Sunday, December 1, 2024

पावल्या पेढा आणि आंबेनळी

 http://ahireyogesh.blogspot.com/2020/09/pedha-pavlya-ambenali.html

 

बारा पुण्यक्षेत्री बारा लिंगे बारा ज्योती !

तिथे नांदे शंभू कैलासाचा पती ! !

         गेल्या वर्षी अलेक्झांडर ट्रेक वेळी मित्र ‘दिलीप वाटवे’ म्हणाले होते, ‘भिमाशंकर भागातील एखादा वेगळा रूट असेल तर नक्की सांग’. नंतर नेकदा पदरगड लगतच्या पावल्या पेढा या वाटेबद्दल आमच्यात चर्चा होई. पाऊस लांबल्यामुळे मुहूर्त मात्र मिळत नव्हता. एकदा फेसबुक वर ‘स्वप्नील खोत’ याचा पदरगडाचा या वाटेवरून घेतलेला फोटो पाहिला. त्याच्या सोबत अवघ्या काही मिनिटांत मुद्देसूद चर्चा.. काम फत्ते. 

     ऑक्टोबर महिन्यातील शनिवार ठरवला गेला. पुण्याहून ‘दिलीप वाटवे’ व त्यांच्या सोबत ‘योगेश चौरी’, ‘नंदकुमार नलावडे’ आणि ‘पुजारी’ साहेब. इथे अजयरावांची गाडी माझ्या घरी ठेवून माझ्या गाडीतून खरे साहेबांना ठरलेल्या ठिकाणी पीकअप करून रात्री अकराच्या सुमारास निघालो. पावसामुळं झालेली रस्त्याची दुरवस्था त्यामुळे कशेळे पोहचायला उशीर झाला, दिलीप भाई व पुणेकर मंडळी आधीच येऊन वाट पाहत होते. भेटल्यावर नाक्यावर चहा घेऊन थेट मुक्कामी अशोक मामांच्या घरी. आवाज दिल्यावर मामा बाहेर आले, गाडी लावणे, समान काढणे, अगदी थोड्याच गप्पा मग पाण्याची कळशी शेवटी पथारी पसरून आडवे होईस्तोर दोन वाजले.  

      अशोक मामांशी आता चांगलाच घरोबा झालाय. नेहमी फोनवर चौकशी बोलण. या भागातल्या कोणताही ट्रेक असेल तर हक्काचं घर. एकदा भारीच किस्सा झाला. मागे निसणीच्या वाटेने कोथळीगड करून डुक्करपाड्यात उतरलो. एकटाच होतो जशी पाड्यात एन्ट्री मारली तशे चार पाच तगडे कुत्रे जोराने भुंकू लागले. कुठल्याही वाडी, पाड्यात असे स्वागत होतेच त्यात आपण एकटे असल्यावर यांना चेव येतो. असाच काठीने धाक दाखवून पुढे सरकत होतो. भुंकणे काही कमी होईना, त्यांचा आवाज ऐकुन एकजण दगड मारत शिव्या हाणत बाहेर आला. जवळ जाऊन पाहिलं तर तो ‘काळूराम थोराड’. अंधारी ते खेतोबा ट्रेक वेळी सोबत आलेला वाटाड्या. तेव्हा अशोक मामांनी याला आमच्या सोबत पाठवलं होतं. 

'राम राम ओळखलं का काळूराम ?'

थोडे डोळे बारीक करून.. 'हो ओळखलं.'

'तुम्ही मागं आले होते आपून वर अंधारीला गेलथो.'

'पण मंग आता इथं कुठे एकटा ?' 

सगळी उत्तरं देत त्यांच्या सोबत मामांच्या घरी आलो.

मी वरंड्यात बसून बुटाची लेस सोडू लागलो. दुपारची वेळ होती, मामा बहुतेक आतल्या खोलीत झोपलेले. काळू राम आत जाऊन मामांना म्हणाला.

‘ओ उठा या बाहेर.. चला बाहेर.’

