Tuesday, November 22, 2022

एका प्रवासाची गोष्ट - २

 http://anandyatra.blogspot.com/2012/04/blog-post_24.html


वेळ वाचवण्याचा खुळा छंद कुणाला असेल का? आणि असलाच तर वेळ वाचवण्याच्या धडपडीपायी माणूस काय काय करतो? याची उत्तरे वेगवेगळी येतील. पण सुखासुखी होऊ शकणारा प्रवास टाळून आपणहून धाकधूक ओढवून घेणारा प्रवास एखादा वीर नक्की करू शकतो. मी नुकताच केलाय!

रायगडच्या नितांतसुंदर ट्रेक कम ट्रीपनंतर पुण्याला जाण्यासाठी बसमधून एकटाच महाड फाट्याला उतरलो तेव्हा सव्वापाच वाजले होते. हायवेपासून पाव किमी वरचा स्टँड गाठून पुण्याच्या गाडीत बसायचे एवढा साधा मामला होता. स्टँडवर गेल्यावर समजले, की पुणे गाडी साडेसहा वाजता आहे. मला तो उरलेला सव्वा तास दहापट मोठा होऊन दिसायला लागला. महाडहून पुण्याला येणार्‍या बर्‍याच गाड्या वरंधामार्गे येतात. 'त्यामुळे इथे वेळ घालवण्यापेक्षा मिळेल त्या वाहनाने वरंध/माझेरीपर्यंत जाऊ. तिथे भोरपर्यंत जाण्यासाठी वाहन मिळाले तर उत्तम, नाहीतर ही साडेसहाला इथून सुटणारी गाडी तिथे पकडू' असा साधा-सोपा विचार करून स्टँडबाहेर आलो.
सहा आसनी टमटमवाल्याला विचारले तर तो बिरवाडीपर्यंत सोडेन म्हणाला. बिरवाडी हे हायवेपासून आत असल्यामुळे मला चालणार नव्हते. मग चालत पुन्हा गोवा हायवेला आलो.

तिथे एक बाबाजी भेटला. 'भोरपर्यंत कसे जावे' असे विचारल्यावर त्याने 'विक्रममधून (टमटमला पेण-रायगडमध्ये 'विक्रम' म्हणतात) बिरवाडी फाट्याला जा, तिथून भोरला जायला टेम्पो मिळेल' असे सांगितल्यावर विक्रममध्ये बसलो. बिरवाडी फाट्याच्या ठिकाणावरून माझा थोडा गोंधळ झाला होता. गोवा हायवे सोडून वरंधा घाटाकडे जो रस्ता वळतो, त्या रस्त्यावर पिंपळवाडी (कांगोरीगड फाटा), ढालकाठी, बारसगाव (शिवथरघळ फाटा) ही गावे आहेत. त्याच रस्त्यावर बिरवाडीकडे जाणाराही एक फाटा आहे. टमटम मला तिकडे सोडेल अशा समजुतीतून मी विक्रममध्ये बसलो होतो. प्रत्यक्षात गोवा हायवेलाच एक बिरवाडी फाटा लागतो. टमटम तिकडून आत शिरल्यावर मी डायवरशी भोरला पोचण्याबद्दल विचारायला सुरूवात केली. मुख्य प्रश्न फक्त वेळेचा होता. मला वेळ वाचवून लवकरात लवकर पुण्याला पोचायचं होतं आणि झोपायचं होतं.

"बिरवाडीतून ढालकाठीला जा. तिथून भोरला जायला ट्याम्पो भेटतील." - डायवर.
"हो. बिरवाडीतून ढालकाठी किती लांब आहे?"
"असेल दहा-पंधरा मिनिटे. पण तुम्ही साडेसहाच्या गाडीने का नाही गेलात?"
डायवरने अचूक मुद्द्यावर बोट ठेवले होते.
"अहो, मला वाट बघायचा कंटाळा आला. ढालकाठीहून टेंपो नाही मिळाला तर ही साडेसहाची गाडी मिळेलच की!"
"कुणी सांगितलं? ती गाडी ताम्हिणीमार्गे जाते"
"!!!!!!"
"........."
"क्क्काय??"
"हो मग! वरंधामार्गे आता डायरेक्ट रात्री साडेअकराला एसटी आहे"
"हो! बरोबर आहे. मागे एकदा त्या एसटीने गेलो होतो". मला तीन वर्षांपूर्वीचा तोरणा ते रायगड ट्रेक आठवला. त्यावेळी त्या साडेअकराच्या एसटीने पार पुण्यापर्यंत उभे राहून गेलो होतो.
"मग आता कसं जाऊ? पुन्हा माघारी महाडात जाऊ का?" घड्याळात सहा वाजले होते. डोक्यात वेळेचा हिशेब सुरू होता.
"छे छे! आता उलटं कुठे जाताय? १० रूपयाची रिक्षा करा, ढालकाठीपर्यंत. ढालकाठीहून फळा-बिळांचे ट्यांपो नक्की मिळतील."
"बरं".

बिरवाडीत उतरलो तेव्हा सहा वाजून पाच मिनिटे झाली होती. एका रिक्षावाल्याला विचारलं तर त्याने तीस रूपये होतील असं सांगितलं. ते ऐकून तर डॉस्कंच हललं. आधीच एसटीची आशा संपली होती, त्यात हे असं! मग चालतच ढालकाठीकडे निघालो. वाटेत एक नदीचा पूल लागला. अस्ताला जाणार्‍या सूर्याचं प्रतिबिंब, संथ वाहणारं पात्र, वार्‍याची झुळूक हे सगळं अनुभवल्यावर खूप्पच फ्रेश वाटलं. आणि तसंही ते अंतर तीस रूपयांच्या मानाने फारच कमी होतं. ढालकाठीपासून थोडं पुढे पिंपळवाडीच्या फाट्यावर येऊन थांबलो.

तिथे माझेरीकडे जाणार्‍या गाडीची वाट पाहत उभे असलेले दोन गावकरी भेटले. पेहराव आणि बोलण्यावरून सरकारी कचेरीतले असावेत असे वाटून गेले. त्यांना पाहिल्या पाहिल्याच मी 'रायगडला गेलो होतो. दोस्त मुंबईचे होते, ते मुंबईला गेले. मला भोरला जायचंय' असं जाहिर करून टाकलं. मला नीट पाहून घेतल्यावर मग ते बोलायला लागले.
"आम्ही पाच वाजल्यापासून उभे आहोत. एकही वाहन आलं नाही अजून. रोज असं होत नाही. आज काय झालंय काय माहित!"
वेळ वाचवण्याच्या उरल्यासुरल्या आशाही नेस्तनाबूत करायला निघालेली ती सलामीची वाक्ये ऐकून मला धस्स झालं.
"टेंपो मिळेल ना एखादा?"
"हात करायचा. थांबला तर थांबला. आज रविवार आहे ना, त्यामुळे टेंपोंची वर्दळ कमी असते"
हे रविवार प्रकरण नवीनच होतं. त्याचा मी विचारच केला नव्हता.
"एकदा भोरला पोचलो की मग पुढे चिक्कार एस्ट्या मिळतील पुण्यासाठी" - मी.
"हो, पण भोरचा स्टँड साडेनऊला बंद होतो. त्यानंतर पोचलात तर कापूरहोळपर्यंत जावं लागेल कसंतरी"
हायला! हे अजून एक नवीन! पण ही वस्तुस्थिती असू शकत होती. कारण सहा वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये असताना भोरला एका स्पर्धेसाठी गेलो होतो तेव्हा तिथून पुण्यात परतायला साडेनऊची शेवटची एसटी मिळाली होती. आताही तीच परिस्थिती असेल तर साडेनऊच्या आत भोरमध्ये पोचणं मस्ट होतं! हा विचार मी महाडहून निघाल्यापासून केलाच नव्हता कारण साडेनऊच्या लक्ष्मणरेषेच्या आत पुण्यातही पोहोचू असं वाटलं होतं!

दोन ट्रक आले, पण न थांबताच निघून गेले. बाकी सगळ्या प्रायवेट गाड्या. त्यांची अलिशानता पाहूनच मला त्यांना हात करायची हिम्मत होईना! मग दोन टेंपो आले. त्यांना हात करणार तेवढ्यात ते उजवा इंडीकेटर दाखवून पिंपळवाडीत वळले. आत लग्नाचं वर्‍हाड बसलं होतं. लांबवरून येताना दिसलेले १ ट्रक आणि २ टेंपो ट्रक लांबूनच बिरवाडीकडे वळले. निराशा! तात्पर्य, भोरच्या दिशेने निघण्याच्या निर्णय अत्यंत चुकीचा ठरण्याची चिन्हे दिसू लागली होती. आणि वर पुण्यात केव्हा पोचेन हेही बेभरवशाचे होत चालले होते.

सहा पंचवीस!
अजून पाचच मिनिटांनी ती पुणे गाडी महाडमधून सुटली असती आणि ताम्हिणीमार्गे निघालीही असती. आणि मी अनिश्चित काळासाठी पिंपळवाडी फाट्यावर अडकून पडलो होतो. 'कॅप्टनना महाडऐवजी माणगावात सोडायला सांगितलं असतं तर कदाचित ती गाडी मिळालीही असती' - उशीरा सुचलेले निरर्थक विचार मनात सुरू झाले होते! अखेर कंटाळून पुन्हा आल्या मार्गे ढालकाठी-बिरवाडी-'विक्रम' करून महाडात जायचा विचार त्यांना बोलून दाखवला. तेही सहमत झाले.

