https://www.bankapure.com/2021/11/DeryaaGhaat-TawliGhaat-Yetoba-DamdamyaHill-JakhmaataGhaat.html
मंडळ :
योगेश अहिरराव
![]() |
| W आणि सिद्धगड, जांबुर्डे धरण... |
अश्विनी अहिरराव
साईप्रकाश बेलसरे
दत्तू तुपे
![]() |
| बोरवाडी... आणि महिंद्रा'ज ... |
![]() |
| डेऱ्या घाट... |
दिनांक : २० नोव्हेंबर २०२१
समग्र
हिमालयीन बाईक राईडच्या सहलीनंतर सह्याद्रीत भटकणं जमलंच नाही, त्यात
कौटुंबिक सहली आणि इतर घरघुती कामांत व्यस्त असल्यामुळे अचानक एक पिलांन
ठरला आणि हो-नाही करता ह्या पिलांन ला जायला तयार झालो... पुण्यातून
नेहमीचं मंडळ सोडून फक्त मी आणि साई एवढेच पहाटे ४:४० AM IST
ला चिंचवड सोडून निघालो... लवकर पोचावं म्हणून एक्सप्रेस वे (द्रुतगती
महामार्ग) धरला तर त्याची एक डावीकडची लेन खोदलेली... त्यामुळे जुन्या
हायवे ने गेलो असतो तरी चाललं असतं असा एक विचार मनात चमकला... खोपोली
मार्गे कर्जत फाटा ओलांडून एका टपरीछाप हॉटेलवर सकाळी चहा/वडापाव हाणला...
वातावरणात चांगलाच दमटपणा जाणवत होती... अहिरराव दांपत्याला सकाळी
०७:०० AM IST वाजता भेटण्याचा शब्द दिल्याप्रमाणे शार्प ०६:५८ AM IST आम्ही
"म्हसा" येथील "हॉटेल गुरुप्रसाद" येथे त्यांची वाट बघत बसलो... तेवढ्यात
दोघेही हजर झाले... चहा उरकून 'जांबुर्डे' धरणाच्या रस्त्याला लागलो...
सिद्धगड येथील "भिमाशंकर अभयारण्यात फॉरेस्ट डिपार्टमेंट तर्फे सकाळी ६ ते
संध्याकाळी ६ पर्यंत बॅरीकेड लावला जातो... जांबुर्डे फाटा ते बोरवाडी हे ४
किलोमीटरचं अंतर बऱ्यापैकी जंगलातून आपल्याला घेऊन जातं... बोरवाडी ला
गेल्यावर आवरून घेतलं... साई ने ब्रेकफास्ट ला नेहमीप्रमाणे अप्रतिम थालीपीठ, दही आणि लोणचं आणलं होतंच... मावशींनी कोरा चहा दिला... ब्रेकफास्ट उरकुन निघालो...
![]() |
| वि बोथ ऑफ ४... |
वेळ सकाळची ०८:४७ AM IST...
