कशी वाट, काय पुसता; जा खुशाल, खुलेल जाता कळी!
मध्येच हलकीशी जाग आली म्हणून हळूच डोळे उघडुन पाहिलं तर लक्षात आलं की,
खिडकीचं तावदान तर अर्धअधिक उघडंच आहे. बाजूच्या भटक..भ.. भ.. भावाकडे
पाहतो तो त्याचे डोळे तर मिटलेले! बहुदा 'बाह्यावलोकन' संपवून तो नुकताच
निपचित पहुडला असावा. मग आत नजर फिरवता दिसलं की बऱ्याचशा खिडक्यांची
तावदानं तर अर्धी-अधिक उघडलेलीच; आणि , मंद, धुंद व प्रसन्नसा वारा
संपूर्ण बसमध्ये ऐसपैस खेळायला लागलेला.. इतर भाऊही, चारदोन हळू आवाजात
गप्पा मारत असलेले वगळले तर सगळे निपचित पहुडलेलेच! मग, कुठपर्यंत आलोय, हे
पाहावं म्हणून पुन्हा खिडकीकडे पाहिलं, अंदाज घेतच होतो, तेवढ्यात बसचा
वेग कमी झाला नि तिनं वळण घेतलं; तसं लक्षात आलं, तिनं आता मुंबई हमरस्ता
सोडलाय नि ती चौक फाट्यावरुन चौक-कर्जत रस्त्याने निघालीय. बस तशी पहाटे
चार वाजल्यापासूनच धावत होती. सहकाऱ्यांना गोळा करीत करीत तिनं साधारण पाच
वाजता पुणं सोडलेलं. काही मिनिटांनी बोरगाव फाटा आला नि तिनं पुन्हा वळण
घेतलं; चौक-कर्जत रस्ता सोडला अन् ती बोरगाव फाट्याला आत वळून धावू लागली.
आता रस्ता खूपच अरुंद, एकेरी, होता. बोरगाव गेलं, पाठोपाठ सोंडेवाडी फाटाही
गेला; अन, जेंव्हा आंबेवाडी आलं तेंव्हा साधारण आठ वाजले होते. आम्ही सर्व
उतरते झालो. पाठोपाठ चहा-दुधाची भांडी अन इतर आवश्यक सामुग्रीही उतरली!
चहा-दूध होईपर्यंत मग दुपारच्या भाजीचीही.. लसूण, वाटाणा सोलणे इ., तयारी
झाली नि चहा-दूध होताच टोस्ट, बिस्किट्स, कुणी जवळच्या पोळ्या.. असं
उदरमार्गी लावलं; अन, पाठोपाठ आवराआवर सुरु झाली. सारं आटोपून
भटकंतीमार्गी लागायला आम्हांला जवळजवळ नऊ वाजले. अंमळ उशीरच झाला होता.
थोडी दूरची भटकंती असली की असा उशीर हा व्हायचाच, हे सर्वमान्यच होतं.
आजची भटकंती..
प्रबळगड!
मार्गे...
आंबेवाडी-ऊंबरणेवाडी-सुक्याची
व्हळ-मोरगीचा कडा-डेंगचीची
वाट-डेंगची-अन घोगळची नळी.
![]() |
| घोगळची नळी .. १ |
आमची पूर्ण तयारी झाली होती. आम्ही निघायच्या बेतातच होतो. रविवार होता,
अर्थात, शाळेला सुट्टी!त्यामुळं आंबेवाडीतील तमाम 'बालजनता', तिथं जमा
होती. आम्ही निघताच त्यांचे ते इवलेसे हात आम्हां सह्यसवंगड्यांना
सदिच्छापर निरोप देण्याहेतुतून कौतुकानं हलत होते. प्रत्युत्तरादाखल,
आम्हीही आमचे हात हलवून त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत वाट पकडली नि
निघालो. वाटही सस्मित वदनाने 'चला, आता' म्हणून खुणावत होती. तिचे सगे..
