मंडळ :
* निनाद बारटक्के
![]() |
| Courtesy @ श्रवण : दाजीपुर अभयारण्य |
* नितीन तिडके
* श्रवण प्रसाद
* केदार नरवाडकर
* विक्रम पेठे
* निलेश बाबर
* प्रसाद तांदळे
* यतीन नामजोशी
* उत्तम काका
* ढमढेरे काका
* अनुप काका
* दत्तू तुपे
दिनांक : १६ नोव्हेंबर २०१३
फडताड-घाट च्या ट्रेक नंतर दिवाळीमुळे कुठेही ट्रेक ला जाता आलं नाही… एखादा घनदाट जंगल ट्रेक मारू म्हणून पुनश्च: एकदा दाजीपुर चा विचार सगळ्यांसमोर मांडला… आणि बघता बघता १२ मंडळी तयार झाली… पुण्याहून अनुपकाकांची पांढरी स्विफ्ट, उत्तमरावांची लाल गेट्झ आणि दत्तूची निळी स्विफ्ट अश्या तीन गाड्यांत १२ माणसं कोंबून पहाटेच्या ०२:१२ AM च्या कडाक्याचा थंडीत … पुण्याहून दाजीपूरच्या दिशेने प्रस्थान केलं… नेहमीप्रमाणे आम्ही तीन डायवर सोडले तर बाकीचं सारं धावतं विश्वं गाढ झोपी गेलं होतं… सगळीकडे टोल भरून नेहमीप्रमाणे चहा प्यायला सुरुर फाट्याला गाडी थांबवली… पुढे कऱ्हाड ते कोल्हापूर ह्या लोण्यासारख्या रस्त्यावर … ताशी १४५ KMPH च्या स्पीड ने गाडी पळवीत … उत्तमराव आणि दत्तू ह्यांनी आपआपसात "रेस-रेस" खेळून सगळ्यांची झोप उडवली… कोल्हापुरात आल्यावर श्री. बाबजी कांबळे (read बाबजी मामा) ह्यांना फोन करून आमच्या ट्रेकची सोय करून ठेवली … GPS मुळे कोल्हापुरात पोचल्यावर राधानगरीचा रस्ता शोधायला फारशी अडचण आली नाही… जागोजागी खड्ड्यांमुळे पुढे अनेक ठिकाणी रस्ता खराब होता… दाजीपुर च्या Bison Resort नामक हॉटेलात नाष्ट्यासाठी गाड्या थांबवल्या…
![]() |
| Courtesy @ निनाद : दाजीपुर ला जाताना |
काका, उत्तमराव आणि दत्तू दाजीपूरच्या वनाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी नाक्यावर गेले… तिकडे श्री.जाधव साहेबांनी हटकले…
जा. साहेब : कोनाला भेटायचंय …
दत्तू : आम्हाला दाजीपूरच्या जंगलात जायचे आहे… सोबतीला शिवगड उरकून पलीकडे बोरबेट गावी जायचे आहे… आम्ही तिकीट काढायला तयार आहोत… बाबजीमामांना घेऊन जातो…
जा.साहेब : बाबजी इथेच हाये … पण तो येऊ शकणार नाही … त्याला बोरबेटहून गवत कापायला इथे नाक्यावर बोलावलंय… कामावर हाय तो… कुठं कुठं जानार हाय ?
दत्तू : अहो… पण आम्ही त्यांना फोन करून येणार असल्याची वर्दी दिली
होती… आम्ही पाट्याचा डंग मधून जाउन पदमसत्ती मार्गे बोरबेट ला जाणार…
सोयीस्कर दुर्लक्ष करून मध्येच जाधव साहेब हापिसात जातात… थोड्यावेळाने बाहेर येतात …
जा. साहेब : पाट्याचा डंगाला जायला मिळणार न्हाई… प्रकल्पात आलाय तो भाग…
दत्तू : कसला प्रकल्प?
जा. साहेब : व्याघ्र प्रकल्प… 'येष्टीआर' प्रकल्प … आणि किती 'जनं' आहात तुम्ही? आधी फोन करून का नाही कळवलं…
दत्तू : आम्ही १२ आहोत… आम्ही फोन केला होता… कोणी उचलला नाही … मागच्या खेपेला माने साहेबांनी आम्हाला परवानगी दिली होती…
जा. साहेब : कोण माने? अंबादास मारुती माने? …. त्याला हाकलला… त्याने लई घोटाळा केला होता बघा …
काका : तोच का तो जो नरक्या प्रकरणात सापडला होता?
