https://www.bankapure.com/2021/03/HelvyaachiPaaj-TalyaachiPaaj-SiddhachaDongar.html
![]() |
| हेळव्याची पाज उतरताना... |
मंडळ :
निनाद बारटक्के
निरंजन भावे
विक्रम पेठे
केदार नरवाडकर
चिराग मुळे
मंदार वर्तक
उत्तमराव
ढमढेरे काका
दत्तू तुपे
दिनांक : २६ मार्च २०२१
सुमारे महिनाभर आधीपासून ह्या ट्रेकची प्लॅनिंग सुरु होतीच... मॅप्स चा जोरदार अभ्यास, स्थानिकांकडून चौकशीसत्र, पब्लिकची जुळवाजुळव आणि त्यात लॉकडाऊनची उगीचंच धास्ती, त्यामुळे कोल्हापूर जिल्हा आणि पुणे जिल्हा मध्येच ४ प्लॅन्स बनवले गेले... शेवटी जेव्हा कळलं कि लॉकडाऊन एप्रिल मध्ये पण लागणार नाहीये तेव्हा मूळ प्लॅन वर आलो... ठरल्याप्रमाणे सगळे माझ्या घरातून रात्री ९:१२ PM IST ला निघालो... कापूरहोळ पाशी नेहमीप्रमाणे खडीसाखरेचा चहा आणि घरातून जेवण झालेलं असतानाही गरमागरम वडापाव हाणला... थर्मस मध्ये चहा भरून वाटेत कऱ्हाडला पंकज हॉटेलच्या बाहेर प्रगतिशील शेतकरी जिद्द उर्फ मंदार वर्तक ला उचलला... कागल मार्गे गारगोटी वरून जाताना वाटेत अंधारात कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्ह्याचे दर्शन झाले... शिवाय सांबराचे हि दर्शन झाले... पहाटे ०३:३५ AM IST ला भटवाडी येथील श्रीराधाकृष्ण मंदिरात पोचलो... गाडीतून उतरल्यावर उत्तमरावाला लक्षात आलं कि त्याचं पैश्यांचं पाकीट (वॉलेट) काही केल्या सापडेना... बरीच शोधाशोध केल्यावर अंदाज बांधला कि शेतकरी ला कऱ्हाड ला उचलताना वाटेत लघुशंकेला थांबलो असताना कदाचित तिकडे पाकीट पडलं असावं... शेवटी पाटगावच्या रस्त्याला माघारी जाऊन त्याने मोबाईल ला रेंज आल्यावर सगळी क्रेडिट/डेबिट कार्ड ब्लॉक केली... पुन्हा मंदिरात येऊन झोपायला तसा तासभर गेलाचं...
वेळ पहाटेची ०४:४७ AM IST...
![]() |
| भटवाडीच्या अलीकडच्या राधाकृष्ण मंदिरातील आमच्या मुक्कामाची जागा... |
दिनांक : २७ मार्च २०२१
सकाळी ०६:०० AM IST च्या गजराने जाग आली... आवरा आवरी करून पुन्हा पाटगावच्या दिशेने जिथे रेंज येत होती तिकडे गेलो... शेतकरीच्या मित्राला सकाळी सकाळी कामाला लावलं... तो बिचारा दात न घासता तडक कऱ्हाडच्या पंकज हॉटेलपाशी शोधकार्याला गेला पण दुर्दैवाने त्याला काही पाकीट सापडलं नाही... फोनाफोनी संपल्यावर आम्ही भटवाडी ला गेलो... वाटेत आम्हाला श्री.तुकाराम लाड भेटले... त्या सद्गृहस्थाने श्री.अनंत लाड किंवा इतर कोणी मंडळी आमच्याबरोबर येऊ शकतील ह्यासाठी अर्धी भटवाडी पालथी घातली... गावात इतर कोणीही यायला तयार नव्हतं कारण एकतर घनदाट जंगलात फारसे कोणी फिरकत नाहीत आणि बाकीच्यांना शेतीची कामं होती... मग वाटेत श्री.संतोष कांबळे मामा भेटले... त्यांनी आडवाडी ला श्री.