निसर्गसखे! ते तर आधीपासूनच तयार होते. मागे मोरवेचा पाणफुगवटा, बाजुला
डावीकडे जणु 'वनराजा'च्या तोऱ्यात डौलदार दिसणारा तो इरसाल 'इर्शाळ', आणि
अगदी नजरेसमोर, थोडं उजवीकडे, बव्हंशी पानगळ झालेलं जंगल अन त्यातुन
हश्याच्या पट्टीकडे सावकाशीनं निघालेली जंगलवाट.. असा चहुबाजुचा नजारा
आपापल्या परीने तयार राहून आम्हां निरोप देण्यास सज्ज होता.
आम्ही निघालो, तशी वाटही हातात हात घालून आमच्यासह चालू लागली. आम्ही
निघालो खरं.. पण, ऊष्म्याला गारव्याचा काही आधार मिळेल, ही आशा, पानगळ
झालेले साग व इतर वनराजी पाहता फोल ठरली होती; पण, सुदैवानं काही
मिनिटांतच हिरवाईनं थोडीशी संगत जोडली अन दाट-विरळ तिच्या साथीत आम्ही
साधारण तासा-दीड तासातच पिसारनाथ तथा शिवाजी शिडीला जाणाऱ्या वाटेच्या
आरंभाला भिडलो. इथून वर उजवीकडे वाट शिवाजी शिडीला जाते तर डावीकडे खाली
उंबरणेवाडीला. आम्हांला, अर्थातच, खाली उंबरणेवाडीला जायचं असल्याने आम्ही
इथूनच खाली उतरणाऱ्या त्या छोट्याशा उताराने खाली उतरलो नि काही मिनिटांतच
तेथील मराठी शाळेच्या भव्य नि सुंदर प्रांगणात अवतरलो. अंगण प्रशस्तच होतं;
अन स्वच्छही! झाडंही शिस्तीत लावलेली. काहींना दगडी गोल पारही केलेले!
शाळेच्या इमारतीही नुकत्याच रंगविलेल्या असल्याने बहारदार दिसत होत्या.
भिंतीवर सुभाषिते अन इतर काही शैक्षणिक अन तात्विक तथा वैचारिक 'साहित्य'
उतरवलेलं दिसत होतं. अंगणात, गोलाकार छोटासा पार असलेला ध्वजस्तंभही उठून
दिसत होता. शाळेच्या प्रांगणात येताच पाठपिशव्याही सैल होतात, उतरतात; नि,
इथं एक छोटासा विसावा होतो. तिकडे वाडीत गेलेल्या आमच्याच काही मंडळींकडून
मार्गदर्शक-संशोधन चालू असतंय. तेवढ्यात, समोरुन हाक येते नि आम्ही सर्व
तिकडे गमन करतो. विष्णुचं घर असतंय तिथं. विष्णु.. आमचा आजचा
मार्गदर्शक-साथी म्हणून निश्चीत झालेला असतो. मग तिथंही चहा होतो, जरी
कोरा, काळा तरी अगत्याने पुरेपूर भरलेला! मग, पाण्याचंही व्यवस्थापन होतं
अन मग नव्या साथीला घेत आम्ही निघतो.
आमचं आजच्या भटकंतीचं खऱ्याअर्थी 'आक्रमण' सुरु होतं ते इथपासूनच!
विष्णुच्या साथीत लागलीच वाडी मागे पडते, पाठोपाठ वाडीजवलील नदीपात्रही;
आणि, पुढील काही मिनिटांतच आम्ही सुंदर अशा जंगलाला भिडतो. हे वन चांगलंच
दाट, हिरवंगार असं होतं. जंगलवाटही छान वळणावळणाची होती. मुळातच जरा उशीरच
झाला असल्यानं आमचं मंडळ आता हळूहळू थोडं पळु लागलं होतं. साधारण अर्ध्या
तासातच आम्ही, उजवीकडे, वर वर चढत, एका भल्यामोठ्या, छानशा खडकमाळावर आलो.
