Thursday, November 24, 2022

"पाथरा घाट, आजोबा आणि गुयरीदार घाट"

 


ज्या ट्रेकची गेल्या तीन महीन्यांपासून खुपच उत्कंठा लागून राहीली होती तो पाथरा घाट, आजोबा माथा आणि गुयरीदार घाटाचा ट्रेक सरतेशेवटी ११-१२ नोव्हेंबरला म्हणजे शनिवार-रविवारी असा दोन दिवसांत करण्याचं नक्की झालं होतं. निघण्याची तारीख जसजशी जवळ येत होती तसतशी उत्कंठा वाढत चालली होती. दरम्यानच्या काळात ट्रेकला येणारा प्रत्येकजण आंतरजालावरून दोन्ही घाटांबद्दल आणि आजोबाबद्दल माहिती मिळवत होता.
हा 'आजोबा पर्वत' म्हणजे सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असणारा उभा-आडवा सर्वच बाजूंनी महाकाय असा पर्वत आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची ४५११ फुट असून तो अहमदनगर जिल्ह्यात आहे. याच्या पायथ्याशी कोकणात ठाणे जिल्हा आहे जिथे डेहणे नावाचे गाव आहे. या डेहणे गावातुन आजोबा वा आजा पर्वताच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन घाटवाटा आहेत ज्यांनी घाटमाथ्यावरच्या आजोबाच्या पायथ्याच्या कुमशेतच्या पठारावर चढून जाता येते. अर्थात हे दोन घाट म्हणजे आम्ही ट्रेक करणार असलेले पाथरा आणि गुयरीदार घाट.
सह्याद्रीत अशी बरीच ठिकाणं आहेत की ज्यांना धार्मिक कथा जोडलेल्या आहेत. त्यातल्या या महाकाय डोंगराला 'आजोबा' नाव कसंकाय पडलं याची गोष्ट प्रसिद्ध आहे. पुराणातल्या कथेनुसार रावणवधानंतर काही काळाने रामांनी सीतेला त्यागलं म्हणून सीतामाई वाल्मिकी ॠषींच्या आश्रमात राहू लागली. तिथे तिने लव आणि कुश नावाच्या दोन मुलांना जन्म दिला. लव आणि कुश लहान असताना वाल्मिकी ॠषींना आजोबा म्हणत म्हणून या पर्वताचे नाव 'आजोबा' असे पडले. या पर्वतावरच वाल्मिकी ॠषींनी रामायण हा ग्रंथ लिहिला असं म्हणतात. आजही या आजोबाच्या पोटात निसर्गरम्य वातावरणात वाल्मिकी ॠषींचा आश्रम आणि त्यांची समाधी आहे. या आश्रमापासून थोडे वर चढून गेल्यावर आजोबा पर्वताला चिकटून एक सुळका आहे. त्याच्या खिंडीत एक पाळणा लावलेला आहे म्हणून या सुळक्याला 'सीतेचा पाळणा' सुळका म्हणतात. या ठिकाणी पाण्याच्या दोन खोदीव टाक्या देखील पहायला मिळतात.
आजोबाला जाणारे बहूतेकजण 'वाल्मिकी आश्रम आणि सीतेचा पाळणा' एवढंच पाहून येतात, जे एकूण पर्वताच्या अर्ध्या पदरात आहे. इथे जाण्याची वाटही सोपी आहे. मागल्या खेपेला या ठिकाणी जाऊन आल्यावर राहून राहून माथ्यावर जावं असं वाटत होतं. पण जाण्यासाठी नवीन वर्ष उजाडावं लागलं. तसं या ठिकाणी घाटमाथ्यावरच्या कुमशेतहूनही जवळची वाट आहे पण घाटवाटांचं व्यसन जडल्यानं आजोबा माथ्यावर जाताना डेहण्यातून पाथरा घाटानं आणि उतरताना गुयरीदार घाटानं परत असा एकंदरीत प्लॅन केलेला होता. यामुळे आजोबासोबत आमच्या दोन घाटवाटा पण पाहून होणार होत्या. डेहण्यातल्या बाळकृष्ण पाटेकरांकडून ट्रेकबद्दलची बरीचशी माहिती घेतली होती. त्यावरून तरी पाथरा आणि आजोबा हे प्रकरण साधंसुधं वाटत नव्हतं.

--दिवस पहिला--

नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री जेवण करून निघालो. शेवटच्या स्टॉपवर थांबून गाडीची पुजा करण्यासाठी सगळे खाली उतरले होते. रात्री अकरा वाजता गाडीभोवती गर्दी पाहून गस्तीवरच्या पोलीसांनी अगदी गाडी थांबवून चौकशी केली. मग त्यांनाही प्रसाद देऊन मार्गस्थ झालो.

