Sunday, December 12, 2021

दक्षिण कोल्हापूर वर्षाभ्रमंती.

 --------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दक्षिण कोल्हापूर वर्षाभ्रमंती..  भाग.. १ :  भुदरगड आणि सामानगड

'तुफानी पाऊस नि मनमानी धुकं, अशात सूर्यही उगवण्या लाजतो जिथं;
वर्षाभ्रमंती ही दक्षिण कोल्हापूरची, देते भ्रमंतीचं शुद्धसुवर्णसुख इथं!'

 

पहाटेचा साधारण तीनचा सुमार होता..  मग, निसर्गसुलभ छोटा विसावा म्हणून वाहकाने अशीच एका ठिकाणी गाडी थांबवली. आणि थांबलीच आहे गाडी तर  जरा 'मोकळं' व्हावं या हेतुतून तर काहीजण जरा 'हलकं' व्हावं या हेतूनं असं हळूहळू प्रत्येकजणच खाली उतरला. आपापला कार्यभाग आटोपून जो तो गाडीकडे वळतो तो कुणा तरी भल्या 'साथी'चं लक्ष 'त्या' भलत्या वेळी 'उघड्या असलेल्या एका चहाच्या टपरी वजा हॉटेलकडे गेलं. मग काय, थोडक्या वेळेतच 'कानोकानी' झाली, मग 'खुणवाखुणवी' झाली आणि क्षणातच भलाच 'उच्चारव' झाला नि, चहाची 'सामुहिक तल्लफ' (तल्लफ कसली? हुक्कीच म्हणा ना!) उसळली.

टपरीच ती.. तिथं जागा ती कितीशी असणार? मग, त्या अपुऱ्या जागेत कुणी बसलं, कुणी 'हूभं ऱ्हायलं'. म्होरक्यानं चहाची ऑर्डर दिली अन तिथल्या तिथंच  दोन-चार गट बनत हरेकजण गप्पांत रमला. पण.. पण, चहा तयार होईतो कोण्या आणखी एका भल्या सवंगड्याची तिथल्या अंड्यांशी 'नजरानजर' झाली.. मग का, पुन्हा तशीच  'कानोकानी' नि 'खुणवाखुणवी' आणि तसाच 'उच्चारव' झाला अन 'भल्या पहाटे'च्या त्या 'भलत्या वेळी'  'सामुदायिक मर्जी'खातर तिथल्या  त्या अंड्यांची 'भुर्जी'ही झाली.. मग त्यावर चहा-बिस्कीटेही  झाली नि 'यथेच्छ भरल्या पोटी' आम्ही पुन्हा 'मार्गस्थ' झालो.

रात्री पुण्याहून निघायला सुमारे साडेअकरा झालेले.. चार-साडेचार तासांचा प्रवास झालेला.. त्यामुळं प्रत्येकजण, नाही म्हटलं तरी, थोडासा कंटाळलेला होताच.. पण, या छोट्याशा 'विसाव्या'मुळे सर्वच जण चांगलेच ताजेतवाने झाले. आता आम्ही थांबलो तो  होता 'किणी नाका' अन कोल्हापूर अद्यापही बाकी होते, सुमारे तीसेक कि.मी.! मात्र, कोल्हापूर येण्यापूर्वीच, 'क्रांती'च्या सुचनेनुसार गाडी शहरातून नेण्याऐवजी बाह्यवळणमार्गांने घेऊन काही वेळ आणि अंतर वाचवत आम्ही थेट गारगोटी गाठलं. इथं थोडा वेळ गाडी थांबली.. आणि क्रांती, आमचा आजचा सोबती परंतु स्थानिक सह्यसाथी, थोडक्यात, कोल्हापूरकर, काही मिनिटांतच आपल्या 'आजोळघरी' जाऊन आला नि मग अधिक वेळ न दवडता आमचं 'बिऱ्हाड' लगोलग गडाच्या दिशेने कूच झालं.

आता गड इथून साधारण दहा-बारा कि.मी. होता. रस्ताही तसा बरा होता.. अन नाही म्हटलं तरी पाऊसही थोडा भुरभुरत होताच. त्याच्या तडतड आवाजाची एका विशिष्ट लयीत जणू काही संगीत-साथ चालू होती. काचेवरून पावसाचे ओघळ ओघळत होते. समोरच्या काचेतून पावसाचा जोर कळत होता अन सकाळची वेळ असल्याने हवेत नाजूकसा गारवाही  होता. गड जवळ आल्याने झोपाही उडालेल्या.

काही  मिनिटांतच पाटगाव रस्ता, मग पुढे भुदरगड फाटाही आला.. आणि इथून गाडीनं डावीकडे वळण घेतलं तसं काही वेळातच पेठ-शिवापूरही आलं. मग गडाची वाट पकडून आमची गाडी गडाकडे निघाली. रस्ता काहीसा अरुंद नि सोबतीला दुतर्फा झाडी..  त्यामुळं सफरीला चांगलीच मजा येत होती. यथावकाश गाडीनं वळणा-वळणाच्या रस्त्याने  थेट गडमाथाच गाठला; आणि, आम्ही सर्व गड आल्याच्या खुशीत गाडीतून पायउतार झालो.

१. भुदरगड  :

 गडावरील जागृत देवस्थान.. श्री भैरवनाथ मंदिर 

गाडीतून खाली उतरताच दिसला तो संपुर्ण भोवताल प्रचंड धुक्यात पूर्ण हरवलेला.. साहजिकच, एकूण एक सारा आसमंतच केवळ दुधी, दुधाळ आणि दुधासमच फक्त! एखाद्या परग्रहावर आलो की काय जणू असंच वाटलं. आमची गाडीही मला क्षणभर यानासारखीच भासली. तेवढ्यात, पावसाचीही भुरभुर चालू झाली अन ओल जाणवताच आम्ही गडावर असल्याचं आम्हां भान आलं. मग, गाडीकडे धाव घेत, 'पावसाळी अस्त्रं' काढून घेऊन ती  परिधान  करीत  आणि  प्रथम  'जागृत'  भैरवनाथाचं  दर्शन  नि  आशीर्वाद  घेऊन या आणि मग सुरुवात करू या, या शुद्ध नि पवित्र विचाराचा कृतीत अंमल करीत आम्ही एका विशिष्ठ उत्साहात गडफेरीला निघालो. थोडंसं चालताच उबनिर्मिती झाली नि आमचा उत्साह दुणावू लागला. मात्र, दूरवर सर्वत्र धुक्याची चादरच पसरलेली असल्यानं दूरची दृश्ये, अवशेष इ. च्या अलीकडे जणू एक पारदर्शक पडदाच असल्याचा भास होत होता. जवळ गेल्याशिवाय फारसं स्पष्ठ असं काही दिसत नव्हतं.


सर्वत्र धुक्याचीच चादर!

