Sunday, December 1, 2024

किल्ले पदरगड

http://ahireyogesh.blogspot.com/2024/10/padargad.html

    अनेक दिवस ड्राफ्ट मध्ये असलेला, आता संक्षिप्त रूपात ब्लाॅग पोस्ट किल्ले पदरगड... 
          नुकताच करोना लाॅकडाऊन संपला होता. त्याकाळात ट्रेक म्हणा रोड ट्रिप वा अशी काही भटकंती झालीच नाही. बर्‍याच कालावधीनंतर सह्याद्रीत जाण्याची ओढ लागलेली ती काही स्वस्थ बसून देईना. दोन तीन दिवस विचार करून पुन्हा सक्रिय होण्यासाठी, वन डे छोटेखानी पदरगडाचा ट्रेक ठरवला. आजवर भीमाशंकर वेगवेगळ्या मार्गाने अनेक वारी करून आलो पण नजीकचा पदरगड पहाणं राहूनच जात होतं. मोठ्या गॅप नंतर सुरूवात करायला मला पदरगड योग्य वाटला. सोबतीला अश्विनी, अंकुश, सुनील व रोहित सर तयार झाले. पहाटे लवकर निघून पाचखडकपाडा गाठले. आंबेनळी, पावल्याची वाट, रानमळा शिडी, पायदरा, तांबडीची वाट अशा अनेक वाटेचा मागोवा घेण्यासाठी आमचे इथं येण होतच रहातं. 
       पावल्याची वाट इथून भीमाशंकर जाण्यास सोयीची त्या वाटेने आमचं अनेकदा जाणं येणं झालं. तासाभरात पावल्याची वाटेने पठारावर दाखल झालो. 
पुढच्या दहा मिनिटांतच पदरगडाला वळसा घालत असताना पुरातन आयताकृती खोदीव टाकं त्या पल्याड हाकेच्या अंतरावर गणेश घाटाची खांडस, काठेवाडी कडून येणारी प्रचलित वाट. याच वाटेने जात पदरगडाच्या वाटेवर असणारी ठळक खूण ती म्हणजे जुनी विहिर दहा मिनिटांच्या अंतरावर. विहिरीत पाणी स्वच्छ होते रिकाम्या अर्धवट पाण्याच्या बाटल्या भरून घेत चालू पडलो. पंधरा वीस पावलावर नव्याने लावलेला पदरगडाची माहिती देणारा फलक.. 
पदरवाडी भीमाशंकर कडे जाणारी सरळ मळलेली वाट सोडून आम्ही उजवीकडे रानात शिरलो. ओढ्या पल्याड काहीशी अस्पष्ट अशी वाट वर चढू लागली. साधारण अर्धा तास झाडीतून चढाई केल्यावर पदरगडाला चिकटून असलेला डावीकडचा डोंगर व उजवीकडील गडाचा कडा यामध्ये आलो थोडक्यात खिंडीत आलो. याच वाटेत थोडं आधी डाव्या हाताला एक वाट सरळसोट वर चढते त्या पेढ्याच्या वाटेने भीमाशंकर नागफणी अथवा येळवली जाता येतं. हा ट्रेक आधी केलेला, मनात त्याच्या आठवणी जाग्या झाल्या. असो....
     दगडं धोंडे सोबत घसारा युक्त खिंडीची वाट चढून थेट चिमणी क्लांईब पॅच जवळ आलो. हाच तो खडतर भाग ज्यामुळे पदरगड काहिसा दुर्गम राहिला आहे. नीट निरखून पाहिल्यावर लक्षात आले की हा निमुळता भाग फारच गुळगुळीत.. खडबडीत असे चांगले होल्ड नाहीच. 
त्या अरूंद भिंतीवर पाठ लावून चिमणी चढायचा प्रयत्न  जेमतेम जागा हालचालीला त्यात लाॅकडाऊन मध्ये सुटलेले ढेरेदार शरीर कसबसं तोलत ढांगा टाकत दोर लावला. दोराच्या साहाय्याने मंडळ वर आलं. वर चिमणी चढून आल्यावर जेमतेम अशी अरूंद जागा. डावीकडे लहानसा पण पूर्ण एक्स्पोजर असलेला पॅच. 
उजवीकडे आधाराला कडा व डाव्या हाताला खोल दरी. सावकाश हा पार करून सपाटीवर आलो. कड्याला डावीकडे ठेवत पुढे गेल्यावर एक चांगली गुहा व काही दगडी अवशेष पसरलेले. 
गुहेत आपला मालकी हक्क सांगायला टिनपाट लोकांनी नाव लिहून ठेवली आहेत... काय बोलावे. असो.. जरा वेळ विसावून पुढे निघालो.
     सह्याद्रीत काही किल्ले डाईक या भौगोलिक जडण घडण रचनेनुसार आहेत. धोडप, तैलबैला, मोरोशीचा भैरवगड. पदरगडाला पण एक असाच काहीसा विशिष्ट आकार आहे. भीमाशंकर वाटेतून पहाताना सर्वात ऊंच सुळका काहीसा मंदिर वा शिवपिंड सारखा भासतो तर त्या लगतचा दुसरा सुळका खरंतर डाईक ची भिंत ही त्या समोर बसलेल्या नंदी सारखी वाटते. मला तर खरंच अशा नैसर्गिक आकारांचे सह्याद्रीतील काही डोंगर किल्ले अस्सल रत्न वाटतात. 
पुढे जात आणखी एक नाळ त्यात आधाराला झाडाची मोळी ही मात्र फार मोठी नाही. 
मोळीचा आधार व पाय फाकवत वर चढलो. नंतरच्या टप्प्यात चांगला दगडी पायरी मार्ग. 
हा पार करून पुढे जातात पुन्हा कातळात कोरलेल्या प्रशस्त पायर्या ते चढून वर सपाटीवर आलो. 
वरती पुरातन ढासळलेले वास्तू अवशेष त्यात जोडीला पाण्याचे टाके. काही अंतरावर कातळात कोरलेली प्रशस्त गुहा. दुपारच्या जेवणाची पंगत याच गुहेत. 
जेवण अर्थातच घरून आणलेले. पदरगडची ही गुहा भीमाशंकरच्या घाटातून व्यवस्थित दिसते. दरवेळेस गुहा पाहत पदरगड न्याहाळायचो आज मात्र आम्ही गुहेतून भीमाशंकरचा पसारा पाहत होतो. 
         
