Sunday, December 1, 2024

दाऱ्या घाट

http://ahireyogesh.blogspot.com/2020/02/darya-ghat.html

    मी, छोटी चार्वी सोबत जितेंद्र खरे, सकाळी पळूत दाखल झालो तेव्हा आठ वाजेलेले. पुढच्या पंधरा मिनिटांत ठरल्याप्रमाणे राजेश मास्तर व शरद आणि अनिल भावांची जोडी पुण्याहून बाईकवर आली. 

      नियोजन होते ते दाऱ्या घाटाने वर जाऊन जमलच तर रिठ्याच्या दाराने खाली. पुढे वाघ्याच्या वाडीत गाडी लावून निघेपर्यंत साडेआठ होऊन गेले. २००६ मध्ये खुट्टेदार चढाई करून दुर्ग पठारवर मुक्काम मग दुसऱ्या दिवशी ढाकोबा टॉप करून मंदिरात मुक्काम तिसऱ्या दिवशी दाऱ्या घाट उतराई असा निवांत ट्रेक केला होता. हा प्रांत जवळचा त्यामुळे अधिकच प्रिय असल्यामुळे नंतर परत गणपती गडद,  दुर्ग, ढाकोबा दोन तीनदा जाणं झालेच. पुढे मात्र  इतर ट्रेक बाकी मोहिमा यात मागच्या दहा बारा वर्षात इथे येणं झालंच नाही. 

    वाघ्याच्या वाडीतून निघालो, वाटेतल्या घरात वाटेची खात्री करून पुढे सरकतो. तोच अनेक पायवाटा, ट्रॅक्टर डंपरच्या वाटा यात अक्षरशः गंडलो. या भागात नाणेघाट जीवधन पासून निघालेली रांग दोन चार खिंडी सारख्या भागातून उजवीकडे भल्या मोठ्या ढाकोबा पर्यंत. 

जीवधन आणि ढाकोबा पहावा तो या भागातून त्यांचे ताशीव बेसाल्टचे कडे, आभाळाला भिडलेले माथे, सारं डोळ्यात साठवायचे. 

यात ढाकोबाला लागून असणारी दाऱ्या घाटाची खिंड तशी ओळखीची त्यानुसार सुटलो सुध्दा. पण काय माहित ओढा अल्याड पल्याड की समांतर जावं यात उजवीकडच्या रानात अगदी मळलेल्या पायवाटेने शिरलो. जसं आत जाऊ लागलो तशी गर्द झाडी. 

सकाळच्या उत्साहपूर्वक थंड वातावरणात जोडीला पक्ष्याची किलबिल. पुणेकर मंडळी सकाळी चारच्या सुमारास निघालेली, साहजिकच नाश्तासाठी थांबावे तर लागणार. 

घरून सोबत आणलेला नाश्ता करत अर्धा तासाचा ब्रेक झालाच. रानातील वाट थोडी फार वर चढू लागली. गर्द झाडीत फार डोकं न चालवता वाट नेईल तसेच जात होतो, आता वाट वळेल.. पुढे वळेल.. पण दिशा पाहता ती थेट ढाकोबा कड्याखालच्या रानात जाते की काय... एका वळणावर थोडी उघडीप मिळाल्यावर डाव्या हाताला दाऱ्या घाटाची खिंड पाहून चक्रावलोच. जे वाटत होतं तेच झालं, थोडक्यात आम्ही मूळ वाटेच्या विरुध्द दिशेला.

   आता दोन पर्याय पहिला आल्या मार्गी परत जात पुन्हा सुरुवात करणे, दुसरा मागे जात त्या बाजूला जाणारी एखादी वाट पकडून मूळ वाटेला लागणे. वेळ पाहता पूर्ण मागे जाणे परवडणारे नव्हते. दुसरा पर्याय विचारत घेत काही अंतर मागे येताच खिंडीच्या दिशेनं लहानसा ओढा गेलेला दिसला त्यातून घुसखोरी करत मोठ्या ओढ्यात आलो त्या पलीकडे लागूनच आणखी एक मोठा ओढा हाच तो मुख्य वाटेवरील घाटाच्या खिंडीतून येणारा ओढा काही ठिकाणी अजूनही वाहते पाणी. 