जा. साहेब : ते मला म्हाईती न्हाई … मी इथे ५ वर्षांपासून काम करतोय… पन मला एक सांगा … तुम्ही मागच्या वर्षी आलेला मला कसा दिसला न्हाईत?
दत्तू : अहो साहेब, तुमच्या डायरीत माझं नाव आढळेल… कदाचित त्या वेळेस तुम्ही सुट्टीवर गेला असाल…
जा. साहेब : ऑ… असं कसं … बरं मला एक सांगा … हा माने कोण ? अर्रे हां … माने नाही हो पाटील असतील… येच. ये पाटील असतील बघा … नीट आठवा …मी इथे ५ वर्ष काम … (मी मध्येच त्यांना तोडीत)
दत्तू : होय होय पाटील साहेब… असो…हां … तर त्यांनी परवानगी दिली होती…
जा. साहेब : कुठली गाडी आहे… मोठी असेल तर जा… छोटी गाडी नाही जाऊ शकणार… रस्ता लई खराब आहे…
दत्तू : ती बघा … बाहेर लावली आहे… तश्या आणखीन २ गाड्या आहेत… बरं … आता बाबजीमामांना घेऊन जातो आम्ही…
जा. साहेब : ते आमच्या हातात न्हाई … सायेबांशी बोलावं लागंल … (एकदम मला पु.लं च्या म्हैस मधला आर्डरली आठवला)
दत्तू : चला कि मग… बोलतो साहेबांशी…
जा. साहेब : ते आत्ताच बाहेर गेल्येत … तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलून घ्या…
![]() |
| Courtesy @ श्रवण : F - B : निनाद, केदार, श्रवण, प्रसाद, विक्रम आणि यतीन |
दुपारचा बाराचा सुमार… गाडीतचं बसून बसून मंडळी वैतागली… मग श्री. परब साहेबांशी फोनवर बोलून रीतसर परवानगी वगैरे काढली… माणसांची आणि "गाडीची" तिकीटं फाडून बाबजी मामांना गाडीत कोंबून शिवगडच्या रस्त्याला लागलो… मागच्या वेळेपेक्षा ह्या वेळेस रस्ता खरंच फार खचला होता… पहिलाच डावीकडचा रस्ता पकडून दीड-दोन किलोमीटर आत गेल्यावर लक्षात आलं कि रस्ता चुकलाय… अख्खं आयुष्य दाजीपुर च्या जंगलात गेल्यावर सुध्दा बाबजी मामांना शिवगडचा रस्ता माहिती नाही हे ऐकल्यावर आमची बोबडीच वळली… आणि मागच्या दोन्ही गाड्यांतून शिव्या :)… हे म्हणजे कुठल्यातरी अमुक तमुक वैधर्बीय बंड्याने एखाद्या अस्सल पुणेकराला शनिवारवाड्याचा 'जांभूळ' दरवाजा कुठला असला प्रश्न विचारल्यावर त्या पुणेकराची काय अवस्था होईल…तद्वत आमची अवस्था झाली … अर्थात अनवट आणि आड वाटेवर असलेल्या शिवगड पेक्षा लोकांना दाजीपुर च्या जंगलातले गवे आणि गगनगिरी महाराजांच्या मठातच अधिक 'रस' असल्यामुळे शिवगड वर अस्सल ट्रेकर शिवाय फारसं कोणी जात नाही… त्यामुळे 'शिवगड' ही काय 'भानगड' आहे … असला चेहरा बाबजी मामांनी केला… गाड्या माघारी फिरवून दुसऱ्या डाव्या रस्त्याला लागलो आणि खचलेल्या रस्त्यावरून अडखळत गाड्या हाकीत एकदाचे गेटापाशी पोचलो… पुढे खचलेल्या रस्त्यातून शिवगड चा रस्ता धरीत वाटेत थांबलो… अनेक ठिकाणी रस्ता शोधून सुद्धा सापडला नाही… शेवटी एकदाचा समोर शिवगड सापडल्यावर सगळ्यांनी हुश्श केलं…
![]() |
| Courtesy @ अनुप काका : शिवगड |
शिवगड :
शिवगड च्या मध्ये एक छोटीशी दरी लागते… सुमारे तासभर शोधून सुद्धा रस्ता काही केल्या सापडेना… मग उत्तमरावांनी त्यांच्या
भारी मोबाईल मधल्या अफाट GPS मधून एक पायवाट शोधली… हुश्श … रस्ता