![]() |
| नारमाता मंदिर... |
डेऱ्या घाट - नारमाता मंदिर :
मागच्याच आठवड्यात अहिरराव दांपत्य हे डेऱ्या घाटाने चढून सिद्धगड करून आले होते... पण आमच्यासाठी खास यायचं म्हणून दोघांनी त्यांच्या बछड्यांना घरी आजीकडे सोपवून शिवाय योगेश ने त्याच्या हॉपिस मध्ये LWP टाकून आला होता... दोघांनाही हॅट्स ऑफ... "हुतात्मा भाई कोतवाल" स्मारकाच्या रस्त्याला न जाता आम्ही डावीकडे शेताडीतून वाट काढत निघालो... ढगाळ वातावरणातुन चढताना डावीकडे जांबुर्डे धरणाच्या बॅकवॉटरचं पाणी दिसत होतं... छोट्याश्या जंगल पट्ट्यातून जात एक दांड ओलांडून पलीकडे पदरात पोचल्यावर छोटे छोटे कातळटप्पे (रॉक पॅच) चढलो... सॉ स्केल्ड व्हायपर - फुरसं चं छोटंसं पिल्लू आम्हाला क्रॉस झालं... काही ठिकाणी पावठ्या आणि आधाराला खोबण्या खोदल्या होत्या... एकदोन छोटे ओढे होतेच... डेऱ्या घाटाच्या चढाईनंतर आम्ही सिद्धगडाच्या पदरात डेरेदाखल झालो... एका वाहणाऱ्या ओढ्याचं पाणी पिऊन आत्मा तृप्त केला... पदरातून जाताना मोठ्ठाले आंब्याचे वृक्ष आणि हिरडा, बेहडा चे वृक्ष लागले... पुढच्या अर्ध्या तासात सिद्धगडवाडी उर्फ रेवणी गावात पोचलो... थोडीफार घरं होती... तिकडून पुढे नारमाता मंदिराकडे जात असताना साधारण १० फुटी मोठी धामण रस्त्यात दिसली... आमच्या पावलांच्या व्हायब्रेशन्स ने ती लागलीच पसार झाली... उजवीकडे एक छोटा फाटा धरला आणि आम्ही नारमाता मंदिरात पोचलो.. आल्याआल्या २ कुत्र्यांनी आमचं भुंकत स्वागत केलं... संपूर्ण काळ्या रंगाच्या भू-भु चं नाव काय तर म्हणे निळ्या आणि दुसऱ्याचं नाव बछड्या ... !!! सूर्यकांत घोडे नामक एका कोवळ्या १८ वर्षीय तरुण पोराला योगेश ने आधीच फोनवरून "राजु गाईड" म्हणून नेमला होता... तो बिचारा खास आहुपे गावातून गायदरा घाटाने आमच्यासाठी नारमाता मंदिरात आमची वाट बघत बसला होता... नारमातेचं दर्शन घेतलं... फलाहार केला... मंदिराच्या कौलांच्या लाकडी फास्यांमध्ये मोठ्या भुंग्यांनी ठिकठिकाणी घरं केलेली आढळली... आणि भुंग्यांचा भुंगण्याचा भर्रर्रर्रर्र आवाज येत होताच... मंदिराच्या बाहेर एक तोफ, अनेक विरगळी, भग्नावस्थेतल्या मूर्ती ठेवल्या आहेत... थोडाफार खाऊ हाणला आणि पायऱ्या उतरून निघालो... थोड्याचवेळात सिद्धगडाचा एक दरवाजा लागला... दरवाज्याला स्थानिक लोकांनी लोखंडी खांब लावून आधार दिलाय... पुढे गेल्यावर एकमोठी वाट नारिवली कडे जाताना आढळते...
फोटोस्फियर : आपल्याच हाताच्या बोटांनी हा फोटो ३६०° फिरवा ...
दाट जंगलातून मार्गक्रमण करताना मध्येच ऊन - सावली चा खेळ सुरु होता... त्यामुळे सॅक मधून गॉगल काढ-घाल करता करता माझा अनुराग वैद्य कधी झाला हेच कळलं नाही... White Cheeked बार्बेट - कर्टुक्या आणि Common Iora - सुभग, Black Drongo - कोतवाल, Crested Bulbul - काळ्या शेंडीचा बुलबुल आणि असंख्य पक्षी जंगलात साद घालत होते... Peacock Pansy - मयूर भिरीभिरी, Glassy Tiger - कंचा रुईकर, Lemon Pansy - पितनेत्री भिरभिरी, Common Evening Brown - सांजपरी, Jamides Celeno - निलांबरी, Common Grass Yellow - तृण पिलाती आणि इतर असंख्य फुलपाखरांनी संपूर्ण ट्रेक दरम्यान आमची साथ दिली...