"इथे सध्या चोर्‍यामार्‍यांमुळे वातावरण टेन्शनमध्ये आहे. त्यात तुम्ही पडलात बाहेरगावचे. उगाच काही व्हायला नको. त्यापेक्षा महाडमध्ये सुरक्षित असाल. आणि तो स्टँड रात्रभर सुरू असतो"
"हो ना!"

साडेसहा वाजता मी एवढा वेळ रस्त्यावर ठेवलेली नवी कोरी प्रिय ट्रेकिंगसॅक उचलली आणि स्वतःच्या एका फसलेल्या प्लॅनला (अतिउत्साही, घाई-गडबड वगैरे) दोष देत ढालकाठीकडे निघणार तेवढ्यात एक ट्रक आला. सातारा पासिंगचा तो ट्रक पाहिल्यावर आशा-उमेद वगैरे जे काही असेल ते एकदम आकाशात पोचलं आणि त्याला हात केला. त्यानेही 'कुठे' असे खुणेनेच विचारले. भोर म्हटल्यावर ट्रक थांबला. मी आणि ते माझेरीचे दोघे ट्रकमध्ये चढलो. त्याचा चालवण्याचा वेग पाहिल्यावर पहिल्याच मिनिटाला ते गावकरी "आता पोचाल वेळेत भोरला" असं म्हणू लागले आणि मी जरा निवांत झालो.

वाटेत अजून एक "डोलकर" ट्रकमध्ये चढला. त्याला वाघजाईला जायचे होते. आता आमची चौघांची कंपनी झाली होती. माझेरीमध्ये ते दोघे उतरले. मग मी थोडा ऐसपैस बसलो आणि ट्रकची केबीन निरखू लागलो. गडी नेहमी ट्रकवर असणारा असावा. झोपायला चादर-उशी, एक्स्ट्रा शर्ट-प्यांटचा जोड, उदबत्त्या, दोन पाण्याच्या बाटल्या, एक डबा. बोर्डवर देवीचा फोटो, शेजारी टेप. फक्त क्लिनर दिसत नव्हता. (नसेल क्लिनर, मला काय?)

डायवर मुकाट ट्रक चालवत होता आणि मला गप्प बसून झोप येऊ लागली होती. मग 'रिकामे मन सैतानाचे घर' प्रमाणे मनात भोर-वरंधा मार्गावर अंधारात झालेल्या लुटीचे आणि मारहाणीचे किस्से आठवले. अनोळखी ट्रक डायवर आणि त्यात बरोब्बर अंधार पडताना आम्ही त्या मार्गावर असणार होतो. या विचारांना ट्रक जेव्हा कावळ्याच्या पायथ्याशी थांबला तेव्हा ब्रेक लागला. डायवरसाहेब उदबत्ती घेऊन उतरले आणि वरंधामाथ्यावरच्या वाघजाईच्या मंदिरात जाऊन पूजा वगैरे करून आले. तेवढी पाचएक मिनिटे मीही बाहेर उतरून दरीत पसरणारा अंधार बघून घेतला. वातावरण सुंदरच होते ते!

वाघजाईला ते 'डोलणारं' पावणं उतरलं आणि ट्रकमध्ये आम्ही दोघेच उरलो. ट्रक रिकामाच चालला होता. माल पोचवून आला असावा. भोर-वरंधा हा पस्तीसएक किमी चा रस्ता मला दिवसाही विलक्षण कंटाळवाणा वाटतो. रस्ता वळणं घेत घेत जात राहतो. चालवणार्‍याच्या हातांना चांगलाच व्यायाम! तिन्हीसांजेला डायवरबाबांनी भजनांची कॅसेट लावली आणि झोप-बिप सगळी उडून गेली. बर्‍याच महिन्यात न ऐकलेली सुंदर भक्तिगीते ऐकायला मिळाली. ते लूट वगैरेचे विचार केव्हा दूर पळाले ते कळलेही नाही.

बरोब्बर आठ वाजून चाळीस मिनिटांनी भोरमध्ये चौपाटीला उतरलो. (छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा असलेल्या चौकाला भोरमध्ये चौपाटी म्हणतात) डायवरला धन्यवाद दिले (धनही दिले). दहा मिनिटे चालत स्टँड गाठला. परंतु पुण्यासाठी एसटी थेट साडेनऊलाच असल्याचे कळले आणि इतकी धावाधाव निष्फळ ठरल्याचे जाणवले. अर्थात माझेरी-ढालकाठी-महाड अशा दूर दूर ठिकाणी अडकण्यापेक्षा हा पाऊण तास अधिक सुसह्य होता. एक स्व-आयोजित, दगदगीचा पण अतिशय सुंदर असा प्रवास संपवून स्वारगेटला उतरलो तेव्हा सव्वा अकरा झाले होते. डोळे झोपेमुळे बंद होत होते आणि मन टक्क जागे!

नुकतीच एक बातमी वाचली - मी जेव्हा बिरवाडी-ढालकाठीमध्ये फिरत होतो आणि टेंपोची वाट पाहत होतो, योगायोगाने त्याच दिवशी, आणि कदाचित एक-दोन तास आधी चांभारगडावर एकटाच चाललेल्या एका ट्रेकरला स्थानिक गावकर्‍यांनी चोर समजून पोलिस ठाण्यात नेले होते. माझेरीचे ते दोन गावकरीसुद्धा चोरीबिरीबद्दल बोलले होतेच. ती बातमी वाचून मला फक्त हसू फुटले एवढंच!

आता ठरवलं आहे, महाडमधून पुन्हा कधी यावेळेला आलोच तर मुकाट साडेसहाच्या एसटीने यायचे.....नाही! नको नको! कारण त्याशिवाय असा विचित्र तरीही भरपूर आनंद-अनुभव देऊन गेलेला प्रवास कसा घडणार? या अनुभवामुळे पुढच्या वेळी धोपटमार्गाने प्रवास करावा की निश्चिंतपणे असे ऑफरूट ट्राय करावेत या दुहेरी शंकांमध्ये सध्या अडकलो आहे, एवढे मात्र निश्चित!

- नचिकेत जोशी (१९/४/२०१२)

 

तोरणा (निवी) ते रायगड


साधारण ६-७ वर्षांपूर्वी मी जेव्हा दुर्गभ्रमंती बऱ्यापैकी आवडीने करायला सुरूवात केली, तेव्हापासून तोरणा ते रायगड व्हाया बोराट्याची नाळ हा ट्रेक हे एक स्वप्न होतं. बहुतांश वेळी सलग सुट्टी नसणे आणि ह्या heavy ट्रेक साठी अट्टल भटके दोस्त नसणे ह्या दोन कारणांमुळेच हा ट्रेक लांबत गेला. यावेळी मात्र साऱ्या गोष्टी जमून आल्या आणि मी, मयूर, श्रीकांत, ओंकार आणि आशिष उर्फ लॉली असे पाच जण २४ डिसेंबरला तोरणा ते रायगड या जुन्या स्वप्नाचा वेध घ्यायला निघालो. नेट वर थोडीफार माहिती मिळाली. GS नेही वाटांबद्दल थोडी माहिती दिली. पण मुळात हा ट्रेक केलेल्यांची संख्य़ा कमी आणि त्यातून नेट किंवा ब्लॉगवर त्याबद्दल लिहिलेल्यांची संख्या कमी. त्यामुळे, ट्रेकमध्येच बऱ्याच गोष्टी उदा, वाटा, अंतरे इ. समजल्या आणि finally we did it!!

This trek is not a joke!! ही भटकंती महाराष्ट्रातल्या अत्यंत दुर्गम तालुक्यांपैकी एक असणाऱ्या वेल्हा तालुक्यातील आहे आणि मग खडा सह्याद्री उतरून थेट कोकणात शिरायचे आहे. खड्या चढाचे डोंगर, विरळ मनुष्यवस्ती, पायवाटांचा सुळसुळाट - त्यामुळे हमखास वाट चुकण्य़ाची शक्यता, आजुबाजुला (बऱ्यापैकी श्वापदविरहित) जंगल, भरपूर शांतता ह्या गोष्टी म्हणजे कलंदर भटक्यांसाठी पर्वणीच!
********

तोरणा ते रायगड : Day - 1
आम्ही हा ट्रेक तोरण्याच्या पुढे जिथपर्यंत ST पोहोचते त्या शेवटच्या गावापासून सुरू करणार होतो. कारण तोरण्यापासून सुरूवात केल्यास त्यासाठी छान ५-६ दिवस लागले असते - तेवढे आमच्याकडे नव्हते.

या ट्रेकसाठी घिसर किंवा हारपूड या गावांपर्यंत जाणाऱ्या एसटी बसेस सोयीच्या आहेत. घिसर गावासाठी सकाळी साडेसहा वाजता आणि हारपूडसाठी दुपारी साडेतीन वाजता स्वारगेटहून एसटी आहे. यातली घिसरची एसटी निवी गावापर्यंत जाते. स्वारगेट-निवीसाठी ३ तास लागतात आणि स्वारगेट-हारपूडसाठी साधारण ४ तास लागतात. त्यामुळे हारपूडच्या एसटीने गेल्यास पहिला मुक्काम मोहरीत करता येत नाही, कारण हारपूड-मोहरी हे अंतर कमीत कमी दीड तासांचे आहे, आणि अंधारात त्या वाटेवर न जाणे श्रेयस्कर कारण वाटेवर जनावरांची (रानडुकरे, साप) गाठ पडण्याची शक्यता आहे.

