https://dhawalbhangale85.blogspot.com/2019/07/blog-post.html
माझ्यामते
जगामध्ये तीन प्रकारचे खरे ट्रेकर्स असतात. तीन.
एक
म्हणजे ज्यांना ट्रेकिंग करून आनंद मिळतो, सॅटिसफॅक्शन मिळतं, ज्यांचा आनंदच ट्रेकिंग मध्ये सामावलेला असतो, हॅप्पीनेस मोड वाले ट्रेकर्स. दुसरे म्हणजे थोडी वेगळी कॅटेगरी, ज्यांना अर्थातच आनंद तर मिळतोच पण
ते तेवढ्यातच सॅटीस्फाईड नसतात, त्यांना जास्त स्वारस्य असतं ते शोधण्यात !!! काय
शोधण्यात ? तर काहीही, नवीन
जागा, नवीन रस्ता, इतिहास, पुरातन वास्तू, वगैरे वगैरे, एक्सप्लोरेशन मोड वाले ट्रेकर्स.
लक्षात
घेऊया हे दोन्ही कॅटेगरीतले
ट्रेकर्स खरे ट्रेकर्सचं आहेत हां, सो कॉल्ड "पावसाळी
बेडूक" वगैरे नाहीतचं. कोणत्याही ऋतूत ह्यांचे मोड ऑनच असतात.
आता
हॅप्पीनेस मोड वाले ट्रेकर्स, जर म्हटलं तर
आनंदासाठी ट्रेक करतातच पण म्हटलं तर
ट्रेकच्या प्रत्येक गोष्टीत आनंद शोधतात, अगदी तय्यारी पासून ते समारोपापर्यंत. ह्यांचं
असं असतं कि जरा रोजच्या
जीवनातून वीक-एंड मिळाला किंवा रुटीन मधून वेळ मिळवला ( आता तो कसा मिळवावा
हा बोलण्याचा एक वेगळा विषय
पण बनू शकतो, हे लोक या
विषयात भयंकर पारंगत असतात ), हां तर काय, वेळ
मिळवला कि चार डोकी
शोधायची, बॅग भरायची आणि निघायचं शेवटची किंवा पहिली ट्रेन पकडून ट्रेकला. हॅप्पीनेस मोड वाल्या ट्रेकरला अजून एक गोष्टीत आनंद
वाटतो, तो म्हणजे आपल्याला
चावलेला तो किडा दुसऱ्याला
चाववायला. ह्यांच्या नादाला लागून अजून एखादा / एखादी ट्रेकिंगसाठी खुळा / खुळी झाला / झाली की हा / ही
पठ्ठा / पठ्ठी खूष. ट्रेकला जातांना सगळे वेळेत आले, ट्रेक ठरल्या बरहुकूम अगदी झाला, व्यवस्थित वाहन मिळालं, वगैरे सारख्या गोष्टी ट्रेकचा आनंद दुप्पटीने वाढवतात. गेल्या ट्रेकला चार जण गेलेलो आणि
ते ऐकून या ट्रकला दहा
जण जमा झाले यातही ही मंडळी आनंद
मिळवतात. हॅप्पीनेस मोड.
पण एक्सप्लोरेशन वाल्यांचं थोडंस वेगळं असतं. ह्यांची एक्सप्लोरेशनची अँटेना नेहमीच ऑन असते आणि
त्यासाठी त्यांना विकेंडची ही गरज लागत
नाही, खरतरं तो नकोच असतो.
नसेल विकेंड तर सरळ ट्रेकचं
कारण सांगून सुट्टी घेऊन (बरंका मागून नाही हां) निघणाऱ्यांची हि जमात. साधारणपणे गर्दीचा ह्यांना तिटकारा, मग कधी दहा
लोकं ही सुद्धा यांच्यासाठी
गर्दीच. या लोकांची आनंदाची
व्याख्याच वेगळी असते, भयंकर पायपीट झाली, उन्हात अंगाची काहिली झाली, जायला यायला आरामशीर वाहन नाही मिळालं, डास-माश्यांनी हैराण केलं, झोप अपूर्ण झाली, या आणि असल्या
क्षुल्लक (यांच्यामते बरं) गोष्टींच्या वैतागापेक्षा हे सगळं झेलून
डेस्टिनेशनला पोचून तिथे इतिहासातल्या दोन विटा पाहायला मिळाल्या ह्याचा आनंद यांना मोठा. चार लोकं मिळून प्लॅन करून जिकडे
ट्रेकला जातील तिकडे जायचा यांना कंटाळा, पण त्याऐवजी एखादी
नवीन जागा, त्या जागेचा जुनाच इतिहास पण नव्याने
धुंडाळायला मिळाला की स्वारी खुष.
