http://narendralakhan7.blogspot.com/search?updated-max=2017-10-02T23:35:00%2B05:30&max-results=10&start=6&by-date=false
२०१७ मॉन्सून ची पहिली ट्रेक :
संच : धवल , श्रेयस , रोहन , शशांक , विग्नेशा , अनिकेत , राहुल , महेश , अविनाश , रुपश्री , नरेंद्र .
किल्ले "रामसेज"
रविवार दिनांक : २ जुलै २०१७
![]() |
| रामशेजचे भव्य द्वार |
२०१७ मॉन्सून ची पहिली ट्रेक :
राजगड
ते तोरणा ट्रेक मार्च मध्ये झाला आणि ट्रेकवारी थांबली. असे वाटत होते की
मोठा काळ लोटून गेला . मध्ये अनेक संधी आल्या पण त्या साधता आल्या नाही .
येता पावसाळाच मुहूर्त घेऊन येतो कि काय असे वाटत होते आणि अगदी तसेच झाले .
ट्रेक साठी किल्ला ठरला ! " रामसेज " .
![]() |
| धुक्यातील रामशेज , पहाटे ६ वाजता |
काही
किल्ले हे निसर्ग सौन्दर्यासाठी तर काही किल्ले त्यांच्या दूर्गमते मुळे
प्रसिद्ध असतात . काही किल्ल्यांवर आपल्याला अचंबित करणारे
वास्तूशास्त्राचे नमुने पाहण्यास मिळतात तर काही किल्ल्यांचा इतिहास
आपल्याला त्यानां पाहण्यासाठी आकर्षित करतो . रामसेज हा असाच एक किल्ला आहे
जो मराठ्यांच्या शेवटपर्यंत झुंजणाऱ्या स्वभावाची साक्ष देतो . किल्ला
पाहताक्षणी खूप लहान वाटतो पण त्याचा इतिहास खूप पराक्रमी आहे .
संभाजी
महाराजांच्या काळात रामसेज हा असा किल्ला होता ज्याने मोगलांशी जवळजवळ
साडे पाच वर्षे सतत झुंज दिली . एका अज्ञात किल्लेदाराच्या शौर्याने हा
किल्ला साडेपाच वर्ष लढवला गेला. ऐतिहासिक कागदपत्रांत रामशेजच्या
किल्लेदाराचे स्पष्ट नाव सापडत नाही, परंतु बहुतांश इतिहासकारांच्या मते,
सूर्याजी जेधे हे रामशेजचे किल्लेदार होते. रामसेजच्या लढाईने
किल्ल्याच्या किल्लेदाराचे कार्यही इतिहासात अजरामर केले आहे. मुघल
इतिहासात आणि संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कादंबर्यांमध्ये व
पुस्तकांत या लढाईचे वर्णन वाचायला मिळते.
‘रामसेज’ या शब्दाचा अर्थ :
‘रामसेज’
या शब्दाचा अर्थ ‘रामाची शय्या’ असा होतो. वनवासात असताना भगवान श्रीराम
यांनी याच डोंगरावर काही दिवस मुक्काम केला होता. त्यामुळे प्राचीन
काळापासूनच या डोंगराला व किल्ल्यालाही ‘रामसेज’’ हे नाव मिळाले आहे.
कल्याण ते रामसेज :
सर्व
पाऊलची मंडळी रात्री १२ वाजता वेळेवर कल्याणला पोहचली . श्रेयसच्या
हायटेक नियोजनामुळे ट्रेन पकडण्यापूर्वी एक तास अगोदर आम्हाला रिजर्वेशनचे
तिकीट मिळाले . २ दिवसापूर्वी ठरलेल्या ट्रेकला रिजर्वेशन डब्बायत बसून
प्रवास करायचा म्हणजे मोठी चैनेची गोष्ट ! जनरल डब्ब्यातील दाटीवाटीचा ४
तासाचा प्रवास हुकला असल्याने सगळे कसे विमानाचे तिकीट मिळाल्या सारखे
आनंदित होते. पुढे कल्याण स्टेशन वरील साखरपाणी सदृश्य चहा पिऊन ट्रेकची
सुरुवात झाली आणि रात्री १. १५ ची हटिया मेल पकडून आम्ही पहाटे ४ वाजता
नाशिक रोड स्टेशनवर पोहोचलो . नाशिक रोड स्टेशन ते जुना " सिबीएस एसटी
स्टॅन्ड " असा ११ किलोमीटर चा प्रवास रिक्षाने केला. सिबीएस एसटी
स्टॅन्डवर डेपो नियंत्रक अगदी वेगळ्या लकबीने स्थानकावर लागणाऱ्या
गाड्यांची माहिती सर्वांना देत होता . पहाटेच्या शांत वातावरणात
तो कानठळ्या बसणारा आवाज मात्र खूप जाचक होता . पण आम्ही सर्वजण त्या
जाचाला ना जुमानता विनोद करत होतो . पहाटे ५.३० ची पेठ गावी जाणारी पहिली
एसटी पकडून आम्ही रामसेज कडे निघालो . गडावरजात असल्याने एसटी वाहकाने
आम्हाला आशेवाडी फाट्यापुढे अगदी आशेवाडीगावाच्या तोंडावर सोडले आणि गडावर
जाण्यासाठी मार्गदर्शन पण केले. तेव्हा पहाटेचे ६ वाजले होते .