पाण्याच्या बाटल्या भरून घेत शॉर्ट ब्रेक घेऊन निघालो. वेळ पाहिली अकरा या आधी दाऱ्या घाटाची चढाई आणि उतराई झाली असल्याने इथून वर जायला किती वेळ लागेल याचा अंदाज होताच त्यामुळे रिठ्याचं दार होण्याची शक्यता कमीच.

वाट ओढ्यातून झाडीत शिरून वर चढू लागली. तुरळक मग दाट झाडी पुढे दगडी वाट ओढ्यात आली. ओढ्यात सर्वत्र असतात तसे इथेही भले मोठ्ठे दगड धोंडे. याच मुख्य ओढ्याला अगल बगल देत कधी उजव्या बाजूने तर कधी डाव्या बाजूने अगदी व्यवस्थित मळलेली वाट. आमच्यातील अनिल आणि शरद मात्र मूळ वाटेच्या फंदात न पडता लहान मोठे धोंडे आणि बाजूच्या वॉल वर जात क्लाईंम्बिगची हौस भागवून घेत नाळेतून गेले. 

थोडे वर जाताच मागे वळून पाहता सरळ रेषेत पळू गाव तेथील तलाव त्या आसपासच्या लहान लहान वाड्या, खालच्या भागात असलेले दाट जंगल.    

      कारवीचा मोठा टप्पा पार करून पुन्हा वाट मुख्य नाळेत आली, इथून माथा आणि खिंड स्पष्ट दिसते तर उजवीकडे उंच आभाळात गेलेला ढाकोबाचा रौद्र असा कडा. आता काही अंतर नाळेतून फर्स्ट गिअरची चढाई. नाळ अरुंद होऊ लागताच खिंड समीप आल्याची जाणीव झाली. 

खिंडीत सरळ उभा शे दीडशे फुटांचा कडा पण वाट तिथून न जाता डावीकडून कड्यातून आडवी वळसा घेऊन खिंडीच्या माथ्यावर. 

या वाटेवर सुरुंग पेरून वाट रुंद केल्याच्या खुणा अजूनही व्यवस्थित दिसतात. याच ठिकाणी लहानशा उंबराजवळ पाण्याचं खळग. 

पाहिलं तर पाणी एकदम स्वच्छ. पाण्याचा बाटल्या टॉप अप करून खिंडीत असलेल्या देवाच्या ठाण्याजवळ जेवणाची पंगत मांडली. 

जेवण अर्थातच घरून आणलेले. घड्याळात पाहिलं तर पावणेतीन होत आलेले जेवण उरकून झटपट जरी निघालो तरी खिंडीतून आंबोली बाजूला उतरून डावीकडच्या डोंगराला वळसा घालून पुन्हा छोटी चढाई मग पुढच्या खिंडीतून होती रिठ्याचं दाराची उतराई. आंबोली गाव तसे नजरेत पण तिथून पुढे मुख्य रिठ्याचं दाराची सुरूवात तिथवर जायला आम्ही होतो तिथून किमान एक तास सहज लागणार, आता पर्यंतची झालेली दमछाक त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे उशिरा झालेली सुरुवात आणि वाट चुकल्यामुळे लागलेला वेळ यामुळे अल्पपरिचित अशा रिठ्याच्या दाराने न जाण्याचा निर्णय घेतला. कारण नवीन वाटेला भिडताना अचानक अनेक सरप्राइज येतात त्याला सामोरं जाण्यासाठी हाताशी वेळ हवा, अन्यथा ना घाटात.. ना गावात..     

    आजूबाजूला गर्द झाडी असलेल्या खिंडीत गार वारा. खरे साहेबांनी निवांत पडी मारली, चारूताई बाजूला वाटीत ठेवलेला शेंदूर त्यात पुन्हा पाणी टाकून काहीबाही खेळत होती, राजेश मास्तर फोटोग्राफी तर पवळे बंधू उजवीकडे ढाकोबा कडील कातळकड्यावर खाचाखोचा शोधत पार वरच्या बाजूला गेले. फुल्ल रिफ्रेश होऊन, चारच्या सुमारास पुन्हा आलो तसं दाऱ्या घाट उतरायला सुरुवात केली. खरंतर निघावे असं वाटतंच नव्हतं पण काय करणार..     