वाटेत एके ठिकाणी खोदीव पाण्याचं टाकं लागलं... पुढे जंगलातून मार्गक्रमण करत जेवायला एका नाळेत थांबलो... नुकताच अवकाळी पाऊस पडून गेल्यामुळे जमिनीला ओल होतीच... शिवाय नाळेत अनेक ठिकाणी साचलेल्या ओढ्यातलं नितळ थंडगार पाणीही होतंच... जेवायला बसलो... नेहमीप्रमाणे साई ने फाईव्ह स्टार जेवणाची सोय केली होतीच... उभ्या कांद्याचे काप घातलेलं झकास पिठलं, तांदळाची भाकरी, लोणचं आणि दहीभात एवढं सगळं खाल्ल्यावर सुस्ती आली... साडेतीन सेकंदांचा अखंड तृप्तीचा ढेकर देऊन ते खोरं दणाणून सोडलं... थोड्यावेळ पडी मारली... घामामुळे जंगलातल्या डासांनी आमच्यावर जोरदार हल्ला केला... हल्ली अनेक शाळकरी/कॉलेजकरी मुलांकडे स्मार्टफोन असतोच... आमच्या राजु गाईड - सूर्यकांत घोडे ने सुद्धा reels आणि इतर मोठ्मोठ्याला आवाजातले टाईमपास व्हिडीओजद्वारे आमची झोपमोड केलीच... शेवटी विनंती केल्यावर साहेबांनी मोबाईलचा आवाज कमी केला... एव्हाना निघायची वेळ झाली... ओढ्यातलं पाणी भरून घेतलं... दाट जंगलातून निघालो...एक वाट उजवीकडे गायदरा ला जाते... आता आमच्या डोक्यावरच्या तवली डोंगरावर टॉप ला "येतोबा" मंदिर होतं... कारवीच्या आणि इतर झाडांच्या जंगलातून प्रवास करताना मस्त मज्जा येत होती... विस्थापित केलेलं साखरमाची गाव आणि मोकळी कौलारू घरं दिसायला लागली... जंगलात आहुप्याची काही मंडळी गप्पा मारत विसावली होती... आम्ही वरून त्यांच्याशी थोडाफार बोलण्याचा प्रयत्न केला पण "ते आमच्या "बोलण्याच्या आऊट ऑफ कव्हरेज" असल्यामुळे एकमेकांना आवाज नीटसा पोचत नव्हता... आम्ही आपले तवली घाट चढायला सुरवात केली...
फोटोस्फियर : आपल्याच हाताच्या बोटांनी हा फोटो ३६०° फिरवा ...
तवली घाट :डावीकडे गोरक्षगड/गोरखगडचा सुळका डोकावत होता... छोटासा दांड ओलांडून पलीकडच्या दांडावरून चढायला सुरवात केली... खोदीव पावठ्या आणि खोबण्या साथीला ठिकठिकाणी होत्याच... त्यामुळे चढाईला फार कुठे ताण आला नाही... वाटेत एके ठिकाणी थांबून सोफीट प्यायलो... त्यामुळे जोरदार एनर्जी आली... एका बेचकेत आलो आणि तिकडून टिपिकल नागमोडी घाटवाटेचं वळण चढत वरच्या पदरात पोचलो...छाताडावरची उभी चढाई आणि कोकणातला दमटपणा, त्यात ऊन-सावलीचा खेळ ह्यामुळे चांगलाच घाम निघत होता... अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे सर्वत्र ढगाळ वातावरण होतं... समोर दमदम्या डोंगर, सिद्धाची लिंगी आणि सिद्धगड ह्यांचा एक ईंग्रजी W आकार मस्त दिसत होता... एव्हाना एक विचित्र आवाज ऐकू यायला लागला... आमच्याबरोबर आलेल्या निळ्या/बछड्याला कुत्र्यांना बघून डोंगराच्या कडावरची माकडं ओरडत होती... जसजसं जवळ यायला लागलो तसा आवाज वाढायला लागला... सुमारे दोन तासांच्या ३०० मीटरच्या चढाईनंतर आम्ही घाटमाथ्यावर पोचलो... आता सिद्धगड सोनेरी पिवळ्या रंगात न्हाऊन निघाला होता... वर Nimbus Clouds दिसत होती म्हणजेच पावसाची १२३५% खात्री ... दक्षिणेकडे भिमाशंकर नागफणी, खांडसचा तुंगी डोंगर, पदरगड, कोथळीगड, ढाकचा बहिरी - कळकराय सुळका, माथेरान, त्याच्या मागे राजमाचीच्या जुळ्या किल्ल्यांची टोकं, माणिकगड, पेब, चंदेरी किल्ला, ताहुली डोंगर ... पश्चिमेला बारवी धरण, बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण आणि वायव्येला किल्ले माहुली उठवलेला दिसत होता... सिद्धगड आणि चंदेरीच्या मध्ये असलेला जांबुर्डे धरणाचं पाण्यावर सोनेरी किरणांचा वर्षाव झाला होता त्यामुळे ते पाणी अजूनच उजळून दिसत होतं... साईने थर्मास मधलं गरम पाणी आणि गिरनारचा रेडी-टू-ड्रिंक चहा प्यायला दिला... अंगात एकदम तरतरी आली... भरपूर फोटोग्राफी उरकली... एव्हाना अंधार पडायला लागला... आम्ही "येतोबा" देवस्थान उद्या करायचं ठरवून थेट आहुप्याच्या वाटेला लागलो... छोटासा जंगल पट्टा ओलांडून पलीकडे देशावर पोचलो... आता तिन्हीसांजेच्या प्रकाशात आम्हाला उत्तरेला देवदांड्या डोंगर, नाणेघाट, दुर्ग आणि ढाकोबा, न्हाप्ता, मोरोशीचा भैरवगडचा सुळका, कोंबडा डोंगर, खुटेदराची क्रेस्टलाईन असं सर्व काही दिसायला लागलं...