श्री भैरवनाथाच्या साक्षीनं गडफेरीला सुरुवात झाली. इथलं भैरवनाथाचे मंदिर हे अगदीच वेगळ्या धाटणीचं व हेमाडपंती शैलीतील असल्याचं दिसतं. मंदीराभोवतीच्या ओवर्‍या, कमानी अन दीपमाळा अगदी नजरेत भरण्याजोग्या आहेत. समोरील बुरुजावरचा ध्वजस्तंभ व बाजूची ब्रिटिश बनावटीची तोफ पाहून आम्ही पुढे निघालो. मंदिरासमोर काही वीरगळींचे अवशेषही दिसून आले. धुकं अधूनमधून निवळत जरी असलं तरी प्राप्त माहितीनुसार सुमारे चारेकशे एकरभर असलेला प्रशस्त किल्ला अन त्यात सुमारे पस्तीस एकरावरील तो 'दूधसागर' काही पूर्ण दृष्टीपथात येत नव्हता. चार-दोन मंदिरं, आणि त्या 'सागरा'मधील काढलेल्या गाळाचे बाजुला लावलेले ढिगारे 'मागे सारत' आम्ही आता 'दुधसागरा'समीप पोहोचलो.

 दूधसागर.. केवळ दुधी, दुधाळ नि दुधासमच!
इथल्या दोन तलावांपैकी हा तलाव चांगलाच विस्तीर्ण, बांधीव आणि मनोहर असाच! अन, पाणीही 'दुधाळ'!! जणू दूधच!! इतक्या मधुर आणि मनोहर देखाव्याजवळ आम्ही रमलो नाही तर नवलच!

दूधसागराजवळ रमलेले सवंगडी 
पाण्याला असा हा रंग येण्याचं कारण 'इथली माती' आहे, असं सांगितलं जातं. तलावाचं पलीकडचं टोक, आकाश आणि मधलं धुकं यांत कोण, कोणाला, कुठं टेकलंय याचा अंदाज घेणं, हे काही सोप्पं गणित नव्हतं. त्यातच सततची बारीक बुरबुर, मध्येच येणारी लहरी सर आणि विशाल पठारावरील मुक्त वारा मात्र धुंदपणे अंगाला झोंबत शरीरातील 'उबे'ची छानपैकी बेरीज-वजाबाकी करण्यातच अधिक रस घेत होता.

 गडावरील तटफेरी 
आता  आम्ही  पायऱ्यांवरुन  तटबंदीवर  चढत  'तटफेरी'  चालू  केली.  परंतु  जोरदार  वारा अन दाट धुकं यांच्या लपंडावात  गड  आणि  गडाचा  भोवताल  काही  विशेष  असा  नजरेत  'ठरत' नव्हता.  आणखी  पुढे    गेल्यावर आम्ही एका  छोटया  तलावाजवळ  येतो. त्यापुढे,  बाहेरील  बाजूस  सभामंडप  असलेले  एक  छानसं गुहामंदीर लागतं.   इथल्या  गाभाऱ्यात  अनेक  देवतांच्या मुर्ती  दिसतात.   मग  करवीर छत्रपतींनी  जिर्णोध्दार केलेले व सभामंडपात छत्रपती शिवरायांचा अर्धपुतळा असलेलं शिवमंदिर दिसतं. गडावर शिवमंदिरं तशी नाहीच.. आम्ही मनोभावे महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं' थोडा विसावा घेतला  नि पुढे निघालो.

गडावरील शिवरायांचा अर्धपुतळा असलेलं शिवमंदिर 
आणि त्यापुढं सदरेचे अवशेष स्पष्टपणे नजरेत येणारा भव्य वाडा दिसतो. एवढ्यात भली मोठी सर येते, तद्नंतर धुकंही वाढतं अन मग निवांत भटकंती "पुढच्या वेळी"त सोपवून आम्ही गडफेरी आटोपती घेतो.


गडावरील एक शिवालय  
शिलाहार राजवट, आदिलशाही, मराठेशाही इथं या गडावर होती, असं इतिहास सांगतो.  राजाराम महाराजांचेही या गडावर काही काळ वास्तव्य होते, असं इतिहासातील नोंदीवरून दिसून येते.  गडावरील मंदिरांत बव्हंशी शिवालयेच असून गडावर थोडीबहुत झाडीही आहे. शिवाय, गडावरील इतर अवशेष, गडावरुन दिसणारी दुधगंगा-वेदगंगा नद्यांची रम्य खोरी, राधानगरीचे दाट अरण्य अन आंबोली घाटाचा धुंद परिसर यांचं अवलोकन करण्यास प्रचंड धुक्यामुळे आम्ही मुकलो याचं मात्र खूप वाईट वाटलं.

-----xxx-----xxx-----xxx-----

२.. सामानगड  :

आता भुदरगडाहून पाल घाटाने पुढच्या गडासाठी "उत्तुर-गडहिंग्लज-भडगाव-चिंचेवाडी मार्गे सामानगड" असा आमचा प्रवास सुरु झाला. गडहिंग्लपासून केवळ दहाएक कि.मी. असलेल्या या किल्ल्याचा विस्तार सुमारे तीस-एकतीस एकर असून येथेही गाडी थेट गडावर जाते. माथ्यावर पोहोचताच सडकेला दोन फाटे फुटतात. सरळ जाणारी उजव्या हाताची सडक "भीमसासगिरी (हनुमान) देवस्थान"कडे तर डाव्या हाताची सडक थेट सामानगडावर जाते.

 नव्यानेच संवर्धित झालेला गडाचा दरवाजा, सूचनाफलक, गडाची माहितीदर्शक फलक नि महाराजांचे आज्ञापत्र  
सद्यस्थितीत या गडाचे छानपैकी संवर्धन झालेलं असून काही वेळातच गडाच्या नूतन अन रंगविलेल्या तटबंदीतील नवीन व कौलारु रंगातील भव्य प्रवेशद्वार आपले स्वागत करते. सडक थेट आत जात असल्याने आम्ही गाडी थेट निशाण बुरुजापर्यंत नेऊन लावली अन गडभटकंतीला सुरुवात केली. पाऊस काहीसा थांबलेला अन धुकंही विरलेलं.. शिवाय सर्वच ठिकाणी नाम व दिशादर्शक फलक असल्याने किल्ला-निरीक्षणासाठी आटापिटा झाला नाही. साहजिकच, गड पाहण्यास, तुलनेने, मजा आली. खरेच, 'शिलेदार' अन "दुर्गवीर प्रतिष्ठाण" यांचं याकामीचं योगदान निश्चितच प्रशंसनीय, अभिनंदनीय अन अर्थातच, अनुकरणीयही आहे.

 गडावरील विविध बुरुज 
गडाच्या सर्व बाजूंचा कातळ हा तासीव असून त्यावरील तटबंदी, बुरुज हे, गडाचं व्यवस्थित संवर्धन केल्याने 'शाबूत' आहेत. या गडास प्रवेश बुरुजासह झेंडा, वेताळ, चिलखती असे लहान-मोठे दहाएक बुरुज असून येथे विहिरींही संख्येने अधिक व वैशिष्ट्यपूर्ण आहेत. काही विहिरी तर बाराव्या शतकातील स्थापत्यकलेचे अगदी उल्लेखनीय व प्रशंसनीय उदाहरण होत. सातकमान विहीर तर अगदीच वैशिष्ट्यपूर्ण आहे.

