Sunday, December 12, 2021

एक संस्मरणीय 'सह्य'सफर.. भैरवगड ते रतनगड!!'

 समीर पटेल बरोबर नुकतीच 'ताडोबा'ची मस्त अन दिलखुश अशी भटकंती करून आलो होतो. पण, लगेचच एक दमदार अन् कसदार अशी भटकंती करायला मिळेल, हे स्वप्नीही नव्हतं. तशी ही भटकंती खूपच पूर्वनियोजित होती; पण ती इतकी संस्मरणीय होईल असं मात्र वाटलं नव्हतं.


मुळेचं खोरं.. म्हणजे प्रवरेचं उगमस्थान! नयनमनोहर नि मनमनोहर असं निसर्गसान्निध्य नि गडवैभव! अर्थात एक सोनेरी अन आनंददायी अशी सह्याद्रीसफर!!

वातावरणात असलेला जबरदस्त उष्मा अन भटकंतीपरिसरातील पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष, हे वास्तव असतानाही ते काही आमच्या मनोनिग्रहाला रोखु शकत नव्हतं. अनिकेत तर ही भटकंती कोणत्याही परिस्थितीत रद्द न करण्याच्याच मताचा होता; मग, भले सहभागीसंख्या कमी होवो अथवा न होवो! कारण, बरेच दिवसांपासून त्याच्या मनांत हा विषय रेंगाळलेला होता. शिवाय, भटकंतीही तीन दिवसांची, त्यामुळे सलग सुट्टी किंवा रजा अनुपलब्द्धतेच्या कारणास्तवच आतापर्यंत याआधी हा बेत कितीतरी वेळा पुढे, पुढे ढकलला  गेलेला होता.  अखेर, यावेळी त्यानं  'जायचंच'  हे निश्चितच केलेलं  होतं.

एप्रिलचा महिना.. उन्हाळा अगदीच प्रचंड.. नि पारा तर चाळीसचेही वर जाणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज  होता. शिवाय, हे कमी की काय म्हणून भटकंतीदरम्यान दोन दिवस पाण्याचा ठिपुसही नजरेस पडणार नसल्याचे वास्तवही समोर होतं.  साहजिकच, आवश्यक तेवढं पाणी सोबत वाहून नेण्याची कसरत तर करावीच लागणार होती. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून असेल कदाचित, पण, सुरुवातीला जमलेला चांगला पंधरा-सोळा जणांचा आमचा चमू एकदम निम्म्यापेक्षाही कमीवर आला. आता आम्ही.. म्हणजे अनिकेत खेडेकर, निखिल सावंत, संतोष मोर्ये, मेघा संजेश, जयदीप भोईर, पिंकेश नागदा आणि मी, असे एकूण केवळ सातजणच राहिलेलो होतो.


कळसुबाई डोंगररांग  :  भैरवगड  (शिरपुंजे) वरून













'भैरवगड (शिरपुंजे) ते रतनगड.. मार्गे घनचक्कर, गवळदेव, मुढा नि कात्राबाई..' एकूणच असं आमचं भटकंती-नियोजन असतं. ३१ मार्चच्या दुपारीच मी घरुन, शिरूरहून, निघालो. मग, पुण्यास येऊन  ठाणे गाठलं. तिथंही पुलावर थोडं पुढंच उतरवल्याने आता ठरलेली साडेअकराची 'कसारा' हुकते की काय, अशी भीती वाटून घाईने रिक्षाही केली; अन, आणखी एक छोटा रेल्वेप्रवास करीत ठाणे स्थानकावर पोहोचलो.  मग ठाण्याहून, कंपुसमवेत, कसारा गाठला. जीपगाडीचं नियोजनही झालं नि मग  चहा-बिस्कीट अशी उगाचच जुजबी पोटपूजा करून आम्ही सुमारे साडेतीन तासांचा प्रवास करून थेट भैरवगड शिरपुंजे गावठाणात दाखल झालो तेंव्हा पहाटेचे साडेचार वाजले होते.  साधारण तासभराची विश्रांती घेत थोडंसं स्थिरावून घेतलं, अन  तासाभराने उठून सकाळची आन्हिकं उरकून घेतली आणि रामनाथ, आमचा मार्गदर्शक, यांच्याकडेच चहा घेतला नि आम्हां भटक्यांची भटकंती सुरु झाली तेंव्हा गावही बऱ्यापैकी जागं होऊन आपापल्या कामाला लागलं होतं.


