http://narendralakhan7.blogspot.com/search?updated-max=2018-03-10T16:28:00%2B05:30&max-results=10&start=4&by-date=false
९ - १० सप्टेंबर २०१७
हरिश्चंद्रगड आणि भूतकाळातील आठवणी :
जेव्हा भटंकती आणि ट्रेकिंगची माहिती
नव्हती तेव्हा एक पुस्तक माझ्या हाती सापडले होते . त्यात हरिश्चंद्रगड
आणि कोकणकड्याचे सुंदर वर्णन होते . कोकणकड्यावर दिसणारे इंद्रवज्र आणि
सह्याद्रीच्या महादेवाच्या मंदिराचे खूप मोहक वर्णन त्या पुस्तकात होते .
ट्रेक्स सुरू केल्यावर मला समजले की हरिश्चंद्रगड म्हणजे हौशी ट्रेकर्सची " पंढरी " आहे
. २०१४ च्या हिवाळ्यात जेव्हा हरिश्चंद्रगड आणि कोकणकड्यास भेट दिली
तेव्हा मला निसर्गाचे मंत्रमुग्ध करणारे रूप दिसले .उरात धडकी भरवणाऱ्या
आणि " सह्याद्रीचे रौद्रभीषणसौन्दर्य " असे बिरुद असलेल्या कोकणकड्याच्या
प्रेमात मी पडलो . महादेवाचे सुंदर हेमाडपंथी मंदिर आणि पाण्याचा बारमाही
विसृतसाठा असल्यामुळे २ दिवसांच्या ट्रेक साठी ही पूरक जागा आहे .
सह्याद्रीच्या कुशीतली ही माझी आवडती जागा बनली आहे .
 |
| हरिश्चंद्रगडावरील मंदिर |
 |
हरिश्चंद्रगडावरील मंदिर : दक्षिण दिशा |
हरिश्चंद्रगड संक्षिप्त माहिती :
ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर
माळशेज घाटाच्या डावीकडे एक पर्वतरांग आहे जी बालाघाटची रांग म्हणून ओळखली
जाते. या पर्वत रांगेच्या सुरुवातीलाच हरिश्चंद्रगड आहे . हरिश्चंद्रगड हा " कळसुबाई - हरिश्चंद्रगड अभयारण्य "
क्षेत्रात आहे . हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक
पाश्वर्भूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या
हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्नीपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. मुख्य
हेमाडपंथी मंदिराच्या मागे असणार्या गुहेमधील चौथर्यात चांगदेव ऋषींनी'
चौदाशे वर्ष तप केलं आहे असे स्थानिक गावकरी म्हणतात. हरिश्चंद्रगडाचे शिखर
तारामती नावाने ओळखले जाते. १७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी
मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती
केली. हरिश्चंद्रगड समुद्र सपाटीपासून १४२४ मीटर उंच आहे . गडावर
जाण्यासाठी तीन चार वाटा सध्या प्रचलित आहेत. खिरेश्वरकडून जाणाऱ्या
वाटांमध्ये तोलारखिंडीची वाट , नळीची वाट , साधले घाट आणि बालेकिल्ल्याची
वाट येते. अहमदनगर राजूरकडून जाणारी पाचनईची वाट येते. त्यापैकी
पाचनईकडून जाणारी वाट ही सोपी आहे. पण खिरेश्वरकडून जाणाऱ्या वाटा जास्त
आव्हानात्मक आहेत .
 |
| हरिश्चंद्रगडावरील मंदिर |
 |
| हरिश्चंद्रगडावरील मंदिर आणि सप्ततीर्थ परिसर |
 |
| एक सुंदर टेन्ट |
९ सप्टेंबर २०१७ :
९ सप्टेंबर !
माझ्या बाबांचा वाढदिवस ! ते नेहमीच मला ट्रेक्ससाठी पाठिंबा द्यायचे.
त्यामुळे ह्या दिवशी हरिश्चंद्रगडला जाणे माझ्यासाठी खूप खास होते.
