https://www.bankapure.com/2022/04/AndhaarichiWaat-Kothaligad-NakhindichiWaat.html
मंडळ :
![]() |
| नाखिंडीच्या वाटेवरून दिसणारा कोथळीगड... |
केदार नरवाडकर
निनाद बारटक्के
राकेश काका
सोमण सर
ढमढेरे काका
दत्तू तुपे
दिनांक : १० एप्रिल २०२२
भिमाशंकर - कर्जत परिसरातल्या आणखी काही घाटवाटा उरकूया म्हणून ह्यावेळेस अंधारीची वाट निवडली... आणि सर्किट पूर्ण करायला नाखिंडीची वाट... कारण दोन्ही वाटा ऐतिहासिक आहेत आणि आलोच आहोत तर लगेहात चिकटून (चिटकुन) असलेला कोथळीगड पण प्लॅन मध्ये समाविष्ट केला... रोजच्या टेकडीवरच्या "सकाळच्या मॉर्निंग वॉक" ला भेटणारे सोमण सर सुद्धा यायला तयार झाले... ठरल्याप्रमाणे मंडळी आली आणि शार्प ०५:०० AM IST ला पुणे सोडलं... वाटेत केदार ला पिकप केलं... भामनेर खोऱ्यातले अनेक ट्रेक्स केले पण ह्यावेळेस तांबडं फुटत असताना त्याचे प्रतिबिंब भामा-आसखेड धरणाच्या बॅकवॉटर्स मध्ये लाल-गुलाबी रंगांची उधळण काही न्यारीच होती.. सकाळी ०७:३५AM IST ला वांद्रे गावाच्या पहिल्या पवनचक्की (विंडमिल) खाली दाखल झालो... नुकताच कोकणात पाऊस पडून गेल्यामुळे कोकणात सगळीकडे ढगांची दुलई पसरली होती... पश्चिमेच्या वाऱ्याने त्या दुलईला देशावर यायची अनामिक ओढ दिसत होतीच ... जणू काही गावातल्या सर्व तरुणांना शहरात यायची ओढ असते तशीच... आवरा-आवरी करून निघेपर्यंत ०७:५०AM IST वाजले... ढमढेरे काकांनी आणलेल्या थर्मास मधल्या वाफाळत्या चहाने तरतरी आली... सुमारे २ किलोमीटर कच्च्या रस्त्याने आल्यामार्गी चालत आम्ही लोणावळा-भिमाशंकर (लो-भि)ट्रेक रूट वर डावीकडे वळलो... झुंजूमुंजू होत असतानाच पक्ष्यांच्या मंजुळ किलबिलाटात फोटोग्राफी उरकत अंधारीच्या वाटेला लागलो...
वेळ सकाळची ०८:१२ AM IST...
![]() |
| वांद्रे खिंडीतून जाताना... |
| Courtesy @ निनाद : वांद्रे खिंडीतून जाताना... |
| Courtesy @ निनाद : अंधारीचा वाटेवर जाताना... |
![]() |
| अंधारीची वाट ... |
अंधारीची वाट :
लो-भि ट्रेक रूट वर एक छोटासा बंधारा बांधला आहे... त्यावर आम्ही खुणेसाठी कॅरेन्स (दगडांवर दगड रचून)ठेवून डावीकडे उतरायला सुरवात केली... गवताळ प्रदेशातून क्रेस्ट लाईन वर आलो आणि खाली उतरायला सुरवात केली... छोट्याश्या ओढ्याला क्रॉस करून आम्ही पलीकडे उजवीकडे रानात घुसलो... आता गच्च जंगलात एंट्री मारली... आता दाट झाडी मुळे आणि वारा नसल्यामुळे दमटपणा जाणवायला लागला... दिवसाढवळ्या जंगलात असल्यामुळे उजेड होता आणि क्वचित काहीठिकाणी सूर्यकिरणं पडत होती... त्यामुळेच की काय ह्या वाटेला "अंधारीची वाट" म्हणत असावेत... थोड्याचवेळात पुन्हा मोकळवनात आलो ... इकडून अंधारीच्या वाटेशेजारची डावीकडची नाळ आणि समोर कोथळीगड