Tuesday, November 22, 2022

शिदोबादार - भैरवनाथदार

 https://www.bankapure.com/2017/05/Shidobaadaar-Bhairavnaathdaar.html

मंडळ :
*निनाद

Courtesy  @निनादराव : कोकणातून शिदोबादाराकडे बघताना... 

बारटक्के
*नितीन
तिडके
*केदार
नरवाडकर
*विक्रम
पेठे
*निरंजन
भावे
*श्रवण

प्रसाद

*दत्तू 

तुपे

दिनांक : २७ मे २०१७

                          बऱ्याच दिवसांनी म्हणजेच सुमारे ८ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर घोड्याचं इंजेक्शन असलेला ट्रेक करण्यात आला... असेही मध्यंतरी इतर अनवट ट्रेक्स चालू होतेच पण त्याचा उल्लेख Social "मी-dia" वर मुद्दाम केला नाही अन्यथा पुन्हा बाजार-बुणग्यांनी तिकडेही जत्रा केली असती... असो... गुरुवर्य ढमढेरे काका आणि अनुप काका हे  गंगोत्री ३ एक्स्पिडिशन  ला गेल्यामुळे त्यांना यायला जमलं नाही... इतरांनाही सांसारिक अडचणींमुळे जमलं नाही... निनादरावांच्या डोक्यात गेली अनेक महिने हा ट्रेक घोळत होता... आता हा ट्रेक करून आल्यामुळे त्याच्या पिंडाला कावळा नक्कीचं शिवणार... हिवाळ्यात भयंकर झाडोरा माजला असल्यामुळे वाट सापडत नाही, पावसाळ्यात दरडी कोसळत असतात तर उन्हाळ्यात उष्माघात होऊ शकतो... म्हणूनचं मे महिन्याच्या शेवटी ह्या नाळा उतरणे हितावह असल्यामुळेचं आम्ही हा सिझन निवडला...

Courtesy @निनादराव : ढगाळ वातावरण... 

                         ठरल्याप्रमाणे भल्या पहाटे ०४:१२ AM IST ला दोन्ही गाड्या सुसाट निघाल्या...  नाशिक हायवेवर एका उघड्या टपरीपाशी भरपूर आलेयुक्त गवती चहा व इतर खाद्यपदार्थ हादडले...  आणि ढगाळ वातावरणात सुमारे ०७:१२ AM IST ला पिंपळगर्णे अथवा पिंपळगरे (स्थानिक गावकऱ्यांच्या टी-शर्ट वर मागे प्रिंट केलं होतं) ह्या गावी पोचलो... वाटेत गोल्डन ओरीओल आणि असंख्य मोर दिसले... आकाशात असंख्य पक्षी दिसत असताना तेवढ्यात तिडके ने मला एक पक्षी दाखवला : तो बघ कावळा...  मी हि गाडी चालवताना उगीच त्याच्याकडे बघून का-वळा? म्हणून सोईस्कर दुर्लक्ष केलं... भावे ची गाडी आहुप्याच्या देवराई मध्ये सावलीत लावून पुन्हा माझी गाडी पिंपळगरे गावात येऊन लावली... एव्हाना निनादराव आणि केदार ने वाटाड्याची सोय करून ठेवली... बघता बघता अख्खं गाव आम्हाला "बघायला" लोटलं होतं...पण चहा पोहे आम्ही सकाळीच खाल्ले होते ;)...   कारण ह्या गावाला अजून शहरी लोकांची सवय नाही आणि त्यात आम्ही शिदोबा आणि भैरवनाथ करायला आलोय म्हटल्यावर नेहमीप्रमाणे कशाला उगा तरास करून घ्येताय वगैरे टिपिकल कॅसेट चालू झाली... मग आम्हीही त्यांना नेहमीप्रमाणेचं आमच्या भटकण्याचा कॅसेट वाजवून दाखवल्यावर एक मामा आमच्याबरोबर यायला तयार झाले... असेही आमच्याकडे प्रत्येकाने तिथल्या परिसराचा रितसर अभ्यास केल्यामुळे हरवण्याचा किंवा चुकण्याचा प्रश्नचं नव्हता... आवरा-आवरी करून आम्ही निघालो...
वेळ सकाळची ०८:२० AM...

Courtesy @निनादराव : शिदोबादार एंट्री... 
Courtesy @निनादराव : शिदोबादार... 
Courtesy @निनादराव : शिदोबादार... 


