भाग -१
गेले अनेक दिवस तयार असलेला औरंगाबाद जिल्ह्यातला अजिंठा -सातमाळ रांगेतील हा " ५ श्रीमंत किल्ल्यांचा मोठ्ठा प्लान " ....अनेक भटक्या मित्रांना सांगून झालं होता.पण मुहूर्त काही सापडेचना.माझी दिवाळीची सुट्टीही घरीच साजरी झाली.पुन्हा रोजचं रहाटगाडगं सुरु झालं.एवढ्या लांब जायचं म्हटलं तर इतरांना उपलब्ध वेळ ,प्रवासाचं वाहन , सोबत्यांची संख्या इ. अनेक तांत्रिक बाबींवर अधून मधून चर्चा होत होती. पण नुसतीच चर्चा .अधूनमधून पुन्हा पुन्हा या प्लान चे प्रेरणास्त्रोत असलेला आमचा फेसबुक मित्र ओंकार ओक याचा ''श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात '' हा ब्लॉग ( http://www.onkaroak.com/2014/08/blog-post_24.html ) वाचीत बसायचो.आमचं पूर्ण नियोजन त्या ब्लॉग वरूनच तयार केलं होतं.
अखेर डिसेंबर महिना अखेरीस नाताळच्या सुट्ट्यांची चाहूल लागली अन मनात पुन्हा उकळ्या फुटू लागल्या.पुन्हा भटक्यांना जागं करण्याचा प्रयत्न करू लागलो.शेवटी आमचा पुणेकर हौशी मित्र योगेश पाचंगे या भटकंतीसाठी तयार झाला .अन तेही मोटारसायकल वर ....
आळंदी वरून संभाजीनगर / औरंगाबाद ला जाण्याचा मी निवडलेला मार्ग खालीलप्रमाणे होता.
- · आळंदी देवाची (पुणे ) –पेरणे फाटा हून पुणे नगर महामार्ग –अ.नगर –औरंगाबाद – कन्नड शहर –सिल्लोड रस्त्याने – वासाडी गाव –करंजखेड फाटा – करंजखेड गाव – नागापूर –खोलापूर – अंतुर किल्ला
- · अंतुर किल्ला –खोलापूर –नागपूर -- गौताळा अभयारण्य क्षेत्रातून औट्रम घाट उतरून –सायगव्हाण –नागद गाव –महादेव टाका फाटा --- महादेवटाका डोंगर म्हणजेच लोन्झा किल्ला .
- · लोन्झा किल्ला –नागद ते बनोटी रस्त्याने बनोटी गाव – नायगाव –कच्च्या रस्त्याने सुतोंडा किल्ला
- · सुतोंडा किल्ला –नायगाव –बनोटी –सोयगाव –वेताळवाडी गाव – हळदा घाट माथ्यावर वेताळवाडी किल्ला
- · वेताळवाडी किल्ला –हळदा गाव –उंडणगाव –अंभई—नानेगाव— जंजाळा गाव – जंजाळा किल्ला.
· परतीचा प्रवास -----जंजाळा गाव – अंभई –भराडी –सिल्लोड –औरंगाबाद –अहमदनगर – आळंदी देवाची ,पुणे.
* हा पूर्ण मार्ग उलट क्रमाने फिरूनही हे ५ किल्ले बघता येतात.एकूण ३ दिवस पूर्ण असा कालावधी किल्ले बघाण्यास आवश्यक.
* लक्षात ठेवण्यासारखे : गावांदरम्यान चे रस्ते अगदी खराब आहेत .चारचाकी वाहनाने गेल्यास वाहनाची अन आपली हाडं खिळखिळी होणार. दणकट आणि आरामदायक दुचाकी अन तेही गरजेच्या देखभाल साठीचे सर्व हत्यारे ( दोरी, पहाने ,स्क्रूचावी ,पक्कड इ.) सोबत अशी तयारी असावी.
या परिसरात धूळ मुक्तपणे संचार करत असते . नाश्ता ,जेवणखाण स्वत : बनवणे केल्यास उत्तम .हॉटेल्स अपेक्षेला उतरतील असे नाही.कुठेही मुक्कामाची तयारी असू द्यावे.
स्थानिक माणसांशी सुसंवाद साधावा .नक्की मोलाची मदत करतात.वाटाड्या म्हणुंनही.
आणि अखेरीस तो दिवस उजाडला !! गुरुवार ,२५ डिसेंबर २०१४. पहिल्यांदाच मोटारसायकल वर इतक्या लांबवर प्रवास आणि ५ किल्ले भटकंती , ४ दिवस !
सगळी तयारी करून झाली होती.सकाळचे ११:३० झाले होते .खुद्द योगेश पाचंगे पुण्याहून आळंदीत माझ्या घरी हजर .१५ मिनिटातच दोघांच्या ब्यागा व्यवस्थित भरून घेतल्या. गाडीला टांग मारली. दोन मोठ्ठाल्या ब्य्यागा म्हणजे विंचवाच बि-हाड पाठीवर अशी गत होती.
तास दीड तास भराने सरदवाडी च्या वळणावर हॉटेल नवनाथ मधली मिसळ भरपेट खाल्ली.पुन्हा मीटर चालू . सं.६ ते ७ च्या दरम्यान वाळूंज MIDC नंतर रेल्वे क्रॉसिंग पाशी हे ट्राफिक जाम. बाकीच्यानसारखाच डांबरी सडक सोडून कशीबशी रुळावरून गाडी पुढे काढली .नगर नाका चौकात पोलीसमामांना कन्नड साठी वाट विचारून वेरूळ लेणी,घृष्णेश्वर च्या मार्गाने पुढे कन्नड शहरात पोहोचलो.रात्रीचे ९:३० वाजले होते.खूप वेळ गाडीवर बसून होतो.जवळजवळ ३१५ किमी .अंतर पार पाडलं होतं.. नियोजनानुसार कन्नड शहरानंतर नागपूर किंवा खोलापूर या अंतुर किल्ल्याजवळच्या गावात पोहोचायचे होते.आणि मग पोटोबा करायचा होता.
योगेश ला चौकातल्या टपरीवर पुढची वाट विचारायला सांगितले . तर तिथल्या २ - ४ स्थानिक व्यक्तींनी पुढे जाऊ नका , रात्रीची वेळ आहे आणि पुढे अभयारण्य क्षेत्र आहे असं सांगितलं .त्यांनी आमची इतर चौकशी केली. ट्रेकिंग वाले म्हटल्यावर लोकं मदतीला आली .मी त्यांना आमची कुठंतरी मुक्कामाची सोय होईल का विचारलं.....तर त्यांच्यातल्या दत्तू सोनावणे नावाच्या सद्गृहस्थाने सां.बां.विभागाच्या कार्यालयाच्या आवारात येण्यास सांगितले .दुस–याने तर कहर केला.....आम्ही जेवण बनवणार आणि मग जेवण करणार हे कळल्यावर त्याने नाय व्हय करता करता आमच्याकडची Maggi ची पाकिटेच घेऊन गेला.
आणि १० -१५ मिनिटात,आम्ही तिकडं ब्यागा उतरवून फ्रेश होतो न होतो तोच ......गरमागरम ,वाटाणा आणि गाजरं घातलेली Maggie घेऊन हज्जर !! .....अशी एक एक माणसं भेटतात भटकताना ......
मस्त पैकी Maggie फस्त
करून सर्वांशी
गप्पा टप्पा तसेच आमचा भटकंतीचा पुढचा मार्ग इ.चर्चा झाली .आम्ही दोघंच
आणि मोटारसायकल वर एवढ्या लांब किल्ले बघायला हेच त्यांना मोठं अप्रूप
वाटलं होतं. गप्पा टप्पा नंतर १२ वाजता झोपी गेलो..
पहाटे ५:३० ला उठलो आणि आवरायला घेतलं. ६ वाजता गर्रम चहा सोबत बिस्किटे खावून घेतली. ब्यागा गाडीवर बांधल्या आणि दत्तू सोनावणेचा निरोप घेतला
वरच्या छायाचित्रात उजवीकडे उभे
असलेले श्री. दत्तू सोनावणे. हे म्हणजे जणू एखाद्या कथा कादंबरीतलं
पात्रच.....आमची मुक्कामाची सोय केल्यानंतर घरी जाऊन येतो म्हटले
.आमच्यासारखेच अजून कोणी पाव्हणं त्यांच्या घरी येणार होते.त्यांचा
पाहुणचार केला घरी. स्वत :च्या भाड्याच्या घरात ४ -५ जणांची रहायची सोय
केली .अन हे बहाद्दर स्वत: अंथरून पांघरून घेऊन इकडं आले झोपायला.अतिथी
देवो भव :
वार -शुक्रवार ,दि.२६ /१२/२०१४ ..... सकाळी ७ वाजता आम्ही कन्नड मधून निघालो होतो. आता वेध लागले होते ते कधी
एकदाचं अंतुर किल्ल्याला पोहोचतोय त्याचे !.....
