https://www.bankapure.com/2015/10/Saatnaal-MaarudaaGhaat-NisanichiWaat.html
१. नितीन तिडके
२. शार्दुल देशमुख
३. केदार नरवाडकर
४. अनुप अचलेरे (काका)
५. दत्तू तुपे
दिनांक : ३१ ऑक्टोबर २०१५
मागच्याच आठवड्यात ताम्हिणी
जवळचा "सावळघाट" उरकून आलो होतो... बऱ्याच दिवसांपासून त्याच भागातली
पलीकडे धामणओहोळ पाशीची सातनाळ खुणावत होती… त्याच भागात २०१३ मध्ये ठिपठिप्या घाट ही उडवला
होता… अजून बरीच माहिती शोधल्यावर, मिळाल्यावर आणि अभ्यासल्यावर सातनाळेला
आणि मारुडा घाटाला जायचा शिक्कामोर्तब झाला… दुर्दैवाने गुरुवर्य ढमढेरे काका आणि निनाद्रावांना काही अपरिहार्य कारणांमुळे यायला जमलं नाही… त्यातचं माझा "पितांबरी" मोड चालू असल्यामुळे प्रत्येक आठवड्याला ट्रेक पिलान करत होतो… उत्तमारावांच्या बलाढ्य ARIA ४X४ (रणगाडा) नंतर अनुपकाकांच्या नव्या कोऱ्या SAFARI ची भर आमच्या मंडळात झाली… अनुपकाकांना त्यांच्या नव्या कोऱ्या Safari Storme ला भविष्यात सह्याद्रीतल्या खडतर आणि आडवळणाच्या (रस्त्यांच्या) संसाराची सुरवात करून दाखवायची होती … अनुपकाकांच्या भाषेत "बाईगं…
तुला पुढे अश्याच खडतर वाटेवर जाऊन संसार करायचा आहे… नंतर तुझ्या
पालकांकडे तक्रार करून चालणार नाही… आत्ताच काय तो रस्ता बघून सुरवात कर
संसाराला…" असं म्हणत आम्ही भल्या पहाटे सवयीप्रमाणे सगळ्यांना उचलत
०४:४७AM पुण्यातून निघालो…पहाटे साडेपाच च्या सुमारास लवासा नामक "कृत्रिम"
थंड(?) हवेच्या ठिकाणाच्या कमानीपाशी पोचल्यावर… तिथल्या गावरान
"शिकुरीटी" ने अडवलं … आणि आपल्या अफाट तोडक्या-मोडक्या हिंदी मध्ये
अडखळत त्याने सुरवात केली…
शिकुरीटी : गेट अभी बंद है… सहा बजे खुलेगा… अभी अंदर नही जा सकताय"…
दत्तू : बाबारे… आम्हाला धामणव्हळ ला जायचंय… लवासा मध्ये बिलकुल जायची इच्छा नाही"…
शिकुरीटी : (डायरेक्ट मराठीत) थांबा, सायबाला इचारून येतो…
त्याचा हरयाणवी सायब आला आणि गाडीचे डीटेल्स लिहुन सोडून दे असं म्हणाला…
बिचाऱ्या शिकुरीटीची दया आली… आपल्याच चोरलेल्या जमिनीची राखण करून त्याच
चोराची चाकरी करताना, ह्या बिचाऱ्याच्या मनाची काय घालमेल होत असेल… देव
जाणे…
अंधारात धामणव्हळी च्या रस्त्याच्या ऐवजी चुकून आम्ही वर
नवीनच बनणाऱ्या (तूर्तास स्थगित) एका "नासा पॉईंट" (!!!) च्या रस्त्याला
लागलो… मदत म्हणून सहज पुढे २ किलोमीटर वर गेल्यावर एका Dead End पाशी
U-Turn मारा असा गुगलताईचा "मेशेज" आल्यावर पुन्हा खाली उतरलो… आणि
नारायणराव आकाशात येईसतोवर धामणव्हळीत पोचलो… वाटेत एका मामांना सगळी
माहिती विचारल्यावर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला… ठिपठिप्या घाटाच्या
वेळेस ह्याच "शेडगे" मामांनी आम्हाला धामणव्हळ ते दापसरे च्या वाटेला लावून दिलं होतं… मग आम्हाला सातनाळचं काय, अजून बऱ्याच गोष्टी दाखवतो असं
म्हणत त्यांच्या घरी घेऊन गेले… जुन्या ओळखी कश्या कामाला येतात याचा