मामा – ‘का रे काय झालं’.

काळूराम – ‘ते अंधारीवालं आलं आहे’.

मामा – ‘अंधारीवालं ??? कोण’ ???

मामांना लक्षात येईना. पण हे आत सुरू असलेले संभाषण मला बाहेर स्पष्ट ऐकू येत होत. 

मामा बाहेर आल्यावर, मला पाहून काळूराम ने ज्या प्रकारे ओळख सांगितली त्यावर दोघांची हसून हसून पुरेवाट झाली..   

   खरंय आपल्या सोबत कधी काळी येणारं वाटाडे त्यापैकी बहुतेक जण आपलं नाव ही विसरून जातात.. काही वेळा तर पूर्ण ट्रेक होतो पण वाटाड्या आपल्याला आपलं साधं नावही विचारत नाही. आपण मात्र त्यांची कुंडली काढून लक्षात ठेवतो. पण मग कधी ते अशा काही ट्रेक किंवा एखादा घडल्या प्रसंगावरून आपल्याला लक्षात ठेवतात..

ते म्हणतात ना, नाम मे क्या रखा है.. असो.

     पहाटे लवकर उठलो, सर्व आवरून चहा पाणी झाल्यावर मामांचा निरोप घेतला. रजपे, पाचखडक पाडा शेवटी धनगर वाडा असा दहा पंधरा मिनिटांचा प्रवास. धनगर वाड्यात मोजून चार ते पाच घर त्यात सुरुवातीला मोठं अंकुशचे घर. मागे आंबेनळी खेतोबा शिडी हा ट्रेक केला होता तेव्हा इथूनच सुरुवात केली होती. आता अंकुश सोबत बोलणं झाले होते त्या प्रमाणे त्याचा लहान भाऊ ‘लहू’ आमच्या सोबत येणार होता. आजचे नियोजन पावल्याच्या वाटेनं पदरात जाऊन पुढे पदरगड लगतच्या पेढ्याचा घाटाने माथा गाठून कमळजाई मार्गे आंबेनळी नं खाली. भिमाशंकर अभयारण्य मधील या अल्पपरिचित दणकट अशा वाटा. गाडी लावून सॅक बाहेर काढल्या, चहाचा आग्रह तो घेऊन निघेपर्यंत चांगलेच उजाडले होते. अंकुशच्या घरातून दिसणारा सह्याद्री बाकी मोहक.. अंगणात बसलं की समोर रानमळा, पाठीमागे पदरगड तिथून उंच होत गेलेली रांग पेढ्याचा माथा ते थेट आत लपलेले आंबेनळीचे कडे. चिल्हार नदीच्या पूर्वेला टेंभरे, रजपे, पाचखडक पाडा व सर्वात शेवटी धनगरवाडा हि लहान वस्ती.

   घराच्या मागून पदरगडाच्या दिशेने निघालो, इथून पदरगडाकडे पाहिल्यावर डावीकडून दुसरी घळ दिसते तिथूनच आहे पावल्याची वाट. ओढा पार करून वाट रानात शिरली. 

काही अंतर जाताच डाव्या हाताला रजपे पाचखडक पाडा बाजूने येणारी वाट. एक लहानसे टेपाड चढून आल्यावर वन विभागाने घातलेले कुंपण. इथून पुढे वाट मळलेली अगदी काही ठिकाणी झाडांवर मार्किंग केलेले. वाटेत लहान मोठे ओढे, इथे एक गोष्ट चांगली की वन विभागाने या भागात लहान लहान का होईना दगडी बांध घातले आहेत. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’.. 

दाट रानातून वाट चढणीला लागली, अगदी पहिल्या गिअर मध्ये. थोडं वर येताच मोकळीक मिळाली. खाली धनगरवाडा समोर रानमळा ते जामरुख टेकडी पासून कोथळीगड, कौल्याची धार पर्यंत सारं सहज नजरेत. 