कन्नड नंतर पुढे अभयारण्यक्षेत्रातून हि सडक जाते.
नागपूर नंतर खोलापूर पासून किल्ला अंतुर च्या दिशेने जाताना खोलापूर गावानंतर पुढ कच्च्या रस्त्याने (वन खात्याने बनवलेला) पुढे जाताना एक ठिकाणी उजव्या बाजूला हा स्तंभ दिसतो.
ह्याच्या चारही बाजूंना अंतुर किल्ल्याच्या चारही बाजूंना असणा-या गावांची नावे त्यांच्या दिशांप्रमाणे त्या त्या बाजूला फार्सी भाषेत लिहिलेली आहेत —
अजून थोडं पुढ गेल कि वाटेच्या उजव्या बाजूला हि मारुतीरायाची मूर्ती दिसून आली
तसंच पुढ जाताना वन खात्याच्या ऑफिस पाशी च्या वळणावर अंतुर किल्ल्याचं पहिलं दर्शन झालं आणि.......
मनात विचार आला ......याचसाठी केला होता अट्टाहास
!!.....
तसं इथून अजून पुढ गाडीरस्ता जातो.पण पुढे माणसांची वर्दळ कमी दिसल्यामुळे वनखात्याचे ऑफिसपाशी दुरुस्ती
काम करणा-या कामगारांशी थोड्या गप्पा मारल्या .आमच्या जड ब्यागा आणि गाडी
तिथं ठेवू देण्यास विनंती केली .तर ते बिनधास्त ठेवून जावा म्हटले.
वेळ .- स.१०:३५ .मोटारसायकल लावली .किल्ल्याचा
नकाशा ,माहितीचे कागद ,पाण्याच्या बाटल्या आणि खाऊ सोबत घेतला. आता आम्ही
जरा मोकळं किल्याच्या दिशेनं चालू लागलो. किल्ल्याचा नकाशा माहितीसाठी
......सौजन्य -- ट्रेकक्षितीज संस्था संकेतस्थळ.
इथून थोडे पुढे गेलं कि
वन खात्याच्या प्यागोडाजवळ पोहोचलो .
इथून खालच्या दिशेनं किल्ल्यात जाणारी वाट बनवलेली दिसते.
वरती बघितल्यास काही बुरुंज दिसतात.त्यात एक तिहेरी बुरुंज लक्ष वेधून घेतो.
वेळ .स.११ .- समोरच दिसलं हे भव्य असं किल्ल्याचं पहिलं दक्षिणाभिमुख प्रवेशद्वार ......इथून सुरु होतं या किल्ल्याच्या श्रीमंतीचं दर्शन !!
दरवाजाच्या कमानीमध्ये वरती कोनाड्यात उजवीकडे एक शरभ शिल्प दिसून आले .
इथून थोडं पुढे गेलो आणी काटकोनात उजवीकडे वळलो आणि दुसरं प्रवेशद्वार स्वागताला तयार !!
पूर्वेकडे तोंड असलेले हे द्वार .
अजून पुढे चालत पाय-या चढून गेल कि काटकोनात वळलो..आणि समोर तिसरं प्रवेशद्वार !!
या दरवाजाच्या कमानीमध्ये मध्यभागी ५.५ फुट लांब आणि२ फुट रुंद असं हा फारसी भाषेतला शिलालालेख दिसला ....
या दारातून आत गेलो तर उजवीकडे एक वास्तू दिसली
....तिच्या उजव्या कोप-यातून वर दरवाजाच्या वर जाण्यास पाय-या होत्या ..
आम्ही वर गेलो तर तिथून या प्रवेशद्वारांची रचना बघायला मिळाली ....अप्रतिम !!
......परंतु आजमितीला वृक्षांनी खूप पडझड झालीये ...
.....इथून फोटोग्राफी झाली अन उजव्या हाताने आम्ही तटबंदी बघत पुढे गेलो ...
.डावीकडे थोडं उंचावर गेल कि एक तलाव दिसला
आणि उजवीकडे २ मोठ्या वास्तू अथवा राजसंकुल दिसलं .आत गेलो तर वटवाघुळांच साम्राज्य ....
एका वाड्याच्या वर जाण्यासाठी पाय-या हि दिसल्या .
थोडं पुढ उजवीकडे उंचावर एक चौकोनी आकाराचा सुट्टा असा टेहळणी बुरुंज दिसला..
आम्ही पाय-यांनी वर गेलो....आणि इथून संपूर्ण किल्ल्याच दर्शन घेतलं.
समोर पाण्याचा तलाव , किल्ल्याच्या दक्षिण बाजुच मध्येच बांधलेली तटबंदी आणि त्याअलीकडे २ उध्वस्त वास्तू आणि शेवटी टोकाला झाडीमध्ये असलेला किल्ल्याचा प्रमुख आकर्षण असलेला भव्य बुरुंज दिसतो ...
खाली उतरून तलावा पासून पुढ निघालो ....तलावाच्या दक्षिणेला एक भव्य दरवाजा दिसला.थोडंसं आत जाऊन बघितलं.
इथून उजवीकडे थोडं खाली उतरलो...तटबंदीच्या बाजूला ...तर कातळाच्या पोटात असलेल्या कोरीव टाक्यांपाशी पोहोचलो. चार खांबी अशी हि टाकी .....पिण्यायोग्य असं यातलं एक टाकं आहे.
पाण्याच्या टाक्यांपासून माघारी पायवाटेने तटबंदी बघत दक्षिणेकडे आलो ....
पुढे जाताना समोर किल्याच्या दक्षिणेकडे निमुळत्या टोकाकडे निघालो.एक दरवाजा आणि बुरुंज ओलांडला .
तो पाहतो तर काय.........मघाशी टेहळणी बुरुंजावरून पाहिलेली किल्ल्याला दोन भागांत विभागणारी तटबंदी आणि तिचे २ भव्य बुरुंज ,तीच्यामधून अलीकडे पलीकडे जाण्यास असलेली द्वारं.....हे विशाल दृश्य नजरेत सामावून घेतलं .
एव्हाना दुपारचे १ वा .४० मिनिटे झाली होती.या तटबंदी समोरच्या मोठ्या वृक्षाखाली बसून थोडीशी पोटपूजा करून घेतली .नंतर इथून पुढे दक्षिण टोकाकडे पोहोचलो .आणि समोरच .....हाच तो किल्ल्याचा बाहेरून दिसणारा भव्य बुरुंज ....याला या बाजूने आत मधून खोली केलेली दिसली.दोन्ही बाजूला तळघर वजा खोल्या आहेत.यात दगड पडलेली होती .
पाय-या
चढून वर गेलो ...आतल्या बाजूला देवड्या आहेत ...
पलीकडे खाली उतरलो ..समोरच एक बाबांचा
दर्गा दिसला.इथ आपले मुस्लीम बांधवांची वर्दळ असावी.रंगरंगोटी केलीये.
हे सर्व बुरुजाच्या आतून आहे.
आणि समोरच पठार आणि हा बुरुंज यांच्या मध्ये असलेला ५० फुटी खंदक......किल्ल्याला भक्कम करण्यासाठी समोरची डोंगर रांग आणि किल्ला यांच्यामधील कातळ फोडून बनवलेला .....
आताशा किल्ला पूर्णपणे बघून झाला होता .त्यामुळे तटबंदी कडेकडेन माघारी पायवाटेने मुख्य प्रवेश द्वाराकडे आलो.
पुनश्च एकदा या ३
प्रवेशद्वारांच स्वागत स्वीकारलं अन निरोप द्यावा अशी विनंती करून बाहेर
पडलो....पाय निघत नव्हता
वेळ . दु .२:३०......पुन्हा पुन्हा या किल्ल्याच्या श्रीमंतीचे अनेक पैलू वळून वळून बघतच वाहनतळ ओलांडून कच्च्या वाटेन चालत निघालो .
नुकत्याच पाहिलेल्या त्या बुरुंजाच ते अंतर्बाह्य असं भव्य रुपडं काही डोळ्यासमोरून जात नव्हतं आणि जाणारही नाही कधी . किल्ल्याच्या वैभवाबद्दल गप्पा मारत मारत ....चालत चालत वन खात्याच्या ऑफिस पाशी आलो ते कळलंच नाही.....मोटारसायकल काढून ब्यागा चढवल्या.