शिदोबा दार :

                        ट्रेकिंग जगतातले प्रसिद्धीपासून लांब, गुरुवर्य ढमढेरे काकांचे आणि आमचे स्नेही, अशक्य अनवट घाटवाटा करणारे, भिकनाळेला  सर्वप्रथम गवसणी घालणारे, संपूर्ण उत्तर-दक्षिण महाराष्ट्र समुद्रकिनारा-बिच ट्रेक करणारे एकमेव ज्येष्ठ ट्रेकर आणि कायम सह्याद्रीवर मनापासून प्रेम करणारे श्री. सुनील करंदीकर काका  ह्यांना  सुद्धा आमच्याबरोबर ह्या ट्रेकला येण्याची तीव्र इच्छा होती...  पण काही अपरिहार्य कारणांमुळे ते आमच्या बरोबर येऊ शकले नाहीत... त्यांना फोन करणार एवढ्यात त्यांचाच फोन खणाणला आणि आम्ही ट्रेक चालू केल्याची व इतर परिसराची माहिती दिली... त्यामुळे ते ट्रेकला आमच्याबरोबर मानसिकरित्या कायमी हजर होते...  आहुपे घाट ते त्रिगुणधरा (डोणी दार) दरम्यान दोन ज्ञात वाटा आहेत ज्या फक्त शिकाऱ्यांनी आणि लाकूडतोड्यांनी त्यांचं अस्तित्व काही प्रमाणात जपलंय आणि त्या म्हणजे शिदोबादार आणि भैरवनाथदार होय... सुमारे १० मिनिटांची Crest Line वरून चाल केल्यावर आम्ही शिदोबादाराच्या भव्य नाळेत येऊन ठाकलो... पहिली basic उतराईचं मुळी घसाऱ्या (Scree) ने सुरु झाल्यावर पुढे नाळेत किती दंगा असणार आहे हे लगेच ओळखलं... समोर उत्तरेकडे उतरणाऱ्या ह्या  नाळेच्या V आकाराच्या कॅनव्हास मध्ये  फक्त कोकणातली  उंब्रोली (खु) - दूधनोली गावं  मात्र दिसत होतं... साधारण ३००० फुटांची उभी नाळ दगडगोट्यांनी आणि घासाऱ्यांनी खचाखच भरली होती... एकदम भिकनाळेची आठवण झाली... इथेही कुठेच कचरा आढळला नाही... फक्त माकडांची विष्ठाचं काय तेवढी ती मुबलक आढळली...  सुमारे अर्धा तास गोटेआळीतून (गुरुवर्य ढमढेरे काकांचा पेटंटेड डायलॉग) उतरत खाली एका वळणावर येऊन थबकलो...  युनायटेड स्टेट्स ऑफ आंध्रप्रदेश (USA) हुन पेठेने आणलेली सफरचंद प्रत्येकी एक हाणल्यावर थोडा हुरूप आला...
वेळ सकाळची ०९:३५AM...

            Courtesy : @निरंजन भावे : शिदोबादार...
वरील फोटोस्फियर मध्ये माऊस च्या लेफ्ट क्लिक ने फोटो ३६०°  अंशात फिरवा ... 

 डावीकडच्या नाळेला डावीकडेचं ठेवत पुन्हा उजवीकडे नाळेतल्या एका दांडावरच्या वाटेवरून चढून पलीकडच्या बाजूला पोचलो... ढगाळ वातावरणातचं समोर दिसायला लागला नाणेघाटातला नानाचा अंगठा आणि जीवधन किल्ला... उजवीकडचा अजस्त्र कोकण-कडयाच्या मागे होती माडाची नाळ (त्रिगुणधरा नाळेची डावी बहीण)... आणि असाच थोडा वेळ उतरत असताना एकदम वाट उजवीकडे दुसऱ्या नाळेत उतरली... आणि चालू झाला भयंकर घसाऱ्याचा खेळ... पण घसाऱ्यावरच्या चढाई-उतराईचा दांडगा अनुभव पाठीशी असल्यामुळे घसाऱ्याची उतराई सहज पार करू शकलो... थोड्यावेळाने नाळेतून खाली पुन्हा एकदा गोटेआळी लागली... कारवीच्या झाडांचा दरवेळचा दरवळ ह्यावेळीही पसरला होता... एक दोन छोटे रॉक पॅचेस उतरून तासाभरात आम्ही नाळेच्या पदरात पोचलो... एक वाट खाली उंब्रोली (खु) - दूधनोली गावात जाते... त्याच वाटेवर शिदोबा देवस्थान आहे... पण आम्हाला भैरवनाथदार ओलांडून आहुप्याच्या देवराईमध्ये वेळेत परतायचं असल्यामुळे शिदोबानाळेलाच लांबून दंडवत घातला आणि पदरातून डावीकडे दांडावर वळालो... करंदीकर काकांना  फोन करून खाली पोचल्याची खबर दिली...
वेळ सकाळची ११:३५ AM...