आम्ही २४ डिसेंबरला सकाळी साडेसहाच्या घिसर एसटीने निवी गावात उतरलो तेव्हा साडेनऊ झाले होते. एसटीमध्ये प्रभुणे नावाचे १९७८-८० या काळात हारपूडमधे जिल्हापरिषदेच्या शाळेत शिक्षक असलेले आणि आता त्या वेल्हापलिकडच्या भागाचे केंद्रप्रमुख असलेले मास्तर भेटले. त्यांच्याशी गप्पा मारल्या. (दोन शिक्षक भेटल्यावर बोलण्याचा विषय नेहमीच शिक्षणपद्धती असेल असं नाही ;-) असो.) एसटीतून उतरलो तेव्हा आमच्या पाठीवरील प्रचंड मोठ्या ट्रेकींग सॅक्स बघून एसटीचे दार लोटता लोटता कंडक्टरने ’आयला पैसे देऊन वर जिवाला त्रास!’ अशी comment केली, गावकऱ्याच्या हातावर टाळी-बिळी दिली आणि आम्हीही खोखो हसायला लागलो. निवीहून घेवंडे आणि घेवंडेहून हारपूड असा पहिला टप्पा होता. हारपूडला जेवून मग मोहरीकडे मुक्कामासाठी निघायचे होते.

अर्ध्या तासात घेवंडेला पोहोचलो. तिथे एका म्हाताऱ्या गावकऱ्याने आस्थेने विचारपूस केली आणि स्वत:हून येऊन हारपूड गावची वाट सांगितली. घेवंडे गावातून एक पायवाट तोरणा किल्ल्याला डाव्या हाताला ठेवत सरळ डोंगर चढून जाते. या डोंगरावरचे आणखी दोन दांड चढून मग उजव्या हाताला वाट वळेल तेव्हा वळा असे त्या म्हाताऱ्याने बजावून ठेवले होते. त्याप्रमाणे निघालो. पहिल्या डोंगरावरील पठारावर सरळ पायवाट दिसली नाही म्हणून उजवीकडे जाणाऱ्या एका वाटेने पूर्ण झाडीखालून १५ मिनीटे चालत राहिलो. वाट चुकलो हे लक्षात येऊन तिथेच बसलो आणि मयूर व आशिष वाट शोधायला पुढे निघून गेले. त्यांनी खूप पुढे वरच्य़ा दिशेने जात दोन कोरडे ओढे ओलांडले व अखेरीस झुडुपांत वाट नसल्यामुळे ते परत फिरले. एव्हाना साडेअकरा झाले होते. मग आम्ही पुन्हा त्या पठारावर येऊन सरळ वाटेला लागलो आणि तो दांड चढून वर पोहोचलो. अखेरीस पायवाटेने उजवीकडे वळण घेतले आणि आम्ही आता योग्य वाटेवर असल्याची खात्री झाली. तसेच पुढे जात राहिलो आणि मगाशी मयूर व आशिषने खालच्य़ा अंगाला पार केलेले कोरडे ओढे वरच्या अंगाला पायवाटेने ओलांडले.

एव्हाना पायांनी आपापली गती पकडलेली असल्याने मी, मयूर आणि ओंकार पुढे आलो आणि श्रीकांत-आशिष मागून येत होते. असेच साधारण तासभर चालत होतो. एका U-turn वरती दोन पायवाटा निघाल्या होत्या. त्यापैकी वरच्या बाजूच्या पायवाटेलगतच्या दगडावर पांढरा arrow दिसला आणि आम्ही कमालीचे खूष झालो. निर्जन जंगलात हे arrows भटक्यांची खूप मोलाची मदत करतात. दुर्दैवाने, मागून येणाऱ्या श्रीकांत-आशिषने तो arrow पाहिलाच नाही आणि ते त्या बाजूच्या दुसऱ्या पायवाटेने ती दरी उतरून सरळ खाली गेले. दीडच्या सुमारास श्रीकांतने फोन करून सांगितले ( BSNL जिंदाबाद!), की आम्ही गावात पोहोचलो - पण त्या गावाचे नाव होते - घिसर!!

हाय रे देवा!! एव्हाना दीड वाजला होता. अजून हारपूडचा पत्ताही नव्हता आणि हारपूडहून २ तास चालून मग अंधार पडायच्या आत मोहरी गाठायचे होते. त्यांना आम्ही ’गावातूनच एखादा माहितगार माणूस बरोबर घ्या आणि हारपूड गाठा’ असं सांगितलं आणि आम्ही तिघे पुढे निघालो. अर्धा-पाऊण तास तसेच चालत राहिलो आणि पायवाट एका सपाटीवर आली. आता तोरणा मागे होता आणि खूप दूरवर दिसायला लागला होता - शिवतीर्थ रायगड, जिथे आम्ही परवा असणार होतो.. आता घिसर गावची दरी आमच्या उजव्या हाताला होती. त्या सपाटीवरून ५-१० मिनिटे चाललो असू, तेवढ्य़ात आम्हाला दोन पायवाटा लागल्या - एक डावीकडची, सरळ जाणारी आणि दुसरी उजवीकडची खाली उतरून गेलेली. डाव्या पायवाटेवर झाडाची छोटी फांदी आडवी टाकलेली होती, त्यामुळे ही वाट वर्ज्य असावी असा ग्रह करून आम्ही उजव्या वाटेला लागलो. पण ५ मिनिटातच लक्षात आले, की ही वाट खालच्या दिशेने चालली आहे आणि डोंगराच्या आतल्या बाजूस जात आहे. अजूनही हारपूड गावाचा मागमूस नव्हता, आजुबाजुला चिटपाखरूही नव्हते, घरे नव्हती, चरणारी गुरे नव्हती, गुराखी नव्हते, धनगर नव्हते, शेतकरी नव्हते,चिडिचूप जंगल आणि आम्ही हरवल्यागत फिरणारे ३ ट्रेकर्स! आता आम्हालाही वाटायला लागले होते की आपण चुकलोय आणि हरवलोय! शेवटी मयूर आणि ओंकारला तिथेच थांबवून मी पुन्हा माघारी येऊन त्या ’बंद’ केलेल्या पायवाटेने १५ मिनिटे पुढे गेलो. पण गावाचा नेमका अंदाज आला नाही, फक्त दिशा बरोबर आहे असं strong intution होतं. त्यामुळे आम्ही त्या ’आतल्या आवाजाचं’ ऐकायचं ठरवलं आणि त्या बंद पायवाटेनेच पुढे चालायचा निर्णय घेतला.

तासभर चालल्यावर एके ठिकाणी छोटासा झरा लागला, तिथे तहान भागवून घेतली. ह्या अनिश्चित पायपीटीचा शेवट कधी होईल असा विचार करत असतानाच एका वळणावर साधारण ८-९ वर्षांची एक गुराखी चिमुरडी समोर आली आणि आम्ही "अजि म्या ब्रह्म पाहिले" च्या आनंदात न्हालो.. ’कुठून आलात? कुनिकडे जायाचंय’ असे एकापाठोपाठ तिने प्रश्न सुरू केले. मग तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तिचे समाधान होईस्तोवर दिल्यावर तिला त्या भागाची व तिची माहिती विचारली. ह्या मुलीचे नाव होते चिंधी. दुसऱ्या गुरांत शिरलेल्या स्वत:च्य़ा गाईला परत आणण्याच्या मोहिमेवर निघालेल्या ह्या मुलीने आम्हाला दूरून पाहिले होते आणि म्हणून आमचा शोध घेत ती पुढे आली होती. गाव कधी आणि मुख्य म्हणजे कुठले - हारपूड की मोहरी (आम्ही इतका वेळ चालत होतो की आम्हाला शेवटी शेवटी असेही वाटायला लागले होते की आपण आता थेट मोहरीतच पोहोचणार) येईल याची अनिश्चितता आता संपली होती. आम्ही हारपूडच्या धनगरवस्तीपासून अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर आलो होतो. त्याच डोंगराच्या धारेवरून चालत यथावकाश वस्तीवर दाखल झालो. अंगणातून त्या छोट्या कौलारू घरात आवाज गेला - ’माये, गडवाले आले आहेत.’ (अट्टल ट्रेकर्सना त्या प्रदेशात ’गडवाले’ असे मावळी संबोधन आहे.) अंगणात बसल्याबरोबर आतून लगेच एक लोटाभर पाणी आणि अंथरायला कांबळ आलं. हारपूड गाव त्या डोंगराच्य़ा पायथ्याला वसलेले होते. त्या घरातील छोटा चुणचुणीत पोरगा - संतोष नाव त्याचे, वाट दाखवायला बरोबर घेतला आणि ओंकारला तिथेच बसवून मी व मयूर तो अख्खा डोंगर उतरून आशिष-श्रीकांतला आणण्यासाठी गावात आलो. त्या घराच्या मागच्या सपाटीवरून पश्चिमेला दुर्ग लिंगाण्याने पहिले दर्शन दिले. अर्धा तास त्यांची वाट पाहिली आणि वरून विश्वास (उर्फ ’इस्वास’) - संतोषचा भाऊ सांगत आला की तुमचे दोन मित्र वर वस्तीवर आले आहेत. आम्ही २ तासांपूर्वी उताराकडे जाणारी जी पायवाट सोडून फांदीने बंद केलेली पायवाट धरली होती, त्याच पायवाटेने डोंगर चढून हे दोघे आमच्याच वाटेने त्या वस्तीवर पोचले होते. आणि तीच पायवाट त्या हारपूड धनगरवस्तीवरून पुढे मोहरीकडे जात होती. (मोहरीला जाण्यासाठी हारपूड गावामध्ये शिरायची अजिबात आवश्यकता नाही. डोंगराच्य़ा धारेवरून वाट सोयीची आहे.) परत तो अख्खा डोंगर चढून वर आलो आणि जेवणाच्या पुड्या सोडल्या.

