Tuesday, November 22, 2022

कुलंग - छोटा कुलंग - हिवाळा नाळ

 https://www.bankapure.com/2018/01/Kulang-ChhotaaKulang-HiwalaaNaal.html

मंडळ :

कुलंग वरून अलंग आणि मदन... 

* ढमढेरे
काका
* खरे
काका
* अनुप
काका
* राजू
 काका
* भाऊ
काका
* निनाद
बारटक्के
* नितीन
तिडके
* कौस्तुभ
दातार
* साईप्रकाश
बेलसरे
* मिलिंद
लिमये
* विजय
राजगुडे
* चैतन्य
सहस्रबुद्धे
* अजय
दादा
* दत्तू
तुपे

                       २०१८ च्या सुरवातीलाच एखादा किल्ला करावा आणि ते हि सह्याद्रीतल्या मानदंड समजल्या जाणाऱ्या अ-म-कु रेंज मधल्या त्रयींनपैकी एखादा उडवावा हे खरं तर अनपेक्षितचं होतं... पण 'युनायटेड स्टेट्स ऑफ आंध्र प्रदेश' चे नागरिकत्व असलेले आमचे गिरिमित्र श्री.आनंद खरे काकांच्या आग्रहास्तव हे both-of-the-three किल्ले सहजरित्या आमच्या  किल्ल्यांच्या न बसणाऱ्या यादीत पडले आणि मकर संक्रांतीच्या वाणात कुलंगगड लुटला गेला... सोबतीला हळदीकुंकू म्हणून छोटा कुलंग आणि अनवट अपरिचित अशी हिवाळा नाळ हि उडवण्यात आली... आणि अनेकांच्या पिंडाला कावळा शिवण्याचा योग्य योग हि आला...  अर्थात गुरुवर्य ढमढेरे काका (१९८१ पासून  : ट्रांस-सह्याद्री), राजू काका (१९९३ पासून), भाऊकाका (१९९१ पासून), अनुप काका (२००४ पासून) ह्यांनी अनेक वेळा हे त्रयी उडवलेत, त्यामुळे त्यांच्यासाठी हे किल्ले अगदीच छटाक होते... असेही मी आणि निनादराव ने इ. स. पु २०१२ मध्ये अलंग आणि मदन उडवला होता पण  हॉपिस व इतर "सांसारिक आणि सामाजिक बांधिलकी" मध्ये अडकल्यामुळे आम्हाला चारही दिवस यायला जमलं नाही ...  ढमढेरे काका, अनुप काका, अजय दादा, लिमये, साईप्रकाश, आणि आनंद खरे काका ११ जानेवारीलाच घाटघर मार्गे अलंग आणि मदन ला गेले होते...

दिनांक : १२/१३ जानेवारी २०१८

आमचे दोन रणगाडे... तिसऱ्या रणगाड्याची मालकासकट  उणीव जाणवली ... 

                             रात्रीच सगळी जय्यत तयारी करून आम्ही पुण्यातून निघून वाटेत नारायणगावला सवयीप्रमाणे साय असलेलं मसाला दूध पीत पहाटे घाटघर ला पोचलो... वाटेत गुरुवर्य राजू काकांनी  डामचिक शोमॅन राजकपूरच्या ष्टोऱ्या सांगून रात्रभर बेफाम हसवलं त्यामुळे झोप लागण्याचा प्रश्नचं नव्हता... एकेठिकाणी तर गाडी चालवताना आणि हसताना तोलही गेला एवढा दंगा चालू होता... पहाटेच्या गारठ्यात घाटघर ला पोचल्यावर थोडीशी झोप घेतली... आवरा-आवरी करून अलंगच्या दिशेने कूच केले ...
वेळ सकाळची ०८:१२AM...

खोऱ्यातलं नदी पात्र... 
Courtesy @ निनादराव : मदनची खिंड चढताना... 

