Wednesday, November 23, 2022

लो.- भी.

 चंगळवादी लोणावळा-खंडाळ्यापासुन निबिड अरण्यातील भीमाशंकरचा प्रवास म्हणजे सह्याद्रीच्या दर्याखोर्यातून पायपीट करत जाणे. एकप्रकारे हा मोहमाया त्यागून खडतर साधनेची निवड केल्याचाच अनुभव आहे. म्हणजे असे म्हणा की ट्रेकिंग धर्मियांसाठी लोणावळा ते भिमाशंकर ही पंढरपूरची वारी आहे. कॉलेजच्या दिवसात पायाला भिंगरी लागली की अनेक छोट्या मोठ्या ट्रेक नंतर लो-भी करायचे आपसूकच घडून येते. यातल्या अनेक सहली सुखवून जातात तर काही मोचक्या सहली खडतर परीक्षा घेऊन शिकवून जातात.

तसं पहायला गेल्यास काय नाहीये लोणावळा खंडाळ्यामध्ये. सुखाचैनीच्या अनेक साधनाची रेलचेल, मोठमोठी हॉटेल्स, महागडी फार्म हाउसेस, पिठलं भाकरी पासुन इटालियन वगैरे आणि खूप काही. पण भटका कशाला ढुंकून बघतोय ह्या सगळ्या चोचल्ल्यांना. कारण त्याचा मार्ग जातो डोंगर वाटांनी, मुक्कामाला त्याला छोट मंदिर, शाळेचा व्हरांडा, गुरांचा गोठा किंवा गड किल्ल्यावरची गुफा पुरे होते. खायला जे मिळेल ते खातो. जास्तीत जास्त पायपीट हीच त्याची खरी चैन असते.

लोणावळ्यावरून तुंगार्ली धरणामार्गे राजमाची आणि ढाक किल्ल्याला जाणारा मार्ग पकडल्यास दिवसभरात आपण जांबवली या गावी पोहोचतो. इथला मुक्काम घेतल्यावर परत दिवसभर चालून आपण मेटलवाडी किंवा सावळे या गावी मुक्कामास थांबतो. येथून दिवसभराची पायपीट आपल्याला भिमाशंकरला पोहोचवते. एकूण दोन रात्र तीन दिवसांच हे प्याकेज एकदा तरी करायलाच हवं. पण ह्या सहलीची खरी मजा आहे ती पावसाळ्यात. पावसाचा सामना करायची तयारी असल्यास यासारखी धमाल नाही. रिस्क असतेच पण “नो रिस्क नो रिवार्ड “ या थिअरीने ही सहल करायलाच हवी. ह्याच हिशोबाने आम्ही पाच जणांनी २००३मध्ये ही सहल आखली. पहिल्या श्रावण सोमवारी भीमाशंकर गाठायचे असे आम्ही कॉलेजच्या मित्रांनी ठरवले होते.

त्याच्या मागल्या वर्षी मी हा ट्रेक केला असल्याने त्यातल्या त्यात मी थोडा माहितगार होतो. शेवटचा टप्प्यात धुक्याने वाट चुकते त्यामुळे गरज पडली तर वाटाड्या घ्यावा लागेल हे सांगून मी तसे बजेट आखले होते. बजेट हा विषय आम्हाला डोंगरांपेक्षा कठीण होता. जुलै महिन्याचा धो धो पाऊस अंगावर घेत प्रवासाला सुरुवात केली. २३ जुलै २००३ ला शिवाजीनगरवरून लोणावळा लोकलने आमचा प्रवास सुरु झाला. सकाळी घरातून बाहेर पडतानाच वरुण राज्याने आम्हाला श्रावण आगमनाचा ट्रेलर दाखवला. पहिल्या दिवसाचा पायी प्रवास सुरु करण्या अगोदरच सगळे मित्र ओले झालो होतो. पावसापासून बचाव करणारे आमचे रेनकोट किती साथ देतील याची कल्पना पण आली.