बाजीराव कांबळे किंवा श्री. सुभाष कांबळे ह्यांना भेटायला सांगितलं... पुन्हा ५ किलोमीटर अलीकडे आडवाडी ला आलो... हो नाही करता कोणीच तयार झाले नाहीत... शेवटी श्री. बाजीराव कांबळे मामांनी खाली घोटगे गावात श्री. दिगंबर केळुस्कर "तुम्हाला सिद्धाच्या/भरणीच्या वाटेला लावून देतील" असा सल्ला दिला... ह्या सगळ्या धामधुमीत एव्हाना सकाळचे ९:०० AM IST वाजले... हेळव्याच्या वाटेने खाली उतरून घोटग्यात जाऊन भरणीच्या वाटेने वर येणे - हाच निर्णय फायनल करून आम्ही मंदिरात पुन्हा डेरेदाखल झालो... पब्लिक आमची वाट बघतचं होते... मंदिराबाहेर ब्रेकफास्ट म्हणून खडीसाखरेचा चहा आणि उकडलेली अंडी, भावे ने आणलेला वॉलनट केक फस्त केला... इथल्या घनदाट जंगलामुळे बिबट्याची दहशत अजूनही ह्या भागात एरव्हीचं असते... पण आपल्याकडे ऍसिडिक बिबट्या, ऍलर्जिक बिबट्या आणि वकार युनूस बिबट्या असल्याने खराखुरा बिबट्या आमच्या नादी लागणारचं नाही असा सार्वजनिक "हाहाक्षात्कार" झाला... कपडे बदलून पुन्हा आडवाडी ला आलो... एका झाडाखाली दोन्ही गाड्या लावल्या... एव्हाना एक मामा खाली घोटग्यात चालले होतेच... आम्ही हि त्यांच्याबरोबरीने निघालो...
वेळ सकाळची ०९:३५ AM IST...
![]() |
| हेळव्याच्या पाजेच्या अलीकडे आमच्या गाड्या.. |
![]() |
| हेळव्याची पाज उतरताना... |
![]() |
| उजव्या बाजूला दिसणारी सिद्धाची पाज... |
![]() |
| आंब्याच्या झाडाखाली ९ जणांनी घेतलेला २०वा... |
हेळव्याची पाज :
सुरवातीच्या मोकळवनातून जाणारी धोपट वाट अचानक पुढच्या ५व्या मिनिटाला क्रेस्टलाईनला खाली उतरायला लागते... रेंज आल्यावर प्रत्येकाने आपापल्या घरी जिवंत असल्याची ग्वाही दिली... हळूहळू कोकणातला उष्मा जाणवायला लागला होता... दूरवर कोकणातली घरं दिसायला लागली होती... उत्तरेला "सोनगड" उठवलेला होता...पूर्वेला "घोटग्याची पाज" आणि त्याचा दांड खाली उतरलेला दिसत होता...हल्लीच्या युवापोरांची डोक्यावरच्या "केसांची हेअरस्टाईल" - जशी साईडने चकोट आणि वर संपूर्ण केसांचं टोपलं ठेवतात तद्वत पश्चिमेला सिद्धाच्या डोंगराच्या पदरातलं घनदाट जंगल क्रेस्टलाईन वर दिसत होतं... तिथून खाली आलेली वऱ्हाडाची पाज उर्फ सिद्धाची पाज उर्फ तळ्याची पाज दिसत होती...सध्याच्या "चालू" राज्य सरकारने अराजकता माजवलेल्या घटनांच्या राजकीय गप्पा मारता मारता आम्ही तासाभरात बऱ्यापैकी खाली उतरलो... जंगलपट्टा सोडून आता कोकणातल्या शेताडीवरून चालत होतो... सकाळचा ११चा सुमार असला तरीही ऊन "मी" म्हणत होतं... वाटेत एका मामांना भरणीच्या पाजेविषयी चौकशी केली असता त्यांनी घोटग्यात जायला सांगितलं... थोड्याचवेळात एका मोठ्या आंब्याच्या झाड्याखाली सगळ्यांनी छोटासा तहानलाडू-भुकलाडू ब्रेक घेतला... केदार ने रुह-अफझा मध्ये सबजा आणि पुदिन्याची पानं टाकून बनवलेलं अप्रतिम थंडगार सरबत प्यायलं दिलं... टेक्निकल सेकंड फ्रंटलाईनचा धडाडीचा उत्साही कार्यकर्ता असल्याची जाणीव पुन्हा एकदा केदार ने सगळ्यांना करून दिली... तिकडून घोटगे गावात एंट्री मारली... गाव तसं टुमदार... डांबरी सडकेवरून चालताना ऊन चांगलंच जाणवायला लागलं...