Tuesday, November 22, 2022

तांबटधार - अंगठेसरी - नाळेची वाट

 https://www.bankapure.com/2015/03/TaambatDhaar-Angthesari-NaalechiWaat.html

मंडळ :

*निनाद बारटक्के

मधोमध अर्धी अंगठेसरी, समोर नाळेची वाट आणि देवडोहाची धार, त्याच्यावर निरीपजी देवी, कांदाट आणि पर्बत्या 

*नितीन तिडके
*अनुप अचलेरे (काका)
*कौस्तुभ दातार
*केदार नरवाडकर
*विक्रम पेठे
*कुणाल वाडेकर
*दत्तू तुपे

दिनांक : ०६ मार्च २०१५ 

                           उन्हाळ्यात जंगल ट्रेक्स करायचे म्हणून…  आणि गेले कित्येक दिवस अंगठेसरी आणि मारखिंड साद घालीत होती म्हणून…  ह्यावेळेस आम्ही कांदाटी खोऱ्यात जाऊन उरलेल्या घाटवाटा उरकायच्या निष्कर्षात आलो… ठरल्याप्रमाणे संध्याकाळी ०७:३५PM ला पब्लिक दत्तू (अस्मादिक) घरी जमले… अनुपकाकांच्या  गाडीवर दत्तूच्या  जुन्या गाडीचं कॅरियर बसवून उरलेलं सामान कौस्तुभच्या गाडीत टाकून… "वेडात मराठे वीर दौडले सात" वरंध घाटाच्या दिशेने कूच झालो… १५ दिवसांपूर्वीचं मारलेल्या  चोरकणा घाट - मंगळगड  ह्या ट्रेक हून येताना सापडलेल्या हॉटेल (२४ तास सुरु) मध्ये 'रात्रीचं डिनर' उरकून घेतलं… वाटेत वाडेकर ला खेड ऐवजी पोलादपूर मध्ये उतरण्याचा 'आग्रहाचा प्रेमळ सल्ला' देऊन… वरंध घाटामार्गे निघून पहाटे पोलादपूर ला पोचलो…
वेळ पहाटेची १२:१२ AM…

Courtesy @ कुणाल वाडेकर : रात्रीची Night Photography : अप्रतिम 

                         पोलादपूर 'ठेश्नाबाहेर' गाडीतचं डासांच्या सान्निध्यात झोपायचा थोडाफार प्रयत्न झाला… गाडीच्या काचा अर्धवट बंद असूनही, शेजारच्या (कौस्तुभ) गाडीतून मजबूत घोरण्याचा आवज ऐकू येत असल्यामुळे, झोपेचे खोवलेले खोब्रे झाले… बरोबर ०२:३५ AM ला 'वाडेकर ' बुवा 'प्रकट' झाले… वाडेकर ला गाडीत कोंबून खेड च्या दिशेने सटकलो… खोपी फाट्याला डावीकडे वळल्यावर संपूर्ण रस्त्यात फक्त आमच्याच दोन  'स्विफ्टा' होत्या… गाडीतून पहाटे रघुवीर घाट चढताना कोकणातला दमटपणा चांगलाच जाणवत होता… महीमंडणगडाच्या बाजूने देशावर येताच शिवसागर जलाशयाच्या थंड हवेचा गारवा जाणवायला लागला होता… मेट शिंदी ओलांडून वलवण च्या दिशेने पुढे गेल्यावर… बराच वेळ झाला पण कौस्तुभ च्या गाडीचा पत्ता नाही… म्हणून माघारी येउन बघतो तर कौस्तुभ च्या गाडीचे पुढचे डावे टायर "पमचर" झाल्याचा  सार्वजनिक साक्षात्कार झाला… मग टायर बदलून घेतले… त्याच्यात अर्धा तास कधी गेला कळलंच नाही… पौर्णिमेच्या रात्री सुद्धा चकदेव आणि पर्बत्या ची अवाढव्यता स्पष्ट दिसत होती… पहाटे उचाट मध्ये पोचलो… गाडीतचं झोपण्याचा निर्णय घेतला…
वेळ पहाटेची ०५:३५AM…

Courtesy @ केदार नरवाडकर : कांदाट गाव आणि मागे पर्बत्या… 

दिनांक : ०७ मार्च २०१५

तांबट धार : 

