Sunday, December 1, 2024

दोन चार एक पाणकोटांची स्वप्नपूर्ती

 http://sahyadrichabhatakbhavanya.blogspot.com/
शनिवार रविवार नाही निदान रविवार तरी कुठल्या तरी गडकोटांच्या, अनवट वाटांच्या किंवा आपल्या सह्याद्रीच्या कुशीत घालवावा या विचाराने शनिवारी संध्याकाळी फोनाफोनी झाली... पण सगळेच कामात व्यस्त त्यामुळे नकारघंटेचा अक्षरशः गजर चालू होता. रवी तेवढा बोलला होता जाऊया कुठेतरी, पण कुठे ते काही ठरलं नव्हतं. शनिवारी रात्री साडेनऊ-दहाच्या आसपास भेटलो आणि सुरु झाली ठिकाणांची शोधाशोध, अखेर चर्चेअंती पाणकोट करुया यावर एकमत झाल, पुनः त्यात कुठले करायचे यावर पुनः चर्चा, प्रवास, वेळ, तिथे काय बघायला मिळेल, काही अवशेष आहेत का? या सर्व प्रश्नांच्या उत्तरादाखल खंदेरी-उंदेरी ही सागरी किल्ल्यांची जोडगोळी ठरली, सोबतीला Complimentary म्हणून खुबलढा(थळचा किल्ला) निश्चित करुन सकाळी ७ वाजता भेटायच ठरवून साडेअकरा वाजता निरोप घेतला.
प्रस्थान 
निघायला सातचे साडेसात कधी झाले कळलच नाही आणि आमची गाडी मार्गस्थ झाली, आपण कुठे चाललोय ते सगळ्यांना कळाव म्हणून मुद्दाम सोशल साईट वर अपलोड टाकले, याचा एक फायदा असा झाला की अलीबागच्या मैत्रिणीने जेवायला घरीच ये म्हणत कॉल केला, ते शक्य नव्हत म्हणून नाश्ता करायला येतो सांगून तिच्या घरी पोचलो. मस्त बगा आणि करली मच्छी फ्राय आणि कालवण यावर ताव मारून पोटोबा उरकला. किल्ल्यांची थोडीफार माहिती मिळवली होती आणि बऱ्यापैकी जवळचे आणि सहज होण्यासारखे किल्ले असल्याने आमचं काम आरामात चालू होतं. साडेदहा वाजता तिचा आणि तिच्या घरच्यांचा निरोप घेत आम्ही थळ ला पोचलो(खंदेरी -उंदेरी साठी होड्या याच गावातून मिळतात) चौकशीअंती कळलं कि एका शाळेची ट्रिप आलेली आहे आणि त्यांना घेऊन एक होडी गेलीय, म्हणजे किल्ल्यावर बऱ्यापैकी गर्दी असणार(एरवी या किल्ल्यांवर कुणीच फिरकत नाही, त्यामुळे होडीवाले अव्वाच्या-सव्वा पैसे घेतात हे ऐकून होतो) तिथे एक होडीवाले बसले होते, होडीच विचारायला त्यांच्याजवळ गेलो, तर आणखी ५ जणांचा ग्रुप होडीसाठीच थांबला होता, हे बघून आम्हाला पण जरा बर वाटलं. होडीवाल्यांशी बोलताना खंदेरी ला जायचे २०० रुपये माणशी असं ते बोलले. २००,२०० म्हणजे ४०० प्रश्नार्थक नजरेने आम्ही एकमेकांकडे बघत होतो, कारण नाही म्हटलं तरी हि रक्कम मोठी होती. किल्ले तर बघायचेच आहेत, बघूया काही कमी-जास्त होतंय का म्हणत होडीवाल्यांशी घासाघीस करू लागलो आणि असं कळलं कि ४०० रुपयांत फक्त खंदेरीच होणार, उंदेरी करायचा असेल तर अजून २०० रुपये लागणार आणि वेळ फक्त एक तास(सहाशे रुपये आणि एक तास, जिथे आमचा सगळ्या दिवसाचा खर्च यापेक्षा कमी असणार होता), त्यामुळे हो बोलण्याचा पर्यायच नव्हता. त्यामुळे हे दोन्ही किल्ले पुन्हा कधीतरी बघू म्हणत तिथून माघारी फिरलो, थळचा किल्ला तिथेच होता, तो शोधण्याचा छोटासा प्रयत्न केला, पण त्या किल्ल्यावर जास्त अवशेष नाहीत आणि पुढे आता वेगळं कायतरी बघू म्हणत खंदेरी -उंदेरी-थळचा किल्ला हा दौरा बासणात गुंडाळला.