        आडव्या ट्रेव्हर्सी वर उंबरा जवळ पुन्हा गार पाणी भरून घेत वळसा मारुन खिंडीत आलो. या पाण्याचा फायदा झाला नाहीतर पाण्यासाठी कदाचित आंबोलीच्या वाडीत जावं लागलं असते. तसा पाण्याचा राखीव साठा होता पण घाटाच्या चढाई किंवा उतराई वेळी पाणी पूर्ण हवेच, कधी कुठे अडकून वेळ कशी येईल सांगता येत नाही. नाळेतून उतराई पुन्हा मोठा कारवी टप्पा इथे चारू विचारू लागली, 'बाबा आपण तर दुसऱ्या वाटेने उतरणार होतो ना, काय हे पुन्हा या झाडीत घेऊन आलास'..  

कारवी तिच्या उंची पेक्षा ही उंच साहजिकच त्यात ती पूर्ण झाकून जात काहीशी वैतागली. परिस्थिती सांगत तिची समजूत काढली. हा कारवीचा टप्पा उतरून पुन्हा वाट नाळेत. 
आधी म्हणालो तसा या ठिकाणी उतरताना वाट कड्याच्या डावीकडून इथेच एके ठिकाणी खोदलेल्या पावठ्या. 

घाटावरील देव, कातळ फोडून वाट बांधल्याचा खुणा या पावठ्या या सर्व गोष्टी वाट पुरातन असल्याच्या पुरावा. नाणेमावळातील ‘कुकडेश्र्वर’ ‘फांगळे’ ‘आंबोली’ ‘भिवाडे’ भागातून कोकणात ‘सिंगापूर’ ‘पळू’ ‘सोनवळे’ येथे जोडणारा हा प्राचीन मार्ग. कधी काळी येथून गाडी मार्ग करायचा मनसुबा होता अजूनही अधून मधून या बद्दल वावड्या उठतात. असो...    

     नाळेतून बाहेर येत उजवी मारली आता उतराई होती मिश्र झाडीचा टप्पा वेळ पाहत अंधार पडायच्या आत या रानातून बाहेर पडायचं हेच टारगेट. मध्येच चार्वी किरकिर करू लागली. 

काय झाले? काय गडबड? काहीतरी विचारून, खरे साहेबांनी तिला गोष्ट सांगायची सुरूवात केली त्यात गुंग होऊन झटपट उतरत पावणेसातच्या सुमारास रानातून बाहेर आलो. 