Courtesy @तिडके : शिदोबादार-नाळेत एक क्षण विश्रांती... 

                     सहज मागे वळून बघितल्यावर शिदोबादाराचा अवाढव्य पसारा बघून अवाक झालो... त्रिगुणधरानाळेसारखीच शिदोबादार सुद्धा आपल्या सोबतीला ३ नाळा घेऊन खाली उतरते... क्षणभर कांदाटी खोऱ्यातल्या नाळेचीवाट आणि तेलीसरी वाटेची सुद्धा आठवण झाली... आकाशात घुसणारी त्यांची टोकं आपल्याला खाऊ कि गिळू अश्या स्वरूपात भासायला लागतात... एव्हाना उन्हाने आपलं अस्तित्व दाखवायला सुरवात केली... मजल-दरमजल करीत जात असताना अचानक कुत्र्यांचा आवाज ऐकायला आला आणि गाव जवळ असल्याची चाहूल लागली... पुढच्या अर्ध्या तासात सिद्धेश्वरवाडीत डेरेदाखल झालो... गावातल्या मावशींनी कळशीभर पाणी प्यायलं दिलं... कुठूनशी आलात वगैरे चौकशी केली आणि इथेही मावशींनी कपाळावर (स्वतःच्या) हात मारून घेतला... मामांनी तर आल्या-आल्या आंब्याच्या झाडावर चढून सुमारे पिशवीभर रायवळ आंबे काढले... मग आम्ही त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढून थोड्याफार प्रमाणात आपापल्या दाढ्या पिवळ्या करूंन घेतल्या... जेवण म्हणून भावेने  आणलेले पराठे, दही, ताक आणि दहीभातावर यथेच्छं आडवा हात मारला... बसल्या जागी थोड्यावेळ आराम केला...निघताना आमच्या सह्यमित्र  श्री. दिलीप वाटवे  : हे सुद्धा प्रसिद्धीपासून लांब राहून अनवट घाटवाटा करण्यात पटाईत आहेत  ह्यांना फोन करून भैरवनाथदाराच्या चढाईबद्दल फोन वरून थोडी माहिती घेतली कारण त्यांनी हीच नाळ मागच्या महिन्यात उतरली होती... थोड्यावेळात आवरा-आवरी करून निघालो...
वेळ दुपारची ०१:३० PM...

Courtesy @निनादराव : शिदोबादार... सिद्धेश्वरवाडीच्या अलीकडून... 

                     दूधनोली ते मिल्हे ह्या डांबरी सडकेवरून एखाद्या वडाप ने सुद्धा जायला हरकत नव्हती, पण मग हा अगदीच बाजारू लोकांचा पिकनिपछाप सदृश ट्रेक झाला असता... म्हणून तो वडाप प्रोग्रॅम कॅन्सल  करून आम्ही पदरातल्या वाटेने भैरवनाथदाराच्या तोंडापाशी जायचा निर्णय घेतला... शेवटी घोड्याचं इंजेक्शन असलेला ट्रेक बऱ्याच दिवसांनी करत असल्यामुळे आमच्या ७ BHP  इंजिनच्या स्टॅमिनाचा चांगलाचं  कस निघणार होता... सिद्धगड ते जिवधन मार्गे उत्तरेला भोजगिरी पर्यंत एकसंध पसरलेल्या सह्याद्रीच्या ह्या अखंड डोंगर-रांगेतल्या ह्या दोन अनवट नाळा एकेकाळी फक्त देशातून कोकणात दळणवळण, रोटी-बेटी व्यवहारात वापरल्या जायच्या... त्यात दोन्ही नाळांच्या तोंडापाशी स्थानिक ग्रामस्थांचं श्रद्धास्थानं (जाताना येताना प्रवास सुखरूप व्हावा म्हणून बांधलेली त्याकाळातली देवाची ठाणी) असल्यामुळे वार्षिक उरूस साठी का होईना ह्या वाटा काहीप्रमाणात आजपर्यंत तरी टिकून आहेत... असेही हल्ली देश-कोकण जोडणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि येष्टी (ST) महामंडळाच्या गाड्या आल्यामुळे ह्या घाट-वाटा हि अनवट प्रकारात मोडायला लागल्या आहेत...