                          समोर पॅनोरॅमिक अ-म-कु चा अवाढ्यव्य विस्तार बघून डोळेच चमकले... खोऱ्यातून नदीपात्रं ओलांडून शेती तुडवत सरळ चालल्यावर एका मोठ्या टेकाडावर चढायला सुरवात केली ...  मस्त ढगाळ वातावरण होतं आणि झकास वारं वाहत होतं... सुरवातीचा ढेकूण चढ नंतर बऱ्यापैकी अंगावर यायला लागला आणि पाऊण तासात आम्ही अलंगच्या पदरात पोचलो... पलीकडे उडदावणेहुन येणारी वाट जॉईन झाली... आमच्या अगोदरचं उडदावणेहुन काही मंडळी अलंगचा रॉक पॅच चढत होती... पदरातून चालताना गुरुवर्य राजूकाकांनी  पुन्हा एकदा डामचिक शोमॅन राजकपूरच्या ष्टोऱ्या सांगून अलंगचं खोरं दणाणून सोडलं... राजू काका असले कि ट्रेक ला फुल्ल ऑन धम्माल असते...  वाटेत पाणवठ्यापाशी थांबून "कंबरेचे लाडू" (पौष्टिक लाडू), नाचणीचे लाडू, उकडलेली अंडी हाणली... पदरातून चालताना अलंगची शिडी चढताना काही मंडळी दिसत होती... तर काही मंडळी वरच्या अंगाने पदरातून चालत होती... भुरट्या जंगलातून चालताना मज्जा येत होती... थोड्याचवेळात आम्ही अलंग आणि मदनच्या खिंडीत जाणाऱ्या वाटेने चढायला लागलो... आणि अलंगच्या उतारावर असणाऱ्या पुरातन काताळातल्या खोदीव पावट्यांवर चढून खिंडीत पोचलो... पुढच्या १० मिनिटांत खिंडीत डेरेदाखल झालो... स्वागताला आधीची मंडळी तयार होतीच... आल्या-आल्या साई ने आवळा सरबत पाजलं...  थोडी हुशारी आली...
वेळ दुपारची १२:१२ PM IST...

Courtesy @साई : मदनच्या पदरातून ट्रॅव्हर्स मारून कुलंगकडे जाताना... 

                               गप्पा-टप्पा झाल्या आणि सुमारे ५-६ वर्षांपूर्वी आंबेवाडीच्या गणेश मोरे ने शोधलेल्या वाटेवरून आम्ही मदनच्या पदरातून चालायला सुरवात केली... वाटेत एका नाळेत दोन घुबडांनीं दर्शन दिले... अर्ध्या तासात एका छोट्याश्या स्क्री सदृश पॅच पाशी पोचलो... सामान बरंच असल्यामुळे आणलेल्या रोपचा  वापर करून एकएक जण खाली उतरत गेला... थोडयावेळाने वर पोचल्यावर पदरातचं साई आणि कौस्तुभ ने  मस्तपैकी कल्याण भेळ बनवली... तोपर्यंत राजूकाकांनी लोकाग्रहास्तव श्वानपुराणच्या (पेट्रोल आणि एरंडेल तेल) दोन जबरदस्त कॅसेट ऐकवल्या आणि कुलंगचं खोरं दणाणून सोडलं..  सफरचंद, संत्री आणि  इतर खादाडी उरकली... तरतरी आल्यावर कुलंगच्या दिशेने मार्गस्थ झालो... कुलंगच्या पदरातून सावलीतून चालल्यावर थोड्यावेळाने कुरुंगवाडीहुन येणाऱ्या वाटेला लागलो... मी आणि राजू काका  बऱ्याच वेळ गुरुवर्य भाऊ काकांची  वाट बघत हळू हळू चढत होतो ... कुलंग च्या अफाट कातळकोरीव पायऱ्या बघून डोळे विस्फारले... एक एक पायऱ्या चढल्यावर थोड्याचवेळात कुलंग च्या प्रवेशद्वारातून  पहीलटकरीण प्रमाणे गडावर एंट्री मारली... गुहेत सॅक्स ठेवल्या...
वेळ संध्याकाळची ०४:३५ PM IST...