आमची मोटारसायकल वारी .......श्रीमंत किल्ल्यांच्या दारी ! भाग - २
आमची मोटर सायकल वारी चा दिवस २ रा .... किल्ले दर्शन दिवस १ ला.
शुक्रवार २६ डिसेंबर २०१४. वेळ – दुपारी ३ वा . १० मि
आजचा १ ला किल्ला - किल्ले अंतुर पासून कसाबसा काढता पाय घेतला. त्याची मोह माया काही सुटत नव्हती. तरीही आजच्या दिवसात्तल्या २ रया श्रीमंत किल्ल्याच्या ओढीने मोटारसायकल ला टांग मारली.खोलापूर – नागापूर नंतर गौताळा अभयारण्यातून औट्रम घाटाने खाली जाणाऱ्या मुख्य रस्त्याने आम्ही आता नागद च्या दिशेने निघालो होतो.....
वाटेवरच या पोराचा फोटू काढण्याचा मोह योगेश ला आवरता आला नाही......व्वाह ! काय मज्जा !! त्याची स्वारीच निराळी !!.....वाटत होतं कि मोटारसायकल वरून उतरून त्याच्यासारखा आनंद घ्यावा. पण नाईलाज ......
पुढे गेलं कि ....गौताळा अभयारण्याची कमान ....या वाटेने रात्री उशिरा जाणेस बंदी असते अशी माहिती मिळाली.
अधून मधून वानरांच्या टोळ्याच आम्हाला आडव्या गेल्या.
या चौकातून डावीकडे कन्नड ला आणि उजवीकडे औट्रम घाट उतरून सायगव्हान गावात पोहोचता येते.
सायगव्हान ओलांडून आम्ही नागद मध्ये पोहोचलो. चौकशी करून आम्ही लोन्झा किल्ला अर्थातच महादेव टाका डोंगरासाठी बनोटी रस्त्याने १ कि ..मी.वरील या पाटी पाशी आलो.
वेळ – ५ वा .१५ मि....महादेव टाका डोंगराच्या जवळ तर आलो होतो. पण इथून पुढच्या प्लान बद्दल मनात काहूर माजलं होतं. त्या पाटी पाशी थांबलो असताना एक स्थानिक व्यक्तीने आमची चौकशी केली.त्यांना सर्व सांगितले. या माझ्या मागमाग म्हणाले.माताड वाटेनं आम्ही त्यांच्या मागं निघालो.
पुढं त्यांच्या घराकडे जाणाऱ्या वाटेपाशी गाडी थांबवली.डोंगराकडे बोट दाखवत म्हणालं, ‘ या कच्च्या वाटेनं शेवटाला जायचं. तिथं उजवीकड पायऱ्यांची वाट वर जाते.’....
आता काही वेळातच दिवस संपणार होता .मी म्हटलं, ‘पुढं कुणी वाट दाखवणार भेटल काय ?....आम्हाला किल्ला बघायचाय आणि परत खाली उतरून माघारी यायचंय. नंतर बनोटी ला जायचंय. म्हंजी उद्या तिथला सुतोंडा किल्ला पाहणे होईल ‘....
माझ्या पुढच्या नियोजनाचा त्यांना कळवळा आला. आणि गडी ‘ लगीच सोबतचा किराणा घरी पोचवून तुम्हाला किल्ला दाखवाया येतू’ म्हणाला......हे पात्र म्हणजे कन्नड मधल्या त्या ‘ दत्तू सोनावणे ’ ची डुप्लिकेटच.....
पुढल्या १० व्या मिनिटाला माणूस त्यांच्या सोबत २ प्वोरांना घेऊन हज्जर !
वेळ- ६ वा १५ मिनिटे . रेलिंग लावून सुरक्षित बनवलेल्या पायरी मार्गाने या गडाच्या प्रवेशद्वारात पोहोचलो .
पूर्णपणे उध्वस्त प्रवेशद्वाराचा फक्त पाया दिसून येतो सध्या.
इथून किल्ल्याला डावीकडून किंवा उजवीकडून जावून पूर्ण वळसा घालून पुन्हा इथे येता येते. डावीकडे गेलं कि कातळकोरीव अशी एक मोठ्ठी गुहा दिसते. या गुहेतल्या महादेवाच्या जागृत देवस्थानामुळे हा किल्ला स्थानिकांना ‘ महादेव टाका’ म्हणूनच अलीकडच्या काळात जास्त प्रसिद्ध आहे.या गुहेत एक साधू महाराज राहतात.फारशा बसवून विजेचिही सोय केलि आह
या गुहेच्या शेजारी पिण्याच्या पाण्याचे बारमाही असे ५ खांबी टाके आहे . इथे पायरया बनवून खाली उतरने सोप्प केले आहे आम्ही वेळेअभावी इकडे पुढे जावून नागद गावाकडे उतरणारा कातळकोरीव पायरयांचा मार्ग पाहणे रद्द केले. पुन्हा मागे आलो अणि उजव्या बाजूने पुढे जाताना थोडखालच्या बाजूला तटबंदीत असलेला किल्ल्याचा चोर दरवाजा शोधण्याचा निष्फल प्रयत्न करू झाला.परंतु आता अंधार पडायची चिन्हे दिसत असल्याने आम्ही थोडं घाईने या श्रीमंत किल्ल्याची किल्ल्याची फेरी मारीत निघालो.
तसेच वरती किल्ल्याच्या माथ्याला पोहोचलो. तिथे इमारतींचे अवशेष ,चौथरे दिसून आले .
माथ्यावरती असलेली मारुती रायाची मूर्ती
एव्हाना अंधार पसरला होता . आम्ही ६ वा. ४० मिनिटांनी किल्ला उतरून खाली आलो. खाली गाड्यांजवळ आलो तेव्हा पुढच्या गावाला न जाता आमच्या घरीच आज राहा अशी आग्रहाची विनंती त्या पोरांनी केली.अन आम्ही पेचात पडलो. कारण इथून पुढच्या किल्ल्याच्या जवळ आज पोचलो तर उद्याच्या किल्ल्याच्या भटकंतीला भरपूर वेळ मिळेल.असं आमचं नियोजन. ती पोरं काही ऐकेचनात. त्यांचा पाहुणचार नाकारणे अवघड जात होते. पण कसबसं त्यांना समजावलं. आणि तिथनं निघालो. हि अशी एक एक माणसे भेटत्यात बघा भटकताना ......
नागद – बनोटी रस्त्याने बनोटी ला निघालो. रस्ता खराबच आहे. मध्येच वाटेवर एक स्कूल बस थांबलेली दिसली. पुन्हा मागं वळून आलो. तर गाडीचा ड्रायव्हर बस चे पंचर चाकं बदलण्याची कसरत करीत होता ..अन तोही एकटाच !
गाडीत बालवाडी अन १ ली, २ री ची चिमुकली पोरं बसून होती. माहिती अशी कि , ह्या मुलांची सहल गेली होती. पण माघारी येताना मुलांच्या म्याडम लोकं उतरुली मागच्या गावात ...हि पोरं घरी पोहोचवायची जबाबदारी एकट्या ड्रायव्हर वर टाकून .....काय म्हणावं आता !
आम्ही टोर्च दाखवून त्याला मदत केली. आणि काही वेळाने पुन्हा मार्गस्थ झालो.
बनोटी गावात पोहोचलो. एव्हाना गावात शांतता झाली होती. शेकोटी पेटवून चौकाचौकात मानसं गप्पा हाणत होती. आमचे अवतार पाहून ‘ मिल्ट्री वाले’ , ‘एस पी आर एफ ' अस म्हणत बाजून गोळा झाली. आम्ही मिळालेल्या माहितीनुसार अमृतेश्वर मंदिर कुठाय ते विचारलं आणि आमची भटकंती वगैरे सगळं त्या मंडळींना सांगितलं.
अमृतेश्वर मंदिराच्या आवारात उघड्यावर मुक्काम करावा लागणार होता. जो मोठ्ठा हॉल आहे तो बंदिस्त नाही . आणि आजूबाजूने शेती आहे.त्यामुळे आम्ही माघारी गावात आलो. पुन्हा चौकात आलो. तिथल्या मंडळींना आमची मुक्कामाची काही सोय होईल का विचारलं . त्यांच्यातल्या बापू चौधरी नावाच्या तरुणाने लागलीच ग्रामपंचायत ऑफिस ची चावी मागून घेतली.अन चला म्हटले....मला पुन्हा ‘कन्नड चे दत्तू सोनावणे’ ची आठवण झाली. त्या दत्तू सोनावणे चा हा ‘बाप्पू चौधरी’ आजचा हा ३ रा अवतार जो आमच्या मदतीला धावून आला.