लोणावळ्यावरून अर्धा तास चालल्यानंतर जंगलास सुरुवात झाली. डोंगरदऱ्यात पावसाचं सौंदर्य काय असू शकत ते माझ्यासारख्या मराठवाडा विदर्भात राहणाऱ्याला माहिती नव्हत. हिरवीगार वनराई, पावसाच्या धारा, आजूबाजूला वाहणारे पाणी, निसरडा रस्ता, ओसंडून वाहणारे ओढे, वारेमाप वाढलेलं गवत आणि धुक्यात लपलेली वाट...अहाहा. धुक्यातून चालताना बालपणीचे ढगातून चालण्याचे स्वप्न पूर्णत्वास आल्याने होणारा आनंद पण वेगळाच होता. रमत गमत धबधबे, डोंगरकडे पाहत जांबवलीच्या शिवमंदिरात संध्याकाळी पोहोचलो, गावात पोहोचे पर्यंत चांगला अंधार पडला होता. डोंगरात भटकणारे या गाववाल्यांना नवे नाही, त्यांना चीड असते ती चाळे करणाऱ्या पोरा-पोरींची आणि दारू पिणार्यांची. आम्ही त्यातले नाहीत हे ओळखून एका स्थानिक राजकारणी सज्जनाने ग्राम देवतेच्या देवळात आमचा राहण्याचा बंदोबस्त केला. प्लास्टिक मधील कोरडे कपडे चढवून आधी चहा बिस्कीट मग लोणचे भात असा कमीतकमी साधनात आणि पुरेपूर अंधारात भरपेट जेवणाचा आस्वाद घेतला.

जेवण उरकून ग्रामस्त मंडळींशी चालू राजकारणाच्या आणि आमच्या पुढीलवाटेचा माहितीपर संवाद झाला. मेणबत्ती विझवली आणि आम्ही निद्रादेवतेच्या उपासनेत गडप झालो. मातीने जेमतेम सारवलेल्या मंदिरात आधीपासूनच वस्तीस असलेले मूषकराज्याचे भलेमोठे बिर्हाड संचार करायला लागले, बराचवेळ खर्च करून सर्व स्याक दोर्यांना बांधून लटकवले आणि त्या मूळ निवास्यांना त्यांची जागा मोकळी करून दिली. डोळा लागतो न लागतो गावकरी मंदिरात सकाळच्या दर्शनाला हजर. थंडीने, थकव्याने पांघरून सोडावे वाटत नव्हते. तेवड्यात एका लहान पोराने चांगला पातीलभर चहा आणि डेचकभरून दुध आणून दिल. अजून काय हवं. त्यालाच दुपारच्या भाकऱ्या पिठलं सांगून आम्ही पुढच्या प्रवासाची तयारी सुरु केली. एक मोठा डोंगर आणि दिशेचा अंदाज चुकावणार फसवं पठार पार करायचं की धरणाच्या बाजू बाजूने खांडी गावापुढच्या मेटलवाडीत मुक्कामास पोहोचणे, असा दिवसभराचा अजेंडा होता. पठारावरची वाट सापडल्यास संध्याकाळी सहज पोहोचता येते.

परत अंगावर ओले कपडे,सॉक्स, बूट आणि स्याक घेऊन आम्ही पाच जण डोंगराच्या दिशेने निघालो. कोरडे कपडे नीट गुंडाळून न भिजता ठेवणे हे कौशल्याचे काम. रात्री घालायचे कपडे आणि अंथरून पांघरून ओले झाल्यास वाट लागते. स्टो सोबत लागतो कारण इतक्या पावसात सरपण लवकर मिळत नाही. स्टो ज्याच्यापाठीवर त्याचं गाढवं होण पक्क.

गावातून निघताना एकदा दिशा समजवून घेतली आणि छत्रपतींचा जयघोष करून जांबवलीतून चालायला सुरुवात केली. जसं जसं पुढे जाउ लागलो तस तशी झाडांची दाटी वाढायला लागली आणि मग एकमेकांशी अंतर ठेऊन चालायला लागलो. अश्या वेळी चालता चालता एक गंमत होत असते. आपण सर्वासोबत असूनही कुठे तरी एकट्यात हरवून जातो. असंख्य विचार डोक्यात यायला लागतात. डोक्यात चालणारे विचार, सभोवतालचा हिरवागार निसर्ग, धुक्यात उलगडत जाणारी वाट ह्याचा काहीतरी आपसात संदर्भ असतो. ते अलगद एकमेकात मिसळून जातात आणि कायमचे मनात कोरले जातात. या ठिकाणाच्या क्यान्व्हासवर आपण स्वतःलापण वेगळ्याच भूमिकेतून व स्वरुपात बघायला लागतो. कधी निसर्गासमोर एकदम खुजे तर कधी इथल्या लोकांपेक्षा खूप खूप सुखी.