भैरवगडाकडे जाणारा मधल्या टप्प्यातील पायरीमार्ग आणि त्याबाजूचे कठडे 

रामनाथच्या घरापासून ते भैरवगडाच्या पायथ्याशी, पायरीमार्गाजवळ, पोहोचेतो सकाळचे साडेसहा झालेले. रस्त्यात माता-भगिनींची पाणी भरण्यासाठीची लगबग चालू होती. ते पाहून उगाचच मला माझं लहानपणीचं ग्राम-जीवन आठवलं. आम्हीही, अर्थात घरातला प्रत्येक लहान-मोठा सदस्य, गावी असताना उन्हाळ्यात पाण्यासाठी अशीच लगबग करीत असु. असो.

पायरीमार्ग तर वळणा-वळणाचा अन  नव्यानं बनवण्यात आलेल्या रंगीत लोखंडी कठड्यांचा होता. ते दृश्यही अगदीच मनोवेधक दिसत होत. साधारण तासाभरातच आम्ही खिंडीत येऊन पोहोचलो. जोरदार अन प्रसन्न वाऱ्याने आमचं सुस्वागत केलं. अगदीच प्रसन्न वाटलं. आतापर्यंतची चढ़ाई तशी फारशी सोपी नसली तरी अगदीच कठिणही नव्हती. मात्र, रंगीत कठड्यांमुळे संपूर्ण मार्ग सुरुवातीला खालून अन् नंतर, खिंडीत पोहोचल्यावर, वरुनही अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसत होता.


भैरवगडाच्या कातळकोरीव पायऱ्याआधी लागणारी खिंड आणि तीमधून दिसणारं आंबित गाव आणि निसर्गपरिसर 

त्यानंतर डावीकडे दिसलेल्या, वर वर चढत जाणाऱ्या कातळकोरीव पायऱ्याही अगदी मनात भरतील अशाच होत्या. खिंडीतून समोरची ती उजव्या हाताची दरी, त्यातलं ते आंबित गावही छान दिसत होतं. आंबितमार्गेही या गडावर येण्यासाठी एक वाट आहे. इथपर्यंत येईतो साधारण आठ वाजलेले.. सकाळी नाश्त्याला केवळ चहा-बिस्किटच झाल्याने भूकही लागलेली.. मग, आम्ही खिंडीतच आमच्याजवळील नाश्ता उरकून घेतला आणि लगेचच समोरील त्या कातळकोरीव, देखण्या पायऱ्यांना भिडत, पुढे एका भग्न दरवाज्याने गडप्रवेश करते झालो.


भैरवगडाच्या माथ्याअलीकडील पायऱ्या  आणि भग्न दरवाजा 

वर येताच  अचानक होणारे ते गडदर्शन.. त्याची  ती व्याप्ती..  ती तटबंदी,  त्यापुढील  डावीकडील बाजुचे ते गुहा-जलकुंभ तर केवळ विलक्षणच! यानंतर लागलं एक सुंदरसं गुहामंदिर! आम्ही तिकडे वळालो. दोन कक्ष असलेलं हे गुहामंदिरही अगदीच लक्षणीय असंच होतं. त्यातील ती भैरवाची पाचएक फुटांची रंगीत मूर्ति तर खरेच खूपच सुंदर अन वेधक अशीच होती. बाजूचे ते तीन दगडी दीप, थोडेफार पूजेचे साहित्य, अन त्यापलीकडे ती महादेवाची पिंड अन नंदी इ. सर्व आपलं लक्ष वेधून घेत होते. तसेच, या गुहामंदिराच्या वरील भागात  उघड्यावरच श्रीगणेशासह आणखी इतर काही मूर्ती व वीरगळही मांडून ठेवलेल्या दिसून आल्या. बाजुला भगवी पताकाही फडकत होती. हे सर्व गडाचे सौंदर्य पाहून गडाचं गतवैभव लक्षात येत होतं. आणखी पुढे जातो तो पाण्याच्या चार टाक्यांचा समूहही दृष्टीस पडला.