एकंदरीत (वाट चुकल्यामुळे वाया गेलेल्या) वेळेचा अंदाज घेतला. एव्हाना पाच वाजून गेले होते. दिवसभर खूप चाललो होतो, मोहरी अजून २ तासांवर होते, वाट अंधारात चालण्यासारखी नव्हती. म्हणून मग ती रात्र त्याच वस्तीवर काढायचा निर्णय घेतला. त्या वस्तीवर एकूण ३ घरे होती. सर्वात पहिले घर रामजी-भागाबाई या जोडप्याचं. त्यांच्या घराच्या बाजूला छोटा गोठा होता. त्या रात्री त्या गोठ्याच्या नशिबात मनुष्यवास होता. एका बाजूला त्यांच्या ३ बैलांनी अंग पसरले होते आणि दुसऱ्या बाजूला आम्ही डेरा टाकला होता. आता वेळ भरपूर असल्यामुळे, बॅग्स आत ठेवून सूर्यास्ताचे फोटो काढायला बाहेर पडलो. उगवतीला तोरणा आणि त्याची बुधला माची, राजगड, वरंध्याच्या डोंगररांगा, कोकणदिवा, लिंगाण्याचे टोक, आणि मावळतीला रायगड असा सुंदर देखावा दिसत होता. रात्री मयूरने मॅगी बनवली, अस्मादिकांनी चहा बनवला, रात्री थंडी वाढली म्हणून शेकोटी पेटवली आणि निद्राधीन झालो. The Great hunter Jim Corbett ने बऱ्याच गोष्टींमध्ये त्याने शिकारीच्या निमित्ताने दिवसभर मैलोगणती पायपीट केल्याची रोमांचकारी वर्णने लिहून ठेवेली आहेत. आज झोपताना एक शतांश प्रमाणात का होईना, पण एक तसा दिवस अनुभवल्याचा feel होता. अखेर ट्रेकचा पहिला दिवस संपला होता..
*********

तोरणा ते रायगड : Day - 2 (२५ डिसेंबर)
सकाळी पाचचा गजर लावून सातला उठलो. (उत्तम, लज्जतदार इ.इ.) चहा-पोह्यांचा फक्कड नाश्ता बनवला. भागाबाईने दोन लोट्या भरून गाईचे दूध आणून दिले (वाह!!). सर्व आवरून निघायला साडेआठ झाले. सोबत वाट दाखवायला भागाबाई आणि तिचा पोरगा ’इस्वास’ येणार होते. रात्रभरच्या कडाक्याच्या थंडीत रहाण्याची मस्त सोय केल्याबद्दल रामजीबावांचे आभार मानले, व त्यांचे ’मानधन’ देऊन निघालो. भागाबाईने मोठी बाटलीभर ताक (विकत) दिले. पुढच्या घराच्या अंगणातून चिंधी डोकावून बघत होती. तिला बोलावले, तिच्या हातावर गोळ्य़ा-चॉकलेट्स ठेवली आणि मोहरीकडे निघालो. हारपूड धनगरवस्ती ते मोहरी ही वाट तशी सरळ. पण पुन्हा तेच - गुरांच्या फसव्या वाटांनी गेलो तर आपण चुकलो हे लक्षात येईपर्यंतही कदाचित एखाद डोंगर पार झालेला असेल - चुकीच्य़ा दिशेला!! पण आता भागाबाई आमच्याबरोबर असल्यामुळे निश्चिंत होतो. मोहरीच्य़ा अलिकडे पठारावर पोहोचलो तेव्हा मागे तोरणा आणि समोर रायगड सारख्याच अंतरावर दिसत होते. लिंगाणा कड्यापलिकडे गायब झाला होता. मोहरीच्या वाटेवर असतानाच भागाबाईने "बोराट्याच्य़ा नाळेतून जाऊ नका, सिंगापूरच्या नाळेने उतरा असा सल्ला दिला होता". पण आमचे ’तोरणा-रायगड व्हाया बोराटा नाळ’ हे जुने स्वप्न होते. त्यामुळे तिला बोराट्याच्या नाळेपर्यंत घेऊन चल, वाट उतरण्यासारखी नसेल तर सिंगापूरच्या नाळेचा रस्ता दाखव असं सांगितलं. तीही याला तयार झाली. मोहरीला पोहोचलो तेव्हा पावणेदहा झाले होते. बोराट्याच्या नाळेच्य़ा तोंडाशी पोहोचलो आणि आमच्य़ा तोरणा-रायगड व्हाया बोराटा नाळ या प्रवासनाट्याने एक अनपेक्षित वळण घ्यायला सुरूवात केली...

नाळेच्या तोंडावरून दिसणारे दृश्य मनोरम होते. दोन्ही बाजूला कडे, त्यामधून गेलेली खड्य़ा उताराची, प्रचंड कातळांची घळीसारखी वाट (हीच नाळ), साधारण दीड हजार फूट उतरल्यानंतर एकदम open होणारा नजारा... - यात उजव्या हाताला एका दरीपलीकडे उभा असणारा लिंगाणा किल्ला, डाव्या हाताला डोंगररांगा, डावीकडे दूर दापोली गाव आणि समोर खोऽऽऽऽऽल दरी!! मी वाटेचा अंदाज घ्यायला नाळेत उतरलो. माझ्या मागून सुरक्षित अंतर ठेवत आशिष आणि मयूर उतरले. नाळेमधे बरीच झुडुपे उगवली होती. मी साधारण २००-३०० फूट उतरलो असेन. rock patches अवघड आणि अनियमित असले तरी उतरायला अशक्य नव्हते. योग्य ती खबरदारी घेऊन नाळ उतरणे शक्य होते. हिच गोष्ट मी आशिषला सांगत असतानाच माझ्या कानाशी घोंघावण्याचा आवाज आला.. चमकून पाहिले तर २-३ मधमाशा उडत होत्या. जरा निरखून पाहिल्यावर असं लक्षात आले की आसपासच्य़ा सर्व झुडुपांमध्ये मधमाश्यांची शाळा भरली आहे!!! आणि ही झुडुपे सबंध नाळभर वाढलेली असल्यामुळे नाळ उतरतांना या झुडुपांना आणि पर्यायाने माश्यांना टाळून उतरणे केवळ अशक्य होते! अजिबात आवाज न करता तसेच मागे परतलो. आता प्रश्न वाटेतल्या rock patches चा नव्हता, तर या उपटसुंभ माश्य़ांचा होता. नाळेमध्ये आग्यामोहोळ होते, पण ते नक्की कुठे लागले आहे ते दिसतच नव्हते. कदाचित ५०० फूट उतरल्यावर, कदाचित नाळेच्या exit जवळ असेल, कदाचित नाळेमध्ये नसेलही. पण नकळतसुद्धा माश्या डिवचल्या गेल्या तर आम्हाला पळायला जागा नव्हती ही वस्तुस्थिती होती. म्हणून मुकाट्याने आम्ही बोराट्याच्या नाळेने न उतरता सिंगापूरच्या नाळेने उतरण्याचा निर्णय घेतला. भागाबाई म्हणत होती त्याप्रमाणे नाळेमध्ये दरड कोसळल्यामुळे मागच्या ३ वर्षांत नाळेमधून मनुष्यवावर बंद आहे. त्यामुळे झुडुपे वाढून ती वाट आता ट्रेकर्ससाठी बंद झाली आहे. (२००६ नंतर बोराट्याच्य़ा नाळेतून सह्याद्री उतरल्याची एकही नोंद कुठल्याच ट्रेकर्स ब्लॉगवर आम्हाला मिळाली नव्हती ही tube नंतर पेटली. अर्थात, आनंद नावाच्या एका बहाद्दराने हा ट्रेक २००८ मध्ये २ दिवसांत (वाट एकदाही न चुकता, सलग चालत हे गृहीत आहे) केल्याची नोंद हा लेख लिहिल्यानंतर नेटवर सापडली आहे.) असो.

एव्हाना अकरा वाजत आले होते. आता सिंगापूरची नाळ हा एकमेव option उरला असल्यामुळे वेळ आणखी जाणार होता. त्याचबरोबर लिंगाण्यापर्यंतचे तब्बल ३ तासांइतके अंतर वाढणार होते. मोहरीच्या खालच्या अंगाला सिंगापूर गाव वसले आहे. तिथूनच नाळेकडे वाट जाते. पण पुन्हा उलटे मोहरीपर्यंत जाण्यापेक्षा मधूनच एक सोयीची वाट आहे असं भागाबाईने सुचवले. तिच्याकडून ती वाट डोंगरमाथ्यावरूनच समजावून घेतली आणि तिला निरोप दिला. ’नीट जा रे बाळांनो, अजिबात चुकू नका’ असं दामटवून ती आणि तिचा इस्वास निघून गेले.

प्रिय वाचकहो, ट्रेकच्या इथपर्यंतच्या वर्णनामध्ये जितक्या patience ने माझी साथ दिलीत ती अशीच द्याल अशी आशा आहे, कारण संपूर्ण ट्रेकमधल्या माझ्या मते सर्वाधिक exciting अशा ६ तासांची कहाणी आता सुरू होते आहे.