रात्री थोडफार पाऊस झाल्याने आजची हवा वाहती व एकदम स्वच्छ प्रसन्न वातावरण. शेवटच्या टप्प्यात कातळाला बिलगून वाट प्रशस्त मोठ्या खडकावर आली. एकदम सपाट अशी जागा इथेच सोबत आणलेला नाश्ता करायला थांबलो. 

खरे साहेब, अजयराव यांच्या सोबत बरेच ट्रेक झाले त्यामुळे वेव्ह लेंथ जुळलेली, पण ही पुणेकर मंडळी.. दिलीप भाई सोबत अलेक्झांडर रामबाग झालेला त्यावेळी नलावडे काका आणि पुजारी साहेब होतेच. पण आता मात्र खरी गट्टी जमली, वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असलेली ही मंडळी एकदम हसमुख व मिश्किल. हलका फुलका कॉमेडी पंच तर कायम ठरलेला. दोन वर्षांपूर्वी जुलै महिन्यात रजपेहून याच वाटेने आलो होतो. तेव्हाचा धुव्वाधार पाऊस चांगलाच लक्षात आहे. असो.. दहा मिनिटांची चढण संपवत पदरात दाखल झालो. काही अंतरावरच पाण्याचं पुरातन टाकं. 


इथून साईड व्यू मुळे पदरगड काहिसा लिंगाणा सुळक्या सारखा दिसतो. आम्ही इथवर आलो त्या वाटेला पावल्याची वाट म्हणतात. पदरगडाला उजवीकडे ठेवत वळसा घालून निघालो पुढे खांडस कडून येणाऱ्या गणपती घाटाच्या वाटेला लागलो. भीमाशंकरसाठी खांडस काठेवाडी कडून गणपती घाट आणि शिडी घाट दोन्ही सर्रास वापरले जाणारे मार्ग. कड्याजवळ जाऊन शिडी घाटाची वाट पाहिली त्याच रेषेत उत्तरेला सिद्धगड डोकावला तर वर नागफणी आभाळाला भिडलेले. गणपती घाटाच्या प्रशस्त वाटेला पदरगड पायथ्याच्या भागात उजवीकडे एक विहीर लागते. त्याच्या थोडं पुढे गेल्यावर पदर वाडी भिमाशंकर कडे जाणारी मुख्य वाट सोडून उजव्या हाताला पदरगडाची फारशी न मळलेली वाट धरली. आता पर्यंतचा रेपो पाहता पदरगड ही करून टाकावा असं वाटलं. सोबत गरज लागली तर रोप ही होताच. पुजारी साहेब आणि योगेश चौरी तर हट्टाला पेटले. काय तो फेवरेट डायलॉग, "आमचं ठरलंय.. मुख्यमंत्री आमचाच" तसाच "पदरगड आपलाच". चला बघू काय ते.. पण काही वेळातच जोरदार पावसाला सुरूवात झाली, त्यात वाटेत काही ठिकाणी झालेली पडझड. 

वेळ आणि पुढचा पल्ला पाहता अशा पावसात पदरगड लवकरात होणं शक्य नव्हते. तसेही मुख्य आकर्षण पेढ्याची घाटवाट ठरली होती… असो. 

पदरगडाला उजव्या बाजूला ठेवत वर तिरक्या रेषेत चढू लागलो या भागात ही पडझड होऊन काही लहान झाडे उन्मळून पडली होती बऱ्याच ठिकाणी मातीचा घसारा त्यात पावसामुळे पावलं टाकायला कसरत करावी लागली. वीस एक मिनिटांच्या चढाई नंतर लहान अशी आडवी वाट. याच वाटेवर पुढे कड्यालगत देवीचे ठाणं. 