स्वतःवर झालेल्या बिबट्याच्या हल्लाच्या खोल जखमा आणि पुढची वाट दाखवणाऱ्या गुराख्याला भेटून बराच वेळ उलटून गेला. आम्ही पठारावर वाट धरून चालत होतो धुक्याने दिशा लवकर उलगडत नाही. वाटेत एक घर वजा झोपडी लागली.ही आपण बरोबर जातोय याची खूण होती. अश्या दुर्गम जागी कुणी कशाला राहील असा प्रश्न पडतो. वरईच पीक घेऊन राहणाऱ्या या कुटुंबाला मीठ जरी लागलं तर दोन तीन तासाची पायपीट केल्याशिवाय जवळपास दुकान नाही. शेजारी म्हणजे पठाराच्या दुसर्या टोकावरचा. या घरात शेक घेत नवरा बायको बसलेले होते. “यादिसात काही काम नसत पठारावर. दाराबाहीर बी पोरासोरास्नी सोडाची सोय नै, जनावर फिरतंय. पायटेच डोळे चामाकले ”. मदत म्हणून आमच्या जवळचा वजनदार किराणा त्यांना देऊन त्यांची आणि ओझं उचलानार्याने स्वतःची सोय करून घेतली. गम्मत म्हणजे एक शाळा मास्तर रोज घरी येऊन पठारावरील आसपासच्या अश्या घरातील मुलांना एकत्र करतो आणि शिकवतो असं समजल. अश्या मास्तरांना सलाम.

हे पठार मात्र जितके रमणीय तितकेच भुलवणारे आहे, त्यामुळे इथेच अनेक मंडळी वाट चुकतात आणि भलत्याच ठिकाणी पोहोचतात. संध्याकाळपर्यंत मेटलवाडीची गावाबाहेरची शाळा सहज गाठली. या गावात पण बस येते. किराणा दुकानातून रिकामा झालेला माल भरून घेतला. या गावांमध्ये इथेच पिकवलेला तांदूळ मिळतो, तो खायची मजाच वेगळी. आज सुरुवातीचा जोरदार पाऊस सोडल्यास तसा पाऊस कमी लागल्याने सर्व ओले जरी असलो तरी तसे ताजेतवाने होतो. शाळेत स्वयंपाक व जेवण उरकून लगेच व्हरांडा गप्पागोष्टीसाठी सज्ज झाला. वस्तीला असलेले शिक्षक आणि चारदोन गावकरी मंडळी सोबत गप्पा रंगल्या. अश्या बैठकीत एकतरी गोष्ट अशी बाहेर पडते. म्हणे शेजारी गावात एक मुंबईचा करोडपती होता. तो त्याचा हेलिकॉप्टर इकडे आणून उडवायचा. हेलिकॉप्टर चे पाते उडत उडत शेजारील धरणाच्या पाण्याला चाटवून आणायचे अश्या अवलिया छंदात त्याचा अपघाती मृत्यू झाला म्हणे, खरेखोटे देव जाणो. शाळा गळकी होती. त्यातल्या त्यात चांगला वर्ग मास्तरांनी दिला खरा पण तुटक्या खिडकीने रात्री चांगलेच काकडवले.