थोडासा हिरमोड होऊनच माघारी फिरलो होतो, आणि आता पुढे काय वाढून ठेवलंय याची पुसटशीही कल्पना नव्हती, गाडीवरच विचारचक्र फिरवत अलिबाग चा कुलाबा किल्ला बघूया सोबतीला सर्जेकोटही आहेच हि जोडगोळी ठरली, अकरा वाजता आम्ही अलिबाग बीच वर पोचलो, सप्तमी असल्याने आम्ही पोहोचल्याचा वेळेच्या आसपास ओहोटी असल्याने आपल्याला चालतच किल्ल्यावर जाता येईल(म्हणजे होडीचा प्रश्नच मिटला, तस अलिबाग बीचवरुन किल्ल्यावर जायला होड्या असतात आणि ११० रुपये तिकीट आकारतात). एखाद्या मंदिरात दर्शनाला भक्तांची रांग लागावी तसे जथ्थेच्या जथ्थे किल्ल्याकडे चालले होते, इतकी गर्दी बघून किल्ल्यात काय कल्ला असणार हे समजत होत. आम्ही दोघे पण त्याच जथ्थ्यातील भाग झालो होतो, फूटभर पाण्यातून चालताना मध्येच एका ठिकाणी गुडघाभर पाण्यातून जावं लागत होत, लोकांची सुमार गर्दी असल्याने भीतीचा लवलेशही नव्हता. सगळी जत्रा कुलाब्याकडे चालली होती, इथे मात्र आमच्यातला भटक्या जागा झाला आणि मध्येच वाट वाकडी करून आम्ही सर्जेकोटच्या दिशेने कूच केली.

तटबंदी, सर्जेकोट किल्ला 
तिथे किनाऱ्याला कालवांची दगडे आणि पायात बूट नसल्याने एक जरी दगड लागला तर झालं, या विचाराने जपत जपत, एक एक पाऊल सरकवत सर्जेकोटच्या तटाला लागलो. सर्जेकोटच्या तटाला प्रदक्षिणा घालत आम्ही किल्ल्यात प्रवेश केला. अवघा तीन-चार गुंठे एरिया असलेला सर्जेकोट हा कुलाब्याच्या जोडकिल्लाचा पण आणीबाणीच्या वेळी कुलाब्याच्या संरक्षणार्थ महत्वाची भूमिका बजावेल असाच(मूर्ती लहान,पण कीर्ती महान).
सर्जेकोट
कुलाब्यावर गर्दीचे लोंढे येत होते, पण सर्जेकोटवर आमच्या दोघांव्यतिरिक्त चिटपाखरूही नव्हतं. इतका वेळ पाण्यातून चालल्यानंतर आता दगडांवरून उड्या मारत ढेंगा ताणत चाललो होतो. सर्जेकोटवर पाण्याची एक विहीर आहे ती पण कचऱ्याने आणि मातीने नामशेष होण्याच्या मार्गावर चालली होती, तटावरून फिरून किल्ला आटोपता घेतला आणि पावले कुलाब्याच्या दिशेने वळली, या दोन्ही किल्ल्याने जोडणारा पूल अजूनही काहीअंशी शाबूत आहे, या दगडी सेतूवरून जाताना रामायणातील रामसेतू कसा असावा याचे चित्र डोळ्यांसमोर तरळून गेले. ज्या गर्दीला नावे ठेवत होतो त्याच गर्दीचा आता एक भाग होत आम्ही कुलाब्यात प्रवेश केला. मागच्याच महिन्यात कुलाबा केला होता मात्र तेव्हा संपूर्ण किल्ल्यावर मी आणि सोबतीला एक जण आणि अजून बाकी दुसरी १५-२० लोक होती, त्यामुळे ते कुलाबा दर्शन आणि आजच कुलाबा दर्शन यातली दरी स्पष्टपणे जाणवली. महादरवाज्यातून प्रवेश करून डाव्या हाताला लगेच भवानी मातेचे मंदिर आणि त्याच्यासमोरच पद्मावती आणि गुलवती मातेचे मंदिर आहे, या त्रिदेवींचे दर्शन घेत भवानी मातेच्या मंदिरासमोरच्या तटबंदीवर चढून किनारा न्याहाळत पुढे चालू लागलो. या तीन मंदिरानंतर उजव्या बाजूला विहीर आणि डाव्या हाताला छोट्या टपरीवजा दुकाने आहेत. त्याच्याच पुढे किल्ल्यातील वाड्या, कोठ्या, घोड्यांच्या पागा यांचे जुने अवशेष आहेत, ते पाहत पाहत डाव्या बाजूने वर चढून कमाल उद्दीनशहाच्या दर्ग्याजवळ गेलो, रविवार असल्याकारणाने बाजूच्याच गावातले लोक बोकडाचा मान द्यायला आले होते, चूल पेटलेली होती आणि बाकी त्यांची तयारी चालू होती. दर्ग्याच्या पुढे आणि मागे २ गोड्या पाण्याच्या विहरी आहेत, लांबून पाहिल्यावर त्या विहिरी नसून भुयार आहेत असच वाटत, १०-१२ पायऱ्या सरळ खाली उतरून नंतर पुन्हा डाव्या बाजूने ३-४ पायऱ्या खाली उतरल्यावर आपल्याला पाणी दिसत. सागरी किल्ल्यांवर फिरताना या अशा विहिरी खूप चर्चेचा विषय ठरतात, कारण चहुबाजुंनी खाऱ्या पाण्याने वेढलेले असून देखील आत गोड्या पाण्याच्या विहिरी.