आता पुढे होती ती मळलेली सपाटीवरील चाल. जवळपास अर्धा तासानंतर ट्रॅक्टर जाईल असा कच्चा रस्ता लागला पण तो सरळ वाघाची वाडी अथवा इष्ट्याची वाडीकडे न जाता जास्तच उजवीकडे सरकू लागला. खिंड मागे पडून जीवधनच्या दिशेला जातोय की काय वाटू लागले. पुढे जात वाट वळली व दिशेचा अंदाज घेत ती वाट सोडून मळलेली पायवाट घेतली. दूरवर कुठल्या तरी वाडी मधील दिवे लुकलुकत होते. काही अंतर जात वाट खालच्या टप्प्यात आली. एक मोठा ओढा ओलांडून पुन्हा डावी मारली पलीकडे येतो तर वाटच गायब, पुन्हा माघारी येतो तर तोच ट्रॅक्टर वाला रस्ता फिरून आलेला. टॉर्च प्रत्येकाकडे असल्यामुळे फार त्रास नव्हता. पण तरीही या भुलभुलैया तून लवकरात लवकर बाहेर पडणं गरजेचं. त्यात सकाळी जिथे गाडी लावली त्या घरातील आजीने सांगितलेला काही महिन्यांपूर्वी याच भागात घडलेला बिबट्याचा प्रसंग आठवला. तसेही या भागातील त्यांच्या अस्थित्वाच्या बातम्या कधीतरी वर्तमानपत्रात येत असतात. यात आणखी भर म्हणजे हे सगळं पाहून चार्वीचा संयम सुटला. “अंधार झाला, बाबा आपण रस्ता चुकलो, घरी जायला उशीर, होमवर्क राहिला, उद्या स्कूल आहे, टीचर ओरडणार” असं काहीतरी बोलत रडू लागली. पुन्हा धीर देत समजावत पुढे सरकत होतो. एके ठिकाणी व्यवस्थित घर नजरेच्या टप्प्यात आल्यावर ती थोडी शांत झाली. तिथवर जायचं हेच उद्दिष्ट्य पण सरळ जाता येईल तेव्हा ना.. पुन्हा लहान खुरट्या झुडुपाचा भाग तो झाल्यावर ओढ्यातील दगड गोटे एके ठिकाणी छोटा बंधारा आडवा आला. पुन्हा मागे येत अचूक पायवाट पकडून पुलाजवळून एकदाच रस्त्यावर आलो. घराच्या दिशेने आवाज दिला तर प्रतिसाद नाही. भर अंधारात कुणीही नाही. थोड्या अंतरावर मंदिराचा दिवा. नक्की कुठल्या वाडीत आलोय यासाठी जाऊन पाहिलं तर कळलं.. सिंगापूर. इथून काट्याची / इष्ट्याची वाडी, वाघाची वाडी अंदाजे दोन अडीच किमी अंतरावर. पुन्हा चालायचं म्हंटल्यावर चारूताई ने ठिय्या आंदोलन पुकारले. आता कुणीतरी चालत जाऊन गाडी घेऊन येणं असं ठरवलं. पाच दहा मिनिटं थांबतो तर एक बाईकवर एक जण येताना दिसला, त्याला थांबवत वाघाच्या वाडीत सोडायची विनंती केली. कुठून आले? काय झाले? विचारपूस केल्यावर त्यात छोट्या चार्वीला पाहून तो लगेच सोडायला तयार झाला. चार्वी आणि मी जेव्हा वाडीत गेलो तेव्हा तिथली मंडळी आणि त्या आजी आमची वाटच पाहत होत्या. "लहान मुलीला घेऊन एवढ्या दूर गेलात, रात्र झाली तरी पत्ता नाही, आमच्या जीवाला चित्त नाही.. काय झालं.." त्या साऱ्या मंडळीला आमची काळजी, निव्वळ त्या पायी तिथली दोघं मुलं टॉर्च घेउन आम्हाला शोधायला घाटाच्या पायथ्याशी गेली आहेत हे ऐकून तर कसतरी वाटलं. त्यांना शांत करत चारूताईला तिथे सोडून, गाडी काढून चौघांना घ्यायला परत सिंगापूरात.

    आल्यावर सर्वांना सकाळ पासून घडलेला सारा प्रसंग सांगितला. काही वेळाने ती दोघे मुलं परतली ते सांगू लागले, "आम्ही तुम्हाला बॅटरी घेऊन येताना पाहिलं किती आवाज दिला तुम्हाला कळलं नाय काय?" आता काय बोलणार त्यांची काळजी रास्त होती. रात्रीची वेळ त्यात या भागात बिबट्याचं सावट असल्यानं खुद्द गावकरी अंधार पडल्यावर भटकत नाहीत. असो....आजीने चारूताईला अंघोळीसाठी गरम पाणी, आम्हाला कोरा चहा ज्याची गरज होतीच मग इतर अनेक विषयांवर गप्पा. यावेळी राहिलेलं रिठ्याचं दार करायचं आहेच त्या वेळी पुन्हा येण्याचे कबुल करून वाडीतील प्रेमळ ग्रामस्थांचा निरोप घेतला… 

गेल्या काही वर्षात उदंड झालेले फार्म हाऊस त्याला जोडणारे कच्चे रस्ते, अनेक ढोरवाटा, त्यात ओढ्यात काही ठिकाणी नव्याने बांधलेले बांध. जोडीला काही अंशी वृक्षतोड यामुळे उलट आमचा मुख्य वाट शोधण्यात वेळ गेला. आपण कितीही नियमित फिरणारे असलो तरी वेळेचं भान हवंच. तिथला प्रदेश तेथील स्थानिक गावकरी यांची मतं, काळजी युक्त सल्ले हे निश्र्चितच सकारात्मक दृष्टीने घ्यायला हवं. वाटा काय किंवा गड किल्ले काय कुठेही पळून जात नाहीत, आपली सुरक्षितता सर्वात महत्त्वाची. यावर ट्रेक मध्ये कुठंतरी वाचलेली गोष्ट मला आठवली. 

Come home alive.

Summit if possible.

Have a fun.

किती साधं सोपं आहे ना.....

                                               योगेश चंद्रकांत अहिरे. 

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...