.

नेहमीप्रमाणेच नारायणगावच्या स्टँडसमोर दुध प्यायला थांबलो.

.

त्यावेळी माझे पुणे व्हेंचरर्समधले काही मित्र तिथे भेटले जे हरिश्चंद्रगडाच्या माकडनाळेचा ट्रेक करायला निघाले होते. समव्यसनी मंडळी एकत्र आल्यावर मग काय सांगता? चर्चा फक्त एकाच विषयावर. आम्हा सर्वांना लवकर मुक्कामी पोहोचायचं असल्यानं गप्पा आवरत्या घेतल्या. आळेफाटा-मोरोशी-तळेगाव करत डोळखांबच्या थोडं पुढं गेलो नाही तर गाडी पंचर झाली. स्टेपनी लावून निघेस्तोवर अर्धा तास गेला.

.

त्यामुळं पोहोचायला सकाळचे तीन वाजले. एवढी रात्र झाली तरी पाटेकर आमची वाट बघत जागे होते. एवढ्या रात्रीही त्यांनी आनंदानं हसून आमचं स्वागत केलं. दुसर्‍या दिवसाच्या एकूण कार्यक्रमाबद्दल त्यांच्याशी थोडक्यात बोलून गावातल्या प्रशस्थ मारूती मंदीरात पथार्‍या पसरल्या.

.

क्रमशः


पाथरा घाट, आजोबा आणि गुयरीदार घाट"

--दिवस दुसरा--

डेहण्यात रात्री उशीरा पोहोचल्यानं सकाळी थोडी उशीराच जाग आली. तरीही सकाळची आन्हीकं उरकून गाडीत बॅगा टाकल्या आणि पाटेकरांकडे नाश्ता करायला बरोबर सव्वासहाला पोहोचलो. नाश्ता करून नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मंदीरात आरती केली.

.

.

भात तोडणी झाली होती. त्यामुळे बळीराजाची भल्या पहाटेच उठून भात झोडपणी सुरु झाली होती.

.

या ट्रेकमधे खाण्यापिण्याची सर्व जबाबदारी आम्ही पाटेकरांकडे दिलेली होती. याचं पहिलं कारण म्हणजे आम्हांला शिधा, पातेल्यांचा अतिरिक्त भार उचलावा लागणार नव्हता आणि स्वयंपाक करण्याच्या वेळेत आम्ही मुक्कामाचे ठिकाण फिरून पाहू शकत होतो. दुसरं असं की आम्हाला आपसुकच गाईड मिळाला होता. बाळकृष्ण पाटेकरांनी त्यांच्यासोबत 'देवराम' नावाचा माहितगार माणूस पोर्टर म्हणून घेतला होता. सह्याद्री माथ्यामागून तांबडं फुटायला लागलं होतं. देवरामदादा येईपर्यंत कुलंग, कुडपण, खुटा, रतनगड, कात्राबाई, गुयरीदार, महाकाय आजोबा ते नाप्त्याची दुकल पर्यंतचा सह्यमाथ्याचं विहंगावलोकन केलं.

.

देवरामदादा आल्यावर आम्ही आमच्या गाडीतुनच पाटेकरांच्या नातेवाईकांकडे गुंडे गावापर्यंत गेलो. आमची गाडी तिथे पार्क करून पुढे त्यांच्या गाडीतून त्यांनी आम्हाला पुढच्या वाळशेत आणि भिकारवाडीच्या मधेपर्यंत सोडलं. यापुढचा भिकारवाडीपर्यंतचा रस्ता खुपच कच्चा असल्यानं वेळ खुप लागतो. तसं भिकारवाडीतुनही पाथरा घाटात जाता येते पण त्यापेक्षा अलिकडच्या ठिकाणाहून लवकर पाथरा गाठता येतो. गाडीने या ठिकाणापर्यंत आल्यामुळे आमचा सकाळचा बराच वेळ वाचून आम्ही उन्हं चढायच्या आत पाथरा घाट बर्‍यापैकी चढून जाणार होतो. सर्वांसाठी आणलेल्या सामाईक वस्तुंचं जसं काकडी, पन्हे, किराणा आणि इक्विपमेंटचं सर्वात सारखं वाटप केलं.

.

भिकारवाडीच्या पुढे नदी ओलांडली, पिट्टूचे बंद करकचकून आवळले आणि पाथर्‍याकडे मार्गस्थ झालो. आता आमच्यासोबत 'बाळकृष्ण' आणि 'देवराम' असल्यामुळं आमचा ट्रेक चांगलाच होणार याबद्दल काही शंकाच नव्हती.