वेळ – रात्री ९ वा .५० मि. ........आमच्या सोबत समस्त गावकरी ग्रामपंचायत ऑफिस ला दाखल झाले.आमच्या मोटारसायकल वरील मोठ्ठाल्या ब्यागा , पुण्याहून आलेली लोकं अन तेही किल्ले बघाया हे सारं मोठ्ठ कौतुकाच वाटत होतं त्यांना.
गाडीला बांधलेल्या ब्यागा सोडून आतमधी घेऊन आम्ही आता पोटोबाची सोय कराया घेतली. त्याचसोबत हजर असलेल्या गावकऱ्यांच्या सोबत गप्पाही चालू होत्या.त्यांना आमचा भटकंतीच सर्व नियोजन सांगितलं. आमच्या कडील माहितीचे फाईल अन पुस्तक इ.टी लोकही चाळू लागली.
नंतर सव्वा अकरा ला झोपी गेलो. पुढच्या दिवशीच्या किल्ले सुतोंडा चे वेध मनाला लागले होते. पण काही वेळातच दिवसभरच्या धावपळीने झटकन झोप लागली.
शनिवार २७ डिसेंबर २०१४..... दिवस ३ रा ...किल्ला ३ रा ....
खाऊ आणि पाण्याच्या बाटल्या सोबत घेऊन बाकी सगळे सामान तिथेचठेवून आम्ही ६ : ४५ वाजता नायगाव च्या दिशेने कूच केलं. कच्च्या रस्त्याने नायगाव मध्ये पोहोचल्यावर तिथून पुढची सरळ गडाकडे जाणारी वाट विचारून घेतली .पुढे वाटेवर डावीकडे एक ओट्यावर हनुमानाची मूर्ती दिसली.
सरळ पुढे जात नंतर समोर सुतोंडा किल्ल्याचा डोंगर दिसतो त्याच्या डावीकडून शेताकडेने वळसा घालत आम्ही एका तलावाच्या बाजूने शेतात पोचलो.
पडवी वजा झोपड्या जवळ जाऊन तिथं उभ्या गाववाल्याला गडाची वाट विचारली. बोलता बोलता त्यालाच वाट दाखवायला येण्याची विनंती केली. तो तिथल्या शेतावर कामासाठी आला होता.
तरीबी आमच्या साठी लगीच निघालं सोबतीला. किल्ला दाखवायला. तिथच गाडी उभी केली. लागलीच किल्ल्यावर जाणारी पायवाट पकडली. झाडाझुडूपांतून वर जात होतो.
आमच्या समोर उजवीकडे सुतोंडा किल्ला आणि डावीकडे रक्ताई चा डोंगराची रांग दिसते आहे. या दोहोच्या मध्ये निघणाऱ्या खिंडीच्या दिशेने आम्ही वर पोहोचलो.
अचानक समोर पाहिलं तर ....इतका वेळ डोक्यात घोळणार..... सुतोंडा किल्ल्याचं कातळात कोरलेले १२ -१३ फुट उंच पश्चिमाभिमुखी प्रवेशद्वार !!....
डोंगर फोडून त्यातच खंदक बनवलेला ,ही मानव निर्मित अशी खिंड .... उजवीकड वरती तटबंदी ची रचना केलेली .तसेच त्यात डाव्या बाजूला एक शरभ शिल्प ही दिसते.आणि या दरवाजातून कातळातून खोदलेल्या भुयारी मार्गाने किल्ल्यात प्रवेश ....काय विलक्षण !!
येथून दरवाजातून समोर आत गेलं कि बांधकामांचे अवशेष दिसतात. डावीकडे थोड़े पुढे गेलो की किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार , उध्वस्त स्थितीत दिसते. इथून आत गेल की २ सुकलेली टाकी अणि मग हे १३ तुटलेले खांब असे पिण्यालायक असे टाक आढळते.
इथून डावीकडे चालत गेलो तर मोठमोठाल्या लेण्यांसारखे पाण्याची कित्येक खांब असणारी टाकी पार वेड लावून टाकत होती. म्हणता म्हणता अशी तीस एक टाकी बघून झाली. एक से बढकर एक अशी टाक्यांची मालिकाच जणू !
.... इथून पुन्हा मागे येवून उजव्या अंगाने किल्ल्याला वळसा घालायला निघालो. या बाजूनेही तशीच मोठ्ठाली कोरीव टाकी .... पडक्या बांधकामांचे काही अवशेष ....
तसेच किल्ल्याची तटबंदी हि आढळून येते. पुढे एके ठिकाणी वरील प्रमाणे मशिदिचे उध्वस्त असे द्वार हि दिसून आले. इथे जवळ किल्ल्याचे सर्वोच्च ठिकाण आहे.
त्या टाक्यांपासून थोडं पुढे खालच्या बाजूला उतरलं की किल्ल्याचा चोर दरवाजा लागतो. जो नायगाव चे दिशेला खाली उतरतो.त्याच दरवाजा शेजारी पडलेले एक शिल्प..
एव्हाना आमच्या यादीनुसार या किल्ल्यावरील सर्व स्थळ बघून झाली होती. संपूर्ण पणे किल्ला बघून घेतल्याचं सुख आता जाणवत होतं.
आमचे वाटाड्या म्हणून आलेले श्री हिरामण चोरमल यांनीही तितक्याच आपुलकीने आम्हाला या किल्ल्याची श्रीमंती दाखवायला कसलीही कसूर ठेवली नाही. हे जणू आजच्या दिवसातले १ ले असे ‘ दत्तु सोनावणे ’ चे एक रूप !!
आता शेवटी जाता जाता बोनस म्हणून हिरामण रावांनी आम्हाला चोर दरवाजाने खाली उतरून डोंगराच्या पोटातली जोगणामाई चे घरटे म्हटली जाणारी लेणी दाखवणेचेही कष्ट घेतलेच ....तिथं पोहोचायला झाडझूडूपांतून वाट काढीत आम्ही पोहोचलो. आणि एव्हडे कष्ट घेतल्याचे सार्थक वाटले.
हेच ते जोगणमाई चे घरटे अथवा लेण...हे एक जैन लेणी असून इथे कधी मधि जैन लोक येतात अशी माहिती हिरामण रावांनी दिली. बाकि इतर वेळी कुणीच फिरकत नाही.
बाहेर च्या दालनाला २ कोरीव खांब असून आत गेल की उजवीकडे मांडीवर मूल घेउन बसलेली अशी एक स्त्री ची मूर्ति आहे. अणि डाव्या बाजूला भिंतीवर महावीरांची प्रतिमा कोरलेली दिसून येते.
आतले चौकोनी आकाराचे दालन ..त्यात कसलीही मूर्ति कोरीवकाम दिसून येत नाही.
या लेण्यातुन बाहेर आलो. हिरामण रावांना इथ जवळ असणारी अजुन दूसरी लेणी कुठे विचारताच स्वारी झुड़ूपातुन वाट काढीत पुढे निघाली. अणि ४ थ्या मिनिटात आम्ही त्या २ रया लेणी पाशी . .
बाहेर २ खांब कोरीव अन आत उजवीकडे बसायला दगडी बाकाची रचना ..आणि बाकी थोड खोल खोल टाक्या सारख कोरीवकाम.
ही लेणी पहायची तर एखादा स्थानिक महित्गर सोबत असने खुप गरजेचे .
हे सर्व बघून आम्ही वाट बनवत झाडा झुडुपातुन डोंगराच्या नायगाव कडील बाजुस पोहोचलो.....चालत गप्पा मारित हिरामण रावांचे करावे तितके कौतुक कमीच असून देखिल ते करीतच त्यांच्या झोपड़ी पाशी आलो. त्यांचे मनोमन आभार मानले. अणि मोटर सायकलला किक मारली.
वेळ – १० वा. ३० मि..... मागील तब्बल अडीच तास लोटला होता - किल्ला चढ़ाई , फेरी आणि उतराई हे सर्व मनसोक्तपणे पूर्ण झाले होते ....पाठमोर बघत या असाधारण असा सुतोंडा किल्ला नजरेत सामावून घेतच आम्ही नायगाव कड़े जाणारी परतीची वाट धरली. दगडा मातीच्या वाटेने नायगावमधी पोहोचलो.इथे गावात रस्त्या चे बाजूला ठेवलेली ही विष्णुमुर्ती पाहणे म्हणजे आजचा डब्बल बोनस !!
गावकरी कुतुहलाने जमा झालेले चौकशी करीत होते.आमची हौस एकून सगलेच लई खुश झाले.त्यातच दुधात साखर म्हणजे एक उत्साही गावकरयाने चला माज्या मागे म्हणत ........शेतातल्या वाटेने चालत एका मोठ्या प्राचीन बारव पाशी नेल. चौकोनी आकाराची , भिंती ढासळलेली , चारही बाजूंना प्रवेशद्वार आहेत तसेच अनेक कोरीव शिल्प दिसून आली.
