https://www.bankapure.com/2021/02/GavlanGhaat-KoraaiGhaat.html
![]() |
| गवळण घाटातून किल्ले अनघाई... |
मंडळ :
~ अमेय जोशी
~साईप्रकाश बेलसरे
~ दत्तू तुपे
दिनांक : २७ फेब्रुवारी २०२१
रेग्युलर ट्रेक्स चालू
असतानाही बऱ्याच दिवसांनी ब्लॉग लिखाण करतोय... दरवेळच्या घाटवाटांपेक्षा
वेगळं म्हणून छोट्याश्या घाटवाटा उरकायचा पिलांन बनला... संचारबंदीमुळे
कंपलसरी सकाळी ६:०० AM ला गाडी ला स्टार्टर मारून, साई ला चिंचवड हुन उचलून पुढे आकुर्डी रेल्वे स्थानक ला जगतभारी चहा हाणून मग अमेय ला
तळेगावहून उचलून थेट लोणावळा गाठलं... सहारा अँबी व्हॅली च्या रस्त्याला
लागलो आणि वाटेतच पेठ-शहापूरच्या अलीकडे गाडी थांबवून जंगलात आत एंट्री
मारली... मस्त सकाळचा ब्रेकफास्ट म्हणून बटाट्याचे पराठे हाणले... थर्मास
मधला फर्मास चहा ही झाला... विकेंड ची जनरल पिकनिक छाप लोकांची गर्दी
रस्त्यात हळूहळू वाढायला लागली होतीच... गाडी काढून आंबवणे फाटा ओलांडून
थेट एका ग्रामस्थांच्या घरापाशी गाडी लावली... आवरा-आवरी करून निघालो...
वेळ सकाळी १०:०२ AM IST...
३६०° अंशातून फोटो फिरवा : खाली ढाकेवाडी आणि नैऋत्येला अनघाई किल्ला ...
गवळण घाट :
अमेयने आधी सुद्धा हि घाटवाट केली असल्यामुळे चुकण्याचा कुठे प्रश्नचं नव्हता... पुढच्या ५व्या मिनिटाला क्रेस्टलाईन ला पोचलो आणि गवळण घाटाच्या तोंडापाशी पोचलो... सुरवातीच्या दाट कारवीच्या रानातून थेट हिरडा, बेहडा आणि कित्येक वनौषधींच्या मोठ्ठाल्या झाडांतून धोपट वाट तुडवत २० मिनिटांत आरामात खाली कोकणात उतरलो... एका वाळलेल्या न्हाळेत १० मिनिटं उगीच विसावा घेतला... मग पुढच्या १०व्या मिनिटाला मोकळवनात पोचलो... उन्हाळा बऱ्यापैकी जाणवत होता... एक वाट खाली ढाकेवाडी ला जाते आणि उजवीकडे जाणारी वाट कोराई घाटातुन येते... तिथूनच काठीचा झुरा ह्या बारमाही वाहणाऱ्या झुऱ्यातून ढाकेवाडीच्या ग्रामस्थांनी पाण्याची पाईपलाईन खाली गावात आणली आहे... समोर खाली कळंब गाव आणि नैर्ऋत्येला हळूच बाहेर डोकावणारा अनघाई किल्ला उन्हात चांगलाच रापला होता... एरव्ही पावसाळ्यात नयनरम्य असणारा हा परिसर उन्हाळ्यात चांगलाच रखरखीत जाणवत होता... खाली ढाकेवाडी दिसत होती... उजवीकडे कोराई घाटाकडे जाणारी घाटवाट पकडली आणि थोड्याचवेळात काठीच्या झुऱ्यापाशी पोचलो...
वेळ सकाळी ११:२० AM IST...
![]() |
| काठीचा झुरा ... |
कोराई घाट :
कोराई गडावर जाण्यायेण्यासाठी प्रामुख्याने ही प्राचीन घाटवाट तयार केली
आहे ...समोरच्या उत्तरेला दांडापलीकडे घोडेजिन घाटवाट, पूर्वेला कोराई
घाटवाट आणि पश्चिमेला अनघाई किल्ला असल्या ऐतिहासिक खोऱ्यात वावरताना
वेगळाच फिल येत होता...अजूनही कोकणातल्या लोकांना वर देशावर जाण्यासाठी
अनघाई घाट, गवळण घाट, कोराई घाट, ऐतिहासिक घोडेजिन घाट, निसणी घाट, पायमोडी
घाट, इत्यादी - ह्या घाटवाटांचा वापर करावा लागतो... कारण गाडीरस्ता थेट
खोपोलीहून आहे... मध्ये अखंड क्रेस्टलाईन अबाधित आहे... काठीच्या
झुऱ्यापाशी चांगला अर्धा तास टाईमपास केला... पाणी पिऊन घेतलं... आणि
ऐतिहासिक कोराई घाटवाटेच्या दिशेला चढायला सुरवात केली...
