुसार पहाटे चारलाच पुण्यातून सुरुवात करीत, रस्त्याने क्रमाक्रमाने एकएक भिडू जमा करत आम्ही वरंध घाट गाठतो. वरंध घाट म्हणजे या बाजुच्या भटकंतीतील आमचा चहाचा ठिय्याच! दूरचा पल्ला असेल तर आम्ही इथं बऱ्यापैकी लवकर आलेलो असतो. आणि, अशावेळी इथल्या रम्य पाणफुगवट्याच्या पार्श्वभूमीवर इथला सुर्योदय न्याहाळण्यास मिळणं, ही एक पर्वणीच  असते.

एव्हाना सकाळचे साडेसात होत आलेले.. सूर्यराज केंव्हाच कामावर हजर झालेले. . पण आज तसा उशीरच झालेला असतो.  त्यामुळे सुर्योदय आधीच होऊन गेलेला. अन घाटातील वर्दळ तशी अद्यापही कमीच.. क्वचित एखादेच वाहन जात अथवा येत होते. तिथली तथाकथित उपाहारगृहे तथा एकूणएक टपऱ्या तर अद्याप चालू व्हायच्या बाकी होत्या. क्वचित येणारे-जाणारे वाहन नि आम्ही एवढा आवाज सोडला बाकी सर्व शांतताच होती. आम्ही जसजसे आमच्या बसमधून एकएक करीत खाली उतरु लागलो तसतसं  एक एक करीत तिथली वानरसेनाही तिथं जमू लागली होती. आमचं मंडळ  चहासाठी उतरलं असल्याने, साहजिकच, रिकाम्या असलेल्या टपऱ्यांमधून एक टपरी तात्पुरती 'काबीज' करीत  मंडळाने चहा-दुधाची 'किलबिल' सुरुही केली.

मंडळाचे सातारचे सदस्य श्री. राजपुरोहित यांचेकडून यावेळी 'म्हैसूरपाक'ची मेजवानी तर मागील ट्रेकला बसमध्येच घराची चावी विसरुन गेल्याबद्दल श्री. दातेंकडून सर्वांना 'पोहे' होते; साहजिकच 'मंडळा'ची अर्थात आम्हां मंडळींची आणि पाठोपाठ वानरसेनेचीही आज चंगळच होती. घाटातला हा 'खटाटोप' आटोपेतो हॉटेलमालकाचे 'शुभागमन' झालं. अर्थातच, त्यांची 'मालमत्ता' विनातक्रार नि विनाविलंब आणि पूर्णपणे 'साफसुतरी' अर्थात 'जैसे थे'पेक्षाही चांगली अशी त्यांच्या हवाली करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासास 'पांथस्थ' झालो.

वरंध  पार झाले अन पुढे  'भावे' फाटा  येताच बस  झरकन  डावीकडे  आत वळली.  आता या अरुंद अन 'नाजुक' रस्त्याने आमची बस निघाली. रस्ता  अरुंद  इतका की समोरुन एखादं  वाहन आलं तर   दोघांनाही  निघून जाण्यासाठी सोयीची  जागा  मिळेपर्यंत  दोघांपैकी  एकाला   सरळ 'माघार ' घ्यावी लागे. या दिव्यातून आम्हासही दोन वेळा  जावं लागलं.  त्यामुळंही किये येथे  पोहोचायला आम्हास  अंमळ  उशीरच  झाला.. तोपावेतो, गावातील जो तो आपापल्या उद्योगाला  निघून  गेलेला! बऱ्याच वेळच्या प्रयत्नानंतर  एक महाशय   'पदरी पडले'  पण,  'चोरकण्या'ची वाट मधल्या पावसाळ्यानंतर  अजून  वहिवाटेतच आली  नसल्याने तिकडे जाणे अडचणीचे ठरू शकेल, असे  सांगितल्याने  आयत्यावेळी  तातडीचा  पर्याय म्हणून  मग  'चोरकन्या'चे  नियोजन रद्द करीत सर्वानुमते  'चिकण्याची धार'  निवडण्यात आली. मग, सर्वानी पुन्हा आपले पाण्याचे नियोजन  ठीकठाक  केले;  घाटवाटेसंदर्भात  भाऊंचे   दोन  शब्दही  झाले..   अन मग,  अधिक  वेळ  न  दवडता,


 घाटवाटेसंदर्भात भाऊ दोन शब्द सांगताना.. 

