Sunday, December 12, 2021

पेमगिरी :

 


संध्याकाळ होत  आलेली. आजच आमची अहमदनगर  जिल्हा भटकंती मोहीम सुरु झालेली होती. अगदी  सकाळी सकाळीच  बहादुरगड तथा धर्मगड, मग  श्रीगोंदे शहरातील भुईकोट, त्यानंतर अहमदनगर शहरामधील भुईकोट नि पाठोपाठ किल्ले मांजरसुंभा अन  बाजूचे कानिफनाथ देवस्थान येथील देवदर्शन आटोपून आम्ही आजच्या दिवशीच्या  भटकंतीची  सांगता केलेलीच होती. कानिफनाथ मंदिराकडून परतताना सायंकालचा तो रम्य सुर्यास्त आणि त्या तांबुस सोनेरी रंगछटेच्या  पार्श्वभूमीवर तो मांजरसुंभा गड न्याहळतच आम्ही तो परिसर मांगे टाकला होता.  साहजिकच, आता आजचा  मुक्काम इथं तिथं करण्याऐवजी  पुढच्या गडपायथ्याला वा शक्यतो गडावरच करावा या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी आम्ही  दुसऱ्या दिवशीच्या नियोजनातील पहिल्या  किल्ल्यासाठी  आमची धाव त्या  गडरस्त्याकडे वळवली.

सुर्यास्त तर मांजरसुंभ्यालाच न्याहाळून झालेला. तेंव्हा मध्येच कुठे तरी  एक ठिकाणी रात्रीच्या जेवणाचे नियोजन करून  आम्ही गडपायथ्याचे गावापर्यँत  पोहोचलो होतो. इथवर येईतो अंधार चांगलाच झाला असल्याने गावात कुणी जागे वा  रस्त्यावर   कुणी फिरताना दिसले  नाही म्हणून मग  गावात  इतरत्र कुठे  जागेचा शोध घेण्याऐवजी आम्ही गाडी थेट गडरस्त्यालाच घातली नि डोंगर-माळरानाच्या त्या उजाड़ परिसरातील वळणावळणाने पण छानशा अशा डांबरी सडकेने तो रस्ता पार करीत थेट  गडमाथा गाठला. इथे तिथे जागाच शोधत होतो; एवढ्यात, नशिबात थोडा 'वाद' मांडूनच ठेवलेला होता की काय माहित; पण, तिथल्या त्या हिंदीभाषिक 'बाबां'नी तर तो थेट सरपंचांपर्यंतही  पोहोचवला. पण, सुदैवाने  पेमाईदेवीकृपेने अन सरपंचांच्या सुचनेनुसार  पाचच मिनिटांत तिथल्या  खोल्यांची चावी   त्या 'बाबां'च्या मदतनिसाकरवी  आमच्या हाती आली आणि आम्ही धन्य होत एकदाचा सुटकेचा निश्वास टाकला.

पण.. त्यानंतरही बराच  वेळ 'नाखूष'बाबांच्या त्या चालूच राहिलेल्या 'भुणभुणण्या'तच  आम्ही थकलेले जीव केंव्हा झोपी गेलो  ते कळलेदेखील नाही. सकाळी जाग आली तीही  पुन्हा त्या बाबांच्या 'उच्चरवा'नेच!  पण यावेळी त्यात काहीसा ओलावा होता.. का कोणास ठाऊक, थोडासा मायेचा गंधही होता. आणि मग,आम्हीही जले गेले विसरुन  त्यांच्याकडून आलेल्या त्या  हाकेस साद देत मिळालेल्या  'काली चाय'चे आमंत्रणही स्नेहाने  स्वीकारले आणि  पहाटेचा तो साजिरा प्रहर त्या  'खुशबाबां'च्या 'कुटी'तच  गोजिरा केला. बाबांच्या हाकेने  अपेक्षेपेक्षा  जरा लवकरच आवरल्याने आम्हीही  त्या संधीचे सोने करीत  भल्या सकाळीच  गडफेरी हाती घेतली.