![]() |
| फुलपाखरं... |
आहुपे गाव
एव्हाना अंधार पडायला लागला आणि आहुप्यातले दिवे अंधारात चमकायला लागले... तिन्हीसांजेला उतरायला लागलो... टॉर्च बाहेर काढल्या... खाली उतरल्यावर काही अंतराने डांबरी सडकेला लागलो... थोड्याचवेळात मावशींकडे पोचलो... मावशींनी आल्या आल्या मस्तपैकी गरमागरम चहा दिला... मग कढत गरम पाण्याबरोबर मोती साबणाने अंघोळी उरकल्या... आहुपे गावातल्या शाळेत विदर्भ-मराठवाड्यातून काही रेसिडेंट शिक्षक मंडळी शिकवायला आली होती... जनरल इकडच्या तिकडच्या गप्पा-टप्पा झाल्या... जेवायला मस्तपैकी पापड, वरण, घेवडा-बटाट्याची भाजी, ज्वारीची भाकरी, दही वाटी, लोणचं आणि एक वेगळ्याच प्रकारची चटणी - कोथिंबीर,आलं,लसूण, खोबरं सगळं एकत्र करून वाटण केलेलं आणि नंतर उभ्या कांद्याच्या काप टाकून जिरे-मोहरी-कढीपत्ता ची फोडणी दिलेली... अशक्य भारी चटणी... मनापासून पोटभर जेवलो... घरातच त्यांच्या साडेतीन सेकंदांचा अखंड तृप्तीचा ढेकर दिला... बाहेर मोकळ्या हवेत जरा चक्कर मारली...ढगाळ वातावरण असल्यामुळे काहीप्रमाणात वारंही बऱ्यापैकी सुटलं होतं... मावशींची जेवणावळी झाली... हॉल मध्ये मावशींनी आमच्या चौघांची झोपायची सोय केली... उशी-पांघरूण ही दिलं... आमची खास बडदास्त ठेवली होती... लवकर झोपलो...
वेळ रात्रीची १०:४७PM IST...
![]() |
| सकाळचा सूर्यास्त... |
फोटोस्फियर : आपल्याच हाताच्या बोटांनी हा फोटो ३६०° फिरवा ...