 गडावरील प्रसिद्ध अशी सातकमान विहीर 

गडावरील आणखी  काही विहिरी 
विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या असुन त्या संपल्यावर भुयार व त्यापुढे पाणी लागते. यापुढे आपणास जाता येत नाही. पूर्वी इथं कैद्यांना ठेवलं जायचं, असं इतिहास  सांगतो. या वैशिष्यपूर्ण विहिरी हे या गडाचे भूषणच आहे. 

आणखी  एक  वैशिष्ट्य  म्हणजे,  येथील तटबंदीवरून फिरताना तटाच्या बाहेरून पण साधारणतः तटालगतच 

गडावरील वैशिष्ट्यपूर्ण तटबंदी 
साधारण आठ-दहा फूट उंचीचे, जांभ्या दगडाचे अनेक खांबही आपल्या दृष्टीस पडतात. तटबंदीचं काम करताना तटाबाहेरील जागा किती प्रमाणात खोदली हे दर्शविणारे हे खांब म्हणजे याबाबतचं हे एक प्रमाणपत्रच जणु!

इतिहासातील नोंदीनुसार, छत्रपती शिवराय व समर्थ रामदास यांचं काही काळ इथं वास्तव्य होतं.  तसेच बेहलोलखान व त्याच्या सैन्यांवर आपल्या केवळ सहा सहकाऱ्यांनिशी (वेडात मराठे वीर दौडले सात..) तुटून पडलेले सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांचा बलिदानापूर्वीचा तळ याच गडावर होता. तसेच, हा गड विशाळगड, पन्हाळा, भुदरगड, रांगणा इत्यादी लढाऊ किल्ल्यांच्या बेचक्यात अगदी मधोमध स्थित असल्याने रसद-पुरवठा दृष्टीनेही या गडाचे इतिहासात विशेष महत्व होते.

भीमसासगिरी (हनुमान) देवस्थान  :

डभटकंती झाल्यानंतर त्याच प्रवेशद्वाराने बाहेर पडत आम्ही आल्यावाटेने परत जाऊन सरळ जाणाऱ्या सडकेने भीमसासगिरी (हनुमान) देवस्थानाकडे गेलो.

 भीमसासगिरी हनुमान देवस्थान.. मुख्य मंदिर आणि दोन प्रवेशद्वारे 
इथलं मंदिरही भव्य नि प्रेक्षणीय असुन त्यास दोन प्रवेशद्वारे आहेत. दुसऱ्या प्रवेशद्वाराने गडाची बाजू टाळून पायऱ्याने थेट वर येता येते. या मंदिरापासून आणखी थोडं पुढे भूयार तथा गुहासदृश वसलेलं एक छानसं शिवमंदिर (सुर्यमंदिर)असुन त्यास कमानीदार देवळ्या आहेत.

या मंदिराच्या बाजूच्याच परिसरात प्रभू रामचंद्र, सीता अन लक्ष्मण यांच्या नावे बैठक, ध्यान तसेच स्नान.. आदी कक्षही असून सीतेसह हे बंधु त्यांच्या वनवासकाळात इथं वास्तव्यास होते, असं भाविक मानतात.

सूर्यमंदिराच्या मंदिराच्या बाजूस प्रभू रामचंद्र, लक्समन नि सीतामाई यांच्या नावे असलेले विविवध कक्ष 
पुढे, थोडं खाली उतरणाऱ्या रस्त्याने एक मठ असून धार्मिक यज्ञयाग, पुजा-अर्चा, महाप्रसाद आदी कार्यक्रम तेथे नियमित आयोजिले जातात. हनुमान व शिवमंदिर.. ही दोन्ही श्रद्धास्थाने या पंचक्रोशीत प्रसिद्ध असून दोहोंसमोरील परिसरही अत्यंत रमणीय व प्रशस्तही आहे.

दक्षिण कोल्हापूर वर्षाभ्रमंती..  भाग..२  : पारगड


'तुफानी पाऊस नि मनमानी धुकं. अशात सूर्यही उगवण्या लाजतो जिथं,
वर्षाभ्रमंती ही  दक्षिण कोल्हापूरची, देते भ्रमंतीचं शुद्धसुवर्णसुख इथं!' 

पारगड  :

 पारगडाचे पुढील प्रवेशद्वार 

_ पारगडकडे प्रस्थान.. 

आता पारगडला मुक्कामी जाण्यापूर्वी 'नेसरी' करून जायचं नियोजनात होतं म्हणून हरळी, महाडगाव करीत आम्ही नेसरी गाठलं पण सायंकाळचे पाच वाजल्याने ते बंद झालेलं. मग, नाईलाज झाला नि आम्ही पुढचा बेत 'काबीज' करण्यासाठी अडकूर, गडहिंग्लज मार्गे चंदगड गाठलं नि तिथून सटावणे-सुळये-पारळे फाटा मार्गे पारगड असा आमचा प्रवास सुरु झाला..

_ पोहोचण्यापूर्वीचा एक थरार!

पारगड जवळ येईतो सायंकाळचे सहा वाजून गेलेले.. अंधार पडायला आता थोडाच अवधी राहिलेला; रस्ता रिकामा जरी पण वळणा-वळणाचा! रहदारीही खूप कमी, त्यात सततचा पाऊसही.. त्यामुळे वाहने सहज नियंत्रित होतील अशाच वेगात अन लयीत येत-जात होती.

आणि.. आणि, तेवढ्यात गलका झाला. दोन-चार सेकंद काही कळलंच नाही, पण, लगेचच, पुढे रस्त्यावर एक  'काळ' उभा असल्याचं समजलं. आता गाडी थांबलेली.. अन इंजिनची 'धडधड'ही;  पण आमची 'धड-धड' मात्र वाढलेली! तो 'काळ' मात्र तस्साच पुढे चालत होता.  मागून एक गाडी येतेय, हे त्याच्या गावीही नव्हतं. हळूहळू मागे-पुढे ठराविक अंतर राखून आणखी गाड्या जमा होऊ लागल्या, पण दहशतीमुळे गाडीबाहेर कुणीही  आलं नाही.  आम्ही गाडीतूनच त्याला न्याहाळू लागलो.

'तो चांगलाच तरणाबांड नि धष्टपुष्ट असा दिसत होता. भलताच मस्तवाल अन भीतीदायक असाही वाटत होता. ती भलीमोठी शिंगे, काळीकभिन्न काया नि आक्रमक असा तो..  एक 'गवा' होता.. आणि रस्त्याने अत्यंत रुबाबात चालला होता! राज्य जणु त्याचं होतं, अन मक्तेदारीही त्याचीच!