Courtesy @निनादराव : केजरीवाल (छोटा) समर्थक... 


Courtesy @केदार : गोरख-मछिंद्र ... 

Courtesy @भावे : भैरवनाथदाराकडे जाताना... 

                       दुपारच्या कडक उन्हात (सुमारे ४० डिग्री टेम्परेचर) आणि कोकणातला अतिरिक्त दमटपणा ह्या वातावरणातही दोन्ही नाळांच्या पदरात असलेल्या प्रत्येक दांडाची वस्पटी करत पुढे सरकत होतो... उष्माघाताचा फार त्रास होऊ नये म्हणून झाडाखाली चक्क सावलीमध्ये पडल्यापडल्या अर्धा-पाऊण तास झोपलो... पडल्या पडल्या स्वप्ने बघितली... दुपारचा दोन-अडीचचा सुमार... सूर्यनारायण आग ओकत होते... पदरातल्या दांडांवरून चढ-उतार करताना चांगलीच तारांबळ उडत होती... असेच ३-४ दांड पालथे घातल्यावर गोरख-मछिंद्र गडाच्या समोरचं असलेल्या खोऱ्यात उतरलो... आता हि नाळ वायव्येकडे तोंड करून उतरते... ह्याच्या शेजारी पलीकडे आहुपे घाट खाली उतरतो... पदरातल्या भुरट्या जंगलात कुरटुक उर्फ कुकडूक्या (White Cheeked Barbet) एकसंथ साद घालून मनाला हलकासा आनंद देत होता... पदरातल्या जंगलातही भयंकर घसारा होताच... भैरवनाथदाराच्या खोऱ्यात उतरायला अनेक छोटे छोटे दांड उतरून चढून जावं लागलं... प्यायलेलं सगळं पाणी घामावाटे बाहेर पडत होतं... थोड्याचवेळात भैरवनाथदाराच्या तोंडापाशी पोचलो... एनर्जी साठी वितळलेली डेरीमिल्क कॅड(बी)री आणि मॅप्रोचं महाकुल सरबत प्यायल्यावर थोडीशी तरतरी आली...
वेळ संध्याकाळची ०५:२०PM ...

Courtesy @ पेठे : मॅप्रोचा मॉडेल पण वाकणार नाही... 

Courtesy @ श्रवण : भैरवनाथदार 
Courtesy @केदार  : पदरातून गोरख-मछिंद्र... 

भैरवनाथदार :
                      खालून बघताना समोर नाळेच्या टॉप ला आहुप्याची देवराई ठळकपणे दिसत होती... अभ्यासाप्रमाणे हीच ती भैरवनाथदारची नाळ... आमच्याबरोबर आलेले मामा सुद्धा कैक वर्षांपूर्वी ह्या नाळेतून फक्त अर्ध्यावरचं उतरून परतले होते... त्यामुळे हीच ती भैरवनाथदाराची नाळ असा बहूमताने सार्वजनिक शिक्कामोर्तब झाला... टिपिकल धबधब्याची वाट परिसरातील अनेक नाळांतून खाली उतरून मोठ्या ओढ्यात रूपांतर करते आणि ह्याच ओढ्यावर पुढे खोपिवली खुटरवाडी गावांसाठी पाडळे पाझर तलाव बांधला आहे... थोडाफार आराम केल्यावर संध्याकाळच्या सूर्यास्ताला नमन करून चढायला सुरवात करताना पलीकडचे गोरख-मछिंद्रगड  आमच्याकडे कौतुकाने डोकावत होते... त्यांना मनातूनच म्हणालो कि आमच्या म्हातारपणी तुमच्या अंगाखांद्यावर वसवलेले इतिहासाचे अवशेष बघायला नक्की येणार... सध्या आम्ही फक्त सह्याद्रीतल्या घाटवाटांवर फोकस आणि लक्ष केंद्रित करतोय... आशीर्वाद द्या...  एव्हाना आमच्याकडचं पाणीही संपायला आलं होतं त्यामुळे आता रेशनिंग करणं भाग होतं... नुकतीच अमावस्या होऊन गेल्यामुळे सगळ्यांनी आपापल्या टॉर्च काढल्या...