शेंदूर, नारळाच्या करवंटी, कधी काळी भरलेली ओटी आणि भगवा झेंडा. थोडा वेळ ब्रेक घेतला, खाली पाहिलं तर काही गावकरी येत होते. त्यांचा देवीला नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम होता. त्यातील एकाने फोडलेल्या नारळाचा प्रसाद घेऊन निघालो. पदरगड जिथे मुख्य रांगेला जोडला गेलेला आहे त्या खिंडीच्या दिशेने कारवीच्या रानातून वाट चढू लागली. काही ठिकाणी तर कारवी कमरे पेक्षाही उंच. तीव्र चढ सहाजिकच छातीचा भाता फुलवत खिंड गाठली. पाऊस थांबून सौम्य वारा वाहत होता खिंडीत आल्यावर बरं वाटलं. 

खिंड म्हणायला अतिशय अरुंद जागा. समोर खडा पहाड त्यावर नाकड्या सारखी / धारेने जाणारी पेढ्याची वाट आणि मागे वळले तर पदरगडाच्या माथ्यावरील अरुंद चिंचोळी पट्टी. 

खिंडीच्या दोन्ही बाजूला दरी, एका बाजूला पदरवाडी भागातील जंगल तर दुसरी बाजू आम्ही आलो तो भाग. पश्चिमेला सरळ रेषेत सोबत करणारा तुंगी. त्या पलीकडे माथेरान, पेब, चंदेरी पाऊस थांबल्यामुळे काही ठिकाणी शुभ्र ढगांची गर्दी. बराच वेळ तिथे सारे फोटो काढत बसलो. कुणीतरी घड्याळात पाहून वेळेची जाणीव करून दिली.

      पेढाच्या घाटाचे ढोबळमानाने दोन टप्पे करता येतील. पहिला टप्पा पदरगड पायथा ते पदरगड व त्याला जोडला गेलेला डोंगर जिथे मुख्य रांगेला छेदते ती खिंड. तर दुसरा खिंड ते माथ्या पर्यंतची चढाई.

      आता आमची दुसर्या टप्प्यांला सुरुवात झाली. उजवी डावी दोन्ही बाजूला दरी, धारेवरील चढ अंदाजे पंचेचाळीस अंशाहून अधिक तीव्र. सरत्या पावसाचे दिवस वाटेला झुडपी आणि कारवीचे प्रमाण अधिक काही ठिकाणी तर वाट नक्की आहे ना? असा विचार मनात यायचा. लहू त्यातून शिरत झोडपत जाई त्याच्या तर पाया खालचा हा नेहमीचा मार्ग. वीस पंचवीस मिनिटात थोडं बाहेर आलो, खाली मागे वळून पाहिलं तर पदरगड बराच खाली व तीव्र उतरण असलेली आम्ही आलो ती वाट. 

वर पहावं तर माथा अजुनच उंच, नक्की किती राहिलंय याचा विचार न करता घाटाची मजा घेत निघालो. असेच वर जात एके ठिकाणी उजवीकडे वळलो. तिरकी चढाई करत अती अरुंद वाट, जेमतेम पाऊल मावेल ऐवढी. डावीकडे कडा उजव्या बाजूला खोल दरी. तसेच काही अंतर जाताच, कड्याला लागून उंबराचे झाड अवघड अशा जागेवर वारा सोबत हेलकावे खात ऊभे. त्या झाडा जवळचा कातळटप्पा सावकाश पार करून वरच्या पातळीवर आलो. सुदैवाने पाऊस थांबला होता अन्यथा भर पावसात दृष्टीभय असलेली हि अरुंद ट्रेव्हर्सी पार करणं काहिसे अवघड.

      मला तर ‘पेढ्याची वाट’ व ‘पाथरा घाट’ दोघांमध्ये काही प्रमाणांत साम्य वाटले. दोन्ही ठिकाणी मुख्य रांगेला काटकोनात लागून उंचीने लहान असलेला डोंगर. त्या ठिकाणी खिंडी अलिकडे असलेले देवीच स्थान. पुढची थरारक अनुभव देणारी नाकड्या किंवा धारेवरील चढाई, एक्सपोज असे ट्रेव्हर्स. हा चाल कदाचित पाथरा घाटाची जास्त असावी.. पण या दोन्ही घाटवाटेचा ट्रेक हा खुपच सुंदर अनुभव. असो..