 किये गावातील नरवीर तानाजी यांचा पुतळा

एव्हाना पावणेदहा झालेच होते, बाजुच्या नरवीर तानाजी पुतळ्यास अभिवादन करुन आणि महाराजांचे 'गारद'द्वारे स्मरण करत  आम्ही आमच्या आजच्या भटकंतीला सुरुवात केली.

आजची भटकंती ..

'चिकण्याची धार.'
घाटवाट तथा धारवाट..

अर्थात्
'किये-कोंड' (ता. महाड) ते 'शिरगाव (ता. भोर)


 किये गावातून दिसणारा घाटवाटेचा मोहक नजारा.. 


भटकंतीला सुरुवात झाली तशी पूर्वेकडच्या शेवटच्या टप्प्यातल्या चार-सहा घरांबरोबरच काही शेतवाड्यांसह आम्ही  'किये' गावही  टाकलं अन दाट-विरळ झाडीच्या  पांदरस्त्याने दहा-बारा मिनिटांतच मूळ धारवाटेशी येऊन भिडलो.


 अशाच एका शेतवाड्याजवळ भाऊ.. 

आरंभीलाच पायरीमार्गाने आमचे स्वागत झाले. पायऱ्याने सुरु झालेली ही  वाट, पुढे   काही  मिनिटांतच  मोठमोठ्या  दगड-धोंड्यांच्या  आडोशाने वर वर  निघाली. स्थानिक भाषेत  हे होते   'खोगीर'! हे पार करेतो काही मिनिटांतच तिनं पुन्हा आपलं  रूप बदललं अन विरळ झाडां-झुडपांच्या नि छोट्यामोठ्या दगड-धोंड्यांच्या साथीत गवताळही बनत ती आणखी  वर-वर निघाली.


 मोठमोठ्या दगड-धोंड्याच्या साथीने निघालेली  धारवाट.. 

साधारण अर्धा तास झाला असेन,  सलग वर वर चढणीने मंडळी बऱ्यापैकी घामाघूम झालेली. आता आम्ही काहीसं उंचावर आलेलो, मात्र गार हवेचा अजूनही पत्ता नव्हता.  मुळातच भटकंतीलाच बऱ्यापैकी उशिर झाल्यानं चढाईही तितकीच जड नि अवघड तर बनलीच  होती. पर्यायाने, प्रत्येकजण अवती-भोवती, मागे-पुढे पहात, दम घेत, निसर्ग न्याहाळत मन रिझविण्याचा प्रयत्न करीत होता. त्यात, अधून मधून ऐकू येणारी, यशवंताची पाव्याची मधुर धून मात्र सर्वांचे छानपैकी मनोरंजन करीत होती; त्यातल्या त्यात 'गीत', 'हिरो' या चित्रपटांतील  त्या प्रसिद्ध गीतांच्या धुनी तर रम्य त्या महाविद्यालयीन दिवसांची आठवणही करून देत होत्या.

अधूनमधून टाळसंगीताच्या साथीने त्यांच्या खड्या नि स्पष्ट आवाजातील तालबद्ध अन तितकीच  सुरेल भाव-भक्तीगीते अन हिंदी-मराठी सिनेगीतांचे मुखडेही जोडीला होते! साहजिकच, त्यामु़ळे चांगलीच रंगत येत होती अन त्यामुळं चढाईने आलेला शीण-थकवा जावून उत्साह दुणावला जात होता. खरं तर चढाई करताना लागणारा दम, जीवाची होणारी उलघाल.. अशा अवस्थेत साधं बोलणंही जिथं दुरापास्त होत असतं, अशा वेळी निवांत अन तालबद्ध  टाळवादन  नि साथीला उत्तम गीत-भावगीतांच्या बोलीत तितकंच उत्तम पावा वादन हे, खरं तर अगदी अफलातून असंच होतं. आणि, निश्चितच कौतुकास्पदही!


मधुर  पाव्याच्या धूनवाला यशवंता.. पाठीमागे कांगोरीगड.. 

आमची चाल चालूच होती. खोऱ्यातील वृक्षराजी अगदी दाट बहरलेली दिसत होती. त्यात, मागे पाहता, किये गाव व वस्त्या एखाद्या रंगवलेल्या निसर्गचित्रासारख्या दिसत होत्या. दूर तिकडे उजवीकडे मंगळगड तथा कांगोरीगड तर सारखं वळून वळून त्याकडे पाहण्यास भाग पाडत होता.