रामशेजचे दर्शन आणि ट्रेकची सुरुवात :
पहाटेचे
वातावरण प्रसन्न होते आणि सर्वत्र हिरवळ होती . नुकताच जोराचा पाऊस पडून
गेला होता आणि पहाटेच्यावेळी रामसेज किल्ल्याचा माथा धुक्यांनी वेढला गेला
होता . किल्ला पाहताच सर्व खुश झाले कारण धुक्यातल्या रामसेज एका
अविस्मरणीय ट्रेकची जणू चाहूल करून देत होता. बरेचसे किल्ले सह्याद्रीच्या
दर्याखोर्यांत व घनदाट झाडींमध्ये आहेत . रामशेज किल्ला मात्र यास अपवाद
ठरतो. नाशिकच्या जवळ असलेला हा किल्ला मैदानी प्रदेशात आहे. छोटेखानी
किल्ला पाहून आमच्या मनात प्रश्न आले कि ६०० मावळे घेऊन हा किल्ला साडेपाच
वर्षे कसा लढवला गेला असेल ? आणि लाकडांचे दमदमे कोठे उभारले गेले असतील
?
किल्ल्याच्या
प्रवेशद्वारासारखी दिसणाऱ्या एका कमानीतून रामसेजकडे जाणारा मार्ग जातो .
डांबरी रोडवर गप्पा मारत आम्ही पुढे जाऊ लागलो . वाटे मध्ये मोरांचे ओझरते
दर्शन ही झाले . पुढे सिमेंटनेच्या पायर्या बांधल्या आहेत. पायर्या चढत
असताना रामशेज किल्ल्याचा घेर आपणास समजून येतो. जास्त वेळ न काढता लवकरच
आम्ही एका छोट्या गुहेजवळ पोहोचलो जेथे शंकराची पिंड आहे , पुढेच गडावर
जाताना वाटेत एक गुहा लागते. या गुहेमध्ये रामाचे मंदिर आहे. गुहेच्या
खालच्या बाजूस एक पाण्याचे टाके दृष्टीस पडते जेथे आम्हाला एका सर्पराजाचे
ही दर्शन झाले. पावसाळ्यात ते टाके पूर्ण भरून जाते. त्यातील पाणी
पिण्यायोग्य आहे. येथे प्रभू श्री रामाचे आम्ही दर्शन घेतले आणि धवलने
रामसेजचा विस्तृत इतिहास आम्हा सर्वांना सांगितला.
गडावर पाहण्यासारख्या गोष्टी :
१. गडमाथ्यावर आलो कि समोर दिसतो तो विस्कळीत अवस्थेतील गुप्त दरवाजा . येथून समोरचा मुलुख दृष्टीक्षेपात येतो
२. डावीकडे
भगव्या ध्वजाजवळ जाताना पाण्याची टाकी आणि वाड्याचे अवशेष दिसतात
. ध्वजस्तंभ हा किल्ल्याच्या मुख्य बुरुजावर उभारलेला आहे. या ठिकाणी उंच
कडा आहे. खाली आशेवाडी गाव दिसते.
३. गडमाथ्यावरून उजवीकडे जाणार्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर खाली गडाचा मुख्य दरवाजा आहे. दरवाजा भव्य आहे.
४. थोडे वर चढल्यावर आपण एका सपाटीवर येऊन पोहोचतो. येथे पाण्याची दोन टाकी आणि एक मोठा तलाव आहे
५. थोडे आणखी वर चढून गेल्यावर आपण एका देवीच्या मंदिरापाशी येऊन पोहोचतो.
६. सर्वोच्य गडमाथ्यावर जाण्यास पुढे जास्त वेळ लागत नाही . गाद पाठारावर आपणास आजूबाजूचा परिसर न्याहाळता येतो .
