Sunday, December 1, 2024

घोडपाण्याची नाळ आणि रिठ्याचं दार

http://ahireyogesh.blogspot.com/2020/03/ghodpani-ritha.html


      दाऱ्या घाटाच्या वेळी राहिलेलं रिठ्याचं दार खुणावत होतं. या रिठ्याच्या दाराला जोडून घोडपाण्याची नाळ करता येईल ! प्रिती सोबत यावर मुद्देसूद चर्चा झाली व त्याचा नियोजनात खूपच फायदा झाला. 
        शनिवारी रात्री कल्याणहून साडेनऊ वाजता निघून म्हारळ पार करायला पाऊण तास लागला इतकी ट्रॅफिक.. मला तर बुवा प्रश्न पडतो कधी कधी कुठून येतात एवढ्या गाड्या आणि माणसं.. असो... तिथून पुढे गाडी थेट पळू. राजेश मास्तर आणि कुशल उर्फ केडी दोघेही पुण्याहून बाईकवर आले. पळू गावातील मारुती मंदिराजवळ एकत्र भेटून मुक्कामी वाघ्याच्या वाडीत. रात्री निघणं यासाठी की काहीश्या दुर्गम आणि अनवट वाटेसाठी, वेळ पाहून सकाळी लवकरात लवकर सुरुवात करणं आणि मुख्य म्हणजे यासाठी माहितगार माणूस शोधणं गरजेचं. 
सकाळी उजाडताच आवरते घेत सिंगापूर गाठलं. अशोक मामांना भेटून आमचं नियोजन सांगितले. समोर दोन तीन बाया माणसं होती ते आम्ही कुठे जाणार हे ऐकुन हैराण. मामांनी गावात दोघा तिघांना विचारलं कुणी बाहेर गेलं होतं तर कुणी कामात व्यस्त. आमची घालमेल पाहून मामांनी ऍक्टिवा काढली. राजेश मास्तर आणि केडी तिथेच पारावर बसून राहिले. मामांच्या ऍक्टिवा वर एका पाड्यात गेलो तिथं एका घरात आवाज दिला, आतल्या बाईंनी 'बाहेर गेलाय मला नाय माहित' असा रिप्लाय दिला. वाटेत आणखी दोघे भेटले मामांनी त्यांनाही विचारले एकाने पाय दुखतात तर दुसऱ्याने लै रान आहे, लै दूर आहे असं कारण दिले. तिथून गाडी फिरवत बोबेवाडीत गेलो तिथल्या एका घरात या दोन्ही वाटेबद्दल अचूक माहिती पण त्यांचे घर बांधायचं काम हाती असल्यानं त्यांचाही नकार. त्याच वाडीत बाजूच्या घरात विचारलं, 'वाळू काढाया गेला आहे घेऊन येतो त्याला' असे सांगत दोघं नदीच्या दिशेने गेले. त्याच घरातून चहा मिळाला तो घेत इतर गप्पा, पुढे त्या मुलांची वाट पाहत आठ वाजत आले. मामांना म्हणालो, ‘गावात जाऊन करू शेवटचा ट्राय. कुणी यायला तयार असेल तर ठिक’. गावात परत येतो तोच समोरून एक जण येताना दिसला. "काय रे कुठे होता?” “यांच्याच घरी आपण सुरुवातीला गेलो होतो." असे मामा म्हणाले. त्यांच्या सोबत बोलणी करून निघायला साडेआठ झाले. एकनाथ त्यांचे नाव. 
     हे सारं लिहायचं कारण.. योग्य माहितगार शोधायला लागलेला वेळ. सद्या गाडीचा जमाना त्यामुळे खुद्द इथली मंडळी प्रचलित अशा दाऱ्या घाटाने ये जा टाळू लागली आहेत त्यात या घोडपाण्याची व रिठ्याची तऱ्हा तर विचारायची सोय नाही. इतर सर्वत्र दिसते तसेच इथेही नवीन पिढी तर या पासून कोसो दूर. जे काही थोडफार जपलं आहेत ते इथल्या जुन्या खोडांनी व या लहान वाड्या वस्तीतील आदिवासी ठाकरं कातकरी यांनी. असो...