संपूर्ण वाटचालीत आतापर्यंत सपाटी अशी नव्हतीच मुळी. मग तासाभराने कारवीचं बन लागलं, पण तेही काही काळापुरतंच! ते संपता संपता पुढे पंधराएक मिनिटांतच पुन्हा एक चढाईचा टप्पा लागला. तो संपवून आता  थोडी तरी सपाटी यावी, असंच आम्हा सर्वाना वाट होतं पण सपाटी काही येत नव्हती. मुळात नव्हतीच  तर येणार कुठून?  तो भास तथा वेडी आशाच ठरली. चढाई कायम होती. कारण, थोडं वर येताच पुढचा टप्पा अगदी समोर रस्त्यातच ऊभा ठाकलेला दिसत होता. जणु एखाद्या आडमुठ्यासारखा! त्याला पाहताच, आम्ही पहिला 'कासोबाचा टप्पा' संपवून या दुसऱ्या, 'तोरणीचा टप्प्या'च्या चढाईला सुरुवात करीत आहे, हे लक्षात यायला वेळ लागला नाही. आजच्या भटकंतीत आम्हांला असे एकूण तीन टप्पे पार करायचे होते.

 घाटवाट तथा धारवाट ... चिकण्या !
 तोरणीचा टप्पा दृष्टीपथात.. 









आता केवळ गवताळ वाटेने, क्वचितच एखाद्या दगडधोंड्याच्या संगतीत आम्ही वर चढत होतो. सलग अन उभ्या चढाईने आतापावेतो अनेकजण गलबलले होते. नाही म्हटलं तरी चढाईची कठीणता जाणवू लागली होती. त्यात ऊनही चांगलाच जाणवत होतं. समोरचा टप्पा तर, जसजसं जवळ जाऊ तसतसा आणखी अवघड भासत होता. वाळलेले गवत आणि मोकळी झालेली खडी-मुरूम आता पाय जागेवर ठरू देत नव्हते. कटाक्षाने काळजी घेत प्रत्येकजण वर चढत होता. हा  टप्पा होता एकूण केवळ वीसएक मिनिटांचाच.. पण, चांगलाच कठीण होता. मात्र, सर्वांनी तो यशस्वीरित्या पूर्ण केला.


गवत नि कारवी, दगड  नि धोंडे याशिवाय  खडी चढण ? शक्य आहे ?

आता हा टप्पा पार करुन वर येताच आम्हांस तिसरा नि अखेरचा टप्पा समोरच  दॄष्टीस पडला. तो समोर पाहून, तुलनेत, अगदी साधारणच  वाटत होता आणि खरेच तो साधारण होता हे पाचएक मिनिटांत त्याजवळ जाता दिसून आले. हा टप्पा छोटा आहे हे समजलेले होतेच पण तो इतका छोटा नि इतका सोपा असेल याचा  मात्र अंदाज नव्हता. पण, पाचच मिनिटांत जेंव्हा तो वर चढून झाला तेंव्हा ते चांगलंच ध्यानी आलं! हुश्श! झालं एकदाचं! भर उन्हात तशी चढाई आता संपली होती एकदाची. जरा  माथ्यावर आल्याने  मघापासून दूर,  दूर, अस्पष्ट अशी दिसणारी 'दुर्गाडी'ही आता अगदी स्पष्ट अन जवळ दिसू लागली होती.आणि, थोडी-बहुत खेळती हवाही मन आणि शरीराला दिलासा देत होती. 




पुढे सपाट, गवताळ असं माळरान होतं. आत्तापर्यंतच्या वाटचालीत लागलेली ही होती पहिली सपाटी!साहजिकच चढाई संपल्याने अधिकच बरं वाटलं होतं. पाचएक मिनिटांतच आम्ही एका लहानशा वृक्षबनात आलो. इथं सावलीही बऱ्यापैकी असते. दुपारचा  एक वाजून गेलेला असतो. काहीशी भूकही लागलेली असते. त्यामु़ळे येथेच सहभोजन व थोड्या आरामाचा बेत ठरतो नि होतोही. थकलेले जीव मग सोबतच्या न्याहरीवर लगबगीने ताव मारतात नि तृप्त होतात. मग थोडा विसावाही होतो.