सध्या गावातल्या लेकी सुना इथे धूण कराया वापर करतात.गाव वाल्या लोकांना थोड बारवेच्या जतन करण्या बद्दल विनंती केली....आभार मानले . आणि आमच्या सारखच भटकंतिला येणारे हौशी लोकांना ही बारव आवर्जुन दाखवा म्हणून आग्रह सुद्धा केला .योगेशने आजी सोबत फोटू काढायला सांगितलं आणि मी नाही म्हटलं असा कधी होत नाही .
ही बारव पहायली मिळण म्हणजे आजचा २ रा बोनस !
गाडीला टांग मारून बनोटी गावाला निघालो. तिथे समस्त गावकरी आमची वाट बघत होते. कारण ग्राम पंचायत ऑफिस ची किल्ली आतमध्ये सामान ठेवून आम्ही सोबत. नेलेली होती. ११: ३० वाजता तिथे पोचलो. ऑफिस उघडून आम्ही ब्यागा बाहेर काढल्या. बैग्स आवरून गाडीला बांधून टाकली.आता जाम भूक लागली होती. पण तसा वेळ नव्हता झालेला. त्यामुळ आम्ही पुढल्या किल्ल्यासाठी मार्गस्थ होणे चे ठरवले.
आम्हाला इथे रात्री मुक्कामाची सोय ज्यांनी करुन दिली असे श्री. बाप्पू साहेब चौधरी अणि इतर प्रेमळ गावकरी .....सर्वांचे आभार मानले. अशी मदत करणारी, पाहुण्यांचा असा पाहुणचार करणारी अशीच माणस नेहमी भटकताना भेटत्यात !! त्यामुळ कधीच कशाची फिकिर वाटत नाही. भले मग आपण कुठल्याही प्रदेशात भटकायला जावे .....आणि ही तर या “ श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशातली – श्रीमंत मनाची माणस ”.....
अपूर्ण !
ठळक वैशिष्ठ्ये -- संभाजीनगर (औरंगाबाद ) परिसरातील भटकंती तील २ रा आणि ३ रा किल्ला भ्रमंती - ---दिवस २
रा अणि ३ रा --- मोटरसायकल प्रवास – अंतुर
किल्ला – नागापुर -- गौताळा अभयारण्यातून औट्रम घाटाने –नागद गाव – महादेव टाका फाटा अर्थात ‘लोंझा किल्ला’ –पुन्हा माघारी
फाटा – नागद बनोटी रस्त्याने – बनोटी गाव –मुक्काम – बनोटी गाव – कच्च्या
रस्त्याने नायगाव – शेतातल्या वाटेने सुतोंडा किल्ला – नंतर पुन्हा माघारी –नायगाव
मार्गे – बनोटी गाव .-आणि पुढच्या किल्ल्याच्या दिशेने मार्गस्थ .
शनिवार ,२७ डिसेंबर २०१५ ... वेळ – दुपारचे १२ वाजले होते .
बनोटी गावातल्या आमचे यजमान गावकऱ्यांचे आभार मानले.आणि पुढच्या....... या वारीतल्या ४थ्या श्रीमंत किल्लाच्या ओढीने मोटार सायकल ला टांग मारली.इथला सुतोंडा किल्ला काही डोळ्यासमोरून जाईनाच्च !.....बनोटी –सोयगाव रस्त्याने भर उन्हात ,धुळीने सजवलेल्या अगदीच खराब अशा डांबरी ने गाडी धावत होती. मध्ये एके ठिकाणी मस्त चहा मारला .पुन्हा वाटेला लागलो.
सोयगाव च्या मुख्य चौकातून वेताळ वाडी किल्ल्या साठी उजवीकडे वळालो. तेथून ४ कि.मी. नंतर वेताळ वाडी गाव ओलांडून पुढे गेले कि डावीकडे एक डोंगर आहे.याच डोंगरावर वेताळ वाडी किल्ला वसवलेला आहे.
या डोंगराला वळणे घेत जाणारा हळदा घाट पूर्ण चढून वर गेलं कि डाव्या बाजूला डांबरी सडके ला लागुनच एक पायवाट किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला जाते.
आम्ही इथे २ वा .१० मिनिटांनी पोहोचलो. डावीकडे संपूर्ण किल्ला त्याचे भले मोठ्ठ्ले असे बुरुंज , तटबंदी ,प्रवेशद्वार आम्हाला खुणावत होते .
परंतु पोटात भुकेचा डोंब उसळला असल्याने आम्ही प्रथमतः जवळ कुठेतरी घर वगैरे शोधण्याचे आणि जेवण बनवण्याचे ठरवलं.जवळपास काही घर वगैरे किंवा माणस दिसणेही मुश्कील .हळदा गाव इथून २ कि.मी.दूर आहे .आणि त्या पायवाटेच्या कोपऱ्याला गाडी उभी करून किल्ल्यात जावून जेवण बनवणे आणि मग किल्ला पाहणे आणि तेही गाडी अशा निर्जन अशा ठिकाणी ...एक धोक्याचे वाटत होते .
मी योगेश ला सुचवलं कि मी थोडे पुढे डांबरी रस्त्याने जावून कुठे काही घर , माणसे दिसतात का ते पाहतो.त्याला तेथेच थांबवून मी पुढे गेलो.थोडे घाटाने आणखी पुढे गेलो. उजवीकडे एक शेतात माणसे आणि एक पडवीवजा झोपडं दिसलं.छायाचित्रात या शेताचा मालक कु. विठ्ठल जाधव. हळदा गाव.
बस्स ! होणार सोय ..म्हुणुन मी गाडीसकट तिथे पोचलो.बाजेवर बसलेले गृहस्थ दिसले रामराम ठोकून मी म्हणालो, “किल्ला बघाया आलोय. जेवण बनवायचं आहे .आडोसा पाय्ह्जे .जमलं का इथे ?.”....गाववाले , “हा ,चालतंय कि.ह्या सपारात बनवा जेवण ”..वाहः ," मी माझ्या दोस्ताला किल्ल्यापाशी थांबिवला आहे त्याला आलो घेऊन लगीच" म्हणालो .माघारी आलो तोवर योगेश वैतागून गेला होता.त्याला घेऊन शेतात पोहोचलो.
गाडीच्या ब्यागा काढून घेतल्या. त्यातलं स्वयंपाक साठीच्या वस्तू काढू लागलो . आणि योगेश ला जवळ कुठ पाणी होतं तिकडं हंडा घेऊन पाण्याला पाठवलं.
एवढ्यात गावावाल्यानी त्या
पोराला ते सरमाडाचे साप्पार (पडवी ) साफ कराया लावलं. हे असं असतंय बघा . जान ना पेहचान पण एवढी सेवा करत्यात हि
माणसं !
५ -१० मिनिटात योगेश पाणी घेऊन आला.
मी गेस पेटवून खिचडी भात बनवायची तयरी केली .आता योगेशला कांदा, गाजरं चिराय दिली . हां...ह्ये असंच असतंय ...भटकंतीवर असताना सगळ्यांना कामे समान वाटून घेऊन करावी लागतात.आणि करतात सुद्धा !! ....लई मज्जा येते .
पोटाची भूक भागवली आता या भटक्या मनाची भूक भागवायची होती.
४ वाजत आले होते. सोबत पाण्याच्या बाटल्या अन खाऊ घेऊन गाडी तिथच लावून आम्ही किल्लासाठी चालत निघालो . डांबरी सडकेने नंतर पायवाटेन किल्ल्याच्या या घाटच्या बाजूने असणाऱ्या मुख्य प्रवेश द्वारापाशी आलो.किल्ल्याचा व्याप मोठ्ठा आहे.
थोडं आत गेलं कि तसाच एक प्रचंड बुरुंज दिसतो .त्याला कला कुसर केलेली कोरीव सज्जा दिसून येतो. याच्या वरून इथवर पोचलेल्या शत्रूवर हल्ला करण्याचे प्रयोजन असावे बहुदा .
आमची तर दोघांची कशाचे फोटू काढू अनं कशाचे नाही असं होऊन गेलं होतं.या किल्ल्याच्या श्रीमंतीच्या दर्शनाची जोरदार सुरुवात झाली.
इथे चांगली फारस बंदी केलेली आहे .
समोरचं उभ ठाकलेले.....किल्ल्याचे उत्तर मुखी प्रवेशद्वार ....तोंडात बोटं घालायला लावणारं ....या द्वाराचे तोंड जंजाळा गावाकडे असल्याने याला ‘ जंजाळा दरवाजा ‘ असं म्हणत असं उल्लेख आढळतो. २० एक फुट उंचीचा जे भव्य द्वार ...वरती दोन्ही बाजूस शरभ शिल्पे कोरलेली दिसून येतात.
