Sunday, December 1, 2024

निसणीची वाट - बाजारपेठेची नाळ- कुंभे धबधबा व्ह्यु पॉईंट

https://www.bankapure.com/2024/10/NisaniWaat-BajarpethechiNaal-KumbheDhabdhaba.html

कुंभे धबधबा... 

साईप्रकाश बेलसरे  

विवेक काळे 

केदार नरवाडकर 

दत्तू तुपे 

दिनांक :  १९ ऑक्टोबर २०२४ 

                                       

"माऊंट पोलोगोंगका" च्या हिमालयीन एक्सपीडीशन नंतर जनरल भटकंती सुरु होतीच पण घाटवाटांच्या मूळ विषयाला  हात घालायला सवड मिळालीच नाही... त्यात पावसाने यंदा जास्तचं धुमाकूळ घातल्यामुळे इतर भटकंती करत बसलो...

"झ" दर्जाच्या

पर्यटकांमुळे कुप्रसिद्ध झालेला "कुंभे धबधबा" आणि "बोगदा" सोडल्यास कुंभे परिसर तसा थोडासा दुर्लक्षितचं आहे हे एक प्रकारे बरंय... भल्या पहाटे ०५:०० PM IST ला केदार ला पिकप करून पिरंगुट येथे साई आणि विवेक सरांना पिकप करून डिझल भरून पुढे निघालो... ताम्हिणी घाटात धुक्याची दुलई संपूर्ण परिसरात पसरली होती... निजामपूर नाक्याला गर्दी नसलेल्या ठिकाणी एका हॉटेलात शिरलो आणि साधी मिसळ (बेचव) खाल्ली...  चहा मारून पुढे निघालो आणि निजामपूर मार्गे मानगड रस्त्याला लागलो... पायथ्याला एक चालुक्य कालीन मंदिराचे जोते, काही विरगळी आणि एक भग्नावस्थेतला नंदी आढळला... त्याच्या समोरच एक छोटेसे देवीचे मंदिर आहे आणि बाहेर सुमारे २५ विरगळी लाईनीत लावून  ठेवल्या आहेत... "चाच" गावाच्या पुढे जाऊन गाडी एका टपरीपाशी लावली... पुढे डांबरी सडकेने चालत डावीकडे पायवाटेला लागून पुढे ओढ्यावरच्या पुलावरून पलीकडे पोचलो... 

निसणीची पायवाट... 

निसणीची वाट : 
                                        झाडोरा चांगलाच माजला होता... डावी-उजवीकडे जात एक दोन छोटे चढ चढल्यावर पहिल्या कातळकोरीव करकरीत पायऱ्यांच्या शृंखलांपाशी पोचलो... खोदीव पावठ्यांना बघून जाग्यावरचं थबकलो... पहिल्या पाच पावठ्या सरळ आडव्या रेषेत खोद्ल्यात तर मग उजवीकडे वळण घेत सुमारे ३१ कोरीव पावठ्यांवरून चढताना मज्जा आली... रातवाच्या पावसाने पावठ्या ओल्या झाल्या होत्या त्यामुळे सांभाळून चढत होतो... पुन्हा झाडोऱ्यातून गेल्यावर अजून २८ पायऱ्यांची शृंखला  लागली... मग मोकळवनात आलो... दोन-तीन चढ चढल्यावर शेवटच्या ३० पायऱ्यांवरून जाताना मज्जा आली... तेरडा, सोनकी वगैरे रान फुलांनी डोंगर फुलून निघाला होता... क्षणभर विश्रांती घेतली... कोकणातला दमटपणा पदोपदी जाणवत होताच... 

विरगळ... 

                                        पदरात दाखल झाल्यावर एक गुराखी भेटले... त्यांचं भूभू आमच्यावर उगीचंच भुंकत होतं... पुढच्या ५ मिनिटांत आम्ही केळगणं गावात पोचलो...  एका आज्जींना विचारलं कि "विरगळ कुठेत?" तर त्यांचं उत्तर : विरगळ? आरं ह्ये  केळगणं  हाये, विरगळ नाय..." मग डांबरी सडकेवरून चालत पलीकडे शेतातून काट्याकुट्यातून वाट तुडवत एका मंदिरापाशी पोचलो... क्षणभर विश्रांत घेतली... तिकडून शेतातून आणि चिखलातून वाट काढत पलीकडे पदरात विरगळींपाशी पोचलो... एका देवराई मध्ये सुमारे ४५ विरगळी ओळीत लावून ठेवल्या आहेत...  काही भग्नावस्थेतल्या विरगळी खाली ठेवल्या आहेत... गेली अनेक शतकं ह्या विरगळी ऊन-पाऊस-वारा झेलत इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत...त्यात काही सतिशिळा पण होत्या... फोटोग्राफी उरकून पुन्हा खाली डांबरी सडकेवर आलो... भर दुपारच्या कडक उन्हातून डांबरी रस्त्यावरून चालताना थोडं बोअर होत होतं... पण रान फुलांनी आणि राक्षसी लाकडी कोळ्यांनी (Giant Wood Spiders) च्या असंख्य जाळ्यांनी फोटोग्राफी ला पुरेपूर वाव दिला...   