पुढे एका दरवाजातून आत गेल्यावर मोठ्या पुष्कर्णीच्या जवळ येतो, पाण्याचा वापर नसल्याने पाण्यावर हिरव्या रंगाचा तवंग आला होता तिथून बाहेर पडल्यावर सिद्धिविनायक, मारुती आणि शिवमंदिर अशी तीन मंदिरे आहेत, तिथे जे काही पाहण्यासारखं आहे ते म्हणजे शिवमंदिरा समोरची तुळस, सहा फूट उंचीची एकसंध दगडावर कोरीव काम केलेली हि तुळस, स्थापत्य कलेचा हा नजराणा मन भरून टाकत.
तुळशी वृंदावन, कुलाबा किल्ला 
मंदिराच्या बाहेर एक दीपमाळ आणि होमकुंड देखील आहे. मंदिरातून पुढे सरळ चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या दक्षिणेला मागच्या बाजूला म्हणजे दर्या दरवाजाकडे पोचतो, एकदम सुस्थितीत असलेला हा दरवाजा पण लोकांच्या गर्दी गोंगाटामुळे मन पाहिजे असं स्थिरावलंच नाही, दरवाज्याच्या दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत, आणि बाहेर अथांग पसरलेला जलधर.
दर्या दरवाजा, कुलाबा किल्ला
दरवाजा ओलांडून तटबंदीच्या बाहेर आल्यावर पश्चिमेला अजून एक मारुती मंदिर आहे, तिकडे लोक कुणी जात नाहीत, आम्ही मात्र गेलो कारण तिथे गेल्यावर जी काही शांतता अनुभवता आली ती वेगळीच होती, आमचं हे सुख मात्र दोन मिनिटांच्या वर काही राहिलं नाही,
कुलाबा किल्ल्याचा दक्षिण भाग
एक २५-३० जणांचा गुजराती ग्रुप आमच्या मागेच मागच्या दरवाजातून बाहेर आला आणि फोटोशूट करू लागला, आणि असा काही गोंगाट-गोंधळ चालू होता कि वाटलं २-४ जणांच्या समाध्याच इथे समुद्रात कराव्यात. मनातल्या मनात त्यांचा उद्धार करतच पुन्हा किल्ल्यात शिरलो आणि पायऱ्या चढून तटबंदीवरुन चालायला लागलो, तटावरती काही ठिकाणी दगडांची पडझड झाली होती, तटावरून चालताना एका बाजूला किल्ला, एका बाजूला अथांग पसरलेला दर्याराजा आणि हिवाळ्यात सुद्धा आग ओकणारा तो दिनमणी आम्हा दोघांच्या सोबतीला होता, किल्ल्याच्या उत्तरेला आल्यावर चाके असलेल्या दोन तोफा आहेत,
चाके असलेल्या तोफा, कुलाबा किल्ला 
पुरातन अवशेष, कुलाबा किल्ला 