दाराच्या आतील बाजूस पहारेकऱ्यान्साठी देवड्या आहेत
.उजवीकडेच च्या देवडीत थोडं सांभाळून वर जाणाऱ्या जिन्याने आम्ही वरती गेलो. दरवाजाच्या वरील भागात प्रशस्त असे अनेक दालन आहेत .इथून खाली दरवाजा दिसतो.
दरवाजापासून थोडं आत गेलं कि त्या दरवाजावर असलेल्या छतावर जावून नंतर छतातून खाली उतरणाऱ्या छोट्या खाचेतुनहि आपण त्या मोठ्या दालनात पोहोचू शकतो.
इथूनच त्या एका मोठ्या बुरुजावर जाता येते. भोवतालचा विस्तीर्ण असा किल्ल्याचा परिसर दिसतो....सर्वात खाली वेताळ वाडी धारण......भक्कम पणे उभी अशी तटबंदी...
बुरुजावरून खाली उतरून समोरच थोडं उजवीकडे वर गेलो तिथे खराब पाणी असलेले तुटलेल्या खांबांचे टाके आढळले .
पुन्हा खाली आलो ..तटबंदी उजवीकडे ठेवून चालत निघालो. त्या बुरुजाला आत पोटात नेणारी वाट दिसते...पण आत खूप अंधार आणि वटवाघूळाचे साम्राज्य असल्याने तो विचार सोडला.
असेच पुढे चालत पूर्व टोकाशी असलेला बुरुंज पाशी पोचलो.....बुरुजातून सर्व बाजूंचा प्रदेश न्याहाळला ...दरी उजवीकडे ठेवून वरती चालत गेलो. आणि बालेकिल्ल्यात पोहोचलो. हा बालेकील्याचा पूर्व बुरुज ...या घुमट असलेल्या इमारतीच्या वर जाणाऱ्या वाटेने चढलो ,
तटबंदी वरून चालत पुढे गेलो.बालेकिल्ल्याच्या आत भागात भरपूर सीताफळाची झाडे वाढलेली आहेत.त्यामुळे आत फिरायला इथून वाट नाही. तसेच पुढे तटबंदी वरून मधल्या बुरुजापर्यंत जावे.आता आत खाली उतरलो....चालत गेलं कि जमिनीत बांधलेले एक तेल तुपाचे टाके दिसलं
. कुतूहलाने आत उतरून त्याची पाहणी केली.तसेच पुढे या टाक्याच्या बाजूला धन्य कोठाराची इमारत आहे.
पुरातत्व खात्याचा फलक असून इथे आतमध्ये व्यवस्थित निगा राखलेली दिसली.
याच्या समोर एक भग्न इमारत आहे.....पुढे गेलं कि नमाजगीर नावाची इमारत (मस्जिद ) आहे....इमारतीची बाहेरून वरती असलेली कोरीव कामे लक्ष वेधून घेतात..
.नमाज गिर च्या समोरचं एक मोठ्ठा तलाव आहे ....भक्कम अशी तटबंदी असलेला ...
आता आम्ही दरी उजवीकडे ठेवीत ....बालेकिल्ल्याच्या उत्तरेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागाकडे पुढे चाललो होतो....मध्येच डावीकडे एक भग्न इमारत आढळली...
त्यानंतर किल्ल्याचे उत्तर टोकाशी असणारी हि बारादरी ....एक इमारत .....दोन मोठ्ठ्या कमानी असलेली हि बारदरी .....किल्ले देवगिरी वरील बारादरी सारखीच ....काय मस्त भन्नाट वारे लागत होते इथं......
.
समोर खाली उतरणाऱ्या धारेने आम्ही बरोब्बर बारदरी च्या खालच्या टप्प्यात असणाऱ्या किल्ल्याच्या वेताळ वाडी गाव बाजूच्या मुख्य दरवाजाकडे गेलो.
खाली एक बुजलेले टाका दिसलं..जवळच एक ६ फुट १० इंच लांबीची तोफ आहे...उजवीकडे तटबंदी मध्ये एक चोर दरवाजा आहे. त्यातून थोडं खाली उतरून पुढली वाट बघून येण्याचा मोह काय आवरला नाही.
....शेवटी दाट झाडीने वाट अडलेली दिसली आणि मागे आलो...पुन्हा वर आलो .
डावीकडे किल्ल्याचा
वेताळवाडी गावाकडील भव्य दरवाजा आहे.
....पहिले उत्तराभिमुख प्रवेशद्वार ...याची कमानीची पडझड होत आहे...उंची २० फुट असून वरच्या बाजूस शरभ शिल्पे कोरलेली आहेत.
थोडं पुढं डावीकडे लगेच दुसरे प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असे......
.आतून दोन्ही बाजूस पहारेकर्यांच्या देवड्या आहेत.बाहेरून या द्वाराला डावीकडे एक थोडा लहान आकाराचा बुरुज आणि उजवीकडे मोठ्ठा ऊंच बुरुज उभा आहे.... त्या उजवीकडे च्या बुरुजावर हे असं शिल्प आढळून आले.
एकेक अशी किल्ल्यावरील सर्वच अत्यंत प्रेक्षणीय अशी सर्व स्थळ एव्हाना बघून झाली होती....या दरवाजा पासून खाली वेताळ वाडी गावात वाट उतरते. आपण त्या वाटेने वर येवून किल्ला बघून पुन्हा गावात असे हि करू शकतो ...नाहीतर आम्ही केले तसे....
आत्तापर्यंत आमचा किल्ल्याचा घाट कडील दरवाजा ,तिथली सर्व स्थळे ....बालेकिल्ला ..आणि उत्तरेकडील हा दरवाजा ...असं बघून झाले होते.
वेळ झाली होती – ६ वा .१५ मी....किल्ल्याच्या हळदा घाट बाजूकडील तटबंदी ने उरलेला फेरी पूर्णकरीत आम्ही तिकडच्या दरवाजा कडे निघालो.
आमच्या उजवीकडे आत्ता भास्कर राव हि आपली फेरी पूर्ण करण्याचं नियोजनात होते .
४ – ५ बुरुंज ओलांडून आम्ही घाट जवळच्या मुख्य दरवाजात आलो....पुन्हा त्या भव्य दरवाजा अन बुरुंजना नजरेत सामावून घेतलं काही फोटू काढले. साडेसहा वाजले होते. अंधार पडू लागला होता....
खाली पायवाटेने येताना पुन्हा पुन्हा हा प्रचंड विस्तार असलेला किल्ला वळून वळून पाहतच आम्ही डांबरी सडकेने ...हळदा गावाकडे पायी निघालो....रस्त्याकडेच्या शेतात पोहोचलो.
गप्पा मारीत आणि किल्ला दर्शनाने प्रफुल्लीत मनाने ब्यागा आवरल्या .गाडीला बांधल्या. शेताचा मालक तो मुलगा ...कु .विठ्ठल जाधव ....त्याला आणि दुपारी तिथे भेटलेल्या त्याच्या मामाचे आभार मानून आम्ही निघालो ....
वेळ मिळाल्यास आमच्या नियोजनात नसलेले असे रुद्रेश्वर लेणी जी वेताळ वाडीच्या पूर्वेला असलेल्या डोंगरात आहेत आता शक्य होणार नव्हती . त्यामुळे आम्ही या मोटारसायकल वारीतल्या ५ व्या आणि शेवट च्या श्रीमंत किल्ल्याच्या दिशेने निघालो.
पुढे २ कि मी वर हळदा गावात उंडणगाव साठीच रस्ता विचारून पुन्हा मार्गस्थ झालो.....अंधारातून पुढे जाताना जंगल वजा डोंगरातून वाट जाते. आमची गाडी २ -३ वेळा मागच्या चाकापाशी काहीतरी घासत असल्याच्या आवाजाने थांबिवली....थोडं दगडाने ठोकून चैन वरील कव्हर नीट केलं.आणि पुन्हा गाडी पळविली.असे छोटामोठ काही न काही होतंच असत.
पुढे उंडणगाव मध्ये गाडीत पेट्रोल भरले.आणि अंभई - नानेगाव – जंजाळा गावासाठी निवांत मोकळ्या अंधाऱ्या रस्त्याने मी गाडी हाकत निघालो. एकूण आजपर्यंत चा ३ दिवसांचा पूर्ण आठवणींना उजाळा देत गप्पा मारीत आम्ही दोघं मोठ्ठ्या आनंदात अंतर कापले जात होते.