हरिश्चंद्रगडाचे सौन्दर्य प्रत्येक ऋतूमध्ये अनुभवण्यासारखे असते. रमा
दादाच्या विशेष प्रयत्नांमुळे पावसाळ्यात हरिश्चंद्रगडाला जाण्याचा योग्य
जुळून आला . ह्यावेळी पाचनईच्या मार्गे जाण्याचे ठरले . रात्री शेवटची
कसारा ट्रेन पकडून आम्ही १४ जण एका खासगी गाडीने राजूर मार्गे पाचनईला
पोहोचलो . ह्यावेळी सर्वच ट्रेकिंगमध्ये मुरलेले सवंगडी होते . अनेकांची
हरिश्चंद्रगडाला येण्याची दुसरी खेप होती . पावसाळ्यात हरिश्चंद्रगडाचा
अनुभव चांगलाच असणार ह्याबद्दल सर्वांना हमी होती . पहाटेच आम्ही पाचनईला
भास्करदादाच्या घरी पोहोचलो. गडावर आमची व्यवस्था सुखकर जावी ह्यासाठी
आम्ही भास्करदादास टेन्ट आणि जेवणाबद्दल सुविधा करण्यास सांगितली . भास्कर
दादा हा ट्रेकर्स साठी काही नवीन नाही . भास्कर दादा हा पश्चिम घाटातील
सर्वोत्तम वाटाड्यांपैकी एक आहे . थोड्याश्या विश्रांती नंतर फक्कड चहा
पिऊन आम्ही ट्रेकला सुरुवात केली . पहाटेचे वातावरण हिरवेगार होते आणि
समोरच दिसणारा धबधबा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता . कोणता डोंगर पार केला
की हरिश्चंद्रगडाच्या मंदिराचे दर्शन घडेल ह्याचा विचार करत करत मी धवल
मागोमाग चालू लागलो.
 |
| पाचनई गाव :
प्रवासाची सुरुवात ( अभि - वैशू - राजू - सोनल - भाग्यश्री अनिकेत -
विग्नेशा - रोहन -रमाकांत - नरेंद्र - सचिन- राहुल - भास्कर दादा - धवल ) |
 |
| " कळसुबाई - हरिश्चंद्रगड अभयारण्य " क्षेत्र |
सचिन लांडे आणि आडवाटेचा रास्ता :
अभि आणि वैशूचे लग्न झाल्यावर आम्ही पहिल्यांदाच एकत्र एका ट्रेक मध्ये
भेटलो . त्यांच्याशी गप्पा मारत आम्ही सर्व एका छोट्या पठारावर आलो . येथे
येण्यासाठी एक दम भरवणारी चढण पार करावी लागली. उजव्या बाजूला जाणारा
रस्ता कपारीकडे जाणाऱ्या जिन्यांकडे जात होता . गडावर जाणारा धोपट मार्ग
तोच होता पण लांडे साहेबांनी डाव्या बाजूने जाणारा आडवाटेचा रस्ता धरायचे
ठरवले . खरे तर श्वास फुलाला होता आणि हृदयाचे ठोके पण वाढले होते त्यात
आडवाटेने ज्याचे म्हणजे मोठा लॉंग कट होणार ! कष्टपण वाढणार ! अश्या
वातावरणात मी , रमा दादा आणि विग्नेशाने आडवाटेला न जात नेहमीच्या वाटेने
जाण्याचा मिश्किल हट्ट धरला . पण आमचा हट्ट फार काळ टिकला नाही . ट्रेक
म्हणजे नवीन वाटा सावधपणे चोखंदळून पाहणे आणि नवीन वाटांचे नवीन अनुभव
गाठीशी बांधणे होय. ४ जण असो किंवा १४ जण, सर्वांनी एकाच वाटेने जायचे
हा नियम आम्ही पाळला. आम्ही सर्व मताने आडवाटेने गेलो आणि घनदाट जंगलात
वाट कापत कपारीजवळ पोहोचलो . सकाळच्या उन्हात पाचनई गाव फार सुंदर दिसत
होते . साल्हेर किल्ल्याची आठवण ह्या कपारीतून जाताना आली . भविष्यात
कॅम्पिंग साठी उत्तम जागा हेरून आम्ही गडाकडे चालू लागलो
 |
| पाचनई गावाचा सुंदर नजारा |
 |
| कपारीतून दिसणारा सुंदर धबधबा |
 |
| आडवाटेवरील सुंदर फुल |
अडवाटेच्या पुढचा सुखकर प्रवास :
एरव्ही टंगळमंगळ न करता , जास्त फोटोग्राफीसाठी वेळ न घालवता गडमाथ्यावर
पोहचायचे असा हेतू असतो . ह्या वेळी मात्र सरळसोट साधा रस्ता मिळाल्याने
प्रवास सुखकर झाला होता आणि छोट्या ओहोळापासून ते पाण्याच्या मोठ्या
पात्रात आम्ही डुबून धमाल केली. चालताना पण दमछाक झाली नाही. पाऊस नव्हता
पण छोट्या छोट्या धबधब्यांचे शिंतोडे मनाचा थकवा दूर करत होते. मधेच
लागलेल्या ओढ्यामध्ये पाय बुडवले की असे वाटत होते की पुढे न जाता
ओढ्याच्या पाण्यात लोळत पडावे . सोनल आणि भाग्यश्रीने येथे जी धमाल केली
आहे ती अवर्णनीय आहे . धमाल मस्ती करून आम्ही पुढे चालू लागलो . एक चढण
चढून गडमाथ्यावर आलो आणि जगातले सर्वोकृष्ठ नजारे दिसण्यास सुरुवात झाली .