साधारण पावणेदोनचे आसपास आमची पुन्हा चाल  सुरु होते. आता संपुर्ण वाट सौम्य उतरणीची व बव्हंशी सपाट अशीच असेल, हे मार्गदर्शकाने सांगितलेलं..परंतु, दुर्दैव आड आलंच! कारण, वहिवाट नसल्याने अन नुकत्याच सरलेल्या पावसाळ्यात बहरलेल्या झाडी-झुडूपांमुळे या  ठिकाणी आल्यावर आमची वाट  अचानक बुजलेली दिसली, म्हणजे गायबच की! आता काय ? मग,  आजूबाजूला कुठे वाट  मिळतेय का, याचा बराचसा शोध घेण्याचा प्रयत्न करूनही सगळीकडेच हा अडथळा.. वाट काही केल्या मिळतात नव्हती. काटेरी अन त्रासदायक झुडपांची पावसाळ्यात बेसुमार वाढ झालेली दिसत होती. अखेर, वाटच दृष्टीस पडत नसल्याने जनावरांनी बनवलेल्या बोगदासदृश्य पाऊलवाटा कोयत्याच्या साहाय्याने थोड्याशा उंच छाटत अन मधले अडथळे आवश्यक तेवढ्याच प्रमाणात दूर करत, निसर्गाचा फारसा समतोल ढासळू न देता  अशीच  एक वाट जरा  सुधारित करण्यात आली   नि मग त्या काटेरी पांद-बनातूनच  वाटेचा  मागोवा घेत, कधी  वाकून  तर  कधी  बसून, आम्ही त्या काटवनातून पुढे पुढे होत एकदाचे बाहेर आलो नि  थेट  नदीपात्रातच  उतरलो. पाणी थोडेच होतं नि समोरच भूभागही नजरेस येत होता त्यामुळे काही भीती वाटली नाही.  मग पुढे,  कधी  नदीपात्रातून तर कधी बाजूने,  तिच्या काठाकाठाने तर कधी  गच्च कारवी  बनातून आमची सवारी पुढे पुढेच चालत होती.


 वाटेत लागलेला जलप्रवाह.. 


                            
रमणीय अशा पाणवठ्याच्या साथीत स्वत;ला थोडंसं थंड व हलकं करून घेताना  हरेक सह्याद्रीसाथी !

असा प्रवास करीत करीत आम्ही  पुढे थोडं आणखी खाली उतरतो तो एक छोटासा  पूल दुरूनच पण स्पष्ठ असा आमच्या दृष्टीस पडला आणि, 'पूल, पूल' असा एकच गलका झाला. आधीच सांगितल्यानुसार, शिरगाव जवळ आल्याची ही  खूण असते. मग, गाव जवळ आल्याच्या, अर्थात, पाठोपाठ भटकंतीही संपन्न होण्याच्या मार्गावर आल्यानं थोडंसं हायसं वाटतं अन मग त्याच धुंदीत  उरलेलं  अंतर पूर्ण करीत  आम्ही एकदाचे  'शिरगावा'त पोहोचतो,  तेंव्हा साधारण साडेतीनचा  सुमार झालेला असतो.


शिरगाव जवळ येताच दृष्टीस पडलेला गावाजवळील पूल 

इथं, खरं तर, भटकंती संपलेलीच असते.. पण, नेहमीच्या शिरस्त्यानुसार, भ्रमंतीपश्चात  असलेला सहभोजन  कार्यक्रम तसाच आणखी थोडं  पुढे बसने जाऊन सोयीने  एका खाजगी मंदिराचा आसरा घेत  यथोचितरित्या आटोपला  जातो..  अन आम्ही, सुखेनव, परतीच्या मार्गाला  बिलगतो.

■●■समाप्त●■


या भटकंतीतील आणखी काही मोहक छयाचित्रे :

           


डावीकडून ... प्रतापगड,महादेव मुऱ्हा नि दुर्गाडी 


 संपूर्ण भटकंतीमार्गावर आपल्या मंजुळ पाव्याच्या मंत्रमुग्ध स्वरांनी आणि खड्या नि सुरेल  आवाजात हिंदी-मराठी गीते-नि-भावगीते यांतून मनोरंजन करणारा एक हरहुन्नरी कलावंत...  यशवंत साळुंखे 

घाटवाटेचा तिसरा टप्पा.. 








 वाट अशीच एकदा पात्रातून वर चढत बांधाने निघताना.. 

धारवाटेतुन.... कांगोरीगड 


धारवाटेतुन.... किये गाव व आसपासचा वस्ती-परिसर 

■●■समाप्त■●■

भटकंतीत आपण सर्व हे अवश्य पाळू या!

No comments:

Post a Comment

किल्ले बहुला.

 आयुष्यात पाहिल्यांदा आपल्या आर्मीला घाबरून जीव मुठीत धरून केलेला एक अविस्मरणीय ट्रेक - किल्ले बहुला.   ✍️ मेघन तारिहाळकर पाटील (चौफेर भटकंत...