आज पावसाने पावसाळ्यासारखी संततधार पकडली तर. आठवणीतल्या काही ट्रेक्स बद्दल लिहून काढणं चालू ठेवावं असं वाटून आज आणखी एका भटकंती विषयी स्वतःला बोलतं केलं.
जवळपास
१० वर्षं झाली फक्त घाट वाटा फिरतोय. ह्या भटकंतीत गवसलेला सह्याद्री
हा त्याच्या अंगाखांद्यावर वर्षानुवर्षं मुक्त जीवन
जगणाऱ्या सह्य-लेकरांसारखाच भासला. प्रेमळ, निर्व्याज, रांगडा, खुशाल
अन अत्यंत निष्पक्ष. आल्या गेलेल्याच आपुलकीनं करणारा. खऱ्या अर्थानं अतिथी
देवो भव पाळणारा. आपण भलेही मैलभर पायपीट आणलं असलं तरी अंगणात आलेल्या
भटक्याला कळशी पुढे करणारा. काबाडकष्ट करून पिकवलेलं अन्न भाव न करता
गरमगरम आमच्या ताटात वाढणारा. घाटाने पायी आलाय कळल्यावर विठ्ठल
भेटल्याचे भाव येणारा अन लागोलाग गरम पाण्याची बदली हात-पाय धुवायला घ्या
म्हणून पुढे करणारा अन मर्यादित गरजा अन अमर्याद सुख लाभलेल्या
रानातल्या ताडी - माडी सारख्या गमती - घ्या हो, काही होत नाही म्हणत पुढे
करणारा.
अश्याच
एका आषाढ महिन्यात गणेश, अप्पा, निरंजन इ. मित्र-मंडळी खोपोली पाली
रस्त्याला समांतर धावणाऱ्या सह्य-धारेत भटकायला निघालो. माण खोऱ्यातनं
घाटावर एका वाटेने जाऊन सहाराहून खाली येणाऱ्या एखाद वाटेने परत असा साधा
सोपा प्लॅन.पहाटे खोपोली पर्यंत लोकल अन मग जांभूळपाड्या ला एस टी अन तिथून
पुढे गणेश कडल्या चार-चाकी ने पायथ्याला. वाटेत खोपोली ला न्याहारी उरकली.
जांभूळपाड्यात पोहोचेपर्यंत अन वाटेला लागायला १० वाजले होते.
पण ऊन लागण्याची चिंता नव्हती. किंबहुना मुक्कामाला कोरडी जागा मिळेल ना हा
प्रश्न समोर होता.
आमच्या
पैकी गणेश चं जांभुळपाडा हे होम ग्राउंड. त्याच्या माहितीतल्या एका
मामांना घेऊन वासुंडे घाटाच्या मार्गी लागलो. पावसानं खरंतर नाईट वॉचमन
येऊन दणकाउन बॅटिंग केलेली. अन एव्हाना तर सराईत फलंदाजासारखं बरसत होता.
सुरुवातीच्या ओढ्याचं क्रॉसिंग बघूनच अंदाज आला होता कि पुढे मामा म्हणतायत
तो ओढा ओलांडायला अडचण येऊ शकते. सराईत फिरणारे असल्यानं विशेष अडचण
नव्हती. शिवाय जागेवर पोचल्यावर बघू असं ठरवून आम्ही चालू लागलो.
सुरवातीच्या समतल
चढाई नंतर एक छोटासा तीव्र चढाईचा टप्पा पार करून आम्ही मोकळवनात पोचलो.
मामांना सहज बोलतं करणं थोडं अवघड गेलं. शेठकडले (गणेश) पाहुणे असल्याने
त्यांची गडबड उडाली होती. आइस-ब्रेकिंग का काय ते झाल्यावर मामा
परिसरातल्या गमती जमती (इतर वाटा/फासे/वनसंपदा इ बद्दल) सांगू लागले.
एव्हाना आम्ही पदरात पोचलो होतो. मागे वळून बघितलं तर पूर्ण माण खोऱ्यात
ढगांनी गर्दी केली होती. जंगल फार घनदाट नसलं तरी अगदीच बोडकं पण नव्हतं.
मलबार व्हिस्टलिंग थ्रश, हळद्या, काळा बुलबुल, बार्बेट यांच्या शिट्ट्या
ऐकत तो ओढा केव्हा आला कळलं पण नाही. वाट मळलेली होतीच शिवाय चांगल्यापैकी
वावर ही होता. स. ११.३० वाजले होते.