.

आजोबा आमच्या डाव्या हाताला दुरवर दिसत होता. त्याला जोडून असलेला सीतेचा पाळणा सुळका पाहिल्याबरोबर त्या सुळक्यापाशी असलेल्या खाणाखुणा चटकन डोळ्यासमोर आल्या.

.

आता आमची वाट मस्तपैकी झाडीतुन सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर अशी दक्षिणेकडे चालली होती. सह्यमाथ्यावरून उतरलेल्या दांडांवरून चढ-उतार करत आरामात वाट पुढे जात होती.

.

.

पाऊस उशीरापर्यंत राहिल्याने वाटेत बरेच वाहते ओहोळ ओलांडावे लागत होते.

.

.

.

थोडं अंतर चालून गेल्यावर मधेच एक पांढरीचे झाड दिसले. स्थानिक लोक याला 'कांडळ' म्हणतात. शेंगदाण्यासारखी याला फळे येतात आणि ती लहान मुले आवडीने खातात. हे झाड दिसायला पांढरे शुभ्र असल्याने इतर झाडांपेक्षा एकदम वेगळे दिसते. त्यामुळे या झाडाचा ट्रेकमधे रस्ता लक्षात ठेवण्यासाठी खुपच उपयोग होतो. उदाहरणच सांगायचं झालं तर तैलबैलाजवळच वाघजाईचा घाट आहे. या घाटातुनच ठाणाळे लेण्यात जाण्याची वाट आहे. पण घाटवाटेतुन नेमका लेण्यात जायचा फाटा कुठे आहे हे समजत नाही. या घाटवाटेतल्या एका पदरावर पांढरीचं झाड आहे नेमकं त्याच्या अलिकडच्या पदरात लेण्यांना जायचा फाटा आहे.

.

शेवटच्या ओढ्यात पाण्याच्या बाटल्या भरुन घेतल्या कारण इथून पुढे आम्हाला कुमशेत पठारापर्यंत पाणी मिळण्याची शाश्वती नव्हती.

.

या ओढ्यानंतर पुढच्याच एका मोठ्या सोंडेवरचा चढ सुरु झाला. सोंडेवर पुर्ण चढुन गेल्यावर समोरच दिसणार्‍या झाडीत एक छोटासाच खाऊ ब्रेक घेतला. याच सोंडेच्या पायथ्याशी असलेल्या 'कुंडाचीवाडी' इथून एक वाट आम्हाला येऊन मिळाली होती. खरं म्हणजे पाथरा घाट कुंडाच्यावाडीतुन सर्वात जवळ आहे. या कुंडाच्यावाडीला येण्यासाठी मोरोशी-डोळखांब दरम्यानच्या तळेगावातून फाटा फुटतो. या व्यतिरिक्त मोरोशी-टोकावडे-मोढळवाडीतुनही पाथरा घाट गाठता येतो.

.

.

.

आता पुढची वाट जवळजवळ साठ अंशात असल्याने चांगलीच दमवत होती. जसजसं वर जात होतो तसतशी झाडी विरळ होत चालली होती. ऊनही जाणवायला लागलं होतं. उजव्या बाजूच्या सोंडेच्या माथ्यावर पाथरा घाटाची खिंड आणि त्यातून उतरलेली नाळ झाडीमागे जाणवत होती. पुढे उजवीकडे ट्रॅव्हर्स घेत त्या नाळेत शिरलो.

.

.

.

.

.

आमच्या बाळकृष्णांना घेतलेल्या शिध्याचं वजन चांगलंच जाणवू लागलं होतं. ते कमी करण्यासाठी एका सुकलेल्या ओढ्यात दुपारच्या जेवणाची शिदोरी सोडली आणि सर्वांनी जेवून घेतलं. पण समोरचा चढ बघता जेवण जातंय थोडंच? आवंढाही गिळवत नव्हता. दोन घास पोटात कसेबसे ढकलले आणि पुन्हा चढू लागलो.

.

.

नाळेतला चढ भयानकच होता. एकतर खुपच खडा आणि घसार्‍याचा. बरं पावसाळ्यानंतर आम्हीच पहिले जात असल्याने वाट तयार करतच जावं लागत होतं.

.

.

.

.

खिंडीच्या थोडं अलिकडं उजव्या बाजुच्या डोंगराच्या गुहेत पाथरा देवीचं मंदीर लागलं. एका द्रोणात देवीला वाहिलेले सुटे पैसे दिसले. अगदी एक पैसा, दोन पैसे, पाच पैशाची केव्हाच बंद झालेली नाणीही त्यात होती. बाजूलाच पाण्याचं कोरडं टाकं होतं. एक प्रकार बाकी लक्ष वेधून घेत होता तो म्हणजे तिथे पडलेली असंख्य छोटी मडकी. घाटाखालच्या पंचक्रोशीतली मंडळी देवपुजेत असणारे मडके जुने झाले की नवे आणतात आणि जुने पाथरा देवीला येवून वाहतात. प्रथा असते प्रत्येक ठिकाणची नाही का?