![]() |
| रात्रीच्या डिनरला अप्रतिम जेवण... |
दिनांक : २१ नोव्हेंबर २०२१
![]() |
| ग्रेट लिजेंडरी आणि दिग्गज ट्रेकर : साई... |
येतोबा :
नेहमीप्रमाणे सकाळी लवकर जाग आली,... सकाळी सूर्योदय ला आकाश पूर्णतः नारंगी रंगाने भरून गेलं होतं... इंद्र्धनुष्याने अजुनचं वातावरण प्रसन्न केलं... आवरून घेतलं... ब्रेकफास्ट ला डिशभर झकास गरम पोहे आणि चहा हादडला... थोड्यावेळाने आहुपे घाटाच्या तोंडापाशी गेलो... रेंज आल्यावर घरच्यांना फोन करून जिवंत असल्याची ग्वाही दिली... सूर्यकांत ने काल आलेल्या वाटेवरून न येता वेगळी वाट पकडली... वाहणाऱ्या ओहोळातून थोडंफार थंड नैसर्गिक पाणी चाखलं... दोन-तीन छोटे कातळटप्पे ओलांडून आम्ही घाटमाथ्यावर पोचलो... संपूर्ण पठार हिरव्या-पिवळ्या गवताच्या चादरीने भरलेलं होतं... असंख्य फुलपाखरं होतीच... समोर येतोबा मंदिर दिसलं... देवदर्शन घेतलं... क्रेस्टलाईन वरून कालचाच विहंगम नजारा दिसला... फलाहार घेतला... फोटोग्राफी उरकली... तिकडून पलीकडे दमदम्या डोंगराकडे निघालो... वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर लवलवणाऱ्या गवताच्या पाती अधिकचं सुंदर दिसत होत्या... कालची कुत्री सुद्धा आमच्याबरोबर आली होती... एके ठिकाणी छोटासा डोंगरउतार उतरल्यावर गवताळ पठारावरून चालत एका छोट्या कातळ-टप्प्यापाशी (रॉक पॅच) पोचलो...नेढं सदृश रॉक पॅच मधून एक एक जण खाली उतरत गेला... छोटा बछड्या मात्र रडतखडत कसाबसा खाली उतरला... पुढे कारवीच्या दाट रानातून खाली उजवीकडे उतरत एकदाचे भट्टीच्या रानात पोचलो... उजवीकडे वाट गायदरा ला जाते तर सरळ दमदम्या डोंगराच्या कुशीत... एका जंगल पट्ट्यात पोचल्यावर एकदम दाजीपूरच्या जंगलाची आठवण झाली... भली-मोठ्ठाली झाडं होती... त्यात ढगाळ वातावरणामुळे जंगलाचा एक वेगळाच अनुभव येत होता... टिपिकल "जंगल बाथ" मिळाला... थोड्याचवेळात एका छोट्याश्या मोकळवनात पोचलो... पुन्हा एक छोटासा जंगल पट्टा ओलांडल्यावर आता मोठ्या मोकळवनात पोचलो... सॅक्स बाजूला कडेच्या झुडपात ठेवल्या... पुन्हा एकदा सोफीट, चिक्की आणि खजूरवडी हाणली... पिट्टू घेऊन आम्ही दमदम्या डोंगराच्या दिशेला गेलो...
फोटोस्फियर : आपल्याच हाताच्या बोटांनी हा फोटो ३६०° फिरवा ...
![]() |
| कारवीच्या रानातून वस्पटी... |
दमदम्या डोंगर :
एक छोटासा ओढा वाहत होता... डावीकडे कोंढवळ हुन येणारी वाट दिसली... नंतर चढाईला जोरदार वस्पटी करत कारवीच्या रानांना तुडवत १५ मिनिटांत दमदम्या टॉप ला पोचलो... आता सिद्धगड आम्हाला उजवीकडे दिसायला लागला... क्रेस्टलाईन वर एकावेळेस एकंच मनुष्य उभा राहू शकतो एवढी छोटीशी जागा होती... त्यामुळे सगळे एका रांगेत बसून क्रेस्टलाईन चा आनंद घेत बसलो... लोणच्याच्या तेलाने माखलेल्या टेट्रा-पॅक मधून सोफीट प्यायलो... फोटोग्राफी उरकली... पुन्हा खाली उतरत कारवीच्या रानातून वस्पटी करत सॅक्स पाशी पोचलो... दुपारच्या जेवणाला साई ने कप पोहे आणि कप-मिसळ आणली होती... सकाळीच मावशींकडून थर्मस मध्ये गरम पाणी भरून घेतल्यामुळे दुपारच्या जेवणाची झकास सोय झाली... सोबतीला चितळ्यांचं आम्रखंड देखील आणलं होतं... एकदम फाईव्ह स्टार रॉयल ट्रिटमेंट..