आम्हाला तो डोंगर पायवाटेने उतरायचा होता. तासभर उतरलो की एक ओढा डावीकडून येईल ज्यात तहान भागवता येईल, तो ओढा न ओलांडता उजव्या हाताने पायवाट धरून पुढे जायचे होते, मग एक अवघड असा rock patch ओलांडायचा होता. त्यानंतर मात्र मळलेली वाट दिसेल ती नाळेकडे घेऊन जाईल - इति भागाबाई. त्याप्रमाणे उतरायला लागलो. वाट झाडीतून होती. मध्येच गायब व्हायची, मध्येच वाटेला २ वाटा फुटायच्या. अशा वेळी खबरदारी म्हणून सर्वात शेवटी चालत मी झाडाच्या डहाळ्या खोडांवर खुणेसाठी खोचत निघालो होतो. अर्धा तास उतरलो असू, तेवढ्यात उजवीकडून एक ओढा लागला!! या ओढ्याबद्दल भागाबाईने काहीच सांगितलेले नव्हते. हा ओढा उजवीकडून कसा काय आला अशा विचारात पडलेले असतांनाच डावीकडून आणखी एक ओढा उतरला! (या ऋतुमध्ये ओढे बहुतांश कोरडे असतात, हे आपण जाणताच! - हे ही तसेच होते) परत solllid confusion!! वाट अनोळखी, आसपास मनुष्य़ाचा मागमूस नाही, सिंगापूरच्या नाळेपर्यंतच्या अंतराचाही अंदाज नाही. शांत जंगल आणि पाच ट्रेकर्स! जय हो!

बॅग्स खाली ठेवल्या आणि मी आणि आशिष वाट शोधायला पुढे निघालो. दोन ओढ्यांच्या संगमामधून चालत पुढे निघालो. थोड्या अंतरावर तो ओढा एका dropनंतर थेट कोकणात उडी घेत होता! त्याच्या दोन्ही काठांवरून चालत गेलो, पण वाट सापडली नाही. अखेर वाट चुकलो असे वाटून परत फिरलो. एव्हाना बारा वाजून गेले होते. म्हणून मग तिथेच ओढ्याच्या काठी जेवण उरकावे असा विचार केला आणि बाटल्या भरायला सर्वजण पुन्हा ओढ्याकडे निघालो. आम्ही बाटल्या भरत असताना मयूर आणि आशिष १५ मिनिटात येतो असे सांगून उजव्या काठावरून पुन्हा चालत कड्याच्या दिशेने गेले आणि तेवढ्यात मला पात्रामधे एका कातळावर उजव्या काठाकडे काढलेला पिवळ्या रंगाचा बाण दिसला. त्या काठावर एका कातळावर सरळ रेषेत काढलेला अजून एक बाण होता. आता एवढ्या दोन बाणांमुळे आशा निर्माण झाली होती खरी, पण मी थोड्या वेळापूर्वी त्याच काठावरून जाऊन आलो असल्यामुळे तिकडे वाट असेल अशी खात्री मला तरी वाटली नाही. म्हणून आम्ही तिघे माघारी फिरलो आणि मयूर-आशिषची वाट बघत बसलो. जरा वेळाने सिंगापूरच्या डोंगरावरून मनुष्यहाळी ऐकू आली आणि त्याच वेळी मयूर-आशिषही परत आले. त्यांनी वाट शोधली होती. भागाबाईच्या खुणा, आम्ही चालून आलेली वाट आणि ते बाण हे सगळे perfect होते. बाकीच्यांना स्वयंपाक करायला सांगून मी आणि मयूर त्या डोंगर-उतारावरून आलेल्या आवाजाशी गप्पा मारायला निघालो.

पलीकडच्या काठावर डोंगर उतरून आलेला एक पन्नाशीच्या आसपासचा धनगर पाणी पित होता (हा जर आधी भेटला असता तर?). त्याला रामराम केला, त्याचं नाव - बाबू पोटे. आपल्या एकुलत्या एका शेळीला आणि तिच्या पाडसाला चारायला तो तिथे फिरत होता. त्याला नाळेपर्यंतच्या आणि नाळ उतरून पुढच्या प्रवासाबद्दलही माहिती विचारली. आम्ही कालपासून वाट चुकतो आहोत असं म्हटल्यावर त्याने आठवड्यापूर्वी घडलेला किस्सा सांगितला. पुण्याहून ४ जणांचा ग्रुप सिंगापूरच्या नाळेने उतरण्यासाठी हारपूडला आला होता. तिथून कसल्यातरी जबरदस्त misunderstandingमधून कोणीतरी त्यांना मोहरीची वाट दाखवायच्य़ा ऐवजी घिसरची वाट सांगितली आणि तो ग्रुप घिसरला जाऊन पोहोचला!!! मग पुन्हा घिसर-मोहरी असा उलटा फेरा मारून तो जेव्हा सिंगापूरला पोहोचला तेव्हा त्यांची एकच इच्छा उरली होती - कसंही करून दापोलीपर्यंत पोहोचवा! मग या बाबूने त्यांना खाली पोहोचवले होते. आम्ही हे ऐकल्यावर हसून कोसळायचे बाकी होतो!! मग त्याला जेवायचे आमंत्रण देऊन आम्ही परत फिरलो. तोपर्यंत श्रीकांतने शेगडी पेटवून झकास मॅगी बनवली होती. बटर, सॉस, मॅगी आणि नंतर फलाहार असा मस्त जेवणाचा बेत पार पडला. जंगलातली ती पंगत कायम आठवणींत राहिल. अर्ध्या तासात जेवण आटोपून सर्व कचरा पिशवीत भरून घेऊन आम्ही लिंगणमाचीपर्यंतच्या दीर्घ प्रवासासाठी सज्ज झालो होतो. ओढ्यावर बाटल्या भरून घेतल्या आणि नाळेच्या तोंडापर्यंत वाट दाखवण्यासाठी बाबूलाच तयार केले.

ओढ्याच्या उजवीकडील rockpatch खरंच अवघड होता. पायवाट नाहीच, तर खडा डोंगर उतार शरीराला आतल्या बाजूला झुकवून दरीला समांतर रेषेत पार करायचा होता. ही अशी काही वाट असेल हा विचार न सुचल्यामुळे मगाशी मला आणि आशिषला ही वाट दिसली नव्हती. (ह्या अशा वाटा मयूरलाच नेहमी दिसतात). इथपासून सिंगापूर नाळेपर्यंतची वाट मात्र खरोखर अनुभवण्यासारखी आहे. डाव्या बाजूला खोल दरी उजव्या हाताला डोंगरकडा अशी ही वाट डोंगराला वळसे घेत घेत लिंगाण्याच्या दिशेने सरकते. सिंगापूरची नाळ आणि लिंगाण्याची दरी यांमध्ये बोराट्याची नाळ आहे. वाचक यावरून दिशांचा अंदाज लावू शकतील. घाटमाथ्य़ावरून उतरल्यास लिंगाण्यावर जाण्य़ासाठी सर्वात सोयीची वाट ही बोराट्याच्य़ा नाळेपासूनच आहे. त्यामुळे, सिंगापूरची नाळ उतरल्यावर बोराट्याच्या नाळेच्य़ा वाटेला जोडणारी एखादी वाट आहे का असा शोध आम्ही घ्यायला लागलो. बाबूनेही तशी एक वाट सांगितली, आणि सिंगापूर नाळेच्य़ा तोंडापाशी कड्याजवळच उभे राहून दिशांच्या आधारे समजावूनही दिली. ह्या वाटेने गेलो असतो तर आमचा लिंगाण्याला वळसा वाचला असता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजच लिंगाण्याच्या पायथ्याला पोहोचू शकलो असतो.

सिंगापूरच्या नाळेपर्यंत पोहोचलो आणि मला चवड्याला भयानक वेदना व्हायला लागल्या. माझ्या नव्या कोऱ्या hunter shoesनी ऐनवेळी "खिंडीत" गाठले होते. त्यावर band-aid बांधून चालायला सुरूवात केली आणि डाव्या गुडघ्याने असहकार पुकारायला सुरूवात केली. कालपासूनच्या सह्याद्रीतल्या ’वजनदार’ पायपीटीमध्ये कुठेतरी तिरका पाय पडला असणार आणि त्यामुळे muscle pull झाला असणार ही खात्री झाली. पण इलाज नव्हता. त्यातल्या त्यात हलकी बॅग पाठीवर घेतली आणि नाळ उतरून खाली आलो. इथून बाबूच्या सांगण्यानुसार आम्हाला झुडूपात शिरून पश्चिमेच्या दिशेने जात राहायचे होते. ज्यामुळे आम्ही लिंगाण्याच्य़ा अलीकडच्या सोंडेवर पोहोचलो असतो आणि त्या उतारावरच्या वस्तीवर कोणीतरी आम्हाला पुढचा रस्ता दाखवला असता. अन्यथा मळलेल्या पायवाटेने दापोली गावात पोहोचाल असा पर्याय दिला. पण ती झुडुपात शिरायची वाट सापडेना. बरं, घड्याळात पाच वाजत आले होते, आणखी तासा-दीडतासाने सूर्य मावळला असता, त्यामुळे घाई करायला हवी होती. अखेर, समोर आलेल्या पायवाटेने उतरायला सुरूवात केली. मध्येच एका मोकळ्या गवताळ सपाटीवर थांबलो, आणि मागे पाहिले. सुंदर view दिसत होता. डाव्या हाताला लिंगाणा, त्याला खेटून V-shape ची दरी, तिला खेटून उजवीकडे बोराट्याच्या नाळेचा कडा, लपलेली नाळ, तिच्या उजवीकडे वळसे घेत गेलेला डोंगर, त्याच डोंगराच्या मागे गायब झालेली सिंगापूरची नाळ आणि त्याच रेषेत उजवीकडे ’ती’ पायवाट आणि शेवटी ’तो’ ओढा, जिथून आम्ही तो rockpatch पार केला होता.