 ●◆●◆●◆●


पेमगिरी किल्ल्याचे एक मनमोहक दृश्य

पेमगिरी.. सुमारे ३५००  लोकसंख्या असलेले हे गाव..  एकेकाळी 'बांगड्यांच्या,    निर्मितीसाठी चांगलेच प्रसिद्ध होतं. पूर्वी येथे भरपूर प्रमाणात पानमळेही होते. जुन्याकाळी या गावाजवळील चुन्याच्या खाणीही प्रसिद्ध होत्या. येथील  बाळेश्वर  डोंगररांग  ही    चुनखडकांच्या  स्तरांनी युक्त आहे.   त्याकाळी इथल्या  चुन्यात 'येळुशीच्या दऱ्या'तील 'पेमगिरी' कंद चुना प्रसिद्ध होता आणि याच येळुशी दऱ्यात अभ्यासकांना जीवाश्मही सापडली होती. आज  मात्र  इथं लिंबाच्या व सिताफळाच्या बागा खुप मोठ्या प्रमाणात दिसतात. पेमगिरीच्या चहूबाजूंनी उंच उंच डोंगर असल्याने इथली प्रसन्न हिरवाई व यातील मनमोहक धबधबे अगदी मनमोहक असेच आहेत. मात्र, आज  हे  गाव    जगात   ओळखले  जाते  ते  येथे   अडीच एकरामध्ये  वसलेल्या  अतिशय  जुन्या  अशा  एका वटवृक्षामुळे!  या गावातच   एक जुनी  पायऱ्यांची विहीरही  असून  तीत   एक शिलालेखही  आहे. त्याबाबतचा अधिक तपशील पुढे येईलच.


पेमगिरी किल्ल्याचे आणखी  एक मनमोहक दृश्य

तर, महाबली स्वराजसंकल्पक महाराज शहाजीराजे यांच्या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवल्याची साक्ष देणारा हा किल्ला आहे.. अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात. संगमनेर-अकोले रस्त्यावर कळस नावाचं गाव आहे. या गावातून डावीकडे जाणारा रस्ता थेट पेमगिरी गावात जातो. इथून हे अंतर साधारण दहा कि.मी. आहे. किल्ल्यावर पंचक्रोशीचे दैवत व गडदेवता पेमादेवीची दोन मंदिरे असल्याने किल्ल्यावर जाण्यासाठी वनखात्याने किल्ल्याच्या माथ्यापर्यंत पक्का डांबरी रस्ता बनवला आहे. मूळ पायवाटेवर अवघड ठिकाणी शिड्या बसवलेल्या आहेत. समुद्रसपाटीपासून २७७२ फुट उंचीवर असणारा पेमगिरी किल्ला दक्षिणोत्तर पसरला असून किल्ल्याचे क्षेत्रफळ साधारण ५ एकरपेक्षा कमी आहे. किल्याच्या पायथ्याला ग्रामदेवतेचे देऊळ असुन या मंदिराशेजारूनच पेमगिरी किल्यावर जायची वाट सुरु होते. पायवाटेने साधारण अर्ध्या तासात आपण गडमाथ्यावर पोहोचतो. या वाटेने जाताना शेवटच्या कातळटप्यात पायऱ्या खोदलेल्या असुन त्यावरील भागात शिड्या लावलेल्या आहेत.
●◆●◆●◆●

प्रथम मातेला वंदन करूनच सुरुवात करायची, हे चहा घेतेवेळीच ठरवलं होतं; मग, तदनुसार आम्ही 'मंदिरमार्गी' झालो.


  पेमगिरी किल्ल्यावरील  पेमाई मातेचे मंदिर व् मातेची  तैलरंगात रंगविलेली मूर्ति 

पेमाई  देवीच्या   छोट्या देवळात   देवीचा  शेंदरी तांदळा  व  त्यामागे  तैलरंगात   रंगवलेली    मूर्ती आहे. या मंदिरासमोरच   सातवाहन काळातील   चार आयताकृती   पाण्याची जोडटाकी   असुन  त्यामधील दोन टाकी खांबटाकीही आहेत. या टाक्यात  पिण्यायोग्य पाणी आहे.   या टाक्यांना लागून पुढे काही अंतरावर कातळात कोरून काढलेला हौदही आहे परंतु त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या टाक्यांच्या डाव्या बाजुने पुढे गेल्यास आपणाला एक लांबलचक टाकं दृष्टीपथात पडते. 'बाळंतीणीच टाके' असा फलकही तेथे लावलेला दिसून येतो.