सकाळी उठून वाटाड्या शोधला. तो भीमाशंकर डोंगरापाशी आम्हाला सोडणार होता आणि पुढचा थोडा प्रवास आम्हालाच करायचा होता. इथून पुढे लागणारे जंगल खूप घनदाट तर आहेच पण पूर्णपणे निर्मनुष्य आहे. त्यात पावसाचा या भागात विशेष तडाखा असतो. हा टप्पा पण थकवणारा असल्याने कमीत कमी समान सोबत होते. अगदी बिस्कीट पुडे पण मर्यादित होते. हळूहळू चालत निघालो. ग्रामस्थांच्या मुख्य वाटेसोबत अनेक जवळच्या वाटा असतात, त्या समजायला कठीण असतात. जागोजागी रानडूकरांनी उकरून ठेवलेले होते त्यावरून याभागात त्यांचा मोठा संचार असावा. एका ठिकाणाहून पेठचा कोथळीगड दिसला. गप्पाटप्पा करत भोरी विहिरीपाशी पोहोचलो. वेळेचा काही अंदाज नव्हता आणि पुढच्या वाटेचा तर अजिबातच नाही. मात्र वातावरण एकदम साफ होते. वाटाडी माघारी जाण्यासाठी कुरबुर करीत होता. तू नागफणी दाखव आणि माघारी फिर असे त्याला सांगितले होते. थोडे अंतर गेल्यावर “नागफणी नाय न दिसाची धुक्याने, तुमी जावा आता निवांत.डावी सोडायची नाय. फूडे वाट सांगायला गुराखी आहेत की” या त्याच्या आश्वासनावर त्याला राम-राम करून आम्ही पुढची वाट धरली. वाटही तशी चांगली मळलेली होती.

काही वेळाने जंगलाच्या हृदयात प्रवेश केल्यासारखा वाटायला लागले. दाट झाडीमुळे आजूबाजूला काय आहे हे समजतच नव्हते. एका जागी आलो आणि थबकलो. सारख्याच दिसणाऱ्या तीन पायवाटा तीन दिशेला फुटत होत्या. डावी सोडायची नाही हे माहित होत पण डावीकडची वाट डोक्याहूनही मोठ्या गवतात जाऊन नाहीशी होत होती.आता काय करावे समजत नव्हते कारण चुकीच्या वाटेने पुढे गेलो आणि धुक्यात हरवलो तर काय करायचे ? धुक्याने दऱ्यापण दिसत नाहीत. मागे थोडे अंतर जाऊ, एखादा गुराखी भेटेलच, मग त्याला विचारू आणि पुढे जाऊ असं ठरवलं. तास दोन तास झाले तरी कुणीचीच ये जा झाली नाही. आम्ही पण मागे फिरायचे सोडून तिथेच रमलो. इथे जवळ एक वस्ती आहे हे माहित होते आणि त्यातला एकतरी गुराखी आपल्याला भेटेल याची खात्री होती. त्या वस्तीत मुक्काम करून सकाळी जाता येईल असा पण एक विचार होता. जंगलात शेकडो वाटा असतात, कोण कोणती वाट धरेल हे त्यांनाच ठाऊक. आम्ही परतीचा ठोस निर्णय न घेता स्वतःला एका चक्रव्युहात फसवून घेत होतो. काही वेळातच पक्ष्याच्या आवाजांमुळे संध्याकाळ जवळ आली आहे याची चाहूल झाली आणि छातीत धडधडायला लागले ....


परत मेटलवाडीला जायचा मार्ग पण बंद झाला होता कारण परतीची वाट जास्त गुंतागुंतीची होती. गावातले वाटाडी लोक ज्यावाटेने नेतात ती आपल्याला उमजत नाही. आता उरला एकच पर्याय ...रात्र इथेच काढायची आणि सकाळी वाट शोधून भीमाशंकराचे दर्शन घ्यायचे. त्यात भोळी भावना ही की रात्रीत काही झालच तर भीमाशंकर आहे रक्षणासाठी. नाहीच काही मिळाल तरी सकाळी अनेक गुराखी इथे येतातच,पकडू एखाद्याला. आपण फार जास्त धाडस करतोय असं काही कुणालाच वाटत नव्हते. सर्व काही हसण्या- खिदळण्यात दंग होते. परत एकदा विचार करायला हवा होता नाही का ? आम्ही तश्या मुक्कामच्या तयारीत पण नव्हतो. मागे फिरण्यात फार काही गुन्हा नव्हता, पण जे ठरलं ते ठरलं. ....हर हर महादेव.!!!!!