भैरवगडावरील गुहासदृश जलकुंभ, चार टाक्यांचा समूह, 

श्री भैरवाचे भैरवगडावरील  गुहामंदिर


गडमाथ्यावरून फेरी मारता ते शिरपुंजे गाव, त्याच्या त्या विखुरलेल्या वाड्या-वस्त्या, भोवतालची ती तुरळक हिरवाई, आणखी पलीकडे.. कुंजरगड, हरिश्चंद्रगड, कलाडगड आणि दूरवर तिकडे ती कळसूबाईची  डोंगररांग!  नगर-नाशिकच्या गडश्रीमंतीचं  अगदी  श्रीमंत असं दर्शन मोहनिय असंच होतं. 



हे गडदर्शन करून तासाभरातच आम्ही आल्यावाटे खिंडीत परतलो. येताना पाठपिशव्या तिथंच सोडल्या होत्या, त्या पाठीला लटकावत, थोडेसेच अंतर उतरून, आम्ही आला-पायरीमार्ग उजवीकडे सोडत, डाव्या बाजूच्या डोंगराची कड धरत पुढची वाट पकडली. खाली उतरून पुन्हा वळून वर येण्याऐवजी आम्ही रामनाथच्या सुचनेनुसार वेळ नि अंतर वाचवलेलं असतंय. पण, वाट नवखी, न वापरती आणि, साहजिकच, फार रुळलेली नसल्याने मस्त घसारा होता. तो अनुभवतच एक वळसा मारुन आम्ही पुढे घनचक्करच्या दिशेने जाणाऱ्या नियमित वाटेला येऊन मिळालो. या मार्गात, मध्ये, एक बऱ्यापैकी मोठी अशी गुहाही लागते.


भैरवगड खिंडीतून खाली उतरताना डाव्या हाताने जाणाऱ्या वाटेवरील गुहा 

गुरे-जनावरांच्या दृष्टिकोनातून स्थानिकांसाठी ती गुहा एक उत्तम सोय होती. हो, पण पावसाळ्यात मात्र ही वाट केवळ गैरसोयीचीच असल्याने मुख्य वाटेने खाली उतरून जाणेच अधिक सोयीस्कर. या वाटेने अजून काही अंतर जातोय न जातोय तोच आम्हां सातमधील एका सरदाराची 'तलवार' 'म्यान' होते.. सबब, पुढचा पल्ला चांगलाच मोठा असल्याने अधिकची चिंता न वाढवता सदर सरदार महाशयांच्या परतीच्या प्रवासाच्या व्यवस्थेत आम्ही रामनाथाला गुंतवून आम्हीं  आमची 'वारी' मार्गदर्शकाशिवायही पुढे 'जारी'च ठेवतो. मजल दरमजल करीत पुढे गेल्यावर, एक छानसं झाड पाहून पुन्हा एक छोटासा न्याहरी-विसावा होतो. रामनाथही एव्हाना त्या 'म्यान तलवारी'ला 'योग्य  मार्गी'  लावून आमच्यात सामील झालेला असतो. घनचक्करचा पसारा तसा खूपच मोठा.. गडावर पाहण्याजोगे जरी फार काही नसले तरी 'गडावरून' पाहण्याजोगे मात्र खूप काही आहे. येथून दिसणारं ते नगर-नाशिकचे गडवैभव नि ती निसर्गसंपत्ती न्याहाळतच,  उतरणाऱ्या वाटेने आम्ही खाली घळीत उतरतो. आता हा उतार, ही घळ म्हणजे थोडक्यात घनचक्करची हद्दच असते. येथून पुढे पलीकडे गवळदेवची हद्द सुरु होते. 