      ट्रेव्हर्स संपवत वाट अलगद माथ्यावर घेऊन आली. एका बाजूला लहान टेकडया त्यांच्या पल्याड नागफणी फार दुर नसावे, तर दुसरी कडे गवताळ पठार. गार वाहता वारा त्यावर डौलनारे गवत आणि आजुबाजुचा आसमंत. पावसाने विश्रांती घेतली असल्यानं उलगडला भव्य देखावा. समोर तुंगी पासून पाठिमागे चंदेरी, पेब, माथेरान तशीच नजर डावीकडे फिरवली असता मुख्य रांगेत ढाक कुसुरची पठारं, कोथळीगड, नाखिंडा त्यावरील पवनचक्की ते अगदी बाजुला खेतोबा कमळजाई पठार तिथून आंबेनळीचे दिसणारे रौद्र रूप. खरंच असा भला मोठा नजारा पाहून आमच्याही अंगात वारा शिरला त्या स्वच्छ वातावरणात पेढ्याच्या वाटेने दिलेले हे बक्षिस स्विकारून आम्हीही बेधुंद होत नाचलो. 

      आता पुढचा पल्ला होता कमळजाई मंदीर. आमच्या समोरच होती तिथून उतरणारी आमची आंबेनळीची वाट. पण तिथवर जाण सोप नव्हते त्यासाठी होती ती पुर्ण अर्ध वर्तुळाकार फ़ेरा घेत घाटमाथ्यावरील चाल. अर्थात अशा वातवरणात ती चाल अजुनच रंगतदार यात शंकाच नाही. अधेमधे उन पावसाचा खेळ. गवताच्या पात्यांवर थेंबाचे मोती. जिकडे तिकडे हिरव पिवळं, सोनकी ऐन भरात तिच्या जोडीला घाणेरी, जांभळी मंजिरी, गौराई. माळावर एका बिळातून दुसर्या बिळात तुरुतुरु तिरपी जाणारी असंख्य खेकडे, दरीत झेपावणारे अनेक लहान मोठे ओढे. सारेच धुंदमय...

    

        
        या भागात सुध्दा दगडी रचाई करून घातलेले बांध. पुढे जात मधूनच डावीकडची टेपाड पार करून नागफणीकडे जाता येतं अस लहू म्हणाला. आमचे टारगेट वेगळे होते. 

मजल दरमजल करत रानात शिरलो हिरडा, अंजन, जांभूळ, पिसा, आंब्या ई. सारखी मोठी झाडे त्यावर लगट करणारी महाकाय वेली. टिपिकल भिमाशंकर...सदाहरीत जंगलातून जाणारी तांबडी पायवाट सर्वच ऋतुत भुलवणारी. मोकळ वनात आलो निवांत असणारी गुर्ं आम्हाला पाहून दचकली. 

चला गुरे गुर दिसली म्हणजे वस्ती जवळ आली तर. पुन्हा दाट जंगलात शिरलो डावीकडून भिमाशंकरहून येणारी वाट मिळाली. थोडक्यात ट्रेकर मंडळीचा लोणावळा भिमाशंकर हायवे. इथून उत्तरेला भिमाशंकर, तासा दिडतासाची रमणीय अरण्यचाल. साक्षी विनायक, गुप्त भिमाशंकर काहिसं आड बाजूला असलेले हनुमान तळ पाहत खास अनुभवावी अशीच.       