सापडल्यावर १० मिनिटांत शिवगडावर दाखल झालो… समोर उत्तरेला गगनगड उठवलेला
होता … मागे पश्चिमेला घनदाट जंगलात झांजेचं पाणी आणि गगनगिरी महाराजांचा
मठ दिसत होता… दूरवर डोंगरांमध्ये वॉच टॉवर डोकावून बघत होता … पुन्हा एकदा
शिवगड बघून पठारावर आल्यावर दुपारचे पोटभर मम-मम उरकले… बाबजी मामांशी सल्ला-मसलत
करून आम्ही सामान आवरून घेतलं… आणि गाडीत बसून गाडी पुन्हा गेटापाशी
लावली… तोपर्यंत दुपारचे ३:४५ PM वाजले होते…मजल - दरमजल करीत जीप ट्रॅक
वरून चालत आम्ही वीस मिनिटांत एका वॉच-टॉवर पाशी आलो… एका Innova मधून काही
पिकनिक छाप पब्लिकने वॉच-टॉवर वर जाऊन जंगलाचा अनुभव घेतल्याचा आव आणला
होता… त्यांच्यातल्याच एक काकू गाडीतच विश्रांती घेत होत्या… पण खरं जंगल
त्यांनी अजून कुठे बघितलंय … असो… सुमारे अर्धा तास सलग चालल्यावर बाबजी मामांनी डावीकडे एका ढोरवाटेकडे वळायला सांगितलं…
हडक्याची सरी :
हळू हळू दाट कारवीच्या रानातून मार्ग काढीत आम्ही आम्ही
हडक्याच्या सरीवरून चढायला सुरवात केली… बऱ्याच दिवसांनी केलेला ट्रेक,
अर्धवट झालेली झोप, बोजड सामान आणि त्यात कोकणातून चढताना लागलेली धाप…
त्यामुळे मंडळींना बऱ्यापैकी दम लागायला लागला… अर्ध्या तासात आम्ही
पठारावर पोचलो… चिक्की खाऊन आणि पाणी पिऊन ५ मिनिटांची विश्रांती घेऊन
पुन्हा जंगलाचा अनुभव घ्यायला मार्गस्थ झालो…
![]() |
| Courtesy @ निनाद : पहिला वॉच टॉवर |
![]() |
| Courtesy @ श्रवण : वाघाचे पाणी |
![]() |
| Courtesy @ अनुपकाका |
![]() |
| Courtesy @ श्रवण |
असेच सुमारे अर्धा तास चालल्यावर जीप ट्रॅक च्या रस्त्याला आलो… लगेच वाघाचे पाणी आणि त्याच्यावर असलेला पहिला वॉच टॉवर दिसला… समोर पूर्वेला शिवगड दिसत होता… खाली घनदाट जंगलाने वेढलेल्या दाजीपुरचा पाट्याचा डंग खुणावत होता… सूर्य हळू हळू पश्चिमेला झुकत होता… जीप ट्रॅक वरून चालत असताना अचानक तंबूत शिरल्यावर जसा भास व्हावा तसा एकदम घनदाट जंगलात प्रवेश केल्यावर अंधारून आल्यासारखं झालं…
![]() |
| Courtesy @ अनुपकाका : कोकणदर्शन पॉईंट |
अचानक पुढच्यांच्या हाक ऐकू आल्या… ५ फुटी जाड-जुड Diamondback Russels Viper (घोणस) रस्ता अडवून बसला होता… बघायला म्हणून सगळे पळत आले पण जमिनीवरच्या हादर्यांमुळे पसार झाला… जंगलातला पहिला प्राणी सापडला… असेच थोड्यावेळ चालल्यावर पौगंडावस्थेतल्या एका हरणटोळ ने रस्ता अडवला… त्याला क्यामेरा मध्ये captured… पुढे बाबजीमामांनी एका ढोरवाटेचा रस्ता पकडून थेट कोकणदर्शन पॉईंट ला आम्हाला आणलं… कोकणदर्शन पॉईंट ला संध्याकाळ चा सूर्यास्त फारच बढीया… पुनश्च: एका ढोरवाटेने आम्ही सटकलो आणि घनदाट जंगलात प्रवेश केला…
![]() |
| Courtesy @ केदार |
![]() |
| Courtesy @ श्रवण : दुसरा वॉच टॉवर |
सावराईचा सडा :
एव्हाना सूर्य जांभया देऊन घरी पोचला होता … पौर्णिमेच्या
चंद्राची रात्र-पाळी सुरु झाली … असंच जंगलातून जाताना पुढे एका मोकळवनात
