Tuesday, December 10, 2024

घारापुरी लेण्या आणि किल्ला

 https://dhawalbhangale85.blogspot.com/2020/04/blog-post.html



कोकणच्या मौर्यांची राजधानी पुरी उर्फ घारापुरी 
लेण्या आणि किल्ला 

१७ मार्च २०१९

फारच दिवसांपासून मनात होतं कि मुंबई पासून इतक्या जवळ असलेल्या घारापुरी लेण्यांना जाऊन येऊया. इतक्या वेळा गेट वे ऑफ इंडियाला गेलो पण घारापुरीला नाही गेलो. कारण नंबर एक म्हणजे घारापुरीला जगात नावाजलेल्या लेण्या आहेत, जगात एकमेव ब्रम्हा, विष्णू, शंकर यांची त्रिमूर्ती आहे, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे घारापुरी बेटाचा इतिहास फार प्राचीन आहे अगदी इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापर्यंत जुना, आणि बेटावर तसा तर प्राचीनच पण सध्या ब्रिटीशकालीन अवशेष अंगावर मिरवणारा किल्ला सुद्धा आहे. म्हणजे घारापुरीला भेट बनतेच.....

गुरुवार, शुक्रवार करता करता शेवटी २०१९ शनिवार १७ मार्चला निघालो घारापुरीला. लग्नानंतर आमच्या मंडळींसोबत पहिलीच वन-डे ट्रीप, ती पण किल्ला बघायला... व्वा व्वा मस्तच बेत... पण “डोंगरभटक्या सोबत लग्न करण्याचे परिणाम / दुष्परिणाम ते हे असेच ...!!!” इति. आमची मंडळी. 😜 

जायच्या आधी रात्री थोडा इतिहास वाचला/पाठ केला, उद्याचा गाईड मीच !!! जसाचा तसा सांगायचा प्रयत्न करतो इथे, चूक भूल माफ... (नक्की अपडेट करा जर काही चुकलं असेल तर...)

       १. मानवी वर्दळ हजारो वर्षांपासून

       २. कोकणचे मौर्य, त्रिकुट, बदामीचे चालुक्य, शिलाहार, राष्ट्रकुट, कल्याणीचे चालुक्य, देवगिरीचे यादव, गुजरातचा सुलतान, पोर्तुगीज, मराठा आणि शेवटी ब्रिटीश इतक्या सगळ्या राजवटी बघिलेला भूभाग. जवळपास सर्वांसाठी फार मोक्याची जागा असल्याने महत्वाचा ते अतिमहत्वाचा.

       ३. अंदाजे इ.स.पूर्व दुसऱ्या शतकातल्या बौद्ध लेणी, विहार आणि स्तूप

       ४. साधारण ४०० ते ८०० इ.स. मध्ये मौर्यांच्या काळात बनलेल्या हिंदू लेणी ज्या आत्ता जगप्रसिद्ध आहेत, युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केल्याने देशो-देशीचे पर्यटक ह्या लेणी पाहायला येतात.

      ५. ह्या हिंदू लेण्यांमधील शिवमंदिर साधारण इ.स.१५०० पर्यंत, पोर्तुगीजांनी बेटावर कब्जा करेपर्यंत वापरात होत्या, रोज पुजा-अर्चा होत असे. पोर्तुगीजांनी ह्या मंदिरांमधली पुजा बंद करवून, लेण्यांची प्रचंड नासधूस केली असं म्हटलं जातं.

      ६. ह्या बेटावर असलेल्या प्रचंड आकाराच्या हत्तीच्या मूर्तीला बघून पोर्तुगीजांनी बेटाला एलिफंटा असे नाव ठेवले जे आजतागायत वापरले जाते.

      ७. पोर्तुगीजांनी तसेच नंतर इंग्रजांनी बेटावर किल्ला बनवला आणि मुंबई बेटाच्या रक्षणासाठी तैनात ठेवला. इंग्रजांनी किल्ल्यावर ३५ फुटी २ तोफा लावलेल्या आहेत ज्या आजही चांगल्या अवस्थेत आहेत.

तर १७ मार्चला घारापुरीची ट्रीप सुरु झाली सकाळी उठण्यापासुन, सकाळी ६ ला उठण्याचा कार्यक्रम (तसं बघायला गेलं तर बायकोला उठवण्याचा कार्यक्रम 😜 झाला, तय्यारी झाली, बायकोची लवकर आणि माझी उशिरा 😅. सकाळची ट्रेन पकडली आणि ९.३०ची बोट जी निघाली ९.४५ला ती पकडून १ तासाचा प्रवास करून घारापुरीच्या बंदरावर उतरलो. छान सकाळ होती मग चालतच, रस्त्यात ग्रामपंचायतीचा टोल भरून पायऱ्यांना लागलो. माझ्या अपेक्षांना सुरुंग लावत त्या पायऱ्यांवर स्त्रीलंकार, स्त्रीकवच, आणि परदेशी पाहुण्यांसाठी म्हणून १०-१० हजार रुपयाची हँडमेड इन इंडिया शोपीस विकणारी दुकानं सकाळी सकाळीच उघडलीही होती 🙆. आमचा वेग आपोआपच कमी होऊ लागला, तरीही मनावर आणि खिशावर कंट्रोल ठेवत काहीच खरेदी न करता तडक पायऱ्या पार केल्या आणि करवल्या 😉. समोरच पुरातत्वखात्याने लावलेला दगडी वेलकम बोर्ड स्वागत करतो. बाजूलाच चांगला माहिती फलकही लावलेला आहे. 