ढगांनी अर्धे झाकलेले उंचच उंच कडे आणि त्यावरून वाहणारे ढग जणू आम्हाला
स्पर्श करून जात आहेत असा भास होत होता . समोरचे पर्वत कधी स्वच्छ दिसत
होते तर कधी क्षणातच दाट धुक्यानी झाकोळून जात होते . धुक्यांचा तो
लपंडावाचा खेळ न संपणारा होता. पठारावरची सोनकीच्या फुलांचा पिवळा गर्द
गालिचा आणि त्यामागील धुक्यांची झालर असा नजारा स्वप्नवत होता . वाऱ्यासोबत
सोनकीची फुले छान डोलत होती. कास पठारावर गालिचे पाहायचे जे हुकले ते येथे
पाहावयास मिळाले ह्याचा आनंद फार झाला .
 |
| सोनकीच्या फुलांचा गालिचा |
 |
| धुक्यांचा लपंडाव |
 |
| गडमाथ्यावरील पठार |
 |
| सोनकीच्या फुलांचा गालिचा |
हरिश्चंद्रगडावरील मंदिर :
पठारावरून पुढे जाताना आम्हाला झुपकी कारवी
दिसली . झुपक्या करावीला फुले ही १२ वर्ष नंतर येतात असे समजले .
रोहनला हरिश्चंद्रगडावरील जैव विविधतेबद्दल खूप माहिती होती. कंदीलपुष्प
नावाचे एक फुल हे ह्याच परिसरात सापडते असे रोहन ने सांगितले आणि त्याला
ते पाहण्यास ही मिळाले . पुढेच आम्हाला मंदिराचे व त्याच्या सोनेरी कळसाचे
दर्शन झाले . कळसाचे पहिले दर्शन मनाला खूप सुखदायी होते . मंदिरात
शंकराची एक पिंड आहे जिच्यावर कुणीतरी माळलेला हार व फुले घालून मनोभावे
पूजा केलेली होती. मंदिरावरील कोरीवकाम हे विरळ होत चालले आहे परंतु
लक्षवेधी आहे . गडावर मंगळगंगेचा उगम आहे असे म्हणतात जी पुढे नदीचे स्वरूप
घेते . मंदिराच्या दक्षिण दिशेस शेंदूर फासलेला सुंदर गणपती आपले लक्ष
लगेच ओढून घेतो . मंदिर परिसरात अनेक गुहा असून त्यामध्ये आपण राहू शकतो .
मंदिर परिसरातील टाकीत जे पाणी आहे ते अत्यंत सुमधुर आहे. मंदिराच्या
मागे असणार्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्यात जमिनी खाली एक खोली
आहे, यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत ’चांगदेव ऋषींनी’ चौदाशे वर्ष
तप केलं होते अशी स्थानिक गावकर्यांची श्रध्दा आहे. श्री चांगदेवांनी
येथे तपश्चर्या करून ’तत्वसार’
नावाचा ग्रंथ लिहिला. येथे एक शिलालेख आहे असे मी वाचाले आहे पण तो मला
पुढच्या वेळी पाहावा लागेल कारण त्या बद्दलची माहिती आत्ताच वाचनात आली .
 |
| हरिश्चंद्रगडावरील मंदिर |
 |
| मंदिरात शंकराची पिंड |
 |
| दक्षिण दिशेस शेंदूर फासलेला सुंदर गणपती |
तीर्थकुंड:
अनेकजण मंदिराजवळ असणाऱ्या तीर्थकुंडातील देवळ्यांमद्ये फोटो काढतात .