 गोलमटोल, अवाढव्य, धष्टपुष्ट, मस्तवाल, भीतीदायक, तरणाबांड नि आक्रमक असा तो काळाकभिन्न 'काळ'

समोरच्या वळणावरून तेवढ्यात एक दुचाकी आली; पण, स्वारानं ती अफलातून नियंत्रीत करत मागेच थांबवली अन थोडं थोडं मागे सरकत स्वतःला सुरक्षित करुन घेतलं. त्यामागे एक बस आली, तीही थांबली.  मघा सरळ चाललेला 'तो' आडदांड आता चार-सहा पावलं थोडं मागे येत रस्त्यावर अडवणुकीच्या थाटात आडवा उभा राहिला! एखाद्या मुजोर धटिंगणासारखा! आमच्यातलं अंतर आता केवळ आठ-दहा फुटच! धावून आला तर आख्खी गाडी पलटवून टाकील, अशी ताकद, मस्ती आणि जिगर त्याच्या डोळ्यांत दिसत होती. नशीब आमचं, सुदैवानं आमची गाडी लाल रंगाची नव्हती!

आणि, तेवढ्यात.. रस्त्यात आडवा 'उभारलेला' मग्रूर तो..  जोशात, अतिजोशात निघाला.. अन डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच, रस्त्याच्या पलीकडील बाजुच्या, त्या लोखंडी नियंत्रकांवरून अगदीच  पल्लेदार अशी उडी मारून, क्षणार्धात 'पसार'ही झाला! त्याची 'ती उडी' उरात जितकी धडकी भरविणारी होती तितकीच ती 'मोहक' अन 'आकर्षक' अशीच होतीतो गेला तरीही काही मिनिटे इतकी शांतता नि स्तब्धता होती की त्यावरूनच त्याची प्रत्यक्ष दहशत लक्षात यावी. मात्र, कसलाही धोका तथा संहार न करता गेल्याने, इतका वेळ भयावह आणि धोकादायक असा भासला-दिसलेला तो, आता 'नायक' वाटू लागला. त्या जंगलाचा, त्या घडीचा तो हिरोच! त्यानंतर चर्चा होती ती त्याचीच फक्त! 

यथावकाश, काही मिनिटांतच सर्वकाही सुरळीत झालं, रहादारीही सुरू झाली, तशी आमचीही गाडी निघाली, पारगडाच्या दिशेने.. आता अंतर थोडंच तर राहिलं होतं.

_ भटकंतीपूर्वीची रात्र..

आता आम्ही पारगडला पोहोचणारच होतो तोच 'तो' पुन्हा सुरू झाला नि पारगडाचा पायथा येताच सुदैवाने थोडा कमीही झाला. तरीही सुरक्षितता म्हणून पावसाळी अस्त्रं चढवीत आणि पाठपिशव्या सोबत घेत आम्ही पारगडाच्या त्या पायरीवाटेला भिडलो. नुकत्याच बांधलेल्या पंचाहत्तर व शिवकालीन दोनशे एवढ्या पायऱ्या चढून गेल्यावर आम्ही पूर्ण भग्न झालेल्या अशा दरवाजाच्या जागेतुन नि त्यानंतर एका जिर्णोद्धारीत अशा छानशा हनुमान मंदिराजवळ येतो. तेथून पुढे आणखी थोडं वर चढत गेलं की थेट गड तथा गडावरील वस्तीच आपल्या समोर उभी ठाकते. एव्हाना जवळजवळ अंधार झालेला असतो. थोडी चौकशी करताच 'ठिकाणा' मिळतो आणि अगदी दोनच मिनिटात आम्ही, आम्हाला हवे असलेल्या श्री. देवीकरांचे घरी पोहोचतो. मग आगमनाची चहा-बिस्किटे होतात. भगवती मंदिराकडे एखादी चक्कर मारावी तर बाहेर पाऊस चालूच असतो. त्यामुळं तो बेत आपोआप रद्द होतो. मग, थोडया गप्पा होतात अन त्यानंतर तुषारच्या कल्पनेनुसार विराटकडे सूत्रं सोपवत छानपैकी दोर-गाठींचं एक सरावसत्र होतं. बाहेर अद्यापही 'तो' बरसतच असतो. त्यानंतर गरम अन चवदार भोजनाचा आस्वाद घेऊन झाल्यावर पुन्हा गप्पा-टप्पा रंगतात. आता मात्र, उद्या सकाळी लवकर उठायला हवं या जाणिवेने आम्ही झोपी जातो. सकाळी कळतं, बाहेर वरुणराजा रात्रभर अगदी मनसोक्त कोसळलाय! कोल्हापूरचाच पाऊस तो! इथं हे अगदी नैसर्गिक मानलं जातं. अगदी साप वगैरेचं निघणं'ही! अंगण, ओट्याची अवस्थाही बरंच काही सांगून जाते.

_ गडफेरी..

सकाळी उठायला बिलकुल उशीर न करता उठलो; पण बाहेरील वातावरण अद्यापही पावसाळीच असतंय. त्यात जोडीला प्रचंड धुकंही! तशाही परिस्थितीत आम्ही चहा-नाश्ता वगैरे उरकून घेत, 'आता पाऊस असो वा पावसाच्या छोट्या-मोठ्या सरी, त्यामध्येच गडफेरी करायचीच, असं ठरवलेलं. आणि अन्य पर्यायही नसतो.  मग, आम्ही आपलं, पावसाळी अस्त्रं परिधान करीतच गडफेरीला सुरुवात करतो.


 पूर्वीच्या सदर असलेल्या जागेत आज असलेल्या शाळेच्या प्रांगणातील महाराजांचा पुतळा 

अगदी सुरुवातीलाच, पूर्वीच्या सदरेच्या जागेत आज असलेल्या शाळेच्या प्रांगणातील महाराजांच्या कांस्यातील त्या छान पूर्णाकृती पुतळ्याला मनोभावे नि आदरपूर्वक वंदन झालं, उंच आवाजात गारदही दिली अन मग पुतळा उजव्या हाताला ठेवत आम्ही पुढे निघालो. थोडंसं खाली उतरत हनुमान मंदिर, तेथून पुन्हा आणखी थोडं खाली उतरत उजव्या हाताच्या पाऊलवाटेने, मध्येच भेटलेली घरे उजव्याच हाताला ठेवत, तसंच सरळ  पुढे आम्ही थेट महादेव मंदिराकडे निघतो. 


गडावरील संगमरवरी महादेव मंदिर 

तिथलं दर्शन घेऊन मग आम्ही उजव्या हाताला 'झेंडा असलेल्या बुरुजा'कडे निघतो. तिथलं निरीक्षण आटोपून आता आमची तटफेरी चालूच असते; एवढ्यात,' त्या मनमानी धुक्यानं' पुन्हा  मनावर घेतलं आणि एक सुंदरशी पेशकष केली. नंतर ते वाढतच राह्यलं. आता तर पुढे दिसत असलेली तटबंदी, छोटा तलाव इ. क्षणांत धूसर नि त्याच्या पुढच्याच मिनिटात आणखी धूसर, अगदी अस्पष्टच झालं!



