Thursday, December 30, 2021

उपांड्या घाट आणि खुट्याची वाट

http://simplyatin.blogspot.com/2020/07/blog-post_11.html

अमाप गड-किल्ले, पठारं अन प्राचीन मंदिरं लाभलेल्या पुणे जिल्ह्याचा कोकणात पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या बंदरांशी ही तेवढाच जवळचा संबंध. परदेशातून येणार माल घाटावरच्या पैठण, मिरज इत्यादी बाजारपेठांत यायचा तो पुणे जिल्ह्यातल्या घाट-वाटा ओलांडूनच. अन मग ओघाने आली ती भरभराट अन समृद्धी. तर अश्या या पुणे जिल्ह्याच्या पश्चिम अन दक्षिण सीमेवर असलेल्या मुलुखात आज आपली भटकंती आहे. 

जुलै महिन्यातला दणाणून पडणारा पाऊस आज जरा शांत वाटत होता. मस्त दुलई ओढून ताणून द्यायच्या दिवसात सौरभ, प्रसन्न, आगटे, गणेश, रुपेश आणि मी इत्यादी सवंगडी काही आडवाटेवरच्या भटकंतीला निघालो होतो. रात्रभरचा प्रवास, अर्धवट झोप, भुकेलेलं पोट अन पेंगुळलेले डोळे असं सगळं सहन करत भोरच्या ओलेत्या गारठ्यात आम्ही चेलाडी फाटा अर्थात नसरापूर फाट्याला उतरलो. पहाटे ५ चा सुमार. आडोश्याला एक शेड बघितली आणि कोरडा कोपरा पकडून उजाडायची वाट बघू लागलो. जीप मिळून वेल्ह्यात पोचे पर्यंत ७.३० वाजले. तोरणा विहार च्या कदम काकांकडे पोचलो आणि त्यांना मस्त गरम न्याहारी ची व्यवस्था सांगितली अन पहिले चहा द्या म्हणून विनंती केली. जवळपास चौकशी केल्यावर कळलं, उपांड्या घाटाच्या सुरुवातीला असलेल्या केळद ला पोचायला आणखी एक जीप करावी लागेल. 

अशी मजल दरमजल करत शेवटी घाटाला मार्गी लागायला सकाळचे ९.३० वाजले. वातावरण आल्हाददायक होतं. सुरुवातीलाच कानंदी नदी चं पात्र ओलांडावं लागतं अन मग आपण धारमाथ्याकडे चालू लागतो.



वाटेत विविध रानफुलांनी मोजक्या सुर्यप्रकाशाचं चीज करत नवी इनिंग सुरु केली होती. सह्याद्रीत ऑगस्ट महिन्यापासून ठिकठिकाणी अशी सुंदर नाजूक उमलतात. उण्यापुऱ्या काही दिवस/आठवड्याचं आयुष्य पण भरभरून देतात अन चराचरातील सृष्टी बहारदार करून टाकतात. 
 

आणखी एक ठिकाणी नजर गेली तर निसर्गाने जणू सह्याद्रीला मोतीहार अर्पण केला होता. 


केळद पासून धारेवर पोचायला जेमतेम १५-२० मिनटं पुरे. वाट आजही बऱ्यापैकी प्रचलित दिसते. रुंद ठळक पायवाट अन अधून मधून प्लास्टिक ची वेष्टनं. 


धारेवर अप्रतिम नजारा उलगडला. धुक्यात हरवलेलं शिवथर नदीचं खोरं एकदम स्पष्ट दिसू लागलं. 


थोडं इकडे-तिकडे पाहताच घाटाची सुरुवात सहज मिळाली. डावीकडे डोंगर अन उजवीकडे दरी अश्या पद्धतीने अरुंद पण सुरक्षित वाट टप्प्या टप्प्याने खाली उतरू लागली. 



पश्चिमेला वळणं वळणं घेत गेलेली शिवथर नदी अन दूरवर महाड आद्योगिक क्षेत्र. 



इथून घाटाच्या साधारण संरचनेचा उत्तम अंदाज येतो. माथ्यापासून आडवी जात, खाली उतरलेली पायवाट पदरात घेऊन जाते. पदरातल्या कर्णवडी पासून खाली कोकणात पुन्हा एक टप्पा उतरावा लागतो. 