                        अवघडलेल्या स्थितीतचं सकाळी ०७:१२ AM ला जाग आली… मागच्या वर्षीच्या होळी-पौर्णिमेच्या नाळेची वाट - तेली सरी च्या ट्रेक ची आठवण झाली… आवरा आवरी करून XXXX मामांबरोबर निघालो… बलोबल सकाळी ०९:१२AM ला  श्री. निरपजी देवी मंदिराच्या अलीकडे दांडावरून चढायला सुरवात केली… सकाळच्या फ्रेश मूड मध्ये तासाभरात उत्तेश्वर डोंगराच्या रांगेतल्या झाडणीच्या डोंगराच्या पदरात पोचलो… समोर झाडणी गावातल्या भैरवनाथ मंदिरावरचा भगवा तेवढाचं काय एक दाट झाडीत उठवलेला होता… पदरातून चालताना किटवडे गावाची पदोपदी आठवण होत होती… पुढच्या १० मिनिटांत झाडणी च्या मंदिरापाशी पोचलो… मंदिरात शिवपिंडी समोर नंदी आहे… एकूणच प्रशस्त असा परिसर आहे…

Courtesy @ निनाद्राव : तांबटधार… 



झाडणी गावातले मंदिर… 

झाडणी गावातले मंदिर… 
Courtesy @ निनाद्राव : झाडणी गावातलं मंदिर… 

मंदिराबाहेर ओतप्रोत भरलेली विहीर… 

                        ओतप्रोत भरलेल्या विहिरीतून पाणी भरून घेतले… मंदिरासमोरचं सकाळचा Brunch हादडला… नितीनसाहेबांनी आणलेली उकडलेली डझनभर अंडी…  केदार ने आणलेली सफरचंद, केळी… निनाद्रावांनी आणलेले डिंकाचे लाडू, मेथीचे ठेपले…  अनुप काकांनी  घरातून आणलेली पिठलं पोळी, आणि टरबूज… विक्रम ने आणलेलं दही…अश्या संमिश्र सामिष आहाराने आपापल्या टाक्या भरून घेतल्या… पलीकडे झाडणी च्या प्रेमळ गावकऱ्यांनी आग्रहाने हंडाभर अस्सल ताक दिले…गावरान ताकाची मजा काही औरचं… झाडणी आणि परिसरातली बरीच गावकरी हि गवळी समाजाची आहेत, त्यामुळे इथल्या गावांचा मुख्य धंदा हा महाबळेश्वरला जाउन दुध - तूप - खवा आणि मध विकणे होय…
वेळ सकाळची १०:३५ AM…

 ओलांडली दरी ओलांडली कि आला मधु-मकरंदगड… 

महाबळेश्वर आणि खाली मेट तळे गाव 

कोंडनाळेचं तोंड… 

अंगठेसरी च्या तोंडावरचं झाप… 

                   सोबतच्या वाटाड्या ला विचारून आणि शिवाय ग्रामस्थांना विचारून सुद्धा मारखिंड चा काही केल्या शोध लागेना… श्री. आनंद पाळंदे काका  सुद्धा बाहेरगावी गेल्यामुळे त्यांच्याशी काँटॅक्ट होऊ शकला नाही… अखेरीस गुरुवर्य ढमढेरे काकांशी सल्ला-मसलत केल्यावर मारखिंड ची खरी माहिती मिळाली… तासभर फोनाफोनी मध्ये वेळ गेला… एव्हाना ऊन वाढायला लागलं होतं… मध्ये काही घनदाट जंगल पट्टे लागले…