टीप : अलंग मदन आणि कुलंग वर अनेक लोकांनी सविस्तर (ऐतिहासिक)  ब्लॉग/मासिकं/पत्रकं मार्फत बरंच काही लिहिलं आहे, त्यामुळं मी ह्या त्रयींवर वेगळं अजून काहीच भाष्य करू इच्छित नाही... 
अन्यथा निनादरावांच्या "पद्मावती" परिसरातल्या घरात बसून "अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या" नावाखाली काहीही लिहून एक वेगळीच "लीला" दाखवली असती... असो... 


Courtesy @ अजय दादा : मयूरासन मधला निनाद More ... 

                   गडावर आल्यावर काही मंडळींनी झोप काढली तर काही जण अलंग आणि मदन facing एरियात पूर्वेकडे गेली...

काही जणांना गडावर मयूरासन मधला निनाद More दिसला...

 एव्हाना संगमनेर परिसरातले विकिपीडिया आणि गुरुवर्य ढमढेरे काकांचे व आम्हा सगळ्यांचे परमस्नेही श्री. भरत रुपवाल काका उर्फ भाऊ काका (वय ७२) सुद्धा गडावर पोचले... अनुप काकांनी  म्हटल्याप्रमाणे भाऊ काकांवर खरंच एक स्वतंत्र लेख लिहावाच लागेल... बल्लवाचार्य कौस्तुभ आणि चैतन्य ने आणलेल्या ३ किलो मटारची झकास पैकी उसळ बनवायला चालू केली होती... बल्लवाचार्य कौस्तुभ ने एका सपाट दगडाचा पाटा करून त्यावर दुसऱ्या दगडाने मस्तपैकी ओला मसाला वाटून घेतला... भरपूर आणलेल्या फळांचा (सफरचंद, संत्र, केळी, डाळिंब) मिल्कमेड घालून नेहमीप्रमाणे फ्रुटसॅलड बनवण्यात आला... एव्हाना मुंबईहुन इतर काही मंडळी सुद्धा गडावर दाखल झाली... काही मंडळींनी टेंट लावला तर काहींनी गुहेतचं आमच्या शेजारी मुक्काम केला... गप्पांचा फड रंगला आणि जगातभारी मटार उसळ व भाकरी कुस्करून जेवणं उरकली... सोबतीला फ्रुटसॅलड चं डेझर्ट संपवल्यावर आणि नेहमीप्रमाणे 'स्विकार'चं पान दिल्यावर आश्चर्यचकित झालेल्या अजय दादाने  पानाबरोबर तोंडात बोटेचं (स्वतःची) घातली... पण आमच्यासाठी ट्रेक ला एरव्हीचं साग्र'संगीत' (गुरुवर्य ढमढेरे काकांची बासरी-माऊथ ऑर्गन) मेजवानी असल्यामुळे आम्ही फक्त बोटंचं (स्वतःची) पुसली... पलीकडे पाण्याच्या टाक्यात पाणी काढून अलीकडे भांडी घासून घेतली...  काही जणांना तेल मालिश करून दिलं ... आणि लगेच घोरावाडीतल्या निद्रादेवीच्या आराधनेत गर्क झालो...
वेळ रात्रीची ०९:१२ PM IST...

Courtesy @ साई : सकाळचा सूर्योदय... 

Courtesy @साई : बल्लवाचार्य कौस्तुभने आणि चैतन्य ने बनवलेली विशेष खिचडी काकडी... 