ओढ्यापाशी
क्षणभर विश्रांती घेत मामांकडून पुढील मार्ग समजून घेतला. ओढा ओलांडून वाट
मुख्य धारेला नागमोडी चढते अन एका दांडावर माणखोऱ्यातून येणाऱ्या एका
वाटेला मिळते. पुढे साधारण पाऊण ते एक तासाच्या सोप्या चढाई ने आम्ही माथा
गाठला. दु. १ वाजला होता. इथून मामांनी आमचा निरोप घेतला. त्यांना साजेसे
कौशल्य शुल्क अन सोबत थोडं खाणं देऊन मोकळं केलं.
माथ्यावर
तुरळक झाडीचा पण उंच सखल छोट्या टेकड्यांचा भाग होता. इथे अचानक धुकं
दाटून येऊन दिशा-शोधन गंडले आणि मग घड्याळातल्या दिशा यंत्राची अन आधी
अभ्यास केलेल्या नकाशाची जुळवणी करत मार्ग शोधू लागलो. साधारण १०
मिनटात आम्ही तुलनेने सपाट माळरानात आलो होतो अन दूरवर गाड्यांचा आवाज
अधनंमधनं येत होता. आवाजाच्या दिशेनं वाटचाल चालू ठेवली अन पुढल्या १०
मिनटात आम्ही आंबी व्हॅली कडे जाणाऱ्या रस्त्यालगत येऊन पोचलो.
समोर
धुक्यात हरवलेला कोरीगड नजरेस पडला. खूण पटली - आम्ही पेठ शहापूर जवळ
बाहेर पडलो तर ! रस्त्यात २-४ वाहनांना हात दाखवून बघितले पण सगळे
कसल्यातरी घाईत होते. मग काय, सुरेख पायवाटेवर चालल्यावर डांबरी रस्त्याने
चालायचं महत्भाग्य आमच्या नशिबी होतं. दु. २.०० वाजले होते. आंबवणे इथून २
किमी होते.
वाटेत
चहाची एक टपरी बघून ब्रेक घेतला अन मग आंबवण्याला निघालो. दिवसाचं "घाटावर
पोचणे" हे महत्वाचं लक्ष्य पार झालं होतं अन अखेरचं लक्ष्य "आंबवणे"
आवाक्यात होतं. थोडक्यात काहीही घाई नव्हती :D
आंबवणे हे तसं मोठं गाव आहे. घाटमाथ्यापासून जवळ असल्यानं इथल्याही कोकणात
सोयरीक आहेत. एक घर गाठलं अन मुक्कामाला शाळा/मंदिर इत्यादी बद्दल चौकशी
केली. ज्यांना विचारपूस करत होतो त्यांचं किराणाचं घाऊक दुकान ही होतं.
सौजन्याखातर काही बारीकसारीक जिन्नस खरेदी करत त्यांना विनंती केली. जुजबी
चौकशीत आम्ही कोकणातुन घाटाने पायी आलोय कळल्यावर म्हाताऱ्याने तोंडात बोटं
घालायचं बाकी होतं. एकदम वेगळीच आपुलकी आली अन मामा म्हणाले ह्या मंदिरात
ऱ्हा कि.. वशाट (नॉनव्हेज) बनवू नका अन मंदिर हाय याचं भान ठेवा म्हणत चावी
हातावर सोपवली अन म्हणले म्या च्या घेऊन येतो तोवर बसा कोरड्याला. मंदिर
प्रशस्त आणि नवीन बांधकाम होते. ५० एक जणांची सोय सहज होईल.
मग
काय मामांसोबत चहा सोबत बाकरवडी चा फडशा पाडत गप्पा झाल्या. सोबत आणलेल्या
शिध्याची खिचडी अन सूप हा नेहमीचा खात्रीशीर मेनू मार्गी लावला. शिवाय,
दुपारचे ठेपले, मिरची अन श्रीखंड होतंच. गावात पार मध्यभागी असल्यानं आम्ही
रात्री बाहेर पडण्याच्या फंदात पडलो नाही. पावसाचे दिवस अन घाटावर
असल्यानं वातावरण मस्त गार झालं होतं.
निवांत मंदिरातच कॅरीमॅट अंथरत ताणून दिली. अर्थात उद्याची वाटेची विचारपूस
करूनच.
