Tuesday, November 22, 2022

कुंभ्याची वाट - वाघजाई घाट - तेल्याची नाळ - जित्याची वाट

 https://www.bankapure.com/2016/10/KumbhyaachiWaat-WaaghjaaiGhaat-TelyaachiNaal-JityaachiWaat.html

मंडळ :

निनाद बारटक्के

Courtesy @ निनादराव : तवली डोंगर ... 

निरंजन भावे
कौस्तुभ दातार
केदार नरवाडकर
दत्तू तुपे




दिनांक : ०१ ऑक्टोबर २०१६

                            सुमारे ४ महिने संसारघाट कामात व्यग्र असल्यामुळे माझ्याकडून कुठलेही फारसे ट्रेक्स  घडले नाहीत, पण मंडळाची मात्र नित्यनेमाने  भटकंती चालू होती... अश्यातच गुरुवर्य ढमढेरे काकांनी एक खणखणीत ट्रेक आयोजित केला पण सुट्ट्यांअभावी आम्हाला जायला जमलं नाही, म्हणून ह्या ट्रेक चं प्रयोजन  निश्चित झालं... भल्या पहाटे ०४:३५AM IST ला माझ्या घरातून निघून पानशेतच्या रस्त्यावरून घोलच्या दिशेने लागल्याबरोबर नारायणराव आळसातचं उठले, कारण उजाडल्यावर सुद्धा ढगाळ वातावरण जाणवत होतं... ह्यावर्षीच्या अतिरिक्त पावसाने रस्त्याची अगदीचं चाळण केली होती... पण कौस्तुभ ने खास ट्रेक साठी गाडीला स्पेशल मिशेलिन चे टायर बसवल्यामुळे फारसे खड्डे जाणवले नाहीत... वर्षातून महिन्याभरासाठीचं "माहेरी" आलेल्या सोनकीच्या फुलांमुळे  सगळे  डोंगर "पितांबरी" रंगात दिसत होते...  त्यातचं शेजारी पानशेत धरणाच्या पाण्याचा काठचा करडा रंग, पदरातल्या सोनकीचा पिवळा रंग, तेरड्याचा  गुलाबी रंग आणि गवताच्या हिरव्या रंगांची उधळण, माहेरवाशिणीच्या साडीला एक वेगळंच रूप देत होता... थोड्याचवेळात दापसरे गावात दाखल झालो...

Courtesy @ निनादराव : रंगीबेरंगी फुलांची उधळण... 


Courtesy @ निनादराव : अप्रतिम लँडस्केप... 
दापसाऱ्यात नव्यानेच लावण्यात आलेली पाटी... 

                          आजच्याच दिवशी घट बसणार असल्यामुळे आणि देवीची पूजा करायची म्हणून दापसरेच्या धोंडिबा मोरे मामांना आमच्याबरोबर यायला जमलं नाही... थोडीफार फोटोग्राफी उरकून गाडी थेट घोल गावी लावली... कौस्तुभ ने भल्या पहाटेचं बनवून आणलेल्या थर्मास मधल्या वाफाळता चहा आणि सोबतीला भावे ने आणलेले डोनट्स ह्यामुळे सकाळची भरपेट न्याहारी झाली... आवरा-आवरी करून घोल गावातल्या एका मामांना घेऊन, कुंभ्याच्या वाटेने चालायला सुरवात केली...
वेळ सकाळची ०८:०० AM IST

कुंभ्याची वाट उतरताना... 
कुंभ्याची वाट... 
दाट जंगल... 



कुंभ्याची वाट : 

                                            सोनकीने बहरलेल्या आणि धुक्याने आच्छादलेल्या पठारावरून चालत आम्ही क्रेस्टलाईन वर पोचलो... समोर धुक्यात तवली (पुनाड) डोंगर आमच्याशी लपाछपी खेळत होता... पंधरा मिनिटांची छोटीशी वाट उतरून आम्ही  एका मोठ्या ओढ्यापाशी पोचलो... तिकडून पुन्हा खडी चढण घेत पंधरा मिनिटांत भुरट्या जंगलात दाखल झालो... धुक्यातचं मलबार व्हिसलिंग थ्रशच्या सुरेल शिट्टीने सगळा माहोल बदलून टाकला... असं वाटतं होतं कि इथून जाऊचं नये... एका मोठ्ठ्या नाळेला वळसा घालून पलीकडे गेल्यावर पठारावर दाखल झालो... तिकडून पुन्हा एकदा तवली डोंगर ढगांमधून दर्शन देत होता... मनुष्यविरहित परिसर असल्यामुळे इकडचा पठार अजूनही निसर्गाने समृद्ध आहे... कारवीही झकास फुलली होती...  निसर्गाने पिवळ्या, जांभळ्या आणि गुलाबी रंगांची नुसती उधळण केली होती... तिकडून खाली उतरून दुसऱ्या एका पठारावर दाखल झालो...
वेळ सकाळची ११:१२ AM IST...