आल्यावर पूर्ण पडलेल्या चांदण्यातून मार्ग काढीत आम्ही एका पठारावर पोचलो…
थोड्याफार प्रमाणात कोयनेच्या जंगलात सापडतो तसा सडा पडलेला दिसला… एका
पडक्या वाड्याचा चौथरा दिसावा तद्वत मोठी आयताकृती शिळा उजवीकडे सापडली …
पुढे चालल्यावर डाव्या बाजूला पाणवठा सापडला … आणि समोर चालत असतानाच दुसरा
वॉच-टॉवर सापडला… तोपर्यंत १७ किलोमीटर चा ट्रेक प्रवास संपलेला होता…
| Courtesy @ नितीन |
बाबजीमामा म्हणत होते कि लवकर चला… अजून बोरबेट ला २ तास लागतील पोचायला… सगळ्यांनी
Torch आणि HeadLights बाहेर काढल्या … आता खरा रात्रीचा जंगल ट्रेक चालू
झाला होता… मध्येचं रातकिड्यांचा किर्र आवाज ऐकू येत होता… दाट जंगलातून
चालताना पूर्वेकडे पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात न्हाऊन निघालेल्या
जंगलातील पानांचं चमचमणारं दृश्य … अगदीच अफाट आणि अफलातून… कधीही न
विसरणारं दृश्य होतं ते … एव्हाना हळू हळू आम्ही उतरायला लागलो होतो …
पुढच्या प्रत्येक फांदीचा, दगडांचा, वेलींचा, काट्यांचा … चालू अहवाल
ज्याला आपण running commentary म्हणतो … तोविक्रम देत होता…
त्यामुळे मागच्यांना उतरायला सुसह्य होत होतं … दूरवर पलीकडे उजव्या अंगाला
माणबेट गावातून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येत होता…
![]() |
| Courtesy @ श्रवण : पौर्णिमेचा चंद्र … मस्त काढलाय |
पदमसत्ती :
अचानक पठारावर पोचल्यावर जंगल नाहीसं झाल्याचं लक्षात आलं… तेव्हा
पदमसत्ती मध्ये प्रवेश झाल्याचं कळलं… डावीकडून पाट्याच्या डंगातून
आलेल्या रस्त्याला लागलो … २० मिनिटं चालल्यावर अशोक पाटलाच्या रिकाम्या
घराच्या अंगणात विश्रांती साठी थांबलो… चिक्की, अंडी, सफरचंद, संत्री,
खजूर, बिस्किट्स… असा दणदणीत आहार घेतल्यावर… बोरबेट च्या मार्गाला लागलो…
चांदण्या रात्री चालताना Torch चा अगदीच अंमळ वापर करावा लागला… एव्हाना
थंड वारे वाहू लागले होते… गुरं दिसली… तासाभराने गुरांसाठी लावलेल्या
फ़ाटकांवरून पलीकडे उड्या मारून गेलो… अर्ध्या तासात सोलारचे दिवे
दिसल्यावर बोरबेट गाव आल्याचं निदान झालं…
बोरबेट :
सामान ठेवून बाबजीमामांबरोबर झोपायला जागा शोधायला गेलो… बाबजीमामांनी त्यांच्या वनखात्याचा uniform घातला … शाळा मास्तरांना भेटल्यावरचं संभाषण :
दत्तू : सर, आजच्या दिवस शाळेत झोपायला परवानगी मिळेल का? आम्ही दाजीपुरहून आलोय… १२ जणं आहोत…
शा . मास्तर : (रागाने) बाबजी, कोण आहेत ही माणसं? कुठून आणलीस?
बाबजी मामा : मास्तर, दाजीपुरहून आलोय ह्यांना घेऊन… झोपायला जागा पाहिजे… एकचं रात्रं काढायची आहे…
शा. मास्तर : (रागाने) जा … वॉचमन ला बोलाव…
दत्तू : सर, आम्ही उद्या सकाळीच जाणार आहोत… साफसफाई करून जाऊ… काळजी नसावी…
मास्तर चं पूर्णता: दुर्लक्ष … बाबजीमामा वॉचमन ला घेऊन आले…
वॉचमन: जी मास्तर… शाळेत जागा न्हाई… समद्या बाक्ड्यांनी जागा खाल्लीये… तुम्ही सांगा कुठली शाळा देऊ?