घनचक्कर अन गवळदेव या दोहोंमधली ही  सीमादर्शक घळ 

परंतु, गवळदेवची चढाई-उतराई नि परत मुढ्यापर्यंतची चाल, तिथला नियोजित मुक्काम व परत दुसऱ्या दिवशीची कात्राबाई, रतनगडपर्यंतची चाल, जवळचा शिल्लक पाणीसाठा आणि आमच्या हाती असलेला वेळ.. इ. लक्षात घेता आम्ही, सर्वानुमते, गवळदेवच्या चढाईचा बेत  रद्द करत, त्याच्या पायथ्यानेच तसेच पुढे मुढ्याकडे नियोजित  मुक्कामी निघतो. पण, थोडीफार चाल होते न होते तोच ,इथंही,  आमच्यातली आणखी एक तलवार, यावेळी, म्यान नव्हे तर, काहीशी बोथट झाल्याचे लक्षात येते. फार नाही, पाचच वाजलेले असतात पण नाईलाज असतो. पायांनीच नकार दिल्यावर काय करणार ना?  आता विश्रांती हाच एक पर्याय असतो. आम्हांला थांबावेच लागते. मग काय, गवळदेव नि मुढ्याच्या मध्यातच आयत्या वेळी, मुक्कामाची व्यवस्था केली जाते. गप्पा मारत, विविध अनुभवांची देवाणघेवाण करत, एकूणच मजा घेत रात्रीचं जेवणही सायंकाळीच उरकलं जातं आणि अपेक्षेपेक्षा खुपच लवकर आम्ही निद्राधीन होतो.

आता आजचा भटकंतीचा हा  दुसरा दिवस.. सकाळी सहाला उठून लगेचच,  नाश्ताही न करता, आम्हीं  'आक्रमण' सुरु करतो. भोवतालचा निसर्ग तोच, परंतु त्याच्या विविध छटा अन छब्या प्रत्येकवेळी वेगवेगळ्या कोनातून न्याहाळत, सकाळच्या त्या ताज्या हुरूपात आम्ही केवळ दीड तासातच कात्राबाईच्या खिंडीत पोहोचतो.


कात्राबाई : उघड्यावरचे मंदिर : बंदीस्त मंदिरासाठी श्रद्धेनुसार परवानगी नाही.

वेळेचा व्यय आणि पाण्याची काटकसर या हेतुतून इथला नियोजित नाश्ताही  काही काळ प्रलंबित ठेवत आम्ही आणखी  सुमारे  तासाभराची चाल करतो नि मग आवश्यक समजून  एक ठिकाणी नाश्ता होतो. थोडी विश्रांतीही होते. सकाळपासूनच नियोजित दोन्ही ठिकाणचा नाश्ता पुढे ढकलत  पाण्याचं व्यवस्थित व्यवस्थापन केल्यानं काटकसर होऊन  जवळचं  पाणी   पूर्णपणे संपत आलेलं नसतंय. मधलं जंगल नि मस्त हिरवाईमुळे उन्हाचा कडाका तुलनेने आता बराच  कमीच झालेला असतो. तरीही, कधी एकदाचा रतनगडाचा पायथा येईल आणि पाण्यावर 'धाड' टाकता येईल, असंच प्रत्येकाला झालं होतं. परंतु तिथपर्यंत पोहोचायला अजुन बराच अवकाश होता.