पायऱ्या चढून आलो कि आपण कॅनन हिलला पोहोचतो, याच टेकडीच्या पोटात घारापुरीच्या ५ हिंदू लेणी आहेत आणि याच टेकडीच्या वर इंग्रजांनी बांधलेला घारापुरी किल्लाही आहे. या टेकडीला कॅनन हिल हे नाव ह्याच किल्ल्याच्या आवारात लावलेल्या २ लांबलचक ३५ फुटी तोफांवरून पडले आहे. ह्या लेण्यांपेक्षाही जुन्या २ बौद्धलेणी बाजूलाच खेटून उभ्या असलेल्या स्तूपा हिल च्या ७५% उंची वर कोरलेल्या आहेत.

सर्वप्रथम येते ती गुहा क्रमांक १, ह्याच गुहेत जगप्रसिध्द ८.५ मीटर उंचीची महेशाची त्रिमुखी मूर्ती आहे, 

महेशाची त्रिमुखी मूर्ती 


डावीकडचा चेहरा अघोर किंवा भैरव, रुद्र रूप आहे, मधला शांत चेहरा तत्पुरुष महादेव म्हणवतो आणि उजवीकडचा चेहरा प्रसंन्न वामदेव आहे. ह्या त्रिमूर्तीच्या आजूबाजूला गंगाधरशिव आणि अर्धनारीनटेश्वर आहे. तसेच शिव-पार्वती विवाह, अंधकासुर वध, महायोगी शिव, कैलासावर शिव-पार्वती आरूढ आणि रावण कैलास हलतांना, शिव पार्वती चौरस खेळतांना, नटराज शिव अश्या मुर्त्या आहेत. 

कैलासपती शिव - पार्वती आणि रावण कैलास हलवतांना 
नटराज शिव 
शिव - पार्वती 
पुरातन गणेश रूप 

गुहा १ बघितली आणि सरळ रस्त्याने निघालो, चांगला घडीव रस्ता मायबाप पुरातत्वखात्याने बनवलेला आहे जो गुहा १ पासून ते गुहा ५ पर्यंत जातो. पहिली गुहा सोडली तर बाकीच्या गुहांमध्ये पर्यटकांना बघण्यासारखे काही खास सापडत नाही. मात्र शोधक नजर आणि अभ्यासू डोक्याला तिथेही बराच इतिहास आणि पुराण सापडतो. 

मुख्य गुहा सोडून बाकीच्या काही गुहा 

  


 


 

एक अपूर्ण राहिलेली गुहा 


आता पर्यंत सर्व हिंदू लेण्या बघून झाल्या होत्या मात्र शिल्लकितल्या २ बौद्ध लेण्या बघायच्या होत्या. तिथल्या सुरक्षारक्षकाने जायला मनाही तर केली नाही पण, तिकडे जाता येत नाही, रस्ताच नाही, खूप कठीण आहे आणि झाडोरा साचला आहे वगैरे वगैरे सांगून स्वतःची जबाबदारी निभावली. इथेच थोडी फार ट्रेकरची नजर आणि थोडसं गुगल मॅप वाचन (आजकाल नकाशा वाचन वगैरे होत नसतं) करून लेणी क्रमांक ६ आणि ७ ला जाणाऱ्या जुन्या पायऱ्या सापडल्या आणि मी आणि आमच्या मंडळींनी त्यांच्या आयुष्यातला क्रमांक दुसरा ट्रेक सुरु केला.

स्तूप टेकडीवर जाणाऱ्या जुन्या मोडकळीस आलेल्या बांधीव पायऱ्या 
स्तूप टेकडीवरून डावीकडे कॅनन हिलच्या पायथ्याच्या हिंदू लेणी, उजवीकडे जुही आणि स्तूप हिल वर जाणाऱ्या पायऱ्या 

 साधारण १५-२० मिनिटांच्या चढाई नंतर आणि दाट झाडीतल्या ५ मिनिटांच्या चाली नंतर लेणी क्रमांक ६ सापडली आणि थोडसंच पुढे अजून एक अर्धवट फक्त ३-४ फुट खोल खोदलेले आणि अर्धवट सोडलेलं लेणं सापडलं. कदाचित ही लेणी क्रमांक ७ नव्हती, पण त्या टेकडीवर आम्ही दोघेच होतो म्हणून मी शोधमोहीम तिथेच थांबवून परत माणसांच्या गर्दीपर्यंत पोचण्याचे ठरवले. 

