Sunday, December 1, 2024

घोटीचा घाट आणि दारचा माळ.

http://ahireyogesh.blogspot.com/2022/04/ghoticha-ghat-daracha-maal.html

          होळीचा विकेंड कौटुंबिक सहल, नंतरचा विकेंड गुढीपाडवा. यात पंधरवडा गेला व ट्रेक काही झाला नाही. राजमाची व ढाक बहिरी परिसरातील दारचा माळ उर्फ लगीन माळ आणि घोटीचा घाट खुप आधी पासून बकेट लिस्ट मध्ये होता.

यंदा तो योग जुळून आला. शनिवारी सकाळीच सांडशी त दाखल झालो.  यंदा माझा जुना मित्र "प्रशांत", कधीकाळी आम्ही एकत्र ट्रेक करायचो आणि सोबत त्याची मुलं "सायली" व "बाळू" होती. घोटीचा घाट हा दारच्या माळ या घाटाच्या तुलनेत काहिसा दुर्गम. कधीकाळी राबता असलेला पण सद्य स्थितीत या वाटेवर खुद्द गावकरींचा वापर नसल्यात जमा. अवघड ते प्रथम या अनुषंगाने घोटीचा घाट चढाई करण्याचे ठरले. 

 बहीरी कडे पाठ करून मांजरसुंभाची दिशा धरली.  नऊचा सुमारास ऊन चांगलेच जाणवू लागले. ठाकुरवाडी, सालपे मागे टाकली. 
 हुश्श आणि पाणी पाणी करत मुलं पहिला टप्पा तासाभरात चढली. इथून मांजरसुंभाच्या खालच्या पदरातून उजवीकडे वळून आडवी मारायची. पदरातलं रान व झाडोरा बक्कळ माजलेलं. 
डोक्यावर हिरवीगार सावली, पायाखाली गळालेल्या पानांची करकर जोडीला बुलबुल कोकीळ आणि फेवरेट तांबट पक्ष्याचा आवाज. जसं आत जाऊ लागलो तशी वाट अस्पष्ट होत गेली फक्त दिशा अचूक पकडून झाडीतून थोडफार उजवं डावं करत पुढे सरकत होतो. सोबतच्या मामांचा या भागातील भूगोल एकदम पक्का त्यामुळे चुकण्याची शक्यता नव्हतीच. मजल दरमजल करत थांबे घेत मुख्य चढाईला भिडलो. 
साठ सत्तर अंशातील खडी चढाईत कारवीचाच काय तो आधार. अंतिम टप्प्यात वाट काहीशी एक्सपोज त्यात चढण तीव्र हे कमी की काय सोबत फुल्ल स्क्री फ्री... सावकाश ते पार करत माथ्यावर आलो. मुलांनी हा काहिसा अवघड टप्पा व्यवस्थित पार केला. 
आता समोर आले ते राजमाचीचे श्रीवर्धन व मनरंजन अर्थातच आमच्यात व राजमाचीत मोठी दरी. आमचे टार्गेट मुक्काम पोस्ट वळवंड. तिथवर जाणं सहज सोपं नव्हतं. लहानसे पठार मग एक टेपाड व दरी पार करून लोणावळा राजमाची वाटेवर आलो. काही वेळ वाटेवर जात आणखी एक टेकडी पार करून पूर्वेस लोणावळा वळवंड रस्यावर आलो. याच रस्त्याच्या वरच्या अंगाला वळवंड ठाकूरवाडी. 
 
शिरोटा जलाशयाच्या काठावर वसलेली आटोपशीर स्वच्छ अशी वाडी. राजमाची वरून सुर्यास्त अनेक वेळेस पाहिला पण इथून राजमाची मागे होणारा सुर्यास्त त्याचा नजारा भारीच. 
मुलं पण सारं अनुभवत भलतीच खुश होती. शुक्ल पक्षातील अष्टमी चंद्र प्रकाशात पडवी बाहेर गार हवा खात झोपी गेलो. 

   

सकाळी कोंबड्यांनी लवकरच झोपमोड केली. पूर्वेस तांबड फुटू लागलं. शिरोटा जलाशय पलीकडील डोंगरावर तसेच विरूद्ध दिशेला राजमाचीवर धुकं जमलेलं. 