माळच होता तो, अध्ये-मध्ये खाचा-खोचा असलेल्या पूर्ण खडकाचा, नि काहीसा
उताराचा! पण वर माथ्यावर जराशी झाडी होती, त्यामुळं जराशी सावलीही! मग, ती
थोडीच जरी, छानशी नि गरजेपुरती मिळाल्यानं आम्ही सर्व तिच्या आश्रयाला जात
छोटा 'पायनापल-विसावा' घेतो.. अन, थोडं विसावतोही!
![]() |
| पायनापल विसावा |
दहाएक मिनिटांच्या विश्रातीनंतर आम्ही पुन्हा निघालो. वाट तशीच त्या
जलप्रवाहमार्गातुन पुढे पुढे निघत होती. मोठा खडक तर सलग होताच, पण, जिथं
कुठं खंड पडेल तिथं लहान-मोठ्या पाषाण-शिळांच्या साथीनं, कधी पाण्याच्या
छोट्या-छोट्या वस्त्यांच्या संगतीनं, कधी थोड्याबहुत दगड-गोट्यातून आम्ही
वर वर निघालो होतो. हीच तर होती ती सुक्याची वाट! प्रथम वाटलं होतं, खडकमाळाचा हा उतार.. मग पाणी कसं थांबणार? मग ओलावा नाही म्हणून सुकं.. म्हणून, सुक्या! अन सुक्याकडे जाणारी ती सुक्याची वाट! असाच काहीसा अंदाज बांधला; पण नाही, 'त' म्हणता तपेलंच असेल, हे काही प्रत्येकवेळी साधत नाही, तसंच झालं.
मग, हा 'सुक्या' आहे तरी काय, कोण नि कुठं? तर, याचं उत्तरही आपल्याला काही मिनिटांतच मिळतं. आता '' म्हण 'सुक्या' जे काय हे कळल्यावर त्याच्या दर्शनाची आम्हांला घाईच झालेली.. पण, तो यायला अजून अवकाश होता.
आणखी सुमारे पंधरा-वीस मिनिटे आम्ही या वाटेने चाललो असेन, तोच ही वाट
आम्हांला डावीकडे वळवत एका छोट्याश्याच पण साधारण कठीण निखड्या अशा चढाईला
सामोरे घेऊन जाते. ही चढाई संपवून वर पोहोचताच समोर येते एक खडकाळ सपाटी!
बऱ्यापैकी उंचावर आल्याने समोर नि सभोवतालचा निसर्ग कसा अगदी मन मोहवून
टाकणारा असतो.. आणि, तेवढयात आपली नजर अशीच थोडी उजवीकडे वळते.. आणि, तो
दृष्टीस पडतो.. नव्हे, लक्षच वेधून घेतो.. तो.. ज्याची आम्ही वाट पहात होतो
तो.. ''! त्याचं सुक्या! ते ध्यान, त्याची ती उंची, ती तब्येत.. अगदी महाकायच!
..हा असतो सुक्या! या प्रवाहमार्गातील एक कुंड! एक जलकुंड !! एक एक टप्पा खाली उतरत धबधबणारं जल नि अखेरीस बनलेलं महाजलकुंड! जे आज पुर्णपणे दगडमातीने बुजलं गेलंय! हाच तो सुक्या! तर हा 'सुक्या' हा या वाटेवरील एक नवलयुक्त टप्पा! एक विशाल जलकुंड! एक विशाल धबधबा !! आणि, या 'सुक्या'पर्यंत धावत येणारी ही वाट, म्हणून ही सुक्याची वाट! सततची चढतीच !! ![]() |
सुक्या! एक विशाल जलकुंड आणि धबधबा.. या वाटेवरील एक नवलयुक्त टप्पा.. |
..चांगलाच तीन-चार ऊंच अशा टप्प्यांत.. धोधावणारा, धबधबणारा तो.. हो, तो 'सुक्या'च!
आज जरी सुका तो, त्याचं मोहनिय दर्शन होताच आम्ही प्रचंड सुखावलो.
