Tuesday, November 22, 2022

गोठ लेण ,भादसकोंड गुंफा

 https://www.bankapure.com/2014/12/GotheCave-BhaadaskhondCaves-MaanCave.html

मंडळ :

* साईप्रकाश बेलसरे

गोठे लेणं … 
  

दिनांक : ३० डिसेंबर २०१४

                         अमेरिकेत क्लायंट ला ख्रिसमस ची सुट्टी असल्यामुळे ऑफिस ला शून्य काम होते… विकिमॅपिया वर खेळत असताना हिंजवडी च्या आसपास काही प्राचीन गोष्टींचा सुगावा लागला… लागलीच साईप्रकाश ला फोन केल्यावर त्याने मुळशी च्या खोऱ्यातल्या काही अनवट लेण्यांची माहिती दिली… 

B.E Electronics असूनही हौसेखातर, आवडीमुळे आणि स्व-खुशीने M.A Indology केलेल्या साईली  कडून मिळेल तेवढी माहिती मिळवली…  कुठलाही ट्रेक / सहल हा सोलो करायचा नाही ह्या 'दत्वां'मुळे( दत्तू ची तत्व) साईप्रकाश ला विचारले असता… अनमोल खजिना बघायला मिळणार म्हटल्यावर साहेब एका पायावर यायला तयार झाले… 

कुंडलिका खोरं … 
                           

साईप्रकाश ची गाडी माझ्या ऑफिस मध्ये लावून पेट्रोल भरून निघालो… बऱ्याच दिवसांनी वाटेत ट्रेकिंग च्या गप्पांना उधाण आले होते… ताम्हिणी च्या अलीकडे हॉटेल 'क्विक-बाईट' मध्ये "सकाळचा Breakfast" उरकून घेतला… मग लोणावळा फाटा ओलांडून अजस्त्र अश्या कुंडलिका खोऱ्याचे दर्शन घेतले… समोर च्या अंधारबनाचे जंगल खुणावत होते… उत्तरेला सिनेर खिंड दिसत होती… फोटोग्राफी उरकून पुढे जात असतानाच … थोड्याचवेळात गोठे गावी पोचलो… तिकडे XXXX नावाचे एक गृहस्थ भेटले… त्यांनी आम्हाला गुहा - लेणं दाखवायला तयारी दाखवली…

अंधारबन आणि खाली कुंडलिका खोरं… 

         

गोठे लेणं : 

                      

 अर्धा  तास देशमुखांच्या शेताडीतून चालल्यानंतर… दाट कारवीच्या बनातून घुसाघुशी करत… थोडासा चढ चढत आम्ही गोठे गुहा - लेण्यापाशी पोचलो… भैरोबाच्या डोंगरातली…  सुमारे अडीचशे पान सहज उठेल एवढी प्रशस्त आणि अर्धवट कोरलेली गुहा बघून चाटचं पडलो… छप्परावर ठिक-ठिकाणी छन्नी -हातोड्याचे घाव  दिसत होते… डाव्या बाजूला अर्धवट तुटलेल्या अवस्थेत एक बसायचा बेंच होता… गुहेच्या मधोमध पाटा-वरवंटा ठेवला आहे… त्याच्या वरच्या दगडावर शेंदूर फासलेला आहे… दोन तेलाच्या रिकाम्या पणत्या आहेत… स्थानिक गावकऱ्यांनी त्याला देवत्वाचे रूप दिले आहे… अतिशय अनवट आणि अप्रतिम गुहा बघितल्यावर सुमारे १२ मिनीटं स्वस्थ आणि ध्यानस्थ बसून राहिलो… कुठेही कचरा नाही… पांचट सहलीकरांच्या कुठे खाणा-खुणा नाहीत… वाह… जबरी… नशीब त्या गुहेचं…            

गोठे लेणं… 

सन २००० मध्ये श्री. विक्रम मराठे  ह्या पुण्याच्या Indologist ने हि गुहा प्रथम शोधून काढली आहे… 
संदर्भ साभार : सौ. साईली पलांडे - दातार  