Courtesy @ निनाद्राव :  मधला जंगल पट्टा… 

                    अर्ध्या तासाच्या चालीनंतर समोर उत्तरेला मधु-मकरंद गड दिसला… मधली दरी ओलांडली कि लगेच आला मधु-मकरंदगड… मागच्या हिवाळ्यात मारलेल्या कोंडनाळे चं तोंड दिसत होतं…  पश्चिमेला both of the three महीपत - रसाळ - सुमार दिसत होते… त्याच्या खाली कांदोशी गाव आणि कंजळे गाव दिसत होते…  दक्षिणेला पर्बत्या उठावलेला होता,  त्याच्या खालीच कांदाटगाव, निरीपजी देवस्थान, नाळेची वाट… अश्या जागा उतरत्या क्रमाने दिसत होत्या… त्याच्या खालीच देवडोहाची धार… ईशान्येला महाबळेश्वर चा सनसेट पॉईंट आणि त्याच्या खाली मेट-तळे गाव दिसत होते…पुढच्या दहा मिनिटांत अंगठेसरी च्या तोंडापाशी असलेल्या निर्मनुष्य झापा(घर) मध्ये पोचलो… आगळ कोकम सरबत प्यायल्यावर चांगलीच तरतरी आली…  थोडावेळ आराम करून अंगठेसरी च्या मार्गाला लागलो…
वेळ दुपारची ०१:१२ PM…

Courtesy @ निनाद्राव : मधु-मकरंदगड ते उत्तेश्वर डोंगर रांगेतला सर्वात मोठा कोकणकडा… 
मधु-मकरंदगड ते उत्तेश्वर डोंगर रांगेतला सर्वात मोठा कोकणकडा… 

रसाळगड  - महीपतगड… 
मधोमध अर्धी अंगठेसरी, समोर नाळेची वाट आणि देवडोहाची धार, त्याच्यावर निरीपजी देवी, कांदाट आणि पर्बत्या… 

अंगठेसरी :

                    कोकणातल्या कंजळे / कांदोशी ते देशावरच्या झाडणी / धोडणी किंवा पलीकडे दाभे मोहन, खरोशी गावांच्या मध्ये दळण-वळण साठी अंगठेसरी चा मुख्य वापर होतो…
 झापावरून निघाल्यावर पुढच्या ५ मिनिटांत कांदोशी - बिरमणी च्या खोऱ्यातला उत्तुंग कोकणकडा बघून डोळेचं दिपले… सुमारे ३००० फुटांची सरळसोट कातळभिंत आणि तेवढीच अक्राळ-विक्राळ खोल दरी आम्हला खाऊ कि गिळू अश्या अविर्भावात भासत होती… मधुमकरंदगड - उत्तेश्वर रांगेतली ही सर्वात खोल दरी असावी… समोर महीपत-रसाळ-सुमार मोठ्या दिमाखात उभे होते…  बक्कळ फोटो काढायचा मोह आवरता घेत अंगठेसरी च्या मार्गाला लागलो…आता समोर दक्षिणेला पुन्हा पर्बत्या, निरीपजी देवस्थान आणि कांदोशी खोऱ्यातली नाळेची वाट आणि देवडोहाची धार दिसायला लागली… आम्हाला वाटलं कि नाकासमोरच्या दांडावरून थेट खाली उतरायचं असेल… पण तीव्र घसाऱ्याची वाट हळूच वसपटीतून उजवी कडे वळली…

                    कोकणातला दमटपणा, वाढतं ऊन आणि वाढती भूक आम्हाला आव्हान देत होती… तीव्र उतारावरच्या  वाळलेल्या सोनेरी गवतावरून आणि भयंकर घसाऱ्यावरून प्रत्येकजण मातीशी एकरूप होत होता…  त्यातचं गवताच्या काड्या नाकात गेल्यामुळे सटासट शिंका ही येत होत्या… हळू हळू वाट पूर्णत: उजवीकडे वळत पदरातून उत्तरेकडे गेली… एकावेळेला एकचं माणूस जाऊ शकेल अश्या अवघड वाटेवरून पलीकडे जाताना चांगलीच भंबेरी उडत होती… पुन्हा घसाऱ्यावरून वाट डावीकडे दक्षिणेला वळून एका कातळापाशी थांबली…