किंचितशी एक धार अद्यापही चालू असलेली, जी त्याच्या जिवंतपणाचं लक्षण सादर
करीत होती तर जलप्रवाहाच्या जोषाने खरवडून निघालेला तो कातळ.. जो त्याची
व्याप्ती दाखवून देत होता. आणि ठिकठिकाणी त्या कोसळधारांच्या उमटलेल्या
पाऊलखुणा त्याची गतकाळची समृद्धी दर्शवित होत्या; आणि, मागे वळून पाहता
दिसणारा, खाली दूर, दूर, त्या दरीपर्यंत, धावत चाललेला, त्याचा तो लांबलचक
असा प्रवाहमार्ग! समोरील ती खोल दरी अन त्या खोल दरीतील प्रवाहमार्गाच्या
दोन्ही बाजुला, अगदी संपुर्ण खोऱ्यातच.. हिरवाई अगदी प्रचंड बहरलेली होती.
आणि, अगदी समोर, ऊंचावर, तो भला मोठा पर्वत.. माथेरान! तो तर
निर्विवाद बहरलेलाच! एक भलं मोठं, विशाल नि समृद्ध असं निसर्गसाम्राज्य! जे
जे काही दिसत होतं ते सारं, सारं अगदी, अगदी नयनमनोहरच होतं. रम्यच होतं
ते!
![]() |
| समोर माथेरान, त्याच्या पायथ्याचं विशाल निसर्गसाम्राज्य आणि सुक्याचा प्रवाहमार्ग, |
मग, ही समृद्धी.. थोडीफार
कॅमेऱ्यात, बरीचशी डोळ्यांत अन मनकप्प्यात साठवत आमची सवारी
पुन्हा निघाली आणखी वरच्या दिशेने! यावेळी प्रवाहमार्ग पुन्हा
ऊजवीकडे ठेवत आम्ही डाव्या हाताने चढाई सुरु करतो. ही वाटही
मघासारखीच सलग उंच चढत जाणारी, साधारण अर्ध्या तासाची परंतु काहीशी
घसरडी! ही असते डेंगचीची वाट! आणि, डेंगची.. हा असतो
या वाटेवरील आणखी नवलयुक्त टप्पा! तो असतो आणखी थोडा पुढे. साहजिकच,
स्वत:ला व सहकाऱ्यांना साथीला घेत नि जपून चढत आम्ही या वाटेची कसरत
पूर्ण करीत वर पोहोचतो तो आमच्या दृष्टीस पडतो तो टप्पा, ज्याची आपण
वाट पहात असतो.. डेंगची!
![]() | |
|
एक साधारण वीस-पंचवीस फुट ऊंचीचा खडकटप्पा.. आणि, जिथं एका लाकडी
ओंडक्याच्या आधारानेच करावी लागते चढाईची सुरुवात! जी नसते सहज आणि सोपी..
आणि, त्यापुढेही सरावाने जाणाराच जातो सहज अन्यथा दोर आणि अनुभवी
माहितगार यांची गरज लागतेच. मग एव्हरेस्टर भगवान चवले आणि काही इतर
सहकारी, सुरक्षा कवच बनत, दोराच्या साह्याने सर्वांना सुखरुप वर घेतात;
नि, हा अंतिम, अवघड टप्पाही पार केल्याच्या आनंदातच आम्ही वर पोहोचतो. सगळे
वर आल्यानंतर थोडी विश्रांती होते नि त्यानंतर आम्ही लगेचच पुढच्या
जंगलवाटेला जवळ करतो.
या मस्त जंगलवाटेने दाट वनराई अन गर्द सावलीचा प्रवास करीत आम्ही पुन्हा
जलप्रवाहमार्गात उतरतो. एव्हाना दुपारचा एक झालेला असतो. एका ठिकाणी या
प्रवाहालगतच एक सपाटीची जागा मिळते. पाणीही उपलब्ध असते. साहजिकच, दुपारचं
भोजन अन विसावा इथंच घेतला जातो.