.

.

.

मंदीरातून समोरचा घाटातल्या सर्वात अवघड टप्प्यातला एक छोटासाच भाग दिसत होता आणि तोही मनात चांगलीच धडकी भरवत होता. ते बघताच आता समोर काय वाढून ठेवलंय याची पुसटशी कल्पना आली. या टप्यात अतिशय घसाऱ्याची वाट दिसत होती. आम्ही शितावरून भाताची परीक्षा केली होती.

.

.

घाटातला रस्ता जसा वळणे घेत जातो त्याचप्रमाणे पाथर्‍याची जेमतेम एक पाऊल बसेल एवढीच वाट वळणे घेत जात होती. कधी दरी डाव्या बाजूला तर कधी उजव्या बाजूला.

.

.

इथून पुढे सावलीसाठी तर जाऊच द्या पण आधारासाठी कारवीदेखील नव्हती. सुर्यदेवही चांगलेच तापले होते. पर्यायाने ज्याला धरुन चढायचे ते दगडही. हाताला चटके बसू लागताच शाळेत शिकलेली बहिणाबाईंची कविता आठवली 'आधी हाताला चटके...' फक्त इथं भाकर नव्हती तर घाटमाथा होता. बाकी एकूण परिस्थिती तीच होती. दृष्टीभयही एवढं होतं की फोटोही फारसे काढता आले नाहीत. फोटो काढू की जीव सांभाळू अशी गत होती सर्वांची. बरं वाट एवढी घसार्‍याची होती की चाळीशीनंतरचा माणूसही कसा रांगतो याचं प्रात्यक्षिक पहायला मिळत होतं.

.

.

.

.

.

.

.

.

माथा समोरच दिसत होता पण वाट काही संपत नव्हती. समोरच्या टोकावर सरळ चढायला वाट नसल्याने ती आता उजवीकडून आडवी जात होती. वाट होती एवढी चिंचोळी की जेमतेम एकच पाऊल बसेल. डाव्या बाजुला कडा आणि उजव्या बाजूला डोळे फिरवणारी दरी. बरं डोळे फिरतात तर बघावं कशाला दरीकडं? असं म्हणून तरी जमतंय थोडंच. लक्ष जायचंच हळूच. डाव्या कड्याला धरत आणि मन खंबीर ठेवत एकदाचे माथ्यावर पोहोचलो आणि सुटकेचा निश्वास सोडला. वाळशेत पुढील ट्रेक चालू केलेल्या फाट्यापासून पाथर्‍याचा घाटमाथा गाठायला आम्हाला तब्बल सात तास लागले होते.

.

.

एकंदरीत पाथरा घाट प्रचंड घसाऱ्याचा, भयानक दृष्टीभय असलेला आणि घाटवाटेत पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असलेला आहे. हा घाट अत्यंत कठीण प्रकारात मोडू शकेल. निष्णात ट्रेकर्स किंवा ज्याला दृष्टीभयाचा त्रास नाही अशांनीच या वाटेने जाण्याचे धाडस करावे. ज्याला या वाटेने जायचेच आहे त्याने या वाटेने शक्यतो चढुन जावे. उतरण्याच्या तुलनेत ते काहीसं सोपं असेल. पावसाळ्यात या वाटेने जाणे अतिशय धोक्याचे आहे.
कुमशेत पठारावर एका झाडाच्या सावलीत थोडावेळ आराम केला. सर्वांकडील पाणी बर्‍यापैकी संपत आलं होतं. अर्थात माझ्याकडे दोन लिटर पाण्याचा 'रिझर्व स्टॉक' होताच. पण तो मी फक्त आणीबाणीच्या प्रसंगासाठी ठेवलेला असतो. तसं आता पठारावर आम्हांला मुबलक पाणी मिळणार होतं आणि झालंही तसंच. थोडं अंतर चालून गेल्यावर एक मस्त वाहत्या पाण्याचा ओहोळ दिसला. मग काय? पोटभर पाणी पिऊन घेतलं. हातपाय धुवून ताजेतवाने होईतोपर्यंत एकाने लिंबुसरबत तयार केलं ते पिऊन लगेचच समोरच्या आजोबाकडे निघालो.

.

.

.