आणि पुढे लगेच महादरवाजाच्या वर असलेल्या ध्वजस्तंभाच्या इथे पोचलो आणि भवानी मंदिराच्या इथे पायऱ्यांवरून उतरलो अशा प्रकारे तासाभरात आमची गडफेरी पूर्ण झाली, भरतीला सुरुवात झाली होती त्यामुळे पाणी थोडं थोडं वर यायला लागलं होत, त्यातून मार्ग काढत किनाऱ्यावर पोचलो, हातात वेळ भरपूर शिल्लक होता, अजून कुठेतरी आपण जाऊ शकतो असा विचार करत, सोड्याचे २-४ घोट घेऊन रेवदंड्याकडे जायचं ठरवलं.

सोडा घेतल्यामुळे तेवढी भूक नव्हती लागली, त्यामुळे अलिबाग मधून तसेच निघून रेवदंड्याच्या इथे कुठेतरी जेऊ म्हणत रेवदंडा गाठला. रेवदंडा किल्ल्याच सर्वात मोठं आकर्षण म्हणजे किल्ल्याच्या तटबंदीला लागून असलेला किनारा, आजकालच्या प्रिवेंडिंग शूटसाठी नवीन लग्न जमलेले जोडपे फोटोशूट साठी येत असतात. चौल गावात प्रवेश केल्यावर मंदिरेच मंदिरे आणि एका ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत किल्ल्याच प्रवेशद्वार दिसत, प्रत्येक घरासमोर नारळी-पोफळीची उंचच-उंच झाडे, कोकणात आल्याची खऱ्या अर्थाने जाणीव झाली. गाडी लावून किल्ल्यात प्रवेश केला.
सातखणी मनोरा, रेवदंडा किल्ला 
किल्ल्याच्या समोरच्या प्रागंणात ७ तोफा एका ठिकाणी अस्ताव्यस्त स्वरूपात ठेवलेल्या/पडलेल्या स्थितीत आहे, समोरच सातखणी मनोरा आणि वाड्यांचे अवशेष आहेत. ते पाहून किनाऱ्याच्या दिशेने बाहेर पडल्यावर तटबंदी आणि किनारा यांचा मिलाप खरंच पाहण्यासारखा आहे. किल्ल्याची तटबंदी काही ठिकाणी खचलेली आहे, काही ठिकाणी पडझड झालेली आहे, सळसळता वारा, मध्ये मध्ये ऐकू येणारी लाटांची गाज आणि नारळी पोफळीच्या झाडांची ती सावली आम्हाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन गेली.
रेवदंडा किल्ल्याची तटबंदी आणि किनारा 
भुकेचा अजूनही काही पत्ताच नाही आणि का कुणास वेळ आज आमच्या सोबतीला होता, कुठे घाई नाही गडबड नाही, निवांत आरामात आमचे आतापर्यंत सर्जेकोट, कुलाबा-रेवदंडा हे किल्ले मनसोक्त फिरून झाले होते.
 रेवदंडा किल्ल्याच्या तटबंदीवर बसून समोर कोर्लई किल्ला न्याहाळताना 
घड्याळाचे काटे अवघे अडीच वर स्थिरावले होते, त्यामुळे रेवदंड्याच्या किनाऱ्यावरून खुणावणाऱ्या कोर्लईचे वारे आता मनात भिरभिरू लागले, आणि गाडी कोर्लईच्या दिशेने मार्गस्थ झाली.