![]() |
| छानशी सपाटी अन पाणी पाहून आम्ही इथंच भोजनविसावा घेतो.. |
भोजन व विश्रांतीपश्चात पुन्हा मार्गक्रमण सुरु होते. आता आमची पुन्हा
जलप्रवाहमार्गाने वाटचाल सुरु होते आणि सुरु होतो एक थरार.. पुन्हा एका
जबरदस्त वाटेचा! कारण, इथं आपण सामोरे जातो एका अफलातून साहसी वाटेला ज्या
वाटेत आहेत केवल महाकाय शीळा! चित्र-विचित्र,अजस्त्र पाषाण! लहान-मोठे
असंख्य दगड-धोंडे! एक, दोन, शेकडो? नव्हे.. हजारो!! आणि आपण चालतो
त्यांच्याच साथीत! अगदी सतत.. डावी-ऊजवीकडे, समोर-मागे केवळ दगड-धोंडे नि
शिळा-पाषाण! कधी त्यांचेवरुन तर कधी खालूनही.. अगदीच बोगद्यातून
गेल्यासारखे! सोबतीला प्रचंड झाडं-झुडपं, लहान-मोठी वृक्षराजी, लता-वेलीही!
आणि, मग कधी.. पांदसदृश रम्य बोगदावाट, कधी पाना-फांद्यांचा अडथळा तर कधी
सावली म्हणून त्यांचाच आधार.. नि नेत्रसुखही! ..बाजूला तर अजस्त्र, भयावह
कातळभिंतीही! आकार, रूप तर अगदी नळीच्या वाटेसारखेच! होय, ही असतेच मुळी
नळीची वाट.. 'घोगळची नळी!'
![]() | |
|
![]() |
| प्रबळगड वाटेवर दृष्टीस पडलेल्या पाषाणात कोरलेल्या पावट्या ! |
आपल्या नजरेत येतात पाषाणात कोरलेल्या सुस्पष्ट अशा अन थोडं त्यापुढंही आणखी तशाच परंतु गवत-गबाळाखाली झाकल्या गेलेल्या काही पावट्या! या वाटेतील हे आणखी एक नवल! आणि, त्याहीपुढे, नजरेस पडतात, पाण्यासाठी बांध घातल्यासदृश्य काही विस्कळीत बांध-काम-रचना! थोडक्यात, ही सगळी लक्षणं आता आम्ही गडप्रवेश केल्याची चाहूल असते.
![]() | |
|
आता वेळही खूप झालेला असतो. दुपारचे तीन वाजलेले असतात. गड पूर्ण पार करुन
विरुद्ध बाजुला उतरुन ठाकूरवाडी गाठायची असते. भटकंतीपश्चातचे नियमित
सहभोजनही असतेच. साहजिकच, पाय उचलणे गरजेचे ठरते. मग, अधिकची गडभ्रमंती
टाळून वाटेतच भेटलेली.. स्थानिकांना गिर्यारोहण आणि शिकारीचे धडे देणा-या सावंतांची समाधी, त्यापुढे गणरायाचं भग्न असं मंदिर अन त्याहीपुढे, थोडी वाट वळवून म्हणु या किंवा थोडी लांबवून.. 'कलावंतीन'चा तो विहंगम नजारा! तोही जरा घाईतच पाहून घेण्याच्या हेतुतून मुद्दाम वाट वळवून वेग वाढवला..
![]() |
| कलावंतीनचा प्रबळगडावरून दिसणारा अप्रतिम नजारा! |
कलावंतीन दर्शनाचं सुखही पदरात पाडून घेतलं अन् तेथून परतून आम्ही
गडउतरणीस सुरुवात केली. पुढे नियमित वाटेनं, झाडाझुडुपातून,
फांद्या-वेलीतून आणि अखेरीस मोकळवनातून आम्ही ठाकुरवाडीत पोहोचलो.. आणि सांघिक स्नेहभोजनाचा आस्वाद घेवून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.
अशाप्रकारे एका जबरदस्त, महत्प्रयासी, अनन्यसाधारण अशा अनोख्या भ्रमंतीची समाधानकारक नि यशस्वी सांगता झाली.














No comments:
Post a Comment