झकास दिसत होता... पुन्हा खाली जंगलात एंट्री मारली... मोठ्ठाल्या वृक्षांच्या राईतून उतरताना रातकिड्यांच्या Cicada विशिष्ठ लयीतून वाजणाऱ्या कर्णकर्कश आवाजाने कानात बोटं (स्वतःची) घालायची वेळ आली... बघावं तिकडे पालापाचोळा पडलेला आणि दाट जंगल... १५ मिनिटांच्या जंगल पट्ट्यातून उतरल्यावर एके ठिकाणी २ खोदीव पावठ्या सापडल्या... थोड्यावेळाने वाट हळूच डावीकडे वळली... २ नागमोडी वळणं घेत खाली दगडी पॅच वरून तिरके खाली उतरत आम्ही नैसर्गिक पाणवठ्यापाशी पोचलो... पाणी बऱ्यापैकी गढूळ होते... ओंजळीतून पाणी पिताना "उक्षीच्या" फुलांचा हलका अरोमा जाणवत होता... पाणवठ्याच्या वरचं झाडावर उक्षीची फुले बहरली होती ... आणि शेजारीच पाणी असल्यामुळे कॉमन क्रो, यलो पॅन्सी, कॉमन पियरट, इत्यादी विविध फुलपाखरांची शाळा भरली होती... पाणवठ्याच्या खाली बरोबर ४ खोदीव पावठ्या सापडल्या... आणि पाणवठ्यावर एक मोडकळीस आलेली एक पावठी... शेजारीच ऐतिहासिक कोथळीगड आणि पलीकडे नाखिंडीच्या वाटेवर असलेल्या पाण्याच्या खोदीव टाक्या बघितल्यावर ह्या वाटा निश्चितचं ऐतिहासिक आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असाव्यात असा प्राथमिक अंदाज निघतो...
![]() |
| अंधारीची वाट उतरताना ... समोर कोथळीगड... |
![]() |
| नाळेतला पाणवठा... |
![]() |
| खोदीव पावठ्या... |
![]() |
| पाणवठ्याच्या वर असलेली एक खोदीव पावठी... |
उक्षीच्या झाडाखाली केदार ने थर्मास मध्ये बनवून आणलेलं पुदिना आणि सब्जा घातलेलं थंडगार रुह-अफझा प्यायल्यावर झकास तरतरी आली... तिकडून नाळेतून गोटे-आळी तुडवत खाली उतरत गेलो ... एकेठिकाणी झाडावर मधमाश्याचं मोठ्ठालं पोळं दिसलं... अजून पुढे काही ठिकाणी साचलेल्या गढूळ पाण्याच्या तळी सापडल्या... नैसर्गिक क्षार असलेल्या काही ठिकाणी फुलपाखरांची शाळा भरलेली होतीच... एप्रिल महिना आणि सूर्य आग ओकतोय तरी सुद्धा इथे एवढी जैववैविध्यता बघून मन प्रसन्न झालं... बरोबर समोर उत्तरेला खांडस ची तुंगी... मग अजून उत्तरेला पदरगड... त्याच्यावर पेढ्याची वाट... त्याच्याखाली पावल्याची वाट आणि उजवीकडे आंबेनळी घाट... त्याच्या खाली तांबडीची वाट... मागे भिमाशंकर नागफणी दिसत होती... खाली जांबरुंग चा डोंगर... त्याच्या शेजारून येणारी शिडीची वाट... मग धनगर पाडा आणि मग वाजंत्री घाट आणि वर खेतोबा घाटातून वर पांढऱ्या रंगातलं खेतोबा मंदिर, अजून अलीकडे दैत्यासुर धबधबा... वायव्येला कोथळीगड दिसत होताच... आम्ही थांबलो तो कोरडा पडलेला घोघोळ धबधबा होता... भरपूर सह्याद्री दर्शन केल्यावर आम्ही डावीकडे रामखंड / रामरानाच्या मळलेल्या वाटेला लागलो... डावीकडे वळायचं म्हणून खुणेसाठी कॅरेन्स (दगडांवर दगड) रचून ठेवले...