१०० पैकी १३५ मार्क... तेवढ्यात आमच्याबरोबरची २ कुत्री भुंकायला लागली... कोंढवळच्या दिशेने २ गावकरी मामा आले... त्यांच्या सोडलेल्या म्हशी शोधायला आले होते... गावकरी मामांच्या म्हणण्यानुसार इकडे भिमाशंकरच्या जंगलात बिबट्या "नसून" पट्टेरी वाघ आहे आणि तो जनरल म्हशींना खातो... STR झाल्यापासून पट्टेरी ढाण्या वाघ हल्ली कुठेही वावरत असतो असं एक सर्वकंश बहुमत झालं... पण बिबट्या नसतो हे ऐकून थोडा चक्रावलोचं... २०१२ ला खुटेदरा घाटाच्या ट्रेकदरम्यान तानाजी शेळकंदे मामांनी "सिंह" असल्याचा उल्लेख केला होता... एकंदरीत ह्या जंगल पट्ट्यातचं पट्टा घातलेले सर्कशीतले हिंस्त्र प्राणी सोडलेले आहेत कि काय - असा एक विचार माझ्या मनाला चाटून गेला... आवरून निघालो... मगाचचे दोन्ही जंगल पट्टे ओलांडून गायदरा घाटाच्या तोंडापाशी आलो...
फोटोस्फियर : आपल्याच हाताच्या बोटांनी हा फोटो ३६०° फिरवा ...
![]() |
| गायदरा घाट... |
गायदरा घाट :
वाहणाऱ्या ओहोळातून थंडगार पाणी प्यायलो... सूर्यकांत घोडे ला त्याची "मंजुरी" दिली... नेमकी दोन्ही कुत्री आमच्याबरोबर खाली यायला लागली... दोन दिवसांत त्यांना आमचा लळा लागला होता... पण काही गोष्टींना सोडावंचं लागतं, तसंचं मनात नसताना सुद्धा त्यांच्यावर काठी उगारून हाकलावं लागलं... नाळेच्या तोंडापासून डावीकडून एक वाट खाली उतरते आणि थेट आपल्याला नाळेत घेऊन येते... टिपिकल नागमोडी वाट आहे... नुकत्याच झालेल्या पावसामुळे जमिनीला चांगलीच ओल होती... काहीप्रमाणात फरसबंदी वाट होती... दाट जंगलातून उतरत होतो... मध्येच करटूक्या ओरडत होता... थांबलं कि डास चावत होते... घामाने अंग पार भिजून गेलं होतं.. पदरातला दमटपणा चांगलाच जाणवत होता... सुमारे २५ मिनिटांत आम्ही तवली घाटाच्या वाटेला "T" जंक्शन पाशी पोचलो... तिकडून डावीकडे वळलो आणि कालच्या जेवणाच्या ठिकाणी परत पोचलो... पाणी प्यायलो... डास पुन्हा चावायला लागले... जंगलातून वाट काढत अर्ध्या तासात पुन्हा नारीवली च्या वाटेपाशी पोचलो... समोरचं वाटेवर कालचीच १० फुटी धामण पहुडलेली होती... आमच्या हालचालीने ती जागी होऊन पलीकडच्या झुडपात पसार झाली... समोरच्या पठारावरच्या घुमटीपाशी गेलो... फोटोग्राफी उरकली... सिद्धगडच्या दरवाज्यातून पलीकडे नारमाता मंदिरात डेरेदाखल झालो... भुंग्यांचा आवाज पुन्हा यायला लागला... साईने गरम पाण्याचा "काव्हा" चहा प्यायला दिला... चांगलीच तरतरी आली...
![]() |
| आमच्यासोबत आलेले दोन भूभू... |
![]() |
| सिद्धगड दरवाजा आणि जाखमाता मंदिर... |
![]() |
| पाण्याच्या टाक्या... |
जाखमाता मंदिर - जाखमाता घाट :
नारमाता मंदिरच्या उजव्या अंगाने एक
वाट वर जाते... दमदम्या डोंगर-सिद्धाची लिंगी-सिद्धगड चा "W"
आकाराच्या परिसरात आम्ही चढलो... काहीठिकाणी पावठ्या खोदल्या होत्या...