     गावातून शाळेच्या मागील मैदानातून मुख्य रांगेच्या दिशेने निघालो. ‘ढाकोबा’ व दाऱ्या घाटाच्या खिंडीला उजवीकडे ठेवत सरळ चाल. वाटेत ठिक ठिकाणी करवंदाच्या नाजूक फुलांना बहर आलेला तशीच अवस्था पळसाची. वसंत ऋतूत या दिवसात एक वेगळेच चैतन्य जाणवते. फार थंडी नाही की भाजून काढणारे उन नाही आणि आकाश ही बऱ्यापैकी स्वच्छ असते. रानात शिरल्यावर तांबटने कॅसेट सुरू केली, मला तरी हे खूप आवडतं. चौघेच होतो त्यामुळे गडबड गोंगाट घाई गर्दी असा प्रकार नाही. 
ओढ्याला पार करत ट्रॅक्टरवाला रस्ता अध्ये मध्ये त्याला शॉर्टकट घेत अर्ध्या तासाची चाल एका मोठ्या ओढ्यात घेऊन आली. इथवर वाळूसाठी ट्रॅक्टर येतो या पुढे मात्र क्वचित कुणी गेलं तर. एकनाथने उजवीकडील अस्पष्ट अशी पायवाट घेतली. दाऱ्या घाटाची खिंड आता दिसेनाशी झाली, रिठ्याच्या दाराची खिंड पार उजव्या बाजूला तर ‘जीवधन’ आणि ‘वानरलिंगी’ डावीकडे अगदी नजरेच्या टप्प्यात. 
आता पुढची चाल ओढ्यातून काही अंतर जात उजवीकडे रिठ्याच्या दाराला वाट गेली. चढाई घोडपाण्याच्या नाळेने ठरली असल्याने तिथे न वळता सरळ निघालो. 
ओढ्यात वरच्या बाजूला स्वच्छ पाणी तिथेच सोबत आणलेला नाश्ता केला. नाश्ता ब्रेक घेऊन साडेनऊच्या सुमारास निघालो. एक एक टप्पा पूर्ण मोठ्या ओढ्यातून, नळीच्या वाटेची जशी सुरुवात तसेच काहीसे. अगदी जायंट स्टेप वगैरे काय म्हणतात तसाच पण लहान प्रकार इथेही. जसे आत जाऊ लागलो तसे नाळेच्या बाजूचे कडे भारीच उंच भासत होते. 
डावीकडे लहान सुळके तर समोर आणखी एक खिंड सरळ रेषेत असलेली जी आता वापरात नाही. पावसामुळे बरीच पडझड होऊन मार्ग बंद झाला आहे. कधीकाळी पूर्वी ही नाळ थेट फांगळे घाटघर जाण्यासाठी वापरत, तर उजवीकडे वळून दुसऱ्या नाळेतून होती ती आमची मुख्य चढाई. हे वळण लक्षात ठेवण्याची खूण म्हणजे डावीकडे दिसणारे सुळके त्याच्या पायथ्या पर्यंत आल्यावर बरोब्बर त्याच सुळक्याच्या समोर ही नाळ आहे. 
या जंक्शन पर्यंत यायला गावातून निघाल्यापासून आम्हाला दोन तास लागले, यात लहान मोठे ब्रेक, फोटोग्राफी, एकदम आरामशीर चाल. इथवर येईपर्यंत फार चढाई होत नाही खरा चढ जाणवतो तो या नाळेत एन्ट्री मारल्यावर. 
अगदी दगड धोंडेवाली टिपिकल नाळ असली तरी आजू बाजूचे कडे, अरुंद नाळेतील मध्येच येणाऱ्या प्रस्तर भिंती या रौद्रता किंबहुना त्यामुळेच इथली दुर्गमता खरी अधोरेखित करतात. 
कधी सरळ तर कधी उजव्या डाव्या बाजूने जसे जमेल तसे वर जाऊ लागलो. सुरुवातीला नाळेचा टॉप अथवा खिंड ही मुळीच दिसत नाही त्यामुळे अजुन किती चढाई बाकी आहे ते समजत नाही. 
साधारण निम्मी चढाई झाल्यावर पाठीमागे वळून पाहिल्यावर समोरचे सुळके आणि त्या पाठी दिसतो तो किल्ले जीवधन आणि वानरलिंगी. हा नजारा बाकी भारीच. 
राहून राहून कॅमेरा घेतल्याचा पश्चाताप शेवटी मोबाईल मध्ये मर्यादा तरी ब्रेक घेत भरपूर फोटो काढले. पुढच्या वाटेतील एक दोन लहान मोठे कातळ टप्पे पार करून गेल्यावर बऱ्याच चाली नंतर झाडी भरली खिंड नजरेत आली. 