वेळ १०:१२ AM IST...
![]() |
| घोघोळ धबधब्याचं पात्रं... |
रामरान / रामखंड :
वाटेत आम्हाला एक बैल चरताना दिसला... त्यावरून साधारण अंदाज बांधला कि इकडून "पेठ" गाव जवळ असावं... थोड्याचवेळात आम्ही घनदाट जंगलात एंट्री मारली... मोठ्ठाले वृक्ष जसे की हिरडा, आंबा, बेहडा, मदनफळ, पापेट, उक्षी, आंबोळ्या, जांभूळ, जंगली कढीपत्ता इत्यादी झाडांची तर मांदियाळीचं होती... आंब्याच्या झाडाला भरपूर कैऱ्या लागल्या होत्या...एकेठिकाणी आम्ही ब्रेक घेतला असताना सोमण सरांनी भरपूर कैऱ्या पाडल्या... ठिकठिकाणी सह्याद्री मध्ये टिपिकल फंगस लागलेल्या तुटक्या फांद्या खाली पडलेल्या दिसल्या... जंगलातून चालताना मध्येच एखादा जंगल बॅब्लर, इंडियन ब्ल्यू रॉबिन, फॅनटेल्स, क्रेस्टेड बुलबुल, व्हाईट चिक्ड बार्बेट (कर्टूक्या) , गोड आवाजात ओरडणारा व्हाईट रंप शमा, कसबापेठेल्या तांबटआळीत गेल्यावर तांबट मंडळी एकाच लयीत जसे ठोके पाडतात तद्वत कॉपरस्मिथ बार्बेट (तांबट) एकदम पुक-पुक-पुक असा नॉन-स्टॉप ओरडत होता... आणि अजून कित्येक न ओळखता येणाऱ्या पक्ष्यांच्या मंजुळ किलबिलाटाने वातावरणात प्रसन्नता आली होती... महाराष्ट्र-राज्याचा स्टेट बटरफ्लाय ब्ल्यू मॉरमॉन ने तर फॅशन शोचं आयोजित केला होता... त्याच फॅशन शो मध्ये इतर अनेक फुलपाखरे इकडून तिकडे बागडत होती... दाट झाडोरा असल्यामुळे जमिनीवर भरपूर प्रमाणात वाळलेल्या झाडांची पानं पडली होती आणि त्यावरून चालताना जणू काही आपण वाळलेल्या पापडांवर चालतोय कि काय असं क्षणभर भास झाला.... थोडयावेळाने पुन्हा एकदा मोठ्ठाले वृक्षांच्या राईतून उतरताना रातकिड्यांच्या Cicada विशिष्ठ लयीतून वाजणाऱ्या कर्णकर्कश आवाजाने पुन्हा एकदा कानात बोटं (स्वतःची) घालायची वेळ आली... प्रचंड समृद्ध घनदाट जंगल आणि तेही भिमाशंकर परिसर असल्यामुळे असंख्य झाडांच्या, फुलपाखरांच्या आणि पक्ष्यांच्या वैविधतेने नटलेल्या ह्या रामरानातून पाय अक्षरश: (अक्षर-शहा ला सुद्धा) काढवत नव्हता...
फोटोस्फियर : आपल्याच हाताच्या बोटांनी हा फोटो ३६०° फिरवा ...