स्थानिक गावकऱ्यांनी पुजलेला पाटा - वरवंटा… 
गोठे लेणं… 

                  साईने कांदा चिरून अप्रतिम 'घरघुती भेळ' बनवली… मला एकदम वासोटा-नागेश्वर ट्रेक ची आठवण झाली… आवरा - आवरी करून निघालो आणि २० मिनिटांत पुन्हा गावात डेरे-दाखल झालो… XXXX मामांची मंजुरी दिली आणि पुढच्या लेण्यांच्या दिशेने निघालो… 

वेळ दुपारची १२:४७ PM … 

कैलासगड आणि त्याच्या पोटातलं  भादसकोंडा लेणं… 

भादसकोंडा गुहा - लेणं : 

                               कैलासगडाच्या दिशेने निघाल्यावर भादसकोंड नावाच्या गावात पोचलो… थोडीफार चौकशी केल्यावर एका मामांनी आम्हाला गुहेची दिशा दाखवली… रस्त्यावरचं गाडी लावून… फक्त कॅमेरा आणि पाण्याची बाटली घेऊन आम्ही निघालो… मोजुन ३.५ मिनिटांत लेण्यापाशी पोचलो… लेणी कसली… हे तर विहारचं… उजव्या बाजूला कोरलेली एक खोली आहे… त्याच्यावर झोपायला / बसायला रीतसर बाकडं आहे… देवत्वाचे कुठेही अवशेष सापडले नाहीत… इथे मात्र स्थानिकांनीच केलेला कचरा आढळला… कासवाच्या पाठीचे कवच सापडले… बहुदा मुळशी धरणातलेचं असावे…  डाव्या बाजूला रांजण ठेवतात तसं 

दिड फुटाचं खोलगट कुंड सापडलं… मृगगडाच्या मागच्या गुहेत पण असेच ३ कुंड आहेत… भादसकोंड लेण्याच्या डाव्याबाजूला नैसर्गिक अर्धवट बुजलेल्या अवस्थेतली गुहा आहे… कैलासगडाच्या पोटात लपलेली हे विहार बहुतेकांच्या नजरेत येत नाही… 

भादसकोंड विहार… 

ऊजवीकडील विहार … 

रांजणकुंड… 
भादसकोंड विहार… 

साई ने तर "दत्तू तू पहिला असा प्राणी असशील जो कैलासगड न करता त्याच्या पोटातल्या विहार करून आला आहेस"  … असा टोला लावला… :) चालायचंच… कैलासगड पुन्हा नक्की करणार… असं सांगून मिनीटाभरात खाली  उतरलो… 


माण विहार… 

माण लेणं :

               कैलासगडला प्रदक्षिणा मारून पुन्हा निवे गावाचा फाटा ओलांडून ताम्हिणी च्या रस्त्याला लागलो… तासाभरात पिरंगुट मार्गे घोटावडे फाटा ओलांडून चांदे - नांदे चा रस्ता पकडून हिंजवडी फेज -३ च्या दिशेने माण गावात पोचलो… समोर आमच्या कंपनीची फेज -३ मधली नवीन बिल्डींग दिसत होती… आणि उर्वरित सगळ्या सिमेंट - काँक्रीट च्या जंगलाने वेढलेल्या हिंजवडी फेज -३ मधल्या कंपन्या… आणि मागे अजूनही तग धरून बसलेले उघडे बोडके डोंगर… ऑफिसहून संध्याकाळी उशिरा निघाल्यावर गर्दी लागली तर मी नेहमी चांदे-नांदे च्या रस्त्यावरून घरी जायचो… प्रत्येक वेळेस मला माण डोंगराचं लेणं दिसायचं… स्थानिक गावकऱ्यांनी त्याला बाहेरून पांढरा रंग लावून शिवाय बाहेर सोलर चा दिवा ही बसवलाय… रात्री अंधारात सुद्धा तो दिवा पेटताना खूप वेळा बघितला आहे…