 दिनांक : १४ जानेवारी २०१८

                          मकर संक्रांतीच्या भल्या पहाटे सगळ्यांना लवकर जाग आली... उत्तरायणकडे झुकणाऱ्या सकाळच्या सुर्योद्य ला बघण्यासाठी सगळ्यांनी भाऊकाकांसकट भाऊगर्दी केली... फोटो उडवले गेले... पलीकडे मुंबईहून आलेल्या मंडळींचे गोगावला लावून उडीबाबा आणि 'यो' (करंगळी आणि तर्जनी दाखवतात)  कॅटेगरीतले फोटोसेशन सुरु झाले... चहा बनवून झाला आणि बल्लवाचार्य कौस्तुभ आणि चैतन्य ने सकाळच्या ब्रेकफास्टची तयारी चालू केली... इकडे  चहा मारताना गुरुवर्य शब्दकोटीभास्कर राजू काकांची  "शांती-नि-केतन" ची सकाळची शाळा सुरु झाली आणि हसून हसून आमचा कुलंगच्या कडावरून कडेलोट होण्याचा बाकी होता... राजूकाकांच्या  बिनभिंतींच्या शाळेत मौलिक तत्वज्ञान सोबत जगाची दुनियादारी हि शिकायला मिळते... असा माणूस एकमेवाद्वितीय... __/\__ राजूकाकांवर सुद्धा एकदा स्वतंत्र लेख लिहिनच...

Courtesy @निनादराव : संपूर्ण मंडळ... 

                      बल्लवाचार्य कौस्तुभ  आणि चैतन्य ने बनवलेली विशेष खिचडी काकडी ह्या पृथ्वीतलावर कुठेही मिळणार नाही... ह्यावर आमचा चॅलेंज आहे... जो कोणी ह्याच्यापेक्षा भारी खिचडी काकडी बनवेल त्याचा मदनगडाच्या नेढ्यामध्ये बसवून जाहीर सत्कार करण्यात येईल... आवरा-आवरी केली आणि गडाला रामराम ठोकून परतीच्या प्रवासाला निघालो... कुलंगच्या पायऱ्या उतरताना एका दगडाखाली एक चिठ्ठी सापडली : "भरत रुपवाल गडावर गेले, दिनांक १४ जानेवारी २०१८"... मोबाईलला रेंज नसल्यामुळे भाऊकाकांनी आमच्या साठी खास निरोप ठेवला होता... एकीकडे कुठल्याश्या छटाक गडावर जाऊन हरवल्यावर रडून रडून पोलिसांना फोन करण्यासाठी रेंज शोधणारे "पर्यटक" कुठे, तर दुसरीकडे मोबाईलच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या जगातही  वेळप्रसंगी रेंज नसताना निरोप कसा द्यावा...  जगभर हिंडून शिवाय आपल्याजवळ  कितीही पैसा हाताशी असला तरी असलेल्या वस्तूंचा पुरेपूर वापर झाल्याशिवाय त्या टाकायच्या नाहीत ह्याचीही उत्तम शिकवण त्यांनी आपल्या अनेक वर्ष वापरलेल्या सॅक आणि बुटांमार्फत दिली...  साधी राहणी आणि अत्युच्च विचार ह्याचे उत्तम उदाहरण आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे आमचे भाऊ काका... __/\__

कुलंगच्या पायऱ्या ... राजू काका.. 

                     गड उतरून खाली येताना पुण्याची काही मंडळी गड चढत होती... वाटेतचं त्यांनी गावकऱ्यांमार्फत जेवण बनवायला घेतले होते... कातळकोरीव पायऱ्या उतरून झाल्यावर डावीकडे वळलो... चक्रम हायकर्स च्या सह्यांकन २०१७ मोहिमेदरम्यान काढलेल्या रूट ने कुलंगच्या पदरातून चालायला सुरवात केली... संपूर्ण पदरफेरी अर्ध्या तासात ओलांडली आणि पलीकडे कुलंग आणि छोट्या कुलंगच्या खिंडीत डेरेदाखल झालो... कुरुंगवाडीहुन येणारी एक वाट सरळ खिंडीत नाळेतून वर येत होती... थोड्यावेळ विश्रांती घेऊन कुलंग आणि छोट्या कुलंगच्या पदरात १० मिनिटांत दाखल झालो... चक्रम हायकर्सने सह्यांकन २०१७ च्या वेळेस विशेष काळजी घेऊन छोट्या कुलंगच्या नाळेत तात्पुरत्या तीन शिड्या बोल्ट्स लावून फिट केल्या आहेत... ह्याबद्दल चक्रम हायकर्सचे आशिष म्हात्रे  आणि राजन महाजन  ह्यांचे