खिंडीनंतरची ती उर्वरित चाल.. कधी प्रवाहमार्गातून तर कधी बाजूने, अन बव्हंशी प्रचंड दगड-धोंड्यांच्या साथीतच आम्ही उतरतो अन नंतर  मात्र मस्त गर्द हिरवाईतून सुखद जंगलवाट तुडवत, पानगळीच्या मुक्तमधुर संगीताच्या साथीत एकदाचे आम्ही रतनगडाच्या पायथ्याजवळ येऊन धडकतो. वाटेतील ते टाके आता काही मिनिटांतच आमच्या दृष्टीपथात येणार असते.. आणि, आणि.. एकच जल्लोष होतो.. आंनदाचा.. उल्हासाचा.. कारण.. कारण,  टाकं आलेलं असतंय..


तहानलेले जीव एकदाचे पाण्यापर्यंत पोहोचलेले असतात.. साहजिकच, मनसोक्त पाणी पिऊन सर्वचे सर्व तृषार्त होतात.. सर्वांना अगदी दोन दिवसांनंतरच  पाणवठ्याचे दर्शन झालेले असतं. मग, इथंच एका महाविश्रांतीचं नियोजन होतं.. थोडं खान-पान होतं.. जलजिरापानही होतं.. पाण्याचं एवढं दुर्भिक्ष, एवढी अडचण झालेली असूनही संपुर्ण भटकंतीत समंजस साथ दिलेल्या आम्हांसोबतच्या त्या  'श्वानमहोदया'ही पाणी दिसताच जिवाच्या आकांताने बाजूच्या मुक्त जलसाठ्यामध्ये स्वत:ला पाण्यात यथेच्छ डुंबवून घेत, सुश्रांत-सुखांत होत, नंतर पारले-जी व पोळी-भाकरीवर तुटून पडत त्याचा भरपेट आस्वाद घेतात. बिचाऱ्या त्याही, शिरपुंजेहुन आमच्याबरोबर इथपर्यंत  आलेल्या, चांगल्याच तहानलेल्या-भुकेलेल्या असतात. या मंडळींचं भटक्यांसोबत सह्याद्रीत सदैव साथीला असणं हे जरी नित्याचं असलं; तरीही, या  अशा उन्हाळ्यातही हे  धैर्य नि शहाणपण मात्र नक्कीच कौतुकास्पद होतं.


रतनगड पायथ्याचा पाणवठा : वाघटाके परिसर आणि सवंगडी 

अत्यंत कमी पाण्यात व्यवस्थित नियोजन करीत आतेपावेतो झालेल्या भटकंतीनं आलेला थकवा आणि मरगळ इथल्या पाणी-नाश्ता आणि विश्रांती यामुळं दूर तर झालेलीच असते; तरीही आता नियोजनानुसारची, रतनगड करुन साम्रदमार्गे उतरून पुन्हा कसारा-ठाणे-पुणे मार्गे शिरुर असा कमाल व कमालीचा प्रवास करत परत जाण्याऐवजी मी आमच्या चमुला या चौकातच गोड निरोप देण्याचा पर्याय सुचवतो. लागलीच, तो सर्वमान्य झाल्याने मी 'राजूर-आळेफाटामार्गे शिरुर' असा पर्यायी आणि अर्थातच जवळचा व सोयीस्कर असा प्रवास निवडतो आणि रमत-गमत मस्तपैकी एकटाच रतनवाडीकडे उतरतोही. इथं उतरताना मध्येच अचानक दिसलेला तलाव पाहून मन हरकते.. याआधीही रतनगड चार-पाच वेळा झालेला पण हे सुंदर धरण आज मी पहिल्यांदाच पहात होतो. त्याची ती भव्यता आणि त्यातलं ते मुबलक पाणी.. हे दृश्य सुखदायक असंच होतं.. स्थानिकांसाठी आता हे चांगलंच झालं, या उत्साहातच मी  रतनवाडीत पोहोचेतो.