पुन्हा प्रत्यय आला… ठरलेली "मंजुरी" मंजूर झाली… चहा झाला… आवरा-आवरी
करून निघालो…
वेळ सकाळची ०८:३०AM …
![]() |
| Courtesy @ केदार : काळ नदीचा उगम… |
काळ नदीचा उगम :
धामणव्हळी पासून सुरवात केल्यावर पुढच्या १२व्या मिनिटाला शेडगेमामांनी एके
ठिकाणी थांबवून आम्हाला "काळ"नदीचा उगम दाखवला… एका
काळकभिन्न पाषाणामध्ये बारीक बांबू आत जाईल एवढ्या
आकाराच्या छोट्या नळकांड्या सारख्या भोकात शेडगेमामांनी बांबू टाकून
पाण्याची पातळी न्याहाळली… ह्या पाषाणात सगळी मिळून सात भोकं आहेत आणि
त्यातल्या पाण्याचा धबधबा लिंगी खोऱ्यात पडतो…म्हणून त्या परिसरातल्या
प्रमुख नाळेला सातनाळ म्हणतात… नुकताच मागच्या आठवड्यात परतीचा पाऊस पडून
गेल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं होतं… पावसाळ्यात हेच पाणी पुढे
धबधब्याच्या स्वरूपात खाली लिंगीच्या खोऱ्यात जातं… त्याच्या शेजारून
डावीकडे लिंग्या उर्फ देव घाटाने खाली गेल्यावर समोरच्या लिंगीला
पावसाळ्यानंतर काही काळ ह्याच 'काळ नदीच्या' पाण्याने (तुषारांनी) जलाभिषेक
होतो अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे… लिंग्या घाटाने खाली उतरताना समोर
शिव-लिंग दिसतो तो देशावरच्या आणि कोकणातल्या ग्रामस्थांचा लिंग-देव आहे
आणि म्हणूनच लिंग्या घाटाला देव घाट असे ही संबोधतात… शेडगेमामांनी आपल्या पोतडीतून माहितीचा खजिना उपसायला सुरवात केली होती… आम्ही सगळी माहिती नीट कान देऊन ऐकत होतो…
![]() |
| Courtesy @ अनुप काका : समोर दिसणारी चोरव्हळ |
चोरव्हळ :
पुढे झाडा-झुडपांतून चालत असताना वाटेत मामांनी
आम्हाला थांबवून एक जागा दाखवली… ह्याला चोरव्हळ असे म्हणतात… पूर्वीच्या
काळी चोर मंडळी "नारू" झाल्याचे भासवून इथल्या जागी पायाला फडके बांधून दबा
धरून बसून राहायचे… पुढच्या आणि मागच्या धनगरांच्या मधल्या मेंढ्या /
शेळ्या आल्या, कि एखादी अंगापिंडाने भरलेली शेळी / मेंढी इथून खाली ढकलून
द्यायचे… पुढे त्याच शेळ्या / मेंढ्याचा "एक टप्पा आउट" झाल्यावर, खालचा
"दोस्त-चोर" तिला घेऊन जायचा आणि ह्यांची रात्रीची सोय व्हायची… हल्ली इकडचा संपूर्ण भागचं लवासामुळे चोरव्हळ झालाय…नाही का हो मामा? ह्या वाक्यावर शेडगेमामा जे काही खळखळून हसले…वाह… जवाब नही…
![]() |
| समोर दुर्गाडी डोंगर |
वाघजाई चं ठाणं :
पुढे काट्याकुट्यातून चालत आम्ही एका खोऱ्यात आलो… इथे
मामांनी आम्हाला शेंदूर फासलेला एक पाषाण दाखवला… हेच ते वाघजाई देवी
चं ठाणं… पण यायला जायला वाट अडचणीचा असल्यामुळे ग्रामस्थांनी इथलं ठाणं
पलीकडे निसणीच्या वाटेला हलवलं… त्यामुळे ग्रामस्थांची तिकडे गर्दी… इकडे
फक्त ठराविक कातकरी आणि शिकारी मंडळी येतात आणि अजूनही देवीची पूजा करतात…
त्यात शेडगेमामा ही नित्यनेमाने पूजेला येत असतात…
वेळ सकाळची ०८:५९AM…
![]() |
| Courtesy @ तिडके : सातनाळ उतरताना… |