गडावरील अवशेष 

मग पाऊलवाटही दिसेनाशी झाली. आपण स्वत: आणि शेजारचा एवढंच काय ते स्पष्ट दिसत होतं. बाकी सगळीकडे धुकंच धुकं! सारं चित्र अस्पष्ट, धूसर असंच! त्यानंतर वाराही सुटला मग थेंबही पडू लागले.  क्षणार्धात त्यांचा वेगही वाढला आणि  मग, अपरिहार्यपणे, त्या धुकं, वारा आणि  पावसाला 'मान देत' आणि



 गडावरील माता भगवती मंदिर 

त्यापुढे 'मान तुकवत 'तसाच' आल्या वाटेने परत वर येत भगवतीमाता मंदिराजवळ येऊन 'आश्रित' झालो. येताना मध्ये हनुमान मंदिर लागलं, धुक्यात ते इतकं वेगळं वाटलं की जाताना जे पाहिलं ते हेच का, असा प्रश्न पडावा!



 गडावरील हनुमान मंदिर 

थोड्या वेळां पाऊस कमी झाला अन धुकंही कमी झालं.  मग हीच संधी साधत आम्ही मुक्कामस्थळाकडे धाव घेतली, पुन्हा एक गरम चहा 'मारला' नि थोडंसं उबदार होत थेट उतराईला सुरुवात केली ते पायरीमार्गाच्या पायथा येईतो थांबलोदेखील नाही. अन गाडीजवळ येताच पाठपिशव्यांसह आतमध्ये घुसलोच!

_जाण्याच्या वाटा..

सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर मुख्य रांगेतील पार दक्षिणेकडील किल्ला म्हणजे पारगड! गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक ह्या तीन राज्यांच्या सीमेवर असलेला.. उत्तर, पूर्व व पश्चिमेकडे असलेले कातळकडे व दक्षिणेची खोल दरी यामुळं चारही बाजूने ह्या गडाला नैसर्गिक संरक्षण लाभलंय. साहजिकच उपलब्ध पायरीवाट हाच गडावर जाण्यासाठीचा एकमेव मार्ग. बाजूच्या रस्त्याने वाहनेही थेट गडावर जायची, पण, दरडी कोसळण्याच्या भीतीतून हा मार्ग सध्या बंद केलेला आहे. मोर्ले गावातूनही एक वाट या पायरीमार्गाला येऊन मिळते; पण, तिची चढाई उभी असून तीनेक तासांची व दमछाक करणारी आहे. ही उतराई मात्र तासाभरातच होते.

_ इतर माहिती..

प्राप्त माहितीनुसार या मंदिराच्या गाभाऱ्यात शिवकालीन मूळ दगडी मंदिर असून त्यात  नेपाळच्या गंडकी शिळेपासून तयार केलेली भगवतीमातेची अत्यंत रेखीव अशी मूर्ती आहे. जिर्णोद्धारीत हे मंदिर भव्य असून सभामंडपही विशाल आहे. त्यात शिवकालातील अनेक प्रसंग चितारलेली चित्रे लावली आहेत.

गडावर गुणजल, महादेव, फाटक व गणेश असे चार तलाव असून शिवकालीन सतरा विहिरी पैकी चारच सुअवस्थेत आहेत. मात्र, गडावर एप्रिल मेमध्येही पाणी भरपुर उपलब्ध असते.

गडास भालेकर, फडणीस, महादेव, माळवे, भांडे, झेंडे अशी नावे-आडनावे असलेले बुरुज आहेत.

गडावर सुमारे तीस-चाळीस घरांची वस्ती आहे. नरवीर तानाजी मालुसरे, शेलारमामा तसेच शिवकाळातील तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे यांचे वंशज येथे वास्तव्यास आहेत.

_ इतिहास..

- पोर्तुगीजांवरील स्वारीवरुन परत येताना शिवरायांनी या डोंगराचे भौगोलिक स्थान व महत्व ओळखून येथे किल्ला वसविण्याचे ठरविले.
- पोर्तुगीज, अदिलशहा आणि सावंतवाडीचे खेम सावंत यांच्यावर कायमची जरब बसावी म्हणून महाराजांनी हा किल्ला वसविला.
- महाराजांच्या उपस्थितीतच किल्ल्याची वास्तुशांत आणि गडप्रवेश झाला.
- पारगडाचे एकूण क्षेत्र सुमारे अठ्ठेचाळीस एकर आहे.
- महाराजांनी पारगड बांधल्यावर किल्लेदार म्हणून पहिली जबाबदारी तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे यांच्याकडे सोपवली. (इ.स.१६७४)
- औरंगजेबाचा मुलगा मुअज्जम याने पारगड जिंकण्याचा प्रयत्न केला; पण, त्याला इथल्या मावळ्यांनी त्याचे प्रयत्न पूर्ण ताकदीनिशी हाणून पाडले. (इ.स. १६८९)

■●भाग..२ समाप्त■●

 (क्रमश:) 

या भटकंतीतील आणखी काही छायाचित्रे..  :


 गडाचा पायरीमार्ग 

 गडाची पुढी व मागची  प्रवेशद्वारे 


गडावरील अवशेष 


 'पुणे ट्रेक ग्रुप'चे सह्यसवंगडी 

■●■स■मा■प्त●■

 भटकंतीत आपण सर्व हे अवश्य पाळू या!

दक्षिण कोल्हापूर वर्षाभ्रमंती.. भाग.. ३  :  कलानिधीगड : 

'तुफानी पाऊस नि मनमानी धुकं, अशात सूर्यही उगवण्या लाजतो जिथं;
वर्षाभ्रमंती ही दक्षिण कोल्हापूरची, देते भ्रमंतीचं शुद्धसुवर्णसुख इथं!'


कलानिधीगड  :

दक्षिण कोल्हापूर भ्रमंतीतील हा आमचा अखेरचा गड.. इथल्या दोन मुक्कामांतील पावसाचं गणित पाहता, दुपारी फारसा पाऊस होत नाही, या अंदाजानं आमची आजची कलनिधीगडाची भ्रमंतीही  सुखकारकच होईल, असा आमचा अंदाज होता. पाऊस आणि धुक्याच्या 'कचाट्या'त सापडल्यानं दोन्ही दिवसांच्या भल्या सकाळच्या भटकंतींनी, जरी आम्हांला  वर्षा-विहाराचा मनस्वी  आनंद लुटु दिला असला तरी, भटकंतीचा मात्र  अल्पसाच आनंद त्या देऊन गेल्या होत्या. दुपारच्या  सत्रात  पाऊस जरी अधूनमधून होत असला तरी धुकं मात्र तुलनेने खूप कमी राहिल्यानं दृष्यमानता चांगलीच मिळाली होती आणि त्यामुळंच काल सामानगड छान पाहता आला होता. आजही, आताचं  इथलं वातावरण पाहता तशीच  खात्री वाटत होती.