तेरडा आणि सोनकी चा रंगवर्षाव... 

फुललेली कारवी... 
श्री. वाघजाई देवी... 
वाघजाई घाट... 

वाघजाई घाट : 
                          थोड्याचवेळात वाघजाई घाटाच्या तोंडापाशी दाखल झालो... रितसर बांधीव असा हा घाट वाघजाई देवीच्या अस्तित्वामुळे अजूनही टिकून आहे... घाटाच्या मध्यातचं वाघजाई देवीचं मंदिर आहे... ग्रामस्थांनी देवीला साडी अर्पण केली आहे... थोड्यावेळाने खाली पदरात पोचल्यावर गावातून एक मामा हातात दुधाने भरलेला छोटा गडू आणि फुलांचा हार घेऊन येताना दिसले... आजचं घट बसणार असल्यामुळे देवीची पूजा करायला चालले होते...  समोर धुक्यात कुर्डूगड आणि त्याच्या उजवीकडे असलेली  घोडनाळ अस्पष्ट दिसत होती... मजल-दरमजल करत खाली चालत बोरमाची गावात पोचलो... मामांनी सासुरवाडीत जाऊन येतो म्हणून एका घरात धूम ठोकली... आम्ही बऱ्याच वेळ त्यांची वाट बघत बसलो... इथेच जेवण उरकूया असा विचार करत असतानाच अचानक त्या घरातून मामा बाहेर प्रकट झाले आणि आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो... वाटेत एका ओढ्यापाशी झाडाखाली जेवायला थांबायचा निर्णय घेतला...

पाणवठा... 

                          भावे ने आणलेले पोळीचे पौष्टिक लाडू, केदार ने आणलेले पराठे, कौस्तुभ ने आणलेलं दही आणि चटणी, उकडलेली अंडी असा सामिष आहार घेऊन आम्ही निघणार, एवढ्यातचं वरुणराजाने  त्याच्या आगमनाची चाहूल दिली ... आवरा आवारी करून निघालो... एव्हाना पाऊस अक्षरश: कोसळायला लागला होता... त्यातचं आम्ही कोकणात असल्यामुळे पाऊस तर जास्तचं टोचत होता... मामांनी छत्री काढली... आम्हीही आपापले मोबाईल आणि क्यामेरे बॅगेत टाकून बॅगेला रेनकव्हर लावून निघालो ...  इथे सुद्धा कारवी छान फुलली होती... तिच्या फुलांचा तर सडाचं पडलेला होता... अमरी ची हि पांढरी फुलं आणि  हेजहॉग ची पिवळी फुलं हि नजाऱ्यात भर घालत होती...
वेळ दुपारी ०१:१२PM IST...

 Courtesy @ निनादराव : धुक्यात हरवलेला कुर्डूगड आणि घोडनाळ... 




तेल्याची नाळ :
                        पदरातून चालत पुढे गेल्यावर उजवीकडे एक पुसटशी वाट वळली... तिकडून चढायला सुरवात केली... जिते गावातल्या आणि पुढे बोरमाचीच्या लोकांना देशावर घोल गावी जायला सर्वात जवळची वाट म्हणून तेल्या नाळेचा वापर करतात... आणि दापसरे गावी जायला ठिपठिप्या घाटाचा वापर करतात ... ही घाटवाट सुद्धा चांगलीचं बांधीव आहे... वाटेत अनेक ठिकाणी हातलोट घाटाची आठवण झाली... कुर्डूगडाच्या खोऱ्यात आढळलेल्या : कुंभ्याघाट, वाघजाईघाट, तेल्याची नाळ, ठिपठिप्या घाट, घोडनाळ, चिपाचं दार, मारुडा घाट जो निसणीच्या वाटेला जाऊन मिळतो, लिंग्या उर्फ देव घाट, सातनाळ ह्या सर्व घाटांची रचना साधारण एक सारखी वाटते ... ह्या खोऱ्यातल्या देश आणि कोकण ह्यांना जोडणाऱ्या सर्व घाटवाटा अजूनही बऱ्याचश्या वापरात आहेत... कारण ह्या खोऱ्याला अजून पक्का डांबरी रस्ता झालेला नाही आणि जर का दुर्दैवाने झालाच, तर इथल्या निसर्गाची ताम्हिणी घाटासारखी दुरावस्था होयला फार वेळ लागणार नाही...

असाच एक लँडस्केप... 

                         ठिपठिप्या घाटाची सख्खी शेजारीण असलेली तेल्याच्या नाळेला बऱ्यापैकी खडी चढण आहे... टिपिकल नाळ असल्यामुळे ठिकठिकाणी मोठ्ठाले दगड धोंडे इतस्त: पसरलेले दिसतात... पहिल्या अर्ध्या तासाच्या चढाईला कारवीची साथ लाभते आणि मग उरलेल्या अर्ध्या तासाला नाळेतल्या दगडधोंड्यांची साथ लाभते...  अर्थात संपूर्ण नाळेच्या चढाईला आम्हाला पावसाने चांगलीच साथ दिली... त्यामुळे कोकणातला दमटपणा जाणवला नाही... सुमारे तासभराच्या सलग चढाईने आम्ही देशावर पोचलो... इथेही घनदाट जंगल आहे... ५ मिनिटांचा ब्रेक घेतला आणि घोल गावाच्या रस्त्याला लागलो...