जवळच झाडाझुडूपापासुन दूर एक खडकाळ जागा मिळाली. मध्यभागी स्याक गोळा करून खाली चादर अंथरली आणि रिंगण घालून बसलो. भीती होती ती रानडुकराची आणि अस्वलाची. त्यांच्याच असंख्य कथा आदल्या रात्रीच समजल्या होत्या. बिस्कीट वगैरे जेमतेम खाण्याचे समान होते ते फस्त केले. वातावरण फक्त ढगाळ होते. वेळ पाहायला दोघांच्या हातातल्या घड्याळी, एक छोटा एफ एम रेडीओ,चार शिट्ट्या आणि एक मध्यम आकाराची ब्याटरी या रसदीवर रात्र काढायची होती.
सुरुवातीचा बराच वेळ मजेत गेला. रात्रीचे नऊ दहा वगैरे वाजले असतील. छोट्या एफ एम वर बातम्या लागल्या होत्या. ऐ पी जे हे राष्ट्रपतीपदी विराजमान झाले होते . आणि अचानक मेघगर्जनेसह कडाडून वीज चमकली. उंच वाटणारं आभाळ हातभर उंचीच उरलं, ढग भरून आले अन गडगडाटासह अशक्य पाऊस सुरु झाला. खूप विजा चमकायला लागल्या. विजेने आजूबाजूचा परिसर इतका भयावह दिसायला लागला की सर्वांची एका झटक्यात दांडी उडाली. काही समजायच्या आत आमच्या खालून पाणि वाहायला लागलं. रपारप झोंबणारे पावसाचे थेंब कधी बदडून गेले समजले नाही. अर्धातास जोरदार बरसुन कुठे वातावरण निवळले. बापरे काय होता तो प्रकोप. सर्वांची रडवेली अवस्था झाली. पावसाचं हे स्वरूप असं चालू राहिलं तर सहन करण मुश्कील होत. खडकाळ वाटणारी जमीन बर्याच ठिकाणी भुसभुशीत वाटायला लागली, खेकडे बाहेर पडायला लागले. रातकिड्यांनी भेसूर आवाजाने पूर्ण जंगल दणाणून सोडले.

आमच्या हलक्याफुलक्या सहलीने काहीतरी वेगळेच स्वरूप घेतले. आधी सर्व गोंधळलो पण लगेच सावरलोसुद्धा. हा तडाखा सुरूच राहणार याची कल्पना आली. त्यामुळे काय करायचे ते लगेच सर्वानुमते ठरले. सर्वांच्या डोक्यावर चादर पुरेल असं दाटीवाटीने बसलो. टेकायला पाठीशी स्याक. प्रत्येकाच्या खिश्यात आपापल्या शिट्ट्या होत्या, त्या वाजवत राहायच्या आणि एकमेव असलेली विजेरी सारखी फिरवत रहायची म्हणजे जनावराची भीती राहणार नाही. सारखं हात पाय जमिनीवर आदळायचे, मोठ्याने बोलायचे, गाणे गायचे म्हणजे सर्व जागे राहतील, अशी सर्वांनी मिळून धीर धरून जशी जमेल तशी योजना आखली. थोड्यावेळातच परत पावसाचा धडाका सूरु झाला तो रात्रभर थोड्या थोड्या वेळाने बरसतच राहिला.

आम्ही थोडं सावरायच्या आत परत दणाणून पाऊस पडायचा आणि लाटेने वाळूचा किल्ला वाहून न्यावा तशी वाताहत करायचा. पाऊस कमी झाला की थंडी अंगात शिरायची, अंग कुडकुडायला लागायचं ,हात पाय आखडून जायचे. त्यामुळे सर्वांनी उठून थोड्या थोड्यावेळाने वार्म-अप करायला सुरुवात केली. दर विसपंचवीस मिनिटांनी हा वीज पावसाचा डाव सुरूच होता.

गेल्या तीन दिवसांच्या चालण्याने आणि भिजण्याने सर्वजण आधीच थकलेले होते. बसल्यावर मधून मधून जंगली श्वापदाबरोबर दिवसभराच्या भूता-खेतांच्या गोष्टी पण आठवायला लागल्या. कुठलेसे युद्ध या भोरी विहिरीपाशी झाले होते म्हणे. म्हणजे खालच्या दरीत असलेल्या पेठच्या कोथळी किल्ल्यावर मोघलांनी का कुणी हल्ला करण्याची वार्ता फुटली आणि गडावर पोहोचली, त्यांनी जवळच्या गडावरून अतिरिक्त कुमक मागवली. रात्रीत ती तिथे पोचणार होती. गडावरील काही मराठे मोघलांना कापण्यासाठी जंगलात दबा धरून बसले होते. मोघलांआधी मराठ्यांची कुमक पोहोचली पण दुर्दैव असे की अंधारात आलेले मोघलच असावे म्हणून मराठ्यांनीच मराठे कापले. पुढे काय झाले माहित नाही पण एक गावकरी म्हणाला हे सगळं भोरी विहिरीपाशीच झालंय. खरंखोट माहित नाही पण अश्यावेळी आम्हाला घाबरवायला ते पुरे होत.