 बाळंतीनीचे टाके..  १ व २ 

 हे टाकं पाहुन तसेच पुढे किल्ल्याच्या दक्षिण टोकापर्यंत जाता येते. या बाजूस आपणांस एका वास्तुचा उध्वस्त चौथरा पहावयास मिळतो. इतर कुठलेही अवशेष दृष्टीस पडत नाहीत, मात्र, नसले तरी किल्ल्याचे संरक्षण करणारी बाळेश्वर डोंगररांग मात्र व्यवस्थित पहायला मिळते. गडावर सपाटी खुपच कमी असल्याने जुन्या काळी किल्यावर फारशी बांधकामे असतील असं वाटत नाही. नवीन पेमादेवी मंदिरात देवीची संगमरवरी मुर्ती बसवलेली आहे. देवीचं दर्शन घेऊन किल्ल्याच्या उत्तरेस फेरी मारता आपणास एक टेहळणी बुरुजसदृश जागा व वाटेत दोन ठिकाणी घरांच्या जोत्यांचे काही अवशेषही  बघायला मिळतात. बुरुज अस्तित्वात नसला तरी येथून दुरवरचा परीसर चांगलाच न्याहाळता येतो. येथून थोडं पुढे गेल्यावर  वनखात्याने बसवलेली लोखंडी शिडी दिसते. वाहन नसल्यासया बाजूने पायथ्यापासून चालत येताना या मार्गानेच आपला किल्ल्यात प्रवेश होतो गडावर किल्लेपणाच्या खुणा सांगणारे तटबंदी,बुरूज दरवाजा यासारखे इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाहीत; मात्र वनखात्याने बांधलेली  दोन निवाराकेंद्रे  दिसून येतात.  जुन्या मंदीरासमोर गावकऱ्यांनी नुकत्याच बांधलेल्या दोन खोल्या स्थित असुन त्यात सिमेंट आदी बरंच साहित्य असल्याने किल्ल्यावर अजूनही काही उपयोगी बांधकाम होण्याची शक्यता वाटते. सध्या येथे एक हिंदी भाषिक बाबा मुक्कामी असून स्वभावाने तो काहीसा तापट असल्याचे लगेच बोलताना दिसून येते. गडावर मुक्काम करण्यासही त्याचा विरोध असल्याचे जाणवते. परंतु, प्रकरण थोडे 'तडी'स नेल्यास मुक्काम करण्यास अडचण रहात नाही. खालील भूभाग सद्या जरी समतल नसला तरी येथे बनवलेल्या, आणखी एक, छत असलेल्या परंतु भिंतीविरहित निवाऱ्यात दहाबारा जणांची सहज सोय होऊ शकते.

हा गड भीमगड तथा शहागड म्हणूनही संबोधला जातो, असे दिसते. हा किल्ला इ.स.१२ व्या शतकात यादव राजांनी बांधला. मुर्तजा निजामशहा म्हणजेच बादशहा या किल्ल्यावर वास्तव्यास असल्याने या गडाला शहागड असे नाव पडले तर बखरीमध्ये पेमगिरीचा उल्लेख भीमगड या नावाने येतो पण पेमगिरी किल्ला इतिहासात प्रसिद्ध झाला तो केवळ शहाजीराजांच्या पराक्रमामुळेच!

गडाचा इतिहास पाहिला असता निजामशाही बुडविण्यासाठी खुद्द शहाजहान दक्षिणेत उतरला होता. त्यासाठी महाबतखान आणि त्याचा मुलगा खानजमान दौलताबाद किल्यावर चालून आले. शहाजहान या मोहिमेवर असताना मुमताजमहलचा बुऱ्हाणपूरला मृत्यू झाल्याने तो तिकडे गेला. १ मार्च १६३३ रोजी महाबतखानाने निजामशहाची राजधानी असलेल्या दौलताबाद किल्ल्याला वेढा दिला आणि १७ जून १६३३ रोजी दौलताबाद मोगलांनी जिंकले. निजाम हुसेनशहा आणि त्याचा वजीर फत्तेखान दोघेही कैदेत पडले. त्यावेळी शहाजीराजे निजामशहाकडे सरदार होते. या लढाईत शहाजीराजांनी व निजामशाहीच्या सर्व सरदारांनी दौलताबाद लढवण्याची शिकस्त केली पण पराभव झाला. मराठा सत्ता स्थापण्याची ही संधी साधुन शहाजीराजांनी आदिलशाहीतील मुरार जगदेव या सरदाराच्या मदतीने जुन्नर जवळील जीवधन किल्यामधून कैदेत असलेला निजामशाहीचा तीन वर्षांचा दुसरा वारस मुर्तजा निजाम याची सुटका करून पेमगिरी किल्यावर आणले आणि त्याला गादीवर बसवुन शहाजी महाराज निजामशहाचे वजीर झाले. शहाजीराजांनी मुर्तजा निजामशहाला स्वतःच्या मांडीवर बसवून पेमगिरीच्या गडावरून तीन वर्ष राज्यकारभार केला. मराठ्यांचे स्वतंत्र राज्य असावे, ही यामागे भावना होती. पुढे मोगलांनी आदिलशाही बरोबर तह करून निजामशाहीवर चाल केली. मोगल आणि आदिलशहाच्या संयुक्त सैन्यांशी शहाजीराजानी ६ मे १६३६ ला तह केल्यावर निजामशाहीची अखेर झाली. त्यामुळे शहाजी राजांचा हा स्वराज्याचा प्रयत्न असफल ठरला.