 गडाचा मुख्य दरवाजा 

काळ्या पाषाणातील  हा गड पायथ्यावरून नंदीसारखा दिसतो, म्हणून या गडाला काळानंदीगड असंही म्हटलं जातं. कलानिधीगडासाठी आमची गाडी पारगडहुन पुन्हा पाराळे फाट्याला लागत पाटणे-शेवाळे-आंबेवाडी फाटा मार्गे 'कालिवडे'त येऊन धडकली तेंव्हा साधारण अकराचा सुमार असेल आणि पाऊसच काय, इथं तर साधी बुरबुरही नव्हती. त्यामुळं आमचा अंदाज खरा ठरत होता. गावात जरा चौकशी केली तर उशीर झालेला असल्याने जो तो आपल्या उद्योगाला निघून गेलेला, त्यामुळं कोणी सोबतीला मिळेल याची खात्री नाही, असं समजलं. पण, महत्प्रयासाने एक 'असामी' भेटलाच. मग  त्यालाच  सोबतीला  घेऊन  आमचं  मंडळ  एकदाचं गडमार्गी लागलं.

सोबतीला हा 'दामु' मिळाला खरा आणि त्याचं बोलणंही काहीसं अडखळतं, बोबडं  होत असलं खरं, तरी  'गडी' मात्र चांगलाच उत्साही दिसला. गावाच्याच मध्यवस्तीतील घरांच्या अशाच एका बोळीतून 'बाहेर काढत' नि काही घरं, गोठे आणि अखेर गावही मागे टाकत,  शेतवडीतुन, उंच-उंच झाडांच्या साथीत अन पायवाटेतल्या पाण्याशी खेळवत, आठ-दहा मिनिटांतच त्यानं आम्हांला नव्यानं बनत असलेल्या 'चारचाकी' 'गडरस्त्या'ला आणून भिडवलं.

ओढ्याच्या नंतरची पावसाळी वाट नि स्वतःला सावरत जपवून चाललेले सवंगडी 

हा रस्ता चांगलाच रुंद होता. नव्यानं बनत असला तरी स्वरूप मात्र कच्चंच होतं. साहजिकच, तो मुरूम-मातीचाच बनत होता. चिखलमातीच्या या रस्त्याने आमची वाटचाल चालूच होती. दोनेक मिनिटांतच 'खडकशेतातला हळ्ळा' लागला. हा एक ओढा नि हे त्याचं स्थानिक नामाभिधान! पाणी विशेष नव्हतं त्यामुळं तो सहज पार झाला. पण, त्यापुढं मात्र प्रचंड गाळ  आणि चिखल लागला. त्यातून चालणं केवळ जिकिरीचंच होत होतं. मात्र, पाऊसकाळात अन कच्च्या रस्त्याला हे असं असणंही आता स्वाभाविकच आहे, असं मानून स्वतःला सांभाळत नि जपून पाय टाकत, आधीच्याच पावलांवरच शिताफीनं पावलं ठेवत, मोठ्ठेच कष्ट घेत आम्ही हे  'दिव्य'ही पार पाडलं आणि पुढील आठ-दहा मिनिटांतच आमची या फेऱ्यातून सुटका झाली.

दुतर्फा अगदी सुंदरशा झाडीच्या साथीत या वाटेने निघालेला आमचा मोर्चा पुढच्या दहाच मिनिटांत दामूनं उजव्या हाताला आतल्या एका पायवाटेला वळवला. इथलं 'विद्युत रोहित्र' ही इथून वळण्यासाठीची नेमकी खुण! आणि गडापर्यंत गेलेली वीजव्यवस्था अशीच पुढे याच वाटेने गेलेली असल्याने त्यासाठी लावलेले विजेचे खांब ही गडापर्यंतच्या वाटेची आणखी महत्वाची एक खूण!! आम्ही आता सोडलेला मोठा रस्ताही थेट गडावरच जातो, पण, लांबचा वळसा घेऊन आणि ते ही  मागच्या म्हणजे गडाच्या पश्चिम बाजूस! पण, ही पाऊलवाट मात्र जाते गडाच्या थेट मुख्य दरवाजाकडेच अन अगदी कमी वेळात! त्यामुळंच  दामूनं आमचा मोर्चा इकडं वळवला होता. 

या वाटेला भिडताच, दामूनं, इथं त्यांच्या गावची दोन 'श्रद्धास्थानं' असल्याचं आम्हाला सांगितलं. एक तिथं जवळच होतं.. त्याच नाव 'चाळोबा' तर दुसरं, थोडं दूर, डावीकडच्या 'तोफेच्या माळा'कडे. पण, दाट व कमी उंचीची झाडी व सर्वत्र असलेल्या चिखलामुळं तिथं जाणं खूप अडचणीचं असल्याचंही त्यानं सांगितलं. त्यामुळं हा बेत 'पुढच्या भेटीत' ढकलून आम्ही सरळ गडवाटेलाच  बिलगलो.


सह्यवाटेचा खानदानीपणा दर्शविणारी एकूण सहा छायाचित्रे 

प्रत्यक्षात, ही वाट म्हणजे 'खानदानी' सह्यवाट'च होती. मुरमाड मातीची अन लहानमोठ्या दगड-गोट्यांची, छोट्या-मोठ्या झाडा-झुडपांची अन गवत-पाना-फुलांचीही! पायात घुटमळणाऱ्या स्वच्छ ओहळ-ओघळांची, त्यांच्या खुळखुळ मंजुळरवाची अन साथीला पक्ष्यांच्या गोड किलबिलाटाचीही! पाचच मिनिटांत मोठमोठया दगड-तोडींच्या व्यवस्थित रचून बनलेल्या पायरीवाटेने वर चढणारं एक 'मेट', आलं. पुरुषभर उंचीचं हे 'मेट', म्हणजे छोटीशी खिंडच ती! ती पार केल्यानंतर मग एक मोकळतरी वन लागलं. ते थोडंच होतं. त्यानंतर मात्र वाट हळूहळू पांदवाटेने पुढे पुढे चढत निघाली. आता तर  झाडांच्या  मुळ्याही वाटेमध्ये येऊ घातल्या. पण, कुठे त्या अडथळा बनून तर कुठे चार-दोन पायऱ्या बनूनही ! त्यानंतर मात्र एक आठ-दहा पायऱ्या असलेला थोडा उंच टप्पाही आला. तो चढतच  आम्ही आणखी वर निघालो.