वेळ : दुपारची १२:१५ PM IST...  

राक्षसी लाकूड कोळी (Giant Wood Spider)... 

बाजारपेठेची वाट.. 

बाजारपेठेची वाट (कुंभ्या घाट) :

                                        डांबरी सडकेवर एक  पायवाट डावीकडे चढताना दिसली...  बॉडी चांगली सिझन्ड झाल्यामुळे ह्या वाटेवरुन चढताना फारसा त्रास झाला नाही... मळलेली पायवाट होती... जुन्याकाळी रोटी-बेटी व्यवहारासाठी  वापरली जाणारी माजुर्णे  ते कुंभे ह्या बाजारपेठेच्या नाळेची घाटवाट खूप उपयुक्त होती... पण काळाच्या ओघात कुंभे धरणासाठी बोगदा बांधला आणि माजुर्णे ते कुंभे साठी डांबरी सडक असल्यापासून ह्या वाटेवरची वहिवाट बंद झाली ... एका नाळेच्या शेजारून घाटवाट काढली आहे... ढेकूण चढाई करत चढल्यावर शेवटच्या चढाईला वाट उजवीकडे वळते आणि आपण थेट डांबरी सडकेवर बोगदा बायपास करून येऊन थांबतो...  खाली माजुर्णे गाव आणि पार सुधागड परिसर मस्त दिसत होता... रस्त्याच्या पलीकडे वरदायनी मंदिर होते... आणि त्याच्याशेजारीच सध्याच्या घडीला "झ" दर्जाच्या पर्यटकांनी उच्छाद मांडलेल्या कुप्रसिद्ध कुंभे धबधब्याच्या पाण्याचा मोठा ओढा लागला... वाहत्या ओढ्याच्या पाण्याने चेहरा धुवून घेतला... फ्रेश वाटलं... मग मंदिरात येऊन जेवलो... साई ने पोळी भाजी आणि घरातला दही भात आणला होता.. त्यावर मस्त तळलेली बेडगी मिर्ची टाकली होती... मज्जा आली... 

माजुर्णे गाव आणि परिसर... 
कुंभे धबधबाचा ओढा... 
वरदानी मंदिर... 
दुपारचं जेवण... 

                                        आवरून घेत डांबरी रस्त्यावरून अर्ध्या तासात कुंभे धबधबा व्ह्यू पॉईंट ला पोचलो... एव्हाना ऊन वाढलं होतं... फोटो काढले आणि पुन्हा चालत बोगद्या पाशी पोचलो... क्षणभर विश्रांती घेतली आणि बोगद्यातून चालत पलीकडे पोचलो ... एका कार ला लिफ्ट मागितली, आतमध्ये चौघे केरळी मल्लू पब्लिक बसले होते... हिंदी,  मराठी काहीच येत नव्हतं म्हणून मग खर्ड्या इंग्लिश मध्ये संवाद सुरु केला... ते "नानेमाची वॉटरफॉल" आणि "सतसदा वॉटरफॉल" ला चालले होते... मग कळलं ते सातसडा वॉटरफॉल ला चालले होते... त्यांना थोडे दारू पिऊ नका किंवा धिंगाणा करू नका चे बेसिक गोष्टी सांगितल्या आणि तसं केल्यास ग्रामस्थ किती आक्रमक होतील हेही सांगितलं... कारण मागचे दोघेही पिऊन तर्रर्र होते ... गाडी घेऊन वर गेलो आणि पब्लिक ला घेऊन निजामपूर ला पोचलो... रात्री डिनर उरकून पुण्यात पोचलो.. 

कुंभे बोगदा... 

ठळक वैशिष्ठ्ये :

१. निसणीच्या घाटवाटेवर सुमारे ९० कातळकोरीव खोदीव पावठ्यांची शृंखला निश्चितचं पुरातन काळी व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून खोदल्या असणार... 

२. केळगणं येथील सुमारे ४८ विरगळींची शृंखला इतिहासाची साक्ष देते... 

३. बाजारपेठेची वाट ही निसणीच्याच वाटेला पुढे जोडणारी असावी अशी शक्यता नाकारता येत नाही... 

४. भक्कम मंडळाची लाभलेली साथ त्यामुळे ट्रेक यथासांग यशस्वी पार पडला... 

ट्रेकळावे,

दत्तू तुपे.

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...