इतके किल्ले पाहून होत असल्यामुळे खंदेरी-उंदेरी-थळचा किल्ला न पहिल्याच शल्य मनातून गेलं होत. रेवदंडा-मुरुड रोडवरून जाताना कुंडलिकेचा पूल ओलांडून एका फाट्यावर आलो आणि तिथे मैलाच्या दगडावर जवळपासच्या ठिकाणांचे अंतर लिहिलं होत आणि त्यात नजरेत भरलं ते मुरुड ३०किमी आणि आमच्या दोघांच्या मनात कालवाकालव झाली. रात्री प्लॅन ठरवताना जो मुरुड-जंजिरा आम्हाला खूप लांब झाला होता तो अनपेक्षितपणे अवघ्या ३० किमीवर होता आणि वेळेचं गणित आमच्या हातात होत, त्यामुळे कोर्लईचं लांबूनच दर्शन घेत नकळत साकार होत असलेलं स्वप्न डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होतो. मुरुडला जातोय तर पाटील खानावळीत ताव मारायचा या आणि अशा अनेक विचारात असताना एक असा काही खड्डा लागला कि ब्रह्मांड आठवलं. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती, आणि किल्ल्यात जायला होडी मिळेल का? सगळा किल्ला फिरून होईल या विचारात ठरवलं कि जेवायचं नंतर बघू अगोदर किल्ल्यांची जी भूक लागलीय ती क्षमवुया. जंजिरा किल्ल्यावर जायला दंडा -राजपुरी इथे होड्या मिळतात हे मला माहीत होत, पण एका स्थानिकाला विचारल्यावर त्यांनी जवळ असलेल्या खोरा-एकदरा इथे जायला सांगितलं, तिथे पोचायच्या लांबूनच होडीत माणसं चढताना पाहून आपण आल्याची वर्दी म्हणून रवीला हॉर्न वाजवायला सांगितलं. गाडी लावून तिकीट काउंटर वर जातोय तर स्वागतादाखल ते काकाच स्वतः तिकीट घेऊन बाहेर आले आणि आम्ही होडीत बसून सुटकेचा निःश्वास टाकला.

होडीत बसून काही वेळ आम्ही दोघेही शांतच होतो, होडी सुरु झाली, किल्ल्याच्या जवळ जाताना मन अक्षरश: भरून आलं होत. जंजिऱ्याच ते अजिंक्य, रांगडं रूप पाहून डोळ्यांचं पारणं फिटलं होत.
जंजिरा किल्ला

किल्ल्यात प्रवेश केल्यावर मात्र आमच्यावर एक बॉम्ब पडला, असं सांगण्यात आलं कि ४५ मिनिटात किल्ला फिरून यायचा, ४५ मिनिटात होडी सुटेल, २२ एकरचा किल्ला आणि खूप साऱ्या अवशेषांनी परिपूर्ण असा आणि पहिल्यांदाच आलेलो आणि फक्त ४५ मिनिटे आतापर्यंत आमच्या कलाने चाललेलं वेळेचं गणित आमच्या सोबत नव्हतं, खूप विचार घुमू लागले कि कसा होईल किल्ला बघून वगैरे. "चल सुटुया जितका बघता येईल तितका बघू" असं म्हणत रवीने आवाज दिला आणि आडवाटेला घुसून तटबंदीवर चढलो. ४५ मिनिटांचं गणित असल्याकारणाने लोक किल्ल्याचा अवघा १/३ भाग बघून परत येत, आणि आम्ही लोक जातात तिकडे न जाता दुसऱ्या बाजूने किल्ला बघायचं ठरवलं. धावत-पळत तटबंदी बुरुज बघत फोटो काढत त्या जंजिऱ्याच अजिंक्य रुपडं जस साठवता येईल तस साठवत होतो. खूप साऱ्या तोफा, सुस्थितीत असलेली तटबंदी-बुरुज, फक्त आम्ही फिरत असलेल्या भागात गवताचे रान माजले होते, तटबंदीच्या खाली देखील चालण्यासाठी भाग होता, परंतु वेळेअभावी आम्ही मनावर दगड ठेवून तिकडे जाण्याचं टाळलं. तटबंदी-बुरुज, तटबंदी-बुरुज सोबतीला ते अजिंक्य अवशेष, तटबंदीला आदळणाऱ्या लाटांचे आवाज, वाऱ्याची सळसळ, आणि किल्ला पाहण्याच्या आसक्तीने न जाणवणारा तो कडक ऊन. या सर्वातून जाताना तटबंदीवरुन वाकून बघितलं तर दरवाजा आहे असं दिसलं. इकडे आता कुणीच नसणार याची ५००% खात्री होती, आणि कुलाबा किल्ल्यावरील गर्दी मुळे एक सुद्धा फोटो न काढता आलेल्या त्या दर्या दरवाजाचे आणि जंजिऱ्यावरील या दरवाजाचे तुलनात्मक चित्र तरळले.
दर्या दरवाजा, जंजिरा किल्ला 
जंजिरा किल्ल्याचा दक्षिण भाग 
दरवाजातून बाहेर येऊन तो सिंधुसागर आणि जंजिरा न्याहाळताना एका विलक्षण स्वप्नपूर्तीचा आनंद मनाला संवेदून गेला, ४५ मिनिट आता जरी संपली तरी चालतील इतकं सुख त्या दर्यादरवाजाने दिल होत. २५ मिनीटे झाली होती एव्हाना जुन्या वास्तूंचे अवशेष डोळ्यात साठवत पावलांना अक्षरशः भिंगरी लावल्यागत आम्ही वाट तुडवत होतो.