कुठे दुपारचे चाळीस डिग्री आणि आताचं एकदम गारेगार वातावरण. सारा निसर्गाचा खेळ. 
आवरतं घेत परतीच्या प्रवासाला सुरूवात केली. दोन किमी रस्त्याने जात वळवंड गाठले. उधेवाडी सारखंच छोटं टुमदार गाव. भवानी मातेचं व बाजूला मारुतीरायाचे मंदिर. 
भटक्या मंडळीला मुक्कामाला आवडेल असाच मंदिर परिसर. गाव मागे टाकून उत्तरेला शेताडीतून चालू लागलो. वरच्या बाजूस कोंडेश्वरची वाट (लोभी हायवे) सोडून आमचं ठरलेलं टार्गेट घाटवाट दारच्या माळाला लागलो. राजमाची मागे पडून मांजरसुंबा डावीकडे ठेवत पुढे सरकू लागलो. 
राजमाची व ढाक बहिरी या दोन्ही मध्ये सह्यशिरोधारेवर मोक्याचं स्थान पटकावून असलेला हा मांजरसुंभा डोंगर. बहिरेच्या गुहेतून या मांजरसुंभाच व राजमाचीचं होणार दर्शन भारीचं. असो... मांजरसुंभा डावीकडे ठेवत त्याला चिकटून वाट झाडी भरल्या दरीत उतरू लागली. अगदी प्रशस्त मळलेली वाट नागमोडी वळणं घेत टप्पा टप्याने खाली उतरत गेली. छोटासा आडवा पॅच मारून झाडीतून बाहेर आलोच तर समोर महाकाय ढाक बहिरी त्याचं लाबंलचक पठार. 
खाली सालपे, सांडशी, माणगाव आसपासचं कोकण तर दुरवर डोळे बारीक करून माणिकगड, इरशाळगड, प्रबळगड व माथेरान नजरेत आले. रमत गमत दिड दोन तासात पदरात म्हणजेच माळात आलो. मामांनी याच माळावर असलेल्या बारमाही पाण्याचा जागे बद्दल सांगितलं. थोडा वेळ जाणार पण हरकत नाही, पाणवठा बघायलाच हवा. या दिवसात तर ट्रेक करताना पाण्याचं महत्त्व कसलेल्या भटक्यांना सांगायची गरज नाही. 
काही अंतर आडव जात वाट मोठ्या ओढ्यात उतरली. याच ओढ्यातून पंधरा ते वीस मिनिटाची चढाई पाण्याच्या बारीक धारेवर घेऊन आली. कातळाच्या उभ्या भिंतीतून पाणी पाझरत खाली लहानसे खळगं स्वच्छ आणि थंड पाण्याने भरलेले. 

पोट भरून ते गार पाणी आम्ही सारेच प्यायलो. पुन्हा कसरत करत तो ओढा उतरून मुख्य वाटेवर आलो. झाडीभरल्या वाटेचं एक टेपाड उतरून पुढे जात उजवीकडून बहिरीच्या घाटाची वाट येऊन मिळाली. एकत्र होत वाट अधिक मोठी वाटू लागली. त्यात या अधिक मळलेल्या वाटेवर गोळ्या बिस्किटं विमलचा कचरा होताच. तसेच काही अंतर मोकळवनातून जाताच आणखी एक वाट उजवीकडे दिसली ती म्हणजे सवाष्णी घाटाची थेट कोंडेंश्वरला जाणारी वाट. ऐन सोनकी बहरात असताना केलेल्या या ट्रेकची आठवण आली. http://ahireyogesh.blogspot.com/2018/10/savashni-kondeshwar-bahiri.html 

आता धोपट वाटेने बहिरीच्या पदराला वळसा घालून सुभेदार धबधबा डाव्या हाताला ठेवत उतरू लागलो. वाटेत एके ठिकाणी कोवळी करंवद आणि कैर्या पाडल्या. बाळू यात लीड घेऊन होता. तितकाच  विरंगुळा आणि विश्रांती थांबा झाला. 


शेवटच्या टप्प्यातील विरळ झाडी पुढे पूर्ण बोडक्या सोंडेवरची उतराई जीवावर आली. या दिवसात उन्हामुळे धुप होते. आधीच तीव्र उतरण व स्क्री असलेली वाट अधिकच खराब स्थितीत. मुलांना या टप्प्यात उतरवताना फार वेळ गेला. मुबलक पाणीसाठा असूनही अशा वातावरणात ते गरम झाले. तरी तसेच थोडथोड पाणी घेत एकदाचे उतरलो. शेवटी ठाकुरवाडी जवळ येताना मागे वळून पाहिलं तर राजमाची मांजरसुंभा वळवंड ढाक सारा इथला सह्यपसारा. 
 या सोबत आमचं साधारण बावीसशे फुट चढाई उतराई आणि वीस किमी चाल असं वर्तुळ पुर्ण झालं याचा आनंद व समाधान काही औरच. 

                                                                                             योगेश चंद्रकांत आहिरे


No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...