![]() |
| Courtesy : साईप्रकाश : कोराई घाटातल्या खोदीव पावठ्या... |
![]() |
| कोराई घाट... |
दुपारी बाराच्या रणरणत्या उन्हात कोराई घाट चढताना मध्येच मोठाल्या झाडांची सावली लाभत होती... थोड्याचवेळात काही खोदीव पावठ्या लागल्या... त्यावर बराच पालापाचोळा साठला होता... नंतर वाट उजवीकडे झाडात जाते... आणि ऊन-सावलीचा खेळ सुरु होतो... वाट चांगलीच धोपट आणि मळलेली आहे... वाटेत अनेक ठिकाणी बिस्किटांची / पान मसाल्याची / वेफर्स /सिगरेट ची रिकामी पाकिटं सापडली... त्यावरून अंदाज आला कि इथे सुद्धा बाजारू लोकांनी जोरदार बाजार भरवला आहे तर...!!! अळंमटळंम करत उगीच किरकोळ ब्रेक्स घेत सुद्धा अर्धा तासात चढाई करून टॉप मारला... मोकळवनात आलो... तिकडून क्रेस्टलाइन च्या जंगलात घुसलो... एव्हाना भूक लागली होतीच... जंगलातचं दाट झाडोऱ्यात आम्हा तिघांची पंगत बसली... मस्त छोलेची भाजी, कांदा बटाट्याचा रस्सा, दही आणि पोळ्या असं जेवण हाणलं... तासभर आराम केला, गप्पा मारल्या आणि थोड्याचवेळात गाडी पाशी पोचलो...
वेळ दुपारची ०३:०३PM IST...
३६०° अंशातून फोटो फिरवा : कोराई घाट ...
इतक्या लवकर ट्रेक संपला आणि आपण खुपचं लवकर घरी जाणार ह्या कल्पनेने मन व्याकुळ झालं... दिवस सत्कारणी लागायला हवा... मग इंद्रायणी लेणं बघायचा माझा हट्ट दोघांनी पुरवला... लोणावळ्यात कृत्रिम शितपेयांनी कोरड्या घशाची तहान भागवली...लोणावळ्यातचं "बापदेव" मंदिर बघितलं... तेव्हा अंदाज आला कि इसपु काळी ऐतिहासिक बोरघाटाच्या वर पांथस्थांना पाण-पोई म्हणून ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या खोदल्या होत्या... आता तो संपूर्ण परिसर नॉन-महाराष्ट्रीयांच्या बंगल्यांनी व्यापला आहे... बापदेव मंदिरापाशी सुद्धा अश्याच पाण्याच्या खोदीव टाक्यांच्या समूह बघायला मिळाला...तिकडून गाडी थेट नारायणी धाम च्या रस्त्याला लावून कैवल्यविद्यानिकेतन शाळेच्यासमोर एक्सप्रेस हायवेच्या अलीकडे पुलापाशी लावल्या... पाण्याची बाटली घेतली आणि अर्ध्या तासात पर्वतीच्या आकाराएवढ्या टेपाडाला वळसा मारून पलीकडे इंद्रायणी लेण्यापाशी पोचलो... इंद्रायणी लेणं आणि त्याची एकंदरीत माहिती जगासमोर आणण्याचं श्रेय साईप्रकासह बेलसरे ला जातं... त्याने अनेक वर्ष इकडून जाऊन बघ, तिकडून जाऊन बघ करत शेवटी हे लेणं शोधून काढलंचं... इंद्रायणी लेणं विषयी माहितीकरिता येथे वाचा : इंद्रायणी-लेणे धुंडाळताना...
![]() |
| श्री.बापदेव मंदिर ... |
![]() |
| इंद्रायणी लेणं ... |
३६०° अंशातून फोटो फिरवा : इंद्रायणी लेणं...
इंद्रायणी लेणं बघून माघारी आलो... अमेय ला तळेगावला सोडला, साईबरोबर नेहमीप्रमाणे चिंचवड मध्ये पवनेश्वर चा झकास चहा मारला आणि पुण्यात संध्याकाळी घरी पोचलो...
ठळक वैशिष्ठ्ये :
१. नेहमीप्रमाणे फाईव्ह स्टार ट्रेक करून लाड पुरवल्याबद्दल साईचे तीव्र आभार...
२. रणरणत्या उन्हात पटकन मारलेल्या दोन घाटवाटा.....
४. सोबतीला बापदेव मंदिर आणि पाण्याची टाकी, विथ इंद्रायणी लेणं बोनस...
जरा इकडे लक्ष द्या :
- आपण आपल्या घरात कचरा करत नाही ना … मग सह्याद्री मध्ये सुद्धा कचरा करू नका ना … !!!
- निसर्गातल्या वन्य प्राण्यांना त्रास देऊ नका … !!!
- बेसुमार झाडांची होणारी कत्तल थांबवा … !!!
- सह्याद्रीतल्या कुशीत वावरताना अनाठायी वेगळ्या 'Angle' च्या Facebook Photography करण्याच्या नादात … स्वत:चा आणि निसर्गाचा तोल सांभाळा… !!!
- पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देऊ नका … !!!
- स्थानिक वाटाड्या ला आपणचं किती भारी आहोत… आपल्याला सगळ्याचं वाटा करायच्या आणि "आपण सांगू त्याच वाटेने घेऊन जाण्याचा "फालतू अट्टहास करू नये"… अश्याने स्थानिकांची मने दुखावतात व ते दुसऱ्या गिर्यारोहकांबरोबर योग्य ते सहकार्य करत नाहीत… ट्रेकिंग चे बेसिक Ethics पाळाव्यात… स्थानिक त्या भागातले राजे असतात… त्यांना तिथल्या सगळ्या गोष्टींची खबरबात असते… तिकडे जाउन त्यांना शहरी शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न करताना… आपलाच पाय कुऱ्हाडीवर पडतोय ह्याची थोडीशीतरी जाणीव ठेवावी…
- स्वतःच्या आनंदासाठी ट्रेक करा... कोणाशीही कुठल्याही प्रकारची कसलीही तुलना करू नका...
- ट्रेक केल्याचा मानसिक आनंद घ्या आणि इतरांना ही द्या...
- अनावश्यक बाजार भरवणं थांबवा...






No comments:
Post a Comment