ही चढाई थोडी व साधारणच होती. त्यामुळं दमखाऊ अशी  नव्हतीच! मुळात होतीच किती ती, फारफार तर अर्ध्या-पाऊण तासाचीच! पण तेवढ्याही वेळात, दमवलं नसलं तरी तिनं आम्हाला मात्र चांगलंच मोहविलं, रिझविलं होतं. शेवटच्या पाच-सात मिनिटांत तर तिनं मस्तच  निसर्गदर्शन  घडवलं!  ते होतं उजव्या हाताचं खोलवर नि विस्तिर्ण असं  'तिल्लारी'चं हिरवंजर्द खोर!  त्यात ती  जंगमहट्टी, शिंदेवाडीसह चारेक लहानमोठी धरणं आणि दूरवर, त्या खोऱ्याच्याही  पलीकडे डावीकडे आणि थोडं उंचावर.. तो बेळगावचा येळ्ळूर तथा राजहंसगडही मोठ्या दिमाखात उभा दिसत होता. हे मात्र खरं की  तिथून  आम्हाला  जरादेखील हलू वाटत नव्हतं. पण वातावरणाच्या भीतीनं प्रथम गडावर जायचा आमचा बेत  होता. आणि, समोर, डाव्या  हाताला, जवळच पण थोडं उंचावर दिसत होती कलानिधीगडाची तटबंदी! तीही आम्हाला खुणावत होतीच. आम्ही आता लक्ष्याच्या खूपच जवळ आलेलो होतो.


लता-वेलींनी बहरलेला गडाचा दरवाजा 
आम्ही तटबंदीच्या दिशेने निघालो. आता वाटेने एक छानसा मुरका घेतला नि आम्हांला थोडं वर  चढवलं. मग एक डावी नि एक उजवी अशी दोन लहानशी वळणंही  घेतली. मग अरुंदशा पायरीवाटेने आणखी आठदहा फूट सरळ उभं चढवलं आणि.. आम्हाला  आणलं ते थेट गडाच्या मुख्य अशा गोमुखी प्रवेशद्वारातच! प्रवेशद्वार तर लहानच पण खूपच सुंदर अन आकर्षक असं होतं. दोन्ही बाजूंचे बुरुजही शाबूत होते. अन, विशेष म्हणजे हे  दरवाजा नि बुरुज, दोन्हीही, प्रचंड हिरवाईनं नटलेले होते. दोन दगडांच्या प्रत्येक भेगेतून उदयाला आलेले अनेक हिरवे हिरवे इटुकले जीव, पिटुकल्या लता-वेली आपल्या माना वेळावत आमच्याकडे जणू कुतूहलाने पाहात होते असं वाटावं इतपत नखऱ्याने  ते हलत-डुलत होते. या दोन दिवसांत अगदी पहिल्यांदाच आम्ही एका 'गडवाटे'चं हे इतकं सुंदर असं  'दृश्यसुख' अनुभवत  होतो!

या निसर्गसुंदर द्वारातून आत येताच अगदी समोरच  दृष्टीस पडतं ते.. अगदी थोडकंच पण भग्न असं बांधकाम अवशेष, त्यातही दोन तोफा ठळकपणे दिसून येतात. त्याहीपुढ दिसतं ते विस्तीर्ण असं पठार! आणि आणखी दूरवर, दूर त्या धुक्याच्या साम्राज्यात..  अंधुकसा एक मनोरा! अन त्याच्या उजवीकडे कमी उंचीची तटबंदी, तीही  चांगलीच लांबवर.. अगदी उत्तर टोकापर्यंत! अन डावीकडे, जवळच काही वाडासदृश बांधकाम रचना! आणि अगदीच  डाव्या हाताला, आपल्या बाजूच्या भिंतीलगतच 'वनमित्र संस्था, कागल'ने लावलेला एक 'गडमाहितीफलक' आपलं लक्ष वेधतो. 


गडाचा दरवाजा (आतील बाजूने), त्या समोरच्या प्रांगणात बसलेल्या तोफा  नि 'वनमित्र, कागल'ने लावलेला गडमाहितीफलक 

आणि अन समोर एक भली मोठी, वाडासदृश  पण भग्न अशी एक  वास्तु! ती काय असावी याचा विचार करीत थोडं पुढे चालत जाताच  हाताला  आपल्या दृष्टीस पडतं ते एक  मोठं  लोखंडी प्रवेशद्वार! गडाच्या मुख्य  प्रवेशद्वारापासून थेट या भग्न वास्तुपर्यंत आलेल्या भिंतीला मध्यभागी  तोडून बसवलेलं. या प्रवेशद्वारातून आत डोकावता काही आधुनिक बांधकाम रचनाही  दिसतात. आत जाऊन प्रत्यक्ष पाहता  तिथं  असतंय.. 'दूरसंचार कार्यालय, आणि गडअवशेषापैकी एक असं दारुगोळा कोठार आणि एक उंच मनोरा'! आणि मघाप्रमाणे इकडंही कार्यालयाच्या मागील बाजूस दूरवरपर्यंत दिसतंय अगदी खूप मोठ्ठ असं पठार!


गडावर सद्या असलेलं दूरसंचार कार्यालय आणि बाजूचे दारुगोळा कोठार 
हे सर्व पाहून झाल्यावर या दूरदर्शन कार्यालयाच्या आवारातून बाहेर येत आम्ही शेजारच्या भग्न वास्तूत तथा त्या वाड्यात प्रवेश केला. तेथील कक्षपद्धतीची रचना पाहता प्रथमदर्शनी तो, जसा बाहेरून वाटतो तसाच  आतूनही,  एक वाडाच वाटला. मात्र, आत जाऊन पाहता तो वाडा  नसून एक मंदिर समूह असल्याचं लक्षात येतं. पहिल्या अवशेषात आत जाण्यापूर्वीच लोखंडी खांबांच्या आधाराने एक लाकडी छत केल्याचं व  त्यास एक घंटा लटकविल्याचं दिसतं. आणखी आतल्या  भागात  डोकावता तेथील मोकळ्या अंगणात नंदी व त्यापुढे छोटं मंदिर व त्यात एक  शिवलिंग, त्यामागे शस्त्रसज्ज भैरव अन भवानी माता यांच्याही मूर्ती दृष्टीस पडतात. बाहेर गणेशाची एक देखणी मूर्तीही दिसते. लाकडी छतासमोर एक समाधीसदृश रचना व बाजूच्या चौथऱ्यावर काही अनगड देवही  दिसतात. तसंच पुढे जाता, एक द्वारहीन प्रवेशमार्ग दिसतो. इथून या वाड्याच्या बाहेर पडता येतं. हे सर्व पाहता, एवढा  मोठा बंदिस्त आणि विविध कक्षयुक्त भाग आज शिल्लक असूनही त्याची दोन्हींकडेची प्रवेशद्वारे मात्र गायब आहेत, याची खंत वाटते. 

दूरसंचार कार्यालयाजवळील वाडा वजा मन्दिर समूह 
इकडून बाहेर पडताच गडाचा विस्तीर्ण नजारा पुन्हा एकदा आपल्या नजरेसमोर येतो. थोडं पुढं निघताच एका भल्या मोठ्या खड्ड्यामध्ये दोन-तीन विहिरीही दृष्टीस पडतात. धुकं खूप नसलं तरी त्याच्या येण्या-जाण्याने अधूनमधून गडाचा नजारा दृष्टीस पडत होता, पण तो काही काळापुरताच! धुकं, पुन्हा पुन्हा आपलं राज्य प्रस्थापित करत होतं. आणि,  त्यामुळं मनोरंजनही होत होतं अन  अडथळाही!