माता जिजाऊ शिवबा उदरी असताना याच गडावर काही दिवस राहीले असल्याचे सांगितले जाते व येथून त्या शिवनेरीवर गेल्या. तेथे पोहोचल्यानंतर तीन दिवसांनी आईजिजाऊंच्या पोटी 'स्वराज्याचा सुर्य' जन्माला आला. इ.स.१७३८ ते १७४० दरम्यान पहिले बाजीराव पेशवे व मस्तानी हेही काही काळ या गडावर वास्तव्यास होते.

संपूर्ण गड पायी भटकंती करायला दोन तास पुरेसे होतात तर गाडीने वरपर्यंत आल्यास अर्ध्या तासात गड पाहुन होतो.

हनुमान मंदीर :

पेमगिरी गावाचं ग्रामदैवत मारुती तथा हनुमानाचे इथले मंदिरही भव्य-दिव्य न अप्रतिम असून ते सन १९४२ मध्ये बांधलेले आहे, असे गावकरी सांगतात. या मंदिराचा परिसरही अत्यंत रम्य असाच आहे. गडाहून आल्यावर किंवा जाण्यापूर्वीच या हनुमंताचे अवश्य दर्शन घ्यावे.


हनुमान मंदीर ... १

हनुमान मंदीर ... २

इथल्या भटकंतीत किल्ल्याच्या पायथ्याला एक व भोवतालात एक अशी दोन विशेष अप्रुपंही आपणांस पहावयास मिळतात; ती पुढीलप्रमाणे..

.  ऐतिहासिक बारव :

पेमगिरी किल्ल्याची सैर संपवून खाली गावात उतरताच डाव्या हाताच्या रस्त्याने अगदी हाकेच्या अंतरावर आपणांस ही बारव पहावयास मिळते. ही बारव अहिल्यादेवी होळकर यांच्यावेळची असल्याचे तेथील फलक दर्शवितो. या बारवेमधील भिंतीत एक शिलालेखही आहे.


ऐतिहासिक बारव.. १


२.  विशाल वटवृक्ष :

पेमगिरीपासुन जवळच साधारण दोन कि.मी. वर 'मोरदरा' या भागात एक विशाल वटवृक्ष आहे. हा वटवृक्ष सुमारे तीनेकशे वर्षे जुना आहे; असे गावकरी सांगतात. या वृक्षाच्या मुख्य खोडाचा घेर ५८ फुट असून जवळपास एकूण ९० पारंब्यांनी या झाडाचा उत्तर - दक्षिण व्यास ३०० फुटापर्यंत तर पूर्व- पश्चिम व्यास २८० फुटांवर व्यापला आहे.


विशाल वटवृक्ष ... १

विशाल वटवृक्ष ... २

विशाल वटवृक्ष ... \३

विशाल वटवृक्ष ... ४

विशाल वटवृक्ष ... ५
यासंदर्भात एक आख्यायिकाही सांगितली जाते. खूप वर्षांपुर्वी जाकमतबाबा नावाचा एक बाबा शेळ्या चारण्यासाठी या भागात आला होता. त्यावेळी एका शेळीवर वाघाकडुन झालेल्या हल्ल्यातुन तिचा बचाव करण्यासाठी त्याने त्या वाघाशी प्रतिकार सुरु केला. या घटनेचा आरडाओरडा ऐकून जाकमतबाबाची बहीण #जाखाई तेथे आली व तीही शेळी वाचविण्यासाठी प्रयत्न करु लागली. मात्र, दुर्दैवानं यावेळी तो वाघ,  जाकमतबाबा व त्याची बहीण जाखाई या तिघांचाही मृत्यु होतो. या घटनेत वापरल्या गेलेल्या कुऱ्हाडीचा दांडाही या झाडाच्या बुंध्यात खोचलेला असल्याचे ग्रामस्थ श्रद्धापूर्वक सांगतात. या बुंध्यात आज जाकमतबाबांचे देवस्थान वसविण्यात आल्याचे पहावयास मिळते. कालौघात, या वटवृक्षाच्या फांद्या तथा पाने तोडल्यास बाबा शासन करतात, यावरही लोकांची श्रद्धा बसली. साहजिकच, त्यामुळे वृक्षतोड टळली आणि आज हा वटवृक्ष सुमारे अडीच एकरमध्ये पसरलेला आपणांस दिसून येतो. एवढेच नव्हेतर आजमितीला अख्ख्या महाराष्ट्रात हा सर्वांत विशाल वटवृक्ष असल्याचेही येथे सांगितले जाते.

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...