आता W च्या खिंडीत पोचल्यावर पलीकडचा परिसर दिसायला लागला... खाली
उतरल्यावर पुढच्या ५ मिनिटांत "जाखमाता मंदिर" मध्ये पोचलो... जाखमाता
म्हणजे जखिणी म्हणजेच यक्षिणी अशी माहिती साई ने दिली... जुन्या
गंजलेल्या पत्र्याच्या आच्छादन असलेले मंदिर मोडकळीस आलेलं आहे...
मंदिराच्या शेजारीच सिद्धगडचा एक भग्नावस्थेतला दरवाजा आणि काही पायऱ्या
लागतात... एक वाट पलीकडे हुतात्मा भाई-कोतवाल ह्यांच्या स्मारकाकडे
जाते तर दुसरी वाट जाखमाता घाटाला जाऊन मिळते... जाखमाता घाटाच्या दिशेने
उतरल्यावर साधारण १०० मिटरवर पाण्याच्या २ खोदीव टाक्या डोंगर-उतारावर
लागल्या... सुदैवाने पूर्ण भरून वाहत होत्या... वर सिद्धगडाचा बुरुज दिसत
होता... तर उजवीकडे दमदम्या डोंगर... आम्ही आता नाळेतून खाली उतरायला
सुरवात केली... आता जास्तंच घाम यायला लागला... डासही चावायला लागले
होते... उजवीकडे छोटासा धबधबा कोसळत होता... घनदाट जंगलातल्या टिपिकल
दगड-गोटे आळीतून उतरत आम्ही नाळेतून खाली उतरत होतो... मध्येच वाट नाळ
सोडून पलीकडे दांडावरून उतरत होती ... सुमारे तासाभराच्या उतराईनंतर आम्ही
डांबरी सडकेला लागलो... एक पुल लागला जिकडून मगाचच्या धबधब्याचं पाणी खालून
वाहत होतं... सुमारे ३ किलोमीटरच्या डांबरी सडकेवरून चालत आम्ही बोरवाडी
ला पोचलो... गावात एंट्री मारल्याबरोबर आमच्या अंगावर पावसाचे २-३ थेंब
पडले... मामांच्या घरी पोचल्यावर पाऊस जो कोसळायला लागला तो सुमारे तासभर
कोसळला... कपडे बदलून आवरून घेतलं... मावशींनी कोरा चहा दिला... पाऊस कमी
झाल्यावर गाडीत पटकन बसलो... म्हसा फाट्याला चहा/वडापाव हाणला... अहिरराव दांपत्याला अलविदा
केलं आणि आम्ही पुण्याच्या प्रवासाला मार्गस्थ झालो... कर्जत-खोपोली
रस्त्यावर मुसळधार पावसात एक अजगर पहुडलेला दिसला... गाडी थांबवून साईच्या वॉकिंग स्टिक ने अलगद रस्त्याच्या कडेला न्हेऊन ठेवला... जुन्या हायवे ने येत सिद्धू ढाबा ला जेवण करून रात्री आपापल्या घरी पोचलो...
वेळ रात्रीची १०:४७ PM IST...
ठळक वैशिष्ठ्ये :
१. पावसामुळे उन्हाची फारशी काहिली जाणवली नाही, तरीपण दमटपणामुळे खुप घाम आला...
२. अजगर, फुरसं, धामण, सोबतीला २ कुत्री, विविध जातीची फुलपाखरं, पक्षी आणि हिरव्यापिवळ्या गवतांची पाती, सोबत पाऊस, संध्याकाळी सिद्धगड सोनेरी रंगात न्हाऊन निघाला होता, आहुप्यात सकाळी नारंगी रंगाचं आकाश - निसर्गाने भरभरून दिलं...
३. अहिरराव दांपत्य आमच्यासाठी खास पुन्हा आलेले...
४. साई ने नेहमीप्रमाणे फाईव्ह स्टार जेवणाची सोय केली होती...
५. गडावर न जाता सिद्धगडची अनोळखी जाखमाता घाटवाट करायला मिळाली...
ट्रेकळावे,
दत्तु तुपे.















No comments:
Post a Comment