मोकळवनात आल्यावर करवंदाची झाडं विपुल प्रमाणात आढळली... चैत्र/वैशाख मध्ये झायटीच्या झाडांना नारंगी फुलं येतात आणि त्यात थेंबभर गोड पाणी असतं... ते प्यायला सनबर्ड्स (सूर्यपक्षी) ची लगबग सुरु होती ... आम्ही सुद्धा थोड्याफार प्रमाणात ते गोड थेंब प्राशन केले... डावीकडे एक वाट "पायरीची वाट" ला वर गेलेली दिसली... मोकळवनातून चालताना समोर कोथळीगड आम्हाला सतत दर्शन देत होताच... मोकळवनातून एक वाट गावात गेली तर दुसरी वाट थेट डावीकडे कोथळीगडावर गेली... वाटेत एके ठिकाणी निनाद ने आणलेलं लेमन-बार्ले आणि जिरा युक्त सरबत प्यायलो... त्याने थोडी तरतरी आली... वाटेत जमिनीच्या मशागतीसाठी काही भाग ग्रामस्थांनी जाळला होता त्याला "राप" असं म्हणतात... एके ठिकाणी गावातल्या एका वृद्ध मामांची आणि आमची भेट झाली... जनरल चौकशी सदृश गप्पा-टप्पा झाल्या... वर कौल्याच्या धारेचा दांड होताच... त्याच्या पदरातून आम्ही कोथळीगडाच्या मुख्य वाटेला लागलो...
वेळ दुपारी ११:२४ AM IST...
![]() |
कोथळीगड :
साधारण बाराचा सुमार आणि वाढतं रणरणतं ऊन आणि वाढती भुक... त्यात रामनवमी निमित्त गावात जोरदार भजन-कीर्तन सुरु होतं... त्यामुळे गडाच्या पंचक्रोशीत सगळी भजनं -कीर्तनं दुमदुमत होती... गडाच्या मुख्य वाटेला लागलो... पावसाळ्यात ह्या गडावर लोहगड, राजमाची आणि हरिहरसारख्या पुण्या-मुंबई मधल्या बाजारू ट्रॅकर मंडळींची तोबा गर्दी असते म्हणून ग्रामस्थांनी कायमस्वरूपी वाटेत ठिकठिकाणी चहा/लिंबू सरबत आणि ताक विकण्याकरिता राहुट्या उभारल्या आहेत... इ.स.पु १९९६ आणि १९९७ साली दोनदा ह्या गडावर येऊन गेलो होतो ... त्यानंतर जवळपास २५ वर्षांनी पुन्हा गडावर येण्याचा योग आला... वाटेत भग्नावस्थेतील दरवाजा आहे... रितसर धोपट मार्गाने रामजन्माच्या शुभमुहूर्तावर आमच्या पैकी काही मंडळींनी गडाच्या पहिल्या गुहेत प्रवेश केला... थोड्यावेळाने खाली गावात "वदनी कवळ घेता... " म्हणत प्रसादाची वेळ झाली... गडावर टाईमपास करायला आलेली पंचक्रोशीतली पोरं जेवणासाठी रपारप गडावरून खाली पळत सुटली... थोड्यावेळाने सगळ्यांचा गुहेत (विहार) प्रवेश झाला... थोडावेळ आराम केला... छातीचा भाता बऱ्यापैकी फुललेला होता... शेजारच्या पाण्याच्या टाकीतून कळशीभर थंडगार गोड पाण्याने सगळ्यांनी आपापल्या आत्म्यांची तृष्णा भागवली... कातळकोरीव आयताकृती गुहेत कोरीव खांब, शिवलिंग आणि पलीकडे अजून एक छोटी गुहा आहे... पलीकडच्या गुहेत जाण्यासाठी दरवाज्यावर हलकं नक्षीकाम आणि वर गणेशमूर्ती आहे... कोरीव खांबांवर वाद्य वादनाची मंडळी दिसतात जसे कि कोण बासरी, कोण मृदंग तर कोण तुतारी वाजवतंय आणि कोण नाचतंय... खांबांच्या खालच्या भागावर भग्नावस्थेतल्या सुरसुंदरी दिसल्या... मूळ गुहेच्या आत शिवलिंगाच्या मागे अजून छोट्या छोट्या देवड्या आहेत... वर एक लांबलचक बांबू लटकवत ठेवला आहे... गुहेच्या बाहेर शेजारच्या गुहेत भैरोबाची मूर्ती आहे... पलीकडे पिण्याच्या पाण्याची टाकी आहे... त्याच्याअलीकडे शेंदूर फासलेले गणेशमूर्ती उघड्यावर ठेवलेली आहे... उत्तर दिशेच्या बाजूने गेल्यावर अजून एक मोठी गुहा आहे... खालच्या बाजूला २ तोफा ठेवलेल्या आहेत ज्या हल्लीच डागडुजी करून व्यवस्थित ठेवल्या आहेत... काही मंडळी त्या तोफांच्या लाकडी चाकांना टर्पेंटाइन लावत होती...