गुगुळशी चा कडा आता एकदम आभाळात गेला होता. अन त्याची दमदार उंची फारच भन्नाट वाटत होती. इथे अशी दंतकथा आहे शिवरायांनी इथे तटबंदी करून गडकोट बांधायचं ठरवलं होतं. जागेची पाहणी करायला आले असताना एका सश्याने इथून कडेलोट करून घेतला. हा अपशकुन मानून छत्रपतींनी तो मनसुबा तसाच सोडून दिला. 



वाटेत दिसलेला हा गतकाळातील चुन्याचा घाणा 


सह्याद्रीच्या पदरात अलगद वसलेलं, मोजक्याच वस्तीच कर्णवडी. गाव ओलांडताना मागून कोणीतरी हाक मारल्यासारखं वाटल्यानं सहज मागे वळून पाहिलं तर एक पोरगं दुधाची किटली घेऊन आला होता - कढी पिता का विचारायला. घाट उतरतांना कोणी कढी विचारणं या सारखं भारी काय असणार. ३-४ ग्लास रिचवत पुढच्या मार्गी लागलो. 


पाऊस थांबताच वातावरणातील धुळीचा कण अन कण खाली बसतो अन हवा अतिशय स्वच्छ होते. अन मग असे विहंगम दृश्य बघायला मिळतं. 



खालचं वाकी अन रानवडी आता नजरेच्या टप्प्यात आलं होतं. इथून शिवथरघळ साधारण ५ किमी. 


वाटेत ashy brown prinia ची प्रचंड कलकल चाललेली ऐकली. भक्ष्यासाठी असेल किंवा पार्टनर ला.. :)


अळूच्या पानावरचे माणिक मोती.. 


गुगुळशीच्या कड्याला आता आसमंत पुरत नव्हता एवढा वर गेलेला. 


वाटेत रस्त्याला एक कॉमन क्रो निवांत पहुडलं होतं. 


रस्त्याला लागताच एक टमटम मिळून आम्ही वेळेत शिवथरघळ ला पोहोचलो. शिवथरघळ च्या जागेला एक विलक्षण वलय आहे. धो धो कोसळणाऱ्या त्या जलौघाच्या कुशीत ध्यानस्थ बसायची कुवत राखायची म्हणजे फारच मानसिक तयारी लागत असावी. नवागतांकरता, शिवथरघळ ही छत्रपती शिवरायांचे गुरु समर्थ रामदास स्वामी यांची साधना करायच्या काही जागांपैकी एक जागा होती. इथे दोघांच्या भेटी झाल्याचेही काही उल्लेख आहेत. अर्थात रायगड काय स्वराज्याची पहिली राजधानी राजगड काय, दोहोंपासून म्हंटलं तर दिवसभराच्या दौडीवर हे ठिकाण आहे. 

देवावर विश्वास असो अथवा नसो, इथली शांतता अन धीरगंभीरता आपल्याला आत्मिक समाधान नक्कीच देईल. 


जय जय रघुवीर समर्थ 


व्यवस्थापकांना विनंती करून आमच्या मुक्कामाची सोय बघितली. अर्थातच काही मूलभूत नियम आखून देऊन त्यांनी आनंदाने ती स्वीकारली. मग आम्ही गुहेत जाऊन दर्शन घेतलं अन आजूबाजूच्या देखण्या परिसराकडे नजर टाकली. घाटमाथ्याला अजूनही काही ढग रेंगाळले होते. इकडे कावळ्या किल्याला ही अधून मधून आपली हजेरी लावत होते. आहोत तोवर मजा करून घ्या सांगत जणू!



रात्री जेवायला आयतं जेवण म्हणजे मेजवानीच. मस्त फक्कड खिचडी, तुपाची धार, पापड अन ताक असा साधा चविष्ट अन पौष्टिक मेनू. पोटभर ओरपून झोपायची सोय असलेल्या हॉल मध्ये आलो. दिवसभराच्या चालण्याने किंवा आदल्या रात्रीच्या जागरणाने पण आता झोपेनं अक्षरशः गारुड केलं होतं. सकाळी उपासनेला उठायचं असल्यानं गजर लावून, फार गप्पा न मारता झोपलो. 

घळीतील दिनचर्या ही रामनामानी सुरु होते. आन्हिकं आवरून सकाळच्या उपासनेला बसलो. कधी कधी हे कठोर नियमन काही चांगल्या सवयी अंगी लावायला किती महत्वाचं आहे दाखवून देतं. उपासने नंतर न्याहारी करून आम्ही आमच्या मार्गी लागलो. आज शिवथर च्या मागच्या खुट्याच्या वाटेने वरंध परिसरातील कुंड गाव गाठायचं होतं. साधारण ३-३. ३० तासाची चढाई अन मग कच्या रस्त्यावर ५-६ किमी रपेट. 