आणि त्यात दमटपणामुळे जोरदार घामही यायला लागला... एके ठिकाणी सुंदर बहरलेला "बहावा" झाडाने आमचं लक्ष वेधून घेतलं... दुपारचा १२:०० PM IST चा सुमार... वाढती भूक, वाढती तहान आणि वाढतं ऊन ह्यामुळे सगळ्यांची चाल मंदावली... वाटेत अनेक ठिकाणी आंब्याच्या झाडांना मोठाल्या कैऱ्या लगडलेल्या दिसल्या... एका किराणा मालाच्या दुकानात चौकशी केल्यावर मंदिराच्या मागे दिगंबर केळुस्कर ह्यांचे घर सापडेल असं कळलं... तेवढ्यात उत्तमराव ला एका अनामिक नंबर वरून व्हाट्सअँप मेसेज आला... तुमचं पाकीट सापडलं आहे, ओळख दाखवून पाकीट कऱ्हाड मधून घेऊन जा... त्याने लागलीच कॉल करून माहिती काढली... नाव होतं "श्री. मलिक बारगीर, डिलाइट बेकरी, कोल्हापूरनाका, कऱ्हाड..." आम्हाला आश्चर्याचा जोरदार धक्काचं बसला... कॅश सकट पाकिटात सगळं जसंच्या तसं होतं... चला म्हणजे माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा भक्कम पुरावा मिळाला...
![]() |
| बहरलेलं बहावा झाड.. |
![]() |
| सौजन्य : शेतकरी जिद्द उर्फ मंदार वर्तक... |
घोटग्यात कोणाच्याही तोंडावर मास्क नव्हता हे बरं होतं कारण अजूनही कोरोना ने गावात एंट्री मारली नव्हती...श्री. दिगंबर केळुस्कर मामांचा पत्ता शोधत शोधत फायनली त्यांच्या घरी पोचलो... त्यांच्या घराच्या ओसरीवरचं दुपारचं जेवण उरकलं... मामांनी सुद्धा आग्रहाने मस्त कैरीची चटणी दिली... उत्तमरावने आणलेला दही-भात आणि बटाटयाची भाजी पोळी, केदार ने बनवलेलं होममेड "हमस" आणि पराठे, ढमढेरे काका आणि भावे ने आणलेली बटाट्याची भाजी आणि पोळी, मी आणलेली पावभाजीची भाजी, दही असं सगळं फस्त करण्यात आलं... डबे धुवून ५ मिनिटं आराम केला... आवरा-आवरी उरकून तळ्याच्या पाजेला जाण्यासाठी तयार झालो... दिगंबर मामांबरोबर बाळू मामा सुद्धा आमच्या सोबतीला आले...
वेळ दुपारची ०२:०० PM IST...
![]() |
| तळ्याच्या प्रजेच्या आधीचं मोकळवन... |
![]() |
| क्षणभर १५ मिनिटांची झोप... |
तळ्याची पाज / सिद्धाची पाज / वऱ्हाडाची पाज :
वेळेचं गणित बघता आम्ही भरणीची पाज स्किप करून तळ्याची पाज करायची असा सार्वजनिक निष्कर्ष काढला ... कारण भरणीच्या पाजेसाठी घोटग्यातल्या बाजारपेठेत जावं लागलं असतं आणि मग तिकडून एखादा गावकरी भरणीच्या वाटेला आम्हाला गाईड म्हणून आला असता/नसता ह्याबाबतीत आम्ही साशंक होतो... गावातल्या शेवटच्या घराचा गडगा (कोकणात दगडांच्या राशींची तटबंदी) ओलांडून रानात आलो...गुरांना पेशल थंडावा देण्यासाठी एक छोटा तलाव बांधला होता... ४-५ म्हशी आरामात डुंबत बसल्या होत्या... तळ्याच्या वरच्या अंगाला गुरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती... तिकडून तसंच पुढे रानात चालत गेलो... एक मोठ्ठाल्या कोरड्या नदीपात्रातील गोटेआळींना तुडवून पलीकडे पोचलो... उन्हाळा आणि त्यात कोकणातला उष्मा आणि दमटपणा चांगलाच जाणवायला लागला होता... करवंदांच्या जाळ्या आणि इतर झाडं-झुडपं तुडवत हलक्याश्या ढेकूण चढानंतर एका झाडाखाली सगळे विसावलो... थोडावेळ चक्क १५ मिनिटं झोप काढली... तेव्हा कुठे थोडी तरतरी आली... मग सुरु झाला पुन्हा जंगलातला प्रवास... त्यात होळी पौर्णिमा असल्यामुळे अजूनच थकायला होत होतं... पौर्णिमेच्या काळात समुद्राला जोरदार भरती येते तर मग माणसाच्या शरीराला काय होत असेल जे ७०% पाण्याने भरलेलं असतं... पावलागणिक दगडांवर पांढऱ्या ऑइलपेंट ने दिशादर्शक बाण मारले होते... काही अंतर पुढे गेल्यावर दोन्ही मामांना त्यांची मंजुरी दिली, ते त्यांच्या गावी परतले आणि आम्ही पुढे मार्गस्थ झालो...