फोटोस्फियर : आपल्याच हाताच्या बोटांनी हा फोटो ३६०° फिरवा ...
गुहेत येऊन मस्तपैकी जेवण उरकलं... जेवणाला राकेश काकांनी आणलेली बटाटयाची भाजी पोळी, केदार आणि सोमण सरांनी आणलेले पराठे आणि लिंबाचं लोणचं, ढमढेरे काकांनी आणलेला दही-भात आणि सुमारे २ किलो दह्याचा जाग्यावर फडशा पाडला... सुमारे ३.५ सेकंदांचा अखंड तृप्तीचा ढेकर देऊन अख्खी गुहा दणाणून सोडली... मग थोडीफार गडफेरी केली आणि येऊन पाऊण-एक तास मस्तपैकी पडी मारली... जाग आल्यावर फ्रेश वाटलं... कोथळीगडाचं मुख्य आकर्षण म्हणजे सुळक्याच्या पोटातून खोदलेला जिना... त्या प्रत्येक पायऱ्या साधारण सुरवातीला १ फुटी उंच आणि वर जाताना सुमारे १.५ ते २ फूट उंच खोदल्या होत्या... सुळक्याच्या कोथळ्यातून(पोटातून) पायऱ्या खोदल्या असल्यामुळे ह्याला कोथळीगड नाव पडलं असावं... सह्याद्रीतल्या गडकिल्ल्यांमध्ये अश्या सुळक्याच्या पोटातून खोदीव पायऱ्यांचं आर्किटेक्चर असणारा एकमेव किल्ला म्हणजे कोथळीगड होय... काही ग्रामस्थ मंडळी साफसफाई करत होती... पायऱ्या चढून गेल्यावर उजवीकडे अजून एक खोदीव गुहा पण तिकडे जाताना सांभाळून जावं लागतं... पायऱ्या चढून वर गेलो...वरच्या भागात सुद्धा खोदीव पायऱ्या आहेत आणि हल्लीच एक भला मोठा लाकडी दरवाजा बसवलेला आढळला... टॉप ला पोचल्यावर वरच्या भल्या मोठ्या आयताकृती टाकीत शेवाळं सदृश पाणी होतं... जनरल पलीकडच्या बाजूला गेल्यावर सह्याद्रीचा अफाट नजारा बघायला मिळाला... उत्तरेला खाली जामरूख वरून आलेली किल्ल्याची वाट आणि पाऊलखा वाट... समोर पश्चिमेला आम्ही आलो ती अंधारीची वाट, खाली घनदाट जंगलातलं रामरान, वर नाखिंड आणि त्यावर असंख्य बांधलेल्या पवनचक्क्या (विंडमिल्स), पलीकडे पायरीची वाट मग नाखिंडीची वाट आणि किल्ल्याला जोडून वर गेलेली उघडी बोडकी कौल्याची धार... त्याच्या लगत असलेला कोकणदांड... आग्नयेला वांद्रे खिंड... दक्षिणेला बैलघाट उर्फ खडीची वाट मग उजवीकडे बैलदरा उर्फ पायरीची वाट... त्याच्या खाली फोदंडीची वाट, अजून उजवीकडे आंबेनळीचा झुरा आणि शेजारी प्रसिद्ध फेण्यादेवी घाट... अशी घाटवाटांची हॉटेल श्रेयसची थाळीचं मिळाली... घाटांच्या मध्ये असलेलं कळकराई पठार आणि वर सावळा गाव आणि तळपेवाडी गाव... गडाच्या संपूर्ण माहितीसाठी टेकक्षितीज च्या संकेतस्थळाला भेट द्यावी → http://trekshitiz.com/marathi/Peth_(Kothaligad)-Trek-P-Alpha.htmlवेळ ०४:२४ PM IST...