![]() |
| Courtesy @ केदार : सातनाळेचा पहिला कातळटप्पा उतरताना… |
![]() |
| Courtesy @ तिडके : सातनाळेतून दिसणारा कुर्डूगड… |
![]() |
| Courtesy @ केदार : काळ नदी चा धबधबा… त्याच्या वर काळ नदीचा उगम आहे… |
सातनाळ :
काळ नदीच्या उगमापाशी सगळी मिळून "सात भोकं" आहेत
ज्याच्यातून काळ नदीचा उगम होतो म्हणून त्या परिसराला सातनाळ
असेही म्हणतात… शिवाय इंग्रजी W आकारात असलेल्या ह्याच खोऱ्यात आणि
पलीकडच्या खोऱ्यात 'मिळून टोटल' सात मोठ्या नाळा खाली कोकणात उतरतात… आणि
देशावरचं बक्कळ पाणी धबधब्याच्या स्वरूपात काळ नदीला जाऊन
मिळवतात… त्यातल्या पूर्वीच्या काळी वापरात असणाऱ्या प्रमुख नाळेला सातनाळ
म्हणतात… इति शेडगेमामा… वास्तविक येण्याअगोदर Topologyचा सवयीप्रमाणे आम्ही अभ्यास केल्यामुळे शेडगेमामांची माहिती
व्यवस्थित पटत होती… त्यात इंग्रजी W च्या आकारात असलेल्या ह्या
खोऱ्याच्या मध्यला टेपाला "दुर्गाडी" चा डोंगर म्हणतात… दुर्गाडी च्या
खोऱ्यात असलेल्या सातनाळेतून उतरायला सुरवात केल्यावर सुरवातीलाच
पाण्यामुळे शेवाळं लागलेल्या छोट्याश्या १० फुटी ओल्या Rock Patch वरून
उतरताना मजा आली… हीच धबधब्याची वाट पुढे दाट अरण्यात जाउन मध्येच खुंटली
होती… शेडगेमामांनी मध्येच दुर्गाडीच्या वर चढायला सुरवात केली…
भयंकर घसारा, माजलेला झाडोरा आणि काट्याकुट्यातून चालत असताना जवळ जवळ
प्रत्येक जण आळीपाळीने भुईसपाट होत होता… मोकळवनात आल्यावर थोड्याचवेळात
मगाशी बघितलेल्या काळ नदीचा धबधबा आता समोर पूर्वेला
कोसळताना दिसायला लागला… त्याच्या खाली एक मस्त नैसर्गिक डोह तयार झाला
होता… आमच्या बरोबर खाली लिंगी सुळका होता पण झाडोऱ्यामुळे दिसत नव्हता…
![]() |
| Courtesy @ तिडके : पाण्याच्या टाकी @ दुर्गाडी डोंगर… |
![]() |
| Courtesy @ केदार : पाण्याची टाकी @ दुर्गाडी डोंगर… |
पाण्याच्या टाक्या :
थोड्यावेळाने चालत आम्ही दुर्गाडीच्या पठारावर
दाखल झालो… भयंकर माजलेलं हिरवंगार गवत तुडवत जात असताना समोरचा कुर्डूगड
जबरदस्त दिसत होता…त्याच्यावरचं सह्याद्रीचं पठार म्हणजे घाटवाटांची
पर्वणीचं… उत्तरेपासून सुरवात झाल्यावर सातनाळ, पूर्वेला लिंग्या घाट,
निसणीची वाट, मारुडा घाट, कुर्डूगडाच्या पलीकडे चिपाचं दार, मग आणखी पलीकडे
दापसरे गावात घेऊन जाणारा ठिपठिप्या घाट, केल्याची नाळ… घोळ गावात घेऊन
जाणारा कुंभ्या घाट असे एकसे एक बढीया घाटवाटा खाली उतरतात… खाली काळ
नदीचं खोरं आणि त्याच्यातून उतरणाऱ्या ह्या नाळा… पावसाळ्यात तर ह्या नाळा
अगदी जोग फॉल्स सदृश कोसळत असाव्यात अशी पुसटशी कल्पना माझ्या मनाला चाटून
गेली… समोर उंबर्डी गाव… दिसत होतं… दक्षिणेला कुर्डूपेठ दिसत होती… दूरवर
अस्पष्ट बोरमाची गाव दिसत होतं…
![]() |
| Courtesy @ केदार : पाण्याची टाकी @ दुर्गाडी डोंगर |