चला आता समिट होणार पण कसलं काय दिसतं तसं नसतं याचा प्रत्यय आलाच. सूर्यराव डोक्यावर आले घामाच्या धारा वाहू लागल्या, त्यात शेवटच्या झाडीच्या टप्प्यात बरीच उंच कारवी काही ठिकाणी तर आम्ही पूर्ण झाकले गेलो. 
तो काहीसा कंटाळवाणा भाग पार करत कड्याला बिलगून वाट आणि काही मिनिटांतच माथ्यावर. घड्याळात पाहिलं तर दुपारचा एक वाजलेला, म्हणजे गावातून निघाल्यापासून माथ्यापर्यंत यायला आम्हाला साडेचार तास लागले. 
नाळ थोडक्यात पूर्ण रूट अपेक्षेपेक्षा खूपच मोठा व दमदार निघाला आणि तितकाच एन्जॉय केला. मला तर ही कोंडनाळ आणि नळीची वाट याचं कॉम्बिनेशन वाटली. केडी ने बँड चेक केला तर सिंगापूर पासून जवळपास अडीच हजार फूट पेक्षाही अधिक चढाई झाली होती. ते बरोबर असणारच कारण नाळ चढत असताना निम्म्या जीवधन इतपत उंची आपण सहज गाठतो म्हणजेच आपण घाटघर नाणेघाट पेक्षाही जास्त उंचीवर येतो आणि पलीकडे पूर्वेला पाहिल्यावर आंबोली बरेच खाली दिसते. 
माथ्यावर कारवी आणि इतर खुरटी काटेरी झुडपे यांच रान माजलेले. त्यामधून डावीकडील वाट फांगळेच्या दिशेने गेली तर खाली उतरणारी वाट थेट आंबोली आम्ही खाली न उतरता वरच्या बाजूला उजवी मारली. खिंडीच्या या भागात पाणी असते असं एकनाथ सांगत होता, पाणी मिळाले तर जेवण उरकून घेता येईल. पण जिथे मिळायची शक्यता होती तिथेच पाणी आटलेले. रिठ्याच्या दारात पाहू असं ठरवून चालू पडलो. खालच्या भागात माणसांचा आवाज आला बहुदा आंबोली कडील लोकं लाकूडफाटा साठी आली असावीत. त्यांना आवाज दिला पण काही रिप्लाय आला नाही. रिठया दारात पाहू असं ठरवून चालू पडलो. या ठिकाणी कारवीचे दाट रान तशीच अरुंद वाट एके ठिकाणी बाहेर येत खाली आंबोलीची वाडी आणि तलाव व्यवस्थित नजरेत आला.
पुन्हा वाट रानात शिरत पलीकडे क्रेस्ट लाईनला बाहेर आली, समोर एक नाळ खोलवर उतरलेली त्याच नाळेच्या मुखाशी घसारा युक्त वाटेने सावकाश उतरलो. नाळेत पाहिलं तर सरळ सोट कडा अंदाजे दीड दोनशे फूट सहज असावा पुढे नंतर तीव्र उतरण त्यात दगडांचा खच पडलेला अत्यंत अरुंद अशी नाळ. 
फोटो काढून आडवं गेल्यावर वाटेत एका ठिकाणी बिबट्याची विष्ठा आढळली. पुढे दहा मिनिटांत रिठ्याचा दारात आलो. इथून डावीकडे एक वाट आंबोली तर सरळ जाणारी वाट समोरच्या टेपाडाला वळसा घालून दाऱ्या घाटात. घोडपाण्याची नाळ आणि रिठ्याचं दार या दोन्ही नाळे मधले हे वरील अंतर पार करायला आम्हाला चाळीस मिनिटे लागली. रिठ्याच्या दारात थोडीशी सपाट जागा तिथेच जेवण करायचे ठरवले. जेवण अर्थातच घरून आणलेले. आम्हा तिघांकडे पाच लिटर पाणी होते जेवण झाल्यावर साडेतीन लिटर शिल्लक राहिले. चौघांत एवढे पाणी किमान अर्धी नाळ उतरे पर्यंत पुरवायचे. यात नाळेची दिशा बऱ्यापैकी नॉर्थ वेस्ट असल्याने सावली होती तर खालच्या भागात हमखास पाणी. अडीच पावणेतीनच्या सुमारास उतरायला सुरुवात केली. उजवीकडील झाडी भरली वाट पाच मिनिटांत मुख्य नाळेत घेऊन आली. 