तसेच चालत खाली आलो आणि संपूर्ण डोंगर उतरून दरीमधल्या एका ओढ्य़ामध्ये विसावलो. सूर्य दिसेनासा झाला होता, आणि जिथे आम्ही पोहोचणे अपेक्षित होते ती लिंगाण्याची सोंड खूप दूर ओढ्याच्या अलीकडच्या अंगाला होती. त्या सोंडेपर्यंत अंधार पडायच्या आत जाणे शक्य नव्हते, म्हणून ओढा ओलांडून हीच पायवाट follow करावी असा निर्णय घेतला आणि त्यानुसार पुढे निघालो. माझा गुडघा चांगलाच दुखत होता. त्यामुळे गाव गाठून त्याला विश्रांती देणे must होते. पाने तोडायला जंगलामध्ये गेलेला दापोली गावातील एक म्हातारा वाटेमध्ये भेटला आणि त्याच्या सोबत संधीप्रकाशात दापोली गावामध्ये दाखल झालो.

लिंगाणा किल्ल्याच्य़ा एका अंगाला वसलेले उण्यापुऱ्या १०० घरांचे दापोली हे टुमदार गाव.(लिंगणमाची किल्ल्याच्य़ा पलीकडच्या बाजूस आहे) छोट्या गल्ल्या, घरांमध्ये वीज आहे, पण रस्ते अंधारात. गावामध्ये दत्तमंदिरात औटघटकेचा संसार मांडला. मंदिरासमोरच्या घरातून कुणीतरी हंडाभर पाणी आणून दिले. जवळच विहीर होती, म्हणून त्यातून पाणी शेंदण्यासाठी पोहराही आणून दिला. विहीरीवर जाऊन हातपाय धुतले, Fresh झालो आणि स्वयंपाकाची तयारी केली. मयूरने mix veg soup आणि अस्मादिकांनी मुगाच्या डाळीची खिचडी बनवली. (खिचडी चवीला उत्तम झाली होती हे इतरांचे मत इथे जाता जाता टायपून ठेवायला हरकत नाही. :-)) एकंदरीत सूप-खिचडी-चटणी-लोणचे-पापड अशी निरामिष पण तरीही Royal मेजवानी लिंगाण्याला आणि हूल दिलेल्या बोराट्याच्या नाळेला साक्षीस ठेऊन त्या दत्तमंदिरात पार पडली. रात्री १० वाजता मयूरला पान खायची हुक्की आली. तेव्हा गावात आम्ही आणि कुत्री सोडली तर कुणीही जागे नाही हे त्याच्या लक्षात आणून द्यावे लागले.

दोन दिवसांच्या heavy पायपीटीमुळे आणि सिंगापूरच्या नाळेतून लिंगाण्याच्या विरुद्ध दिशेला उतरावे लागल्यामुळे लिंगाणा करून रायगडला जाणे ही आता अशक्य गोष्ट होती. माझा गुडघाही त्रास देत होताच. त्यामुळे एक किल्ला वजा करावा लागणार होता. अर्थातच लिंगाणा skip करून उद्या रायगडकडे निघायचे असे ठरवून आशिषने दिलेला Ice tea रिचवून अंथरूणावर आडवे झालो. घाटावरील हारपूडची धनगरवाडी ते घाटाखालील दापोली अशी forever memorable भ्रमंती आज झाली होती. ट्रेकचा मुख्य आणि the most exciting भाग आता संपला होता. आता उद्या बाकी होती शिवतीर्थ रायगडाला भेट आणि ट्रेकची सांगता...
*********

तोरणा ते रायगड : Day - 3
ओंकारने पहाटे ५ पासून सर्वांना उठवायला सुरूवात केली आणि सर्वजण उठले तेव्हा साडेसात वाजले होते. माझा गुडघा अधिकच दुखायला लागला होता. आणि त्यातच आमच्या गॅस शेगडीने काम बंद आंदोलन सुरू केले. नॉबचा काहितरी प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे ज्वाळा मंद पेटत होत्या. त्यामुळे चहाचाही कार्यक्रम रद्द करून आम्ही सामान बांधले. दापोलीहून महाडसाठी सकाळी ९ आणि सायंकाळी ६ अशा दोन एसटी बसेस आहेत. किंवा चालत दापोली-वाघिरे (२ तास) आणि वाघिरे-टकमकवाडी (टकमकटोकाच्या खालचे गाव - २ तास) हाही पर्याय आहे. किंवा दापोली-वारंगी एसटी व वारंगीहून निजामपूर आणि निजामपूर-रायगडवाडी असेही जाता येते. वारंगीसाठी एसटी साडेआठाला होती. गावातून बाहेर पडून एका आंब्याजवळून पायवाटेने कुंडीपाशी बस मिळेल असा सल्ला गावात मिळाला. पण कुंडी म्हणजे नक्की काय हे शेवटपर्यंत समजले नाही आणि विचारूनही घेतले नाही. (कुंडीचा शहरी मराठी आणि कानडीतला माहित असलेला अर्थ व्यर्थ होता). त्यामुळे तो आंबाही चुकला आणि ती पायवाटही. कालपासून नुसताच दुखत असलेला डावा गुडघा तर आता रायगडाच्या पायथ्यालाच बसून राहावे लागेल अशी भीती घालायला लागला होता. तात्पर्य, सर्वजण सरळ रस्त्यानेच चालत राहिलो आणि शेवटी ९ च्या एसटीने महाड गाठले. तिथून मग ’विक्रम’ने रोपवे गाठला.

गेले २ दिवस जरी आम्ही मनुष्यप्राण्यापासून खूप दूर होतो तरी २५ डिसेंबरच्या जोडून आलेल्या सुटीमुळे रायगडावर भरपूर प्रजा जमलेली असणार असा अंदाज होताच. रोपवेला पोहोचलो तेव्हा बारा वाजले होते. महाडहून पुण्याला शेवटची एसटी रात्री साडेअकराला होती. तोपर्यंत वेळ हातात होता. जास्तीत जास्त वेळ रायगड पाहण्यात घालवावा म्हणून रोपवेने रायगड चढून जायचे ठरवले. मयूर आणि ओंकार तिकिटे काढायला गेले आणि ६ तासांचे waiting असल्याचे बघून परतले. आता पायऱ्यांनी चढून जाणे हाच एकमेव पर्याय होता. माझ्या गुडघ्य़ाची अवस्था पाहता उरलेल्या चौघांनी मी वर येण्याचा निर्णय माझ्यावर सोपवला.

रायगडासारखी भव्य, आणि मराठी साम्राज्याची राजधानी असलेली पुण्यभूमी कितीही वेळा पहिली तरी कमीच. रायगड आणि बाकीचे किल्ले यात मला ठळकपणे जाणवणारा फरक हा की बाकीचे किल्ले बांधताना राजांचं बचाव आणि संरक्षण हे मुख्य धोरण होतं. पण रायगडाच्य़ा बांधणीतून या धोरणाबरोबरच मराठी सत्तेच्या स्थापनेबद्दलचा आणि शाश्वततेबद्दलचा निर्वाळा राजांनी दिला. इथे मराठी कारागिरीचे खुले प्रदर्शन आहे. होळीचा माळ असो, बाजारपेठ असो, नगारखाना असो, गंगासागर टाके असो. मराठी सत्तेची ताकद ठसवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न इथे जागोजागी दिसतो. रायगड बांधणाऱ्या हिराजी इंदलकराला रायगड पाहताना कितीतरी वेळा मनातून सलाम मिळत असेल. असा हा किल्ला न पाहता मी खालीच बसून राहणे शक्यच नव्हते. अखेरीस ट्रेकची सांगता मी रायगडावरतीच करेन असे ठरवले. (त्यादिवशी उभ्या रायगडाने काठीच्य़ा मदतीने एक ’किटक्या मावळा’ दिवसभर भिरभिरताना पाहिला. ;-))

पाच जणांचे आवश्यक सामान आणि किंमती चीजवस्तू (म्हणजे कॅमेरा आणि पैसे)एकाच बॅगमध्ये भरून घेतल्या. बाकीच्या बॅग्ज खालीच एका दुकानात (स्वत:च्य़ा जबाबदारीवर) ठेवल्या. मधल्या खिंडीतून चढून ५०० पायऱ्या वाचवल्या आणि आम्ही तासाभरात वर पोहोचलो. एका काठीच्य़ा आधारे दुखरा गुडघा घेऊन मी त्या दिवशी चढलेला रायगड हाही एक अविस्मरणीय प्रसंग होता. दिवसभर रायगड फिरून सायंकाळी टकमक टोकावरून सूर्यास्त पाहून ३ तासांच्या waiting नंतर रोपवेने साडेआठाला रायगड उतरलो. अर्ध्यातासाने वाळूची वाहतूक करणारा एक डंपर तिथे आला. त्या डंपरवाल्याने महाडपर्यंत सोडायचे कबूल केले. महाडपर्यंतचा तो उघड्या डंपरमधला परतीचा प्रवास कायम लक्षात राहिल. एका अविस्मरणीय ट्रेकची सांगताही तितकीच लक्षात राहणारी होती.