तेवढ्यात शेडगेमामांनी आम्हाला पाण्याच्या दोन टाक्या दाखवल्या… पहिली खोदीव टाकी अंदाजे ४ X ३ फुट व्यासाची आहे आणि सुमारे ८ फुट खोल आहे… अनुपकाकांनी त्यांची Walking Stick पूर्ण Expand करून पाण्यात बुडवली आणि शिवाय त्यांचा अर्धा हात आत गेला तेव्हा कुठे तळ लागला… दुर्गाडीच्या पठारावर कोळीराजाच्या काळात (?) बांधलेल्या ह्या पाण्याच्या खोदीव टाक्यांमध्ये कित्येक डुकरं मरून / मारून पडलेली असायची… शेडगेमामांनी स्वतः पाण्याच्या टाक्यांमध्ये उतरून त्या साफ केल्या आहेत… त्यात डुकरांची हाडं, साळींदराची हाडं आणि काटे, मेलेली उंदरं, गाळ, पाला-पाचोळा, गवत आणि इतर बराच कचरा ते दरवर्षी उन्हाळ्यात येउन साफ करतात… दुसरी पाण्याची टाकी ३ X २ फुट आकाराची आहे आणि फार तर २-३ फुट खोल असावी… तीही पाण्याने भरलेली होती… स्थानिक शिकाऱ्यांनी तिकडे दगडाची कायमस्वरूपी चूल मांडून ठेवली आहे… शेडगेमामा म्हणाले कि ह्या परिसरात कोळीराजाच्या राज्यामुळे पूर्वी बऱ्यापैकी वावर होता; त्यामुळे वाडे, पाण्याच्या टाक्या, घाटवाटांमध्ये कोरलेल्या पायऱ्या, टेहळणी साठी बांधलेल्या चौक्या, ह्या साऱ्या गोष्टी काळाच्या ओघात आता उध्वस्त होऊन नामशेष झाल्या आहेत… सध्याच्या विस्थापित वाघजाई देवीच्या ठाण्यापाशी (लवासा चा बॉंबे पॉइंट!!!) उभं राहून, मुंबईहून हेलीकॉप्टर मधून आलेल्या एका बड्या राज'कारणी व्यक्तीला शेडगेमामांनी "बायनोक्यूलर" (दुर्बीण) मधून ह्या पाण्याच्या टाक्या दाखवल्या होत्या… केवढी ही "दूरदृष्टी" म्हणायची…!!!
![]() |
| Courtesy @ केदार : कोळींनी अशी वाट अडवून धरली होती… समोर कुर्डूगड… |
शेडगेमामांनी मग आम्हाला डावीकडे लिंग्या घाट
दाखवला… त्याच्या शेजारीच झाडोऱ्यात लपलेला मारुडा घाट ही दाखवला…
थोड्यावेळाने आम्ही पुन्हा एकदा सातनाळेच्या दिशेने निघालो… इथेही भयंकर
रान माजलेलं होतं… फुललेली कारवी काय छान दिसत होती… पुढच्या १५ मिनिटांत
नाळेच्या तोंडावर आल्यावर सकाळचा ब्रेकफास्ट उरकला… नेहमीप्रमाणे उकडलेली
अंडी, सफरचंद, केळी आणि ड्रायफ्रुट्स हादडल्यावर आणि ओहोळीतलं थंडगार पाणी
प्यायल्यावर … जी काही मनाला तरतरी आली … तात्पुरती डोळ्यावरची झापड उडाली…
पुन्हा नाळेतून खाली उतरायला लागलो… रीतसर धबधब्याची वाट असल्यामुळे
चुकण्याचा कुठे प्रश्नचं नव्हता… वाटेत कोळीराजा च्या प्रदेशातल्या
मोठाल्या कोळींनी आपापल्या जाळ्यांनी संपूर्ण वाट अडवून धरली होती… त्यांना
धक्का न लावता बाजूने येत होतो… पुढच्या अर्ध्या तासात काळ नदीच्या
पात्रात पोचलो… इथे इथून पुढे गोटे-आळी चालू झाली होती… आता दमट वातावरणाने
अंगाची लाही लाही होयला लागली… थोड्यावेळ बसून उरलेला ब्रेकफास्ट फस्त
केला…
वेळ सकाळची ११:१२AM…
![]() |
| Courtesy @ केदार : कोळीराजाच्या उध्वस्त वाड्याचे अवशेष… अश्या चिक्कार शिळा सापडल्या |
कोळीराजा ची उध्वस्त वाडे :
वाटेत कोळीराजाच्या उध्वस्त वाड्यांचे