फोटोस्फियर : आपल्याच हाताच्या बोटांनी हा फोटो ३६०° फिरवा ...
![]() |
| नाखिंडी च्या वाटेवरील पाण्याची खोदीव टाकी |
नाखिंडीची वाट :
गड उतरून खाली आलो आणि नाखिंडीच्या
वाटेला उजवीकडे नाळेत गेलो... पुन्हा घनदाट जंगल पट्टा लागला... गोटे-आळी
तुडवत चढत मुख्य मार्गाला लागलो... आता बॉडी बऱ्यापैकी सिझन्ड (seasoned)
झाली असल्यामुळे चढताना फारसा त्रास झाला नाही... कौल्याच्या धारेच्या
पदरातलं जंगल उजवीकडे होतंच... सुमारे अर्ध्या तासाच्या चढाईनंतर मुख्य नाळ
ओलांडून पलीकडे डावीकडे जंगलातून वर चढलो... थोड्याचवेळात डावीकडे छोट्या
नाळेत पाण्याचं आयताकृती खोदीव टाकं आढळलं... त्यावर शेंदूर फासल्याचे
ठिपके होते... सध्या टाक्यात पाणी नव्हतं... पण एकंदरीत जागा बघता
पावसाळ्यात न्हाळेतून येणारं पाणी टाक्यात साठत पुढे खाली कोकणात उतरत
असणार... सोमण सरांनी टँग बनवलं... चिक्की खाल्ली... थोडा १०
मिनिटांचा ब्रेक घेतला... एप्रिल महिन्यातला कडक उन्हाळा आणि कोकणातला
दमटपणा चांगलाच जाणवत होता... घामाने अंग न्हाऊन निघालं होतं... तिकडून
पुढे अर्ध्या तासाच्या कारवीच्या रानातून खड्या चढाईनंतर वाट डावीकडे
पदरातल्या जंगलात वळते... आता पवनचक्क्यांच्या पात्यांचे आवाज यायला
लागले... संध्याकाळी पक्ष्यांची घरी परतायची किलबिलाट सुरु होतीच...
थोड्याचवेळात घाटमाथ्यावर येऊन पोचलो ... संध्याकाळचा सूर्यास्त डोळ्यात
साठवत बसलो... मस्तपैकी उरलेल्या दह्याचं ताक बनवलं... निनाद ने सगळ्यांना काजू कतली दिली...
वेळ संध्याकाळची ०६:३५ PM IST...
तिकडून पलीकडे क्रेस्टलाईन वर चालत चालत गेलो... तिन्ही-सांजेच्या वेळेस नाखिंडीच्या खालच्या अंगाला पाण्याच्या खोदीव दोन मोठ्या टाक्या दिसल्या... थोड्याचवेळात आम्ही नाखिंडीची वाट संपवून डायरेक्ट गाडीपाशी पोचलो... आवरा-आवरी केली... सामान टाकलं आणि मस्तपैकी किशोर कुमारची गाणी ऐकत तळेगाव ला पोचलो... मावळपीडिया अमेय जोशी सोबत रात्रीचं डिनर उरकून आपापल्या घरी मार्गस्थ झालो...
वेळ रात्रीची ११:३५PM IST...
ट्रेकळावे,
दत्तू तुपे
ठळक वैशिष्ठ्ये :
१. अंधारीच्या वाटेतल्या खोदीव पावठ्या आणि पाणवठा...
२. रामरानातलं घनदाट जंगल, विविध पक्षी, फुले, झाडं आणि फुलपाखरं...
३. रणरणत्या उन्हात चढलेला कोथळीगड ...
४. नाखिंडीच्या वाटेत सापडलेली पाण्याची खोदीव टाकी...
५. ओव्हरऑल संपूर्ण ऐतिहासिक ट्रेक ...
जरा इकडे लक्ष द्या :



















No comments:
Post a Comment