            वातावरण बरेच चांगले असल्याने उत्तरेला सिध्दगड.समोर झाडीभरल्या टप्प्यात पदरवाडी, शिडी घाट, भीमाशंकर चे नागफणी टोक, सरळ रेषेत पूर्वेस पेढ्याची वाट, 
दक्षिणेला ऑल टाईम फेवरेट पेठचा किल्ला तर पश्चिमेस भल्या मोठ्या पठारावर तुंगी. पदरगड व तुंगी या भीमाशंकर जामरूख भागातील घाटमार्गावर नजर ठेवण्यास उपयुक्त त्यांचे स्थान भौगोलिक दृष्ट्या अतिशय मोक्याचे. कलावंतीण चा महाल या नावाने पण पदरगड ओळखला जातो. 
किल्ल्याची स्थान निश्चिती व उरलेसुरले अवशेष पहाता याची निर्मिती बहुदा सातवाहन काळात झाली असावी. जुन्या आठवणी तर काही नवे बेत ठरवत बराच वेळ गुहा परिसरात रेंगाळलो. 
वेळ पहाता परतीचा मार्ग धरला. चिमणी पॅच समीप आलो, तो पॅच न उतरता विरूद्ध दिशेला नाळेत उतराई सुरू केली. थोडक्यात मोठा चिमणी पॅच बायपास, या वाटेने अंकुश आधी आलेला तसेच राजपे भागातील काही मंडळी या वाटेने ये जा करतात. सुरूवातीस तीव्र उतार व जोडीला घसारा. जसा मिळेल तसा आधार घेत उतरू लागलो. काही अंतर जात वाट कारवीत शिरली तेव्हा जरा बरे वाटले. पुढची वाट टप्पा टप्प्यात पदरात घेऊन आली. याच भागात कातळावर कोरलेले शिवलिंग अंकुश ने दाखवले. भिमाशंकर चे हे पदरचे रान खासच अनेक ऊंची झाडांची रेलचेल सादडा, ऐन, धावडा, साग तर क्वचित कुठे आब्यांची झाडं. आडव जात पावल्याच्या वाटेला लागलो पाऊण तासात उतराई संपवत पाचखडक पाडा गाठला. मागे वळून पाहता माचीवर पदरगड स्पष्ट दिसत होता. करोना च्या भीषण कालावधीनंतर तन मनाला सकारात्मक ऊर्जा देण्यात हा ट्रेक यशस्वी झाला. याच निमित्ताने पुन्हा एकवार सह्याद्रीत आम्हा सर्वाचे पुनरागमन झाले....
सह्याद्रीसखा ! सह्याद्रीकृपा ! 



                                                 योगेश चंद्रकांत अहिरे 

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...