![]() |
| तळ्याची पाज चढताना ... |
![]() |
| तळ्याची पाज चढताना ... |
![]() |
| वाहणारा जिवंत झरा... |
हळूहळू चढ चांगलाच दम काढत होता... कोकणातला दमटपणा आणि उष्मा ह्यामुळे सगळ्यांचीच चाल संथगतीने पुढे सरकत होती... त्यात कोकणातली केमरं नावाची चिलटं असतात जी सतत आपल्या डोळ्याभवती आणि कानाभवती घोंग-घोंग करत असतात... मारायला गेलं तर पटकन हातात पण येत नाहीत... निदान काय चावायचं ते चावून घे म्हणून शांत उभा राहिलो तर तेही नाही... नुसतंच आपलं कानापाशी /डोळ्यांपाशी घोंग-घोंग चालूचं... फुल्ल डोक्याची महात्मा फुले मंडई...पाणी प्यायचं, घाम पुसायचा आणि केमरं हाकलायची... हे बऱ्याच वेळ चालू होतं... घामाने तर पार सगळे भिजून गेलो... दाढीतून घामाच्या धारा वाहत होत्या... सॅक्स मधलं पाणीही संपायला आलं होतं... दर २० मिनिटांनी छोटा ब्रेक घेत चढत होतो... पण बसलं कि केमरं कानापाशी घोंघावत होती... घामाने भिजलेल्या पंच्याने/टोपीने आपापली तोंडं / कान झाकून केमरांपासून कशीबशी तात्पुरती सुटका करत होतो...पाजेचा चढ चांगलाच छाताडावर होता... एके ठिकाणी ब्रेक घेतला असतानाच निनादला ऍसिडिटी चा त्रास होत असल्यामुळे पेठे आणि मुळे ने निनाद ला जबरदस्ती उलटी करायला लावली... जोरदार "पोटभर उलटी" झाली आणि त्याचा ऍसिडिक बिबट्या शांत झाला.... जंगलातला शहरी वकार युनूस बिबट्या ... काय बिशाद आहे खऱ्याखुऱ्या बिबट्याची आमच्यासमोर यायची... एव्हाना सूर्य मावळतीला जायला लागला... एके ठिकाणी केदार ने टेक्निकल सेकंड फ्रंटलाईन चा "आजीव सभासद" असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध करत सगळ्यांना अर्धा कप रुह-अफझा, सबजा आणि पुदिना मिक्स सरबत प्यायला दिल्यावर सगळ्यांना तरतरी आली... चढताना भली मोठ्ठाली उंचचं उंच झाडं होती... काही झाडांच्या बुंध्याचा घेर तर चक्क ४ माणसं एकत्र एकमेकांची हात धरून उभी राहिली असती तरी बुंधा हातात मावला नसता... हिरडा, बेहडा, रान-कढीपत्ता, आंबा आणि इतर अनेक झाडं होती... करटूक्या (White Cheeked Barbet) दूरवरून आम्हाला साद घालत होता... मध्येच शिळकरी कस्तुरही (Malabar Whistling Thrush) साद घालत होता... मजल-दरमजल करत चढत होतो... सोबतीला केमरं कानापाशी घोंघावत होतीच... थोड्यावेळाने क्रेस्टलाईन ला पोचल्यावर केमरांचा त्रास नाहीसा झाली आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला... बहुदा त्यांच्या पोलीस स्टेशनची हद्द संपली असावी... एके ठिकाणी मस्त वाहणारा छोटासा झरा सापडला... झऱ्यातलं नैसर्गिक थंडगार गोड पाणी पिऊन आत्मा तृप्त झाला... खऱ्या अर्थाने तृष्णा भागवली गेली... पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या... एके ठिकाणी झाडाला कॅलेंडर लटकवलेलं दिसलं... काहीठिकाणी ग्रामस्थांनी थोडाफार कचरा केलेला आढळला... कदाचित दिशादर्शक बाणांवरून नजर हटू नये म्हणून "नजर" नावाची गुटख्याची रिकामी पाकिटं सुद्धा काही ठिकाणी सापडली...