     कमळजाई मंदीराजवळ दुपारचं जेवण करायचं ठरवलं होतं पण तिथे पोहचे पर्यंत पावसाने चांगलेच झोडपले. पेढ्याचा माथा ते मंदीरा पर्यंत यायला आम्हाला दिड तास लागला. पावसात तिथे जेवण करता येणं शक्य नव्हते मग म्हणालो, 'चला येळवली'.                 येळवली भिमाशंकर अभयारण्यातील हिरव्यागार डोंगरांच्या ओंजळीत वसलेली पाच पंचवीस घरांची वस्ती. वरची वाडी खालची वाडी. पावसाळी शेती, थोडेफार असलेच तर पशुधन नाहीतर पोटा पाण्यासाठी भिमाशंकर किंवा टोकावडे वाडा या भागात जाऊन लहान मोठी कामं करणं. बहुतांशी निसर्गावर अवलंबून असलेले. एकोप्याने राहत इथल्या लोकांनी वनीकरणाचे महत्व चांगलेच जपले आहे. घाटमाथ्यावरील शुद्ध मोकळी हवा तिथलीच भटक्या श्रध्दाळूना सुख समाधान व शांती देणारी खेतोबा कमळजाई सारखी अनगड राऊळं, नजरेच्या टप्प्यात भिमाशंकर डांकिन्या तर पूर्वेला खोर्यात भोरगिरी. भिमाशंकर येथे उगम पावलेल्या भिमा नदीचा जवळच असलेल्या भोरगिरी पासून पुढचा प्रवास सुरु होतो.

  

गेल्या महिन्यात सहपरिवार येळवलीत ‘खंडू बाणेरे’ यांच्याकडे येऊन गेलो होतो. त्यांच्याच घरी गेलो, पाहिलं तर घराला कुलूप. घरा समोर पत्र्याची शेड तिथेच बैठक मांडली. जेवण अर्थात घरातून आणलेले. पोटभर जेवण झाल्यावर दिलीप भाई ने श्रीखंड काढले. एवढं सगळं झाल्यावर सुस्ती येणारच, मग काय अर्धा तास पडी मारली. उठल्यावर पुन्हा कपडे ओले करायची इच्छा नव्हती जो तो पहिलं कोण निघतय तेच बघत होता त्यात लहू ने त्याच्या ओळखीच्या घरातून गरम गरम चहा आणला. त्याची तर यावेळी खरंच गरज होती. घरांच्या पत्र्या छप्परावर येणारा टपटप.. ताडताड.. आवाज यावरुन पावसाचा जोराचा अंदाज आला. असाच पाऊस राहिला तर आंबेनळी उतरणं अवघड होणार. दुसरा पर्याय खेतोबा वाजंत्री घाटाचा पण तुलनेत दूरचा आणि वेळ खाणारा त्यात गाडी ठेवलेली लहूच्या घरी. चहा घेऊन आवरत घेत निघालो. वेळ पाहिली साडेतीन वाजलेले. 

कमळजाई मंदीर जाई पर्यंत पाऊस कमी झाला हे एक बरं झालं. देवीला मनोमन नमस्कार करून पुढच्या माळावरून थेट आंबेनळी. 

  मागच्या वेळी आलो होतो, तेव्हा गंगूताई सोबत कमळजाई पठार अलिकडे झुरीच्या माळावर जात होतो. अशीच पावसाळी सायंकाळ होती. धुक्याचे लोट यायचे क्षणात दिसण बंद मग ते कमी किंवा जायची वाट पाहत अंदाज घेत पुढे सरकायचं, मोकळ्या जागेत दिशेचा अंदाज होता धुकं कमी झाले आम्ही मधल्या जंगल टप्प्यात शिरलो. मला खरतर कमळजाई पासून क्रेस्ट लाईन धरुन झुरी पर्यंत जायचं होतं पण गंगूताई तसे जाता येणार नाही असे म्हणाली. इतक्यात पावसाची जोरात सर येऊन गेली. सहसा पावसा नंतर धुकं कमी होते पण इथे पुन्हा धुकं पसरू लागले. पांढरा शुभ्र धुक्याचा लोट त्यात धुसर होत दिसणारी मोठी झाडं, त्यांची खोडं फांद्या यांचे विचित्र आकार जोडीला पानांची सळसळ. दुर क्षीण होत जाणारा तांबट पक्ष्याचा आवाज. सारंच गुढ... गंगूताईचा या भागातला भूगोल एकदम परफ़ेक्ट. झाडी भरला टप्पा पार करून बरोब्बर क्रेस्ट लाईन म्हणजेच मुख्य कड्यावर आलो. पाऊस थांबलेला धुकं विरळ झाले. खाली सार मजेशीर दिसू लागलं. फोटोच्या एका फ्रेम मध्ये डाव्या बाजूला कोथळीगड तर उजवीकडे तुंगी. दोघांच्या मध्ये होतं एक अप्रतिम दृश्य..