वाट मस्त सपाटीवरुन चालली होती. पाथरा चढून आल्यानंतर तर ते फारच सुखावह वाटत होतं. उजव्या बाजूला कात्राबाईची खिंड, कोंबडा, मुडा लक्ष वेधून घेत होते. महिन्याभरापुर्वीच आम्ही कात्राबाईची खिंडीतुन उतरुन कोंबड्याच्या पायथ्यातून हरिश्चंद्रगडाकडे गेलो होतो. कात्राबाईची केलेली आरती, खिंडीतुन उतरणारी अफलातून वाट वगैरे डोळ्यासमोरुन तरळून गेली. पठारावर वेगवेगळ्या रंगाची रानफुले लक्ष वेधून घेत होती.

.

.

.

.

तर मधेच गवताचे तुरे वार्‍यासोबत डोलत होते.

.

ओहोळावर रचलेला बांध दिसला आणि त्याच्या सांडव्यात मासे पकडण्यासाठी लावलेले फासेही दिसले.

.

कधी कापलेल्या तर कधी तोडणीसाठी तयार असलेल्या भातशेतीतून वाट पुढे जात हळूहळू चढत झाडीत शिरली.

.

.

.

.

गेल्यावर्षीच आजोबाच्या पुर्वेकडील फार मोठी दरड कोसळून खाली आली. खाली कोणती वस्ती नाहीये म्हणून बरं नाहीतर माळीण सारखीच घटना घडली असती. या ढासळलेल्या दरडीच्या डाव्या बाजूला असलेल्या धारेवरुनच आजोबा माथ्यावर जाण्याची झाडीभरली वाट आहे. थोडी निसरडी होती पण धरायला कारवी असल्यामुळे काही वाटत नव्हतं. थोडं पुढं गेल्यावर मधल्या नाळेत उतरलो आणि सरळ नाळेतुनच माथ्याच्या कातळटप्प्यापर्यंत चढून गेलो.

.

.

.

इथून मात्र उजवीकडे वळून ट्रॅव्हर्सी मारली. ही ट्रॅव्हर्सीही खुपच चिंचोळी होती.

.

.

खरं म्हणजे बहूतेक ट्रेकर्स कुमशेत पठारावरच्या ते तसं का करतात याचं कारण वर चढता चढता कळलं. पण आम्हाला आजोबावरच मुक्काम करायचा होता. आता आम्ही जवळजवळ वर पोहोचलो होतो. एक डावे वळण घेऊन समोरच्या ओहोळात पोहोचलो. आज रात्रीचं आमचं मुक्कामाचं हेच ठिकाण होतं. सकाळी आठ वाजता चालायला सुरु करून दुपारी साडेचार वाजता आम्ही मुक्कामी पोहोचलोही होतो.

.

अर्धा तास विश्रांती घेतल्यानंतर पहिली चुल लावली. तोवर सहकार्‍यांनी सरपण गोळा करून आणलं. मग काय तर पहिला फक्कड चहा बनवला.

.

.

आता अंधार पडण्यापुर्वी स्वयंपाक बनवायला हवा होता. मग काय सर्वांनी कामे आपसुकच वाटून घेतली. सर्वांमधला बॅचलर असतानाचा बल्लवाचार्य जागा झाला होता. भाज्या चिरून होत होत्या तोपर्यंत मस्त सुप बनवलं गेलं. आजचा रात्रीचा मेन्यु कांदा-बटाटा रस्सा भाजी कम डाळ, सोबत डेहण्यातुन आणलेल्या चपात्या, पापड आणि लोणचं असा सुग्रास होता. सुप प्यायल्यावर भुक चाळवली गेलीच होती, त्यावर असा मेन्यु म्हटल्यावर असे काय सर्वजण जेवणावर तुटून पडले की विचारता सोय नाही. बरं जेवणही इतकं चविष्ट झालं होतं की सर्वांना रोजची स्वयंपाकाची सवय आहे की काय? असा प्रश्न पडावा. एकंदरीत अशा आडजंगलातही आमच्या जेवणाची चंगळच झाली होती.

.

.

.

.

सुरवातीला कॅम्पफायर करायचा असं ठरलं होतं पण दिवसभराच्या चालीने सर्वजण एवढे थकून गेले होते की कॅम्पफायर वगैरे काहीही न करता सर्वजण लगेचच झोपून गेले.

.