विशेष आभार

... पावसाळ्यानंतर त्या शिड्या कदाचित शिल्लक राहणार नाहीत...

छोटा कुलंग : 

               

Courtesy : @निनादराव : छोटा कुलंग ...

वरील फोटोस्फियर मध्ये माऊस च्या लेफ्ट क्लिक ने फोटो ३६०°  अंशात फिरवा ... 

                             शिड्या लावलेल्या नाळेतून काही जणांनी फ्री क्लायम्बिंग केलं तर काहींनी शिडीचा आधार घेतला... छोटा कुलंगवर असेही बघण्यासारखे काहीच नाही पण तिकडून कुलंगच्या खोऱ्यातील पूर्वेचा जो काही नजारा मिळतो तो लाजवाब... फोटोग्राफी उरकली,  सरबत घेतलं आणि उरलेली चिक्की फस्त केली... घसाऱ्यावरून खाली उतरून नाळेतून पुन्हा पदरात दाखल झालो...
वेळ दुपारची ०१:३५ PM IST...

Courtesy @ साई : हिवाळा नाळ उतरताना... 


हिवाळा नाळ : 
                         यादी वाढवण्यासाठी कुठलीही एखादी नाळ दिसली कि ती उडवायचीचं  ह्याप्रकारात आम्ही "वाकतही" नाही व "मोडतही" नाही शिवाय ही नाळही 'मोडत' नाही... त्यात सनाजी ने सांगितलं कि घाटघरहुन कुरुंगवाडी किंवा कुलंगवर जाण्यासाठी ह्या हिवाळा नाळेचा "क्वचितचं" वापर ग्रामस्थ करतात... नाळेतून खाली उतरायला सुरवात  केल्यावर एक छोटासा चिमणी क्लाइंब पॅच लागला... नेमीप्रमाणे अनुप काकांनी सर्वात पुढे जाऊन रेकी केली आणि "फ्रि क्लाइंब मारून" खाली उतरले आणि बाकीच्यांना गाईड केलं... सगळ्यांच्या सॅक्स खाली रोप ने सोडून दिल्या... काही जण रोप चा आधार घेत खाली उतरले तर उर्वरित मंडळींनी "चिमणी क्लाइंब फ्रि मारून" खाली उतरले... रितसर नाळेसारखी गोटेआळी तुडवत पुढच्या पाऊण तासात  हिवाळा धबधब्याच्या पहिल्या पदरात एंट्री मारली... खाली अजून एक दुसरं पदर होतंच... आता मागे वळून बघितल्यावर कुलंग आणि छोटा कुलंग चा विहंगम नजारा दिसत होता... पदरातचं पाणवठ्यापाशी जेवणं उरकली... सगळ्यांना सपाटून भूकही लागली होती... भाऊ काकांनी आणलेल्या भेळभत्त्याचा फडशा पाडण्यात आला... साई ने मस्त पैकी ताक बनवलं... तिडकेने  आणलेल्या भाकऱ्यांवर दही आणि चटणी टाकून झकास कालवा बनवला... सोबतीला भाजी होतीच... तिडके मुळे अनेकांना हल्ली बऱ्याच गोष्टी 'कुस्करायची' सवय लागली आहे... मग उरलेल्या अनेक लिंबाचं पातेलंभर सरबत बनवलं... एवढं सगळं खाल्ल्यावर 'छोट्या' कुलंगच्या पदरात तृप्तीचा 'मोठ्ठा' ढेकर देऊन खोरं दणाणून सोडलं... ढमढेरे काकांनी खरं तर १५ मिनिटांचं अल्टिमेटम दिलं होतं पण भूक शमवायला (पोटाची) थोडा जास्त अवधी लागला...
वेळ दुपारची ०३:४७ PM IST...