रतनगड पायथ्याचे रतनवाडीजवळील 

पण.. पण, अद्यापपर्यंत दडी मारलेल्या त्या  'दुर्दैवा'कडून इथं मात्र घात होतो.. राजुरला जाणारी बस काही  मिनिटांपूर्वीच निघून गेल्याचं समजतं.. मन चांगलंच खट्टू होतं. आता काय करायचं? हा महाप्रश्न पडतो. नशीब परीक्षा घेऊ पाहात होत. कशाचं तरी प्रायश्चित्त तथा प्रत्यक्ष प्रचिती घ्यायची वेळ आलेली असते. अधिक चौकशी करता आता बस तर नाहीच; तर मग, एकतर राजुरला जाणाऱ्या कोणा सज्जनाची वाट पाहणं, अन्यथा, तिथेच मुक्काम करणं हे आणि एवढे दोनच पर्याय माझ्यासाठी शिल्लक राहिलेले असतात. "आता काय करायचं?" पुन्हा तोच प्रश्न डोळ्यांसमोर नाचत असतो.. असा विचार चालू असतानाच माझी पाऊलं  आपोआप अमृतेश्वराकडे वळतात. "महादेवाचं दर्शन घेऊन थोडं निवांत होऊ या व मग काय ते बघु." असंच मनाशी ठरवत मी श्रद्धेने तिकडं निघतो.. पण, चार सहा पावले टाकली असतील नसतील तोच.. 'आस्तिक असण्याचं भाग्य म्हणा, किंवा गावी असताना ग्रामदैवत महादेवाच्या केलेल्या पुजा-अर्चेचं फळ..'  काहीही असो..  अमृतेश्वराचे दर्शन घेण्यापुर्वीच (त्या 'महा'देवाने) राजुरला जाणारे एक सज्जन, मा.  भांगरे सर, आपल्या दुचाकीसह (माझ्यासमोर) हजर (केलेले असतात.)! (कदाचित पुढल्या गाड्यांची 'त्याला'ही चिंता असावी.)




रतनवाडी ते राजूर अशो  'महा-लिफ्ट' देणारे मा. भांगरे सर 

"काय, रतनगड का..?" मी आपलं अधिक तपशिलात न जाता, "हो" म्हटलं. "हुकली का एस. टी. ..  जरा लवकर निघायचं ना.." असं त्यांनी म्हणताच मी निरुत्तर झालो. नव्हतंच माझ्याकडे उत्तर मुळी.. "मी राजूरलाच चाललोय, सोडतो तिथपर्यंत." हा संवाद मात्र अगदी सुखावह होता. पण, तेवढ्यानंही डोळे  डबडबले नि काळीजही गलबललं.. 'तो अजूनही आहे'  ही भावना  मनीं आणखी प्रबळ झाली;  पण, लगेचच सावध होत अन पडत्या फळाची आज्ञा, प्रसाद  म्हणा वा त्या अमृतेश्वराचा आदेश.. मी, त्या 'महान'देवाचं  दुरुनच दर्शन घेत आणि त्याचे मनपूर्वक आभार मानत,  त्या  सरांबरोबरच राजुरकडे प्रस्थान करतो. राजूरहुन आळेफाटा बसची वेळ माहीत असल्याने त्यांनीही  मला अगदी वेळेआधीच  तिथं पोहोचवलेलं असतंय. मग, पुढील प्रवासही, असाच, अगदी शिरुरपर्यंत, दोन्ही वेळेसही, बसगाडी वेळेत मिळून  सुलभ होतो;  आणि, अविस्मरणीय अशा एका सुफल भटकंतीची अत्यंत गोड आणि सफल अशी सांगता होते.

■◆■◆■ 


या भटकंतीतील काही छायाचित्रे..


भैरवगडाशेजारील  डोंगराच्या कडेकडेने घनचक्करकडे जाणारा वळसामार्ग 


कात्राबाई ते रतनगड दरम्यानच्या जंगलवाटेतील पांदीमार्ग 


 कळसुबाई डोंगररांग  :  घनचक्कर  डोंगररांगेवरून..

आणि.. 
रतनगड पायथा  :  वाघ टाके परिसर 

http://ishwargaikwad.blogspot.com/


No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...