घळीतून वर आल्यावर पहिल्या पदरात हा सुरेख धबधबा पाहिला. मन तृप्त झालं. पण सह्याद्रीच्या मनात काही आणखीच होतं. 


पदरातनं आज करायच्या चढाईचा पहिला अंदाज आला इथे. पदरात तर सहज पोचलो. इथे चंद्रराव मोऱ्यांच्या वाड्याचे अवशेष आहेत. त्यापलीकडे ही धार सरळ नाकासमोर वर चढते. 

सोबत आणलेला सगळा खाऊ चेपून घेतला. (अर्थात अडी-अडचणीला लागणारं थोडं फार ठेऊन). आता कुठे पोटात शांतता पसरली असं वाटलं. वाटेत शेतात काम करत असलेल्या एका कुत्र्यानं भेकर धरलं होतं. मालकीण मामी भेकर गावल्यानं खुश. आम्ही चढाई लागलो अन थोडी  उंची गाठल्यावर आभाळ मोकळं झाल्याचं पाहून मागे वळून पाहिलं. पार शेवता घाट ते अलीकडे सुखदरा पर्यंतचा सह्याद्री करकरीत दिसत होता. शेवता, भेरंड नाळ, मढे, उपांड्या, आंबेनळी, सुखदरा गोप्या घाट असे एक से एक घाट कोकणात उतरत होते. पाय हालत नव्हता. मन तर कधीच गुगुळशीच्या कड्यावर अन मढे घाटाच्या ओढ्यावर पोचलं होतं. समर्थ म्हणतात तसं अनुभूती होत होती जणू - मनासी टाकीले मागे, गतीसी तुळणा नसे।। असो. 


न राहवून कड्याचा अन बाजूच्या धबधब्याचा एक फोटो घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. 


नाकावरची चढाई चांगलाच घाम काढत होती. त्यात वातावरण दमट असल्यानं आर्द्रता फार जाणवत होती. वाटेत एक सोपा कातळटप्पा आला. तो त्यावर ठोकलेल्या खुट्याच्या साह्याने सहज पार करता आला. खुट्याच्या घाटाचं नावाचं प्रायोजन आम्हाला आता कळलं. चढाई संपवून वर आलो तर एक आणखी विलक्षण जागा दृष्टीस पडली  

शिवथर च्या धबधब्याला भर घालणारा हा वरचा धबधबा तितकाच किंबहुना काकणभर सरसच! 


पटकन एक चमूचित्र काढून पुढची हलकी चढाई पार करत कुंड ला पोहोचलो. इथे आल्यावर अंदाज आलाच कि पुढे चालत वरंध्यात धारमंडपला जावं लागणार. सकाळी ०८.३० ला सुरु केलेली चढाई कुंड येस्तोवर ११. ३० वाजले. दांडाने नाकासमोर चाल असल्याने उंची भराभर गाठता आली. 


कुंडच्या आजूबाजूच्या वाटेत हा असा भाताचा तरवा दिसल्यानं तेवढंच जरा नेत्रसुख. 


कावळा किल्ला अन त्याचा न्हवंदिन सुळका आता खाली दरीत दिसायला लागले होते. 


मुख्य रस्त्यावर आल्यावर यासारखं भारी काही वाटलं नाही... :D 



मुंबई पासून साधारण २००-२५० किमी च्या परिघात सह्याद्रीत काही अतिशय दणकट घाटवाटा आहेत. काहींच्या नशिबात दुर्लक्ष, एकटेपण तर काहींच्या नशिबात डांबरीकरण. काहींच्या नशिबात पुन्हा बहरलेलं जंगल तर काहींच्या अंगांवर प्लॉटिंग चे ओरखडे.  तरीही आमच्या सारख्या आल्या गेल्या  हौशी भटक्यांना या घाटवाटा अस्सल अनुभव आजही देत राहतात. इथे मिळत राहते ते खूप वर्ष टिकतं. 



White dotted line - our walking path
Blue line - vehicle path
Yellow dotted line - निसणी trail offshoot 

सह्याद्री - युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांपैकी एक असून जैव-विविधतेतल्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्व.  
चालोनि जाणावे। जाणोनि चालावे।आपुले म्हणोनि राखावे। सकळ वन।।

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...