माण विहार… 

माण विहार… 
सारीपाट चा दगडी पट… 

                गाडी लावून १० मिनिटांत लेण्यापाशी पोचलो… सुमारे ५ बाय २ फुटांच्या प्रवेशदारातून आत एकंच विहार असलेल्या खोलीत पोचतो… गावकऱ्यांनी आतून सुद्धा पांढरा रंग दिला आहे… आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजुला खाली चर खोदला आहे… प्रयोजन नीट कळलं नाही… खाली उजव्या बाजूला सारीपाटाच्या खेळाचे दगडी पट खोदले आहेत… लहानपणी च्या दूरदर्शन वरच्या महाभारतातल्या घाऱ्या डोळ्यांचा 'गुफी पेंटल' उर्फ 'शकुनी मामा' आठवला… आणि रडणारे 'पाच पांडव'…  आता इथे 'शकुनी मामा' कशाला आला असेल द्यूत (सारीपाट) खेळायला? ते ही हिंजवडी च्या फेज -३ मध्ये?  मग लक्षात आलं… अश्या असंख्य शकुनी मामांचीचं  तर  सध्या IT च्या Management मध्ये चलती  आहे… फावल्या वेळेत आला असेल बिचारा AC मधून ऊन खात खात सारीपाट खेळायला… :)

माण विहार … 

               दरवाज्यातून परांजप्यांच्या Blue Ridge Construction चे उंच Towers दिसतात… बाहेर डाव्या बाजूला तीन-चार भोकं दिसली… प्रसिद्ध लेणी अभ्यासक श्री. सागर बोरकर  ह्यांच्या मते हि लेणी/विहार खोदण्याच्या आधी काही भोकं पडून अंदाज घेतला असावा कि दगड किती ठिसूळ आहे किंवा अजून शेजारी किती लेणी खोदु शकतो?   दिवसाचा शेवट तिसऱ्या लेण्याने झक्कास झाला… मज्जा आली… 

एव्हाना संध्याकाळ होयला लागली होती… खाली उतरून गाडीतून थेट ऑफिस मध्ये पोचलो…आप-आपल्या घरी मार्गस्थ झालो… वर्ष-अखेर ची सहल चांगलीच जबरी निघाली…

               जसे दारू ला चकणा लागतोचं… तसेचं घाटवाटांबरोबर चकणा म्हणून लेणी/विहार  ही केल्यास ट्रेक मधली रंगत अधिक चढते… इति : साईप्रकाश बेलसरेसाईप्रकाश  मुळे लेणी अभ्यासाचीही थोडीफार गोडी लागली आहे … प्रचंड धनुर्वाद… __/\__


गोठे लेणं… 

वरील तिन्ही गुहा /विहार चा भोगोलिक दृष्ट्या विचार केला तर :

~~ प्राचीन काळी व्यापारी मार्गाकरीताचं ही लेणी खोदली असावी… ठाणाळे आणि खडसंबळे लेणी पण पलीकडच्या खोऱ्यातचं आहेत… शिवाय अंधारबन, सावळ, लेंड ह्या घाटवाटा हि आहेतचं… 

~~ कोकणातून देशावर दळण-वळणाकरीता आणि 'वर्षावास'साठी (४ महिने पावसाळ्यातल्या विश्रांती साठी)…
~~ शिवाय बौद्धधर्मप्रसारासाठी विहार खोदले गेले आणि मग प्रार्थनेसाठी स्तूप खोदले गेले… 

वरील संदर्भ : प्रसिद्ध इतिहास अभ्यासक श्री. सागर बोरकर  ह्यांच्या पोतडीतून साभार … 

                अजून मुळशी खोऱ्यातल्या पोमगाव आणि पेठ तिकोना च्या पोटातल्या अभ्यासाच्या दृष्टीकोनातून गुहा बघून झाल्या…  कि मुळशी खोऱ्यातल्या ज्ञात गुहांचा अभ्यास इथेच संपेल… नवीन काही सापडल्यास पावले आपोआप तिकडे वळतीलचं… बहुदा काँग्रेस च्या राज्यात मुळशी धरणाचं बांधकाम होणार ह्याची चाहूल लागली कि काय…  म्हणून त्याकाळीच ह्या विहारांची बांधकामं अर्धवट सोडून दिली असावीत… असो… :) 

साईप्रकाश, साईली आणि सागर  ह्यांना प्रचंड धनुर्वाद…

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...