लेणं क्रमांक ६, बौद्ध लेणं 
लेणी ६ च्या पुढे एक अर्धवट खोदून सोडून दिलेलं लेणं 

वाचलेल्यापैकी मोठ्ठा बौद्धस्तूप काही सापडला नाही. सो, परत येण्याचा आणि तो स्तूप शोधण्याचा एक बहाणा ठेवून, वाटचाल परत कॅनन हिलकडे आणि तिकडून वरती किल्ल्याकडे वळवली. मगाशीच्या दगडी वेलकम बोर्ड समोर त्याच्याचकडे तोंड करून उभं राहिलं कि डावीकडे दिसणारा रस्ता गार्डनकडे आणि बौद्धलेण्यांकडे (लेणी क्रमांक ६ आणि ७) जातो तर उजवीकडचा रस्ता वरच्या दिशेने चढत किल्ल्याकडे जातो. एक ग्लास थंडगार एनर्जी डोस पोटात ढकलून थोडे ताजेतवाने होऊन किल्ल्याकडे कूच केले, रस्त्यात वडापाव, चहा, थंडगार पाणी थोडे डिस्कशन की कान्हेरी गुफांना येते तशी मजा इकडे फिरतांना का नाही येत आहे वगैरे केले. (डिस्कशनचं तात्पर्य: “मला (म्हणजे मला स्वतःला) तर कुठे पण मजाच येते अगदी रेतीच्या ढिगाऱ्यावर चढून उतरायचा ट्रेक असला तरीही, फक्त त्या कामाला ट्रेकचं नाव जोडायचं.” इति. आमच्या मंडळी 😛😃. बोलता बोलता टेकडीच्या वरती पोहोचलो, पहिल्या तोफेजवळ बऱ्याच पर्यटकांची गर्दी बघून सरळ पुढच्या तोफेजवळ गेलो. ३५ फुटी मिश्रधातूची तोफ जिला ३६० अंशात वळवण्यासाठी आणि खाली वर कारण्यासाठी संपूर्ण यंत्रणा बसवलेली होती त्यातले काही पार्ट आणि गिअर अजूनही अस्तित्वात आहेत. 

ब्रिटिशकालीन किल्ल्याचे थोडके अवशेष

इंग्रजांची ३५ फुटी तोफ 

तोफेच्या खालच्या बाजूला उतरायला रस्ता आहे, आणि खाली दारूगोळ्यासाठी कोठारे आहेत, तसेच सैनिकांसाठी बॅरॅक्स आहेत. खाली बॅरॅक्समध्ये हवा खेळती राहण्यासाठी क्लेव्हर “L“ शेप पाईप बसवलेले आहेत. वरून “L” शेप मध्ये वळवले असल्याने पाऊस-पाणी आतमध्ये जात नाही. आणि आजसुद्धा ही यंत्रणा पूर्णपणे काम करते, एकदम शुध्द आणि थंड हवा आतमध्ये खेळत राहते. 

  
सैनिकांचे बॅरॅक्स आणि दारुगोळा कोठार

  
बॅरॅक्समध्ये हवा खेळती राहण्यासाठी काढलेले 'L' आकाराचे पाईप, डावीकडे बाहेरून ,उजवीकडे आतून  

दोनही तोफा बघून फोटो काढून आता रिटर्न प्रवास सुरु झाला. खाली येता येता घारापुरीची आठवण म्हणून फ्रीजवर चिटकवायचे मॅग्नेटवाले स्टीकर घेतले. थोडा रानमेवा चाखवला (छोटे आवळे, स्टारफळ, मस्त तिखट मीठ लावलेल्या कैऱ्या), अहाहा उन्हाळ्यात हे सगळं खाल्लं नाही तर ट्रेकची मजाच नाही. 

जुहीला ६ वाजेशी परत पोहोचायचं असल्याने आम्ही परतीच्या प्रवासाचं गणित आखलं. खाली उतरून धक्क्यावर पोहोचताच परतीची बोट मिळाली ते बरंच झालं. धक्क्यापासुन लेण्यांच्या टेकाडाच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी MTDC ने अगदी लुटुपुटूची वाटावी एवढी मिनीट्रेन ठेवली आहे. सकाळी लेण्यांकडे जातांना आम्ही ह्याच ट्रेनच्या उपयोगितेवर चर्चा केलेली पण परत येतांना मात्र दुपारच्या टळटळीत उन्हात मुकाट्याने त्याच ट्रेनची सर्विस घेतली 😅 आणि आम्हाला महत्व पटलं. 

खरंच मिनी आकाराची, मिनीट्रेन  

परतीचा प्रवास सरळ सोप्पा फक्त घाईघाईत काही खायला न मिळताच झाला. पर चालता है ... शेवटी माझी आणि घारापुरीची भेट तर झाली... !!!

No comments:

Post a Comment

किल्ले बहुला.

 आयुष्यात पाहिल्यांदा आपल्या आर्मीला घाबरून जीव मुठीत धरून केलेला एक अविस्मरणीय ट्रेक - किल्ले बहुला.   ✍️ मेघन तारिहाळकर पाटील (चौफेर भटकंत...