फुलंच... फुलं... 

जित्याची वाट : 
                      हीच वाट पुन्हा खाली पश्चिमेकडे उतरल्यावर तिला जित्याची वाट असंही म्हणतात... म्हणजे घोल गावातून कोकणातल्या जिते गावी जायला - यायला ह्या वाटेचा प्रामुख्याने वापर होतो... मामांनी वाटेत १०-१२ खेकडे पकडून प्लास्टिकच्या पिशवीत भरून घेतले... आज शनिवारचा उपास होता त्यामुळे जेवताना आम्ही आणलेले सफरचंद मामांनी खाल्ले, पण उद्या रविवार असल्यामुळे खेकड्यांच्या भाजीचा बेत होता...
मी : मामा, आज घट बसणार म्हणजे आज तुमचा उपास आहे ना?
मामा : व्हयं तर... 
मी : मग हे खेकडे कशाला घेऊन चाललात?
मामा : उद्या रईवार आहे... दारू बरोबर ख्येकडे नकोत का?
मी : देवी ला चालतं होय?
मामा : चालतंय कि... थोडीशी दारू पिली म्हनुन द्येवीचा थोडीचं क्वोप होनार हाय... ?
मी : ..... ..... ..... ..... ..... !!!!!


फुलंच... फुलं... 

             मुसळधार पावसात अंगावर इरलं घेतलेलं  एक धनगर मामा  भेटले...   गुरं चरायला घेऊन आलेले होते... पुढच्या अर्ध्या तासात जित्याची वाट उतरत घोल गावी पोचलो...
वेळ दुपारची ०२:३५PM IST...

घोल गावातला रस्ता... 

                        भरपूर चालल्यामुळे अंगात भयंकर उष्णता निर्माण झालेली होती... आणि मुसळधार पावसामुळे वातावरणात थंडावा होता... त्यामुळे सगळ्यांच्या अंगातून वाफा निघत होत्या...
निनाद : अरे ते बघ, विशेषच्या (कौस्तुभला निनादने ठेवलेलं टोपण नाव) अंगातून वाफा येत आहेत...  त्याही अवस्थेत कौस्तुभने  मिश्कीलपणे तडक एक अजरामर एपिक डायलॉग टाकला  : I am Hot... 
सर्वत्र हशा पिकला... आवरा-आवरी केली... रात्रीच्या जेवणाला शेतकरी हॉटेल मध्ये तांबडा-पांढरा हाणायचा हे सकाळीचं गाडीत ठरलं होतं... मग उगीच अळंम-टळम केली ... पानशेतच्या हॉटेल मध्ये भूक नसतानाही उगीचंच जास्तीचे वडापाव खाण्यात आले ... गाडी ताशी २०kmph पेक्षा जास्त पळवली नाही... एवढं करूनही पुण्यात संध्याकाळी ७ ला पोचलो... जेवण उरकूंन  घरी मार्गस्थ झालो...

ठळक वैशिष्ठ्ये :
१. मुसळधार पावसात केलेली वाघजाई घाटाची उतराई आणि तेल्याची नाळेची अर्ध्या दिवसातली यशस्वी चढाई...
२. हेजहॉग, कारवी, तेरडा, सोनकी, आमरी आणि इतर अनेक फुलांनी नटलेल्या सह्याद्रीचे रंगीबेरंगी अनोखे रूप...
३. नवरात्रात रविवारी (सामिष आहार आणि दारू) सोडून इतर सर्व दिवस देवीचा उपास करणारे घोलचे मामा...
४. कौस्तुभ चा अजरामर  एपिक डायलॉग... I am Hot... 
५. फारचं लवकर ट्रेक संपल्यामुळे उर्वरित वेळ वाया घालवण्यासाठी केलेले आचरट पराक्रम...

कृपया इकडे लक्ष द्या :

  • आपण आपल्या घरात कचरा करत नाही ना  … मग सह्याद्री मध्ये सुद्धा कचरा करू नका ना … !!!
  • निसर्गातल्या वन्य प्राण्यांना त्रास देऊ नका … !!!
  • बेसुमार झाडांची होणारी कत्तल थांबवा … !!!
  • सह्याद्रीतल्या कुशीत वावरताना अनाठायी वेगळ्या 'Angle' च्या Facebook Photography करण्याच्या नादात …  स्वत:चा आणि निसर्गाचा तोल सांभाळा… !!! 
  • पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देऊ नका … !!!

धनुर्वाद,

ट्रेकळावे,

दत्तू तुपे   

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...