क्रमशः

थोडा आगाउपणा करुन तुमच्या ट्रेकचा नकाशा टाकतोय. चुकला असल्यास सांगा. आमच्या सारख्या नंतर जाणार्‍यांना उपयोगी पडेल. ;-)
Guyari Pathara Ghat


पाथरा घाट, आजोबा आणि गुयरीदार घाट"

--दिवस तिसरा--

आजचा टप्पा कालच्या एवढा अवघड काही नव्हता. एकतर गुयरीदार घाट सोप्या प्रकारातला होता आणि तो उतरायचा होता. त्यामुळे सकाळी थोडं आरामातच आवरलं. समोरच कात्राबाईचा डोंगर दिसत होता. त्याच्या उजव्या बाजूला कुमशेतचा कोंबडा आणि या दोन्हीच्या मधे कात्राबाईची खिंड जाणवत होती. कोंबड्याच्या जवळच सुर्योदय होत होता.

.

सकाळचे सात वाजले होते सुर्य बर्‍यापैकी वर येऊनही थंडी काही कमी झाली नव्हती आणि गार वारेही वहात होते. अंगातून थंडी जाऊन चैतन्य यावं म्हणून आमच्यातल्या एकानं थोडंसं फिजिकल ट्रेनिंग आणि नंतर हास्यक्लबात घेतले जाणारे हास्यप्रकार करून घेतले. मग काय सगळे एकदम तरतरीत झाले.

.

.

.

गरमागरम चहा तयार झाल्याची हाक ऐकू आल्यावर सगळे चुलीपाशी जमा झाले. नाश्ता आम्ही माथ्यावर जाऊन आल्यावर करणार होतो. तोपर्यंत दम निघावा म्हणून चहा बरोबर बिस्कीटं खाऊन घेतली. आता आम्ही सर्वजण माथ्यावर जाणार असल्यानं नाश्ता तयार करण्याची जबाबदारी बाळकृष्ण यांनी स्विकारली.

.

.

आता आम्ही आमच्या अंतिम लक्षाकडे म्हणजे आजोबा माथ्याकडे निघालो होतो. सर्वजण माथ्यावर जायला आतुर झाले होते त्यामुळे चढताना कुणीच थांबत नव्हतं. पाऊणएक तासात आम्ही माथ्यावर पोहोचलो. माथा बर्‍यापैकी मोठा होता. कोकणाच्या बाजूला सरळसोट कडा तर घाटमाथ्याकडे तो टप्प्याटप्प्याने उतरत गेलेला होता. माथ्यावर मोठी झाडे अशी नव्हतीच. खुरटीच झाडे तीही थोडीच दिसली. बाकी कमरेपर्यंत गवत माजलेलं होतं.

.

.

.

.

.

आजोबा माथ्यावरून दिसणारा नजारा तर अप्रतिम होता. एवढ्या उंचीवर आल्याने बराच लांबपर्यंत ओळखीचा प्रदेश दिसत होता. त्यात अलंग-मदन-कुलंग, कळसुबाई, कुडपण, घाटघर, साम्रद, सांधणदरी, खुटा-रतनगड, कात्राबाई, करंडा, कोंबडा, मुडा, गवळदेव, अगदी खालच्या बाजुला काल चढुन आलेल्या पाथर्‍याची बेचकी, त्यामागे कुमशेत, नाप्ता, कलाडगड आणि अगदी शेवटी हरिश्चंद्रगडाची रोहीदास आणि बालेकिल्ला टोके तर खाली कोकणात डेहणे, शाई आणि करवली नद्यांची खोरी एवढा परिसर अगदी स्वच्छ दिसत होता. पाहतापाहता स्वतःभोवती एक प्रदक्षिणा मारून पुर्ण झाली होती. माथ्यावर भरपुर फोटो काढले.

.

.

मोबाईलला नेटवर्क मिळाल्यामुळे सर्वांनी घरी खुशालीचे फोन केले आणि नाश्त्यासाठी कॅम्पसाईटवर परत आलो. कांदेपोहे आणि काल राहिलेल्या भाताचा केलेला फोडणीचा भात आणि वर कॉफी.
इथे येण्याचा आमचा अंतस्थ हेतु साध्य झाला होता आणि आता आजोबांचा निरोप घ्यायची वेळ जवळ आली होती.

.

.

ट्रेकला आलेले सर्वच पुणे व्हेंचरर्स या नामांकीत संस्थेच्या तालमीत तयार झाल्यामुळं प्रत्येकाला स्वच्छतेचं बाळकडू अगदी सुरवातीपासुनच मिळालं होतं. त्यामुळे कुणालाही न सांगता सर्वजण कॅम्पसाईटवर साफसफाईच्या कामाला लागले. " Leave nothing but footprints, take nothing but memories" हा मुलमंत्र सर्वांच्या अंगवळणीच पडल्यामुळे कुणाला काही सांगावंच लागलं नाही. अक्षरशः पंधरा मिनीटात कॅम्पसाईट स्वच्छ झाली. परतीचा प्रवास सुरू करण्यापुर्वी नेहमीप्रमाणेच शिवाजी महाराजांची गारद झाली. जय भवानी-जय शिवाजीच्या घोषणांनी आजोबाचा परीसर अगदी दुमदुमून गेला.