                       मजल-दरमजल करीत एकसंथ चालीने तासाभरात पहिल्या रॉकपॅच पाशी पोचलो... टिपिकल चिमणी क्लाइंब असलेला हा पॅच मुख्य नाळ सोडून उजवीकडून चढाई घेतो... आपापल्या सॅक्स वर ढकलल्या आणि सुखरूपपणे पहिला रॉकपॅच चढून आलो... एव्हाना चांगलाच अंधार पडायला लागला... केदार, निनाद आणि मामा  पुढे गेले होते... त्यांना हाका मारल्यावर मामांनी शांत राहायला सांगितलं कारण माणसांचा आवाज ऐकल्यावर वरून माकडं दग(डं)  फेकतात... मग टिपिकल "एक दुजे के लिये" चित्रपटातल्या एका 'शिन' प्रमाणे आम्ही एकमेकांशी टॉर्चच्या लाईटने बेसिक संवाद साधू लागलो... त्यांनी वरून त्यांच्या डावीकडे लाईट मारला कि आम्ही आमच्या उजवीकडे वळायचो... भयंकर घसाऱ्यात चढताना लगेच दुसरा रॉक पॅच आला आणि काही प्रमाणात चिमणीक्लाइंब सदृश असलेला पॅच ही पार केला... सलग चढाईमुळे छातीचा भाता असा काही फुलला होता कि नाकात जाणाऱ्या गवताच्या काड्या, धूळ आणि असंख्य किडे ह्यांचे अयशस्वी प्रयत्न हाणून पाडले जात होते...पाठोपाठ तिसरा आणि चौथा रॉक पॅच चढून आम्ही वर नाळेतल्या महाकाय पाषाणापाशी थांबलो... इथेही ह्या नाळेच्या V आकाराच्या कॅनव्हास वर आकाशात चंद्रकोर, आकाशातले तारे, काजवे  आणि खाली सगळी गावं लुकलुकत होती... कल्याण - नगर हायवेवरच्या गाड्यांचे दिवेही चमकत होते... तिन्हीसांजेच्या सुमारास पाडळे पाझर तलाव ओझरता दिसत होता...
वेळ संध्याकाळची ०७:२१ PM...

Courtesy @भावे : भैरवनाथदार चढताना... 

Courtesy @पेठे : भैरवनाथदार मधील एक छोटासा रॉकपॅच... 

                        आता जनरल नाळेतली चढाई चालू झाली... प्रचंड झाडोरा माजला होता आणि कारवी अस्ताव्यस्त पसरली होती... अंधारातचं टॉर्चच्या सहाय्याने उजवीकडून एका कारवीच्या बुंध्यावरून  आणि घसारायुक्त पॅचवरून पलीकडे पुन्हा नाळेत एंट्री मारली...  आहुप्याच्या देवराईवरचे एकाच लयीत चमचमणारे असंख्य काजवे दर्शवत होते कि देवराई जवळ आली आहे... सुमारे तासाभराच्या चढाईनंतर शेवटच्या पॅचला पाला - पाचोळ्यांवरून चढून वर आल्यावर आम्ही एकदाचे टॉप ला भैरवनाथमंदिरापाशी पोचलो... मंदिरावर सोलर दिवा बसवला आहे... आल्या-आल्या भावेची गाडी घेऊन मी आणि श्रवण पुन्हा माघारी पिंपळगरे गावात माझी गाडी आणायला गेलो...
वेळ रात्रीची ०८:४७ PM...

Courtesy @तिडके  : शेवटचा रॉकपॅच चढून घेतलेली क्षणभर विश्रांती... 

                      सामान आवरून पुन्हा आहुप्याच्या देवराईपाशी दोन्ही गाड्या घेऊन पोचलो... आहुप्यातचं मामांनी जेवणाची आमची सोय केली होती... गावातल्या एका मावशींनी आमच्यासाठी खास चुलीवरची तांदळाची भाकरी, झकास गरमागरम आमटी आणि भात खाल्ल्यावर तृप्तीच्या असंख्य ढेकरांनी भिमाशंकर अभयारण्यातलं गाव दणाणून सोडलं...  एव्हाना दुसऱ्या दिवशीही आहुप्याच्या देवराई मध्ये प्लॅन प्रमाणे राहणाऱ्या भावे, निनाद, तिडके, केदार आणि पेठे ने माझ्याबरोबर पुण्याला परतण्याचा निर्णय घेतला... मावशींना  मनोमन धन्यवाद देऊन पुण्याच्या वाटेला लागलो... नाशिक हायवेला पुन्हा चहा आणि सायीचं दूध प्यायलो... आणि पुण्यात रात्री आपापल्या घरी परतलो...
वेळ पहाटे ०२:३५ AM...