Courtesy @ केदार नरवाडकर : अंगठेसरी च्या पदरात… 

                                      संपूर्ण उजाड आणि उघड्या बोडक्या अंगठेसरीवर, २ तासाने एक झाड लागले … 'नऊ' जणं असून ही त्याच्या खाली थोडावेळ 'विसावा' घेतला… लिंबू सरबत पिऊन आणि सवयीप्रमाणे मुरका तोंडात ठेवून आराम केला… वाट खाली उतरल्यावर पुन्हा उजवीकडे उत्तरेला घेऊन गेली… मजबूत वसपटीतून मार्ग काढत पुन्हा दक्षिणेला वळली…  आता कांदोशी गाव दिसायला लागलं… थोड्याचवेळात धोपट वाट लागली… पुढच्या १५ मिनिटांत कांदोशी गावातलं एक झाप लागलं… तिकडे भरपूर पाणी प्यायलो…तिथेही एका प्रेमळ मामांनी आग्रहाने आम्हाला अस्सल गावरान ताक प्यायला  दिलं… थोडावेळ आराम केला…काही मंडळी दमलेली असल्यामुळे कांदाट गावात न जात इथेच कांदोशी मध्ये झोपण्याचा निर्णय झाला, व दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नाळेच्या वाटेने वर जायचं… मग दुसरा प्रस्ताव असा आला कि अनुप काका, कौस्तुभ, तिडकेसाहेब , निनाद्राव आणि मी (दत्तू) असे "पाच पांडव" मिळून नाळेच्या वाटेने वर जाउन गाडी घेऊन रघुवीर घाटाने पुन्हा खाली रात्री कांदोशी गावात यायचं… सरतेशेवटी दमलेल्या मंडळींना धीर देत पलीकडच्या झापावर गेलो… तिकडे भरपूर मेथीचे ठेपले, दही, ताक, उकडलेली अंडी, शेझवान चटणी, ब्रेड, अशी बक्कळ खादाडी केली… आणि ३.५ सेकंदांचा अखंड तृप्तीचा ढेकर देऊन कांदोशी खोरं दणाणून सोडलं…
वेळ संध्याकाळची ०६:१२ PM…

Courtesy @ निनाद्राव : अंगठेसरी… 

नाळेची वाट : 

                        भरल्या पोटाने आणि जड  अंतकरणाने चालायला सुरवात केली… एव्हाना 'रविदादा' घरी गेले होते… आणि 'पौर्णिमा चंद्रराव चांदोरकर' ची हजेरी लागली…कांदोशी खोऱ्यातल्या घनदाट जंगलातून चालत तासाभरात आम्ही नाळेच्या वाटेच्या तोंडापाशी पोचलो… आता चांदण्या रात्री चढण्याची खरी कसोटी होती… Head-Torch काढून चढायला सुरवात केली… मागच्याच होळीला ही वाट उतरलो असल्यामुळे चढताना थोडाफार अंदाज होताच… मोठ्ठाल्या खडकांतून मार्ग काढत, मजल-दरमजल सावकाश चढत होतो… कोकणातल्या दमटपणामुळे प्यायलेलं पाणी सगळं घामावाटेबाहेर पडत होतं… दर १० मिनिटांनी १ मिनिटांचा ब्रेक ह्या चाली ने चढायला लागलो… सुमारे पाऊण तासाने निनाद्रावांनी वरून आरोळी ठोकत संपूर्ण जंगलातल्या प्राण्यांना जागं केलं… दत्तू रॉकपॅच आला रे… चिंटूकसा रॉकपॅच चढत पुढच्या दहा मिनिटांत आम्ही देशावर आलो… पुन्हा रात्रीचा गारवा जाणवायला लागला…

संग्राह्य छायाचित्र @ मार्च २०१४ : नाळेची वाट 

संग्राह्य छायाचित्र @ मार्च २०१४ : नाळेची वाट 
संग्राह्य छायाचित्र @ मार्च २०१४ : नाळेची वाट 

                       निर्मनुष्य जंगलात काही ठिकाणी रातकिड्यांनी आपला वावर दर्शविला… घनदाट जंगलातून वाट, हळूहळू धबधब्याच्या पात्रात घेऊन गेली… नुकताच पाउस पडून गेल्यामुळे बघावे तिकडे बक्कळ पाणी साठलेले होते… एके ठिकाणी कुठल्याश्या मेलेल्या जनावराची मजबूत  दुर्गंधी येत होती… तेवढ्यात डबा टाकण्याच्या बहाण्याने XXXX मामा पलीकडे जाउन 'टाकून' आले…  त्यामुळे आता जंगलात वेगळाच 'वास' येऊ लागला… पाणवठ्यांच्या बाजूबाजूने चालत चालत एक छोटासा शेवटचा जंगल पट्टा पार करीत निरीपजी देवस्थानापाशी पोचलो…
वेळ रात्रीची ०९:१२PM…