त्यासोबतच आम्हाला आता जंजाळा उर्फ वैशागड किल्ल्याच्या जवळचे गाव जंजाळा इथे आजच्या मुक्कामाची सोय काय होतेय याची थोडीशी काळजी वाटत होती.
रस्त्याने लागणारी छोटी मोठी गावे थंडीमुळे गपगार झोपलेली दिसत होती . सडकेच्या कडेचे अंतर सांगणारे कि .मी.चे दगडआता आम्ही पोहोचलोय असेदाखवत होते. समोरचं गाव आणि उजेड दिसू लागला. रात्रीचे ९ वाजता आम्ही या रस्त्याचे शेवटचे गाव जंजाळा इथे पोहोचलो....
काही घरांपाशी शेकोट्या आणि गप्पांमध्ये मग्न गावकरी दिसले. किल्ल्याकडे जायचं असं म्हटल्यावर सरळ जा असं माहिती मिळाली.एके ठिकाणी घरापाशी ब्रेक लावला .४ -८ माणस गप्पांत गुंतलेली ....एकाने विचारले . “ किधर जाना है ? कहासे आये हो ”......आम्हा दोघांच्याही लक्षात होतं कि हे आपल्या मुस्लीम बांधवांच गाव आहे . असो ! आम्हाला फक्त माणसं आणि माणुसकी धर्म कळतो.आम्ही म्हणालं . “चाचा, किला देखना है .पुणे से आये है .आज रातकु किधर रहने का इंतजाम हो सकता है क्या ? और किधर दुकान है तो थोडा चावल चाहिये .खाना बनायेंगे ,सोयेंगे और कल किला देखके वापिस जायेंगे.”.....त्यांना सगळ्यांना आमचं जाम कौतुक वाटलं. एक जण उठलं आणि , “ आओ मेरे पीछे” म्हणून निघाले पुढे वाटेने .थोडं पुढं जिथं सिमेंट रोड संपतो.तिथल्या घरात ते गेले.घरातन पुन्हा बाहेर आले चावी घेऊन .आणि अजून लोकं बाहेर आली होती .समोरचं खोली उघडली आणि विचारले , “ ये है ...इधर राहो तुम.” ती खोली म्हणजे शेजारी त्यांचच किराणा दुकानआहे त्याची स्टोर रूम. त्या चाचा ने पोरीला खोलीत झाडू माराया लावलं .आम्ही लागलीच , “चाचा रहने दो .हम करेंगे”....पण व्यर्थ ! ....पोरींनी ते चांगल आवरलं ,झाडून घेतलं. आता चाचा ने दुसरी खोली म्हणजे दुकान उघडायला लावलं. काय ते पाहुणचार !....त्याची ती १२-१३ वर्षाची पोरगी सुद्धा आज्ञाधारक.दुकान उघडलं तिने. आम्ही तांदूळ , सकाळच्या साठी बिस्किटे वगैरे खरेदी केली.
नंतर चाचा च्या पोरींनी हंडा भर पाणी आणून दिलं.आम्ही ब्यागा गाडीवरून उतरवून खोलीत गेलो. ब्यागेतल्या गरजेच्या वस्तू काढल्या .स्वयंपाक ची तयारी करू लागलो. सटकून भूक लागली होती.
वेळ रात्रीचे साडेनऊ .....जेवणाची तयारी....
खिचडी भातावर यथेच्छ ताव मारला ....
जेवणा नंतर काही वेळ गप्पा मारल्या. गेले ३ दिवस एवढ्या लांब प्रदेशात आम्ही दोघंच भटकत होतो. हे सगळं एकदम मस्त चाललं होतं.भेटणारी माणसं, त्यांचे बाबत चे एक से बह्डकर एक अनुभव , हे अति भव्य किल्ले , त्यांची वेगवेगळी रूपं....अगदी थक्क करून सोडणारी ....आणखी भरपूर काही अनुभवत होतो.आम्ही . पण......आता उदया हा किल्ला बघून झालं कि ...हे सगळं संपणार.....परत आपल्या प्रदेशी !......मनात अनेक विचार घेऊन गारठलेल्या वातावरणात आम्ही अंथरुणात दडी मारली....
मोबल्याच्या गजराने पहाटे लवकर जाग आली. थोडं आळसानेच आणि उत्साहाने आम्ही महत्वाची कामे उरकू घेतली. नंतर दंतमंजन . हातपाय तोंड धुवून ...मी मस्त चहा केला ....त्यासोबत लई दिवसांनी टोस्टखात होतो.
रविवार २८ डिसेंबर २०१५ ...वेळ – सकाळचे साडेसहा.....
मोठ्ठ्या ब्यागा तिथेच खोलीत ठेवल्या .पाणी आणि खाऊ घेऊन ७ वाजता आम्ही किल्ल्याच्या दिशेने टांग मारली. इथून पुढे शेतातल्या वाटेने दगड माती तून आम्ही आमच्या वारीतल्या ५ व्या श्रीमंत किल्ल्या कडे जात होतो.
काय ती सोनेरी सकाळ !!..... गुलाबी थंडीत न्हालेली.... तिकडून ते काल आम्हाला निरोप दिलेले सुर्यनारायण आज पुन्हा आमच्या सोबतच त्येंसुद्धा कोवळे उन्ह घेऊन आज पुन्हा हजेरीला येत होते. शेतांमधी वाहणारी भन्नाट गार हवा ....सगळचं विलक्षण !!
या रांगेतल्या डोंगराच्या शेवटच्या टोकावर वसलेला किल्ला वैशागड आमच्या स्वागताला आकाशात जणू वेगवेगळ्या रंगांची उधळण करीत होता. आम्ही जवळ पोहचलो. किल्ल्याचे बुरुंज आणि तटबंदी दिसली . माहितीनुसार अलीकडच्या शेतात आम्ही एक तोफ शोधू लागली....आणि हीच ती....तोफ...८ फुट लांब अशी .....
तोफ बघून आम्ही गाडी पुढे दामटली .तटबंदी फोडून बनवलेल्या वाटेतून आम्ही गाडी घेऊन किल्ल्यात प्रवेश केला.....
आता उजवीकडेच तटबंदीत लपलेला चोर दरवाजा बघितला.इथून समोर पाहिलं कि दूर वेताळ वाडी किल्ला आणि धरण दिसते .
पूर्वेकडे अजून थोडं पुढे गेलो तर मोठ्ठाल्या झाडांमध्ये लपलेला किल्ल्याचा पूर्वाभिमुख दरवाजा दिसला.
तरीपण आम्ही तिथं जमेल तसे घुसलो.थोडी झाडे बाजूला सारून वाट करत पुढे गेलो .देवड्या शाबूत आहेत. मध्ये फरसबंदी ची वाट....तसेच भव्य असा २० फुट ऊंच दरवाजा नंतर थोडं खाली त्याचे दोन्ही बाजूला भव्य बुरुंज खालून दरवाजा दिसून येत नाही अशी ती रचना ...असे ते दृश्य .. मागे किल्ल्यात आलो ..पायवाटेने पुढे गेलं कि एक मोठ्ठा बांधीव तलाव दृष्टीस पडला.
तलाव ओलांडला ...डावीकडे तटबंदी मध्ये किल्ल्याचा उत्तराभिमुख असा ‘जरंडी दरवाजा ‘ लागला.तिथेही तसेच . सीताफळांच्या झाडांची गर्दी ...थोडं फांद्या बाजूला करून घेतल्या .
गडाच्या पश्चिमेकडून जरंडी गावातून इथे वाट येते. या जरंडी दरवाजाच्या बाहेरून वरती आढळून येणारे दोन ओळींचे हे शिलालेख ...
इथून पुढे गेलो.समोरच झाडांमध्ये एक इमारत आणि बुरुंज दिसला .तोही झाडांनी वेढलेला ....
तिथेच असलेल्या खिडकीतून वर गेलो ..आत शिरलो ..गचपण आहे ...अनेक कमानीचा हा राणीमहाल......आजूबाजूला इमारतींचे अवशेष दिसतात.गचपण मधून वाट काढीत त्या अवशेषांमध्ये फिरलों. त्यातून बाहेर आलो. .इथे आत बसून थोडी पेटपूजा केली. पाणी घेतलं .पुन्हा फेरी चालू.
उजवीकडे समोर उंचवट्यावर एक जतन केलेली इमारत आहे...ती म्हणजे तीन कमानींची मस्जिद ..
उंचवटा उतरून खाली आलो. वाटेवर एके ठिकाणी हि दोन शरभ शिल्पे ठेवलेली आहेत.