धुकं थोडं आणखी विरळ होताच दूरवर तिकडे पूर्वेकडील तटबंदीच्या उत्तर टोकाला धुक्यात हरवलेला तो मनोरा आणि आमचं पुढं गेलेलं 'मंडळ' दिसलं. जवळ जाईतो धुकं आणखी निवळलं आणि दृष्टीस पडला गडाचा तो बुरुज नि त्यापलिकडील सृष्टीचा तो भव्यदिव्य सुंदर असा हरितनजारा!  छान वाटलं. उंचावर चढून आम्ही तो नजारा मस्त न्याहळला. त्यानंतर  थोडं छायाचित्रण झालं, थोडं खाऊ-पिऊ झालं, थोडा आरामही झाला आणि  मग आम्ही तिथून पायऱ्याने वर तटावर चढून थोडी तटफेरीही  केली. पुढचा अजून एक  बुरूजही पाह्यला. 


 गड दरवाजात आल्या आल्या  समोर परंतु दूरवर उत्तर टोकाला दर्शन देणारा मनोरा, बुरुज आणि तटबंदी 
..एवढ्यात, एवढ्यात अचानक धुकं वाढलं.. काही क्षणांत ते चांगलाच गडद झालं.. पुढच्या काही क्षणांत  ते अधिकाधिक  गडद होत गेलं. इतकं की, एकुणात दृष्यमानताही चांगलीच कमी झाली.  पण वातावरण मात्र अधिकच गूढ आणि रमणीय बनलं. हे पाहून आम्ही काहीसं गंभीर झालो. पण इकडे, इकडे मात्र अचानक 'दामु'चा उत्साह वाढला. तो आनंदाने नाचू लागला.  वास्तविक, सकाळच्या 'त्या मधुरपाना'चा 'असरबिंदू' आता, खरे तर संपायला हवा होता, पण तो चांगलाच 'उच्च' झाल्याचं आमच्या लक्षात आलं.   मग  आम्हीही त्याच्या साथीला थोडं थोडं हलू-डुलू लागलो. त्याचा उत्साह वाढवू लागलो. आता दामू तर चांगलाच मूडमध्ये येत 'व्दिगुणित' झाला होता आणि नाचण्याबरोबर गाऊही लागला होता. आता धुकं इतकं होत की,  आम्ही आणि दामू याशिवाय एकमेकांना काहीही दिसत नव्हतं.  मात्र, त्याहीपेक्षा दाट नि अफाट दामूचं  अंतरंग होतं.  पुढच्या अर्ध्या-पाऊण तासात त्यानं त्याच्याच आवडीची तीन गौळणगीतं, तीही संपूर्ण  अन त्याच्या विशिष्ट अशा 'शैली'त, हस्तमुद्राभिनय नि नृत्यगायनासह पेश केली.  आपल्या अंगभूत कलेचं अत्यंत सुरम्य  असं दर्शन घडवित त्यानं  आम्हाला खुश तर केलंच पण स्वतःही प्रचंड आनंदित झाला. 





चांगलंच मनोरंजन झाल्यानं आम्ही बेहद खुश झालो.  दामू तर प्रचंड  खुश होता. या आनंदातिशयात अत्यंत खुश होत आम्ही त्याला भरपूर बक्षिसी देऊ केली.  त्याचं प्रचंड कौतुक केलं. सकाळी आमच्या लेखी असलेला एक  'अंमल'दार आता एक 'फौजदार' झाला होता. आजचा आमचा 'उत्सवमूर्ती' बनला होता. आमच्या  आयुष्यभराच्या 'भटकंती-स्मरण-कुपी'त एक अध्याय बनून साठवला गेला होता.. आता जो तो दामूभोवतीच घुटमळत  होता.


कोल्हापूर वर्षा-ब्रामंतीतील आमचे सवंगडी 

धुकं मात्र अजूनही यथेच्छ दाटतच होतं. आम्ही अजून थोडी वाट पाहिली पण ते विरळ होण्याचं नाव काही घेत नव्हतं. आणि, तसं होण्याची काही लक्षणंही नाहीत, या शंकेस दामूनंही दुजोरा दिला. आणि मग, दोन समूह-छायाचित्रे काढून घेत, नाईलाजास्तव, आम्ही आमची गडफेरी आटोपती घेतली.  अपूर्ण गडफेरीचं 'दु:ख'  दामुच्या नृत्य-गायनाच्या आनंदात 'बुडवून' टाकीत आम्ही परतीसाठी उतराईला भिडलो.

गडाचा मुख्य दरवाजा लागण्यापूर्वीच चढाईवेळी उजव्या हाताला दिसणारं निसर्गसुंदर  तिल्लारीचं खोरं!

उतराई करताना आता आपल्या डावीकडे असलेलं मघाचं  ते छानसं खोरं पुन्हा आपलं लक्ष वेधतं. हे खोरं, जे की आपण येतानाही पाहिलं होतं आणि ते उतरताना पाहायचं असंही ठरवलं होतं. हे असतंय 'तिल्लारीचं खोरं'! चंदगड तालुका नि कोल्हापूर जिल्ह्याचं शेवटचं टोक असलेलं हे खोरं अतिशय रम्य  असंच आहे. या परिसरातील हे एक उत्तम पर्यटनस्थळ असून इथलं 'ग्रीनव्हॅली' केंद्र तथा 'स्वपवेल टोक' हे प्रतिमहाबळेश्वर म्हणून प्रचंड प्रसिद्ध आहे.

गडवाटेपासून थोडं खाली उतरून हे खोरं निवांत निरखणं हे या ऋतूत तर स्वर्गसुखच! आम्हीही इथं थोडं थांबून नजरेनेच संपुर्ण खोऱ्याची सैर केली नि पुन्हा उतरणीला लागलो. उर्वरित संपूर्ण वाटेत 'दामू' हाच एकमेव चर्चेचा विषय राहिला होता. तासाभरातच आम्ही गावात, गाडीपर्यंत पोहोचलो. आता सरळ पुणे हा परतीचा प्रवास असल्याने कपडेही बदलून घेतले. दामू मात्र इथंपर्यंत आम्हाला निरोप देण्यास आला होता. त्याला जवळचा थोडा खाऊ नि पुन्हा वाढीव बिदागी देत आणि त्याच्याकडून 'अंमलदारकी' सोडण्याचं वचन घेतच आम्ही त्याला गोड निरोप दिला नि आमचा परतीचा मार्ग पकडला.

----xxx----xxx----xxx----

भाग १ ते ३ समाप्त.. 

■●■स■मा■प्त●■

 भटकंतीत आपण सर्व हे अवश्य पाळू या!


http://ishwargaikwad.blogspot.com/


No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...