संग्राह्य छायाचित्र @ मार्च २०१४ : निरीपजी देवी मंदिर… 


                       अनुपकाका, तिडकेसाहेब, कौस्तुभ,  XXXX मामा पुढे चालत गेले… डांबरी सडकेवर थोडावेळ पाठ टेकवत चांदण्या रात्री चांदण्याचं निरीक्षण करीत होतो… थोड्यावेळाने अनुपकाका  त्यांची गाडी घेऊन आले… गाडीतचं सगळ्यांना कोंबून मामांच्या घरी गेलो… आवरा-आवरी करून प्रत्येकाला "थंडा-थंडा-कुल-कुल-नवरत्न" तेलाने रगडून डोक्याची मालिश करून दिली… गरमा-गरम चुलीवरच्या आमटी-भाताने पुन्हा एकदा  ३.५ सेकंदांच्या तृप्तीच्या ढेकाराला न्याय दिला… तडक स्लिपिंग बॅग्स मध्ये स्वतःला कोंबून घेतले…
वेळ रात्रीची १०:३५ PM…

Courtesy @ निनाद्राव : निरीपजी मंदिरातील नंदी… 

दिनांक : ०८ मार्च २०१५

                       भल्या पहाटे ०७:३५AM ला जाग आली… आवरा-आवरी करेपर्यंत कौस्तुभ ने रात्रीच्या उरलेल्या भाताचा मस्त फोडणीचा भात बनवला… आयुष्यात पहिल्यांदा एवढा चविष्ट फोडणीचा भात खाल्ला असेल… तेही एवढ्या निसर्गाच्या सान्निध्यात… वाह मजा आली… मामांकडून चहा घेतला…त्यांची मंजुरी दिली…तेवढ्यात मागच्या खेपेला निरीपजी देवस्थानाचे गुरव आले आणि कोणाचीही चौकशी न करता थेट चंद्रराव मोरे आणि सध्याची कुठल्याश्या टीवी वरच्या सिरियलवरच्या 'सम्राट अशोक' च्या मालिकेशी 'असंबद्ध संबंध' बांधायला लागले… मध्येच किचक राक्षसाची गोष्ट ऐकवली… पुन्हा चंद्रराव मोरे… पुन्हा सम्राट अशोक… काहीच संदर्भ लागेना म्हणून "उशीर होतोय" चा बहाणा करून तिकडून काढता पाय घेतला…   गाड्या तडक श्री. निरीपजी देवस्थानाकडे वळवल्या… सगळ्यांना श्री. निरीपजी देवस्थान, परिसरातली देवराई, चंद्रराव मोऱ्यांच्या पडक्यावाड्याचं जोतं दाखवलं … सगळं बघून झाल्यावर पुन्हा ते गुरव कुठूनसे प्रकट झाले… पुन्हा सम्राट अशोक, किचक आणि चंद्रराव मोरे ह्यांची तीच 'कॅसेट' सुरु केली… आता खरंच गाडीच्या काचा बंद करून घेतल्या आणि तडक निघालो…

गाढीवली गावातून तापोळा येथे जाण्यासाठी तराफ्यातून केलेली सोय,  आमच्या 'स्विफ्टा'… 

                       २ तासांच्या रणरणत्या उन्हातून गाडी चालवत 'गाढीवली' ला पोचलो… तराफ्यात गाड्या टाकून पुढच्या दहा मिनिटांत तापोळा ला पोचलो… वाटेत तापोळा ला 'दुपारचे Lunch'  उरकले… महाबळेश्वरच्या गर्दीतून वाट काढत, शेंदूरजणे ला उसाचा ताजा रस प्यायलो… झाडावरून Grey Hornbill-धनेश, पोपट आणि खंड्या ने मुक्त दर्शन दिलं… संध्याकाळी पुण्यात पोचलो… कौस्तुभ ने वाडेकर ला स्वारगेट ला टाकले…
वेळ संध्याकाळची ०६:३५PM…

ठळक वैशिष्ठ्ये :

१. वाडेकरची उत्कृष्ठ अशी रात्रीची Night Photography… 
२. उत्तर कांदोशी खोऱ्यातल्या उरलेल्या सगळ्या घाटवाटांची यशस्वी चढाई-उतराई… 
३. कांदाट, झाडणी आणि कांदोशी गावातल्या गावकऱ्यांचा प्रेमळ पाहुणचार… 
४. ३००० फुटांची उघड्या बोडक्या आणि घसारायुक्त अंगठेसरी ची यशस्वी उतराई… 
५. २२०० फुटांच्या नाळेच्या वाटेची रात्रीत केलेली यशस्वी चढाई… 