आम्हीही ही संधी सोडली नाही . तीर्थकुंडातील पाण्यात देवळ्यांचे आणि
तारामती शिखराचे सुंदर प्रतिबिंब दिसते . तीर्थकुंडात डिसेंबरअखेरपर्यंत
पाणी असते. येथील चौदा देवळ्यांमध्ये चौदा विष्णुमूर्ती विराजमान होत्या
असे वाचनात आले. तीर्थकुंडासमोर छोटेखानी मंदिर असून, ते काशितीर्थ नावाने
ओळखले जाते.
 |
| तीर्थकुंडातील देवळ्यांमद्ये फोटो |
 |
| तीर्थकुंडातील १४ देवळ्यां |
 |
| तीर्थकुंडातील १४ देवळ्यां |
 |
| तीर्थकुंडातील देवळ्यांमद्ये फोटो |
गणेश गुहा :
तारामती
शिखराच्या पायथ्याला ९ लेणी आहेत . ही लेणी दहाव्या किंवा अकराव्या
शतकातील असावीत असा अंदाज आहे .सहा फुट उंचीची भव्य गणेशमूर्ती जी दिगंबर
अवस्थेत आहे अशी गणेश गुहा येथे आहे . दिगंबर अवस्थेतील गणपतीची मूर्ती खुप
दुर्मिळ असते असे म्हणतात. भास्करदादा
आणि सावळादादा ह्यांनी आमची राहणायची सोय याच गणेश गुहेत केली . आमचे
सामान एका भिंतीजवळ रांगेत रचून आम्ही थोडा वेळ निवांत पडून राहिलो .
दुपारी खूपच भूक लागली होती . सावळादादा आणि वहिनी ह्यांच्या हातचे जेवण
खूप छान होते . दमून भागून आल्यानंतर जे जेवण मिळते त्याची गोडी वेगळीच
असते. जेवल्यानंतर आम्ही ४ च्या सुमारास कोकण कड्यावर गेलो .
 |
| दिगंबर अवस्थेतील गणपतीची खुप दुर्मिळ मूर्ती |
 |
| दुपारचे जेवण |
 |
| कांदे पोहे : पाचनई |
कोकणकडा आणि भ्रमनिरास :
कोकणकडा म्हणजे हरिशचंद्र गडावरील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध आकर्षण आहे
.संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो
आनंद आहे तो अवर्णनीयच आहे. अगदी लोटांगण घालून कड्याच्या ३०००
फुटापेक्षाही जास्त खोलीच्या अंदाज घेताना जी उरात धकडी भरते ती आपण
लिहून सांगू शकत नाही . बाह्यबाजूने हा चंद्रकोरी सारखा अर्धवर्तुळाकृती
आहे . कोकणकड्याची सुंदरता , त्याची भीषणता , त्याचे भय आणि त्याठिकाणवरून
सृष्टीचं जे विलोभनीय दर्शन घडते ह्याचा अनुभव ज्याला येतो त्याला
निसर्गाच्या चमत्कारासोबत एक नाते तयार होते. तेच नाते त्याला कोकणकड्यास
पुन्हा पुन्हा भेट देण्यास भाग पाडते . पावसाळ्यात मात्र येथे ढग आणि
धुक्यांचे सावट होते. कोकणकड्याच राखट आणि कणखर रूप पाहायचे असेल तर
पावसाळा हा योग्य कालावधी नाही . प्रचंड धुक्यात नवख्या माणसाला
कोकणकड्याची विस्तृतताही समजणार नाही. ह्या वेळी सोसाट आणि बेभान वारा
प्रचंड वेगाने अंगावर येत होता . कोकण कड्यात टाकलेला रुमाल ही आकाशी झेप
घेऊन पुन्हा आपल्याकडे येईल इतकी शक्ती वाऱ्यात होती . माझा भगवा पटका मी
कड्यात झोकावला पण आकाशात उंच जाऊन पुन्हा कोकणकड्यात विलीन झाला .