पावसाच्या आणि थंडीच्या फटकार्याने अंग कमजोर पडलं होत. सारखी डुलकी लागत होती. शिट्टी हुकली तर प्राणी हल्ला करेल याची भीती होती. भूत जर खरंच जगात असतील तर त्या सैनिकांचे आत्मे आमच्या आसपास फिरत असतीलच नाही का ?...त्यांचा राग ते आपल्यावर काढायचा विचार करत असतील, अंधारात आम्ही त्यांच्यासाठी गनीमच ना ?.....वगैरे वगैरे विचार डुलकीसरशी येत होते.. शरीर थकले की मनाचे खेळ सुरु होतात. लहान डुलकी जरी लागली तरी सभोवताली युद्ध सुरु असल्यासारखं वाटे,मधूनच कुणीतरी शाळा मास्तर आम्हाला शाळेत मुक्कामाला न्यायला आला असा भास होत असे. कधी जखमी सैनिक आपल्याकडे एकटक पाहतोय की काय असं मनात चित्र येई. झोपेत आहोत की जागे हे कळत नव्हते. बर योगायोगाने सर्वांची हीच अवस्था होती. त्या गडद अंधारात जंगलामध्ये आम्ही पाच जण पाचशे लोकांची भीती उरात धरून बसलो होतो. आम्ही थोडेफार अनुभवी असलो तरी सराईत फिरणारे नव्हतो, ना ही असल्या प्रसंगाची आमची तयारी होती. ही रात्र शेवटची असावी बहुदा...इथपर्यंत विचारांची मजल गेली.

नंतर कधीतरी पावसाचा जोर ओसरला आणि आमचे डोळे लागले असावे. नंतर किलकिल्या डोळ्यांनी पांढराशुभ्र परिसर दिसायला लागला.उक्कड बसून अंग कन्हारलं होत. आमचे शूरवीर चुळबुळ करू लागले. ती पहाटेची वेळ असावी, वेळ समजण्याची सोय नव्हती कारण रात्री ११.१५ च्या आसपास दोघांचेही मनगटी घड्याळ बंद पडले होते. सकाळ पाहायला मिळाली याचाच फार आनंद झाला.
कसेबसे सामान उरकलं आणि पाठीवर घेऊन उभे राहिलो. हर हर महादेव ची आरोळी ठोकली आणि आपण जिवंत आहोत याचा आम्हा सर्वाना परत उलगडा झाला. आता काय करावे यावर सर्वांनी आत्ताच्या आत्ता भीमाशंकर गाठायचं असाच निर्णय घेतला. परत फिरायचे नाही कारण देवाचे दर्शन झालेच पाहिजे, पाहूच कसे दर्शन होत नाही.

जंगलात पहाटेचे धुके लवकर सरत नसते. त्यामुळे जी डावी वाट मिळाली तिने चालत सुटलो. कालचे डोक्यापेक्षा उंच गवत पण ओलांडले. पुढे पुढे मात्र कोणत्याच पाऊलवाटेचा ठाव दिसत नव्हता. जिकडून तिकडून रानवाटा आणि गवत यांनी चक्रव्यूहात अडकवून टाकल. आम्ही कुठे जात होतो माहित नाही, एकही वाट ओळखीची नव्हती. कुठेतरी घुटक्याची पुडी अथवा चॉकलेटचा कागद दिसला की तीच वाट धरायचो. वाटायचे हीच वाट असेल बरोबर. अनेक तास चालत होतो आणि फक्त चालत होतो. वेळेचा पत्ता नाही. पाऊस अधूनमधून सुरू होता. पाण्याने अंग भिजून फुगल होत, पोटात अन्न नाही. जांघेत बगलेत कातडी सोलून निघाली होती. कोळीकिडा जसा पाय शरीरापासून दूर ठेऊन टांगा टाकतो तशीच आमची चाल सुरु होती. यावरून अधेमध्ये विनोद पण व्हायचे. चालतांना कोणी न कोणी घसरून पडणे हे सुरू होत मात्र कुणी थांबत नव्हते. सारखा माणूस किंवा घर दिसल्यासारख व्हायच पण कसल काय ? हे नुसते भासच असायचे. दुपार ढळायला लागली असावी असा अंदाज येत होता. आज जर जंगलात रात्र काढायची वेळ आली तर मग आमचं टिकाव धरण असंभव होत. मनाने तुटलो होतो पण एकमेकांना सर्व धरून सांभाळून राहत होते...अर्थात पर्यायही नव्हता. एका ठिकाणी सर्वांनी आपल्या ब्यागा धुंडाळून काही खायचं सापडत का ते पाहिलं. सुदैवाने प्लास्टिकच्या कचर्याचा पिशव्यात लोणच्याची फेकायची पिशवी सापडली..प्रत्येकाला एक एक चाटण मिळालं आणि हायसं वाटलं. सकाळपासून सगळे उपाशीच त्यामुळे जीव व्याकूळ झाला होता पण कुणी काही बोलत नव्हते.