*******
तोरणा ते रायगड हा खूप वर्षांपासून डोक्यात असलेला ट्रेक हा अशाप्रकारे पार पडला. सगळेच खूपदा वाट चुकलो होतो, भरकटलो होतो आणि दरवेळी finally वाटेला लागलो होतो. वाटाड्या घेऊन हा ट्रेक करणे हे उत्तमच. पण वाट चुकण्यातही मजा आहे आणि ती आपली आपण शोधण्यातही मजा आहे. लिंगाणा किल्ला राहून गेलाय खरा, पण त्याऐवजी या २ दिवसांच्या सह्याद्रीतल्या भटकंतीने खूप काही दिलंय.. भागाबाईचं आतिथ्य, बोराटा नाळ ते सिंगापूर नाळ हा प्रवास, बाबू वाटाड्याने माझ्या शरीरयष्टीकडे(यष्टीसारख्या शरीराकडे) आणि मला rock patches उतरतांना पाहून दिलेलं ’किटक्या मावळा’ हे नाव, रायगडवाडी ते महाड हा उघड्या डंपरमधला प्रवास, हे सगळं त्या वाट चुकल्यामुळे अनुभवता आलं. सगळेच जण खूप थकलो होतो आणि त्याचवेळी ३ दिवसातल्या close to heart अशा सह्याद्रीतल्या रानवाऱ्यामुळे आणि उनाड झऱ्यांच्या पाण्यामुळे fresh ही झालो होतो. महाडहून रात्री साडेअकराच्यागाडीत पुण्यापर्यंत उभे राहून आलो तेव्हाही पुणे-घिसर एसटीच्या कंडक्टरची ’पैसे देऊन वर जीवाला त्रास’ हीच comment डोक्यात घोळत होती. हा लेख लिहित असतांनाही गुडघा पूर्णपणे बरा झालेला नाही. पण पुढच्या ट्रेकपर्यंत तो खणखणीत बरा झालेला असेल हा भक्कम दिलासा त्या मावळातल्या आडवाटांनी, कभिन्न कातळांनी आणि घाटावरून कोकणात झेपावणाऱ्या ओढ्या-नाल्यांनी केव्हाच देऊन ठेवलाय आणि माझ्यासारख्या छोट्या भटक्यासाठी तो पुरेसा आहे..

- नचिकेत जोशी

 

एका प्रवासाची गोष्ट


शनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या "११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस,कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस"मधल्या दोन तासांच्या प्रवासाची ही गोष्ट आहे!

हा अलौकिक प्रवास घडायचे निमित्त होते - "ऑफबीटसह्याद्री" आयोजित समस्त ट्रेकरजनांच्या आदरास पात्र अशा "ढाक बहिरी" नावाच्या ट्रेकचे! भेटायची जागा "लोणावळा स्टेशन येथे रात्रौ ९.२० पर्यंत केव्हाही" असल्यामुळे नोकरी आटोपून मी 'सह्याद्री'ने जायचे ठरवले. वास्तविक, कोल्हापूरला जाणार्‍या "सह्याद्री"मध्ये S4 बोगीमधील रिझर्वेशन्स पुण्याहून भरली जातात. त्यामुळे पुण्यापर्यंत तिकिटावर (प्रसंगी टीसीला 'भरवून') जाता येते. पण त्या दोन दिवसांच्या खात्यावर अस्मादिकांच्या नशिबात अविस्मरणीय योग लिहिलेले असल्यामुळे S4 सोडून जनरल डब्यात शिरायची मला बुद्धी झाली.

सीएसटी ते दादरमध्येही ट्रेन पंधरा मिनिटे लेट आली. (लोणावळ्यानंतर 'चिक्कार' अनयुज्वल स्टेशन्सवर थांबत जाणारी 'सह्याद्री' ही एक 'हात दाखवा ट्रेन थांबवा' कॅटेगरीतली गाडी आहे हे चढण्यापूर्वी प्लॅटफॉर्मवर पुण्याला जाणार्‍या एक-दोन प्रवाशांशी मी बोलून घेतलेच होते.त्यांना आता आणखी उशीर झाला असता!) अगदी आरामात नाही तरी एक सीट बसायला नक्कीच मिळेल असा विश्वास वाटत होता. (नंतर कळले, तो फारच अवास्तव भाबडा होता.) शनिवार संध्याकाळ असला तरी गर्दी स्वतःच्या आटोक्यात राहिल असंही वाटलं. दादरला गाडी थांबता थांबताच चढलो. जनरल बोगीच्या दारात एक बाई वाटणारी मुलगी उभी होती. (का? - देव जाणे!) माझ्या पाठीवर ट्रेकींगची मोठी वजनदार सॅक आणि हातात अत्यंत हलकी कॅरीमॅट! नाईलाज होता. तिला रेटूनच आत शिरलो आणि जागा मिळते का शोधत जाऊ लागलो. (तिने शिव्या घातल्या नसणार याची खात्री आहे!) प्रत्येक कंपार्टमेंट खच्चून भरलेला! उजव्या बाजूच्या खालच्या आणि वरच्या बर्थवर कमीतकमी प्रत्येकी ४ माणसे बसलेली! डाव्या बाजूच्या समोरासमोरच्या सिंगल सीट्सवर प्रत्येकी एक प्रवासी आणि वर अस्ताव्यस्त बॅगा पसरलेल्या!अचानक असं लक्षात आलं की आपण त्या संपूर्ण डब्याच्या मध्यभागी अडकलो आहोत! गर्दीमुळे पुढे जाऊ शकत नाही आणि मागच्या वाटा केव्हाच बंद झाल्या आहेत.

एव्हाना गाडी सुटली होती. अचानक माझं लक्ष एका कंपार्टमेंटमधल्या सगळ्यात वरच्या बर्थकडे गेले. तिथे चक्क दोनच माणसे बसलेली होती आणि पलीकडे बॅग्स ठेवलेल्या होत्या. ही गोष्ट गर्दीच्या लक्षात आलेली नाही आणि फक्त मलाच दिसली आहे हा माझा आनंद क्षणकाळच टिकला. कारण मी जेव्हा ताबडतोब त्याला बॅग काढून तिकडे सरकायला सांगितले, तेव्हा तो म्हणाला, "तिथल्या लाकडी फळ्या तुटलेल्या असून केवळ लोखंडी रॉडची चौकट आहे, आणि म्हणून तिथे बॅगा ठेवलेल्या आहेत!" मी विचार केला, मेरे पास वो है, जो इनमेसे किसीकेभी पास नही है - आणि ती गोष्ट म्हणजे रात्रीच्या मुक्कामात झोपण्यासाठी घेतलेली कॅरीमॅट! मग पुढच्या गोष्टी यथासांग घडल्या. पाच मिनिटांनंतर मी त्या तुटलेल्या बर्थवर होतो. माझ्या 'खाली' रॉडच्या चौकटीच्या आधारे ठेवलेली कॅरीमॅटची गुंडाळी आणि त्याखाली खालच्या बर्थवर बसलेल्या माणसाचे डोके! पुढचा बराच वेळ मला 'मी जर खाली कोसळलो तर काय?' हीच भीती वाटत होती! पण तिकडे दुर्लक्ष करून मी स्थिरस्थावर व्हायला लागलो.

माझ्या समोरच्या अप्पर बर्थचं नशीबही असंच "तुटकं" होतं. त्यामुळे तिथेही तीनच माणसे होती. मग मी माझी सॅक त्या बर्थवर ठेवून दिली. आणि मी लोणावळ्याला उतरेपर्यंत त्यावरचा माणूस तिला आपली मानून धरून बसला होता आणि मी निवांत झालो होतो. खालच्या बर्थवर एक माणूस, दोन बायका. त्या दोन बायका एकमेकींच्या कुणीतरी असाव्यात. (आपण सासू-सुना समजू). त्यांच्या शेजारी अजून दोन माणसे. माझ्या खालच्या बर्थवर कोण बसले आहे हे मात्र कळू शकले नाही, आणि पडायच्या भितीने मी वाकून बघायचा प्रयत्नही केला नाही. यात किती वेळ गेला माहित नाही, पण गाडी स्लो जात होती. कारण बर्‍याच वेळाने जेव्हा कल्याण आले असे मला वाटले, तेव्हा गाडी पारसिकच्या बोगद्यात शिरत होती.

पुढचे दोन तास खायला उठणार अशी माझी खात्री व्हायला लागली होती. वेळ कसा काढायचा हा खरंच प्रश्न होता. घड्याळ बघून झाले, मोबाईल पाहून झाले, थोडा वेळ नखंही कुरतडून झाली. ट्रेकला निघालो असल्यामुळे जवळ पुस्तकही नव्हते. आणि सॅकमध्ये हेडफोन घ्यायला विसरलो होतो. माझ्या शेजारच्या माणसाच्या कानात केव्हाच हेडफोन शिरले होते. त्या पलिकडे एक विद्यार्थी वाटावा असा एक तरूण बसला होता. तो एक जाडजूड पुस्तक वाचण्यात दंग होता. "what is cood" की असं काही तरी टायटल असलेलं ते पान मी वाचलं आणि हे "dhood" आपल्याच्याने झेपायचं नाही असं मला लगेच कळलं! माझ्या मागे असलेल्या दुसर्‍या कंपार्टमेंटमध्ये अप्पर बर्थवर वेगळी परिस्थिती नव्हती. एकंदरीत बोगीमध्ये "बघण्यासारखं" कोणीही नव्हतं आणि मीही बघण्यासारखा नसल्यामुळे कोणी माझ्याकडेही बघत नव्हतं! एक कवी, गझलकार, ट्रेकर, संपादक आपल्याबरोबर प्रवास करतोय याची जाणीव त्या गर्दीला अजिबातच नव्हती! हल्लीच्या समाजात... जाऊद्या!