    दुरवर माथेरान पेबची रांग त्यावर आकाशात एका जागी स्थिर असलेले काळे ढग त्यात सुर्य किरण अडकून पडलेले. आकाशात कुठे नारिंगी तर कुठे शुभ्र धवल तर कुठे निळ्या रंगांची मुक्त उधळण. कोकणातील लहान गाव पाडे, हिरवं शिवार, उल्हास नदीचं चकाकणारे पाणी, करड्या तुंगी वर हिरव्या रंगाची छटा अधून मधून पडणारया सुर्य किरणांनी अजुनच उजळून दिसे. बराच वेळ ते काहीही न बोलता पाहत राहिलो. मोबाईलची बैटरी लो, दुर्दैवाने दोनच फोटो घेता आले त्यात नेमका कोथळीगड व तुंगी यांचा एकत्र काढलेला फोटो नंतर गडबडीत डिलिट झाला. अंदाज यावा म्हणून पदरगड सोबतचा हा दुसरा फोटो देत आहे..असो..

     

     आंबेनळी उतरायला सुरुवात केली. अगदी लहानसा झुडपांचा टप्पा पार करून मोठ्या नाळेत एंट्री मारली. पाऊस जरी थांबला होता तरी नाळेच्या दोन्ही बाजूच्या कातळ भिंतीवरुन पाण्याचे प्रवाह खाली कोसळत होते. आधीच मोठाले आडदांड दगड धोंडे त्यात ठिक ठिकाणी पाण्यामुळे निसरडे आणि शेवाळलेले. सहाजिकच तोल संभाळून उतरावे लागे. 

असे असले तरी लहू, दिलीप भाई, अजयराव, खरे साहेब झटपट उतरत गेले. मी आपला पुन्हा अती ताण येऊन टाच दुखू नये म्हणून आरामात एका लयीत. २०१७ साली झेनो सोबत या आंबेनळी ने चढाई केली होती, तेव्हा याच नाळेत घडलेला मधमाश्याचा प्रसंग आठवला. खरंच दैव बलवत्तर... 

जस जसे खाली उतरू लागलो समोर पदरगड व चढाई केली ती पेढ्याची वाट एकदम नजरेत. अर्ध्याहून अधिक उतराई झाल्यावर डावीकडे झाडीत शिरलो. पावसामुळे या भागात ही पडझड झालेली. घसारायुक्त वाट तर एका बाजूला खोलवर गेलेली नाळ. झाडीतून टप्प्याटप्प्याने उतराई संपवत मोठ्या ओढ्यात आलो. कधी ओढ्याच्या कडेने तर कधी पाणी पाहून ओढ्याला अगल बगल देत एका ठिकाणी उजवीकडे वळलो. रानातली मळलेली पायवाट वीस एक मिनिटांनी धनगर वाड्यात घेऊन आली. आल्यावर फ्रेश होऊन चहा नाश्ता घेत दिवस भराचा आढावा. मनात पुर्ण दिवसाचा खेळ अनेक वेळा रिपिट होत होता...   

अशा प्रकारे भिमाशंकर भागातील दोन वेगळ्या दमदार वाटांची दर्दी भिडू सोबत भटकंती सुफळ संपुर्ण...

 निवडक फोटो: जितेंद्र खरे 

योगेश चंद्रकांत आहिरे.

No comments:

Post a Comment

किल्ले बहुला.

 आयुष्यात पाहिल्यांदा आपल्या आर्मीला घाबरून जीव मुठीत धरून केलेला एक अविस्मरणीय ट्रेक - किल्ले बहुला.   ✍️ मेघन तारिहाळकर पाटील (चौफेर भटकंत...