तिथून निघालो आणि एका विस्तीर्ण पठारावर कुठे एखादे भातशेत दिसते का याचा शोध घ्यायला लागलो. कारण पायवाटा आम्हाला परत परत एकाच जागेवर आणून सोडत होत्या. आम्हाला एक दूरवर भातशेत दिसल. शेतावरून काही अंतरावर एक वृद्ध माणूस पण दिसला...हुर्रे !!!!! घरी परत चाललेल्या “काळूराम भोकटे” या ताडपत्री नावाच्या खेड्यातला हा मनुष्यरुपातला साक्षात महादेव आम्हाला भेटला. त्या वृद्ध बाबाच्या आम्ही आधी पायाच पडलो. त्याना आम्ही कसं हरवलो ते सांगितलं आणि आम्हाला तुमच्या सोबत न्या म्हणून विनवण्या केल्या. त्यांना काही उमजत नव्हत. आम्ही त्यांना भीमाशंकरच्या रस्त्याच विचारले. ते म्हणाले त्याला जायला दिवस लागेल. मग आम्ही त्यांना त्याच्या घरी न्यायची विनवण्या करायला लागलो. बाबा म्हणाले “माझं गाव जंगलातच हाये अन बारकी झोपडी, तुमाला वस्तीला जागा नई.” मग जवळचे एखादे गाव सांगा बाबा जिथून आम्हाला जायला एखादी एस.टी. भेटेल लगेच ? आम्ही अधीरपणे विचारले. बाबानी मोठा पॉज घेतला आणि नकारार्थी मान करून चालायला लागले. आमचा धीर सुटत होता. रडवेले होऊन बाबाच्या मागे चालायला लागलो. त्यांना काय वाटले कोणास ठाऊक. ते म्हणाले “ तुमी हीथून डावी धरून सरळ जा, गाव लागन, तिथून सकाळची यष्टी जाती राजगुरुनगरला”, पण ते म्हणताना त्यांनी उजवा हात केला. आता कसच काय उजवी आणि डावी...खूप झालं होत जंगल. आपला पीच्छा सोडवायला बाबा आपल्याला सांगतायेत असच वाटायला लागले. तरीही विनवण्या करून त्यांना इथून जवळच एस टी येणाऱ्या गावाला नेऊन घाला असं आम्ही म्हणत होतो सोबत पैसे पण द्यायला तयार होतो पण बाबा काही तयार नव्हते. अनेकदा हात जोडल्यावर बाबा डोंगरावरून खालच गाव दाखवायला कबुल झाले. त्यांनी शेवटी सोबत येऊन ते गाव दाखवल आणि आम्ही जवळ जवळ लंगडत, कण्हत, पळत ती दरी उतरलो. काय सांगा परत धुक्यात तेही गायब व्हायचं.