पुढे उजवीकडे एक तलाव आहे त्याला लागुनच सय्यद –अल –काद्री- या पीराची कबर आहे. येथे व्यवस्थित निगा राखलेली आहे.तिथेच फारसी भाषेतले तीन ओळींचे असे दोन शिलालेख कोरलेले दगड आहेत . त्या तलावाचे पाणी पिण्यास वापरले जाते.
समोर उजवीकडे पूर्वेस अजून एक मोठ्ठा तलाव आहे ..या तलाव पासून उजवीकडे तटबंदी च्या दिशेने गेलो.
तिथे भरपूर झाडांच्या गर्दीत हरवलेला पुर्वाभिमुख असा ‘वेताळ वाडी दरवाजा’ दिसला .वाट काढत त्याची फरसबंदी केलेली वाट, दोन्ही बाजूच्या देवड्या बघून पुढे बाहेर उतरणाऱ्या भव्य पायरीचे वाटेने खाली गेलो. तिकडून या प्रवेशद्वाराची भव्यता अजून उठून दिसत होती. वेताळ वाडी कडून या किल्ल्याला येणारी हि मुख्य वाट ....मस्त फोटू घेतले....तिकडून एके ठिकाणी तटबंदी वरती चढलो.आणि मग त्या द्वाराची रचना , त्याचे झाडामध्ये गडप झालेले बुरुंज ....किल्ल्याची लांबलचक धावणारी तटबंदी...सगळंच वेडावून टाकणारं असं दृश्य !....
या किल्ल्याची हि इतकी अनेक प्रवेशद्वार....त्याचे बुरुंज...!
आता या प्रचंड मोठ्ठ्या अशा विस्तारलेल्या किल्ल्या तली आमच्याकडील यादीनुसार सर्व ठिकाणे ,वास्तू, रचना शोधून हुडकून काढीत ....बघून झाल्या होत्या. ७ वाजेपासून सुरु झालेली ही भ्रमंती आता १०: १५ वाजता पूर्ण झाली होती.तरी देखील आम्ही यादी पुन्हा पुन्हा चाळून काही बघायचं राहील नाही ना याची खात्री करीत होतो. आणि आम्ही दोघेही अगदी हौशी....बघूया सगळंच म्हणणरे ....
आजची हि भल्या सकाळची किल्ले दर्शन फेरी तून आलेला शरीराला आलेला थकवा आणि लागलेली भूक भागवायला त्या मोठ्या तलावापाशी निवांत बसलो.
पेटपूजा केली. मस्त थंडगार पाण्याने हातपाय तोंड धुवून ताजेतवाने झालो....आणि महत्वाचे म्हणजे एकमेकांची क्लोज अप फोटोंची हौस केली....काय मज्जाच !! फक्त दोघे असले कि कसे कोणत्याही गोष्टीला लगेच तयार ....
बरोब्बर ११ वाजता किल्ल्यातून बाहेर पडलो.त्या शेतातल्या तोफेपाशी किल्ल्याचे भरपूर फोटू काढले ...आणि आमचेही...
५ वा आणि शेवटचा श्रीमंत किल्ला हि मनसोक्तपणे बघून झाला होता....आता पुढचे ठिकाण म्हणजे इथून शेतात वाटेलाच लागून खाली डोंगरात असलेली घटोत्कच लेणी....
हि बौद्ध लेणी पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून अलीकडेच ....खाली उतरून तिथं जाणारी पायऱ्यांची वाट बनवली आहे...
.लेणी कडे खाली जात असताना पलीकडच्या डोंगरात अर्धवट कोरलेली लेणी दिसली.
डोंगराच्या घळीत असल्याने पावसाळ्यात आजुबाजूंना धबधबे वाहतात.आणि गर्दी लोटते...मुख्य लेणी पाशी अलीकडे हि मूर्ती आहे....
बरोब्बर समोरछोट्या दालनात मोठी बुद्ध मूर्ती आहे....बाजूच्या भिंतीवरही अनेक बुद्ध मूर्ती कोरलेल्या आहेत. इ .सनाच्या ५ व्या शतकात हि लेणी खोदलेली आहेत असा उल्लेख आढळतो.
मुख्य दालनाच्या बाहेर बाजूला एक छोटे दालन आहे .
३० -४० मिनिटे इथे सर्व बघून घेतलं.काय बघू काय नको अशीच अवस्था ...
दुपारचे १२ वाजून ३० मिनिटे .- लेणी मनसोक्तपणे पाहून आणि पुढच्या नियोजनावर लक्ष केंद्रित ठेवून आम्ही माघारी गावाकडे निघालो.
खोलीवर आलो . कालचा उरलेला खिचाडी भात मस्त गरम करून ( परतून ) सटकून खाल्ला. भांडी घासून सगळ सामान भरले .ब्यागा आवरल्या.
आता या मोटारसायकल वारीची सांगता होणेची वेळ काही तासांवर आलेली होती. पण प्रवासाचा लांबचा पल्ला पार पडणे हा महत्वाचा भाग बाकी .... मोटारसायकलीची थोडीफार देखभाल करून घेतली..
.ब्यागा गाडीवर लादल्या. आमचे इथल्या मुकामाची सोय करणारे गफ्फार कुटुंबीय यांचे आभार मानले. चाचा शेतात गेले असल्याने भेट झाली नाही हि खंत.
छायाचित्रात गफार चाचांची ती दुकान चालवणारी , हुश्शार , आज्ञाधारक अशी सुकन्या !....सीमा गफ्फार ..अगदी उजवीकडे...
आमचा दोस्त दरम्यान त्या शेंबड्या पोरांसोबत फोटू काढणेत चांगलाच रमला होता. त्यांच्यात आम्हाला आमचं बालपणच आठवत हो....या बच्चेकंपनी सोबत ग्रुप फोटू घेतला आणि आम्ही या गावाचा निरोप घेतला.... सगळ्या आठवणींचा ,अनुभवांचा खजाना सोबत घेऊन आमची गाडी या गावातून बाहेर पडली खरे...पण आम्ही अजूनही तिथंच....मनाने...
नानेगाव –अम्भई – भराडी – मार्गे आम्ही सिल्लोड या तालुक्याच्या गावाला पोहोचणार होतो. मध्ये बोजगाव या छोट्या गावातल्या जि.प.शाळेपाशी थांबलो.
फोटू काढले.आमचा एक परम मित्र तिथे ४ -५ वर्षे शिक्षक म्हणून राहिला होता. सध्या तो आळंदी ला आहे ... आमच्या मित्राला अजून ती लोकं लक्षात ठेवून आहेत बर....त्याच कामच होत मोठ्ठं !..तिथे उपस्थित गावकऱ्यासोबत थोड्या गप्पा मारून पुढे निघालो.
नंतर वाटेनं कपाशी ची आणि आल्याची शेतं आमच्या दोन्ही बाजूने पळताना दिसत होती.
सिल्लोड मध्ये गर्रम चहा सुर्रके पियो केलं.आणि पुन्हा गाडी चे भुर्रर चालू...
संध्याकाळचे ५ वाजता संभाजीनगरात दाखल... वाहतुकीतून वाट काढीत आणि शहर न्याहाळत बाहेर पडलो.नंतर सलग ३ -४ तास गाडी दामटली. अ.नगर ओलांडून पुढे सुपे जवळच्या एका धाब्यावर जेवणाला थांबलो....
परतीचा प्रवास संपत आला होता. एक मोठ्ठ्या वारीचं , नव्हे आनंद सोहळयाच नियोजन सुफल संपूर्ण झाले होते. चिकन वर चांगलाच ताव मारला.फोटू हि काढला.
रात्री.१२ वाजता आळंदीत प्रवेश केला. आजच्या या परतीच्या प्रवासात....एकूण ३७० कि.मी.चा प्रवास करून तब्बल १२ तासांनी वारीची सांगता झाली....
गुरुवार ,२५ डिसेंबर २०१४ ते रविवार २८ डिसेंबर २०१४....४ दिवस....५ श्रीमंत किल्ले दर्शन !!...जवळ जवळ ३६०० छायाचित्रे .....एकूण ९१७ कि.मी.चा मोटारसायकल प्रवास ....
अशी ही आमची मोटारसायकल वारी....अगदी मनाप्रमाणे !....अहं अपेक्षेच्या कैक पटीने अधिक भन्नाट पार पडली.













































































































































































No comments:
Post a Comment