वेळ संध्याकाळची ०५:०० PM IST...
![]() |
| सिद्धाच्या डोंगराच्या पदरातलं कचकचीत घनदाट जंगल... |
सिद्धाच्या डोंगराच्या पदरातलं कचकचीत घनदाट जंगल...
सिद्धाची खिंड :
एव्हाना सूर्य मावळतीला जायला लागला... जंगलातून पलीकडे गेल्यावर एका मोकळवनात आलो...आता उजवीकडे सिद्धाचा डोंगर चांगलाच उठवलेला दिसत होता... दिशादर्शक बाण आम्हाला उजवीकडे जायला सांगत होते... झाडाला लटकवलेल्या कॅलेंडर पासून एक कच्ची वाट डावीकडे वाट जात होती... मॅप मध्ये बघितल्यावर अंदाज आला कि ते इथून आडवाडीचं अंतर लैचं होतं जे निश्चित आम्हाला रात्रीच्या जंगलातुन पलीकडे घेऊन गेलं असतं... पण वाट धोपट नव्हती... आणि आमच्याबरोबर स्थानिक असं कोणीच नव्हतं शिवाय अंधारात उगीचंच हरवायला नको म्हणून आम्ही दिशादर्शक बाणांच्या साथीने उजवीकडे निघालो... आता खऱ्या अर्थाने चालू झालं टिपिकल कोल्हापूरातलं कचकचीत घनदाट जंगल... दाजीपूरच्या पाटयाच्या डंगची पदोपदी आठवण करून देत होतं हे सिद्धाच्या डोंगराच्या पदरातलं कचकचीत घनदाट जंगल... निरनिराळ्या पक्ष्यांची घरी परतण्याची किलबिल सुरु होतीच... वर बघा, समोर बघा, मागे बघा कुठेही नजर टाकली तरी उंचचं उंच झाडांचं कचकचीत घनदाट जंगल होतं... वाळलेल्या पाचोळ्यांना तुडवत जंगलातून पुढे चाललो होतो... एव्हाना संध्याकाळचा सुर्यास्तही झालाही होता... संधिप्रकाशात उर्फ गोल्डन अल्पाईन च्या प्रकाशात आम्ही जंगल तुडवत होतो... जबरदस्त अनुभव होता... एखादं हिंस्त्र जनावर आलं असतं तर आम्ही पळता भुई थोडी झाली असती... ना धड पुढे ना मागे... कल्पना न केलेलीच बरी... थोड्यावेळाने पुढे एक चढाई लागली... ती वाट अचानक डावीकडे वळाली आणि छाताडावरच्या जंगलातल्या १५ मिनिटांच्या दमदार चढाई नंतर आम्ही एकदम सिद्धाच्या खिंडीत हजर झालो... जंगलसफारी साठी कच्चा रस्ता बनवतात तद्वत हा रस्ता उजव्या अंगाला सिद्धाच्या डोंगरावर गेला... वेळेअभावी आम्ही खाली भटवाडी ला जायचा निर्णय घेतला... तेव्हाच उद्या सकाळी रांगणा किल्ला स्किप मारून इकडे गाडीने वर यायचं आणि दोन्ही गाड्यांच्या ४X४ चा चालना द्यायची असा मनातचं निर्धार केला...