इतर नाळे प्रमाणे सुरुवातीला काहीशी अरुंद पण पुढे फारसे वळण न घेता रुंद होत गेलेली. सरळ रेषेत अगदी पायथ्याचा ओढा सहज नजरेत आला. थोडं उतरताच उजवीकडे कपारीत उंबराच लहान रोपटे तिथे थोडा ओलावा दिसला. 
एकनाथने जाऊन पाहिलं तर स्वच्छ गार पाण्याची अगदी बारीक धार. पाणी पिऊन बाटलीत भरून घेतले. कधी उजव्या बाजूने तर कधी डाव्या बाजूने कड्याला चिकटून वाट अगदी सहज रित्या खाली उतरते. 
थोड खाली आल्यावर उजवीकडे पुन्हा एकदा जीवधन त्यामागे नानाचा अंगठा डोकावला. अंगठा काहीसा खालच्या पातळीत यावरून अजुन भरपूर उतराई शिल्लक आहे हे लक्षात आले. तासभर झाल्यावर डावीकडच्या कड्यात मानव निर्मित अर्धवट सोडून दिलेलं वाटावं असं काहीतरी खोदकाम ? 
ऐरोजन असल्याची शक्यता जास्त पण तरी सिमेट्रीकल खोदकाम पाहून शंका येते त्यात नाणेघाट तसेच रामदेवळी उर्फ गणेश गरड लेणी इथून जवळच त्या काळात इथे कुणी आधी काम केले असावे ? मनात तर्क लावत पुढे सटकलो. 
आता नाळ बऱ्यापैकी रुंद होत, मोठे दगड धोंडे जसं जमेल त्या बाजूने उतरायचं. एक साधारण वीस पंचवीस फुटाचा पॅच आडवा आला. आधीच्या ठिसूळ दगडांचा अनुभव घेत बारीक होल्ड ही भरवसा ठेवावा असा नाही. 
पण टेक्निकल मध्ये अनुभवी असलेला केडीने त्यातील स्टेप समजून कसं बिनधास्त उतरायचं या बद्दल मदत केली. 
याच्या पुढेही आणखी एक असाच मोठा पॅच पण बायपास मारुन त्याच्या डावीकडे झाडी भरल्या धारेवर चढलो. सुरुवातीला प्रचंड झाडोरा भुसभुशीत माती, वर आल्यावर अस्पष्ट वाट मिळाली. थोड जाऊन पाहताच काही ठिकाणी झाडांच्या फांद्या टोकं कापलेली बहुदा काही दिवसांपूर्वी कुणीतरी येऊन गेलं असावं. घाटाच्या खालच्या या भागात शिकारीसाठी येणारे असू शकतात, काही अंतरावर चूल मांडलेल्या खुणा. या धारेच्या टप्प्याने कमी वेळात बरच खाली आलो. 
आता उजवीकडे जीवधन नाणेघाट बरेच उंच. सरळ कुठेही न वळता उतराई संपवत पावणेसहाच्या सुमारास घोडपाण्याची नाळेच्या ओढ्यात म्हणजेच सकाळी जिथे होतो त्या जंक्शन वर आलो.
काही अंतर ओढ्यातून गेल्यावर डावीकडे झाडीत शिरत पुन्हा एकदा ओढा पार करून ट्रॅक्टर वाल्या रस्त्यावर आलो. सकाळी केलं तसे अधून मधून शॉर्टकट मारत साडेसहा वाजता गावाच्या वेशीवर. शाळेच्या मैदानात बैठक मांडली. सूर्यास्त होत होता, आहुपेच्या धारेपासून ढाकोबा दाऱ्या रिठा ते पार जीवधन नाणेघाट पर्यंतची मुख्य रांग सोनेरी रंगात न्हाऊन निघाली. 
कितीतरी तरी वेळ तो पॅनोरमा डोळ्यात साठवत शांत बसून राहिलो. गावात येत एकनाथ आणि अशोक मामांचा निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो ते दोन सुंदर अनवट काहिशा दुर्गम अशा वाटांचा ट्रेक पोतडीत जमा करून. कधी नव्हे तर रविवार असून रस्ता मोकळा, सिंगापूर ते घर पावणेदोन तासात. राजेश आणि केडी यांना मात्र पुण्यात पोहचायला दिड वाजला. 


                                                योगेश चंद्रकांत अहिरे.

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...