चौथरे(जोती) आणि इथस्त: विखुरलेल्या भल्या मोठ्या आयताकृती (२X ८ फुट) शिळा
बघून खात्री पटली कि इथला भाग पूर्वी बऱ्यापैकी समृद्ध असावा… पुढे
गेल्यावर अजून काही वाड्यांचे चौथरे(जोती), मोठ्या शिळा आणि अर्धवट तुटलेलं
"जातं" सापडलं… तशीच परिस्थिती अजून २ ठिकाणी मिळाली… फक्त त्या
चौथर्यांवर बक्कळ झाडी माजलेली होती… त्यामुळे अवशेष शोधायला भरपूर कष्ट
पडले… उंबर्डीतल्या ग्रामस्थांनी त्यातल्या बऱ्याचश्या शिळा घरात ओसरी आणि
गोठा बांधायला न्हेल्या आहेत… त्यामुळे इथे काहीही शिल्लक नाही…
| Courtesy @ अनुप काका : कोळीराजाच्या वाड्याचे अवशेष… |
![]() |
| Courtesy @ तिडके : कोळीराजाच्या वाड्याचे अवशेष… |
कोळीराजा : शेडगे मामांनी सांगितलेली कथा…
कोळीराजा हा पूर्वी कोळी समाजातला महादेव
कोळी होता… शेती आणि गुरं एवढीच त्याची माफक संपत्ती होती… एके दिवशी
नेहमीप्रमाणे संध्याकाळी गुरांसाठी चारा कापुन आणल्यावर त्याने विळा(खुरपं)
वर खुंटीला लटकवून ठेवली… सकाळी उठून बघतो तर संपूर्ण विळा (खुरपं)
सोन्याची झाली होती… तो पुन्हा त्याच भागात गेला आणि तिकडच्या गवताला आणि
दगडाला दुसऱ्या विळ्याने स्पर्श केल्यावर तिचंही सोन्यात रुपांतर झालं…
त्याला परीख (परीस) सापडलं होतं… मग तो ज्याला हात लावेल त्याचं सोन्यात
रुपांतर होई… अश्यारीतीने त्याने भरपूर सोनं जमा केलं… पंचक्रोशीत तो राजा
म्हणून ओळखला जाऊ लागला… तिथल्या लिंगी सुळक्याच्या पायथ्याला शंकराची पिंड
बसवून मंदिर उभारलं… शंकराला भरपूर सोन्याची आभूषणे दान केली… वर
सातनाळेच्या पठारावर वाटसरूंना पाणी पिण्यासाठी टाक्या खोदल्या… टेहळणीसाठी
ठाणं उभारली… सातनाळेच्या वर असलेल्या गुहांमध्ये जायला रितसर पायऱ्या
खोदल्या… पुढे काही कारणाने आपलं सगळं सोनं आणि संपत्ती घेऊन तो त्या
गुहेमध्ये आपल्या बायकोसकट गेला… तिकडे तिला मारली आणि सर्व संपत्ती सकट
तिला पुरून टाकली… येताना सगळ्या खोदीव पायऱ्या उध्वस्त करत खाली आला… पुढे
मारुडा घाट शोधण्याच्या नादात कोळीराजाची कहाणी अर्धवट राहिली…
कोळीराजाचे वाडे बघून झाल्यावर एका ओहोळीपाशी
दुपारचं Lunch उरकून घेतलं… आदल्या रात्रीच जेवण बनवून घेतल्यामुळे त्याचा
फायदा झाला… ओहोळीच्या साचलेल्या पाण्यात सवयीप्रमाणे तिडकेने उडी मारली… पाठोपाठ केदार आणि अनुपकाकांनी अंग धुवून घेतलं…
वेळ दुपारची १२:३५PM… :)
![]() |
| Courtesy @ केदार : मारुडा घाटाची सुरवात |
मारुडा घाट :
कोळीराजाचे उध्वस्त वाडे बघत असताना एक वाट
उजवीकडे हळूच वर चढायला लागली… सरळ चढायला गेलो तर लिंग्या उर्फ देव घाट
लागतो आणि उजवीकडे गेलो तर मारुडा घाट… हळूहळू कोकणातला दमटपणा जाणवायला
लागला… चढाई सुद्धा चांगलीच छाताडावरची होती… वाट तर अगदीच मळलेली आणि अगदी
रोजच्या वापरातली असावी इतकी मळलेली होती… अर्थात जोडीला सिगारेटची थोटके,
गोळ्या चॉकलेटांच्या रॅपंर्स, वेफर्स आणि बिस्किटांची रिकामी पाकिटं