दिवस
दुसरा - सकाळी उठायची फार घाई नव्हती. मंदिर व्यवस्थित यावरून मिळालं तसं
स्वच्छ परत केलं अन मामांचा निरोप घेतला. गाव सधन अन सहारा जवळ असल्याने
असेल कदाचित पण यावेळी देणगी/वर्गणी वगरे विषय झाला नाही.
आंबवण्यातूनच
पश्चिमेला धारमाथा जवळ आहे. नावाप्रमाणेच शहापूर हे पेठेचं अर्थात
बाजाराचं गाव असल्यानं शहापुरात काही वाटा कोकणातून येतात तर काही
आंबवण्यात. शिवाय, आंबी व्हॅली प्रकल्पात काम करणारा कोकणातील वर्ग हा या
वाटांनी रोज वर खाली करत त्या मुळे ह्या बऱ्याच मळलेल्या वाटा. त्यातल्याच
एका - कोराई घाटाने आम्ही खाली उतरायचं ठरवलं. माथ्याला कोराई गडावर
असलेल्या कोराई देवीला जाण्याची वहिवाट म्हणून हे नाव प्रचलित असावं.
ठळक
वाट धारेवर घेऊन आली अन समोरचा ढगांचा पडदा एकदम दूर सरला अन खाली
कोकणातील मुळशी, कळंब इत्यादी गावं दिसू लागली. घाट उतरायला सुरु करायला स.
चे १० वाजले.
या वाटेलाही
पदरात वासुंड्या सारखाच एक ओढा होता. घाटाला सुरुवातीला पाथरवट सदृश वाट
आहे. जी टप्प्या टप्प्याने खालच्या जंगलात जाते अन मग पदरातल्या ओढ्याला.
इथलं
प्रकरण हे तुलनेनं जरा मोठं अन अवघड होतं. वर पाऊस वाढल्याने प्रवाहाचा
जोर ही वाढला होता. थोडं आजूबाजूला बघितल्यावर ओढ्याला एक मोठा टप्पा होता.
हे सगळं पाहता, काळजीपूर्वक मार्ग काढत ओढा ओलांडला. थोडं पुढं आल्यावर
खाली पदरातील ढाकेवस्ती नजरेत आली. स. चे ११ वाजले होते. रमतगमत उतरत
असल्यानं वेळेवर ताबा नव्हता.
ढाकेवस्ती
हि मोजक्याच २-३ घरांची रानात घर करून असलेली वाडी. इथून खाली उतरायला
जेमतेम अर्धा ते पाऊण तास.मागे वळून बघताच सह्याद्रीच्या ७० एम एम पडद्यावर
एक अप्रतिम नजारा होता. अन तो चुकवण्याइतके नतद्रष्ट आम्ही नव्हतोच.
नभ मेघांनी आक्रमियले, गिरिपर्वत उदंड जलौघ प्याले, अरण्य अवघे संतुष्ट झाले, आनंद वनभुवनीं ।।
खाली पुन्हा गणेशच्या कुटुंबीयांनी आपुलकीनी गाडी पाठवली होती मुळशीत घ्यायला. त्यांचे मनोमन आभार _/\_
वाईज
ओढ्यावर डुंबून कापडं बदलून जांभूळपाड्याला निघालो. वाटेत दीक्षितांकडे
सुग्रास मराठी शाकाहारी भोजन घेऊन श्रीखंडावर ताव मारला अन गमावलेले फॅट्स
परत मिळवले. समोर पाली कल्याण बस उभी होतीच. तडक खोपोली पर्यंत येऊन लोकल
ने घर गाठलं.
आजही
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरून असे २ दिवसाचे ट्रेक मनसोक्त भटकून,
खादाडी करून पोटभर आनंद मिळवून देतात. अत्यंत उत्तम असा शारीरिक, मानसिक
अन भावनिक व्यायाम असलेले हे ट्रेक धकाधकीच्या आठवड्यासाठी विश्रांतीच
म्हणा हवंतर.
White dotted line - our walking path
Blue line - vehicle path
Yellow dotted line - निसणी trail offshoot
सह्याद्री - युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांपैकी एक असून जैव-विविधतेतल्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्व.
चालोनि जाणावे। जाणोनि चालावे।आपुले म्हणोनि राखावे। सकळ वन।।
Sahyadri is a UNESCO bio-diversity hotspot. Its ours to care!
http://simplyatin.blogspot.com/2020/07/blog-post_5.html












No comments:
Post a Comment