![]() |
| सिद्धाच्या डोंगराच्या पदरातलं कचकचीत जंगल... |
![]() |
| खिंडीत आल्यावर क्षणभर विश्रांती... |
थोड्यावेळ आराम केला... एव्हाना पिंगळ्यांचे (Spotted Owlet) चे कॉल्स ऐकू यायला लागले... अंधार पडायला लागला... देवदर्शन न करता थेट भटवाडी ला जायचा निर्णय घेतला... डावीकडे खाली सफारीच्या वाटेने उतरायला सुरवात केली... गाड्या आणण्यासाठी मी, उत्तमराव, केदार, भावे आणि निनाद आम्ही सगळे पुढे चालायला लागलो... ठरल्याप्रमाणे उरलेल्यांना घ्यायला गाडी वर घेऊन यायचं होतं... मध्येच वाटेत रातवा (Nightjar) पक्ष्याचे कॉल्स ऐकू येत होते... होळीच्या पूर्णचंद्राने चांगलाच प्रकाश पडला होता त्यामुळे कुठेही टॉर्च काढावा लागला नाही... चंद्रप्रकाशात झाडांची पानं मस्त चमकत होती... मध्येच एखाद्या काटेरी झाडाच्या मागे चंद्र चांगलाच उठवलेला दिसत होता... एकदम मनात "चौदवी का चाँद हो..." हे गाणं आठवलं... वातावरण एकदम झकास होतं... असं वाटत होतं तिथेच थांबावं पण पर्याय नसल्यामुळे मनाला यावर घातला... आमची पावलं झपाझप पडत होती... काहीहा करून वेळेत भटवाडी ला पोचून गाड्या आडवाडीहुन आणायच्या होत्या... मध्येच मृगजळ सारखे चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेले एखादी झाड दिसायचे आणि आम्हाला वाटायचं कि चला गाव आलं... पण मग भास-निरास होयचा... पावसाळ्यापूर्वी बहुतेक ह्या रस्त्यावरून काजव्यांची दिवाळी बघायला मिळेल असं वाटतंय... सुमारे पाऊण तासाच्या तंगडतोडीनंतर आम्हाला भटवाडी गावातले खरेखुरे लाईट्स दिसायला लागले... श्री.विनोद लाड नावाचे सद्गृहस्थ भेटले त्यांच्या गाडीवरून आडवाडी ला जाऊन माझी गाडी परत आणली... एव्हाना मंडळी सुद्धा भटवाडीत डेरेदाखल झाली होती... आडवाडी ला जाऊन पुन्हा एकदा उत्तमरावची गाडी घेऊन आलो... लगतच्या श्री सातेरी देवी मंदिरात सामान टाकलं... ४-५ मंडळींचा "बदक काचिमल" झाला होताच... पण इचगार्ड कामी आलं... उत्तमरावने पुण्याहून २० लिटर आणि २५ लिटर चे २ कॅन भरून "पु चं पा" आणलं होतं... सायफन ने सगळ्या बाटल्या / पातेल्या भरून घेतल्या... आल्यावर भरपूर पाणी पिऊन घेतलं...
![]() |
| ऍलर्जिक बिबट्या आणि ऍसिडिक बिबट्या... |
![]() |
| झोपण्याची तयारी... |
आवरा आवरी करून एका घरातून पाण्याचे २ हंडे आणि एक २० लिटर कॅन भरून गाडीतून हिंदकळत मंदिरात आणलं... तोपर्यंत बल्लवाचार्य केदार ने पुन्हा एकदा टेक्निकल सेकंड फ्रंटलाईन चा धडाडीचा कार्यकर्ता असल्याची ग्वाही दिली...रात्रीच्या डिनर साठी अमूलच्या फुल्ल क्रिम मध्ये शिजवलेला कोकोनट राईस आणि खडा मसाला घालून बनवलेला फ्लॉवर-बटाटा-टोमॅटोचा अशक्य भारी लाजवाब गरमागरम रस्सा... किती खाऊ आणि किती नको असं झालं... जेवणाच्या सामानाची आणि जेवण बनवायची संपूर्ण जबाबदारी केदार ने अगदी लिलया उचलली होती... एव्हाना दुसऱ्या दिवशी रांगणा करायचा कि नाही ह्यावर चर्चासत्र सुरु झालं, कारण आमच्या गाड्या आडवाडीहून आणताना असंख्य भावडे पब्लिक त्याच रात्री आपापल्या बाईक्स वरून रांगण्याकडे कूच झालेले आम्ही पाहिले होते... शेवटी खिंडीत ठरवल्याप्रमाणे सिद्धाच्या डोंगरांवर गाड्या न्हेणे आणि दुपारच्या लंच ला हॉटेल देहाती गाठणे आणि संध्याकाळी पुण्याला आपापल्या घरी रवाना होणे हा ठराव मंजूर झाला... त्याच रात्री चैतन्य कोल्हापूरहून थेट पाटगाव ला येणार होता पण हॉपिसच्या कामात व्यस्त असल्याने तो भल्या पहाटे दुसऱ्या दिवशी येणार होता... ढमढेरे काकांनी त्याला थेट कोल्हापुरात हॉटेल देहाती ला भेटू असा निरोप दिला... मनसोक्त जेवल्यावर सामान आवरून झोपायची तयारी केली... भयंकर उकडत होतं म्हणून मंदिराच्या बाहेर ओसरीवर आमच्या स्लिपींग बॅग्स/कॅरी मॅट्स टाकून पडी मारली...