ह्यांना अजून तिथला वास लागलेला नव्हता… कोकणातला दमटपणा, वाढतं ऊन, वाढती
तहान, आणि खडी चढण ह्यामुळे चढण्याचा स्पीड कमी झाला… लिंबू सरबत आणि मुरका
खाउन झाल्यावर तरतरी आली… पुढच्या अर्ध्या तासात उजवीकडून येणाऱ्या
निसणीच्या वाटेला लागलो… शेडगेमामांच्या म्हणण्यानुसार घाटाच्या तोंडाला
वाघजाई मंदिर असल्यामुळे ह्याला वाघजाई घाट असेही म्हणतात म्हणतात…
थोड्यावेळ आराम केला… पण प्रचंड डासांच्या फोडाफोडीनंतर तिकडून सटकलो आणि
थेट वाघजाई मंदिराच्या वरच्या अंगाला असलेल्या लवासाच्या "बॉंबे पॉइंट"
पाशी पोचलो… खाली अनेक राज'कारणी मंडळींसाठी अर्धवट बांधलेलं हेलीपॅड आहे…
थोड्यावेळाने खाली उतरायला सुरवात केली…
वेळ दुपारची ०३:१२PM…
![]() |
| Courtesy @ केदार : मुळा नदीचे उगमस्थान… |
![]() |
| Courtesy @ अनुप काका : मुळा नदीचे उगमस्थान… |
![]() |
| Courtesy @ केदार : इ.स. पु काळातली विहीर… बारमाही पाण्याने भरलेली असते… |
मुळानदीचा उगम :
धामणव्हळ च्या जवळ आल्यावर मामांनी आम्हाला एके ठिकाणी न्हेलं… इकडे सुद्धा ७-८ ठिकाणी छोटासा बांबू आत जाईल एवढी भोकं असलेला पाषाण दाखवला… ह्याच मुळा नदीचं रुपांतर पुण्यात आल्यावर मैल्यामध्ये होते… शेडगेमामांच्या म्हणण्याप्रमाणे हा मुळानदीचा उगम आहे परंतु Topography चा अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं कि ही खरी तर "मोसे नदी" असून तिच्यावर वरसगाव येथे धरण बांधले आहे… पावसाळ्यापूर्वी ह्याच भोकांतून नैसर्गिकरित्या पाणी यायला लागल्यावरचं, स्थानिक ग्रामस्थ नाचणी आणि भाताच्या पेरणीची कामं करायला सुरवात करतात… थोडेसे अंतर पुढे गेल्यावर एक ई.स.पु काळातली बारमाही पाण्याने भरलेली विहीर दाखवली…त्या विहिरीचा मुख्य उपयोग पाण-पोई आणि शेतीसाठी होतो… शेताडीतून चालत धामणव्हळी पाशी आलो… वाटेत 'मंदिराचे' बांधकाम दाखवले… नदीवर स्थानिक ग्रामस्थ मासे पकडत होते… मामांच्या घरी चहा झाला… त्यांची 'मंजुरी' देऊन आम्ही पुन्हा नदीवर अंघोळ केली… नदीच्या पाण्यात Fish Pedicure करून घेतला… आणि परतीच्या प्रवासाला निघालो…रात्री नेहमीप्रमाणे SP बिर्याणी खाऊन आपापल्या घरी रवाना झालो…
वेळ रात्रीची ०८:४७PM…
ठळक वैशिष्ठ्ये :
१. अनुपकाकांच्या नव्या SAFARI (रणगाडा) ची मंडळात झालेली सोय… तिच्या संसाराची सुरवात सुद्धा झकास अश्या अनवट घाटवाटांनीचं झाली…
२. काळ नदीचा उगम…
३. चोरव्हळ चा रानटी प्रकार…
४. जुन्या वाघजाई मंदिराचं ठाणं…
५. सातनाळ ची कडक जंगलातली मस्त उतराई…
६. दुर्गाडी डोंगराच्या पठारावर सापडलेल्या पाण्याच्या खोदीव टाक्या…
७. कोळीराजाच्या उध्वस्त वाड्याची चौथरे आणि अस्ताव्यस्त पसरलेल्या मोठ्ठाल्या शिळा…
८. पाऊण तासाची मारुडा घाटाची खडी चढाई…
९. मुळा नदीचे उगमस्थान…
१०. इ. स. पू काळातली ऐतिहासिक विहीर…

















No comments:
Post a Comment