सर्वांनी खूप धमाल केली आणि फोटो काढले . तुषारने गमतीने अर्ध्या मिनिटाचा
व्हायरल डान्स पण केला . परत पुढल्यावेळीस येऊ असे म्हणून आम्ही
गणेशगुहेकडे निघालो .
 |
| भगवा पटका कोकणकड्यात पडल्याचा आनंद - वैशू - विग्नेशा - लांडे आणि एक प्रवासी मित्र |
 |
| पाऊल ट्रेकर्स |
 |
| पाऊल ट्रेकर्स |
गणेशगुहेतील रात्र :
त्याच दिवशी रात्रीचे पिठले भाकरी - लोणचे -
भात आणि चवळीच्या भाजीची जी चव होती ती या पुढील अनेक ट्रेक मध्ये लक्षात
राहणारी असेल हे नक्की !रात्री बाहेर पाऊस खूप असल्याने आम्ही गणेश गुहेतच
टेन्ट मध्ये राहण्याचा निर्णय घेतला . स्टे ट्रेकचा अनिवार्य भाग म्हणजे
रात्री झोपण्याआधी भुताखेतांच्या गोष्टी सांगणे आणि ऐकणे . भुतांवर विश्वास
नसला तरी आणि त्या गोष्टी पूर्वी सांगितल्या गेल्या असल्या तरी त्या नव्या
पद्धतीत सांगण्याचे काम आम्ही सर्वांनी केले. माझ्या टेन्ट मध्ये धवल -
सोनल - भाग्यश्री - अनिकेत - राहुल - राजू - विग्नेशा अशी मंडळी गप्पा
मारायला आली. आली कसली आम्ही त्यांना आमंत्रणच दिले होते जणू ! ह्या वेळी
भुताखेतांच्या विषयाबरोबर अजून एक विषय आला . विषय होता कि "पहिले प्रेम " ... ! सर्वांनी आपली पहिली प्रेम कहाणी सांगितली तेव्हा कळले की विषयाचे नाव " अधुरी प्रेम कहाणी "
असे असते तरी चालले असते कारण आमच्या पैकी पहिल्या प्रेमाचा झेंडा
लग्नापर्यंत कुणीच रोवलेला नव्हता ! काही हरकत नाही. अपयश हि यशाची पहिली
पायरी असते असे समजून चर्चेस आलेली मंडळी आपापल्या टेन्ट मध्ये झोपण्यास
गेली . माझ्या टेन्ट मध्ये अनिकेत - राहुल आणि राजू ह्यांनी झोपायची
चांगली सोय केली होती . मला मस्त गाढ झोप लागली . काही मंडळींना रात्री
घोरणाऱ्या मंडळांनी त्रास दिला अशी बातमी सकाळी समजली.
 |
| नरेंद्र - रोहन - सावळादादा - सचिन आणि वाहिनी |
केदारेश्वराची गुहा आणि परतीचा प्रवास :
सकाळी लवकर उठून आम्ही परतीचा प्रवास सुरु केला . हरिश्चंद्राच्या मंदिरात
पुन्हा महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही केदारेश्वराकडे निघालो. केदारेश्वराच्या
गुहेत एक मोठे शिवलिंग आहे . येथे ४ खांब होते परंतु आता फक्त १ खांब
आपणास पाहायला मिळतो . ह्या गुहेत कंबरभर पाणी असते. हे पाणी अतिशय थंडगार
असते . अनेक जण ह्या सुन्न करणाऱ्या पाण्यातून महादेवास अर्ध प्रदक्षिणा
घालतात . गुहेतील पाणी अशुद्ध होऊ नये म्हणून या गुहेतील पाण्यात पोहणे
किंवा उतरणे व्यर्ज करण्याची विनंती करण्यात आली आहे . आपण कोणत्याही गड
किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्यांमध्ये पोहू नये ही विनंती खूप रास्त आहे
. आपण सर्वांनी हा नियम पाळला तर आपल्या सर्व गडावर पिण्याच्या पाण्याचा
साठा स्वच्छ राहील . गड उतरताना एका डोहात मस्त डुबून सर्व ताण आणि थकवा
विसरवून आम्ही पाचनईत उतरलो ते पुन्हा हरिश्चंद्राचे दर्शन व्हावे
ही इच्छा मनात ठेवून.
 |
| केदारेश्वराची गुहा |
 |
| गड उतरताना एका डोहात |
टीम
: धवल , रमाकांत , रोहन , वैशाली , अभिनव , विग्नेशा , तुषार , राहुल
,सचिन , भाग्यश्री , सोनल , अनिकेत , राजू (मंगेश) , नरेंद्र
 |
| गड उतरताना एका डोहात |
 |
| तुषार : HD |
 |
| थोडीशी मस्ती |
 |
| नरेंद्र रविंद्रनाथ लाखण |
नरेंद्र रविंद्रनाथ लाखण .
No comments:
Post a Comment