गावात पोहोचलो तेंव्हा पाच का सहा वाजत आले होते.त्या गावात भटकणारे येत नसल्याने त्यांना कुतूहल वाटलं.बारके पोर जमून आमच्या कन्हारलेल्या चालीवर हसायला लागले, कुत्रे भुंकत भुंकत स्वागताला आले. गाव एकदम लहान होते, गावात दुकान शोधून आधी बिस्कीट विकत घेतले पण हाताच्या संवेदना नाहीश्या झाल्या होत्या त्यामुळे बिस्किटे धरता येत नव्हती ते खाली पडत होते. तशेच बिस्किटे खाल्ली. दोनचार शहाणीसुरती लोक चौकशीला आली. त्यांनी आम्हाला गावातल्या सिंधू सावंत यांच्या घरी नेले व दारातल्या ओसरीवर बसवले.

सावंत साहेब बहुदा गावातील जाणते असावे. ते गावाला गेलेले आहेत उद्या येतील असं त्यांच्या चिरंजीवाने सांगितले. “मंडळी आधी चहा घ्या. जेऊन होईपर्यंत मुक्कामाची यसटी यीन, त्यातच मुक्काम करून सकाळी निघून जा” असे चिरंजीवाने सांगितले. तोपर्यत सावंतकाकू आल्या. त्यांनी चौकशी केली अन सरळ चहा करायला आत गेल्या. चहापाणी झाल्यावर त्यांनी मुलाला सांगून त्यांच्या घरातली एक जागा आम्हाला दिली. घर तस जेमतेम आकाराच होत. कपडे बदला आणि जेवायला चला असा निरोप आला. आम्ही पोटभर चहाने जरा ठिकाणावर आलो. कपडे बदलून जेवयला गेलो. काकुंचा चुलीवर स्वयंपाक तयार होता. आम्हाला चुलीभवती बसवले आणि पोटभर जेऊ घातले. कुठलातरी चमत्कार अनुभवावा असं हे सर्व सुरु होत. आम्हाला रात्री मुक्कामास घरातच ठेऊन घेतले. अंथरून पांघरून दिलं. घरात इतरही मंडळी होती पण आम्हाला काही सुधरत नव्हते. कसंबस बोलून आम्ही ढाराढूर झालो. गावातले लोक सावंतांकडे चौकशी करून जात होते त्याचा आवाज येत होता, पण उठायची ताकद नव्हती. तिकडे एका मित्राच्या घरच्यांनी पोलिसांना फोन करून आम्हाला शोधायला वन खात्याचे लोक पाठवले ते वेगळेच प्रकरण घडले. आम्ही भलत्याच वाटेने दिवसभर चालत होतो हे आम्हाला सावंतांच्या घरी समजले कारण इथून भीमाशंकर अजून चार पाच तासावर.

हुश्य !!!! आम्ही जिवंत राहिलो. जंगलात राहण्याची आणि माघारी न फिरण्याची पोकळ जिद्द आम्ही आकारण केली यात वाद नाही. तयारीविना हे वेडे साहस करणे फार महाग पडले होते. आम्ही थोडक्यात बचावलो होतो हे उपकारच. काळूरामबाबा असो वा सावंतकाकू, देवाच्याच रुपात भेटले. सांगायचे झाले तर "का व कसे" चुकलो हे सांगायला गेले तर अनेक गोष्टी सापडतील. पण घेण्यासारखी गोष्ट ही की आम्ही सर्व जणांनी आलेल्या प्रसंगाला एकत्रपणे तोंड दिले. मला हेच महत्वाचे वाटते. यापेक्षा सरस व अचाट साहसकथा आणि सर्व्हायवल गोष्टी नेहमी टी. व्ही. वर पाहायला मिळतात पण ते अनुभवण्याची मजा फार काही शिकवून जाते. सकाळचा चहा नाश्ता करून आम्ही एसटीने परत निघालो आणि थेट पुणे गाठले. भीमाशंकर नंतर करू यावर एकमत अपोआप झाले होते. सावंतांचा निरोप घेताना काकुंचेच डोळे भरून आले होते. अशे वेडे साहस करायचे नाही याचा धडा आम्ही परतीच्या प्रवासात घेऊन टाकला. अर्थात जेंव्हा चुकायचे ते नंतर चुकलोच.

आम्ही निघालो होतो महादेवाच्या दर्शनाला पण योग होता पार्वती दर्शनाचा एव्हडाच काय या घटनेचा मला उलगडा झाला.....

-----------------------------------------------------------------------समाप्त-----------------------------------------------------------


हृषीकेश पालोदकर 


No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...