ट्रेक ठरतांना दहा लोकं ठरलेली आणी तो दिवस उजाडेपर्यंत
कमी होता होता चारच आणि ते पण आपल्याच
पठडीतले शिल्लक राहिले, यात ह्या मंडळींना कोण आनंद. एक्सप्लोरेशन मोड.
हॅप्पीनेस
मोडवाल्यांचे ट्रेक कसे मुद्देसूद, आखीव-रेखीव, परफेक्टली प्लॅन्ड असतात. आणि ते तसेच एक्सिक्युट
व्हावे ह्याच्याकडे यांचा कटाक्ष असतो. ते तसेच झाले
की हे खुषीत आलेच
म्हणून समजा.
साधारणपणे
एक्सप्लोरेशन मोडवाल्यांच्या ट्रेकचं वेळापत्रक आणि अंदाजपत्रक नेहमीच कोलमडलेलं असतं. हा म्हणजे पण
ते बनवतचं नाहीत असं नाही हां !!! पण .....
हॅप्पीनेस
वाल्यांसाठी नाश्ता ही ट्रेकसाठी ताकद
द्विगुणित करण्याची सोय आहे. पण याचा हट्ट
मात्र हे लोक करत
नाहीत हां, "मिळाला तर उत्तम" वाला
मामला असतो. तसंच तो एक्सप्लोरेशन वाल्यांसाठीही
असतो, पण मिळाला तर
नाश्त्यावर यांच्यासारखा ताव मात्र अजून कोणी मारूच शकत नाही.
मोड
कुठलाही असो साहेबाची चहा मात्र एका सच्च्या ट्रेकरसाठी अमृतच. एक वेळ जेवण
नाही मिळालं तरी चालतं पण चहा मात्र
हवीच (सह्याद्रीत फिरतांना अरबांची कॉफी मागणं हे गरिबीचं आणि
अशिक्षितपणाचं लक्षण मानलं जात ). एकदा का चहाचे ग्लास
किंवा कप समोर आलेत की हॅप्पीनेस मोड वाल्यांच्या बॅगांमधून
रंगीबेरंगी, विविध ढंगी चवीची, आकाराची, प्रकारची बिस्किटं, शंकरपाळी, दिवाळीची चकली, चिवडा आणि असली अनेक आयुधं बाहेर निघू लागतात. कधी कधी इतकी कि हे सगळं
बघूनच चहा आपली सगळी हत्यारं टाकून बिनशर्त समर्पण करते, आणि हॅप्पीनेस वाल्यांच्या सर्व आयुधांचे घाव सोसून तरीही शिल्लक शेवटच्या घोटात आपला अमृतासम गोडव्याचा नजराणा पेश करते. एक्सप्लोरेशन वाल्यांसाठी चहा हे एक जिव्हाळ्याचे
पण मात्र विषयवस्तू, साधन. असं समजण्यामागचं कारण म्हणजे चहा समोर आला की यांच्या बॅगेतून
साधारणपणे बाहेर पडतात कालच्या डब्ब्यातल्या शिल्लक
राहिलेल्या चपात्या, आणि परत मैदा होऊ घातलेला मोडका-तोडका ब्रेड. तरीही चहा या गरिबांवरही तितकीच
माया दाखवते.
आत्ता
फक्त चहाच्या विषयापुरती या दोन, हॅप्पीनेस
आणि एक्सप्लोरेशन मोड वाल्यांमधून एक कॉमन पोट-जमात शोधता येते. यांच्यासाठी चहा हे पूजनीय यंत्र
असते. चहापत्ती, साखर, दूध सारख्या शक्तींची चुलीवर स्थापना करून, साधलेलं, मंतरलेलं हे दिव्य आणि
मौल्यवान यंत्रच असत. आणि चहाचा ग्लास (हो इथे कप
अलाउड नाही) उचलला की गरमागरम सरळ
ओठांना लावुन तृषाशांती करण्यातच त्याची खरी पूजा, उपासना असते. आणि त्यात काही बुडवून खाऊन चहाचं पावित्र्य नष्ट करणाऱ्या पापींना ह्या इहलोकात, यांच्या मते, मोक्ष, माफी नसते.