वेळ रात्रीची ११:१२ PM IST...
![]() |
| श्री.सातेरी देवी मंदिर परिसर... |
मुख्य मंदिरात ढोल वाजवणारे मामा...
भुंग्यांची प्रणयक्रीडा - स्लो-मोशन.
दिनांक : २८ मार्च २०२१
सिद्धाचा डोंगर :
सकाळी नेहमीप्रमाणे ६:०० AM IST ला जाग आली... आज झोप मस्त झाली होती... पण भयंकर उकडत होतं आणि वातावरण सुद्धा ढगाळ होतं... तेवढ्यात गावातून एक मामा आले आणि पलीकडच्या छोट्या मंदिरातून एक मोठा ढोल घेऊन आले आणि मुख्य मंदिरात देवीला उठवायला तो ढोल बडवायला सुरवात केली... जसा जसा ढोलचा आवाज वाढायला लागला तसा तसा पेठे हळू हळू स्लो-मोशन मध्ये जागा होऊन उठून बसला... नेमका तो क्षण व्हिडीओ मध्ये कॅप्चर करायचा राहून गेला... डॅम्न इट...!!!!! केदार ने मस्त कॉफी बनवली...भावे ने आणलेल्या वॉलनट केकचा फडशा पाडला... भुंग्यांच्या विणीचा हंगाम असल्याने ७-८ भुंगे हवेतल्याहवेत प्रणयक्रिडा करत होते... पलीकडे झाडावर कोतवाल (Drongo) आणि तांबट पक्षी (Coppersmith Barbet) विसावले होते... बुलबुल पक्ष्यांची किलबिल सुरु होतीच... त्यात २ भुभूंची दंगामस्तीही सुरु होती... आणि एवढयात पाऊस पडायला सुरवात झाली... गरम कॉफी आणि पाऊस... अशक्य भारी क्षण... आम्ही मंदिरात आडोश्याला आलो... काहीक्षणांपुरतं का होईना पण पावसाने उकाड्यापासून सुटका केली... मुख्य मोठ्या मंदिराच्या शेजारी पूर्वीचं सातेरीदेवीचं मंदिर आहे... समोर अजून एक शिवमंदिर आहे... बाजूला कायमस्वरूपी स्टेज बांधला आहे... नव्या बांधणीची दीपमाळ रंगवली आहे... शेतकरीने मंदिर स्वछ झाडून घेतलं... सामान गाडीत टाकून सिद्धाच्या डोंगराकडे कूच झालो...