रामशेज
पाहताना एक गोष्ट मात्र ध्यानात येते की, या किल्ल्याची रचना ही साधीच
आहे. परंतु तरीही मराठ्यांनी साडेपाच वर्षे हा किल्ला झुंजत ठेवला होता,
यावरूनच त्यांच्या पराक्रमाची प्रचिती येते.
संक्षिप्त इतिहास :
शिवाजी
महाराज्यांच्या निधनानंतर मराठेशाहीचा सहज पराभव करता येईल, या उद्देशाने
औरंगजेबाने शहाबुद्दीन फिरोजजंग या सरदाराला महाराष्ट्राच्या मोहिमेवर
पाठवले होते. त्या काळात नाशिक व आसपासचा प्रांत मुघलांच्या ताब्यात होता.
सरदार पहिला फिरोजजंग : औरंगजेबाचा
सरदार फिरोजजंग रामशेजवर चाल करून आला, तेव्हा किल्ल्यावर केवळ ६०० मावळे
होते. चार-पाच तासांत किल्ला ताब्यात घेऊ, असा फिरोजजंगचा उद्देश होता.
त्यासाठी त्याने अनेक युक्त्या लढवून हल्ला चढवला. वेढा कडक केला, सुरुंग
लावले, मोर्चे बांधले, तसेच लाकडी दमदमे तयार करून त्यावर तोफा चढवल्या.
तरीही रामशेज हाती येत नव्हता. गडावरच्या मावळ्यांनी गोफणीच्या दगडांच्या
साहाय्याने प्रतिकार चालू ठेवला होता. किल्लेदाराने चहुबाजूंनी मुघली
सैन्यावर हल्ले चढवले. मुघलांचे मनसुबे धुळीस मिळवले गेले. मग वेढा
फोडण्यासाठी संभाजीराजांनी रुपाजी भोसले व मानाजी मोरे यांना ५ ये ७
हजारांची फौज पाठवली. युद्ध झाल्यावर मात्र मुघलांना माघार घ्यावी लागली.
फिरोजजंग किल्ल्याचा वेढा सोडून जुन्नरला निघून गेला.
सरदार दुसरा बहादूरखान :
नंतर औरंगजेबाने बहादूरखानाला रामशेजला पाठवले. किल्ला जिंकण्यासाठी
त्याने मांत्रिकाचा अवलंब केला. परंतु त्यास अपयश आले. मुघली सैन्याचा धीर
मात्र सतत चार वर्षांच्या अपयशाने खचून गेला होता. बहादूरशहाने संतापून
रामशेजच्या पायथ्याशी बरीच जाळपोळ केली.
सरदार तिसरा कासिमखान किरमानी :
औरंगजेबाने कासिमखान किरमानी या सरदाराला अखेरीस रामशेजच्या मोहिमेवर
पाठवले. परंतु तोही अपयशाचा धनी ठरला. एवढा छोटासा गड मराठा, सैन्याने
तब्बल 65 महिने अजिंक्य ठेवला होता!
मस्ती मज्जा आणि रामसेज :
जसे
कल्पनेत होते त्या पेक्षा रामशेज हा वेगळाच होता . साधासोपा पण
प्रयत्नांची पराकाष्ठा करुन किल्ला अभेद्य ठेवणे हे साधे सोपे मुळीच नाही .
आम्ही सर्वच किल्ल्याला भेट देऊन खूप खुश झालो . पाऊस वारा आणि गाढ धुके
गडमाथ्यवर होते . सोसाट्याचा वारा आणि पाऊस अंगावर घेऊन सर्व सुखावले होते .
गडावर फार काही अवशेष शिल्लक नाहीत पण जे काही आहे ते भविष्यात रामसेजच्या
इतिहासाची साक्ष देत उभे राहावे असे मनोमन वाटते .
आपला
नेहमीचा मित्रांचा संच सोबत असला की ट्रेकची मज्जा ही वाढतेच . सर्व
ट्रेकर्स बद्दल काय बोलावे ? थकवा आणणारा ट्रेक ही आपल्या मित्रांसोबत सोपा
होऊन जातो . गप्पा गोष्टी आणि जुन्या ट्रेक आठवणी नेहमीच मला आवडतात. राम
मंदिरातील भरपेट नाश्ता आणि धुक्यातील स्वच्छंद फोटोग्राफी नेहमीच आठवणीत
राहणारी असेल . अर्ध्या दिवसात झालेला हा ट्रेक आम्हा सर्वासाठीच ह्या
पावसाळी ऋतूची चांगली सुरुवात आहे .
संच : धवल , श्रेयस , रोहन , शशांक , विग्नेशा , अनिकेत , राहुल , महेश , अविनाश , रुपश्री , नरेंद्र .



























No comments:
Post a Comment