राहिला
विषय जेवणाचा तर त्यावर एक
वेगळा लेखचं लिहिता येईल. पण थोडक्यात बोलायचं
झालं तर इथे मात्र
आतापर्यंतच्या मुद्द्यांमध्ये फार गरीब वाटणारे एक्सप्लोरेशन मोडवाल्यांची श्रीमंती देखणेलायकचं. हॅप्पीनेस वाले जिथे घरून डब्बा न्यायचा की किल्ल्याच्या पायथ्याच्या
गावात जेवण सांगायचं ह्या विवंचनेत असतात, तिथे एक्सप्लोरेशन वाले मात्र आपल्या बॅगांमध्येच एखाद्या कूकलाही लाजवेल इतका संसार घेऊन फिरत असतात. हॅप्पीनेस वाल्यांच्या किल्ल्यावरच्या चुलीवर बनलेल्या जेवणाचा बेत जिथे खिचडी, मॅगी, सूप, पापड, लोणचं यांच्यावर जात नाही तिथे एक्सप्लोरेशन वाले मात्र भाजी भाकरी पासून ते अगदी पुरणपोळी
अन उकडीच्या मोदकापर्यंतची मजल त्याच किल्ल्यांवरच्या चुलींवर मारत असतात.
असो
ह्या दोन प्रकारच्या ट्रेकर्स नंतर राहते ती तिसरी म्हणजे
बरोब्बर ह्या दोन्ही मोडच्या ट्रेकर्सच्या सीमारेषेवरती असणारे, आणि त्यामुळे कधी कधी स्वतःलाच स्वतःच्याच निर्वासितपणाची जाणीव होत राहणारे ट्रेकर्स.
ना मोठ्या संख्येत आनंद मिळतो,
ना एक्सप्लोरेशन साठी टीम मिळते,
ट्रेकला जायला सुट्टी पाहिजे असा ठणकावून सांगण्याची धमक तर असते पण
तसे प्लॅन बनवायला साथीदार नसतात.
आपणच लीड करत असलेल्या ट्रेकच्या, ट्रेकर्सनी भरलेल्या बस मध्ये रात्र
जागवत खेळलेल्या धमाल अंताक्षरीचा सर्व आनंद, संपूर्ण किल्ला फिरत आला नाही किंवा त्या स्थळी जाऊन इतिहास नीट धुंडाळता नाही आल्यामुळे त्याच्या मनाला लागलेल्या चुटपुटीत पूर्णपणे विरघळून गेलेला असतो.
मला अजून चार तास थांबुन अख्खा डोंगर पालथा घालून पुन्हा नवीन वाटेने उतरून, परत घरी येण्यासाठी भल्यापहाटेची काकडआरतीची गाडी पकडून सकाळी घरी पोहोचून पुन्हा लगेच कामावर जाता आलं असतं, पण सोबत घेऊन
गेलेल्या सवंगड्यांपैकी काहींना रात्रीची झोप यापेक्षा जास्त महत्वाची वाटूच कशी शकते किंवा रात्रीपर्यंत घरी नाही पोचलो तर बाबा रागावतील
असं कारण ट्रेकला कोणी देऊच कसं शकतं असे अनेक विचार संध्याकाळच्याच घरी परतण्याच्या गाडीच्या प्रवासात करून करून त्याला नैराश्य आलेलं असत.
पुढच्या ट्रेकला आपणच भाजी भाकरी आणि पिठलं असा भन्नाट आणि अस्सल गावरान घाट स्वतःच डोंगराच्या टोकावर पोहोचून चुलीवर घालु असा बेत गेल्याच ट्रेकला उतरतांना बनवून, चार दिवस आईकडून स्पेशल ट्रेनिंग घेऊन बसल्यानंतरही खरंच पुढचा प्लॅन बनतांना, "कशाला जेवण बनवण्याची झंजट, त्यापेक्षा किल्ल्यावरच्या माईंनाच जेवण बनवायला सांगु", असं आपला खंदा वाटणारा पार्टनर म्हणतो आणि ट्रेक टीमचे सदस्य त्याला दुजोरा देतात, आणि हे बघुन आपल्या
सगळ्या इच्छांच्या झालेल्या चिंधड्या त्याने मुकाट गोळा करून, मनाला आलेला हुंदका त्याच चिंध्या कोंबून गिळून टाकलेला असतो.
हे सर्व करून वरून आनंदी चेहऱ्याने तो त्या सर्व
हॅप्पीनेस मोडवाल्या ट्रेकर्सच्या गर्दीत मिसळून जाण्याचा प्रयत्न करत असतांना त्याला दुरवर एक्सप्लोरेशन मोड वाले ट्रेकर्स त्याच्यावरच हसत असतांना दिसत असतात.....
No comments:
Post a Comment