![]() |
| खिंडीत लावलेल्या गाड्या... |
श्री. विनोद लाड ह्यांच्या घरावरून डाव्या अंगाला एक मोठी वाट जाते... हीच ती सिद्धाच्या डोंगराची वाट... दोन्ही गाड्यांचे ४X४ लावले... निनाद ने सन-रूफ मधून गिम्बल द्वारे व्हिडीओ शूटिंग केलं... ३-४ छोटे पॅचेस सोडले तर कुठल्याही गाड्यांना कुठेच त्रास झाला नाही... अर्थात आपली मंडळी मदत करत होतीच... शेवटच्या टप्प्यापाशी दोन्ही गाड्या लावून सिद्धाच्या डोंगराकडे मार्गस्थ झालो... मोठ्ठाल्या दगडांच्या शिळांमधून वाट बरोबर एका काळ्या लोखंडी शिडीपाशी आपल्याला आणून ठेवते... शिडी चढून वर गेल्यावर सिद्धाच्या डोंगराचा पसारा आणि त्याचा घेर लक्षात येतो.. जांभ्या दगडांचा सडा पडला होता... एकेठिकाणी मधोमध दगडांच्या राशींमध्ये काही देव बसवले आहेत ... उदबत्त्या विखुरलेल्या पडल्या होत्या... पलीकडे पश्चिमेला गेल्यावर एक वाट खाली डावीकडे उतरते.. तिकडून दुसरी गुहा म्हणजे सिद्धाची गुहा... बाहेर घंटा लावल्या आहेत... वटवाघळांचा मुक्त संचार होता... खाली गुहेत काही त्रिशूळ ठेवलेले आहेत... गुहेतून बाहेर आल्यावर असेच खाली उतरून एका महाकाय दगडावर २ मिनिटं विसावलो... पुन्हा वर येऊन डोंगरफेरी केली... उत्तरेला सोनगड उठवलेला, खाली भरणी गाव आणि कचकचीत घनदाट जंगलातली भरणीची पाज दिसत होती... पलीकडे ईशान्येला आम्ही आलो त्या घनदाट जंगलाली तळ्याची पाज... डोंगराचा आवाका बऱ्यापैकी मोठा होता... थोड्यावेळाने खाली गाड्यांपाशी परतलो... कालच्याच तळ्याच्या खिंडीपाशी येऊन पुरणपोळ्या हाणल्या... तूप गरम करावं म्हणून इंजिन वर तुपाची बाटली ठेवण्यात आली... गरम तूप आणि पुरणपोळ्या असा सकाळचा ब्रेकफास्ट उरकला... मगाचचेचं काही किरकोळ पॅचेस सोडले तर भटवाडी ला परत आरामात परतलो...कपडे बदलून कोल्हापूरच्या दिशेने मार्गस्थ झालो...
जंगल सफारी चा एक व्हिडीओ...
वाटेत गारगोटी पासून आमच्या तोंडावर दोन दिवसांनी पुन्हा मास्क लागले कारण शासकीय "वाटमारी" सुरु झालेली होती... कडगांव ला उत्तमरावच्या गाडीत डिझेल भरलं... कोल्हापुरात चैतन्य सोबत हॉटेल देहाती ला मस्त तांबडा-पांढरा हाणला... अनिता ला पान खाल्लं... कोल्हापूर हायवे ला ताशी ९०च्या पुढे स्पिड न्हेला तर पुन्हा शासकीय "वाटमारीचा" बळी पडायचा म्हणून ८०km/hr ने गाडी हाकली... कुठलीही पूर्वसूचना न देता मार्च -एंडिंगच्या नावाखाली पांढऱ्या एर्टिगा गाडीत एका झाडाखाली हे "डोमकावळे वाटमारीकर" स्पिडगन घेऊन बसलेले असतात... कऱ्हाड ला उत्तमरावचे पाकीट सहीसलामत परत "भेटले", त्याने बक्षीसाखातर भेट म्हणून श्री.मलिक बारगीर ह्यांना १०००/- दिले... वाटेत कऱ्हाड ला आईस्क्रीम हाणलं आणि पुढे हॉटेल आराम ला चहा ढोसला... पुण्यात संध्याकाळी परतलो...
वेळ संध्याकाळची ०६:३५ PM IST...
ठळक वैशिष्ठ्ये :
- टेक्निकल सेकंड फ्रंटलाईन चा उत्साही आणि धडाडीचा "आजीव सभासद" कार्यकर्ता असलेल्या केदार ने जेवणाची उत्तम सोय केली...
- घनदाट कचकचीत जंगलातला शेवटच्या टप्प्यातला अविस्मरणीय प्रवास...
- कोकणातल्या उष्माघाताने आणलेला अमर्याद घाम...
- सोबतीला केमरांचा कानापाशी /डोळ्यापाशी घोंघाट...
- तळ्याच्या पाजेपाशी क्रेस्टलाईन ला सापडलेला थंडगार गोड पाण्याचा वाहणारा झरा...
- कोकणातल्या माणसांनी केलेली मदत... श्री.तुकाराम लाड, श्री.संतोष कांबळे, श्री.बाजीराव कांबळे, श्री.दिगंबर केळुस्कर, श्री.बाळा मामा
- दोन्ही गाडयांना ४X४ लावून केलेली जंगल सफारी...
ट्रेकळावे,
दत्तू तुपे.




















No comments:
Post a Comment