.

.

.

काल आजोबा माथ्यावर आलेल्या वाटेनेच परतीचा प्रवास असल्याने उतरताना काळजी घेण्याची जास्त गरज होती. कधीही परतीच्या प्रवासातच अपघात होण्याची दाट शक्यता असते. योग्य ठिकाणी दोराचा वापर केल्यामुळे उतरणं सुरक्षीत झालं होतं. एकमेकांना आधार देत, अवघड असलेल्या जागेवर मागच्याला सावध करत हळूहळू सर्वजण पठारावर आले.

.

.

.

आता आम्हाला आजोबा डाव्या हाताला ठेऊन वळसा घालायचा होता. आजोबाच्या उत्तरेला चिकटूनच साधारण पाऊण तासावर आजोबा आणि करंडा या दोन्हींमधे गुयरीदारची खिंड आहे. वाटेत एक मस्तपैकी पाण्याचा ओहोळ लागला. याला 'शिधोबाचा ओहोळ' म्हणतात. हा ओहोळ बारमाही वाहता असल्याने आजोबा माथ्यावर जाणारे बहूतेक सर्व याच्याच काठावर मुक्काम करतात. ओहोळातलं पाणी ओणवं होऊन प्यायला एक वेगळीच मजा येते.

.

.

.

आमच्यातल्या एकाच्या पायात क्रॅम्स येऊ लागल्याने थोडी विश्रांती घेऊन त्याच्यावर प्रथमोपचार केले.

.

पुढच्या दहाच मिनीटात घाटमाथ्यावर पोहोचलो. इथुन गुयरीदारची एकच एक नाळ दिसत होती जी आम्हाला डेहण्यापर्यंत घेवून जाणार होती.

.

.

.

.

तसं पहायला गेलं तर ही वाट तितकीही सोपी नव्हती पण कालच्या दिवसभरात सर्वजण अवघड वाटा चालून एवढे सराईत झाले होते या वाटेचं कुणाला काही वाटतच नव्हतं.

.

.

ही नाळ पश्चिमवाहिनी असल्यानं जवळजवळ अर्धी नाळ उतरून येईपर्यंत ऊनच लागलं नाही. त्यामुळे थांबण्याचा प्रश्नच आला नव्हता. थोडं खाली उतरल्यावर घसा कोरडा पडल्याची जाणीव झाली. एक मोठं झाड बघुन क्षणभर विश्रांती घेतली. इथूनच एक वाट डावीकडे वळून पदरात असलेल्या वाल्मिकी आश्रमाखालच्या पाण्याच्या कुंडांपर्यंत जाते. पण आम्हाला डेहणे गाठायचं असल्याने आम्ही सरळ खाली उतरून जाणार होतो. घरून आणलेल्या तहानलाडू भुकलाडूंचा काही वेळातच फडशा पडला. त्यावर सकाळीच तयार केलेलं सरबत प्यायलं.

.

.

थोडं खाली उतरल्यावर दोन मोठे दगड एका लहान झाडाच्या आधाराने सख्ख्या भावांप्रमाणे एकमेकांना टेकून उभे होते.

.

नाळेत पुढे एक मोठा कडा असल्याने वाट आता नाळेतून बाजुच्या जंगलात शिरून उतरू लागली. शेवटच्या टप्प्यात झाडे संपली आणि गवताचा एक भयानक उतार लागला. मग काय!! सगळे अगदी लहान झाले आणि त्या गवताळ टप्प्यावरून बहूतेक सर्वांनीच मनसोक्त घसरघुंडी खेळून घेतली.

.

सर्वजण खालच्या झाडीत सुखरूप उतरल्यावर डेहण्याकडे निघालो. वाटही सपाटीची आणि झाडीतुन असल्याने एवढे चालूनही थकवा जाणवत नव्हता. गुयरीदाराच्या नाळेतुन आलेल्या ओहोळाची आता 'शाई नदी' झाली होती आणि वाटही तिच्या बाजूबाजूने आम्हांला डेहण्यापर्यंत नेणार होती. थोडं चालल्यावर जंगल संपून वाट उघड्यावर आली. गाव जवळच असल्याच्या खुणाही जाणवू लागल्या होत्या. वाटेचा झालेला 'ट्रॅक्टरचा रस्ता' बरंच काही सांगुन जात होता. शेवटी ही नदीसुद्धा वाळू उपशापासून सुटली नव्हती.

.