ठळक वैशिष्ठ्ये :
१. भयंकर घसारा आणि रॉक पॅच असलेल्या दोन्ही नाळांमधून मधून चढाई उतराई करताना चांगलंचं घोड्याचं इंजेक्शन बसलं...
२. दुपारच्या कडक उन्हातल्या पदरातल्या भुरट्या जंगलातून प्रत्येक दांडावरून वस्पटी युक्त चढाई - उतराई करताना उडालेली भंबेरी...
३. दोन्ही नाळांच्या V आकाराच्या कॅनव्हास मधून दिसलेलं मनोहारी कोकण दर्शन...
४. सलग १३ तास ट्रेक करूनही गाडी चालवून पुण्यात परतलो...
५. पिंपळगरे, सिद्धेश्वरवाडी आणि आहुप्यातल्या ग्रामस्थांचा आदरयुक्त पाहुणचार...

जरा इकडे लक्ष द्या :

  • आपण आपल्या घरात कचरा करत नाही ना … मग सह्याद्री मध्ये सुद्धा कचरा करू नका ना … !!!
  • निसर्गातल्या वन्य प्राण्यांना त्रास देऊ नका … !!!
  • बेसुमार झाडांची होणारी कत्तल थांबवा … !!!
  • सह्याद्रीतल्या कुशीत वावरताना अनाठायी वेगळ्या 'Angle' च्या Facebook Photography करण्याच्या नादात …  स्वत:चा आणि निसर्गाचा तोल सांभाळा… !!! 
  • पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देऊ नका … !!!
  • स्थानिक वाटाड्या ला आपणचं किती भारी आहोत… आपल्याला सगळ्याचं वाटा करायच्या आणि "आपण सांगू त्याच वाटेने घेऊन जाण्याचा "फालतू अट्टहास करू नये"… अश्याने स्थानिकांची मने दुखावतात व ते दुसऱ्या गिर्यारोहकांबरोबर योग्य ते सहकार्य करत नाहीत… ट्रेकिंग चे बेसिक Ethics पाळाव्यात… स्थानिक त्या भागातले राजे असतात… त्यांना तिथल्या सगळ्या गोष्टींची खबरबात  असते… तिकडे जाउन त्यांना शहरी शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न करताना…  आपलाच पाय कुऱ्हाडीवर पडतोय ह्याची थोडीशीतरी  जाणीव ठेवावी… 
  • कमर्शियल (रजिस्टर्ड आणि नॉन रजिस्टर्ड) ट्रेकिंग संस्थांनी इथे बाजार भरवण्याचा विचार सुद्धा करू नये... स्वतःच्या पोटाची खळगी भरवण्यासाठी सह्याद्रीचा होणारा ऱ्हास थांबवा व वेळीच योग्य मॅच्युरिटी दाखवा... 
  • पूर्वानुभव नसताना काहीही करून  ह्याने केली म्हणून आपणही करूया अश्या अविर्भावात एखादी अवघड नाळ / घाट / दांड / वाट करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांना अतिरिक्त पैसे देऊ नये... अश्याने त्यांना ज्यादा "मंजुरी" ची सवय लागते, व ग्रामीण तरुणांमध्ये एक प्रकारचा कॉम्प्लेक्स निर्माण होतो...  आणि मग मनाने अतिशय हळवे आणि नाकासमोर चालणारे ग्रामस्थ अचानकपणे अतिरिक्त पैश्यांच्या नादापायी मुजोर बनतात... क्लासिक एक्झाम्पल म्हणजे एकलगाव ... 
  • दोन्ही नाळांना भयंकर घसारा आणि कठीण स्वरूपाचे रॉक पॅचेस आहेत, त्यामुळे घसाऱ्याचा पूर्वानुभव असल्याशिवाय ह्या नाळांमध्ये एंट्री मारण्याचा विचार ही करू नये... 
  • स्वतःच्या आनंदासाठी ट्रेक करा... कोणाशीही कुठल्याही प्रकारची कसलीही तुलना करू नका... 
  • ट्रेक केल्याचा मानसिक आनंद घ्या आणि इतरांना ही द्या... 

ट्रेकळावे,
दत्तू तुपे.

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...