आता मात्र लोकांचे आवाज यायला लागले, आणि आडोशाला कुठे कोपऱ्यात नवंनवं प्रेम फुलताना दिसत होत. एका ठिकाणी विहीरिवर पाणी भरताना एक मावशी दिसल्या, विहिरीवर जावं म्हणून तटबंदीवरुन खाली उतरायला पायऱ्या शोधत खाली उतरलो, वाटेत त्या जुन्या वास्तूच्या खिडक्यांवरील, भिंतींवरील नक्षीदार कमानी लक्ष वेधून घेत होत्या, त्याच्या पुढे एक वाट खाली गेली होती, बघायला म्हणून तिकडे उतरलो तर एक छोटा दरवाजा होता, भुयारासारखाच असल्याने जोरात वारा वाहत होता.
बालेकिल्ला, जंजिरा किल्ला 

विहिरीवर जाऊन मनसोक्त पाणी पिऊन राहिलेल्या १० मिनिटांचा फडशा पाडायला आम्ही सज्ज झालो, तलाव, तलावाच्या बाजूला छोटे हौद तिथून बालेकिल्ला, बालेकिल्ल्यावरील तोफ, आम्ही दोघे आणि त्या आसमंतात दिलेली शिवगर्जना... परतीला लागलो तर वर येणाऱ्या एका ग्रुपने पुन्हा शिवगर्जना देण्याची विनंती केली, त्यांच्या विनंतीखातर शिवगर्जना देऊन आता धावतच खाली उतरलो कारण होडी गेली तर काय होईल याची काहीच कल्पना नव्हती. या सगळ्या धावपळीत जंजिऱ्या किल्ल्यावर असणारी भारतातील तिसऱ्या क्रमांकाची तोफ कुठे आहे हे काही कळलंच नाही, कारण बालेकिल्ल्यावर असलेली आणि इतर तोफा बाकी किल्ल्यांवर असलेल्या तोफांएवढ्याच होत्या.
बालेकिल्ल्यावरून दिसणारे दृश्य 
वाड्यांचे वगैरे अवशेष बघत किल्ला आटोपता घेतला आणि होडीच्या इथे आलो तेव्हा ५० मिनिटे झाली होती, आणि आमच्या डोळ्यांसमोरून आमची होडी गेली, अवघ्या २-३ मिनिटांमुळे आमची होडी गेली होती. होडीतून उतरवायला जी माणसे असतात त्यांनी सांगितले कि थांबा म्हणून. मनात मात्र आता प्रश्नांची सरबत्ती चालू झाली. त्यातला एक जण बोलला कि १५-२० मिनिटे जा फिरून या पुढच्या होडीने पाठवतो तुम्हाला, तेव्हा बर वाटलं आणि अजून १५-२० मिनिटांचा वेळ भेटल्याने स्वारी अजूनच खुश,. किल्ल्याचा राहिलेला भाग पूर्ण करायचा म्हणून तटबंदीवरुन वर चढलो आणि समोर ३ मोठ्या तोफा दिसल्या.
कलालबांगडी तोफ,जंजिरा किल्ला 
त्यातली जी सर्वात मोठी होती तीच महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाची कलालबांगडी तोफ(पहिली घारापुरी येथे, तर दुसरी दौलताबाद किल्ल्यावर आहे).