मुख्य रांगेवरचे आजोबा, कात्राबाईचे कडे, रतनगड आकाशात उंच गेलेले दिसत होते. चालताचालता रतनगडाच्या वाटांचा विषय सुरू झाला आणि गोळी बरोबर लागली. बाळकृष्ण सोबतच चालत होते आणि आमचं बोलणं तेही लक्षपुर्वक ऐकत होते. त्यांनी सहजच 'चिकणदरा' वाटेबद्दल सांगितलं आणि माझे कान टवकारले. चौकशीअंती बरेच वर्षांपासून मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर एका चुटकीसरशी मिळालं होतं. पुढच्या महीन्याभरातच हा नवीन घाटवाटेचा अतिशय अवघड ट्रेक आम्ही केला सुद्धा. कोणता होता तो ट्रेक वाचा पुढच्या भागात.
एकंदरीत आम्ही उतरलेला गुयरीदार घाट खुपच देखणा होता. भिकारवाडीनंतर आज आम्हाला आमच्या व्यतिरिक्त काही वेगळे लोक दिसू लागले होते.

.

.

घाट उतरून आल्यानंतर वाल्मिकनगरपर्यंतचं तासाभराचं टळटळीत उन्हातुन चालणं सपाटी असुनही अतिशय कंटाळवाणं झालं होतं. एवढ्या उन्हातही शेतकर्‍यांची शेतीची कामांची लगबग सुरू होती.

.

.

ट्रेकर्स अशा आडबाजूच्या खेड्यात गेले की आपसुकच त्यांच्याभोवती गावातल्या लहान मुलांचं चॉकलेट, गोळ्या आणि खाऊसाठी कोंडाळं जमतं. पण आमच्यातला एक ट्रेकरमित्र प्रत्येक ट्रेकला मुलांना थोडी वेगळी गोष्ट वाटतो ते म्हणजे 'पेन'. खरंच त्याचं हे काम कौतुकास्पदच आहे, नाही का?

.

.

वाल्मिकनगरच्या असलेल्या देवराममामांनी आमचा पाहूणचार त्यांच्याच दुकानातला पेप्सिकोला देऊन केला. घरी आलेल्या पाहूण्यांबद्दल त्यांना असलेलं प्रेम जाणवत होतं. केवळ दोन दिवसांच्या सहवासानं आमच्यात अतिशय घट्ट मैत्री झाली होती.

.

.

पुढच्या पंधरा मिनीटातच डेहण्यात बाळकृष्ण पाटेकरांच्या घरी दाखल झालो. घरून पाण्याला बादली घेतली आणि हातपंपावर अंघोळीला गेलो. नाहीतरी अशी अंघोळ आम्हाला पुन्हा लगेच तरी कधी करायला मिळणार होती?

.

अंघोळ झाल्यावर भुकही जाम सपाटून लागली त्यातुन पाटेकरांच्या गृहलक्ष्मीने असं चविष्ट गावरान जेवण बनवलं होतं म्हणून सांगू सगळ्यांनी दोन दोन भाकर्‍या जास्तच खाल्ल्या.

.

या ट्रेकमधे कोकणातील डेहण्यातुन पाथरा घाटाने आजोबा माथा आणि उतरताना गुयरीदार घाटाने परत डेहणे, असं पाठीवर दोन दिवसांचं सामान घेऊन, एकंदरीत आमचं १६-१७ तासांचं चालणं झालं होतं आणि तसं हे नक्कीच कमी नव्हतं. थकल्यानंतरही अजिबात चिडचिड न करता आम्ही ट्रेक व्यवस्थितपणे पुर्ण केला होता आणि हे केवळ आम्ही एकत्रितपणे, वारंवार करत असलेल्या डोंगरयात्रांमुळेच शक्य झालं होतं.

खरं म्हणजे आज रविवार सुट्टीचा दिवस असूनही कंटाळा करून चालणार नव्हता. दुसर्‍या दिवशीची कामे डोळ्यासमोर दिसत होती त्यामुळे लवकरात लवकर पुण्याला पोहोचायला हवं होतं. देवराममामांच्या मुलासोबत जाऊन गुंड्यातुन गाडी घेऊन आलो आणि लगेचच पाटेकरांचा निरोप घेतला आणि वाटेत फक्त एकच टी-ब्रेक घेऊन रात्री सुखरुप घरी परतलो.


No comments:

Post a Comment

किल्ले बहुला.

 आयुष्यात पाहिल्यांदा आपल्या आर्मीला घाबरून जीव मुठीत धरून केलेला एक अविस्मरणीय ट्रेक - किल्ले बहुला.   ✍️ मेघन तारिहाळकर पाटील (चौफेर भटकंत...