पॅनोरॅमिक अ-मी-कु-छोकु... 

                       

                          कुलंगच्या पदरातून भुरट्या जंगलातून आडवं चालत ट्रॅव्हर्स मारत एक एक छोटे ओढे क्रॉस करत पलीकडे घाटघरच्या बाजूला आलो... आता अ-म-कु-छोकु एकाच पॅनोरमा मध्ये दिसत होते...  एकेठिकाणी वाट उजवीकडे उतरल्यावर अजून एक छोटा नाळ सदृश पॅच ओलांडून पलीकडच्या दांडावरून खाली उतरत घाटघरची शेतं तुडवत खाली आलो... आमच्या 'थकलेल्या शरीराने' 'आळसावलेल्या संध्याकाळच्या सूर्यास्तला'  कॅमेरा मध्ये उडवत एकदाचे घाटघरला आलो... आल्या आल्या सनाजीच्या घरच्यांनी आम्हाला झकास पैकी गरम पाण्याच्या २ बादल्या दिल्या... हातपाय धुवून चहा हाणला... सामानाची आवरा-आवरी करून थेट कोतुळला आमच्या नेहमीच्या गुरुमाऊली हॉटेलात गाडी थांबवली... जेवणं उरकून पहाटे पुण्याला आपापल्या घरी रवाना झालो...
वेळ पहाटेची ०२:३५ AM IST...

ठळक वैशिष्ठ्ये :
संपूर्ण ट्रेकचं विशेष वैशिष्ठ्यांनी भरलेला असल्यामुळे वेगळं काहीच ठळक नमूद करत नाही...

जरा इकडे लक्ष द्या :

  • आपण आपल्या घरात कचरा करत नाही ना … मग सह्याद्री मध्ये सुद्धा कचरा करू नका ना … !!!
  • निसर्गातल्या वन्य प्राण्यांना त्रास देऊ नका … !!!
  • बेसुमार झाडांची होणारी कत्तल थांबवा … !!!
  • सह्याद्रीतल्या कुशीत वावरताना अनाठायी वेगळ्या 'Angle' च्या Facebook Photography करण्याच्या नादात …  स्वत:चा आणि निसर्गाचा तोल सांभाळा… !!! 
  • पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देऊ नका … !!!
  • स्थानिक वाटाड्या ला आपणचं किती भारी आहोत… आपल्याला सगळ्याचं वाटा करायच्या आणि "आपण सांगू त्याच वाटेने घेऊन जाण्याचा "फालतू अट्टहास करू नये"… अश्याने स्थानिकांची मने दुखावतात व ते दुसऱ्या गिर्यारोहकांबरोबर योग्य ते सहकार्य करत नाहीत… ट्रेकिंग चे बेसिक Ethics पाळाव्यात… स्थानिक त्या भागातले राजे असतात… त्यांना तिथल्या सगळ्या गोष्टींची खबरबात  असते… तिकडे जाउन त्यांना शहरी शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न करताना…  आपलाच पाय कुऱ्हाडीवर पडतोय ह्याची थोडीशीतरी  जाणीव ठेवावी… 
  • स्वतःच्या आनंदासाठी ट्रेक करा... कोणाशीही कुठल्याही प्रकारची कसलीही तुलना करू नका... 
  • ट्रेक केल्याचा मानसिक आनंद घ्या आणि इतरांना ही द्या... 

ट्रेकळावे,
दत्तू तुपे.

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...