भूक लागल्याची चिन्हे आता जाणवायला लागली होती, कुठे तरी खायला थांबूया म्हणत राहिलेला किल्ला पार करत मघाशी पाहिलेल्या भुयारातील दरवाज्याच्या इथे जाऊन त्या दरवाजात बसलो, काकडी-करंजीवर ताव मारून तो अरबसागर न्याहाळत आम्ही बसलो होतो, समोरच आम्ही जिथून आलो ते खोरा-एकदरा बंदर दिसत होता, मच्छीमारांच्या होड्या मध्येच जाताना दिसत, तिथली ती शांतता, वारा, समोर दगडांवर आदळणाऱ्या लाटा, आणि मग दगडातून खेळणार ते पाणी. जंजिऱ्याच ते अद्वितीय रूप ओतप्रोत ओसंडून चाललं होत. इथून कुठे जाऊच नये अशा विचारात ब्रम्हानंदी टाळी कधी लागली कळलंच नाही. १५-२० मिनिटे तिथेच बसून होतो, शब्दात आता मांडता येत नाही पण वेगळंच सुख, एक वेगळीच अनुभूती तिथे मिळाली. इच्छा नसतानाही तिथून उठून होडीच्या दिशेने निघालो कारण आता एव्हाना संध्याकाळ व्हायला आली होती आणि अगोदरच एक होडी चुकली होती. पण बघाना ४५ मिनिटांचं गणित जे जमत नव्हतं तिथे आमची होडी चुकल्याने आम्हाला अजून वेळ मिळाला आणि किल्ला पाहता आला. आता मात्र आमची गंमतच झाली, होडीसाठी आलो आम्ही पण परत आमची होडी चुकली होती, हसावं कि रडावं काही कळत नव्हतं, एक मात्र खर जे होत ते चांगल्यासाठीच म्हणूनच कि काय किल्ला पाहण्याची ती मनापासूनची आस खरंच पूर्ण झाली होती, होडीवाला तो माणूस पण चांगला मिळाल्याने २ होड्या चुकल्यावर देखील ते आम्हाला काही बोलले नाही, आता तिथेच त्यांच्याशी गप्पा मारत पुढच्या आलेल्या होडीने किनाऱ्याकडे मार्गस्थ झालो, सूर्यनारायण खाली गेले होते किनाऱ्याला पोचून एक वाफाळता चहा घेऊन साडेसहा वाजता जंजिऱ्याचा निरोप घेत खोरा-एकदरा गाव सोडल.
वाफाळता चहा आणि समोर धूसर जंजिरा 
मुरुड-रोहा-नागोठणे-वडखळ-पेण-उलवा असा रस्ता ठरवून मार्गस्थ झाले, या प्रवासात एक विचार आला कि दिवसभर आपण जेवलोच नाही, सकाळी अलिबागला सुविधाने दिलेल्या पोटभर नाश्त्याने आम्ही आजचा दिवस काढला. अन्नदाता सुखी भव: म्हणत तिला आणि तिच्या घरच्यांना कृतकृत्य करत वळणावळणांचा, अंधारातला निर्मनुष्य रस्ता कापत मध्ये एक चहा-वडा ब्रेक घेऊन १० वाजता घरी पोचलो .मी आणि रवी दोघांनी एका दिवसात अनपेक्षितपणे केलेले सर्जेकोट-कुलाबा-रेवदंडा-जंजिरा हे चार किल्ले खूप काही देऊन गेले. एका विलक्षण स्वप्नपूर्तीचा तो क्षण, भरून आलेलं ऊर, दिवसभराचा तो प्रवास, ते साखळीने होत गेलेले एकेक किल्ले, शब्दांच्या जागी आता मनात फक्त एकच विचार
स्वप्नपूर्ती, स्वप्नपूर्ती आणि स्वप्नपूर्तीच....
साभार,
सह्याद्रीचा भटकभवान्या.
कुलाबा किल्ल्यातील विहीर 

पुष्कर्णी, कुलाबा किल्ला 

दीपमाळ, कुलाबा किल्ला


विहीर,जंजिरा किल्ला 

जंजिरा किल्ल्यात येणारे गर्दीचे लोंढे







तटबंदी, रेवदंडा किल्ला 


जंजिरा किल्ला
जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर थांबलेल्या होडया 

जंजिरा किल्ल्यातील अवशेष 



भटके
महत्वाची सूचना:गडकिल्ल्यांवर फिरताना कृपया खालील चित्रामध्ये दिलेले संकेत काळजीपूर्वक पाळा आणि आपल्याला, सह्याद्रीला, गडकिल्ल्यांना आणखी हानी होण्यापासून वाचवा.

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...