मी पुन्हा एकदा स्वतःची पोझिशन चेक करून घेतली. दोन्ही पाय समोरच्या बर्थच्या रॉडला टेकवले होते. कॅरीमॅटवर फक्त बूड टेकवले होते. दोन्ही हात मोकळे होते आणि त्या अवस्थेत आराम शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. त्या इतक्या बिकट गर्दीमध्ये जेव्हा "सामोसे - वीसचे पाच" ही आरोळी ऐकली तेव्हा मात्र मी धन्य झालो! दुसर्‍या टोकाकडून तो माणूस परत येताना तीच आरोळी "दहाचे तीन" अशी झाली! मग जसेजसे कल्याण जवळ येऊ लागले, तसा तो "दहाचे चार" वर आला. त्याच्या कडून मग कुणीतरी चार सामोसे घेतले. कल्याण प्लॅटफॉर्मात गाडी शिरताना तर "दहाचे सहा"! आणि इथे त्या चार सामोसे घेणार्‍याचा आणि माझा असे दोन चेहरे भिन्न कारणांमुळे पाहण्यासारखे झाले होते! माझे "जोशी"मन एकदम जागे झाले! पण एकट्याच्याने सहा सामोसे संपणार नसल्याने मी शेजारच्याला सामोसे खाणार का असे विचारून पाहिले. (खायच्यावेळी कसली ओळख? हक्काने खायचं!) पण तो बिचारा "अनोळख्या सहप्रवाशाने दिलेले खाद्यपदार्थ खाऊ नयेत" या विचारांचा पाईक असावा! तो नाही म्हणाला आणि जोशींनी आपणहून ऑफर केलेल्या खाण्याची दुर्मिळ संधी हुकवता झाला! समोरच्याचा उपास होता. मग मीही सामोसे घेण्याच्या विचारांचं 'कल्याण झालं' असं मानून गप्प बसलो.

कल्याण आले तेव्हा मागच्या कंपार्टमेंटमध्ये जरा इंटरेस्टींग गोष्टी घडल्या. कल्याणला शिरलेली भयंकर गर्दी हे त्याचे मुख्य कारण! आधीच चार माणसे बसलेल्या अप्परबर्थवर जेव्हा गर्दीतला एक जण बिंधास चढला तेव्हा मग काही तुरळक शाब्दिक चकमकी वगैरे गोष्टी गर्दीची घटकाभर करमणूक करून गेल्या. खरंतर गर्दीच एवढी होती, की कुणी भांडायच्याही मूडमध्ये नव्हते. कारण इंचभर जागेवर उभं राहण्यासाठी भांडण्यापेक्षा सरळ तिथेच लोटालोटी करून जागा घ्यावी हे अधिक प्रॅक्टीकल होतं. सर्वजण तेच करत होते.

माझ्या आसपासच्या बर्थवरील सर्वांच्या कानात वायरी होत्या आणि मी हातभर अंतरावर असलेल्या आणि मला जराही वारा न देणार्‍या पंख्यांचा आवाज ऐकत होतो. तेवढ्यात त्यापैकी एका पंख्यावर ठेवलेला बूट खाली पडला आणि माझ्या गुडघ्यावर टप्पा घेऊन खालच्या माणसाच्या मांडीवर विसावला. त्याची पहिली नजरही माझ्यावर नको म्हणून मी तेव्हाच माझे दोन्ही हंटर शूज लेस तपासायच्या बहाण्याने (स्वतःचा तोल सांभाळून) माझ्या हातात धरले.

"आज गाडी लई प्यॅक आहे!" - अखेर समोरच्या बर्थवरच्या माणसाला कंठ फुटला. मला स्वतःला डोक्यात कविता-बिविता सुचत नसतील तर अबोल प्रवास अजिबात आवडत नाहीत. कानात वायरी खूपसून गाणी ऐकत प्रवास करणार्‍यातला मी नाही! त्यापेक्षा शेजारच्या अनोळख्यांशी गप्पा मारण्यातही मजा येते. मग सह्याद्री एक्प्रेस आजच कशी भरलेली आहे, इतर गाड्यांच्या तुलनेत ही किती स्लो आणि अभागी गाडी आहे इ इ विषयांवर आमच्या गप्पा झाल्या. त्याच्या शेजारचा माणूसही थोड्या वेळाने त्यात सामील झाला. लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे जनरल डबे स्त्रियांनी प्रवास करण्याजोगे नसतात वगैरे सामाजिक मुद्द्यांवरही आम्ही आमची (अमूल्य) मते शेअर केली. तेवढ्यात विरूद्ध बाजूकडील वरच्या रॅकमधली एक बॅग घसरून खाली पडली. मग आम्ही "ट्रेनचे रूफ त्या रॅक्सवरतीही सपाटच असायला हवेत म्हणजे अजून ५-६ बॅगा बसतील" असा मुद्दा डिस्कस केला. खंडाळा घाटातल्या बोगद्यांमध्ये दरवाजात उभे असलेल्यांनी लहान मुले जशी ओरडतात तशा किंकाळ्या मारल्यावर तर "पहिल्यांदाच बोगदा पाहिला असणार" या त्याच्या कॉमेंटच्या टोनवर सगळेच हसलो!

माझ्या सॅकचा कंबरेला सपोर्टसाठी असलेला बेल्ट खाली लोंबकळत होता. खालच्या बर्थवरील दोघींपैकी सुनेच्या हाताला अचानकच एक टाईमपास मिळाला होता. सॅक त्या जागी ठेवल्यापासून देवळातली घंटा हलवावी तसा तो बेल्ट ती हलवत बसली होती. गप्पांमध्ये एखादा भावनिक वगैरे मुद्दा निघाला की ती तो जोरात हलवायची. कधीकधी सासूला टाळी कशी द्यायची असं वाटत असल्यामुळे ती त्या बेल्टलाच टाळी द्यायची. कल्याणनंतर तिने तो एक-दोनदा निरखून, तपासून वगैरे पाहिला! कर्जतनंतर तिने तो बेल्ट हलवणे थांबवून घट्ट धरून ठेवला आणि घाटातल्या बोगद्यांमध्ये तर तिने गप्पांच्या नादात त्याला खालून गुंडाळायला सुरूवात केली. इथे मात्र मी सावध झालो. गुंडाळायला बेल्ट कमी पडतोय असं वाटून तिने जरा जरी जोर लावला असता तर ती १०-१२ किलोची सॅक खाली आली असती. तसंही एवढा वेळ त्या बेल्टशी तिची दोस्ती झाली होतीच! पण सुदैवाने तिने तसं काहीही केलं नाही!

कर्जतनंतर तर डब्यात एवढी गर्दी झाली होती की मी खाली उतरून चालत दरवाज्यापर्यंत जाण्याऐवजी त्यांच्या डोक्यावरून सरपटत गेलो असतो तरी सहज पोचलो असतो! सुदैवाने माझ्या खालच्या बर्थची खिडकी "emergency window" होती. लोणावळा स्टेशन त्याच बाजूला येणार होते. त्यामुळे दरवाजापेक्षा तिथूनही उतरण्याचा पर्याय होता. मी माझ्या समोरच्या माणसाला हे बोलून दाखवल्यावर तो जोक समजून हसलाही! खंडाळ्याच्या आधी दुसर्‍यांदा मी त्याला तोच विचार बोलून दाखवल्यावर मात्र तो शहाण्यासारखा, 'काही गरज नाहीये, दरवाजातूनच उतरा, आरामात पोचाल' असे बजावता झाला. खालच्या माणसाला 'खंडाळा आलं की सांगा, मग उतरायला घेतो' असं सांगितल्यावर तो "कराड? त्याला लई अवकाश आहे" असं म्हणाला. खंडाळा आणि कराड यांच्या उच्चारात काय साम्य आहे माहित नाही! पण काही का असेना, त्यानंतर तो बिचारा खिडकीशी नाक लावून खंडाळ्याकडे लक्ष ठेवून बसला होता.

अखेर, घड्याळात वेळ पाहून, "आतापासून उतरायला घेऊ तर लोणावळा येईपर्यंत दरवाजा गाठता येईल" असा विचार करून अखेर त्या अधांतरी आसनावरूनखाली उतरलो. पॅसेजमध्ये भयंकरच गर्दी होती. त्यात खंडाळ्याला काही माणसे चढली. इतक्यात माझ्या शेजारच्या एका बुटुकमूर्तीला उलटीचा फील आला! आणि तो जवळच्या खिडकीशी जायचे सोडून टॉयलेटच्या दिशेने निघाला! ते सर्व ढोंग असून उलटीपेक्षा त्या गर्दीतून लाक्षणिक कलटीचा तो प्रयत्न आहे हे उपस्थितांपैकी एकाच्या लक्षात आले आणि मग त्याच्या "झेपत नाही तर खातो कशाला" या त्याच्या अस्सल शालजोडीतल्या ठसक्यावर आजूबाजूला हशा पिकला!

तात्पर्य, दोन तास कसे गेले कळले नाही. प्रचंड गर्दी, उकाडा, एकाच स्थितीत उभे राहण्याची शिक्षा इ सर्व प्रतिकूल गोष्टी असूनही माणसे निवांत होती. एक-दोन कुरबुरी सोडल्या तर त्या परिस्थितीतही हास्य-विनोद सुरू होते, वर्तमानपत्रातली कोडी सोडवण्याची तयारी होती, खाणं सुरू होतं, गंभीर चेहर्‍यांसह गप्पाही सुरू होत्या. प्राप्त परिस्थितीला अशा दृष्टिकोनातून सामोरे जाण्याचे दृश्य खूप आनंद देऊन जाते. त्या गर्दीतून हिंदकाळत, ठेचकाळत माझा इवलासा जीव सांभाळत लोणावळ्याला स्टेशनच्या विरूद्ध बाजूला उतरलो तेव्हाही एका अस्ताव्यस्त, त्रासदायक पण तरीही अविस्मरणीय प्रवासाच्या आठवणी मनात रेंगाळत होत्या आणि मी ढाकच्या तितक्यात अविस्मरणीय ट्रेकसाठी रेड्डी झालो होतो...

- नचिकेत जोशी (२१/११/२०११)

 

 

 

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...