शा. मास्तर : आता मला काय विचारतोस… दे कुठली पण… ती पलीकडची दे… च्यायला X#$%^!@… फुल्या फुल्या फुल्या …
शाळेची जागा बघून आम्ही परत आलो…
शा. मास्तर : (रागाने) बाबजी… सांग ह्यांना… पोरं न्हाईत म्हणून जागा देतोय…
मी मनात विचार केला कि इतक्या रात्री पोर शिकायला
कशी येणार? बरं ही रात्रशाळा सुध्दा नाहीये … आणि उद्या तर रविवार आहे…
म्हटल्यावर सुट्टी…
तातडीने बाबजीमामांना घेऊन पुन्हा त्यांच्या घराच्या दिशेने निघालो… वाटेत बाबजीमामांबरोबर चं संभाषण :
दत्तू : इतके रागावले का होते मास्तर?
बाबजीमामा : त्यो लई बारा चा हाये… असाच XXX
करीत असतो… कायम सगळ्यांना असाच बोलतो… डोक्यावर पडलाय हाय… म्हणून तर मी
uniform घातला … जाऊद्या तुम्ही लक्ष देऊ नका … xxxxxx आहे तो … फुल्या
फुल्या फुल्या …
मंदिरात सुद्धा झोपायची सोय होय शकणार नाही म्हटल्यावर शेवटी बाबजीमामांच्या घरीच झोपायची व्यवस्था केली…
काकांनी नेहमीप्रमाणे जेवणाची अप्रतिम सोय केली होती… सुरवातीला सगळ्यांना स्वीट कॉर्न सूप दिल्यावर तरतरी आली… मग ट्रेक मधला खास मेनू म्हणून नेहमीप्रमाणे काकांनी अफलातून मिसळ बनवली… मिसळीवर खोवलेलं ओलं खोबरं भूरभूरवल्यावर मिसळीला आलेली चव तर सुभानल्लाह … अगदीच एक नंबर … पब्लिक अक्षरश: मिसळीवर तुटून पडले… सगळी मिसळ संपली… सोबतीला १ किलो आम्रखंड … काहीच अन्न उरलं नाही … पहाटेच्या एक वाजता खादाडी झाल्यावर सगळे आडवे झाले…
दिनांक : १७ नोव्हेंबर २०१३
भल्या पहाटे उठून आवरा-आवरी उरकून तातडीने निघालो… सकाळची ०८:०० एम ची येष्टी पकडायची होती… प्रसाद ला पुढे पळवत पाठवून गाडी थांबवायची सोय करायला सांगितली… ने
येष्टी थांबवली … डायवर म्हणाले कि २० मिनिटांत पुन्हा येष्टी येईल… मग
सकाळचा ब्रेकफास्ट उरकण्यात आला… काकांनी त्यांच्या Mouth Organ वर अप्रतिम
अशी जुन्या हिंदी गाण्यांची महफिल सादर केली … सोबतीला प्रसादने चांगली
साथ दिली … कोल्हापूर-हायकर्स च्या दोन मोठ्या बस-गाड्या मोरजाईगडाच्या
दिशेने धुरळा उडवीत गेल्या … दीड तासाने तीच येष्टी पुन्हा आली … येष्टीत
बसून गगनबावडा येथे पोचलो… तिकडून करूळ घाट मार्गे वैभववाडी ला अजून एका
येष्टी ने पोचलो… वैभववाडी ते फोंडा अशी अजून एक येष्टी आणि पुढे
फोंड्यातून अजून एका येष्टीने दाजीपुर ला पोचलो… पब्लिक राधानगरीच्या
पाण्यात डुंबायला गेली… उत्तमराव, काका, अनुपकाका, यतीन आणि दत्तू अशी पाच
मंडळी चालत निघाली… तासाभराने ३.८ किलोमीटर ची वाट तुडवत गेटापाशी पोचलो…
गाड्या उचलल्या … आणि Bison Resort ला येऊन यथेच्छ आम्लेट, मिसळ आणि चहा
हादडला… पुण्याच्या दिशेने कूच करून सगळे टोल भरून पुण्यात ९:३५ PM ला
पोचलो…
| Courtesy @ नितीन : L - R : प्रसाद, श्रवण, नितीन, निनाद, निलेश, केदार, दत्तू, काका, यतीन, उत्तमराव, पेठे, अनुपकाका |
ठळक वैशिष्ठ्ये :
- Diamondback Russels Viper (घोणस) आणि Green Vine Snake (हरणटोळ) दिसला…
- दाजीपुरचं घनदाट जंगल…
- अंधाऱ्या रात्री सुद्धा कुठे न चुकता आठवणीने आम्हाला बोरबेट ला व्यवस्थित घेऊन येणारे बाबजीमामा…
- वनखात्याचा नेहमीप्रमाणेचा बोंगळ कारभार…
- काकांनी नेहमीप्रमाणे बनवलेली अप्रतिम मिसळ…












No comments:
Post a Comment