६. कौस्तुभ ने बनवलेला अशक्य फोडणीचा भात… 

७. तराफ्यातून गाड्यांची सफर… 

कृपया इकडे लक्ष द्या :

  • आपण आपल्या घरात कचरा करत नाही ना  … मग सह्याद्री मध्ये सुद्धा कचरा करू नका ना … !!!
  • निसर्गातल्या वन्य प्राण्यांना त्रास देऊ नका … !!!
  • बेसुमार झाडांची होणारी कत्तल थांबवा … !!!
  • सह्याद्रीतल्या कुशीत वावरताना अनाठायी वेगळ्या 'Angle' च्या Facebook Photography करण्याच्या नादात …  स्वत:चा आणि निसर्गाचा तोल सांभाळा… !!! 
  • पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देऊ नका … !!!
  • स्थानिक वाटाड्या ला आपणचं किती भारी आहोत… आपल्याला सगळ्याचं वाटा करायच्या आणि "आपण सांगू त्याच वाटेने घेऊन जाण्याचा" फालतू अट्टहास करू नये" … अश्याने स्थानिकांची मने दुखावतात व ते दुसऱ्या गिर्यारोहकांबरोबर योग्य ते सहकार्य करत नाहीत… ट्रेकिंग चे बेसिक Ethics पाळाव्यात… स्थानिक त्या भागातले राजे असतात… त्यांना तिथल्या सगळ्या गोष्टींची खबरबात  असते… तिकडे जाउन त्यांना फुकटचा शहरी-शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न करताना…  आपलाच पाय कुऱ्हाडीवर पडतोय ह्याची थोडीशी तरी जाणीव ठेवावी… 

आणि इथे सुद्धा प्रामुख्याने लक्ष द्या : 

  • घनदाट जंगलात ट्रेकर्सने ह्या परिसरात… "होळी" निमित्त… हरवल्यावर रात्र काढण्यानिमित्त किंवा इतर कोणत्याही फालतू कारणांसाठी "कॅम्पिंग" आणि Camp-Fire करून…  ह्या जागेची वाट लावू नये… व बाजार उठवू नये अशी कळकळीची विनंती… 
  • जंगलात वाटाड्या घेऊन जाणे केव्हाही इष्ट…  हरवण्याची चिन्हे आहेत… जाताना सगळ्यांनी त्या जागेचा आणि आजूबाजूच्या परिसराचा अभ्यास करणे आवश्यक… एकाच्याच अभ्यासावर अवलंबून राहू नये … उगीच Facebook वर सवंग प्रसिद्धी पायी अनवट ठिकाणी "आम्ही कसे गेलो" आणि "वाट कसे चुकलो"… म्हणण्यात काहीच अर्थ नाही… 
  • Map Reading चा अभ्यास आवश्यक … 
  • जंगलातल्या प्राण्यांना कुठलाही त्रास देऊ नका… एखादा प्राणी सापडला म्हणून त्याचे फोटो काढण्यापायी हल्ला ओढवून घेण्याची शक्यता असते… हातात काठी असावी… पण फक्त स्व-सरंक्षणार्थचं उपयोग करावा… 
  • घनदाट जंगलात हुल्लडबाजी करून शांततेचा भंग करू नये…
  • बाजार उठवू नये… 
  • अंगठेसरी घाटवाटेला उन्हाळ्यात प्रचंड Dehyadration होण्याची शक्यता आहे… भरपूर पाणी आणि भरपूर अनुभव असल्याशिवाय जाणे टाळा… खास करून नवख्याने उन्हाळ्यात जाणे टाळावे… 

ट्रेकळावे,

दत्तू तुपे.

No comments:

Post a Comment

किल्ले बहुला.

 आयुष्यात पाहिल्यांदा आपल्या आर्मीला घाबरून जीव मुठीत धरून केलेला एक अविस्मरणीय ट्रेक - किल्ले बहुला.   ✍️ मेघन तारिहाळकर पाटील (चौफेर भटकंत...